'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

चंद्रपूरच्या दुर्गम भागात EARTH चे काम सुरु

जिवती हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक आदिवासी गाव. एका टिपिकल आदिवासी गावात आढळणाऱ्या समस्या याही गावात पाहायला मिळतात. या समस्यांवर उत्तर शोधण्याच्या उद्देशाने डॉ. कुलभूषण मोरे (निर्माण ५) याने जिवती मध्ये EARTH (Education, Action & Research in Tribal Health) ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे.
आदिवासींशी संवाद साधून जनजागृतीचं, आरोग्यशिक्षणाचं काम कुलभूषण आणि त्याची मित्रमंडळी करतात. या कामाचा भाग म्हणून भूषण, अनिकेत, मानसी आणि कुलभूषण या चार डॉक्टरांच्या चमूने फेब्रुवारी महिन्यात जिवतीमधील तीन आदिवासी गावांमध्ये शिबीर घेतले. शिबिराच्या आदल्या दिवशी त्यांनी लाम्बोरी गावात ग्रामसभा घेवून गावातील आदिवासींशी संवाद साधला.
शिबिरादरम्यान तपासणी करताना भूषण देव
त्यांच्या चर्चेतून प्रामुख्याने पाण्याची कमतरता, वैद्यकीय सेवेचा अभाव, शिक्षणाचा प्रश्न आणि तंबाखूचा प्रश्न प्रामुख्याने समोर आले. गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. रोजचे वापराचे पाणी दुरून भरून आणावे लागते. शेती फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तसेच गावात तंबाखू सेवनाचे प्रमाण अतिशय जास्त आहे. चर्चेदरम्यान लक्षात आले की साधारणपणे ३०० लोकसंख्येच्या या गावात सुमारे २१० जण तंबाखू खातात आणि वर्षाकाठी गावाचे सरासरी २२ लाख रुपये फक्त तंबाखूवर खर्च होतात. हा आकडा सर्वांनाच धक्का देऊन गेला.
आरोग्याच्यादेखील अनेक समस्या आढळून आल्या. मासिक पाळीदरम्यान महिलांना चार दिवस घराबाहेर झोपावे लागते, गावातील प्रसूती अजूनही दवाखान्यात होत नाही. महिलांच्या आरोग्याच्या समस्या प्रामुख्याने जाणवल्या. लाम्बोरी प्रमाणेच टाटाकवडा आणि बुरी-यसापूर या गावांमध्ये देखील याच समस्या आढळून आल्या.
या शिबिराबद्दल बोलताना मानसी म्हणाली, “दुसऱ्या दिवशी चौघांनी जेव्हा आरोग्य केंद्राला भेट दिली तेंव्हा कळले की गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच एका आदिवासी महिलेची प्रसूती आरोग्य केंद्रात यशस्वीरित्या पार पडली होती. तीन वर्षे गावात जाऊन केलेल्या संवादाचा, आरोग्य शिक्षणाचा प्रभाव हळू हळू होऊ लागला हे जाणवते.”
कुलभूषणला EARTH च्या कामासाठी शुभेच्छा !
स्रोत: मानसी अंबारे, premanasi@gmail.com

No comments:

Post a Comment