'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

परिवर्तनासाठी प्रेरित करणारे संवादाचे सॉल्ट (SALT)

आंबेडकर वस्तीत केलेल्या कामाच्या अनुभवाबद्दल वाचूया जुई जामसंडेकरच्या (निर्माण ५) शब्दांत...
“निर्माण प्रक्रियेदरम्यान विविध सामाजिक संस्थाना भेटी देताना, त्यांचे काम समजावून घेताना, आता आपणही काही प्रत्यक्ष कृती करावे असे वाटत होते. या दरम्यान माझ्या कंपनीमधील (झेन्सार) CSR विभाग आणि आम्ही काही कर्मचाऱ्यांनी पुण्यातील आंबेडकर वस्ती मध्ये जाऊन काहीतरी काम करावे असे ठरले. खराडीमधील या गरीबवस्तीत ४००-४५० कुटुंब राहतात. या वस्तीतील घरांना भेट देवून लोकांपर्यंत पोहचायला आम्ही सुरवात केली.
या कामासाठी आम्ही SALT (Stimulate people, Ask questions, Listen to them, & Transfer Knowledge) ही पद्धत वापरली. ‘लोकांना संवादातून जागरूक करणे व स्वतःची उत्तरे स्वतः शोधायला मदत करणे’ हा या कामाचा प्रमुख उद्देश आहे. १५ दिवसातून कमीतकमी एकदा भौगोलिक नकाशाचा वापर करून वस्तीतील एकेका घराला आम्ही भेट देतो. दर भेटीच्या वेळी काही आधी भेट दिलेली आणि काही नवी घरे निवडली जातात. प्रत्येक SALT व्हिजीट दरम्यान त्या घराचा Data बनवला जातो. ज्यामध्ये घरात राहणारे एकूण लोक, त्यांचा व्यवसाय, शिक्षण, तसेच त्यांच्या चांगल्या आणि वाईट गुणांचीही नोंद केली जाते. प्रत्येक भेटीनंतर ही माहिती आम्ही एकमेकात शेअर करतो. या चर्चेतून वस्तीतील प्रमुख समस्या कोणत्या, त्यावर काय उपाय होऊ शकतील याची स्पष्टता येते.
            या सगळ्या दरम्यान जाणवले की वस्तीतील लोक सुरवातीला खूप समाधानी आहेत असे वाटते. त्यांचा सुरवातीचा सूर तक्रारींचा अजिबात नसतो. जसे की नवरा दारू पिऊन मारहाण करतो यात त्या घरातील महिलेला काहीही चुकीचं वाटत नव्हतं, घरातील जवाबदारीमुळे शिक्षण सोडवं लागल्याची वस्तीतल्या एका तरुण मुलीला अजिबात हुरहूर जाणवली नाही. मात्र जशा जशा या भेटी होत गेल्या आणि संवाद वाढला तसे लोक स्वतःच्या समस्या स्वतःच ओळखू लागले आहेत आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करू लागले आहेत असे प्रकर्षाने जाणवले.
या उपक्रमातून वस्तीतील समस्यांवर काम होतेच आणि सोबतच आमचेही खूप सारे शिक्षण होते. वस्तीतील या संवादातून मी तिथल्या बुजुर्ग व्यक्तींकडून संयम, महिलांकडून आपुलकी, समजूतदारपणा या गोष्टी शिकले. तर लहान मुलांशी बोलून प्रचंड उर्जा मिळाली. माझ्या वैयक्तिक अडचणी, प्रश्नांना सामोरे जाताना या अनुभवाची मला खूप मदत होते. त्यामुळेच या पुढेही एकमेकांच्या मदतीने सगळ्यांचाच विकास करण्याचा हा प्रयत्न कायम चालू राहिल अशी खात्री वाटते.”
 
आंबेडकर वस्तीमध्ये जुई व सहकारी

स्रोत : जुई जामसंडेकर, jui.jams@gmail.com

No comments:

Post a Comment