'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 31 August 2014

सीमोल्लंघन जुलै-ऑगस्ट २०१४

सौजन्य : निखील जोशी, josnikhil@gmail.com

या अंकात...

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
निर्माण ६ ची बॅच जानेवारी २०१५ मध्ये सुरू होत आहे...

माळीण शोकांकिका आणि भविष्यासाठी धडे
३० जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस कधी थांबतोय याची वाट पाहत बसलेले आंबेगाव तालुक्यातील माळीण  गाव एकाएकी डोंगरावरून आलेल्या चिखलाच्या प्रचंड लोंढ्यात गाडले गेले. ४४ घरांत असणाऱ्या दीडशेहून अधिक जणांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही..  येथे अनेक समाजसेवी संस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. सदानंद कुरुकवाड (निर्माण ५) यानेही या कामात सहभाग घेतला. या मदत कार्यादरम्यान त्याला आलेले अनुभव त्याच्याच शब्दात

मुक्त व्यापार आणि भारतीय शेती

अव्दैत दंडवतेला सामाजिक कृतज्ञता निधीचे मानधन सुरू

सजल कुलकर्णीचे पुढचे संशोधन जर्नल ऑफ बायोसायन्स डिस्कवरी मध्ये प्रसिद्ध !

सोनाळे गावच्या स्वच्छतेच्या प्रवासात सुरुवातीपासूनच वाटसरू व्हा...

मेळघाटातील मुलांच्या शिकवणीची केमिस्ट्री...

१८ वा हिंद पाक दोस्ती मेळा जल्लोषात साजरा

हरळी, सोलापुर येथील ज्ञान प्रबोधिनीच्या प्रकल्पावर  ५ निर्माणींचे काम....

आणि व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न सुरु. . .

Professional शिक्षण घेऊन सामाजिक योगदान देण्याचा मार्ग !

माविम फ़ेलोशिपसाठी ऋचा व सागर  गडचिरोलीत दाखल!

चिन्मय वराडकरचे जालन्यातील पाणीप्रश्नावर काम सुरु

इंजिनिअर्ससाठी खुला होतोय Appropriate Technology मार्ग

पुस्तक परिचय – Social intelligence – by Daniel Goleman

निर्माणीच्या नजरेतून – जुगाडमेंट

Saturday, 30 August 2014

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

निर्माण ६ ची बॅच जानेवारी २०१५ मध्ये सुरू होत आहे. निर्माणच्या प्रसिद्धीसाठी यावेळी प्रामुख्याने ‘रंगीत पोस्टर्स’ या माध्यमाचा उपयोग करण्यात आला. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्राभरातील १७० कॉलेजेसमध्ये निर्माणचे पोस्टर्स  लागले. सर्वांना मनापासून धन्यवाद !
या वेळी निर्माण प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांतील व महाराष्ट्राबाहेरील सुमारे ३५० जणांनी अर्ज भरला आहे. मुलाखतीही सुरू झाल्या आहेत. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मुलाखती पूर्ण होऊन २ ऑक्टोबरला निर्माण ६ साठी निवड झालेल्या युवांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. मुंबई, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली इथे मुलाखती होणार आहेत. यादरम्यान शक्य तेंव्हा मुलाखती घ्यायला आणि मुलाखत घेणाऱ्या टीमला भेटायला नक्की या.
यावेळी निवडीसाठी अर्ज व मुलाखतींसोबत एक नवी पद्धत वापरण्यात येत आहे. अर्ज व मुलाखत यांच्याद्वारा आपल्याला त्या व्यक्तीची काही प्रमाणात झलक मिळते. मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यात तिच्यासोबत काम केले तर तिच्याबद्दल अधिक विश्वासार्ह माहिती मिळते. ज्यांनी अर्ज भरला त्यांच्यातील काही निवडक युवांना ‘गडचिरोली जिल्हा तंबाखूमुक्ती अभियाना’अंतर्गत लोकजागृती करण्यासाठी गडचिरोलीत बोलावण्यात येत आहे. ही मुले सध्या गावागावांत शाळांमध्ये जाऊन तंबाखूचा विषय घेत आहेत. गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बोलून त्यांच्या सहभागाने गावांत तंबाखूमुक्तीचा कृती कार्यक्रम ठरवत आहेत. त्यांनाही यादरम्यान निर्माण बद्दल अधिक जाणून घेता येते. एका सामाजिक प्रकल्पात योगदान देण्याची संधी मिळते आणि नयी तालीम पद्धतीने त्यांचे शिक्षणही होते.
            निर्माणच्या आजी-माजी-भावी विद्यार्थ्यांची पहिली बॅच तंबाखूविरुद्ध जनजागृती करण्यासाठी गडचिरोलीच्या खेड्यांत पोहोचली आहे. महाराष्ट्रात सुगंधित तंबाखूच्या विक्रीवरील बंदीची अंमलबजावणी गडचिरोलीतील तत्पर प्रशासकीय अधिकारी, सर्च व गडचिरोलीतील अन्य स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकाराने धडाक्या सुरू आहे. या अभियानाला सर्चतर्फे पुढे नेण्यासाठी अजिंक्य कुलकर्णी (निर्माण ६) सर्चमध्ये रुजू झाला आहे. अभियानाचे नियोजन करणे, आरोग्यशिक्षणासाठी साहित्य विकसित करणे इ. कामांमध्ये सर्चमधील निर्माणचे युवा आपले योगदान देत आहेत.

            जर निम्मा जिल्हा तंबाखूपदार्थांचे सेवन करत असेल तर हा प्रश्न कसा सोडवावा? आपले सुझाव नक्की द्या.

माळीण शोकांकिका आणि भविष्यासाठी धडे

(३० जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस कधी थांबतोय याची वाट पाहत बसलेले आंबेगाव तालुक्यातील माळीण  गाव एकाएकी डोंगरावरून आलेल्या चिखलाच्या प्रचंड लोंढ्यात गाडले गेले. ४४ घरांत असणाऱ्या दीडशेहून अधिक जणांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही..  माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या दुर्घटनेची भारतात घडलेल्या दरडींच्या सर्वात भयंकर घटनांमध्ये नोंद झाली. येथे अनेक समाजसेवी संस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. सदानंद कुरुकवाड (निर्माण ५) यानेही या कामात सहभाग घेतला. या मदत कार्यादरम्यान त्याला आलेले अनुभव त्याच्याच शब्दात)
 १ ऑगस्ट रोजी सकाळी whatsapp मधील एका ग्रुप मध्ये massege आला की, 'पुण्यातून Di-MaRF (Disaster Management and Research Foundation) तर्फे  २०-२५ मुलांचा गट माळीण गावात मदत कार्यासाठी जाणार आहे, तरी कुणाला सहभागी व्हायचे असेल तर कळवावे'. क्षणात माझ्या मनात विचार येउन गेला की 'जर अशीच नैसर्गिक आपत्ती माझ्या गावावर आली असती तर मी काय केल असतं'. मी लगेच Di-MaRF सोबत संपर्क केला अन माझा सहभाग निश्चित केला. 

Di-MaRF चे एक सदस्य निलेश संभूस सर, जे माळीण घटनेच्या पहिल्या दिवसापासून घटना स्थळावर मदत कार्यासाठी उपस्थित होते, त्यांनी १ ऑगस्ट च्या सकाळी म्हणजे घटनेच्या तिसऱ्या दिवशी पुण्यात Di-MaRF चे संस्थापक कर्नल मराठे यांना फोन वरून तेथील परिस्थिती सांगितली अन दुर्घटने मध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची विल्हेवाट लावण्यास मदतीसाठी काही माणसांची आवश्यकता भासत असल्याचे सांगितले. कर्नल मराठे यांनी हा विषय त्यांच्या संपर्कात असलेल्या NCC च्या विद्यार्थ्यासमोर मांडला. अन पुण्यातून २० जणांचा ग्रुप ज्यामध्ये सुदैवाने मला सहभागी होण्याची संधी मिळाली, माळीण मदत कार्यासाठी तयार झाला. १ तारखेला कर्नल मराठे यांनी सर्वाना त्यांच्या निवासस्थानी बोलावून घेतले व योग्य त्या सूचना, तेथील आमचे कामाचे स्वरूप अन सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःची घ्यायची काळजी याबद्दल सांगितले. आमच्या मार्गदर्शनासाठी प्रमुख म्हणून कॅप्टन परेश यांना निश्चित करण्यात आले. कॅप्टन परेश हा नुकताच सुट्ट्या मध्ये पाकिस्तान सीमेवरून घरी आला होता, माळीण दुर्घटनेबद्दल समजताच तो सगळे काम बाजूला ठेऊन आमच्यामध्ये सहभागी झाला होता.
२ तारखेला सकाळी ५.३० वाजता सगळ्यांनी शिवाजीनगर बस स्थानका मध्ये  जमायचं ठरलं. मला आदल्या दिवशी रात्रभर झोप लागलेली नव्हती . तरी सकाळी ४ वाजता उठून मी ५ वाजेपर्यंत तयार झालो, अन शिवाजीनगर बस स्थानका कडे निघालो. मी बस स्थानकात पोहचल्याच कॅप्टन परेशला सांगितलं. आदल्या दिवशी कॅप्टन  ने १० kg कापूर विकत  घेऊन शिवाजीनगर पोलिस चौकीत ठेवलेला होता, जो अंतिम संस्कार च्या वेळी अग्नी देताना चितेवर टाकायचा असतो. ते १० kg  कापूर पोलिस चौकीतून आपल्या सोबत घेण्यास त्याने मला सांगितले. तो कापूर हातात घेताना मला पुढचे दृश्य मनात आठवायला लागले होते. मनात वेगळ्याच प्रकारच्या विचारांचा गोंधळ चालू होता. आजपर्यंत मी कधी मृत व्यक्तीला हात सुद्धा लावलेला नव्हता पण इथे मला मृत व्यक्तीची अखेरची विल्हेवाट करायची होती. कुठे तरी अस ऐकल होत की मरण पावलेल्या व्यक्तीची अखेरची विल्हेवाट करण हे खूप पुण्याच अन चांगल काम असत, अर्थात मी तिथे पाप-पुण्याच काम करण्याचा विचार करून जात नव्हतो तर तेथील वाचलेल्या व्यक्तीच्या दुखात सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यासाठी जात होतो. २ दिवस टीव्हीवर  ऐकण्यात येणाऱ्या माळीण बद्दलच्या बातम्यांमुळे मन हेलावून गेले होते. त्यांना थोडा मदतीचा हात लागावा ह्या करणासाठी मी जात होतो. 
राजगुरुनगर मध्ये पोहचल्यानंतर आम्हाला पुढे माळीन गावात घेऊन जाण्यासाठी निलेश संभूस सर गाडी घेऊन बस स्थानकात आले. गाडीमध्ये बसण्याअगोदर त्यांनी सर्वाना घटनास्थळावरील परिस्थिती समजून सांगितली अन तेथे स्वतःची  काळजी घ्यावयाच्या सूचना दिल्या. आमचे काम हे प्रत्यक्ष महसूलखात्या अंतर्गत येत असल्यामुळे आम्हाला मंचर विभाग कार्यालयामध्ये जाऊन उपविभागीय अधिकार्याची परवानगी घेऊन पुढे जायचे होते. आम्ही उपविभागीय अधिकार्याचे परवानगी पत्र घेऊन पुढे निघालो. डिंभे धरणामुळे माळीण कडे जाण्याचा रस्ता खूप कमी रुंदीचा होता शिवाय त्यामध्ये सतत चालू असलेला पाऊस अन अर्थात जागोजागी असलेले खड्डे यामुळे तिथे पोहचायला आम्हाला थोडा उशीर झाला. 
घटना घडून चौथा दिवस झाला असल्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी खूप पसरलेली होती, त्यामुळे तिथे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते. दुर्घटना राष्ट्रीय स्थरावरील असल्यामुळे स्वयंसेवकाची योग्य ती काळजी घेण्यासाठी safety kit, gloves, masks हे सगळ पुरवण्यात आलेल होत. आम्ही सर्वजण आडिवरे च्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोहचलो, जे घटनास्थळापासून २ किमी अंतरावर आहे. कॅप्टन परेश ने ६-७ जणांचे असे ३ ग्रुप बनवले. पहिला ग्रुप प्राथमिक आरोग्य केंद्रात post-mortem साठी येणाऱ्या body ला उचलून hospital मध्ये घेऊन जाण्याच्या कामासाठी होता. दुसरा ग्रुप प्रत्यक्ष स्मशानभूमीमध्ये चिता रचण्याचे अन मृताना त्या चितेवर उचलून ठेवण्याच्या कामाकरिता होता. अन तिसऱ्या ग्रुपला कॅप्टनने गाडीमधेच थोडा वेळ आराम करण्यासाठी अन बोलावल्यानंतर कामाला येण्यासाठी सांगितले. प्रत्यक्ष घटनास्थळावर NDRF च्या जवानांचे काम खूप व्यवस्थित पद्धतीने चालू होते. घटनास्थळावर ३-४ डोझर सतत मातीचा ढिगारा बाजूला काढण्याच्या कामात लागलेले होते. सह्याद्रीचा विभाग असल्यामुळे सतत पाऊस चालूच होता. त्यामुळे NDRF च्या जवानांना काम करण्यामध्ये खूप अडथळे येत होते. प्रत्येक अर्धा-एक तासाला एक किंवा दोन BODY  मातीच्या ढिगाऱ्या खालून निघत होत्या. चौथा दिवस असल्यामुळे बऱ्याचशा body कुजलेल्या अवस्थेत मिळत होत्या. मिळालेल्या ७-८ body मधून एकदाच पूर्ण देह सापडत होता. बाकीच्यांचे कुणाचे अर्धेच धड तर कुणाचे हात पाय शरीरापासून वेगळे झालेल्या अवस्थेमध्ये सापडत होते. NDRF च्या जवानांनी stretcher मध्ये body टाकून १०८ no. च्या अॅम्ब्युलन्स मध्ये आणून ठेवायचं, अॅम्ब्युलन्स ती body  घेऊन २ किमी अंतरावर असलेल्या आडिवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर आमचे कार्यकर्ते ती body उचलून hospital  मध्ये घेऊन जाणार अन नंतर त्या body ची ओळख अन नंतर शवविच्छेदन करण्यात येत होत. शवविच्छेदन झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते त्या body ला पुन्हा अॅम्ब्युलन्स मध्ये ठेवणार अन अॅम्ब्युलन्स थेट स्मशानभूमीमध्ये जाऊन थांबणार अन पुन्हा तिथे उपस्थित असलेले आमचे कार्यकर्ते body ला उचलून १०-१२ bodies साठी रचलेल्या चितेवर ठेवणार. अशाप्रकारे तेथील काम चालू होते. घटनेच्या चौथ्या दिवशी म्हणजे २ ऑगस्ट ला २०-२५ body ला अग्नी देण्यात आलेली होती. त्यामधील १०-१२ body  कुजलेल्या अवस्थेत मिळाल्यामुळे अन ओळख न पटल्यामुळे अनोळखी ठरवण्यात आलेल्या होत्या.  बऱ्याचशा संस्था मदतीसाठी समोर आलेल्या असल्यामुळे कार्यकर्त्यांना वेळेवर जेवण, नाश्ता, फळे देण्यात येत होती. 
२ तारखेला रात्री आमच्या जेवणानंतर आमची राहण्याची सोय जवळच्या असाने गावातील शासकीय आश्रम शाळेत करण्यात आलेली होती. त्याच ठिकाणी माळीन गावातील सुदैवाने वाचलेल्या माणसांची राहण्याची अन जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसलेला होता. त्यांच्या चेहऱ्यावर कोणते भावच उरलेले नव्हते. त्यांच्यासोबत एक रात्र राहण्याची अन त्यांच्या दुखःत सहभागी होण्याची संधी मला मिळाली हे मी माझ भाग्य समजतो. त्यांच्यासोबत बोलल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या. डिंभे धरणाच्या पाण्यामुळे त्यांची वस्ती ऐन डोंगरमाथ्याखाली वसलेली होती. डोंगराच्या वरच्या भागात बरेच जणांची भाताची शेती होती, अन काही लोकांची गावापासून थोड्या दूर अंतरावर होती. घटनेच्या दिवशी काही गावकरी सकाळी लवकरच उठून आपापल्या शेताकडे गेलेली होती. अन परत येउन बघतात तर काय सगळ संपलेलं होत. माझ्यासाठी धक्कादायक बातमी म्हणजे घटनेच्या दिवशी गावातील २०-२५ मुले गावाच्या बाहेरील ओढ्यावर खेळायला आलेली होती, पण ओढ्याच्या समोरील घरातील एका व्यक्तीने त्यांना रागावून घरी पाठवलेले होत. ती २०-२५ मुले घरी पोहचून १०-१५ मिनिट होताच ती दुर्दैवी घटना घडली अन ती सगळी मुले मातीच्या ढिगार्याखाली सापडली. ती २०-२५ मुले जर १०-१५ मिनिटे उशिरा गेली असती तर कदाचित आज वाचली असती. अशा अनेक घटना अन त्याचं दुखः ऐकून मन भारावून गेल होत. 
दुसऱ्या दिवशी लवकर उठून आम्ही ८-९ वाजेपर्यंत तयार झालो अन ठरलेल्या आपापल्या कामासाठी शाळेतून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी एकूण ३० body दोन चितांवर ठेऊन अग्नी देण्यात आला. 
त्या दोन दिवसात मला खूप काही शिकायला मिळालं होतं, शिवाय वेगवेगळ्या प्रकारची माणसे पण बघण्यास मिळाली होती.  काही शासकीय कर्मचारी खूप तळमळीने तेथे काम करत होते.  जुन्नरचे तहसीलदार घटनेच्या पहिल्या दिवसापासून ते अखेरच्या दिवसापर्यंत कशाचीही पर्वा न करता तिथे कार्यकर्त्याच्या सोबत सतत काम करत होते. त्यांच्यासोबत ३-४ तलाठी पण होते जे पहिल्या दिवसापासून तळमळीने काम करत होते. त्यांच्याकडे बघून मनात विचार आला की जर शासनातील प्रत्येक व्यक्ती यांच्यासारखाच तळमळीने काम करायला लागला तर भारताला पुढे जाण्यास कुणीच अडवणार नाही. याउलट तेथे येणारी नेतेमंडळी यांचा सहभाग कमी पण त्रासच जास्त होत होता. सुरक्षेच्या नावाखाली ७-८ मागे पुढे असलेल्या गाड्यामुळे अॅम्ब्युलन्स ला ये जा करायाल खूप त्रास होत होता. अन त्या गोष्टीची त्यांना जराशी पण खंत वाटली असेल याची मला शंका आहे.
 मानवाच्या आयुष्यातील जन्म अन मृत्यू चे वेगळेच समीकरण असते. बाळ आईच्या पोटी जन्माला येण्याच्या ९ महिने अगोदरच चाहूल लागते, पण मृत्यू कधी अन कशा स्वरुपात येईल याचा काही नेम नसतो. पुण्यामधील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील गावकऱ्यांचे असेच काहीतरी हाल झाले... २९ जुलैच्या रात्रीपर्यंत  सुख- समाधानात असलेल्या माळीणवासीयांवर नैसर्गिक आपत्तीने घाव केला, अन दिवस उजाडे पर्यंत पूर्ण गाव मातीच्या ढिगार्याखाली नाहीस झालं. माळीण गावासारखी अशी कित्येक गावे दररोज मृत्यूच्या छायेत जगत आहेत. दरड कोसळून झालेल्या प्रचंड जीवित हानीने देशासमोर एक नवे आव्हान निर्माण केले आहे.  
             माळीण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

स्रोत: सदानंद कुरुकवाड, skurukwad@gmail.com

मुक्त व्यापार आणि भारतीय शेती

शेती व्यवसायावर भारतातील ७०% लोकसंख्येची उपजिवीका अवलंबून आहे. असे असताना शासकीय धोरण-निश्चिती प्रक्रियेत शेती हा विषय नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे.
भारताने फार सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय व्यापारात शेती-उत्पादनांचा समावेश मर्यादीत ठेवण्याचे धोरण अंगिकारलेले आहे. कारण भारतासारख्या विकसनशील देशासाठी शेतीउत्पादन हे केवळ एक व्यापाराचे साधन नसून तो एक अन्नसुरक्षा आणि उपजिविकेचा स्त्रोत आहे.मात्र पुढील काळात विविध आंतरराष्ट्रीय करारांचा भाग म्हणून भारताने शेतीउत्पादन व्यापाराच्या उदारीकरणाचे धोरण स्विकारले. १९९५ मध्ये जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) सदस्यत्व स्विकारल्यानंतर शेतीविषयक कराराचा (Agreement on Agriculture) भाग म्हणून भारताने आपली बाजरपेठ इतर देशांच्या शेतीउत्पादनांसाठी खुली करण्याचे मान्य केले. पण शेती-उत्पादनांची स्थानिक बाजारपेठ यामुळे दोन मार्गांनी संकटात आली. एक, या करारांचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात आयात करात घट करण्यात आली. दोन, प्रगतीशील देशातील शेती उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर शेती-अनुदान (subsidies) दिले जाते. त्यामुळे दोन्ही गोष्टी परकीय उत्पादनांच्या किमती कृतीमरित्या कमी ठेवण्यास कारणीभूत ठरल्या, ज्या किमतींशी स्पर्धा करणे स्थानिक शेतकर्‍याला शक्य नाही. शिवाय सातत्याने WTOअंतर्गत आयात कर अजून कमी करण्याबद्दल वाटाघाटी सुरू आहेत. अजून एक काळजीची बाब म्हणजे आयात-प्रोत्साहनामुळे स्थानिक प्रक्रिया उद्योगाची क्षमता खुंटत आहे. दुसरीकडे WTO अंतर्गत प्रत्येक देशाला अन्न आणि इतर तांत्रिक बाबींच्या आपापले मापदंड ठरविण्याची मुभा आहे. आयात आणि इतर करांमध्ये घट होत असताना इतर देशांकडून या मापदडांचा उपयोग स्थानिक बाजरपेटांचे परकीय उत्पादनांपासून संरक्षण करण्यासाठी होत आहे. WTO मध्ये लढा देवून विकसनशील राष्ट्रांनी आपल्या देशातील उत्पादकांच्या संरक्षणासाठी विशेष संरक्षण यंत्रणा (Special safeguard mechanism) आणि विशेष उत्पादने (Special products) या दोन साधनांना मान्यता मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. पण WTO मधील सध्या सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये या साधनांच्या वापरावर बंधने आणण्याचा प्रयत्न दिसून येतो.
WTOअंतर्गत करारांपेक्षाही घातक परिणाम घडवून आणले ते नंतरच्या काळात आलेल्या मुक्त व्यापार करारांनी (Free Trade Agreements, FTA). कारण, स्थानिक उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी WTO अंतर्गत आयात-कर लावण्याची सूट मिळते तितकीही अनुमती FTA अंतर्गत नाही. खूप कमी शेती उत्पादनांना स्थानिक उत्पादकांचे संरक्षणार्थ या करारातून वगळण्याची सूट आहे. शिवाय ज्या शेती-अनुदानांमुळे, विशेषतः विकसित देशांमधील शेतमालाच्या किमती कृतीमरित्या कमी ठेवून स्थानिक शेतमालाला स्पर्धा निर्माण केली जाते, ती शेती-अनुदाने कमी करण्याविषयीच्या वाटाघाटींना FTA अंतर्गत वाव नाही. FTA अंतर्गत शेतजमीन आणि नैसर्गिक स्त्रोतांमध्ये थेट परकीय गुंतवणूकीला (FDI) करारांना मान्यता दिली जात आहे. ‘बौद्धिक मालमत्ता अधिकार’ विषयक करारांचा समावेश करण्याची भारताकडे सातत्याने मागणी होत आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांच्या मुक्तपणे बिया जतन, देवाणघेवाण, आणि विक्रिच्या स्वातंत्र्यावर गदा येवू शकते. FTA अंतर्गत व्यापारी भागीदारीत बहुतांश देशासोबतच्या व्यापारात भारताला तोटा सहन करावा लागला आहे. व्यापामुळे उत्पादन यंत्रणेवरही परिणाम होतो. भारत वाढत्या प्रमाणात तयार खाद्य पदार्थांची आयात करत आहे आणि त्याच वेळी मुलभूत खाद्य उत्पादनांची निर्यात होत आहे.
कुठलेही मोठे आंतरराष्ट्रीय करार करताना शासन अगोदर त्याच्या परिणामांचे मूल्यांकन करते. मात्र शेतीविषयक उदारीकरणाच्या बाबतीत असे कुठल्याही प्रकारचे मुल्यांकन आत्तापर्यंत झालेले नाही. विशेष काळजीची बाब म्हणजे जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत करार होत असताना देशभरातील शेतकरी संघटना, सामाजिक संस्था, कामगार यांच्याकडून बराच विरोध आणि आंदोलने झाली होती, कारण किमान या करारांची खुली चर्चा झालेली होती. मात्र तुलनेने मुक्त व्यापार करार हे अधिक गोपनीयतेने पार पडतात त्यामुळे सार्वत्रिक विरोधाचा प्रश्नच येत नाही. या करारांची क्वचितच संसदेत चर्चा होते, आणि भारत हा अशा मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे अशा करारांसाठी लोकप्रतिनिधीगृहाच्या अनुमोदनाची गरज नाही. भारतातील राजकीय नेते, शेतकरी, कामगार आणि नागरिकांनी देशाच्या व्यापार धोरणात सक्रीय सहभाग घेण्याची गरज आहे. अन्यथा सध्याचे शेतीउत्पादन व्यापार उदारीकरणाचे धोरण दिवसेंदिवस शेतीक्षेत्राच्या अस्तित्वाला अधिक धोकादायक ठरत जाणार आहे. या संदर्भात भारतीय शेतकरी आणि शेतकरी-संघटनांच्या काही मुख्य मागण्यांमध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश होतो.
1. WTO आणि FTA अंतर्गत करारांमधुन शेती क्षेत्र वगळण्यात यावे.
2. शेती-उत्पादनांवरील अनुदानांच्या सहाय्याने कृतीमपणे स्वस्त बनविलेल्या आयात शेतमालापासून स्थानिक बाजारपेठांचे संरक्षण करण्यासाठी परिमाणात्मक बंधनांची (quantitative restrictions) पुन्हा अंमलबजावणी व्हावी.
3. व्यापारात शेतकरी-केंद्रीत धोरणांवर भर द्यावा.
4. शेतकर्‍यांना न्याय्य किमती आणि मिळकतीची हमी द्यावी.
-रंजन सेनगुप्ता

सारांश- कोरडवाहू गट

अव्दैत दंडवतेला सामाजिक कृतज्ञता निधीचे मानधन सुरू

महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नांवर पूर्ण वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, पुष्पाताई भावे यांनी १९८० साली सामाजिक कृतज्ञता निधीची (साकृनि) स्थापन केली. डॉ. श्रीराम लागूंनी ‘लग्नाची बेडी’ या आपल्या नाटकाचे जगभर प्रयोग करून निधी जमा केला. तर डॉ. दाभोळकरांनी ‘एक उपवास कृतज्ञतेचा’ या उपक्रमांतर्गत शाळकरी मुलांकडून त्यांच्या खाऊचे एका दिवसाचे पैसे जमा केले. सुमारे सव्वा कोटी रुपयाचा निधी जमा झाल्यानंतर कार्यकर्त्यांना मानधन देणे सुरु झाले.
आजपर्यंत अविनाश पाटील, उल्का महाजन, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे यांसारख्या कार्यकर्त्यांना हे मानधन मिळाले आहे. जून २०१४ पासून अद्वैत दंडवतेला (निर्माण ४) हे मानधन सुरु झाले आहे. यात कार्यकर्त्याला दर महा रु. १५०० पुढील १० वर्षाकरिता मिळतात. मिळणारी रक्कम कमी असली तरी पूर्ण वेळ काम करताना आर्थिक समस्या आणि कौटुंबिक जबाबदारी याचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दरमहा मिळणारी ही रक्कम खूप मोलाची आहे.
सध्या पुष्पाताई भावे या साकृनिच्या अध्यक्षा आहेत तर सुभाष वारे संयोजक म्हणून काम पाहत आहेत. साकृनि सोबतच अॅड. प्रदीप मालपाणी अद्वैतला जानकी & पन्नालाल लोहे grandsons & असो., संगमनेर यांच्या ‘ग्राममित्र’ या उपक्रमांतर्गत पुढील एक वर्ष महिना रु. ३००० मानधन देणार आहेत. सामाजिक काम करता करता पडणारा आर्थिक ताण सुसह्य होण्यासाठी अद्वैतला यातून नक्कीच बळ मिळेल.
स्त्रोत: अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com

सजल कुलकर्णीचे पुढचे संशोधन जर्नल ऑफ बायोसायन्स डिस्कवरी मध्ये प्रसिद्ध !

सजल कुलकर्णीला (निर्माण २), नेहमीच प्राण्यांवरील संशोधनाने आकर्षित केले आहे. ह्यापूर्वी देखील, कठाणी जातीच्या गाईंचा अभ्यास व त्यावरील डॉक्युमेंटेशन करण्यात सजलचा सक्रिय सहभाग राहिला आहे. ह्याच डॉक्युमेंटेशन दरम्यान सजलच्या असे लक्षात आले की पशुवैद्यकीय सेवेचा विदर्भातील गोंदिया, गडचिरोली व नागपूर या भागात अत्यंत अभाव आहे. मात्र, तरी देखील स्थानिक लोक स्थानिक वन औषधी वापरून जनावरांचे उपचार करत आहेत. मात्र ह्या वनौषधींबद्दल कुठलेच रेकॉर्ड वा डॉक्युमेंटेशन उपलब्ध नाही. त्यामुळेच अशा औषधींचे डॉक्युमेंटेशन, बायफ ह्या संस्थेच्या मदतीने करण्याचे काम सजलने पूर्ण केले असून, त्याच्या फलस्वरूप असलेला 'Use of Ethno-Veterinary medicines (EVM) from Vidarbha Region (MS) India' हा पेपर २७ जुलैला जर्नल ऑफ बायोसायन्स डिस्कवरी मध्ये प्रकाशित झाला. तिन्ही जिल्ह्यातील विविध ठकाणी ग्रामसभा घेऊन, लोकांशी संवाद साधून, participatory पद्धतीने हे काम करण्यात आले. एकूण २०० लोकांशी बोलून ४५ वनौषधींचे डॉक्युमेंटेशन ह्यामध्ये झाले आहे. ह्या पेपरसाठी, बायफचे डि. के. कुलकर्णी ह्यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

सजलचे खूप खूप अभिनंदन ! 

सजलचा पेपर खालील संकेतस्थळावर बघता येईल -
http://biosciencediscovery.com/Vol%205%20No.%202%20July%202014/Sajal180-186.pdf

स्त्रोत - सजल कुलकर्णी, sajalskulkarni@gmail.com

सोनाळे गावच्या स्वच्छतेच्या प्रवासात सुरुवातीपासूनच वाटसरू व्हा...

या प्रवासाबद्दल वाचूया मुक्ता नावरेकरच्या (निर्माण ३) शब्दांत...
दीपक पाटीलच्या (निर्माण ३) सोनाळे (जि. जळगाव, ता. जामनेर) गावात २६ जुलैला निरंजन तोरडमल, पंकज सरोदे, राही मुझुमदार (सर्व निर्माण ५), प्रणाली दंडवते आणि मी शाळेत काही गोष्टी शिकवायला (आणि खरं तर शिकायला) गेलो होतो. नंतर गावात महिलांची एक मीटिंग घेतली होती. त्यात गावाच्या समस्या काय ? असा प्रश विचारला आणि पाहिलं उत्तर मिळालं ते म्हणजे गावात शौचालय नाहीत ! मग या विषयावर मिटींगमध्ये बरीच चर्चा झाली आणि पुन्हा एकदा मोठी मिटिंग घेऊन शौचालय हा विषय सगळ्यांना नीट समजावून सांगायचे ठरलं होतं. त्यानुसार १४ ऑगस्टला रात्री ८.३० वाजता ही ग्रामसभा सुरु झाली. जामनेर पंचायत समिती, निर्मल भारत अभियानचे गट समन्वयक गोपाल गुजर, सोनाळे गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका आणि साधारण १५० महिला या मिटींगला उपस्थित होत्या. सुरुवातीला दीपक पाटील यांनी उपस्थितांची ओळख करून दिली. त्यानंतर मी 'ही ग्रामसभा कशासाठी आहे' याची थोडक्यात माहिती दिली. नंतर 'सोनपावलं' हा शौचालय या विषयावरील एक तासाचा चित्रपट दाखवला. गोपाल गुजर यांनी निर्मल भारत अभियानाविषयी महिती दिली. त्यात योजनेचे बदललेले स्वरूप, शासनाकडून मिळत असलेले आर्थिक सहाय्य, शौचालय का बांधायला हवे याविषयी ते सविस्तर बोलले. गावातील अंगणवाडी सेविकांनीही याविषयीचे त्यांचे मनोगत सांगितले. नंतर गावात या कामाला सुरुवात कशी करायची, सर्व्हे इत्यादी विषयी आम्ही महिलांशी चर्चा केली. त्यात अनेक जणींनी शौचालय बांधणीचे काम सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. काहींनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. उदा. सांडपाण्याची व्यवस्था नाही, पूर्वी बांधलेले सेप्टिक संडास नीट चालत नाहीत इ. त्यावर गावातील प्रत्येक गल्लीत स्वतंत्र मिटिंग घेऊन तिथले प्रश्न समजून घेऊ, तसेच सौचालाय बांधण्यासाठी गावात एक सर्व्हे करू असंही ठरलं.

या कार्यक्रमाचं एकूण स्वरूप पुढीलप्रमाणे:
१. गावकऱ्यांची मिटिंग -
उद्देश - गावातील स्वछातेची आणि शौचालयांची सद्य:स्थिती समजून घेणे आणि खत देणाऱ्या शौचालयाची (Twin pit latrine) माहिती देणे. सरकारी योजनेची माहिती देणे. आत्तापर्यंत काम का होऊ शकलं नाही हे जाणून घेणे.
अपेक्षित सहभागी - गावकरी (विशेषतः महिला), ग्राम पंचायत आणि पंचायत समिती प्रतिनिधी
 २. सर्व्हे
उद्देश - सुरुवातीला ज्या घरी शौचालय बांधायची आहेत अशा घरांचा प्राथमिक सर्व्हे. (यात उपलब्ध जागा, पाणी, मातीचा प्रकार आणि इतर आवश्यक गोष्टी असतील )
अपेक्षित सहभागी - दीपक, ग्राम सेवक, इतर स्वयंसेवक
 ३. शौचालय प्रशिक्षण -
सोनाळे व आजूबाजूच्या गावातील गवंड्यांना या इको toilet चे शास्त्रीय प्रशिक्षण देणे. इ
अपेक्षित सहभागी - गवंडी, पंचायत समिती प्रतिनिधी, निर्मल ग्राम निर्माण केंद्राचे कार्यकर्ते.
 ४. गावात शौचालय बांधणीची सुरुवात
 या टप्प्यांमध्ये गरजेनुसार थोडेफार बदल होऊ शकतात. तसेच संपूर्ण स्वच्छता या विषयावर गावकऱ्यांसोबत एखादं शिबीर किंवा सफाई जत्रेचं आयोजनही करता येईल. पथनाट्य, प्रभातफेरी, पोस्टर्स इ. माध्यमांचाही वापर करता येईल.
या संपूर्ण प्रक्रियेत ज्यांना पूर्ण वेळ किंवा थोडा वेळ सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर संपर्क करावा.

स्त्रोत: मुक्ता नावरेकर, muktasn1@gmail.com

मेळघाटातील मुलांच्या शिकवणीची केमिस्ट्री...

गेल्या जून महिन्यात निर्माण २ च्या डॉ. प्रियदर्श तुरे ला भेटायला गेली असताना पल्लवी मालशे (निर्माण ५) ला कळलं की त्याच्याकडे मेळघाटातून त्याच्या ओळखीची काही मुलं आली होती, बारावी, PMT चा अभ्यास करायला. त्या मुलांना केमिस्ट्री नि फिजिक्स शिकावातानाचे अनुभव तिच्याच शब्दात-
“त्या मुलांशी बोलल्यावर कळलं, की त्यांच्या गावाकडच्या शाळेत, केमिस्ट्रीसाठी शिक्षकच नाहीयेत! आणि फिजिक्स चे सर नियमित येत नाहीत आणि नीट शिकवत नाहीत. मग ते पास कसे होतात? तर परिक्षेच्या वेळी फक्त 'रिकाम्या जागा भरा' हा प्रश्न सोडवून आणि इंटर्नल मार्क्स च्या मदतीने ते पास होतात. त्यांना केमिस्ट्री, फिजिक्स नीट शिकायलाच नव्हतं मिळालं आणि याउलट माझ्यासाठी हे विषय शिकणं हा आनंददायी अनुभव होता. म्हणून मी ठरवलं होतं की आपल्यासाठी हा अनुभव जितका चांगला होता; तितकाच चांगला अनुभव या मुलांना द्यायचा प्रयत्न करायचा...
            मग पहिले chemistry-II शिकवणं सुरु केलं. त्यात अकरावीतले काही topics basic concepts समजावेत म्हणून घेतले. पहिले त्यांना नक्की किती येतं, कुठपासून समजवायला सुरुवात करावी हे न कळल्यामुळे थोड्यावेळ आम्हाला गडबडल्यासारखं झालं. आमची 'लय' नव्हती मिळत. असं वाटत होतं की यांचा इंटरेस्ट नाहीये यात… मग मात्र आपण जे शिकत आहोत, 'ते का आहे? ते जर नसतं तर काय झालं असतं ?' हे  सांगायला सुरुवात केली. (मला जितकं माहित होतं, तितकं…) मग त्यांचा इंटरेस्ट जाणवायला लागलाआणि मलाही मजा यायला लागली.
उदाहरणार्थ, organic compounds साठी IUPAC nomenclature नसतं, तर आपण त्या compounds ना कुठपर्यंत नावं देऊ शकलो असतो? त्यातही काय प्रॉब्लेम आले असते, हे आम्ही नावं देऊन पाहिलं. मग IUPAC nomenclature शिकलो. मग मात्र compounds ना नावं देण्याचा आणि नावावरून compound चा formula ओळखण्याचा नादच त्यांना लागला! 'एखादी गोष्ट 'कळण्यातला' जो आनंद असतो, तो त्यांना मिळत होता! मग पुस्तकातले काही प्रश्न त्यांना सोडवायला दिले. त्यातून ते विचार कसा करतात, कुठे त्यांना अडचण जाते, ते कळायचं. मग तेवढी शंका दूर केली की त्या विषयातली clarity वाढली!
तिथे ते याशिवायही बरंच काही शिकत होते. त्यांचा स्वयंपाक आणि घरातली सगळी कामं ते "टीमवर्क"ने पूर्ण करायचे. चुका झाल्या, तरी कोणाला दोष देत न बसता चूक सुधारण्याचा प्रयत्न असायचा. प्रियदर्श दादा त्यांना योगासन, प्राणायाम, कराटे शिकवायचा; वाचनासाठी खूप पुस्तकं होती त्याच्याकडे! शिवाय तो काही फिल्म्सही दाखवायचा. अशा प्रकारे त्या घरात राहत असतानाच ते 'learning' चा आनंद घ्यायचे. (एक दिवस त्यांच्या सोबत राहून मी सुद्धा हा आनंद घेतला!) 'गाडीचे licence काढणे, पुढच्या शिक्षणासाठी चौकशी करायला संबंधित संस्थांमध्ये जाणे, अशी कामे ते नवख्या गावात स्वतःच्या भरवशावर करत होते, आणि त्या अनुभवातून शिकत होते.  
हे सगळं ते करायचे कारण प्रियदर्श दादा म्हणायचा, की "आपण "हे" करू शकतो, आणि "ते"  नाही करू शकत अशी बंधनं आपणच आपल्यावर लादलेली असतात. अशी बंधनं एकेक करून आपल्याला तोडायची आहेत, आणि यातूनच आपल्यांना खात्री होईल की आत्मविश्वासाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो!
ही त्याची कल्पना मला माझ्या आयुष्यातही टेस्ट करायचीये!”

स्रोत: पल्लवी मालशे, pallavi.malshe@gmail.com   

१८ वा हिंद पाक दोस्ती मेळा जल्लोषात साजरा

भारत व पाकिस्तान मध्ये लोकशाही व शांतता नांदावी यासाठी १९९३ पासून प्रयत्नशील असलेल्या PIPFPD (Pakistan India Peoples forum for peace and democracy) चा १८ वा हिंद पाक दोस्ती मेळा १४ ऑगस्ट रोजी अमृतसर व वाघा बॉर्डरवर जल्लोषात साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचा उद्देश फाळणीत मृत्यूमुखी पडलेल्याना आदरांजली व भारत पाक मैत्रीचा सेतू बळकट व्हावा असा होता.  महाराष्ट्रातून २५ जणांची टीम यात सहभागी झाली होती (त्यात १० निर्माणींचा सहभाग होता).
            १४ ऑगस्टला सकाळी कार्यक्रमाची सुरुवात नाटशाला येथे परीसंवादाने झाली. परिसंवादाचा विषय ‘Challenge of Terrorism, In south Asia and India-Pakistan relationship’ असा होता. परिसंवादात पाकिस्तानातील दोन वक्त्यांचा समावेश होता. PIPFPD चे सचिव सतनाम सिंघ माणिकानी सांगितले कि सार्क देशात करोडो लोक शिक्षण व आरोग्याच्या सुविधांपासून वंचित आहेत. दक्षिण आशियात भारत, पाक व अफगाणिस्तान ने एकत्र यायला हवे. या देशातील राजकारणी, लेखक, पत्रकार व कलाकार यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपल्या आपल्या सरकारवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकला पाहिजे. भारत-पाक काश्मीर प्रश्नाच्या पुढे नाही गेले तर शांती प्रस्थापित होण्याचे स्वप्न अपूर्णच राहील.

मुंबईतील पत्रकार जतीन देसाईनी भारत-पाक मधील आर्थिक संबंध सुधारावे व आपसातील व्यापारात वाद केली तर शांतता स्थिर होण्यास मदत होईल अशी मांडणी केली. दिल्ली प्रेस क्लब चे अध्यक्ष पुष्पिंदरनी सांगितले की जिहादी कडून जेव्हा इस्लाम खतरे मी अस म्हटलं जात तेव्हा मला वाटत की, इतर धर्मियापेंक्षा सध्या इस्लामला  मुसलमानाकडून अधिक धोका आहे. पाकिस्तान सध्याच्या परिस्थितीतून स्थिर होणे भारतासाठी फायद्याचे आहे. पाकिस्तानातून भारतात पोहोचलेले इदरीश तबसुम यांनी सांगितलं दोन्ही देशांमध्ये असलेले भूकबळी, कुपोषण, गरिबी, भ्रष्टाचार हे खरे आतंकवादी आहेत. आम्हाला त्यांच्याशी लढा द्यावा लागेल. दिल्लीच्या CPI नेत्या अमरजित कौर यांनी भारत पाक मधील खराब संबंधासाठी अमेरिकेला दोषी ठरवले. दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्याची घोषणा करणारी अमेरिकाच जास्त शत्रास्त्र पुरविते. प्रा. शेखर सोनाळकर यांनी सरकारला काय हवं यापेक्षा अधिक जोर हा त्या देशातील जनता काय म्हणते या मुद्द्यावर दिला. परिसंवादाची सांगता भारत पाक जिंदाबादच्या घोषणेने झाली. संध्याकाळी क छोटेखानी पंजाबी गाण्याच्या मैफिल नंतर आम्ही सगळ्यांना हवा असलेला क्षण जवळ येत होता. PIPFPD चे ४० व इतर संस्थाचे ६० असे १०० जण, वाघा सीमेवर पोहचलो. पलीकडे पाकिस्तानातील १०० लोक त्याचवेळेस या कार्यक्रमासाठी हजार होते. १४ ऑगस्ट च्या रात्री ११-३० वाजेपासून ते १५ ऑगस्टच्या १२-३० वाजेपर्यंत ह्या एक तासात भारत-पाक मैत्री मेळाव्याचा शेवटचा टप्पा साजरा करण्यात आला. भारत-पाक जिंदाबाद, (Indo-Pak friendship long live long live) च्या घोषणेणी परिसर दणाणून गेला. दोन्ही बाजूची जनता सीमेच्या प्रवेशद्वारापासून १० फुट अलीकडे व पलीकडे होती. (जे प्रवेशद्वार कधीकाळी नव्हते). वाघा हे भारत पाकिस्तान सीमेवरील एक गाव आहे ज्याचा अर्धा भाग भारतात व अर्धा भाग पाकिस्तानात आहे. सगळ्यांना भरून आलं होतं. काहींनी तिथेच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
            १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिवस वाघा बोर्डर वर साजरा करण्यात आला. उन्हाच्या झळा खात आम्ही सगळे वाघा सीमेजवळील मैदानावर पोहचलो ६००० च्या आसपास लोक दाटीवाटीने बसले होते. त्याहून अधिक लोक मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच अडकले होती. साधारण ४-३० ला कार्यक्रमास सुरवात झाली. सुरुवातीला घोषणा झाल्यानंतर जवानांचे काही प्रात्यक्षिक व कॉलेजच्या विध्यार्थ्यांचे देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम झाला. ‘बिग पैगाम सरहद के नाम’ हा कार्यक्रम एका व्यावसायिक रेडिओला द्यावा हे जरा बुद्धीला पटलं नाही. आरजे निलेश मिश्राने म्हटलेले दिल तो बच्चा है जी, बॉडीगार्ड चित्रपटातील अजून एक गाणे, त्यानंतर सगळ्यांना दिल तो चाहता है वर थिरकायला सांगणे हे सगळ लज्जास्पद होतं. प्रेक्षक चिडले आहेत व ते आपली टर उडवत आहे हे आयोजकांच्या लक्षात येऊ नये ही अधिक लज्जास्पद गोष्ट.
            ह्या दरम्यान दिल्ली – लाहोर बस स्टेडियम (अमृतसर – लाहोर ग्रांट ट्रंक रस्ता वाघ सीमेवरून जातो)  मधूनच गेली. सगळ्यांनी बसला अभिवादन केले. त्यातल्या त्यात सुखावणारी बाब.
            संध्याकाळी RETREAT CEREMONY सुरु झाली. यात दोन्ही सैनिक संचलन करतात व एकमेकांची शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात. (ते सुद्धा योग्य की अयोग्य हा प्रश्नच आहे.) ह्यावेळेस संध्याकाळी दोन्ही देशाचे ध्वज उतरवले जातात. कार्यक्रम प्रवेशद्वार रात्रीसाठी बंद होतात आणि जवान त्यांच्या सुरक्षेचा कामात पुन्हा व्यस्त होतात. कालच आपण भारत पाक मैत्रीसाठी आगाज केला आणि आज त्याचे विपरीत चित्र बघितल्यावर मन विषण्ण होतं. पण काहीका असेना आपले प्रयत्न चालूच राहणार.

भारत पाक दोस्ती झिंदाबाद!

संदर्भ:

http://www.pipfpd.org/


स्रोत: सागर पाटीलsgpatil4587@gmail.com

हरळी, सोलापुर येथील ज्ञान प्रबोधिनीच्या प्रकल्पावर ५ निर्माणींचे काम...

अश्विन भोंडवे (निर्माण ३) व डॉ. स्मिता तोडकर (निर्माण ४), तसेच कल्याणी राऊत, कार्तिकी आणि कल्याणी भोंडवे (निर्माण ५) असे ५ जण जून २०१४ पासून ज्ञान प्रबोधिनीच्या हरळी येथील प्रकल्पात रुजू झाले.

ज्ञान प्रबोधिनीचे हरळी, सोलापुरातील हे केंद्र डॉ. व. सी. ताम्हणकर (अण्णा) यांनी १९९३ च्या किल्लारी भुकंपानंतर मदतकार्याकरिता सुरु केले.  भूकंपग्रस्तांच्या आरोग्याच्या गरजा पुरवण्यासाठी सुरु केलेला हा प्रकल्प, गेल्या ११ वर्षांपासून हरळीमध्ये अनेक समाजोपयोगी कामे करत आहे. यात कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय, ज्ञान प्रबोधिनीची शाळा आणि गुरुकुल, प्रबोधन कृषी पर्यटन केंद्र, फळ प्रक्रिया उद्योग, आणि आरोग्यधाम हा येत्या जानेवारीत येऊ घातलेला प्रकल्प अशी अनेक कामे सुरु आहेत.

अश्विन भोंडवे व त्याची पत्नी  सौ. कार्तिकी जून २०१४ पासून हरळी मध्ये रुजू झाले. कार्तिकी येथील शाळेत शिक्षिका म्हणून काम करते, तर अश्विन इथे शिक्षण व ग्रामविकासामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल हा विषय घेऊन कार्यरत आहे. त्यामध्ये संगणकाचे शालेय शिक्षण तसेच इतर शालेय शिक्षणात संगणकाचा वापर, संस्थेच्या प्रशासनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सुसूत्रता आणणे, गुरुकुल व्यवस्थापनात सहभाग असा कार्यरत आहे.

कल्याणी राऊत येथे शिक्षण म्हणजे काय? व शिक्षणातील बारकावे समजून घेत आहे. त्यासोबतच ती तोरंबा व धानुरी या दोन गावातील ८ वी व ९ वी च्या मुलींकरिता ‘किशोरी विकास’ कार्यक्रमातून जीवन शिक्षण देते. सोबतच कृषी तंत्रनिकेतन (Agri Polytechnic) मध्ये 1st 2nd year च्या मुलांना Physics हा विषय शिकविते. तसेच ती शालेय मुलांकरिता Science Module देखील तयार करते आहे.

कल्याणी भोंडवे (निर्माण ५), अश्विनची लहान बहीण, इथे जुलै २०१४ पासून रुजू झाली. ती इथे कल्याणी राऊत हिला ‘किशोरी विकास’ व  Science Module तयार करण्यामध्ये मदत करत आहे.

डॉ. स्मिता तोडकर येथे Holistic Approach वर आधारित उभारण्यात येणाऱ्या “आरोग्यधाम” या प्रकल्पाकरिता निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून जून २०१४ ला रुजू झाली. 


आणि व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न सुरु. . .

हरळीमधील व्यसनमुक्ती कार्य्कार्माबद्दल डॉ. स्मिताच्या शब्दात,

“हरळी मध्ये रुजू झाल्यावर मी पहिल्या आठवड्यात इथे कार्यरत १४८ कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी केली. त्या दरम्यान या १४८ कार्यकर्त्यांपैकी जवळपास ६० पुरुष व २ महिला कार्यकर्त्या  तंबाखू व गुटखा यांचे सेवन करतात असे आढळले. यासोबतच हरळी व करवंजी या गावांमध्ये आठवड्यातून दोनदा अशा संध्याकाळच्या OPD भेटी सुरु केल्या. इथेही तंबाखू सेवनाचे हेच प्रमाण दिसून आले. त्याच दरम्यान “तम्बाखूमुक्त गडचिरोली करिता” निखिलचा mail आला. मग मात्र यावर काम करावे असे वाटू लागले. सोबतच दंत व मुखरोग यांचेही वाढते प्रमाण दिसू लागले. हे सर्व मग मी इथे कार्यरत अभिजीत दादा, गौरी ताई, अश्विन, अण्णा व लताताई यांच्या समोर मांडले. त्या सर्वांनी सहमती दिल्यानंतर मग आपल्याच कार्यकर्त्यांपासून या कामाची सुरुवात करावी असे ठरले. त्याच्या अंमलबजावणी करिता दि. १८ ऑगस्टचा सर्व  कार्यकर्त्यांच्या महिन्यातून होणाऱ्या मेळाव्याचा वापर करावा असे ठरले, नि कामाला सुरुवात झाली.

         या व्यसनमुक्तीपर प्रबोधन कार्यक्रमात आम्ही तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने शरीरावर होणारे दुष्परिणाम, त्याने ढासळणारी सामाजिक व आर्थिक बाजू, तसेच तंबाखू सोडण्याचे उपाय, व्यसनविरोधी गीते व घोषणा असे सादरीकरण केले. “सर्च” येथे कार्यरत प्रभाकर काका व संतोष भाऊ यांनी पाठविलेल्या गीतांची खूप मदत झाली. तसेच त्यादरम्यान इथे भेटीकरिता आलेल्या डॉ. उज्वला परीट व अश्विनी येर्लेकर (निर्माण ५) या दोघींनीही आमची बहुमोल साथ दिली. या सर्वांचा तसेच तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने होणारया मुखरोगाच्या व Cancer च्या फोटोंचा चांगला परिणाम होतो आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, हरळीमधील किरणा दुकान चालवणाऱ्या दोन कार्यकर्त्यांनी स्वतः तंबाखू न खाण्याचा निर्णय केला आणि सोबतच आपल्या दुकानात चालू असलेली तंबाखूची विक्री पूर्णपणे थांबवली...”

या कार्यक्रमाचा सातत्याने पाठपुरावा करून, हरळी आणि आजूबाजूच्या गावातील तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या या चमूचा मानस आहे. त्यांना या कामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

स्रोत: डॉ. स्मिता तोडकर, smt.todkar@gmail.com

Professional शिक्षण घेऊन सामाजिक योगदान देण्याचा मार्ग !

व्यावसायिक शिक्षण झालेल्या कौशल्यपूर्ण लोकांची अनेक सामाजिक संस्थांना गरज असते. ‘मी CA असेन तर सामाजिक योगदान कसे देऊ?’ असा प्रश्न पडलेल्या वेदवती लेलेने (निर्माण ५) ‘खेळघर’ सोबतच ‘कागद काच पत्रा कष्टकरी पंचायती’साठीही काम करण्यास सुरुवात केली आहे.

‘खेळघर’सोबत काम करता करता आपल्याला अजून कुठल्या संस्थेत योगदान देता येईल याच्या शोधात वेदवती होती. ‘पंचायती’शी संलग्न ‘SWACH’ या संस्थेत काम करणाऱ्या मैत्रिणीला अकाउंट्स शिकवत असताना तिला इथे Admin & Accounts System Development ची गरज असल्याचे लक्षात येताच तिने स्वतःहून पुढाकार घेतला व ‘पंचायत’ व ‘SWACH’ मध्ये पुढील जबाबदारी स्वीकारली:
·         दर महिन्याला अकाउंटच्या नोंदींची अंतर्गत तपासणी करणे.
·         दर महिन्याला अकाउंट्सचे रिपोर्ट बनवणे.
·         अकाउंट्सच्या व्यवस्थेत सतत सुधारणा करत राहणे

या जबाबदारीबद्दल बोलताना वेदवती म्हणाली “सध्या ३ दिवस SWACH व २ दिवस खेळघरमध्ये काम सुरू आहे. कधी कधी तारांबळ उडते,पण खूप मजादेखील येत आहे. मुख्य म्हणजे या दोन्ही कामांमुळे मी आर्थिकदृष्ट्या देखील स्थिर झाले आहे.”

            हा ५ संस्थांचा समूह १०,००० कचरा वेचकांसोबतकाम करतो. गेली २५ वर्षे कचरा वेचकांच्या अनेक प्रश्नांवर येथे काम होत आहे. ‘सत्यमेव जयते’मध्ये देखील ‘SWACH’ चे काम दाखवण्यात आले होते.

SWACH बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.swachcoop.com/
पंचायती बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.wastepickerscollective.org/


स्त्रोत- वेदवती लेले, vedvatilele@gmail.com