'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 December 2014

वैभवच्या नजरेतून ‘जन स्वास्थ्य सहयोग’

वैभव आगवणे (निर्माण २) व त्याची पत्नी ज्योती हे डॉक्टर जोडपं सप्टेंबर २०१४ पासून जन स्वास्थ्य सहयोग (JSS) या संस्थेत रुजू झाले. बिलासपूर जिल्ह्यातील बैगा आदिवासींच्या आरोग्य सर्वेक्षणाची जबाबदारी वैभव सांभाळत आहे. आपली नवी संस्था, नवे राज्य याविषयी सांगतोय वैभव
JSS २००० पासून छत्तीसगढ मधील बिलासपूर जिल्ह्यात कार्यरत आहे. बिलासपूर पासून साधारण २० किमी अंतरावर JSSचा दवाखाना आहे. दवाखान्यात मुख्यत: द्वितीय स्तराची (secondary level care) आरोग्य सेवा दिली जाते व काही आजारांसाठी व वयोगटासाठी तृतीय स्तराची आरोग्य सेवाही दिली जाते. ७० खाटांचा हा दवाखाना सतत भरलेला असतो. अगदी २००-४०० किमी लांबूनही रूग्ण येतात. दवाखान्याची ख्याती अनेक गावांमधे अशी आहे की इथे आलेला रुग्ण कितीही आजारी असेल तरीही बरा होउनच जातो! (ही मान्यता १००% खरे नाही !) असे वाटण्यामागे चांगली मिळणारी सेवा हे कारण तर असावेच पण मुख्य कारण असावे ते स्वस्तात होणारा उपचार. उदा. मोठी शस्त्रक्रिया होउन १५ दिवस दवाखान्यात उपचार घेणारा रुग्ण २००-३०० रूपये देउन गावात परत जातो आणि या दिवसात रुग्ण व त्याच्या नातेवाईकांसाठी १०रूपये प्रतिदिवस या दराने उत्तम जेवणही (नाश्ता + चहा + 2 वेळचे जेवण) उपलब्ध होते!
            JSS आजूबाजूच्या ५४ आदिवासी गावांमधे आरोग्यसेवा पुरविण्याचे कामही करते. या गावांचे ४ क्लस्टर केले असून त्यातील तिघांत छोटेखानी दवाखाना (सबसेंटर) कार्यरत आहे जेथे हप्त्यातून ठराविक दिवस डॉक्टर जाउन सेवा देतात. इतर दिवस ९ महिने निवासी प्रशिक्षण दिलेले आरोग्य सेवक उपलब्ध असतात जे उत्तम आरोग्यसेवा देतात.
            छत्तीसगड मध्ये २००३ पासून भा.ज.पा. शासन आहे, पण वरकरणी निरीक्षणातून असे दिसते की शासनाने सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. सार्वजनिक सेवेचे कर्मचारी गावांमधे सहसा दिसत नाहीत. लसीकरणही नीट होत नाही. गेल्या तीन महिन्यात किमान २० गोवर झालेली मुले आढळली व येथील २ गावांमधे कॉलराची साथही आली. नसबंदी कँम्पमधे झालेले दुर्दैवी मृत्यूतर सर्व जगासमोरच आलेले आहेत. गावांमधे लहान मुले, तसेच मोठ्या व्यक्तींमधेही कुपोषण सापडते. आदिवासींकडे जमिनीची उपलब्धता कमी आहे आणि त्यातही बैगा आदिवासींची स्थिती गोंड व इतर आदिवासींपेक्षा अजून खराब आहे.”
 वैभव आगवणे,  vaibhs.agavane2@gmail.com

1 comment: