'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 July 2017

कासपाड्याचे गंमत-जंमत शिबिर

वयम संस्थेने जव्हार, विक्रमगड अशा दुर्गम आदिवासी भागात मे महिन्याच्या सुट्टीत आदिवासी मुलांसाठी गंमत-जंमत शिबिरे आयोजित केली होती. लहान मुलांना खेळ, गाणी शिकविणे सोबतच आदिवासी समाज-संस्कृती-प्रदेश याची ओळख करून देणं हा या शिबिरामागचा उद्देश होता. याच पार्श्वभूमीवर ६ व ७ मे ला कासपाडा या आदिवासी पाड्यातील शिबिरात आपला मित्र योगेश्वर जोशी (निर्माण ७) सहभागी झाला होता. या शिबिराचा त्याचा अनुभव कसा होता हे वाचूया  योगेश्वरच्याच शब्दात...

शिबिराच्या पूर्वनियोजनासाठी ६ तारखेला आम्ही विक्रमगडला पोहचलो. वयम मधील कार्यकर्त्यांनी  आम्हाला पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज, आदिवासी संस्कृती, त्यांचा इतिहास याची थोडक्यात ओळख करून दिली. त्यानंतर आमचं पहिल्या दिवसाचं सर्वात महत्वाचं काम होतं - आजूबाजूच्या पाड्यातील मुलांना गोळा करून त्यांना शिबिराची माहिती देणे व आवर्जून यायला सांगणे. कासपाडा पकडून जवळच्या अलीमपाडा आणि डोयाचा पाडा अशा ३ पाड्यात आम्ही ७ जण तीन गटात विभागून गेलो. शिबिराची माहिती देणं, येणाऱ्या मुलांची नावनोंदणी करणं आणि छोटीशी वर्गणी म्हणून एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेणं हे काम आम्ही केले.७ मे हा शिबिराचा दिवस होता. सकाळी ८ वाजता मुलांना बोलावलं होतं. मनात उत्सुकता होती की किती मुलं येतील?  सकाळी ८ वाजता अंगणात येऊन बघतो तर मुलं यायला सुरुवात झाली होती. आंब्याच्या झाडाखाली आम्ही शिबिर घेणार होतो तिथे अर्ध्या-एक तासात बघता बघता ५० ते ६० मुलं जमली. सकाळी साडेआठ-नऊ पर्यंत खेळ घ्यायला आम्ही सुरुवात केली. काही खेळ मुख्यतः मनोरंजनासाठी, उत्साह वाढवणारे असे होते तर काही बौद्धिक चालना देणारे, खेळातून शिक्षण, विविध गोष्टींची ओळख करून देणे अशा उद्देशाने घेतले होते. कल्पकता बाहेर यावी यासाठी पण काही खेळ आम्ही घेतले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं त्यात रमली. त्यासाठी आम्हाला विशेष असे काही प्रयत्न करावे लागले नाहीत. हे सर्व खेळ खेळून मुलं खूप आंनदी होती आणि मला पण खूप मजा आली.
शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अनुभवातून मी काय शिकलो असे एका वाक्यात सांगायचं झालं तर माझ्या जाणीवा विस्तारल्या. आदिवासी पाडे कसे आहेत आणि तेथील लहान मुलांची शिक्षणाची परिस्थिती जवळून पाहिली. अजून एक छोटी पण माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे मला स्वतःला कधीच वाटलं नव्हतं की लहान मुलांशी मी चांगल्या प्रकारे वागू, बोलू शकेन पण या शिबिरामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाचा हा एक पैलू माझ्या समोर आला, त्यातून माझा आत्मविश्वास दुणावला आहे.
योगेश्वर जोशी, निर्माण ७

No comments:

Post a comment