'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 12 October 2018

श्वेता ढेंबरेची गांधी फेलो म्हणून कामास सुरुवात


मुंबईची श्वेता ढेंबरे (निर्माण ८) हिने नुकतीच गुजरातमधील सानंद येथे गांधी फेलो म्हणून काम सुरु केले आहे. तिच्या या निर्णयाबद्दल तिच्याच शब्दात...

पार्श्वभूमी:
            M.Sc. पर्यंतचे शिक्षण घेत असताना प्रत्येक वेळी प्रश्न पडायचा की मी जे शिकतेय त्याचा माझ्या आयुष्यात आणि समाजोपयोगी कामाशी काय संबंध आहे. दिवसेंदिवस शिक्षणाचा दर्जा खालवतो आहे याची तीव्र जाणीव होत होती. ज्या शिक्षण पद्धतीतून मी घडले त्याच शिक्षण पद्धतीतील दोष लक्षात येत होते. संपूर्ण शिक्षण पद्धतीला एकदम बदलणे मला अशक्य आहे; परंतु सध्याच्या परिस्थितीत मी काय करू शकते असा विचार करत होते. निर्माण च्या कॅम्पमध्ये सहभागी झाल्यामुळे मला माझे विचार सर्वांसमोर मांडण्याची ताकद मिळाली. आई-बाबांना समजावून सांगण्याचा मार्ग सापडला. त्याचदरम्यान काही निर्माणींकडून मला गांधी फेलोशिपबद्दल कळाले.
फेलोशिपबद्दल:
            Kaivalya Education Foundation (KEF) चा गांधी फेलोशिप हा दोन वर्षांचा रेसिडेंशिअल प्रोग्राम आहे. प्रत्येक गांधी फेलोला ते शाळांसोबत काम करावे लागते. गांधी फेलो त्या शाळेमध्ये लायब्ररी, बालसंसद, Assembly building as a Learning Aid यांवर शिक्षकांसोबत मिळून काम करतात. शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करणे तसेच त्यांच्या शिकवण्याच्या पध्दतीमध्ये सुधारणा घडवून आणणे हा मुख्य उद्देश आहे. फेलोशिप फक्त शाळेपुरती मर्यादित नाहीये. दर सहा महिन्यांमध्ये एक महिना फेलो तो काम करीत असणाऱ्या एका गावात राहतो. त्या एक महिन्यामध्ये गावात एका कुटुंबासोबत कुटुंबातील सदस्यांसारखे राहायचे. गावातील विविध समस्या जाणून घ्यायच्या आणि त्या समस्या दूर करण्यासाठी गावकऱ्यांना सक्षम करायचे असे कामाचे स्वरूप आहे.
माझा अनुभव/ शिक्षण:
            मी सध्या गुजरातमध्ये अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद या तालुक्यामध्ये काम करत आहे. ज्या सामाजिक समस्या मला मुंबईमध्ये जाणवल्या नव्हत्या त्या येथे जाणवत आहेत. इकडे बालविवाह ही पद्धत आजही आहे. अहमदाबादपासून फक्त २० किमी दूर असणाऱ्या या तालुक्यात १३ व्या वर्षी मुलांमुलींचं लग्न होतात. जातीवाद अजूनही इतका आहे की जर शाळेत जेवण बनवणारी स्त्री अनुसूचित जातीची असेल तर उच्च कुळातील मुले ते अन्न खात नाही. शाळेमध्ये दोन वेगवेगळ्या जातींतील मुलांचे छोट्याशा कारणावरून झालेले वाद गावामध्ये दोन जातीमध्ये भांडणाचे करण बनते. माझ्यासाठी हे पाहणे/ अनुभवणे नवीन आहे.
            या दोन वर्षात मी शिक्षण पद्धतीला जाणून घ्यायचा प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या सामाजिक समस्यांना समजून गावपातळीवर गावकऱ्यांसोबत काम करण्याचा अनुभव घेत आहे. स्वतःला पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि शिक्षण क्षेत्रात संशोधनाचा उपयोग करून बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे.

श्वेता ढेंबरे, निर्माण ८

No comments:

Post a Comment