'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 5 June 2024

सृष्टी आणि युवांची जीवनदृष्टी

५ जून हा जागतिक पर्यावरण दिन. खरंतर आता अशी परिस्थिती आहे की वर्षातील कुठलातरी एक दिवस हा पर्यावरण दिवस म्हणून निर्देशित करुन भागण्यासारखा नाही, तर प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येकच दिवस, त्यातील जगणे, नागरिक – ग्राहक – उत्पादक यापैकी कुठल्याही भूमिकेमधील आपले निर्णय आणि वर्तन, हे सर्वच पर्यावरणीयदृष्ट्या सुसंगत कसे असेल, कमीत कमी नुकसानदायक आणि शक्यतो पर्यावरण संवर्धन करणारे कसे असेल याचा विचार करणे हे अत्यावश्यक झाले आहे.

निर्माणच्या निमित्ताने विविध तरुण-तरुणींशी झालेल्या संवादात आम्हाला असे आढळून आले आहे की ‘ग्लोबल वॉर्मिंग’ बाबतीत अनेक युवांनी काहीना काही ऐकले असते, शाळेत थोडेफार वाचले असते. याबद्दल अगदीच अनभिज्ञ असणारे किंवा ‘क्लायमेट चेंज वगैरे झूट है’ असे म्हणणारे सहसा कोणी सापडत नाही. त्याबाबतीत भारतातील परिस्थिती अमेरिकेपेक्षा बरी आहे असे म्हणायला हवे. पण आपले युवा क्लायमेट चेंजविषयी निरक्षर जरी नसले तरी बहुतेकांची समज ही साधारण इयत्ता आठवीच्या दर्जाची असते. कारण त्यानंतर फारसे कोणी काही वाचलेच नसते. या विषयाचे गांभीर्य, त्याची व्याप्ती आणि तीव्रता, त्यासंबंधीचे विज्ञान व फॅक्टस, त्वरित कृतीची निकड, कृतीच्या विविध शक्यता व पर्याय, माझ्या वैयक्तिक जगण्यातील निर्णयांची पर्यावरणीय किंमत इ. बद्दल अनेकांना फारच जुजबी माहिती असते. २१व्या शतकातील आपल्या सगळ्यांच्याच जगण्याला क्लायमेट चेंजचा आयाम हा टाळून चालण्यासारखा नाही. त्यादृष्टीने, विशेषत: युवांचा विचार सुरू व्हावा म्हणून काही मुद्दे:

१. युवांनी सर्वप्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की क्लायमेट चेंजच्या विषयाचे सर्वात जास्त महत्त्व हे, प्रौढ अथवा वृद्ध व्यक्तींपेक्षाही अधिक, तरुणांसाठी आहे. असे समजा की एक आगगाडी चालली आहे आणि पुढे दूरवर एक दरी आहे. जे लोक अधेमध्येच गाडीतून उतरणार आहेत त्यांना गाडीचे पुढे जाऊन काय होणार याची फार फिकीर असेलच असे नाही. पण जे लोक गाडी दरीत कोसळायची वेळ येईल तोपर्यंत गाडीत बसून असणार आहेत त्यांच्यासाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न आहे. गाडीची सध्याची दिशा काय, वेग काय, तिला ब्रेक्स कसे लावता येतील, स्टीअरिंग व्हीलद्वारे दिशा कशी बदलवता येईल हे सर्व केवळ काल्पनिक नाहीत तर अस्तित्वाशी घट्टपणे निगडित असे प्रश्न आहेत. आणि यांची उत्तरे शोधायची सर्वाधिक गरज, जबाबदारी आणि संधी ही युवांकडेच आहे. परिस्थितीचे हे गांभीर्य आणि निकड ध्यानात घेऊन त्यानुसार आपल्या क्षमतांना आणि ऊर्जेला ध्येयाकडे केंद्रित करणे हे माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींसाठी अनिवार्य आहे.

२. क्लायमेट चेंज बाबतचे नविनतम विज्ञान समजून घेत राहणे आवश्यक आहे. ‘ऑल इज वेल सिनारिओज’ किंवा ‘डूम्स डे सिनारिओज’ या दोन्हींच्या पलीकडे जाऊन नेमके फॅक्टस काय आहेत, उत्तरांच्या संभावना काय आहेत, त्यांची परिणामकारकता व मर्यादा काय आहेत, तसेच संबंधित राजकारण आणि अर्थकारण या विषयी समज विकसित होणे गरजेचे आहे. अगदी वैज्ञानिक जर्नल्स मध्ये प्रकाशित होणारे शोधनिबंध वाचणे कदाचित सगळ्यांना शक्य होणार नाही. पण अनेक चांगली पुस्तके आणि डॉक्युमेंटरीज आहेत ज्या द्वारे अभ्यासाला सुरुवात करता येईल. मराठीमध्ये अतुल देऊळगावकर यांनी या विषयाबाबतीत विपुल लेखन केले आहे. नुकतेच ‘सृष्टिधर्म’ हे कमलाकर साधले यांचे माहितीपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले आहे. सोबतच इंग्रजीमधील काही सुंदर पुस्तके सुचवायची झाली तर ‘द अनइनहॅबिटेबल अर्थ’ हे डेविड वॉलेस-वेल्स यांचे अप्रतिम पुस्तक, बिल गेट्सचे ‘हाऊ टू अव्हॉईड अ क्लायमेट डिझास्टर’, रामचंद्र गुहा यांचे ‘हाऊ मच शुड अ पर्सन कंझ्यूम’, वक्लाव्ह स्मिल यांचे ‘नंबर्स डोन्ट लाय’ व ‘हाऊ द वर्ल्ड रिअली वर्क्स’, एलिझाबेथ कोलबर्ट यांचे ‘अंडर अ व्हाईट स्काय’, डिटर हेल्म यांचे ‘नेट झिरो’ या काही पुस्तकांचे अगदी जरुर वाचन करावे. सोबतच अल गोर यांची ‘ऍन इनकनव्हिनियंट ट्रूथ’, लिओनार्दो डि कॅप्रिओची ‘बिफोर द फ्लड’, डेव्हिड अटेनबरो यांची ‘अ लाईफ ऑन अवर प्लॅनेट’, यान आर्थस-बर्ट्रन्ड यांची ‘होम’ अशा काही अत्यंत सुंदर डॉक्युमेंटरीज देखील बघता येतील.

३. उत्साहाला मोजमापाची आणि सातत्याची जोड देणे आवश्यक आहे. अन्यथा दर वर्षी पावसाळ्यात त्याच त्याच खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणारे अनेक उत्साही युवक गट आपण बघत असतो. पण केलेल्या उपक्रमांचे नेमके फलित काय, किती झाडे जगली, त्यांची वाढ कशी आहे, त्यांना योग्य पाणी व खत मिळते आहे का, इ. बाबी बघत राहणे व जरुर तेथे सुधारणा करणे गरजेचे आहे. या पलीकडे जाऊन ज्या कुठल्या विद्याशाखेमध्ये आपण शिक्षण घेत असू त्याचा पर्यावरणाशी काय संबंध आहे, इंटर्नशिप, प्रोजेक्टस अथवा थिसिस करतांना क्लायमेट चेंजच्या मुद्द्याला समर्पक असे विषय निवडता येतील का हे शोधता येईल. यातून पर्यावरण बदलाचा प्रश्न हा निव्वळ छंद किंवा प्रासंगिक सेवेपुरता मर्यादित न ठेवता त्याकडे एक व्यापक, गुंतागुंतीची, गहन समस्या सोडविण्याचा सर्जनक्षम अनुभव म्हणून बघण्याची सवय लागेल.

४. काही दिवसांपूर्वी RIBA म्हणजेच रॉयल इंस्टीट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सचे माजी अध्यक्ष श्री. सुनंद प्रसाद हे आमच्याकडे गडचिरोलीला आले होते. पाश्चिमात्य देशांमध्ये सध्या ग्लोबल वार्मिंगविषयी असलेली तोकडी कृतीशीलता बघून ते फार अस्वस्थ होते. त्यांच्यामते सुमारे दहा वर्षांपूर्वीपर्यंत तिकडे बरीच जागरूकता निर्माण झाली होती. पण त्यानंतर मात्र तेल कंपन्या आणि इतर कॉर्पोरेट हितसंबंध यांनी अगदी सुनियोजितपणे मोहीम उघडून पर्यावरणाच्या विषयाबाबत आणि त्यावर काम करत असलेल्या वैज्ञानिक व कार्यकर्त्यांविषयी संशयाचे व अविश्वासाचे वातावरण पैदा केले. त्यामुळे या चळवळीची मोठी पीछेहाट आजच्या स्थितीत झाली आहे असे सुनंद यांचे म्हणणे होते. भारतात देखील असे होऊ घातले आहे का हे आपण काळजीपूर्वक तपासात राहायला हवे. पर्यावरणीय कृती किंवा पर्यावरणरक्षणाच्या मुद्द्यांना गांभीर्याने घेणे हे जणू विकास-विरोधी आहे, विकास हवा असेल तर थोडा फार निसर्गाचा नाश अटळ आहे असे आजकाल बर्‍याचदा भासवले जाते. युवांना हे लक्षात घेणे आवश्यक आहे की असे व्हायची गरज नसून, सुंदर निसर्ग आणि निरोगी पर्यावरण हे खरेतर सम्यक विकासाचे एक महत्त्वाचे अंग आहे, वैशिष्ट्य आहे. त्याला हानी पोहोचवणारे प्रकल्प, योजना वा कार्यपद्धती या उलट मुळात विकास-विरोधी आहेत. निवडणुकांमध्ये मत देताना देखील धर्म, जात अशा फूटीच्या राजकारणाला बळी न पडता पर्यावरणीय कृती ही ज्यांच्या विचारांमध्ये आणि जाहीरनाम्यात अग्रस्थानी आहे अशांना मत देण्याची आता वेळ आली आहे.


५. माझ्या दैनंदिन जगण्यात मी अधिकाधिक पर्यावरण सुसंगत कसा जगू शकतो? तरुण-तरुणी घरी, हॉस्टेल, फ्लॅट्स, कॉलेज कॅम्पस असे जिथे कुठे असतील तिथे विचारपूर्वक कृती करू शकतात आणि आपली एन्व्हायर्नमेंटल फूटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयत्न करु शकतात. दुर्दैवाने अनेक ठिकाणी असे चित्र पाहायला दिसते की जिथे कॉलेज प्रशासनावरील आपला राग व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी सुट्टीत घरी जातांना देखील हॉस्टेल रूम्सचे सर्व दिवे व पंखे मुद्दामहून सुरु ठेवून जातात, काही ठिकाणी गच्चीत असलेले सोलर पॅनल्स उगाच मस्ती म्हणून फोडले जातात. असले बेजबाबदार वर्तन योग्य नाही हे युवांना उमजले पाहिजे. हॉस्टेलच्या पार्किंगमध्ये अनेकविध आकर्षक (पण वाईट मायलेज असलेल्या) बाईक्स उभ्या असलेल्या दिसतात. सहसा विद्यार्थी कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला गेला की पालकांकडून कौतुकाची भेट म्हणून या घेतलेल्या असतात. त्यांचा वापर बहुतांश वेळेस एक किलोमीटरच्या परीघात कॉलेजच्या आवारात फिरण्यासाठी होतो. हे टाळून या ऐवजी सायकलने अथवा पायी जाणे हे आता ‘कूल’ समजले पाहिजे. नाहीतर पृथ्वी ‘हॉट’ होणार आहे!

६. सरतेशेवटी हे महत्त्वाचे सत्य लक्षात घ्यायला हवे की सृष्टीचा प्रश्न हा अनेक बाबतीत युवांच्या जीवनदृष्टीशी निगडित आहे. ‘ज्यादा से ज्यादा पैसा कमाओ और चाहे जो ऐष करो’ अशी चंगळवाद वाढवणारी प्रवृत्ती ही पर्यावरणविघातक तर आहेच पण सोबतच ‘नवनवीन गोष्टी, सेवा, अनुभवांवर पैसा खर्च करणारा एक ग्राहक’ अशीच जर युवांकडे बघण्याची (आणि युवांची स्वत:कडे बघण्याची) दृष्टी प्रबळ होत असेल तर ती एक मोठी शोकांतिका आहे. ‘बेपर्वा उपभोग घेणारा’ यापलीकडेही माझ्या अस्तित्वाला काही अर्थ आहे काय याचा प्रामाणिक शोध युवांनी घेण्याची गरज आहे. निसर्गापासून आणि आपल्या सामुदायिक मुळांपासून फारकत झाल्याने आलेला एकटेपणा कसा सोसावा हे न कळल्याने अनेक युवा वाढीव उपभोगवादाकडे वळतात. उठसुठ ऍमेझॉन, स्विगीवरुन येणारे पार्सल्स हे त्याचेच द्योतक आहेत. दरवर्षी जगात होणार्‍या मानवनिर्मित कार्बन एमिशन्सच्या 8% हे सिमेंटच्या प्रॉडक्शन मधून होते. मग मी गरज नसतांनाही नवीन घर बांधायलाच हवे का? दोन, तीन, चार फ्लॅट्स विकत घ्यायलाच हवेत का? नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी असे सांगतात की आपली मिळकत जर 10% नी वाढली तर आपले कार्बन उत्सर्जन 9% ने वाढते. असे होणार नाही अशा पद्धतीने त्या वाढीव मिळकतीचा उपयोग युवा मित्र-मैत्रिणींना करता येईल का?


2021 ते 2031 हे जसे ‘यूथ फ्लरिशिंग’चे दशक असणार आहे तसेच ते ‘अपरिवर्तनीय क्लायमेट चेंजला रोखण्याचे’ देखील (शेवटचे) दशक असणार आहे. भारतीय युवा या आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहेत का?

अमृत बंग


लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा लेखकाच्या लोकसत्ता लेखमालेतील सदरात प्रकाशित झालेला लेख आहे.




Saturday 1 June 2024

युवांचा अर्थपूर्ण करियरचा शोध - अभिमन्यू ते अर्जुन व्हाया सिद्धार्थ


युवांपुढच्या व त्यांच्या पालकांच्या मनातील विविध प्रश्नांपैकी त्यांना सगळ्यात कळीचा वाटणारा एक प्रश्न म्हणजे युवांचे करियर. बारावीनंतर काय करावे, कुठल्या कोर्सला प्रवेश घ्यावा, कशात ‘स्कोप’ आहे, इ. बाबत माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून त्याविषयी बोलणे मी टाळणार आहे. करियर म्हणजे केवळ कुठली डिग्री करावी इतका मर्यादित मुद्दा नसून मला नेमके जीवनात काय करायचे आहे याचा विचार आहे. प्रसिद्ध जर्मन समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांच्या ‘वर्क कॉन्ट्रिब्यूट्स टू साल्व्हेशन’ या धर्तीवर आपले करियर म्हणजे समाजाशी (काहींसाठी देवाशी) असलेली आपली नाळ. जीवनातला सर्वात अधिक वेळ ज्या गोष्टीत जाणार, ज्यातून समाजावर आपला काहीएक परिणाम होणार, अपत्यांव्यतिरिक्त काही ‘लेगसी’ राहणार आणि पृथ्वीतलावरील मर्यादित वास्तव्यादरम्यान व्यक्तिश: काही केल्याचे आपल्याला समाधान मिळणार अशी बाब म्हणजे करियर! अशा करियर निवडीसाठीच्या निकषांचा आणि करियरच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये युवांची मनोभूमिका कशी असावी याबाबतचा काही ऊहापोह मी करणार आहे.

1. शिक्षणाने काय साध्य व्हावे याबाबत विनोबांनी म्हटले आहे आर्थिक, बौद्धिक व मानसिक असे त्रिविध स्वावलंबन! सर्वात पहिली बाब म्हणजे स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू नये म्हणून प्रत्येक तरुणाने आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. सध्याचा १०% बेरोजगारीचा दर चिंताजनक आहेच. पण काम मिळत नाही म्हणून बेरोजगार असणार्‍यांसोबतच वर्षानुवर्षे एका डिग्रीनंतर दुसरी डिग्री, एका परीक्षेनंतर दुसरी (स्पर्धा) परीक्षा अशा न थांबणार्‍या ट्रेडमिलवर आपले अनेक युवा आहेत हे देखील काळजी करायला लावणारे वास्तव आहे. म्हणूनच निव्वळ पदव्यांच्या मागे न लागता काही कौशल्य अंगी बाणवणे आणि लवकरात लवकर स्वत:च्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी स्वयंपूर्ण होणे ही युवांच्या करियर वाटेवरील प्राधान्याची बाब असावी. पालकांनीही त्यांच्या पाल्याला स्वावलंबी बनण्यास प्रोत्साहन द्यावे, ते आवश्यक करावे.


2. दुसरी बाब म्हणजे त्याची बुद्धी स्वयंभू बनणे आणि तो स्वतंत्रपणे विचार करू शकणे, गरज भासेल तशी नवी आवश्यक ज्ञानप्राप्ती करू शकणे. एकविसाव्या शतकातील सातत्याने आणि वेगाने बदलत असलेल्या काळात खरा ‘स्कोप’ व ‘सिक्युरिटी’ त्यांनाच राहील जे वेळेनुसार सतत शिकून नवीन गोष्टी आत्मसात करू शकतील. आताचे करियर म्हणजे ‘एकदाचा सेटल होऊन जा कसा’ असा मामला राहणार नाही. म्हणून युवांनी देखील कामाच्या संधी शोधताना ‘कमी काम, बक्कळ दाम आणि जादा आराम कुठे’ असा विचार न करता उलटपक्षी जिथे त्यांना भरपूर मेहनत करण्याचा, नवीन कौशल्ये शिकण्याचा, विविध जबाबदार्‍या व आव्हानांना सामोरे जाण्याचा अवकाश मिळेल अशा पर्यायांचा सक्रियपणे शोध घ्यावा. कामाव्यतिरिक्त स्वत: प्रयत्नपूर्वक वाचन व ‘ऑनलाईन लर्निंग’ करावे. गरजांपुरतीचे आर्थिक स्वावलंबन साधल्यानंतर निव्वळ जादा कमाईच्या मागे धावण्यापेक्षा ज्यातून लांब पल्ल्याचे ‘करियर कॅपिटल’ विकसित होईल अशा बाबींवर प्रयत्न केंद्रित करणे युवांसाठी उपयुक्त असेल. यामध्ये कौशल्य प्राप्ती, सामाजिक वास्तवाचे आणि जग कसे चालते याचे आकलन, ‘कनेक्शन्स व मेंटरशिप’, विश्वासार्हता, नैतिकता व रोल मॉडेल्सचे ‘बेंचमार्क्स’, इ. गोष्टींचा समावेश होतो. या काळात युवा कोणासोबत, कशासोबत वेळ घालवतात हा त्यांच्या वैयक्तिक वाढीचा आणि चारित्र्याचा प्रमुख कारणीभूत घटक असतो.

3. विनोबांनी सांगितलेली तिसरी बाब म्हणजे स्वत:च्या मनावर व इंद्रियांवर ताबा मिळवण्यास शिकणे. व्यवस्थापन शास्त्रात म्हण आहे की ‘यू गेट हायर्ड फॉर युअर ऍप्टिट्यूड अँड फायर्ड फॉर युअर ऍटिट्यूड’. एक जबाबदार युवा, कार्यकर्ता, नागरिक बनत असतांना माझ्या वृत्तीला आणि वर्तनाला मी योग्य वळण कसे देतो हा अत्यंत महत्त्वाचा पण दुर्दैवाने बव्हंशी दुर्लक्षित विषय राहतो. यावर स्वत:हून लक्ष देणे, गरजेनुसार इतरांकडून अभिप्राय घेणे आणि आवश्यक ते बदल करणे हे युवांच्या यशस्वी करियरसाठी अत्यावश्यक आहे.

4. माझे मेंटर, एमकेसीएलचे संस्थापक श्री. विवेक सावंत यांच्याकडून तरुण वयात मला मिळालेला अत्यंत उपयुक्त सल्ला म्हणजे आपला जगाकडे बघायचा दृष्टीकोन आणि मनोभूमिका कशी ठेवावी तर ‘मी इथे देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही!’ मला अनेक तरुण-तरुणी ते जे काही करत आहेत त्यात सतत "मला काय मिळेल" अशा वंचकाच्या मानसिकतेत दिसतात. आणि कदाचित म्हणूनच बर्‍याचदा दु:खी वा चिंताग्रस्त असतात. सध्याची एकूणच व्यक्तिवादी विचारपद्धती, स्वकेंद्री शिक्षण, व कधी कधी पालकांचे अवास्तव प्रेम हे सगळेच युवांमध्ये एक प्रकारची ‘चाईल्ड मेंटालिटी’ भरवत असते. त्यामुळे जगाकडे, कामाकडे, करियरकडे, नातेसंबंधाकडे बघतांना, अगदी जोडीदाराची निवड करतानादेखील ‘यामध्ये माझ्यासाठी काय, मला काय मिळेल?’ असा युवांचा दृष्टीकोन दिसतो. जणू मी सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे आणि माझ्या अपेक्षा, आकांक्षा, आवडी पूर्ण करण्याची जबाबदारी ही इतरांची, समाजाची आहे हा भाव युवांच्या ‘ऍडल्ट’ बनण्याच्या मार्गात अडथळा तर ठरतोच पण सोबतच सततच्या असमाधानाला देखील कारणीभूत ठरतो. त्यापेक्षा मी इतरांना काय देऊ शकतो असा विचार केल्यास केवळ तक्रारी करणे वा स्वत:लाच कुरवाळण्यापेक्षा आपल्या हातात काय यावर लक्ष देता येते, उपाय-केन्द्रित सक्षम भूमिकेतून विचार होतो, उत्साही वाटते आणि आपण उपयुक्त व सकारात्मक अशी काही तरी कृती करण्यात गुंततो. वाढत्या वयानुसार हे संक्रमण होणे हे जबाबदार तरुण बनण्याचे महत्त्वाचे लक्षण आहे.

5. यापुढचे आव्हान म्हणजे डिग्रीच्या, सोशल मीडिया फॉलोअर्सच्या आणि पुरस्कारांच्या यशाला भूलून न जाता जीवनात प्रत्यक्ष कर्तृत्व करून दाखवणे आणि निव्वळ ‘सेल्फ प्रमोशन’ न करता प्रामाणिकपणे आपल्या कामाचा परिणाम तपासणे. यशाच्या या ‘ऍसिड टेस्ट’कडे लवकरात लवकर वळून त्याचा गंभीरपणे अवलंब करणे हे ज्यांना ‘लंबी रेस का घोडा’ व्हायचे आहे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. सध्याच्या जॉब मार्केटमध्ये रेझ्युमेची आणि लिंक्डइन प्रोफाईलची चलती आहे. मला अनेक तरुण मुला-मुलींच्या बाबतीत जाणवतं की त्यांची निवडप्रक्रिया व निर्णय हे त्यांच्या मनातल्या एका काल्पनिक रेझ्युमेवर त्यांचं आयुष्यं कसं दिसेल या पद्धतीने होतात. जगण्याची प्रत्येक पायरी किंवा पुढचा टप्पा त्या रेझ्युमेवर पुढची ओळ कशी दिसायला हवी या रीतीने आखल्या जातो. इथे मग सामाजिक काम देखील एक ‘एक्झोटिक व्हॉलंटियरिंग एक्सपिरीयन्स’ बनतो. इतका ‘शॉर्ट साएटेड’ विचार मला फार संकुचित आणि दु:खद वाटतो. ‘समाजाला कशाची गरज आहे, मला काय जमतं आणि मी काय देऊ शकतो’ असा विचार करून प्रत्यक्ष जीवनात कुठला प्रश्न सोडवायला घेतला, त्यात काय परिणाम साध्य केला यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. भारताचे युवा स्वत:च्याच रेझ्युमेचे ‘कंझ्युमर’ बनतात की समाजासाठी योगदान देणारे ‘प्रोड्यूसर’ बनतात हा कळीचा मुद्दा राहील.

6. सरतेशेवटी तात्कालिक फायद्या-तोट्याच्या पलीकडे जाणारं काहीतरी लांब पल्ल्याचं स्वप्नं, ज्याच्या आधारावर माझ्या जगण्याला काही दिशा प्राप्त होईल असा पर्पज / उद्देश्य शोधता येणं हे युवांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आणि जबाबदारी आहे. शिक्षण घेणे हे काही आयुष्यातलं अंतिम ध्येय नाही. ते एक साधन आहे, आणि म्हणूनच ते नेमकं कशासाठी वापरलं पाहिजे याविषयी चिंतन होणं आवश्यक आहे. स्वत:च्या नेमक्या आर्थिक गरजांची कल्पना येऊन त्याबाबत स्वावलंबी बनणे ही करियरकडून असलेली प्राथमिक अपेक्षा. पण या पुढचा प्रश्न हा निव्वळ उपजीविकेचा नाही तर जीविकेचा आहे, या जीवनाचे काय करु हा आहे.


माझ्या जीवनाचा उद्देश्य काय? माझा नेमका पर्पज काय?

निर्माणद्वारे युवांच्या केलेल्या अभ्यासात आम्हाला सापडले की 85% युवा ‘माझ्या जीवनाचा उद्देश्य काय? माझा नेमका पर्पज काय?’ यावर आठवड्यातून किमान एकदा विचार करतात मात्र केवळ 37% युवांना असे वाटते की त्यांच्या कॉलेजच्या/कामाच्या ठिकाणचे वातावरण हे याचा शोध घेण्यासाठी अनुकूल आहे. या शोधासाठी नीट संधी न मिळाल्यामुळे बाहेरच्या जगात जी काही फॅशनेबल उत्तर आहेत त्यांचाच अवलंब करायचा याव्यतिरिक्त दुसरा पर्याय बहुतांश युवांसमोर उरत नाही. आर्थिक असुरक्षिततेचा बागुलबुवा करून, सेटल होण्याच्या अवाजवी अपेक्षा आणि अमर्यादित उपभोगाच्या आकांक्षा तयार करून तरुण वयातील कृतीशीलता व जीवनाविषयक प्रयोगशीलता खुंटून टाकणे हे योग्य नाही. तरुणांचे जीवन म्हणजे निव्वळ अर्थव्यवस्थेत विकण्याचे उत्पादन नाही. मला असं वाटतं की या युवा पिढीला अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य जगण्याचा हक्क आहे. मात्र ‘स्व:’ची आणि ‘स्वधर्मा’ची ओळख ही निव्वळ गुहेत बसून नाही तर समाजाच्या गरजांना सामोरे जाऊन होते. निर्जीव माहितीचे भेंडोळे, परीक्षा व पदव्यांचा सुळसुळाट, रेझ्युमेची शर्यत, ‘सक्सेस’ची जीवघेणी स्पर्धा, अवाजवी आर्थिक अपेक्षांचे ओझे आणि आत्ममग्नता यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या युवा अभिमन्युंचा ‘माझा स्वधर्म काय’ हा शोध घेणारा अर्जुन व्हावा अशी आशा! आणि यासाठीचा मार्ग म्हणजे सिद्धार्थाप्रमाणे आपल्या महालाच्या बाहेर पडून समाजातील प्रश्न व आव्हाने काय हे समजून घेणाच्या प्रयत्न करणे. निव्वळ अर्थप्राप्तीपेक्षा अर्थपूर्ण जगण्याच्या या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपला निरोप घेतो!


   अमृत बंग

लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा लेखकाच्या लोकसत्ता लेखमालेतील सदरात प्रकाशित झालेला लेख आहे.





Wednesday 29 May 2024

सामाजिक कार्य का? - समाजबदलाच्या कृतींची आणि सामाजिक क्षेत्राची नेमकी गरज काय यासाठीचे सहा आयामी फ्रेमवर्क

सध्या सुरू असलेल्या आमच्या निर्माण उपकमाच्या पुढील बॅचच्या निवडप्रक्रियेसाठी भारतभरातून युवक-युवती अर्ज पाठवत आहेत. समाज परिवर्तनासाठी सहभाग नोंदवण्याची, प्रसंगी झोकून द्यायची त्यांची भावनिक प्रेरणा अतिशय उत्तम आहे. मात्र या मार्गावर लांब पल्ल्यात टिकायचे असल्यास आणि तात्कालिक यशापयशाने भुलून वा खचून जायचे नसल्यास काही एक वैचारिक स्पष्टता व आधार आवश्यक आहे. मी सध्या जे करतोय त्याचा कंटाळा आलाय, मला सामाजिक कामात समाधान लाभते, याला एक ग्लॅमर आहे या किंवा अशा इतर केवळ वैयक्तिक कारणांच्या पलीकडे जाउन मुळात सामाजिक कार्याची अथवा सामाजिक क्षेत्राची गरज काय यासंबंधी मूलभूत विचार करणे जरुरी आहे. पुढे जाऊन भ्रमनिरास व्हायचा नसेल आणि येणारी आव्हानं पेलायची असतील तर ही स्पष्टता मिळवणं भाग आहे.

सुप्रसिद्ध अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ पीटर ड्रकर यांचे 'मॅनेजिंग द नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन' हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्यात ते असं म्हणतात की शासकीय क्षेत्राची प्रमुख भूमिका म्हणजे समाजाला सुरळीतपणे कार्य करण्यास सुकर व्हावे यासाठीचे विविध कायदे कानून, धोरणे व नियम बनवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. खाजगी क्षेत्राचं मुख्य काम म्हणजे लोकांना आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा उत्पादित व वितरित करणे. मग सामाजिक क्षेत्राचं मुख्य काम काय? पीटर ड्रकर असं म्हणतात की 'चेंज्ड ह्यूमन बीइंग्स' म्हणजेच ‘माणसं घडवणे’ ही सामाजिक क्षेत्राची प्राथमिक भूमिका आहे. एखादा खाजगी विक्रेता जेव्हा अमुक वस्तू विकतो आणि ग्राहक त्याचे पैसे देतो तेव्हा त्यांच्यातील व्यवहार संपला असे मानले जाईल. तथापि, सामाजिक क्षेत्र एवढ्यावरच समाधान मानून थांबू शकत नाही. व्यक्तीचा विकास होतो आहे की नाही, त्या व्यक्तीच्या अंतरंगात व बाह्य जीवनात, वर्तनात बदल होतो आहे की नाही यावरुन सामाजिक कार्याचे आणि त्याच्या परिणामकारकतेचे मोजमाप केले जाईल, करायला हवे. यामुळे सामाजिक क्षेत्राची भूमिका एकाचवेळी अतिशय रोमांचक आणि आव्हानात्मक अशी बनते.

या व्यापक भूमिकेला अनुसरून मग प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर सामाजिक क्षेत्राची नेमकी व्याप्ती काय, कामाचे ठोस प्रकार व त्याचे विविध पैलू काय या विषयी मी एक सहा-मितीय रचना सुचवतो:-



1. लोकसेवा: 

समाजातील सर्वात गरजू आणि राजकीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना जीवनावश्यक सेवा मिळवून देणे, प्रसंगी स्वत: ती सेवा देणे, कारण सहसा शासन व बाजार व्यवस्था त्यांच्यापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाही किंवा पोहोचू इच्छित नाही. ग्रामीण, आदिवासी भागात किंवा शहरी झोपडपट्ट्यांमधील वंचित लोकांसोबत काम करणारे अनेक सामाजिक उपक्रम या पैलूवर काम करत असतात. महत्त्वाचा एक फरक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे तो आहे मानसिकतेचा. ‘एखादी सेवा पुरवणे’ ही खासगी क्षेत्राची मानसिकता आहे, तर ‘गरजू लोकांची सेवा करणे’ ही सामाजिक क्षेत्राची मानसिकता आहे, असायला हवी.


2. लोक सक्षमीकरण: 

सत्तेचा असमतोल आणि विषमता दूर करण्याच्या उद्देशाने व्यक्तींना सक्षम करणे आणि विकेंद्रीकरणाच्या व लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला बळकट करणे हे सामाजिक क्षेत्राचे अत्यावश्यक कार्य आहे. इंग्रजीतील ‘एंपॉवर’ हा शब्द बघा, ‘पॉवर’ पासून आलेला आहे. खासगी क्षेत्राकडे आर्थिक पॉवर आहे. शासकीय क्षेत्राकडे राजकीय, नोकरशाही, दंडशक्ती आणि संसाधन वाटपाची पॉवर आहे. सहसा असं दिसेल की हे दोन्ही क्षेत्र त्या सत्तेला घट्ट पकडून ठेवतात. नागरिकांनी निव्वळ मतदार, योजनांचे लाभार्थी, ग्राहक किंवा नोकर बनून रहावं, बाकीची सत्ता अधिकाधिक प्रमाणात स्वतःच्या हातात केंद्रित व्हावी अशी मानसिकता सरकारी व खाजगी क्षेत्रांत सहसा दिसते. हे शक्तीचे असंतुलन दूर करून लोकांना सक्षम करणं, जेणेकरुन ते स्वतः त्यांचे प्रश्न सोडवू शकतील आणि स्वतःच्या जीवनाचे सुकाणू हातात घेऊ शकतील, असे काम हे सामाजिक क्षेत्राचा आत्मा आहे. नुसतीच सेवा केली पण लांब पल्ल्यातही जर समोरची व्यक्ती स्वत:च्या पायावर उभी राहण्यास स्वतंत्र झाली नाही तर ती सेवा तर निव्वळ सामाजिक क्षेत्राची ‘रोजगार हमी योजना’ होईल. लोकांना आत्मनिर्भर होण्यास मदत करणं, त्यांच्यातल्या अव्यक्त सामर्थ्याला पूर्णत्वाने बहरता येणं, आणि याद्वारे विकसित, स्वायत्त आणि जागरुक 'चेंज्ड ह्यूमन बीइंग' घडवणं हे सामाजिक क्षेत्राच्या अस्तित्वाचा गाभा आहे.


3. प्रश्न सोडविण्याचे पथदर्शी प्रयोग:

सामाजिक समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारचे तांत्रिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक व लोकसहभागाचे प्रयोग करणे आणि कल्पक व नाविन्यपूर्ण उपाय शोधणे. लोकांशी व त्यांच्या प्रश्नांशी जवळीक असणे, शासकीय नोकरशाहीतील लाल फितीचे बंधन नसणे आणि कॉर्पोरेट क्षेत्रामधील दर तिमाही नफा मिळवायचा दबाव नसणे ही सामाजिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये आहेत जी या क्षेत्राला एक गतीशीलता आणि लवचिकता देतात. हे स्वातंत्र्य सामाजिक संस्थांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी आणि समस्या निवारणाचे सर्जनशील उपाय विकसित करण्यासाठी वापरले पाहिजे. ‘कुठलीही समस्या ज्या समजेतून निर्माण झाली त्याच पातळीवरून सोडवली जाऊ शकत नाही’ हे अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. म्हणूनच ‘सोशल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’ साठी सृजनात्मक उपाय, कृतीशील ज्ञाननिर्मिती व पुराव्यावर आधारित पद्धती विकसित करणे हे सामाजिक क्षेत्राचं तिसरं महत्त्वाचं काम. तथापि, पुरेशी चाचपणी व चाचणी न करताच ‘यशस्वी मॉडेल’ म्हणून फार चटकन यशाचा दावा करण्याचा बौद्धिक अप्रामाणिकपणा हा अन्यांची दिशाभूल करणारा आणि शेवटी सामाजिक क्षेत्राच्याच विश्वासार्हतेला बाधा आणणारा असतो. म्हणून त्या प्रकारच्या पळवाटेपासून सावध राहणे आवश्यक आहे.


4. व्हिसल ब्लोअर: 

समाजामध्ये जेव्हा कुठे अन्याय, अत्याचार किंवा भ्रष्टाचार होत असेल अशा प्रसंगी “जागल्या” म्हणून भूमिका पार पाडणे. राजकीय, सरकारी वा खाजगी क्षेत्राचे हितसंबंध जिथे आड येतात तिथे अनेकदा व्यक्ती, समूह, प्राणी, पर्यावरण, इ. वर अन्याय होतो. अशा वेळेस त्या अन्यायाला वाचा फोडणे आणि पीडितांच्या हक्कांसाठी लढणे ही सामाजिक क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.


5. योगदानाचे माध्यम व व्यासपीठ: 

समाजाच्या भल्यासाठी मदत करण्याच्या व आपला काही वाटा उचलण्याच्या अनेकाविध लोकांच्या इच्छेसाठी एक अभिव्यक्तीचे माध्यम (चॅनेल ऑफ एक्स्प्रेशन) असणे हे सामाजिक क्षेत्राचे एक अंगभूत काम आहे. समाजामध्ये सुदैवाने अनेक लोकांना असं वाटतं की मी इतरांसाठी काहीतरी मदत करायला पाहिजे. पण ते इतर कोण, त्यांच्यासाठी मी नेमकं काय करणार, कसे करणार हे शोधण्यात व ठरवण्यात बर्‍याचदा अडचणी जातात. म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक, आर्थिक दाते, हितेच्छूक लोक, जागरूक नागरिक अशा विविध मंडळींना त्यांच्या समाजाप्रतीच्या उत्तरदायीत्त्वाच्या पूर्तीसाठी मदतरूप असे एक माध्यम म्हणून, आणि लोकांमधील परोपकाराच्या भावनेला व्यक्त होण्यासाठी एक संघटित व्यासपीठ म्हणून सामाजिक क्षेत्र अतिशय उपयुक्त ठरते.


6. मूल्यांची अभिव्यक्ती व प्रसार: 

सामाजिक क्षेत्राने कितीही वेगवेगळ्या कृती केल्या तरी त्या कृतींच्या आवाक्याला शेवटी काहीतरी मर्यादा राहणारच. आख्या देशभर शाखा पसरवण्याची ‘स्केल’ आम्हाला प्राप्त व्हाही अशी महत्त्वाकांक्षा हे सामाजिक क्षेत्राचं लक्ष्य वा मानदंड नसावं. तर करत असलेल्या कृतींच्या माध्यमातून काय वृत्ती प्रसारित होतेय, कुठल्या मूल्यांची अभिव्यक्ती होतेय याकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे. मानवी समाज आणि संस्कृती ज्या अनेक मूल्यांना महत्त्वाचे मानते त्यांची कायम जाण राहावी म्हणून व्यक्ती, संस्था आणि कृतींच्या रुपातील ‘रोल मॉडेल्स’ आवश्यक असतात, जे या मूल्यांचे दीप म्हणून काम करतात, या मूल्यांवर समाजाचा विश्वास कायम ठेवतात आणि व्यापक प्रमाणावर लोकांना नैतिकदृष्ट्या उन्नत जगण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच आपल्याला गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग किंवा ग्रेटा थनबर्ग हवे असतात. हा मूल्यात्मक प्रभाव समाजकार्याच्या इतर उपक्रमांच्या तात्कालिक फायद्यांपेक्षा खूप मोठा आणि दीर्घकालीन असतो.


या सहा-मितीय फ्रेमवर्कमुळे सामाजिक प्रश्नावर काम करू इच्छिणा-या युवक-युवतींना त्यांच्या वैयक्तिक प्रेरणेसोबतच सामाजिक क्षेत्राच्या अस्तित्वाचा व्यापक संदर्भ व प्रयोजन काय याविषयी स्पष्टता व नेमका दृष्टिकोन विकसित करण्यास मदत होईल ही आशा! ‘का?’ याचं उत्तर मिळाल्यास पुढे ‘काय?’ आणि ‘कसं?’ ही उत्तरे मिळणं आपसूकच सोपं होईल.


अमृत बंग
amrutabang@gmail.com


लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा लेखकाच्या लोकसत्ता लेखमालेतील सदरात प्रकाशित झालेला लेख आहे.




Monday 27 May 2024

युवांचा नैतिक निर्णय-गोंधळ

कॉलेजच्या कट्ट्यांवर तरुण-तरुणींच्या गटात होणार्‍या गप्पांमध्ये सहसा नैतिक मुद्द्यांवर चर्चा होत नाहीत. पण जर का कधीमधी एखाद्या विषयाला घेऊन योग्य – अयोग्य काय यावर वादविवाद झालाच तर बहुतांश वेळा त्याचा शेवट कसा होतो?
‘तू तुझ्याजागी आणि मी माझ्याजागी योग्य आहोत’,
‘इट डिपेण्ड्स ऑन द सिच्युएशन’,
‘सबका अपना अलग अलग पर्स्पेक्टिव्ह होता है, सभी अपनी जगह ठीक है’, ‘छोड ना... क्यूँ टेंशन लेता है?’
ही अथवा अशा वाक्यांचे विविध प्रकार आपल्याला वारंवार ऐकू येतात. हे कशाचे द्योतक आहे?

वैयक्तिक आवडीनिवडीच्या पलीकडे नैतिक मुद्द्यांवर विचार व भाष्य करताना, त्याबाबत आपली काही भूमिका ठरवतांना अनेक युवांना अडचण जाते. या पुढे जाऊन स्वत:च्या जीवनात जेव्हा प्रत्यक्ष काही निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा एकतर त्यांचा फार गोंधळ उडतो किंवा काही एका विशिष्ट पद्धतीनेच (फायदा / तोटा) बहुतांश निर्णय घेतले जातात.
युवांची ‘मॉरल डेव्हलपमेंट / नैतिक विकासाची’ प्रक्रिया काय असते? ते नेमका कसा विचार करतात?
निर्माणमधील आमचा अनेक युवांसोबतचा अनुभव तसेच या विषयाच्या वैज्ञानिक शोधसाहित्याच्या अभ्यासातून काही मुद्दे पुढे येतात:

1. बर्‍याचशा तरुण-तरुणींनी नैतिक मुद्द्यांविषयी फारसा विचारच केला नसतो. परीक्षा, कॉलेज, पी.जी. / प्लेसमेंट्स आणि मजा यांच्या गदारोळात मी जे काही शिकतो आहे किंवा पुढे जे काही करणार आहे, जसा जगणार आहे त्याचा नैतिक बाजुने विचार करण्याची त्यांना कधी गरज भासत नाही व उसंत देखील मिळत नाही. मेकॅनिकल इंजिनियरिंग केल्यानंतर मी लॉकहीड मार्टिन या युद्धसामग्री व शस्त्रे बनविणार्‍या कंपनीमध्ये नोकरी करणार की एखाद्या ‘इलेक्ट्रिक व्हेहिकल्स’ अथवा ‘रिन्युएबल्स रिसर्च’ करणार्‍या कंपनीत, हा निव्वळ कोणाचे पॅकेज किती एवढाच प्रश्न नसून नैतिक देखील आहे हे सहसा तरुण मुला-मुलींच्या ध्यानीमनी नसते. आणि म्हणूनच कधी अशा विषयांविषयी चर्चा छेडल्यास त्यांच्या प्रतिक्रिया या ‘म्हणजे...’, ‘माहित नाही...’, ‘पण...’, ‘मला वाटते...’, ‘आय गेस...’ अशा अनिश्चिततापूर्ण असतात. या इमर्जिंग ऍडल्ट्सना गुंतागुंतीच्या नैतिक प्रश्नांना कसे सामोरे जायचे, सुसंगत तर्क कसा करायचा यासाठीचे मार्गदर्शन व बौद्धिक साधने कोणी फारशी दिलेलीच नसतात. तशा विचारांना, संवादांना ते अगदी क्वचितच सामोरे गेले असतात. आणि म्हणुनच एक प्रकारचा ‘नैतिक सापेक्षतावाद’ (मॉरल रिलेटीव्हिजम) – सब रिलेटिव्ह है, हर कोई अपनी जगह पे ठीक है – बळावताना दिसतो. मग हिटलरपण आपल्या जागी ठीकच होता असे म्हणायचे का? पोस्टमॉडर्निझमच्या वाढत्या प्रभावात बळावलेला नैतिक व्यक्तिवाद नैतिक बाबींवर सामाजिक चर्चा, विवाद, संवाद व सहमती साध्य करण्याच्या जबाबदारीपासून मुक्तता देतो आणि म्हणुनच अनेकदा सोईस्कर वाटतो. पण म्हणून तो श्रेयस आहे का? बहुलता आणि विविधतेचा स्वीकार करणे, विरुद्ध नैतिकदृष्ट्या सापेक्षतावादी असणे यात फरक आहे आणि तो कळणे महत्त्वाचे आहे.

2. याचाच दुसरा परिणाम म्हणजे स्वतःच्या नैतिक विचारांना आवाज देणे हेच जणू अनैतिक आहे असे वाटायला लावणारे पियर प्रेशर! स्वतःचा नैतिक दृष्टिकोन व्यक्त करणे (मद्यपान असो वा रॅगिंग, कट प्रॅक्टीस असो वा विजेचा अपव्यय, ...) म्हणजे जणू इतरांवर वर्चस्व गाजवणे आणि नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे असे भासवले जाते. यामध्ये काही नैतिक मूल्य नाही तर ही केवळ एक वैयक्तिक निवड आहे, व्यक्तीगत मामला आहे असे मानले जाते. म्हणूनच अनेक युवा स्वत: कोणतेही भक्कम नैतिक दावे करणे पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करतात, तसेच इतरांच्या नैतिक मतांवर टीका करणे टाळतात. फळस्वरूप आम्ही नैतिक संभाषण कमी करतो आणि त्यावर आधारित भूमिका घेणे हे गप्पाटप्पा, गॉसिप आणि निष्क्रियतेवर सोडतो. माझी मॉरल आयडेंटिटी, नैतिक ओळख काय आहे हे समजणे हा ‘यूथ फ्लारिशिंग’चा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या अभावात नैतिक निर्णय घेण्याची आणि नैतिकदृष्ट्या सुसंगत जीवन जगण्याची असमर्थता ही युवांमधली एक प्रकारची निर्धनता व कुपोषण आहे.

3. व्यक्तीच्या नैतिक विचार प्रक्रियेचा विकास कसा होतो याबाबात शिकागो विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स कोहलबर्ग यांची स्टेज थिअरी प्रसिद्ध आहे. सुलभ रुपात सांगायचे झाल्यास कोहलबर्गच्या मते व्यक्तीच्या नैतिक विचार व निर्णयक्षमतेचा विकास तीन पातळ्यांतून टप्प्याटप्प्याने होतो. यातील पहिल्या पातळीला कोहलबर्ग प्रि-कन्व्हेंशनल असे म्हणतो ज्यामध्ये प्रामुख्याने ‘फायदा / तोटा काय’ (प्रोज अँड कॉन्स) या विचारसरणीतून निर्णय घेतले जातात. आई रागावेल म्हणून अमकी गोष्ट करु नये, काका चॉकलेट देतील म्हणून तमके वागावे असे ज्याप्रमाणे लहान मुले ठरवतात ती ही पातळी. पुढची पातळी म्हणजे कन्व्हेंशनल. आजुबाजुचे लोक काय विचार करतात, कसे वागतात, ‘गुड बॉय – गुड गर्ल’ कडून काय अपेक्षित आहे, सहजगत्या समाजमान्य काय, त्यानुसार निर्णय घेण्याची ही पातळी. पौंगंडावस्थेतील अनेक मुले ‘सभी लोग तो यही कर रहे है’ अशा कारणाने जेव्हा निर्णय घेतात ती ही विचारसरणी. तिसरी आणि या थियरीमधील सर्वात वरची पातळी म्हणजे पोस्ट-कन्व्हेंशनल अथवा ‘मूल्याधिष्टीत’ पातळी. या टप्प्यावर इतर लोक काय म्हणतात किंवा फायदा/तोट्याचे हिशेब यापेक्षा व्यक्ती स्वतंत्ररीत्या आपला मूल्यविचार ठरवते, योग्य – अयोग्य कशाला म्हणायचे ते ठरवते आणि त्यानुरुप निर्णय व वर्तन करते. समजायला सोपे असे एक ठळक उदाहरण म्हणजे महात्मा गांधींची दांडी यात्रा! स्वत:ला अटक होऊ शकते या तोट्याचा विचार न करता आणि तत्कालीन समाजमान्यता व कायद्यालाही झुगारुन त्यांना जे नैतिकदृष्ट्या योग्य वाटले तो निर्णय घेऊन तद्नुसार वागणे ही म्हणजे कोहलबर्गची तिसरी पातळी. विविध समाजसुधारकांच्या जीवनात अशा प्रकारचे अनेक प्रसंग आपल्याला दिसतील. आपण स्वत:ही कधी आपल्या जीवनात असे निर्णय घेतले असतील किंवा आजुबाजुच्या लोकांमध्ये बघितले असतील. ज्यांच्याविषयी आपल्याला नैतिक आदर वाटतो असे लोक नजरेपुढे आणाल तर त्यांत या प्रकारे ‘मूल्याधिष्टीत’ विचार करणारे लोक दिसतील.

कोहलबर्गचे संशोधन मात्र असे देखील सूचित करते की बहुतांश लोक हे नैतिक तर्काच्या दुसर्‍या (कन्व्हेंशनल) टप्प्याच्या पलीकडे जात नाहीत. आणि जर यदाकदाचित तिसर्‍या पातळीकडे वाटचाल झालीच तर ती सहसा वयाच्या विशीच्या दशकात होते. म्हणुनच या काळात युवांना माझी नैतिक संहिता कोणती ज्यानुसार मला माझे जीवन जगायचे आहे ही स्पष्टता येण्यास मदत करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या जीवनातील निर्णय आणि निवडींची क्रमवारी कशी लावायची? त्याला नैतिक आधार असू शकतो का? कुठला? या बाबत तरुणांना स्पष्ट विचार करण्याची, ओळखण्याची आणि निर्णय घेण्याचा सराव करण्याची (मॉरल जिमिंग) संधी मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. मुळात मनाने चांगले असणारे अनेक युवा यामुळे मात्र अयोग्य विचार करताना दिसतात. नुकताच घडलेला एक प्रसंग: महाराष्ट्रातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील एक रेसिडेंट डॉक्टर तेथील एम.बी.बी.एस.च्या अंतिम वर्षाला असलेल्या काही मुलींना त्रास देत होता. मात्र त्या मुली याविषयी ठामपणे बोलायला, तक्रार करायला घाबरत होत्या. का तर त्यांना भीती होती की तो रेसिडेंट त्यांना परीक्षेच्या वेळेस अडचण पैदा करेल. तुम्ही नापास व्हाल अशी धमकी त्याने दिलेली. ‘क्यूँ रिस्क लेना’ असा पातळी एक वरील विचार किंवा ‘ऐसा थोडा बहोत तो होता ही है, पिछले बॅच वालोंनेभी सह लिया था’ असा पातळी दोन वरील विचार, दोन्हीनुसार मान खाली घालून अन्याय सहन करणे हा मार्ग होता. एम.बी.बी.एस.ला गेलेल्या मुलींची ही अवस्था तर बाकीच्यांची काय गत असेल? सुदैवाने आमच्या निर्माण शिबिरात सहभागी झालेली अशी त्यांची एक सीनियर होती तिने हा मुद्दा लावून धरायचे ठरवले. कुठल्याही हालतीत असली अयोग्य वागणूक खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका तिने घेतली. पीडित मुलींना एकत्र करुन समजावले, धीर दिला, कॉलेजच्या डीनकडे एकत्र तक्रार नोंदवली आणि शेवटी त्या रेसिडेंटला रस्टिकेट करण्यात आले. तिचे अभिनंदन करतानाच इतर युवांमध्ये या प्रकारचे धैर्य कसे निर्माण होईल यावर विचार करणे गरजेचे आहे.

4. फायदा / तोटा काय यानुसार निर्णय घेणे ही दैनंदिन जीवनातल्या साध्या सोप्या व्यावहारिक प्रसंगांमध्ये बर्‍याचदा उपयुक्त पडणारी पद्धत आहे. मात्र तिला तिथेच मर्यादित नाही ठेवले आणि जास्त महत्त्वाच्या निर्णयांसाठी तिचा वापर करायचा ठरवला तर मात्र अडचणी आणि संभ्रम सुरू होतो. उदाहरणार्थ, माझा पर्पज काय, मी नेमके काय प्रकारचे काम करु, जोडीदार म्हणून कोणाला निवडू अशा मूलभूत मुद्द्यांसाठी ‘प्रोज अँड कॉन्स’ ही विचारपद्धती मदतरुप ठरत नाही, कारण आज एक गोष्ट चांगली वाटते तर उद्या तिचाच दुसरा पैलू चिंताजनक वाटतो. स्पष्टता आणि निश्चय याऐवजी गोंधळ, काळजी व सततची अस्वस्थता अनुभवास येते. म्हणूनच माझी मूल्ये काय, योग्य – अयोग्य ठरवण्याचे माझे निकष काय व त्यानुसार जगण्याचे निर्णय घेण्याची क्षमता विकसित होणे हे तरुण वयासाठी अत्यावश्यक आहे. तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासोबतच, तरुणांना त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात मार्गदर्शन करणारी नैतिक मूल्ये शोधण्यात मदत करणे हे देखील शिक्षणाचे, पालकांचे आणि आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. त्यातूनच युवांचा निर्णय-गोंधळ दूर होईल.


अमृत बंग


लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.


amrutabang@gmail.com





Tuesday 30 April 2024

युवांपुढचा सगळ्यात कळीचा प्रश्न?

युवांच्या मनात स्वत:विषयी, स्वत:च्या भविष्याविषयी काय प्रश्न आहेत? ते याबाबत काय विचार करताहेत हे कसे जाणून घ्यावे? गडचिरोलीला शोधग्राम येथे होणार्‍या आमच्या निर्माण शिबिरांमध्ये भारतातील 21 राज्यांतून विविध प्रकारची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी असलेले तरुण-तरुणी येतात. हे युवा भारतातील 26 कोटी युवांचे पूर्णत: सार्वत्रिक प्रतिनिधी नसलेत तरी त्यांच्या मनोविश्वात डोकावून बघितल्यास व्यापक युवामानसाबद्दलची काही झलक आपल्याला समजायला मिळू शकते. किमान हे तरी नक्कीच कळू शकेल की ज्या युवांना स्वयंविकासाची व सामाजिक योगदानाची इच्छा आहे आणि त्यासाठी जे स्वत:हून निर्माणसारख्या उपक्रमात भाग घेऊ पाहतात अशा युवागटाच्या मनातील प्रश्न, संभ्रम, उद्दिष्ट्ये काय आहेत.

याच विचाराने आम्ही एक छोटा अभ्यास केला. 3 वर्षांच्या काळात झालेल्या वेगवेगळ्या निर्माण शिबिरांमध्ये ज्यांनी भाग घेतला अशा 492 ‘युनिक’ युवांना प्रत्येक शिबिराच्या सुरुवातीला आम्ही विचारले की तुमच्या मनात सध्या स्वत:च्या जीवनाविषयी नेमके कुठले प्रश्न आहेत, तुम्ही कशाची उत्तरे शोधता आहात हे कृपया लिहून काढा. हे सर्व ‘रिस्पॉन्सेस’ आम्ही संगणकात नोंदवले आणि गुणात्मक विश्लेषणासाठी त्यांची सात विविध ‘कॅटेगरीज’ / गटांमध्ये विभागणी केली. 492 युवांनी लिहिलेल्या एकूण 6100 प्रश्नांची गटवार विभागणीची टक्केवारी ही सोबतच्या ‘पाय चार्ट’ प्रमाणे होती. यामध्ये सोयीसाठी सातपैकी तीन सगळ्यात छोट्या गटांना’ इतर’ या गटात एकत्र केले आहे. जे चार प्रमुख गट आहेत त्यांत प्रत्येकी काही उपगट देखील आहेत आणि त्यानुसार माहितीचे ‘कोडिंग’ करण्यात आले आहे. परंतु शब्दमर्यादेमुळे ते गटनिहाय अधिक विस्तृत चित्र इथे मांडण्याचे मी टाळतो आहे.



6100 ही 492 युवांनी लिहिलेल्या एकूण सर्व प्रश्नांची बेरीज आहे. प्रति व्यक्ती प्रश्नांची सरासरी ही 12.4 आहे. हे प्रश्न वाचतांना तरुण-तरुणींच्या मनात काय सुरु आहे याचा एक सुंदर रंगपट आपल्या पुढे उभा राहतो.

सर्व प्रश्नांचा एकत्र विचार केला असता सगळ्यात जास्त वेळेस विचारला गेलेला प्रश्न म्हणजे अस्तित्वात्मक व आध्यात्मिक गटामधील ‘माझ्या जीवनाचा उद्देश्य काय? माझा नेमका पर्पज काय?’ हा प्रश्न! खरं तर या बाबत आश्चर्य वाटायला नको कारण हा जीवनातला सर्वात कळीच्या प्रश्नांपैकी एक आहे. आणि 18 ते 29 वर्षातील ‘इमर्जिंग ऍडल्टहूड’चे वय हे या प्रश्नाच्या शोधासाठीचे सर्वात उत्तम वय आहे. 5 आणि 10 वर्षांच्या मुलांना सहसा माझा पर्पज काय हा प्रश्न पडत नाही. इयत्ता बारावीपर्यंतची आपल्याकडची परीक्षार्थी घोडदौड देखील मुलांना या प्रश्नापासून दूर ठेवते. मात्र त्यानंतर, कॉलेजच्या आणि कामाला सुरुवात केल्याच्या वर्षांत हा प्रश्न अनेकांना प्रथमच भेडसावायला लागतो. युवावस्थेत देखील मेंदूची वाढ व विकास होतच असते आणि आयुष्याविषयी, विश्वाविषयी, स्वत:च्या अस्तित्वाविषयी गंभीर प्रश्न पडायला सुरुवात होते (किमान होऊ शकते) असे याबाबतीतले विज्ञान सांगते. जणू काही युवांचा मेंदू या ‘ऍबस्ट्रॅक्ट’ प्रश्नांना भिडण्यासाठी सज्ज होत असतो. मात्र हा शोध घ्यायला मदतरुप होईल असे वातावरण, संधी, वेळ, आणि गरज भासल्यास मार्गदर्शन हे युवांना पुरेशा प्रमाणात मिळते का?

आपल्याकडचे बहुतांश महाविद्यालयीन शिक्षण हे भारंभार माहिती देते, क्वचित प्रसंगी काही कौशल्ये देते. पण एक गोष्ट जवळपास कुणालाच मिळत नाही ती म्हणजे पर्पज. मी घेत असलेल्या या माहितीचा आणि (जर मिळाले असतील तर) कौशल्यांचा उपयोग मी कोणासाठी, कशासाठी करु याची काही नेमकी स्पष्टता फारशी कोणाजवळच नसते. इतकेच नाही तर ही स्पष्टता मिळवण्यासाठी वेळ देणे, विशेष प्रयत्न करणे हे देखील अमान्य असते. घरची मंडळी, शिक्षक तसेच इतर सहाध्यायी या सगळ्यांचाच भर असतो तो लवकरात लवकर पुढची कुठली तरी पदवी घेण्यावर. पर्पजच्या अभावात माहितीचे अधिकाधिक भेंडोळे आणि किमान कुठली तरी कौशल्ये मिळतील या (भाबड्या) आशेने तरुण-तरुणींचा चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू होतो. पुढचा क्लास, परीक्षा किंवा पदवी मिळवण्याच्या सततच्या शर्यतीत मला नेमके कुठे जायचे आहे याचा विचार व शोध कुठच्याकुठे मागे पडून जातो. कदाचित त्यामुळेच एखाद्या विषयाच्या खोलात जावे, कोण्या प्रश्नाच्या झपाटून मागे लागावे हे देखील आपल्या कॉलेज तरुण-तरुणींमध्ये फार कमी प्रमाणात दिसते आणि त्यांचे रोजचे दिवस तात्पुरते मन रमवण्यासाठी नेटफ्लिक्स, यू ट्यूब, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍप मध्येच चालले जातात.

शिक्षणतज्ञ आणि सायकॉलॉजिस्ट आर्थर चिकरिंग त्याच्या ‘एज्युकेशन अँड आयडेंटिटी’ या पुस्तकात तरुण वयातले विकासाचे सर्वात महत्त्वाचे असे जे ‘व्हेक्टर्स’ (सदिश) मांडतो त्यामध्ये स्वत:च्या पर्पजचा शोध घेणे याचा समावेश आहे. चिकरिंग असे देखील नोंदवतो की अनेक तरुण विद्यार्थी हे छान सजून तयार आहेत (ड्रेस्स्ड अप) पण कुठे जायचे हे मात्र त्यांना माहिती नाही आहे. त्यांच्यात ऊर्जा आहे पण त्यांना गंतव्यस्थानाची कल्पना नाही आहे.

निर्माणमध्ये येणारे सुमारे 40% युवा हे भारतातल्या उत्तमोत्तम वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी असतात. बारावीनंतर मोठ्या मेहनतीने आणि आशेने मेडिकलला प्रवेश मिळवणार्‍या या तरुण विद्यार्थ्यांना एकदा का ते कॉलेजमध्ये आले की मग मात्र मी डॉक्टर का बनतोय, आरोग्य क्षेत्रात सध्या महत्त्वाची अशी कुठली आव्हाने आहेत, मी शिकत असलेल्या दवाखान्यात येणार्‍या रुग्णांच्या काय समस्या आहेत, वैद्यकीय ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया काय, या क्षेत्रात ज्यांनी अफाट काम केले आहे असे पूर्वसूरी कोण, मी माझ्या जीवनकाळात नेमके कोणासाठी, कुठे, कशा प्रकारे काम करु शकतो इ. प्रश्नांविषयी विचार करायला, त्यांचा शोध घ्यायला कुठलेही प्रोत्साहन, वेळ वा तसे मार्गदर्शन करणारे ‘मेंटर्स’ मिळत नाहीत. एमबीबीएसला आल्या आल्या आता नीट पीजीची तयारी कशी करायची, कुठला क्लास लावायचा यात ते बूडून जातात. मला ही फार मोठी शोकांतिका वाटते.

हार्वर्ड विद्यापीठातील व्यवस्थापनाचे सुप्रसिद्ध प्राध्यापक क्लेटन क्रिस्टनसन असे म्हणतात, “इफ यंग पीपल टेक द टाईम टू फिगर आऊट देयर लाईफ पर्पज, दे विल लुक बॅक ऑन इट ऍज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दे डिस्कव्हर्ड. बट विदाऊट अ पर्पज, लाईफ कॅन बिकम हॉलो”. युवांच्या एकंदरीत ‘फ्लरिशिंग’ साठी जे विविध घटक कारणीभूत ठरतात त्यातील पर्पज / जीवनहेतू हा सगळ्यात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे.

जयप्रकाश नारायण असे म्हणायचे की ‘अध्यात्म ये बुढापे की बुढभस नहीं तो तारुण्य की उत्तुंगतम उडान है’. युवांच्या पुढचा कळीचा प्रश्न हा निव्वळ उपजीविकेचा नाही तर जीविकेचा आहे, या जीवनाचे काय करु हा आहे. माझ्या जीवनाचा उद्देश्य काय हा आध्यात्मिक प्रश्न आहे आणि याचा शोध उतारवयात नाही तर ऐन तारुण्यातच घ्यायला हवा. त्यातच खरी मजा आहे आणि तरुण असण्याचे प्रात्यक्षिक आहे.

हा शोध घेण्यासाठीची उंच भरारी मारायला आपण युवांना मदत करणार की त्यांचे पंख छाटणार?



अमृत बंग
लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

#युवांना स्वत:च्या पर्पजविषयी विचार करायला चालना मिळावी म्हणून निर्माणने भारतातील प्रथमच अशी एक ‘यूथ पर्पज प्रश्नावली’ विकसित केली आहे. ही मराठी व इंग्रजीमध्ये पूर्णत: ऑनलाईन उपलब्ध असून https://nirman.mkcl.org/selection/selection-process या संकेतस्थळावर बघता येईल.

Thursday 29 February 2024

‘यूथ फ्लरिशिंग’ म्हणजे काय?

माझा मुलगा अर्जुन सध्या अडीच वर्षांचा आहे. जन्मल्यापासून आतापर्यंत अर्जुनची वाढ योग्य रीतीने होते आहे की नाही हे बघण्यासाठी पिडिऍट्रिक्सच्या आणि बालमानसशास्त्राच्या विज्ञानाने बाळाच्या वाढीचे आणि विकासाचे विविध टप्पे व लक्षणे सांगितलेली आहेत. त्या मैलाच्या दगडांनुसार अर्जुनची किंवा इतर कुठल्याही बाळाची वाढ तपासता येते. सर्व छान सुरू असेल तर आनंद मानायचा आणि जर कुठे कमतरता असेल तर त्यावर योग्य ती उपाययोजना करायची ही संधी पालकांना (आणि पाल्याला) उपलब्ध असते.

जर लहान मुलांसाठी ही सोय आहे तर मग या देशातल्या 26 कोटी युवांसाठी काय? त्यांचे सर्व आलबेल चालू आहे की नाही हे (त्यांनी व इतरांनी) कसे ओळखायचे? त्यावर गरज असल्यास उपाययोजना कशा करायच्या? मुळात योग्य ‘ट्रीटमेंट’ साठी प्रथम योग्य ‘डायग्नोसिस’ कसे करायचे?

दुर्दैवाने आपल्या देशात युवांच्या विकसनासाठी पुरेसे काम केले जात नाही आहे. शासन युवांकडे निव्वळ मतदार म्हणून किंवा रोजगारासंबंधीच्या एखाद्या योजनेचे लाभार्थी म्हणून बघते तर खाजगी क्षेत्राचा युवांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा संभाव्य ग्राहक यापुरता सीमित असतो. सामाजिक क्षेत्रात देखील बहुतांश वेळा ‘युथ डेव्हलपमेंट’ हा तुलनेने गौण महत्त्वाचा विषय मानला जातो. सीएसआरद्वारा केल्या जाणार्‍या मदतीमध्ये सुद्धा युवाविकासासाठी काम करण्याला फारसे प्राधान्य दिल्या गेल्याचे दिसत नाही. एकूणच युवांच्या विकासासाठी आपल्याकडे फारसे जोमदार उपक्रम तर नाहीतच पण अत्यंत महत्त्वाची एक समस्या म्हणजे यासाठीचे कुठलेही सिद्धांतन वा प्रारूप देखील भारतात नाही. त्यामुळे एखाद्या युवाचा सुयोग्य विकास म्हणजे नेमकं काय, तो होतो आहे किंवा नाही, त्याची विविधांगी सक्षम जडणघडण होते आहे की नाही, हे कसे ओळखायचे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात व अस्पष्टता राहते.

या संदिग्धतेचा परिणाम असा होतो की मग निव्वळ सहजरीत्या दृष्यमान (दर्शनीय!) आणि विनासायास मोजता येण्यासारखे असे जे विकासाचे मापक असतात उदा. परीक्षेतील मार्क्स, डिग्री वा कॉलेजचे नाव, नोकरी, पगार, घर वा गाडी असणे, इ. त्यांनाच प्राधान्य मिळते. आणि जणु याच बाबी म्हणजे युवा विकासाचे मापदंड व मानदंड आहेत असा समज प्रस्थापित होतो. त्यांचेदेखील काही महत्त्व आहे हे निर्लक्षून चालणार नाही पण ही मानके म्हणजेच परिपूर्ण असेदेखील मानता येणार नाही. मग असे इतर काय घटक, लक्षणे, वैशिष्ट्ये असू शकतात ज्यावरून याची कल्पना करता येईल की एखाद्या युवाचे जीवनात खरोखर छान सुरु आहे, तो किंवा ती “फ्लरिश” होत आहे, युवा विविधांगाने बहरताहेत आणि विकासाच्या / वाढीच्या मार्गावर इष्टतम स्थितीत आहेत? यासाठीचे काही बुद्धीगम्य आणि सैध्दांतिक प्रारूप नसेल तर सखोल समज देखील शक्य नाही आणि परिणामकारक उपक्रमांची कल्पना सुचणे वा ते प्रत्यक्षात आणणे, त्यांचे मोजमाप करणे हे देखील अवघड!

युवांच्या विकासासंबंधीचा आपल्याकडील बहुतांश संवाद व चर्चा ही आत्महत्या, बेरोजगारी, अपघात, लैंगिक अत्याचार, मादक पदार्थांचे व्यसन, मोबाईलचा अतिवापर याभोवतीच घोळते. या सहा मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन आम्ही निर्माण या आमच्या उपक्रमाद्वारे भारतातील युवांसाठी प्रथमच असे एक “निर्माण यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क” तयार केले आहे. हे प्रारूप गेल्या 17 वर्षात हजारो युवकांसोबतच्या आमच्या कामातून आणि अनुभवातून झालेल्या निरीक्षणांवर तसेच या विषयाबाबतच्या नवीनतम विज्ञानावर आधारलेले असे आहे. या फ्रेमवर्कची व्याप्ती व्यापक असून त्यात 7 मुख्य विभाग आणि त्यामध्ये एकूण 50 विविध घटक अशी विभागणी आहे. क्रिएटिव्ह कॉमन्सच्या अंतर्गत लायसन्स केलेले हे विस्तृत फ्रेमवर्क निर्माणच्या संकेतस्थळावर https://nirman.mkcl.org/media/nirman-youth-flourishing-framework येथे बघता येईल.

यातील 7 मुख्य विभाग म्हणजे: 
1. शारीरिक स्वास्थ्य - Physical Health, 
2. मानसिक स्वास्थ्य - Psychological Well-Being, 
3. चारित्र्य विकास - Character Development, 
4. नातेसंबंध - Social Relationships, 
5. व्यावसायिक विकास - Professional Development, 
6. जीवन कौशल्ये - Life Skills आणि 
7. सामाजिक योगदान - Social Contribution


या फ्रेमवर्कचा ज्यांना उपयोग होईल असे 4 श्रोतृगट आमच्या नजरेसमोर आहेत:

1. युवांना फ्लरिशिंगच्या या रंगपटावर मी सध्या नेमका कुठे आहे हे शोधता यावे म्हणून तयार केलेली ‘निर्माण यूथ फ्लरिशिंग प्रश्नावली’ देखील निर्माणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संपूर्णत: ऑनलाईन अशी ही प्रश्नावली भरल्यानंतर त्यावर आधारित 5 पानांचा रिपोर्ट प्रत्येकाला त्याच्या इमेलवर मिळतो. युवा स्वत: याचा वापर करून स्वत:च्या बहुआयामी विकासाची सद्यस्थिती काय, पुढील उद्दिष्ट्य काय आणि त्यासाठी सुरुवात कशी करता येईल याचा विचार करू शकतात. स्वत:च्या फ्लरिशिंगची जबाबदारी स्वत: घेऊन त्याबाबतीत स्वयंपूर्ण बनू शकतात.

2. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थांच्या सर्वांगीण व्यक्तित्व विकासावर भर द्यावा असे सुचवण्यात आले आहे. त्यानुसार विविध कॉलेजेसमध्ये या प्रश्नावलीचा वापर करून अध्यापक मंडळी विद्यार्थ्यांना मदत करू शकतात. डिग्रीच्या अभ्यासासोबतच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक वैयक्तिक ‘ग्रोथ प्लॅन’ तयार करू शकतात. प्लेसमेंट्सच्या वेळी तांत्रिक कौशल्यांसोबतच आपल्या व्यक्तित्व (character) आणि व्यक्तिमत्वाविषयी (personality) देखील विद्यार्थी नेमकेपणे बोलू शकतील अशी तयारी करून घेता येईल.

3. संशोधक व धोरणकर्ते या फ्रेमवर्क मधील विविध घटकांवर संशोधन, त्यांचे विष्लेषण, उपयुक्त ज्ञाननिर्मिती, शिफारसी, इ. वर काम करू शकतात. यातून उद्या काही नवीन घटकांचा समावेश देखील या फ्रेमवर्कमध्ये होऊ शकतो.

4. युवांसोबत संबंध येणारा इतर कुठलाही सुजाण भारतीय नागरिक – पालक, नातेवाईक, भावंड, शिक्षक, सल्लागार, गट प्रमुख, कंपनीतील बॉस वा वरिष्ठ सहकारी, मित्र, जोडीदार – या फ्रेमवर्कचा उपयोग करुन त्याच्या/तिच्या संपर्कात येणाऱ्या युवांच्या विकासात हातभार लावू शकतो.

निर्माण म्हणून आम्ही असे भविष्य बघू इच्छितो जिथे भारतातील तरुणाईची प्रगती व उत्कर्ष यांची संकल्पना ही, त्यांच्या व इतरांच्या विचारातदेखील, परीक्षेचे मार्क्स, पॅकेजचे आकडे, मालकीच्या गाड्यांची संख्या अथवा चौरस फुटामधील मालमत्तेचा आकार, या पलीकडे जाते आणि वैविध्यपूर्ण स्वरूप घेते.

मानसिक वा शारीरिक आजारांचा निव्वळ अभाव म्हणजे आपोआप निकोप व निरोगी वाढ असा अर्थ होत नाही. त्यातून फक्त इतकेच कळते की आपण अक्षाच्या ऋण बाजूला नाही आहोत तर शून्य बिंदूवर आहोत. अक्षाच्या धन बाजूला, सकारात्मक वाढीसाठीच्या अगणित संभावना आहेत. त्या शक्यतांना वास्तवात आणणे ही युवा पिढीची जबाबदारी आणि आपण बाकी सगळ्यांचे उत्तरदायित्व आहे. या प्रवासामध्ये हे फ्रेमवर्क उपयुक्त मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा करतो.

या फ्रेमवर्कवर आधारित आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासावरील शोध निबंधाची येत्या जून महिन्यात अमेरिकेत होणार्‍या ‘कॉन्फरन्स ऑन इमर्जिंग अॅडल्टहूड’ मध्ये सादरीकरणासाठी निवड झाली आहे. भारतातील युवांच्या व्यक्तित्व विकासाबाबत केल्या गेलेला हा या प्रकारचा पहिला अभ्यास आहे. यापासून सुरुवात होऊन हळुहळु भारतातील युवांच्या विकासाबाबतचे भारतीय परिप्रेक्ष्यातील विज्ञान आणि त्यावर आधारित नीती व उपक्रम विकसित होतील अशी मला आशा आहे.

शेवटी फ्लरिशिंग युवा हेच फ्लरिशिंग भारताचे खरे चिन्हक व पताका असतील आणि देशाच्या भरभराटीचे इंजिन असतील!


अमृत बंग

लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात संपादित सदरामधील एक लेख आहे.

amrutabang@gmail.com

Wednesday 31 January 2024

युवा कसे जगत आहेत?

भारतात 18 ते 29 वर्षे या वयोगटात 26 कोटी युवा आहेत. पण ते काय करत आहेत, त्यांचा रोजचा दिवस कसा जगत आहेत, हे युवा स्वयंविकासाच्या इष्टतम स्थितीत आहेत का? अत्यंत कळीचे असे हे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रथम काही उदाहरणे बघुयात.

श्रावणी चंद्रपूरची. स्वत:ची इच्छा नसतांना देखील आई-वडीलांचा आग्रह म्हणून तिने त्यांनी सांगितलेल्या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आता तिला फार पैसे मिळतील अशी नोकरी लगेच सापडत नाही आहे. आई-वडील म्हणताहेत की तू पुण्याला जा आणि स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लाव. तिची ती देखील इच्छा नाही. कुठे शिकाऊ उमेदवारीचे काम करावे यासाठी ती वा पालक दोघेही तयार नाहीत. परिणामत: पदवी संपून दोन वर्षे झालीत तरी श्रावणी घरीच बसून आहे. दिवस कसा जातो तर प्रामुख्याने मोबाईल, इन्स्टाग्राम व युट्यूबवर.

वैभव मुंबईच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसर्‍या वर्षाला आहे. हॉस्टेलला मुलांमध्ये दारु व गांजा सर्रास चालतात. दुसर्‍या मजल्यावरच्या त्याच्या रूमकडे चालत जात असतांना दोन्ही बाजूला अनेक बाटल्या पडलेल्या दिसतात. मेसमधले जेवण ना स्वास्थपूर्ण ना चवीष्ट. खूपदा बाहेरून स्विगी, झोमॅटोवरून पदार्थ ऑर्डर केले जातात. त्यांचे अर्धवट अन्न उरलेले अनेक डब्बे व पार्सल्स विविध खोल्यांच्या दरवाज्यांबाहेर पडलेले दिसतात. तिथे अनेक उंदीर फिरत असतात. पुरेसे उन व खेळती हवा नसल्याने अनेक कपड्यांना फंगस लागले आहे. पण पोस्टिंगला जायचे असल्यास तोंडावर पाणी व अंगावर भरपूर स्प्रे मारुन चटकन तयार व्हायची कला वैभव व त्याच्या मित्रांनी अवगत केली आहे. ‘हॉस्टेल लाईफ’ हे असे असणारच असे मानून यात काही गडबड आहे असे देखील आता वैभवला वाटत नाही. रोजचे (प्रामुख्याने रात्रीचे) सुमारे 4 ते 5 तास हे वैभव इन्स्टाग्राम रील्स स्क्रोल करण्यात, मिर्झापूर – मनी हाईस्ट सारख्या वेब सिरिज बघण्यात, पब्जी वा इतर गेम्स खेळण्यात घालवतो. तो सहसा रात्री 3 वाजता झोपतो. पुस्तके वाचण्याची तशी वैभवला फारशी सवय नाहीच पण आता मित्राच्या सांगण्यावरून त्याने अंकूर वारिकू यांचे ‘डू एपिक शिट’ हे पुस्तक चाळायला घेतले आहे. कुठलेच वर्तमानपत्र वाचत नसल्याने भारताच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड आहेत आणि नुकताच इतर न्यायाधीशांना कॉलेजियम पद्धतीने नियुक्ती द्यावी की नाही यावर सरकार आणि कोर्टाचा काही वाद झाला या (व अशा) बाबतीत वैभव पूर्णपणे अनभिज्ञ आहे.

अक्षय बीड जिल्ह्यातल्या एका गावातील हुशार मुलगा. नवोदय विद्यालयात बारावीपर्यन्त शिकून तो आता अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायला औरंगाबादला आला आहे. कॉलेज तर म्हणायला सुरु आहे पण लेक्चर्स व प्रॅक्टिकल्स क्वचितच होतात. आई-वडील वा घरच्या इतर कोणाशीही अक्षयला फारसे नीट बोलता येत नाही, स्वत:च्या भावना नीट व्यक्त करता येत नाहीत. ‘जेवण झाले का, सर्व ठीक सुरू आहे ना’ या भोवतीच बोलणे थांबते. कॉलेजमध्ये दोन-तीन मित्र आहेत पण त्यांच्यासोबतचा संवाद देखील उथळ आहे. आपली घुसमट होते आहे, सतत एकटेपणाची भावना आहे असे अक्षयला वारंवार वाटत असते.

नाशिकच्या अभिनवची एमबीबीसची पदवी पूर्ण होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. पुढे पीजी करायला हवे, ते देखील रेडियोलॉजी, ओर्थोपेडिक्स वा स्किन याच विषयात असे त्याला वाटते, कारण त्या ब्रांचेसना प्रतिष्ठा आहे, त्यात बक्कळ पैसा आहे असे त्याला सिनियर्सनी सांगितले आहे. दुर्दैवाने यात किंवा इतर कशातही प्रवेश मिळेल एवढे गूण अभिनवला नीट पीजीच्या परीक्षेत मिळत नाही आहेत. तीन वर्षे झालीत तरी तो अद्याप परिक्षाच देत आहे. तोच तोच अभ्यास करून अभिनव कंटाळला आहे. बर्‍याचदा त्याला फ्रस्ट्रेटेड वाटतं. कॉलेजमध्ये फिरतांना लाज वाटते. खोली – लायब्ररी – मेस एवढेच चक्र दिवसभर चालू आहे. 27 वर्षे वय झालं तरी अजूनही त्याचा गुजारा आई-वडील पाठवत असलेल्या पैशांवरच होतो आहे.

जळगावची प्रणाली आता गेली चार वर्षे पुण्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करते आहे. तिला भरपूर पॅकेज आहे याचा तिला झालेला आनंद आता ओसरला आहे पण त्याबाबत तिच्या आई-वडीलांना असलेला अभिमान मात्र अजून कायम आहे. त्याहून किमान दीडपट अधिक कमावणारा मुलगाच प्रणालीकरिता बघायचा असे त्यांनी ठरवले आहे. इकडे प्रणालीला मात्र तिच्या कामात आता कुठलाही उत्साह राहिलेला नाही. रोज पाच कधी वाजतील याची ती वाट बघत असते. ऑफिसमधील सहकारी देखील विकेंडचा प्लॅन काय करायचा याचीच चर्चा करत असतात. दारु पिणे प्रणालीला स्वत:ला फारसे पटत नाही पण सोबतचे मित्र-मैत्रिणी मनसोक्त पितात आणि आपण एकटे पडायला नको म्हणून ती त्यांच्यासोबत पब्सना जात असते. पुण्यातले बहुतांश हॉटेल्स त्यांनी पालथे घालून झाले आहेत. ‘पुण्यात फ्लॅट बूक कर’ असा पालकांचा तगादा सुरू असतो तो तिने कसाबसा आतापर्यंत थोपवून धरला आहे. आपण काही सामाजिक योगदान द्यावे असेही प्रणालीला अधेमध्ये वाटते पण नेमके काय करावे हे काही सुचत नाही.

प्रतीक नांदेडचा. विद्यापीठामध्ये एमएच्या पहिल्या वर्षाला त्याने नाव नोंदवले होते पण मग मध्येच ते सोडले. त्याचा दिवसाचा मुख्य कार्यक्रम म्हणजे इतर दोन मित्रांना घेऊन रोज 50-100 रुपयांचे पेट्रोल भरून त्याच्या यामाहा बाईकवर ट्रिपलसीट फिरणे. त्याला टापटीप कपडे घालायला आवडते. फोटोग्राफरला 200 रुपये देऊन रोज मस्त फोटो काढून घेणे आणि त्याची इन्स्टाग्राम स्टोरी करणे हा त्याचा आवडता छंद. कोणाचे फॉलोअर्स किती व ते कसे वाढवायचे हा तीन मित्रांच्या गहन चर्चेचा नेहमीचा विषय. काम व कमाई यापेक्षा दारु, खर्रा व कॅरम हे जवळचे मुद्दे. आपल्या सारख्या युवांना ‘नीट’ (NEET – Not in Education, Employment or Training) म्हणून संबोधले जाते हे त्यांच्या गावीही नाही. आणि सरतेशेवटी, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा, संदीप. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडचा. कृषीमध्ये बीएससीची पदवी घेऊन आता चार वर्षे पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. युपीएससी नाही तर किमान एमपीएससी तरी होऊ या इच्छेवर तगणार्‍या लक्षावधी तरुणांपैकी तो देखील एक आहे.

वरील सातही उदाहरणे (नावे बदलली आहेत) हे अपवाद नाहीत तर सध्याच्या युवांच्या सार्वत्रिक स्थितीचे प्रातिनिधिक निदर्शक आहेत.

निर्माण उपक्रमाद्वारे गेल्या दीड दशकात प्रथम महाराष्ट्रातील आणि नंतर भारताच्या 21 राज्यातील हजारो तरुण-तरुणींना भेटण्याची, संवाद साधण्याची, त्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधी मला आणि निर्माण टीम मधील माझ्या सहकार्‍यांना लाभली. त्यादरम्यान हे सात जण विविध रुपात, तपशीलाच्या काही बदलासह आम्हाला वारंवार भेटलेत. मनापासून वाईट वाटावे अशी ही परिस्थिती आहे.


लहान मुलांच्या शारीरिक कुपोषणाबाबत बर्‍याचदा चर्चा होते, बातम्या होतात, ते योग्यच आहे. पण आपल्या युवांच्या व्यक्तित्व कुपोषणाची काय परिस्थिती आहे याची भनक देखील कोणाला नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – 5 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 5 वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषणाचे (stunting) प्रमाण हे 35% आहे. मात्र निर्माणद्वारे आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासात युवांमधील व्यक्तित्व कुपोषणाचे (languishing) प्रमाण हे 43% आढळून आले. भारतासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हे लक्षात घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याची चर्चा आपण पुढील लेखात करुया.



अमृत बंग

लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात संपादित सदरामधील एक लेख आहे.

amrutabang@gmail.com