'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 4 December 2012

सीमोल्लंघन, नोव्हेंबर २०१२


कर के देखना है?


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
२ वर्षांपूर्वी २०१० च्या डिसेंबर महिन्यात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एका आगळ्यावेगळ्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सुमारे ५००० ग्रामीण स्त्रिया व पुरुष, आपली रोजी चुकवून आलेले, चिमूर ते नागपूर मधील तब्बल १३५ किमी अंतर कापून, चालत चालत. कपडे मळलेले, ऐन थंडीत घामाच्या धारा, मात्र उत्साहात कुठेच कमी नाही. त्यांच्या तार सप्तकातल्या घोषणांनी उभे नागपूर दणाणून गेले. श्रमिक एल्गार व गुरुदेव सेवा मंडळाने श्रीमती पारोमिता गोस्वामींच्या नेतृत्वाखाली काढलेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीची मागणी करणारा हा मोर्चा. दारूच्या झळा सोसलेल्या सामान्य महिलांना तोंड देताना सर्वच नेतृत्वाची तारांबळ उडाली. खुद्द मुख्यमंत्र्यांना पारोमिता ताई, डॉ. राणी बंग (अम्मा) व सहकाऱ्यांसोबत चर्चा करण्यावाचून पर्याय उरला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना २ महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तज्ञांची समितीही नेमली. समितीने फेब्रुवारी २०१२ मध्ये आपला अहवालही सादर केला. मात्र अजूनही दारूबंदीबाबत कोणताही निर्णय नाही.
पण चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी का? साधी सोपी आकडेवारी पाहू. मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यात साधारणपणे तब्बल ४०० कोटी रुपयांची दारू विकली गेली. चंद्रपूरची लोकसंख्या २० लाख, म्हणजेच साधारणपणे ४ लाख कुटुंबे. याचा अर्थ दारूमागे प्रत्येक कुटुंबाचे दर वर्षी १० हजार रुपये खर्च होतात! मग चंद्रपुरात दारूचा पूर आलाय असं म्हणायला हरकत नाही, नाही का?
आपल्याला काय फरक पडतो? येऊ दे की चंद्रपुरात पूर...
चंद्रपूरच्या पूर्वेला गडचिरोलीत दारूबंदी आहे, छत्तीसगढमध्ये दारूबंदीची प्रक्रिया सुरू आहे. दक्षिणेला आंध्रात अंशतः दारूबंदी आहे (देशी दारूवर बंदी). पश्चिमेला वर्ध्यात दारूबंदी आहे तर यवतमाळमध्ये दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. म्हणजे चंद्रपूरच्या भोवती दारूबंदीची भिंत! मात्र या दारूबंद प्रदेशात चंद्रपुरातून बेकायदेशीर दारूची विक्री होते. इथल्या वैनगंगेला गंमतीने ‘वाईन’गंगा म्हटले जाते. एकेक सुटा दारूबंद जिल्हा असला की अवैध दारूची वाहतूक रोखणे कठीण, मात्र एक लांब दारूबंद झोन असला तर ही वाहतूक रोखणे तुलनेने सोपे होऊन जाते. मग करूयात का चंद्रपूर दारूबंदीची मागणी?
काय म्हणता? तुम्ही चंद्रपूरचे नाही, वर्धा, गडचिरोली, छत्तीसगढ, आंध्राचेही नाही?
उभ्या महाराष्ट्रात मागच्या वर्षी ३० हज्ज्जार कोटी रुपयांची दारू खपली. म्हणजे जवळजवळ दीड तेलगी स्टँप घोटाळा किंवा अर्धा सिंचन घोटाळा एका वर्षात, एकट्या महाराष्ट्रात! बरं दारू म्हणजे काही दूध नव्हे. Cancer, liver cirrhosis या शारीरिक आजारांसोबतच नैराश्य, वेडेपणा इ. मानसिक आजार, त्यातून घडणाऱ्या आत्महत्या, अपघात, घराबाहेरचे व घरात घडणारे गंभीर गुन्हे, ही सर्व दारूचीच पिलावळ. २०% शेतकऱ्यांच्या आत्महत्या दारूमुळे (इति मा. नारायण राणे) व ५०% अपघात दारूच्याच नशेत! मग हा चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या नवऱ्याकडून मार खाणाऱ्या एका महिलेचा प्रश्न का आपणा सर्वांचा प्रश्न?
मग लढूयात का दारूविरुद्ध? पण कसे?
 • १२-१२-२०१२ रोजी हिवाळी अधिवेशनात पारोमिता ताईंच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरच्या दारूबंदीची मागणी करणारा मोर्चा पुन्हा निघणार आहे. येणार का नागपुरात? आम्ही जात आहोत.
 •  दारूप्रश्न, दारूचे दुष्परिणाम, दारूमागचे अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, राजकारण समजून घ्यायचे का? नायनांचे दारूसंबंधी ४ लेख आपण येथे वाचू शकतो: 
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/2/Letter_to_CM_Against_Alcohol.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Vishai_Aadhunik_Paschyaatya_Chintan.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Mukti_Dhoran.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/3/Dhayapasoon%20Darula%20Virodh_Dr%20Abhay%20Bang.pdf
 • आपल्या जिल्ह्यात दारूचा प्रश्न किती मोठा आहे? RTI टाकून जाणून घ्यायचं का?
 •  सह्यांची मोहीम हाती घ्यायची का? चंद्रपूरच्या दारूबंदीची मागणी करणाऱ्या १० हजार जणांची नावे व सह्या मुख्यमंत्र्यांना पाठवायच्या का? (१० हजार लोकांच्या १० हजार प्रश्नांना उत्तरे देताना आपलीही समज वाढत जाईल.)
 • चंद्रपूर दारूबंदीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री व शरद पवारांना पाठवायचे का?
 • महाराष्ट्रात ज्या ठिकाणी निर्माणींचा गट असेल तेथे प्रत्येकी १ चर्चासत्र घ्यायचे का?
 • अजून काय करता येईल? तुम्ही सुचवा ना...

निर्माण कोऑर्डिनेशन टीमची आढावा बैठक संपन्न


निर्माण कोऑर्डिनेशन टीमची आढावा बैठक 26 व 27 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. एकूण 18 जणांच्या चमुपैकी 15 जण या बैठकीला उपस्थित होते. 26 नोव्हेंबरला संध्याकाळी श्री. नंदा व सौ. विद्या खरे यांच्याशी सगळ्यांची भेट झाली तर 27 तारखेला सकाळी दोन तास डॉ. अभय बंग यांनी सर्वांशी संवाद साधला. निर्माण प्रक्रियेची आजवरची वाटचाल, प्रश्न, निर्माण प्रक्रियेचे स्पष्ट होत जाणारे स्वरूप व यापुढील कामाच्या दिशा व नियोजन, इ. विविध विषयांवर या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली.
 • महाराष्ट्रातील युवांमधून सामाजिक कृती व परिवर्तनासाठी नवे कार्यकर्ते निर्माण व्हावेत यासाठी सुरु झालेला, निर्माण समुदायाचे मार्गदर्शनाने आणि सर्चमहाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनयांच्या पुढाकाराने चालणारा असा हा एक कार्यक्रम आहे, अशी या प्रक्रियेबाबतची निःसंदिग्ध वैचारिक एकवाक्यता सर्व चमुमध्ये तयार झाली.
 • महाराष्ट्रातील युवांना समाजोन्मुख होवून व पुढे परिवर्तनाचा कार्यकर्ता म्हणून विकसित होण्यासाठीची शिक्षणप्रक्रिया व फॅसिलिटेशन उपलब्ध होणे या अनुषंगाने निर्माण कोऑर्डिनेशन टीमच्या कामाचा व्याप, स्वरूप व संरचना कशी असावी, गतिमानता व वैविध्यता यांचा योग्य ताळमेळ ठेवून निर्णय प्रक्रिया कशी असावी, पुढील सहा महिन्यांसाठीचा ढोबळ कृती कार्यक्रम व जबाबदा-या काय, इ. बाबतही चर्चा झाली.
 • दिवसेंदिवस निर्माणचा आकार व त्यात सहभाग घेतलेल्या शिबिरार्थी युवांची संख्या वाढत असल्याने कधी कधी व्यक्ती-व्यक्तींमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नैसर्गिकपणे वाढते. मात्र यामुळे निर्माण प्रक्रीयेला हानी पोहोचू नये याबाबतही चर्चा झाली.
 • सामाजिक योगदान देण्याच्या व्यापक उद्देशाने एकत्र आलेले निर्माणी तसेच कृतीशील राहावेत व राजकीय पक्षांसारखा गटबाजीचा निर्माणमध्ये प्रादुर्भाव होऊ नये ही काळजी घेणे सर्वच निर्माणींची जबाबदारी आहे असे डॉ. अभय बंग यांनी बैठकीला संबोधतांना सांगितले.
 • निर्माण कोऑर्डिनेशन टीमच्या सदस्यांनी विचारपूर्वक व अत्यंत मोकळेपणे एकमेकांशी संवाद साधल्याने ही बैठक वैचारिकदृष्ट्या सकस व तरीही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या प्रकारची कार्यपद्धती व जबाबदारीचे भान या पुढेही निर्माण कोऑर्डिनेशन टीममध्ये व वैयक्तिक सदस्यांमध्ये वाढत जावे असे सर्वांना वाटले.
 • रंजन पांढरे, वेंकी अय्यर, अश्विन भोंडवे व अतुल गायकवाड यांनी आयोजनात मुख्य भूमिका बजावली

महाराष्ट्र नॉलेज फाऊन्डेशनच्या वतीने सुरु होतोय दुष्काळ निवारण प्रकल्प


यंदाच्या वर्षी पावसाच्या अल्पवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न जास्तंच बिकट झाला आहे. ह्यावर कायमचा उपाय करण्याच्या दृष्टीने एक प्रकल्प महाराष्ट्र नॉलेज फाऊन्डेशन तर्फे सुरु करण्यात येत आहे. ह्यामध्ये महाराष्ट्रातील विविध तज्ञ व्यक्ती - कल्पनाताई साळुंखे, अश्विनी कुलकर्णी, कुमार शिराळकर, पोपटराव पवार, तसेच ग्रीन हिल्स, वसुंधरा ग्रुप, इकॉलॉजिकल सोसायटी अशा संस्थांचा समावेश आहे. ह्यासंदर्भातील एक मीटिंग नुकतीच पुण्यात एम. के. सी. एल. येथे पार पडली. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील एन. एस. एस. गटांचा देखील ह्यात समावेश असणार आहे. निवडक गावांमध्ये स्थानिक लोकांच्या, स्वयंसेवी संस्थांच्या, एन. एस. एस व युवक गटांच्या सहभागातून विविध पाणलोटक्षेत्र विकासाची व इतर संवर्धनाची कामे उभी करणे असे ह्या प्रकल्पाचे स्वरूप आहे. ह्याचाच एक भाग म्हणून दुष्काळाच्या प्रश्नावर पूर्णवेळ काम करण्यासाठी काही फेलोशिप्स देण्यात येणार आहेत. ह्या उपक्रमात निर्माणच्या स्थानिक गटांनी जास्तीतजास्त सहभाग घेऊन दुष्काळाच्या प्रश्नाचा सामना करण्यात मदत करावी ही सगळ्यांना विनंती. ह्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या अंकात  पाठवण्यात येईलच.

युवतींच्या आत्महत्येच्या प्रश्नावर खानदेश गटाचे काम सुरु

खानदेशातील युवतींचे वाढते आत्महत्येचे प्रमाण थांबविण्यासाठी निर्माणच्या खानदेश गटाने, युवतींच्या सक्षमीकरणाचा एक प्रयत्न तेथील ३ महाविद्यालयांत सुरु केला आहे. ह्या अंतर्गत धुळ्यातील जय हिंद कॉलेज, पाणेशा कॉलेज व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे युवतींचे गट बांधण्यात आले. ह्या युवतींच्या गटांनी खानदेशातील पोलीस अधीक्षक, स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ इत्यादी अनेक तज्ञ व्यक्तींशी संवाद साधला. त्यांना आत्महत्येची कारणे, त्यावरील उपाय, युवतींचे प्रश्न, सामाजिक परिस्थिती अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ह्या तिन्ही विद्यालयातील प्राध्यापकांशी देखील त्यांनी संवाद साधून एक सपोर्ट स्ट्रक्चर निर्माण केले आहे. ह्या कृती गटांनी, महाविद्यालयातील इतर युवतींशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे व वेळप्रसंगी तज्ञांशी भेट घालून देणे, अशी त्यांची कार्यपद्धती असणार आहे.       

श्रेया अयाचितची ‘संतुलन’ व्यसनमुक्ती केंद्रात इंटर्नशिप पूर्ण

        कॉलेजमध्ये मिळणाऱ्या ज्ञानाला प्रात्यक्ष अनुभवाची जोड मिळावी या उद्देशाने निर्माण ४ च्या श्रेया अयाचितने नुकतीच पुण्याच्या संतुलनव्यसनमुक्ती केंद्रात दीड महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केली. फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेच्या मनोविज्ञान विभागात शिक्षण घेणाऱ्या श्रेयाला या इंटर्नशिपच्या निमित्ताने व्यसनी रुग्णांची केस हिस्ट्री घेण्याचे कौशल्य प्रत्यक्ष काम करताकरता मिळाले. त्याबरोबरच व्यसन, व्यसनाधीनता, ड्रग्स आणि त्यांचे परिणाम, व्यसनमुक्तीच्या पद्धती अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चासत्रांत सहभागी होण्याची संधी मिळाली. दर दिवाळीत चॉकोलेटस् आणि पणत्या सजवून त्यांची विक्री या ‘संतुलन’च्या कामातही तिचा हातभार लागला. एक समुपदेशक आणि एक माणूस म्हणून व्यसनाधीनतेकडे पाहताना आपल्यात कोणते गुण असावेत हे चिंतन करताना श्रेयाला ‘संतुलन’च्या अनुभवाची नक्कीच मदत होईल.