'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 13 October 2012

सीमोल्लंघन, सप्टेंबर २०१२

(सौजन्य: सतीश खळीकर)

निर्माण 5 साठी महाराष्ट्रातील पस्तीसही जिल्ह्यांमधून तरुणांचा भरघोस प्रतिसाद


जानेवारी 2013 मध्ये होणार्‍या निर्माण 5 च्या शिबिरासाठी जून महिन्यापासून निर्माण टीमतर्फे प्रसिध्दीसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न सुरु झाले होते. याचाच परिणाम म्हणून यावर्षी  महाराष्ट्रभरातून एकूण 600 प्रवेशअर्ज आले आहेत. त्यातील एकूण 300 युवक-युवती मुलाखतीसाठी निवडले गेले असून त्यातील 250 मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत निवडलेल्या 150 जणांची यादी तयार होईल. यावेळी महाराष्ट्रातील पस्तीसही जिल्ह्यातून तरुणांनी निर्माणच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. ही निर्माणच्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. गेले वर्षभर निर्माणच्या प्रसिध्दीसाठी हातभार लावणार्‍या व मुलाखतींसाठी महाराष्ट्राचा दौरा करण्यार्‍या सर्व निर्माणींचे या निमित्ताने अभिनंदन!

निर्माण 2 च्या कल्याण टांकसाळेचे System thinking मधील काम महाराष्ट्र बोर्डाच्या पर्यावरणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट


निर्माण 2 चा कल्याण टांकसाळे गेली चार वर्ष पर्यावरणाच्या संबंधातील System dynamics या विषयावर काम करत आहे. यात प्रामुख्याने माणूस आणि पर्यावरण यातील परस्परसंबंध, त्यामधील गुंतागुंत हा विषय सामान्य माणसाला बोध होईल अशा स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न तो करत आहे. या त्याच्या चार वर्षांच्या कामाचे फलित म्हणजे त्याचे या क्षेत्रातील योगदान आता महाराष्ट्रातील अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून अभ्यासतील. कोठारी कमिशनच्या शिफारसीनुसार अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात ‘पर्यावरण आणि शाश्वत विकास’ या विषयांचा समावेश केला गेला आहे. यासाठीचा सर्व पाठयक्रम NCERT ने विकसित केला असून या क्षेत्रातील कल्याणचे काम हे उल्लेखनीय असल्यामुळे त्याने लिहिलेला एक स्वतंत्र धडा यात समाविष्ट केला गेला आहे. या धडयामध्ये मानव आणि पर्यावरण यामधील संबंध, तो समजून घेण्याची गरज, त्यासाठी आवश्यक साधने याचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम  राज्यातील विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील अकरावी आणि बारावीतील एकूण 8 लाख विद्याथी वाचतील. अकरावीचे पुस्तक मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असून 2013 पर्यंत बारावीच्या अभ्यासक्रमातही तो समाविष्ट केला जाईल.

या पुस्तकात डॉ. माधव गाडगीळ लिखीत एका धडयाचा समावेश आहे. पर्यावरणाच्या पुस्तकात System thinking या विषयाचा अंतर्भाव करणारे महाराष्ट बोर्ड हे जगातील पहिले बोर्ड आहे. आणि यात कल्याणचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याने त्याचे निर्माण परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन! 

निर्माण 2 च्या सजल कुलकर्णीचा IISC बॅंगलोर येथील कार्यशाळेत सहभाग

निर्माण 2 च्या सजल कुलकर्णी याने नुकतेच आपले मास्टर्सचे शिक्षण पूर्ण करुन तो ‘बायफ’ या संस्थेबरोबर स्पार्क फोलोशिप अंतर्गत काम करत आहे. गेले तीन वर्ष तो विदर्भातील गोंड व गवळी हे आदिवासी या भागातील स्थानिक गायीच्या जातींचा कशाप्रकारे उपयोग करतात, त्यांची या प्रदेशाशी अनुकूल वैशिष्ट्ये काय, वर्षानुवर्षे या जातीचा लोकांच्या समाजजीवनावर काय परिणाम झाला याचा Anthropology आणि Genetics च्या अंगाने तो अभ्यास करत आहे. तसेच गडचिरोलीतील गोंड आदिवासींची जनावरं आणि तेथे घेतली जाणारी पिकं हाही त्याच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. जनावरांच्या जातींचे जनुकांच्या आधारावर वर्गीकरण करण्यासाठी उपयुक्त पध्दतींची माहिती देणारी एक कार्यशाळा ‘IISC बॅंगलोर’ येथे आयोजित करण्यात आली होती. सजलचे या विषयातील आत्तापर्यंतचे काम पाहून या कार्यशाळेस उपस्थित राहण्यास त्याला निमंत्रित केले होते. भारतातील निव्वळ 20 जणांना येथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. जनावरांच्या आणि वनस्पतींच्या नष्ट होणार्‍या दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी त्या कुठून उत्पन्न झाल्या, त्यांचा जनुकीय इतिहास माहिती असणं गरजेचं असतं. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची गरज असते. पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेदरम्यान सजलला Molecular phylogeny म्हणजेच वनस्पतींची मूळ उत्पती शोधून काढण्यासाठी गरजेच्या असणारे प्रगत तंत्रज्ञानाची ओळख झाली. अत्यंत मोजक्या संस्थांमध्ये शिकवल्या जाणार्‍या या पध्दतींचा सजलला आपल्या कामात नक्कीच उपयोग होणार आहे.

नव्याने तयार झालेल्या नागपूरमधील स्थानिक गटातर्फे गणेशविसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम आयोजित

नागपूरमध्ये निर्माण 5 चा एकूण 52 तरुण तरुणींचा गट तयार झाला आहे. या गटातर्फे नागपूरमध्ये गणेशविसर्जनाच्या निमित्ताने अंबाझरी या तलावावर निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निर्माणची एकूण 30 मुले सहभागी झाली होती. नागपूर महानगर पालिका आणि निर्माणच्या मुलांच्या मदतीने या तलावावर प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी तीन कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. निर्माणच्या मुलांच्या मदतीने 12 तासात एकूण 1000 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच मूर्तींबरोबर निर्माल्य संकलन करुन त्यापासून खत करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरु केली आहे. विसर्जनाबरोबर पाण्यात वाहण्यात येणारे एकूण 154 नारळ त्यांनी जवळच्या एका अनाथाश्रमाला दिले. महानगरपालिकेचे सहकार्य, निर्माणच्या मुलांचे आयोजन आणि लोकांना दिलेल्या प्रतिसाद यामुळे या कार्यक्रम अत्यंत शिस्तबध्द पध्दतीत पार पडला. नागपूरच्या नुकत्याच निर्माण झालेल्या गटासाठी ही एक चांगली सुरुवात होती. तसेच निर्माणविषयी माहिती पसरण्याच्या दृष्टीनेही याचा खूप फायदा झाला. या उपक्रमाचे संपूर्ण आयोजन निर्माण 3 च्या रंजन पांढरे आणि त्याच्या सहकार्यांनी केले होते.

नव्याने स्थापन झालेला नागपूर निर्माणचा ग्रुप

‘कोरडवाहू शेती’ या विषयात काम करण्याची इच्छा असणार्य़ा् निर्माणच्या मुलांची पुण्यात प्राथमिक बैठक


निर्माण मधील अनेक तरुणांना शेती, पाणी व्यवस्थापन आणि त्यावर आधारित व्यवसाय या विषयात रस आहे. यातील काही जण प्रत्यक्ष शेती व्यवसायात गुंतली आहेत तर काहींना या क्षेत्रात भविष्य़ात काम करण्याची इच्छा आहे. या सर्व समविचारी तरुणांची एक प्राथमिक बैठक नुकतीच पुण्यात झाली. कोरडवाहू शेती समजून घेणे आणि वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या तरुणांचा हा प्रश्न सोडवण्यास कसा वापर करुन घेता येईल यावर विचार करणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. निर्माणचे एकूण 28 तरुण या बैठकीस उपस्थित होते. मार्गदर्शनासाठी नंदा खरे, नरेंद्र खोत आणि संजय पाटील उपस्थित होते. कोरडवाहू शेतीशी संबंधित जलसंधारण आणि रोजगार हमी योजना, सेंद्रिय शेतीशी संबंधित व्यवसाय, शेतीच्या संबंधित police research, पाणी वाटपातील खाजगीकरण , शेती संदर्भात दस्तऐवजीकरण (documentation) अशा विविध विषयात अधिक काम करण्याची इच्छा यावेळी निर्माणींनी व्यक्त केली. या चर्चेमधून प्रत्येकाला कामांची विभागणी करुन देण्यात आली. हवामानानुसार योग्य असणारे स्थानिक पिकांचे वर्गीकरण करणे, प्रदेशानुसार उपयुक्त असणार्‍या पिकांची यादी तयार करणे, शेतीसंदर्भातील पॉलिसीजचा अभ्यास करणे, रोजगार हमी योजनेतील शेतीसंबंधातील कामे ओळखणे तसेच आदर्श शेतीचा प्रयोग करणार्‍या व्यक्ती किंवा संस्थांना भेटी देणे अशाप्रकारचा कृतीकार्यक्रम या बैठकीदरम्यान ठरला आहे.