'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 25 January 2014

सीमोल्लंघन, जानेवारी २०१४

सौजन्य : पल्लवी मालशे, pallavi.malshe@gmail.com

या अंकात...

संपादकीय

निर्माण परिवारासाठी यावेळी अतिशय आनंदाची बातमी आहे. आपले मित्र सजल कुलकर्णीडॉ. प्रियदर्श तुरे यांना हुंडाविरोधी चळवळीमार्फत युवा वैज्ञानिक व साने गुरुजी युवा पुरस्कार मिळाला आहे. दोघांच्या कामाची पद्धत वरकरणी वेगवेगळी वाटली तरी परस्परपूरक आहे. पूर्व विदर्भातील गायी, त्यांची वैशिष्ट्ये व तेथील समाजात असणारे त्यांचे सांस्कृतिक स्थान हा विषय केंद्रस्थानी ठेवून गेली काही वर्षे सजल काटेकोरपणे संशोधनाचे काम करत आहे. याउलट प्रियदर्श हा पेशाने डॉक्टर असला तरी वैद्यकीय सेवा हा एकमेव फोकस न ठेवता मेळघाटातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासात आपले योगदान असावे यासाठी तो धडपडत आहे. त्यांच्या कामाला हळुहळू मान्यता मिळत असली तरी त्याआधी त्यांनी तीन वर्षांहून अधिक काळ झोकून देऊन काम केले आहे हे लक्षात घ्यावे लागेल.
सजलचे जसे गायींवर संशोधन, तसेच सुवर्णा खडक्कारचे महाराष्ट्रात (विशेषता विदर्भात) पिकांवर पडणाऱ्या कीडीवर संशोधन. तिचेही तीन शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. यासोबतच प्रियदर्श तुरे आणि अद्वैत दंडवते यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मेळघाट व जळगाव येथे शाळा सुरू केल्या आहेत, एक आदिवासी मुलांसाठी तर दुसरी असंघटीत कामगारांच्या मुलांसाठी.
या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘लिहा... लिहा...’ असे मागे लागावे न लागता मुलांनी इतके भरभरून लिहून दिले की काही बातम्या पुढच्या अंकात ढकलाव्या लागल्या. लिहिताना एक पथ्य पाळावे लागते. केवळ बाह्य घटना वाचकाच्या मनाची पकड घेऊ शकत नाहीत. लिहिणाऱ्याच्या मनात काय तरंग उमटले, त्याची काय वाढ झाली यात वाचकाला रस असतो. मात्र संदर्भाविना केवळ मनातले विचार लिहिले तर ते वास्तववादी वाटत नाहीत. बाह्य घटना व मनातले तरंग यांत समतोल साधण्याची तारेवरची कसरत मुलांनी चांगलीच केली आहे.
आपल्या कृतीतून आपले शिक्षण होते असे आपण निर्माणमध्ये मानतो. मात्र आता हळुहळू अशी वेळ येत आहे की आपल्या शिक्षणासाठी केवळ स्वतःच्याच कृतीवर अवलंबून रहायची गरज नाही. कामाच्या विषयांनुसार मुले एकत्र येत असून वैयक्तिक व सामूहिक कृती आणि त्यायोगे होणारे संपूर्ण गटाचे शिक्षण यांच्या सहाय्याने सामाजिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीने वेगाने पावले पडत आहेत. कोरडवाहू गटाची प्रेरणादायी वाटचाल आपण पाहतच आहोत. ‘व्यसनमुक्ती’ या महत्त्वाच्या विषयावर विविध अंगाने काम करणाऱ्या मुलांचे critical mass होऊ घातले आहे. धान्यापासून दारू निर्मितीविरुद्ध झालेल्या आंदोलनात आपल्यापैकी  अनेक जण सहभागी झाले होते. आपण signature / post card campaign, पथनाट्य, साखळी उपोषण, RTI च्या माध्यमातून समस्येचा अभ्यास, PIL अशा अनेक मार्गांचा वापर केला होता. सायली व सनत यांनी तर त्यांच्या आगळ्यावेगळ्या लग्नात चक्क धान्यापासून दारूनिर्मितीविरुद्ध मोर्चा काढला होता. याशिवाय सलग २ वर्षे चंद्रपूरच्यादारूबंदीसाठी हिवाळी अधिवेशनात नागपूरला येणाऱ्या महिलांच्या मोर्चात अनेक जण सहभागी झाले आहेत. आपापल्या भागात ग्रामीण, शहरी (मध्यमवर्ग) व शहरी (झोपडपट्टी) लोकसंख्येत तंबाखू सेवनावर किती खर्च होतो याचा सर्व्हेदेखील अनेक निर्माणींनी केला होता. निर्माणच्या शिबिरांमध्ये दारू व तंबाखूबद्दल सत्रे व चर्चासत्रे होत असतात. वैयक्तिक पातळीवरदेखील ही समस्या आपापल्या परीने सोडवण्यासाठी अनेकजण धडपडत आहेत. संतोष व जयश्री यांना ठाणेदारांच्या मदतीने ३२ हातभट्ट्या बंद पाडण्यात यश आले. तसेच महिलांना संघटित करून मतदानाद्वारे शासनमान्य देशी दारूचे दुकानही ते बंद पाडू शकले. RTI चे हत्यार वापरून सचिन महालेला जळगावमधील दारूच्या जाहिरातींचे फलक हटवण्यात यश आले. अमोल लगाडने बीड जिल्ह्यातील त्याच्या गावात तंबाखू व गुटख्याच्या पुड्यांची होळी केली. संघर्षासोबत व्यसनमुक्तीच्या दलदलीत पाय टाकण्याचे साहस अनेकांनी, विशेषतः मुलींनी दाखवले. मृण्मयी अग्निहोत्रीने ‘मुकांगण’ व्यसनमुक्ती केंद्रातील स्त्रियांसाठीचा खास विभाग ‘निशिगंध’ व ‘संतुलन’ व्यसनमुक्ती केंद्रात काम केले. श्रेया अयाचितने ‘संतुलन’ व्यसनमुक्ती केंद्रात काम केले. समीक्षा मुरकुटेने ‘साहस’ व्यसनमुक्ती केंद्रात आरोग्यशिक्षण केले. पुण्याच्या गटाने ‘मुक्तांगण’ला भेट दिली. मयूर दुधेसौरभसोनावणेला आपल्या मित्रांचे व्यसन सोडवण्यात काही प्रमाणात यश आले. वैभव आगवणेने दारूची समस्या कशी सोडवता येऊ शकते याबद्दल शास्त्रीय निबंधाचा अभ्यास करून आपल्याला सीमोल्लंघनद्वारे सोप्या पद्धतीने माहिती दिली. याच विषयात तज्ञ असणाऱ्या धरव शहाने गुगल ग्रुपवर याविषयी वेळोवेळी शास्त्रीय माहिती दिली. यादरम्यान काहींनी याविषयावर वाचन केले, नाटके पाहिली. आपल्या जागी केलेल्या स्थानिक कृतीला मोठ्या चित्रात महत्त्वाचे स्थान आहे. या चित्राचा ढोबळ आराखडा बनत आहे. त्यात आणखी खूप रंग भरता येण्यासारखे आहेत. गरज आहे ती हे आणि याहीपेक्षा मोठे निर्माणबाहेरील चित्रदेखील पाहता येण्याची. दारू-तंबाखूत गुंतलेले मोठ्या लोकांचे हितसंबंध, त्यांच्या आहारी गेलेल्यांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक समस्या अशी कठीण आव्हाने निर्माणचे तिशीच्या आतले तरुण स्वीकारत आहेत. स्वयंप्रेरित कोरडवाहू गटाप्रमाणेच ‘कोरड्याकडे वाहून नेणारा’ हाही अभ्यासू गट बनू शकेल काय?

निखिल, josnikhil@gmail.com

स्वभाव, स्वधर्म आणि युगधर्म शोधताना . .

नुकतीच निर्माण ५ च्या अवैद्यकीय मुलांची शिबीरमालिका पूर्ण झाली. ५.३ अ शिबिराचा वृत्तांत शिबिरात सहभागी झालेल्या अमृता ढगेच्या शब्दांत...
“२९ डिसेंबर, २०१३ ते ६ जानेवारी, २०१४ ह्या काळात निर्माण ५ चे तिसरे शिबीर (निर्माण ५.३ अवैद्यकीय बॅचचे शेवटचे शिबीर) यशस्वीरित्या पार पडले. शिबिराची सुरुवात अर्थातच शिबिरार्थ्यांनी गेल्या सहा महिन्यातील उपक्रम व त्यातून झालेले शिक्षण शेअर करण्यापासून पासून झाली. मुला-मुलींच्या कामातल्या विषयांमधली विविधता आणि कामाच्या पद्धतींमध्ये असलेल्या फ़रकांमुळे हे सेशन खूप रंगत गेलं.
पहिल्या दिवशीच्या सत्रांची सुरवात ‘जोडीदार कसा निवडावा आणि लग्न’ या गंभीर आणि अति महत्वाच्या सत्राने झाली. सर्वांनीच हिरीरीने सहभाग घेतलेल्या या चर्चासत्रात अनेकांना जोडीदार कसा असावा (आणि काहींना जोडीदार ‘कोण’ असावा) याची स्पष्टता झाली. यानंतर विठ्ठल साळवे आणि अमृत बंग ह्यांनी ‘दरवर्षी सरकारी महाविद्यालयांतून पुरेसे डॉक्टर्स बाहेर पडत असतानाही सरकारी रुग्णालयात डॉक्टरांच्या जागा रिक्त कशा’ हा प्रश्न सोडवताना आलेले RTI संदर्भातील त्यांचा अनुभव आणि त्यातले खाचखळगे समजावून सांगितले. सत्राच्या शेवटी प्रत्येकाने एक RTI लिहून पहिला आणि आपणही RTI भरू शकतो याची सर्वांना खात्री पटली.
दुसऱ्या दिवसापासून झालेल्या सत्रातून आनंद बंग, मकरंद सहस्रबुद्धे, नंदा काका (नंदा खरे), श्रीनिवास खांदेवाले, संजय पाटिल, आणि देवाजी तोफ़ा आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजित कुमार ह्यांकडून त्यांचे अनुभव व अभ्यासाचे भांडार सर्वांसाठी खुले केले. या सत्रांमधून तसेच या सर्व वरिष्ठांशी झालेल्या गप्पांमधून, प्रश्नोत्तरांमधून खूप शिकायला मिळालं आणि कामाबद्दलचा दृष्टिकोन, समज, हुरुप वाढत गेला.
दरम्यान शिबिरार्थ्यांमध्ये ‘स्त्रियांवरील अत्याचारास स्त्रियाच जबाबदार आहेत का?’, ‘आजचे शिक्षण विद्यार्थ्याला वस्तवापसून दूर नेऊन एकाकी बनवते का?’ आणि ‘भारताचे पुढचे पंतप्रधान कोण असावे – राहुल गांधी, नरेंद्र मोदी का अरविंद केजरीवाल?’ अशा वाद-विवाद चर्चा आयोजिल्या होती. या ज्वालाग्राही विषयांवरील चर्चादेखील अतिशय ज्वलंत होती आणि याचबरोबर या विषयांतील विविध कंगोरे समोर आणणारी होती.
Inside Job (अमेरिकेतल्या रिसेशन वर भाष्य करणारी) ही डोक्युमेन्टरी फ़िल्म, जंगल वॉक, सांस्कृतिक कार्यक्रम ह्या सगळ्यामुळे धमाल पण तेवढीच आली. सुलभा ताई व सुनील काका ह्यांच्या सानिध्यात चर्चा छान रंगल्या. मॅस्लोज थेअरी व नायनांनी घेतलेलं स्वभाव-स्वधर्म-युगधर्माचं सेशन खूप अंतर्मूख करणारं होतं.

एवढ्या सगळ्या धमाल मस्ती आणि एकत्र शिकण्यातल्या मजेनंतर शेवटच्या दिवशी एकमेकांचा निरोप घेणं सर्वांनाच जड गेलं. आणि नेहमी टच मध्ये राहण्याच्या आणि एकमेकांच्या गावी येण्याच्या आणा-भाका देत शिबिरार्थी आपापल्या दिशांना पांगले...”

सजल कुलकर्णी व प्रियदर्श तुरे ह्यांना हुंडाविरोधी चळवळीतर्फे युवा सन्मान जाहीर

पुरस्कार स्वीकारताना सजल
 गेली ४० वर्ष हुंडाविरोधी चळवळ प्रभावीपणे हुंडा आणि त्याभोवतालच्या प्रश्नांवर कार्यरत आहे. या चळवळीचे प्रणेते, स्वातंत्र्य सैनिक आणि साने गुरुजींचे मानसपुत्र स्व. मामासाहेब कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दर वर्षी युवा वैज्ञानिक पुरस्कार व सानेगुरुजी युवा पुरस्कार दिला जातो. ह्यावर्षी हे दोन्ही पुरस्कार अनुक्रमे सजल कुलकर्णी व प्रियदर्श तुरे (दोघेही निर्माण २) ह्यांना देण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना प्रियदर्श
१२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ह्या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. सजल कुलकर्णीला त्याच्या कठाणी जातीच्या गाईवरील अभ्यासाबद्दल, तर प्रियदर्श तुरे ह्याला त्याच्या मेळघाटातील वैद्यकीय कामाबद्दल, तसेच बिहार व उत्तराखंडमधील मदतकार्याबद्दल देण्यात आला.
पुरस्कार वितरण प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर व माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख हजर होते. रोख रुपये १०,००० व प्रशस्तीपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. सजल व प्रियदर्श ह्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या कामाविषयी जाणून घेण्यासाठी नक्की संपर्क साधा.
प्रियदर्श तुरे, gracilis4@gmail.com ; 
सजल कुलकर्णी, sajalskulkarni@gmail.com

कर के सीखो !

व्यसनमुक्तीच्या कामातील अनुभव सांगतेय निर्माण ५ ची मृण्मयी अग्निहोत्री

“निर्माण ५.१ मधून निघाल्यानंतर मनात एक गोष्ट पक्की झाली होती की कुठल्याही समस्येवर काम करायला सुरुवात करण्याआधी त्याचा भरपूर अभ्यास झाला पाहिजे; त्यामुळे पुढच्या शिबिराच्या आधीपर्यंत भरपूर पुस्तक वाचली पण कृती  शून्य....... !!!
पण निर्माण ५.२  ला सगळ्यांशी भेट झाली आणि लक्षात आल की, आपण पुस्तक वाचनातून जेवढं शिकलो त्यापेक्षा अधिक लोक कृतीतून शिकले होते. नयनांच्या बोलण्यात पण हीच गोष्ट आली की कृती आणि अभ्यास या परस्पर पूरक गोष्टी आहेत; आणि अचानक डोक्यात काहीतरी क्लिक झाल्यासारख झालं. पुढच्या ६ महिन्यांच्या कृती कार्यक्रमात हे  नक्की केलं की आता कृती आणि अभ्यास यांची सांगड घालता येईल असं काहीतरी आपल्याला करायला हवं.
             
नक्की काय करावं याचा विचार करताना तरुण मुलांचा व्यसनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यांची मानसिकता याचा अभ्यास करावा असा विचार मनात नक्की झाला. सुरुवातीला या अभ्यासात नक्की काय काय करायचे आहे याचा कच्चा आराखडा बनवला. मानसशास्त्र हा माझा अत्यंत आवडीचा विषय आणि व्यसनाधीनता ही जिव्हाळ्याची समस्या त्यामुळे पूर्ण जोशात दोन्हीवर काम करायला सुरुवात केली. सुरुवात कुठून करावी याचा विचार करता करता ‘मुक्तांगण’ ची आठवण झाली. माझी शिकण्याची सुरुवात झाली  ती मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी बोलून त्यांची परवानगी घेण्यापासून ....त्यामुळे माझ्याच विचारांशी मी स्पष्ट होत गेले. मुक्ता ताईने अगदी आनंदाने परवानगी दिली. तिच्या सूचनेप्रमाणे मी मुक्तांगणऐवजी ‘निशिगंध’ या मुक्तांगणच्या महिलांसाठीच्या व्यसनमुक्ती केंद्रात जायला सुरुवात  केली.  पहिल्या दिवशी निशिगंध मध्ये गेले तर मलाच थोडंसं विचित्र वाटत होत.  पण काही वेळातच रुळले. त्यावेळी तिथे खूप तरूण मुली पेशंट म्हणून होत्या. त्यांच्याशी हळूहळू ओळख झाली. मग तिथे बाकीची कामे सुद्धा करावी या विचारांनी मी तिथे भाजी निवडणे, जेवण वाढणे अशा कामात पण मदत करू लागले. मी दर रविवारी तिथे जायचे. त्यावेळी रविवारी त्या सगळ्या जणी एखादा चित्रपट पहायच्या. आमची पहिल्याच दिवशी अशी गट्टी जमली की ताई तू पुढच्या वेळेस आमच्यासाठी एखादा सिनेमा पाहायला आण असं सांगूनही झालं. 
याच काळात माझ्या  मनात लोकांना प्रश्नावली देणे आणि अभ्यास करणे या गोष्टींचे फार कुतुहूल होते. झालं, मीच चांगली २०-२५ प्रश्नांची प्रश्नावली बनवली; ज्याची उत्तर त्यांना फार मोठी मोठी लिहायला लागणार होती. मी प्रश्नावली घेऊन गेले; सगळ्यांना दिल्या. त्यांना या सगळ्याची सवय होती. प्रश्नावली त्यांनी पहिली आणि त्यातल्या चुका मला दाखवून दिल्या. प्रश्नावली कशी असावी याचे काही मुद्दे मी त्यांच्याकडून शिकले म्हणा ना! पण तरीही मला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी ती भरली. फारच शिकवून जाणारा अनुभव ठरला. सुरुवातीला माझ्यासमोर फक्त सिनेमांबद्दल बोलणाऱ्या मुली हळूहळू त्यांचे विचार, मते व्यक्त करू लागल्या. जवळजवळ दीड  महिना मी तिथे जात होते. ‘फ्रेंडशिप डे’ ला शेवटच्या दिवशी मी तिथे गेले, सगळ्यांनी मनापासून विचारपूस केली आणि मला  फ्रेन्डशिप बॅंड्स  देखील बांधले. 
यानंतर मी ‘संतुलन’ नावाच्या व्यसनमुक्ती केंद्रात परत जवळ जवळ दीड महिना जात होते. कॉलेजच्या मदतीने सुरु झालेला हा एक कार्यक्रम होता. तिथे आम्ही व्यसने, व्यसनमुक्ती व विविध मानसिक रोग यांबद्दल शिकलो. तिथे प्रॉपर क्लासरूम lectures कमी व्हायची आणि आम्ही बाकी काम पण करायचो. सुरुवातीला हे काम म्हणजे नसती कटकट वाटायची.. वाटायचं, आपण इथे शिकायला आलोय पण आपल्याला धड काही शिकवतच नाहीयेत; इतरच काम फार....... पण या programme च्या शेवटी हळू हळू कळत गेलं की मी या काळात नकळत खूप काही शिकत गेले होते. याच काळात अजून एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे, मी माझ्या कॉलेजचं शिक्षण आणि इथले अनुभव यांच्यात साधर्म्य ओळखू लागले होते. कॉलेजमध्ये शिकताना वाटायचं की अरे  ही Theory आज आपण संतुलन मध्ये Apply होताना पहिली. आणि संतुलनमध्ये  अथवा निशिगंधमध्ये असताना कॉलेज मध्ये शिकलेली एखादी गोष्ट अचानक relate  होऊन जायची. या काळात मुक्तिपत्रे, स्वभाव-विभव अशी काही पुस्तके वाचनात आली.  Get Well Soon”सारखं व्यसनमुक्तीवर आधारित नाटक पाहण्यात आलं. ही अभ्यासाची काही नवीन मध्यमेसुद्धा शिकून घेतली आणि त्यातून झालेल्या  शिक्षणाची नोंद घेत गेले. 
           
खरच मी अभ्यास आणि कृती यांची परस्परपूरकता शिकत गेले आणि समजत गेले. ही तर सुरुवात होती असं म्हणता येईल. आता अजून पुढची काही ध्येयं निश्चिती केली आहेत. त्यांच्याकडे वाटचाल करायला सुरुवात करायची आहे!”

मृण्मयी अग्निहोत्री, mrinmai.happythoughts@gmail.com

(सोशल ऑलिम्पियाड मधून) छोटे घडत आहेत


MKCL व निर्माणने मिळून सुरु केल्लेल्या महाराष्ट्र सोशल ऑलिम्पियाड च्या पायलट प्रकल्पाला सुरुवात होऊन ६ महिने झाले आहेत. शालेय वयोगटाच्या मुलांमध्ये सह्कारवृत्ती, सामूहिक नेतृत्वगुण व बुद्धिमत्तेच्या विकासाद्वारे समाजातील प्रश्नांना सामोरे जाण्याची दृष्टी व कृतीची रुजवणूक करण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. या पायलट प्रकल्पामध्ये पुणे व बीड या जिल्ह्यातील विविध भागातून वेगेवेगळ्या पार्श्वभूमीच्या एकूण २० संघांनी आपला सहभाग नोंदवला.
आपल्या परिसरातील लहान मोठे प्रश्न ओळखणे व आपल्या परीने ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे किंवा आपल्या सभोवतालीच्या परिस्थितीमध्ये सकारात्मक बदलासाठी प्रयत्न करणे हे या संघांकडून प्रामुख्याने अपेक्षित होते. याअंतर्गत मुलांनी जे कृतीकार्यक्रम केले. काहींनी कचरा व त्यासंबंधित समस्यांबाबत लोकांशी संवाद साधला, आपल्या परिसरातील ओला व सुका कचरा वेगळा गोळा होण्यासाठी योजना राबवल्या, फटाके वाजवणे टाळले, पर्यावरण रक्षणाचा विचार पसरवण्यासाठी वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवले, विज्ञानाचे प्रयोग स्वतः शिकून ते इतर मुलांसमोर प्रदर्शित केले, शाळेमध्ये व परिसरात स्वच्छता राखण्यासाठी तसेच शौचालये उभारणीसाठी आग्रह धरला व त्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली, आपल्या परिसरातील इतर लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम घेतले, शिकवण्या घेतल्या इ. या संघांना मदत करण्यासाठी त्यांचे स्थानिक मार्गदर्शक व पुणे येथील प्रफुल्ल वडमारे (निर्माण ५) व निर्माणचे इतर युवा सक्रीय आहेत.
या सर्व कृतींचा आढावा घेण्यासाठी सहभागी संघ येत्या १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एकत्रित येतील व आपल्या अनुभवाचे सादरीकरण करतील. सोशल ऑलिम्पियाडचे प्रमुख मार्गदर्शक विवेक सावंत व डॉ.अभय बंग या कार्यशाळेला उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवतील व मार्गदर्शन करतील. सोशल ऑलिम्पियाडच्या प्रयोगासाठी प्रफुल्ल आणि सहकारी, तसेच पायलट प्रयोगात सहभागी झालेल्या संघांना शुभेच्छा!!
स्त्रोत : प्रफुल्ल वडमारे, prafulla.wadmare@gmail.com

‘वर्धिष्णू’तर्फे असंघटीत कामगारांच्या मुलांसाठी सायं-शाळा सुरु

वर्धिष्णू- सोशल रिसर्च & सोसायटीने सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या सर्वेक्षणात कचरा वेचून आयुष्य जगणाऱ्या एकूण ३९६ लोकांना माहिती विचारण्यात आली. ३९६ पैकी ११६ चौदा वर्षांखालील मुले होती. यातील ८५ % हून अधिक मुले शाळेत कधी गेलीच नव्हती, अथवा १ली-२री शिकून त्यांनी शाळा सोडली होती. याचमुळे वर्धिष्णूने जळगावमधील तांबापुरा या कचरावेचकांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या भागात अशा मुलांसह वस्तीतील इतरही शाळेत न जाणाऱ्या मुलांसाठी सायंशाळा सुरु केली आहे. या शाळेकरिता अद्वैत दंडवते (निर्माण ४), सागर महाजन, समीर तडवी, समाधान पवार आणि सचिन खैरनार काम करत आहेत.
आज शाळेत ३५ मुले येत आहेत. सर्वच मुले असंघटीत कामगारांची असून त्यांना मुलांना अक्षर आणि अंक ओळख करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र हे करतानाच स्वच्छतेचे महत्व पटवून देणे व मूल्य शिक्षण यावर भर देण्यात येतो आहे. दररोज संध्याकाळी दीड तास तांबापुरा परिसरातील मरिमाता मंदिराच्या अंगणात शाळा भरते. पहिल्या टप्प्यामध्ये तांबापुरा/छोटी भिलाटी भागात हा प्रयोग राबवण्यात येईल व तेथील अनुभवावरून शहरातील इतर भागांमध्ये सायं-शाळा सुरु करण्याबद्दल विचार केला जाईल.
 शाळेबद्दल बोलताना अद्वैत म्हणाला, “या मुलांमध्ये खूप potential आहे, मात्र केवळ exposure नसल्यामुळे ती मागे पडतात असे मला वाटते. त्यांना शिकवलेले ते लगेच लक्षात ठेवतात. उदा. ‘रोज हात-पाय धुतले पाहिजेत, स्वच्छता महत्वाची असते. बाहेरून आल्यावर हात-पाय धुवायचे.’ असे एकदाच सांगितल्यावरही मुले रोज येताना हात-पाय धुवून यायला लागली. मात्र ‘आपल्याला काही येत नाही’ असा न्यूनगंड त्यांच्यात असल्याचे लक्षात येते. यामुळे त्यांना प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा असे मला वाटते. 
मात्र ही शाळा चालवून समातर यंत्रणा उभारण्यावर माझा विश्वास नाही. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात आम्ही या परिसरातील महानगरपालिकेची शाळा दत्तक घेवून पुढील वर्ष त्याच्यासोबत काम करण्याचा दृष्टीने पाऊले टाकत आहोत.”

स्त्रोत : अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com

मेळघाटात रचनावादी शिक्षणाची मुहूर्तमेढ

आदीवासी मुलांसाठी ‘बिरसा मुंडा शाळा’ सुरू

निर्माणमधील व निर्माणबाहेरील काही तरुणांनी मिळून i2h (Investment In Humans) हा समविचारी युवकांचा गट स्थापन केला असून खालील प्रश्नांवर काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे -
) वंचित क्षेत्रात आरोग्य (Holistic Health Approach), शिक्षण (ग्राममंगल पद्धत) आणि व्यावसायिक/ औद्योगिक प्रशिक्षण (विज्ञान आश्रम, पाबळ पद्धत) उपलब्ध करून देणे
) सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण मंडळींसाठी आकस्मिक निधीची तरतूद करून ठेवणे. सोबतच त्यांच्या कामाद्दल इतर लोकांना माहिती कळवणे
) सामाजिक काम करणाऱ्या लोकांची माहिती संग्रहित करून त्यांना वेळ, कौशल्य, वस्तू आर्थिक मदत कोणकोणत्या प्रकारे कोणकोणत्या प्रकल्पात देऊ करू शकतो याची माहिती उपलब्ध करून देणे.
याच प्रकल्पांतर्गत i2h ने रचनावादी तत्त्वांवर चालणारी ‘बिरसा मुंडा शाळा मेळघाटातील आदिवासी मुलांसाठी सुरू केली आहे. पहिल्या वर्षीच आसपासच्या - गावांतून १२० मुलांनी शाळेत प्रवेश घेतला आहे. ह्या प्रकल्पासाठी काही गावकऱ्यांनी जमीन देऊ केली आहे. त्यात शाळाविज्ञान आश्रम आणि दवाखाना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याचा गटाचा मानस आहे. प्रकल्पाची सर्व कामे व्यक्तिगत देणगीतून गेल्या दीड वर्षापासून सुरु आहेत. महिना १००, २००, ५००, १००० रुपये देणारे देणगीदार आहेत. एका व्यक्तीकडून जास्त रक्कम घेण्यापेक्षा अनेक व्यक्तींना छोट्याछोट्या क्कमेद्वरे, मदतीद्वारे या कामाला जोडणे हे या गटाचे ध्येय आहेह्या गटामध्ये प्रियदर्श तुरे, राजू भडके, शरद अष्टेकर, अश्विन पावडे, निकेश इंगळे, पंकज सरोदे इत्यादी सहभागी आहेत.
ह्या प्रकल्पासाठी खालील मदत लागणार असून, इच्छुकांनी प्रियदर्श तुरेशी संपर्क करावा
१)      महिना ५०० किंवा १००० रुपये देणारे देणगीदार
) शाळा बांधकामासाठी लागणारी सामग्री
) शाळा बांधकामासाठी लागणारे निष्णात civil engineers, designers आणि architects 
) शाळेतील मुलांची ने-करण्यासाठी school bus
) website बनवण्यास मदत मार्गदर्शन करणारे designers
) प्रत्येक जिल्ह्यात तेथील सामाजिक संघटनांची माहिती घेणारे ती website साठी उपलब्ध करून देणारे स्वयंसेवक

स्रोत : प्रियदर्श तुरे, gracilis4@gmail.com