'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 29 August 2012

सीमोल्लंघन, ऑगस्ट २०१२


शरद अष्टेकरच्या मायमराठी पुस्तक वितरणाची ग(रु)ड झेप: गडचिरोलीत नवे ग्रंथ दालन खुले


मायमराठी ग्रंथदालन, गडचिरोली: उद्घाटनाच्या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. राणी बंग (अम्मा)
निर्माण 4 चा शरद अष्टेकर गेले दोन वर्ष महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तरुणांपर्यंत मराठी पुस्तके पोहोचावीत यासाठी ‘मायमराठी’ या उपक्रमामार्फत पुस्तकविक्रीचा व्यवसाय करत आहे. मागील दोन वर्षात शरदने व्यवसायात विविध प्रयोग केले आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. नुकतेच त्याने गडचिरोली जिल्ह्यात पुस्तकाचे एक दुकान थाटून एक नवीन आव्हान स्विकारले आहे. व्यवसायाच्या निमित्ताने विदर्भ फिरताना गोंदिया, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज एकही मराठी पुस्तकांचे दुकान नाही हे त्याच्या लक्षात आले. आणि म्हणूनच या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी योग्य किमतीत साहित्य उपलब्ध करुन देण्याचं त्यानी ठरवलं. शरदच्या गडचिरोली जिल्ह्यातील या पहिल्या वहिल्या मराठी पुस्तकांच्या दुकानाचे उदघाटन 19 ऑगस्टला पार पडले. उदघाटनास डॉ. राणी बंग (अम्मा), गडचिरोलीच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास राउत, जिल्ह्यातील काही मान्यवर वर्ग, सर्चमधील कार्यकर्ते आणि निर्माणची मुलं उपस्थित होती. पहिल्याच दिवशी उपस्थित आणि इतर वाचकांनी तेरा हजारांची पुस्तके खरेदी करुन या उपक्रमाचे उत्साहात स्वागत केले. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये पुस्तकांची रिटेल चेन सुरू करण्याचे शरदचे स्वप्न आहे. पुढील दोन- तीन महिन्यात या साखळीतील दुसरे दुकान चंद्रपूरला सुरु होईल. अडीचशे रूपये वार्षिक वर्गणी देऊन ‘मायमराठी पुस्तक सभासद’ होणार्‍या आपल्या वाचकांच्या कोणत्याही खरेदीवर 25% सूट देण्याची अभिनव योजनाही तो लवकरच सुरु करणार आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात कायमस्वरुपी पुस्तकाच्या दुकानात भांडवल गुंतवणे हे शरदसारख्या तुलनेने नवख्या तरुणासाठी खरतर धाडसी पाऊल आहे. परंतु विविध नामवंत प्रकाशकांच्या साहित्याचे वितरण, आणि साहित्य संमेलनाच्या विक्रीच्या अनुभवातून बरंच काही शिकलेल्या शरदने हे आव्हान पेलायचे ठरवले आहे. या त्याच्या साहित्यिक प्रवासाला निर्माणींच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

मायमराठी ग्रंथ दालनासमोर शरद

पहिल्याचदिवशी शरदला लाभलेला प्रचंड प्रतिसाद

निर्माण व सर्चच्या कार्यकर्त्यांसोबत शरद

निर्माण 5 च्या प्रवेशप्रक्रियेला महाराष्टभरातील तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

डिसेंबरपासून सुरु होणार्‍या निर्माण 5 च्या पुढील बॅचसाठी अधिकाधिक तरुणांपर्यंत पोचण्यासाठी निर्माणची महाराष्ट्रभरातील टीम गेल्या दीड महिन्यापासून विविध माध्यमांद्वारे निर्माणच्या प्रचार आणि प्रसारात गुंतली आहे. लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, माहेर यासारखी मासिके तसेच महाराष्ट टाईम्स, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, तरुण भारत व इतर अनेक स्थानिक वृत्तपत्रातून निर्माणच्या विविध बातम्या व लेखमाला प्रसिध्द झाल्या आहेत. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ व ‘हितवाद’ या इंग्रजी वर्तमानपत्रांनी देखील प्रसिध्दीत सहभाग घेतला आहे. IBN लोकमत आणि ABP माझा या वाहिन्यांमधून निर्माणची संकल्पना महाराष्ट्रातल्या लोकांपुढे यायला मदत होत आहे. आज कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर शाखा मिळून महाराष्ट्रातील जवळजवळ 100-120 महाविद्यालयांपर्यंत निर्माणची माहिती पोचली आहे. सध्याच्या निर्माणींनीही आपल्या ओळखीच्या मुलांना, नातेवाईकांना निर्माणविषयी सांगितल्याचे दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून निर्माणला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून युवांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत  समन्वयन टीमकडे एकूण सुमारे 425 प्रवेशअर्ज आले असून येत्या काही दिवसात हा आकडा 500 वर जाण्याची शक्यता आहे. या प्रवेशअर्जांची छाननी होऊन सप्टेंबरमध्ये मुलाखती सुरु होतील.

निर्माण ४ च्या मयुर सरोदेचे अपारंपारिक उर्जाक्षेत्रातील नवे उपक्रम सुरु


निर्माण ४ चा मयुर सरोदे हा मूळचा नाशिकचा असून व्ही. एन. आय. टी. नागपूर या कॉलेज मधून कॉम्प्युटर सायन्स या विषयामध्ये बी. टेक. पूर्ण केल्यानंतर गेल्या २ महिन्यापासून तो विज्ञान भारती या राष्ट्रीय संस्थेबरोबर काम करतो आहे. या संस्थेची National Environment and Energy Development Mission (NEED Mission) अशी संलग्न संस्था आहे. सध्या तो उर्जा वाहिनी या एका उपक्रमात काम करत आहे. आठवी ते दहावी या इयत्तांसाठी चालवल्या जाणार्‍या या उपक्रमात विद्यार्थ्यांना पारंपारिक उर्जास्रोतांची विविध माध्यमांतून माहिती दिली जाईल. यात या विषयामधील विविध प्रयोग प्रत्यक्ष करुन बघण्यासाठी साहित्य उपलब्ध करुन दिले जाईल. तसेच शालेय स्तरावरील स्पर्धा, लघुपट, अभ्यासभेटी याद्वारे सौरउर्जा, पवनउर्जा, बायोगॅस यासंबंधी अधिकाधिक जागरुक केले जाईल. या सर्व उपक्रमाच्या समन्वयनाची जबाबदारी मयुरला देण्यात आली आहे. याच कामाच्या निमित्ताने त्याने नुकतीच मध्यप्रदेशमधील भोपाल, ग्वालियर, इंदोर, उज्जैन या चार जिल्ह्यांना भेट दिली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये २० – २० शाळा निवडण्याचे आणि तिथे स्थानिक स्थरावर व्यवस्थापन समिती बनवण्याचे काम त्याने सुरु केलेले आहे.  ‘मध्यप्रदेश उर्जा विकास निगम’ या राज्य सरकारच्या उर्जा मंत्रालयाने या कार्यक्रमाच्या खर्चाचा भार स्विकारण्याचे मान्य केले आहे. तसा प्रस्ताव त्याने या चारही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना दिलेला असून महिन्याभरात हा कार्यक्रम मध्यप्रदेश मध्ये सुरु होणार आहे.
 
दिनांक २६, २७ आणि २८ जुलै २०१२ रोजी “REaction 2012” या अपारंपारिक उर्जेवरील एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मयुरने सहभाग घेतला होता. या परिषदेमध्ये अपारंपारिक उर्जा या विषयावर काम करणारे काही शास्त्रज्ञ, काही सामाजिक संस्था आणि काही कंपनी आल्या होत्या. तिथे मयूरने ग्रामीण भागाचे विद्युतीकरण या विषयामध्ये अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. पुढे मयुरला याच क्षेत्रात काम करायचे असल्यामुळे या परिषदेमध्ये सहभाग घेणे हा त्याच्यासाठी चांगला अनुभव ठरला. सध्या त्याने सर्चला Green and Energy Efficient  बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.                                      

गौरी चौधरीच्या आणि तिच्या टीमच्या दीड वर्षांच्या परिश्रमांनी पोलिओच्या रुग्णाच्या उपचारात अखेर यश


निर्माण 4 ची गौरी चौधरी गेली एक वर्ष सर्चमध्ये पाठ- कंबरदुखीच्या एका संशोधनात सहभागी आहे. याआधी 2010 पासून ती आनंदवनमध्ये फिजिओथेरपीस्ट म्हणून काम करत होती.  त्यावेळी तिच्याकडे 35 वर्षांचा एक पोलिओचा रुग्ण उपचारासाठी आला होता. त्याच्या उजव्या पायाला वयाच्या तिसर्‍या वर्षी पोलिओ झाला होता. दहा वर्षाचा होईपर्यंत तो कॅलिपरच्या साहाय्याने चालत असे. परंतु त्यानंतर तो सर्वत्र रांगत फिरु लागला. यामुळे त्याच्या डाव्या पायात व्यंग निर्माण होऊन तो पाय कायमस्वरुपी 45 अंशात वाकला. या स्थितीत गौरी आणि तिच्या टीमने त्यावर उपचार करणे सुरु केले. गेले 20 वर्ष पायाचा योग्य वापर न केल्यामुळे स्नायुंमध्ये कमजोरी निर्माण झाली होती. अशावेळी या रुग्णाला स्वत:च्या पायावर उभं करणं हे एक मोठं आव्हान होतं. पण या टीमने ते पेललं. तीन महिने या रुग्णाचा पाय प्लॅस्टरमध्ये ठेवला गेला. त्याचा नियमित पाठपुरावा ठेवला गेला. त्याला आवश्यक व्यायाम दिले गेले आणि पुढील उपचारासाठी पुण्याच्या डॉक्टरकडे रुग्णाला हलवण्यात आले. पुढील दोन महिने त्याने पुण्यात राहून उपचार घेतले. निर्माणच्या गटाने पुण्याच्या वास्तव्यादरम्यान त्याला आर्थिक मदत देऊ केली आणि या संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांनी आज हा रुग्ण 30 वर्षानंतर स्वत: वॉकरच्या मदतीने चालू शकतो आहे.

हा रुग्ण या टीमसाठी अनेकार्थी वेगळा होता. पोलिओचे फार कमी रुग्ण अखेरपर्यंत फिजिओथेरपीच्या उपचारांना प्रतिसाद देतात. अशावेळी डॉक्टर आणि रुग्ण या दोघांचीही कसोटी असते. गौरी या दरम्यान सर्चमध्ये काम करत असूनसुध्दा आनंदवनात जाऊन तिने या रुग्णाच्या उपचारात खंड पडू दिला नाही. पुण्यातील उपचारांसाठी पैशाची सोय झाली नसती तर कदाचित त्याच्या उपचारात व्यत्यय निर्माण झाला असता. त्यामुळे स्वत: रुग्ण, सहभागी डॉक्टर आणि निर्माणी यांचे यानिमित्ताने मन:पूर्वक अभिनंदन!  

चारुता गोखलेचा सहभाग असलेले मलेरियावरील मानववंशशास्त्रीय संशोधन पूर्ण


निर्माण १ ची चारुता गोखले ही गेल्या वर्षापासून गडचिरोलीतील मलेरियाच्या समस्येवर काम करते आहे. सर्चला नुकतीच हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. राधिका सुंदरारजन यांनी भेट दिली. त्या मानववंशशास्त्र (Anthropology) या विषयाच्या तज्ञ असून त्यांनी व चारुताने महिन्याभराच्या शोधप्रकल्पात गडचिरोलीच्या आदिवासी भागात लोकांमधील मलेरियासंबंधीच्या समजूती, त्यांची वर्तणूक, मलेरिया नियंत्रण कार्यक्रमात येणारे अडथळे याविषयीचा एक अभ्यास पूर्ण केला. या अभ्यासात डॉ. योगेश काळकोंडे आणि सर्चचे इतर कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. यात आदिवासी लोक, शासनाचे गावपातळीवरील आरोग्य सेवक, गावातील पुजारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी (ज्यामध्ये निर्माण ४ चा डॉ. शिवप्रसाद थोरवे आणि डॉ. विक्रम सहाने यांचा सहभाग होता) आणि जिल्हास्तरीय शासकीय अधिकारी यांच्या गटचर्चा घेण्यात आल्या. या गटचर्चांमधून मलेरिया होण्यामागचे कारण, त्याची लक्षणं, मलेरियाचा आर्थिक बोजा, मच्छरदाणी, फवारणी, त्वरित निदान यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये येणारे अडथळे, पुजार्‍याच्या उपचाराविषयीच्या लोकांच्या समजुती याविषयीची अनेक निरीक्षणे समोर आली. या अभ्यासाचा एक टप्पा पूर्ण झालेला असून दुसर्‍या टप्प्यात या माहितीचा उपयोग सध्या चालू असणार्‍या मलेरिया नियंत्रण कार्यक्रमात सुधारणा करण्यात कसा करता येईल यावर संशोधन केले जाईल. या निष्कर्षांचा सर्चच्या मलेरिया नियंत्रण उपक्रमामधेही उपयोग होणार आहे. आदिवासी लोक तापाच्या उपचारासाठी सर्वप्रथम गावातील पुजार्‍याकडे जातात जो मंत्रतंत्र आणि जडीबुटी देऊन रुग्णाला 2-3 दिवस स्वत:कडे ठेऊन घेतो. यामुळे रोग बळावतो. सर्चच्या मलेरिया नियंत्रण उपक्रमांमध्ये पुजार्‍यांनाही सहभागी करुन घेण्यासाठी त्यांच्या योग्य प्रशिक्षणाची गरज यातून पुढे आली आहे. यावर येत्या काळात सर्चतर्फे प्रयत्न केले जातील. सध्या जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण आणि शोधनिबंध लिहिण्याचे काम या टीमद्वारा सुरु आहे. अभ्यासाचा दुसरा टप्पा पुढील वर्षात सुरु होईल.