'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 29 August 2012

डॉ. स्वाती देशमुख आणि डॉ. युगंधरा काटे यांना शवविच्छेदनाची गुंतागुंतीची केस सोडवण्यात यश



निर्माण 4 च्या डॉ. स्वाती देशमुख आणि डॉ. युगंधरा काटे गेल्या दोन महिन्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. मध्यंतरी त्यांच्याकडे Post mortem ची एक केस आली. खुनाची केस हाताळण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. मृतदेहावर टोकदार वस्तूने भोसकण्याच्या खुणा होत्या. याविषयी अधिक माहिती गोळा केल्यावर, भोसकल्यावर ती व्यक्ती घरी आली आणि काही काळानंतर तिचा मृत्यू झाला हे लक्षात आले. परंतु शवविच्छेदन करताना मात्र या दोघींना त्याच्या गळ्याभोवती दोरीचा व्रण दिसले. त्यामुळे त्याची फास लावून हत्या केली गेल्याची शंका आली. मृतदेह डॉक्टरांच्या ताब्यात आल्यावर त्याच्यावर चाकूने वार करणाऱ्याने आपला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला. त्याचवेळी मृत व्यक्तीचे वडिलांनी मारेकर्‍याने मला काही पैसा दिल्यास मी पोलिस केस दाखल करत नाही अशी अट टाकली. या घटनेमुळे यात काहीतरी काळेबेरे आहे याची खात्री पटली. अखेरीस पोलिसांनी वडिलांची सक्तीने जबानी घेतल्यावर त्यांनी मीच मुलाची हत्या केल्याचे कबूल केले.

या घटनेने स्वाती आणि युगंधराचे डॉक्टर म्हणून अनेक गुण समोर येतात. शवविच्छेदनाची ही त्यांची पहिलीच वेळ होती परंतु जे पोलिसांच्या नजरेतून सुटले ते व्रण त्यांनी अचूक टिपले आणि त्यामुळे घटनेला वेगळेच वळण लागले. पोलिसांच्या मताच्या विरुध्द जाऊन त्या आपल्या निदानावर ठाम राहिल्या. यामुळे खर्‍या गुन्हेगाराला शिक्षा होऊ शकली. वैद्यकीय कौशल्याबरोबरच त्यांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवल्यामुळे केसमधील गुंतागुंत टळली. स्वाती आणि युगंधराचे हार्दिक अभिनंदन! सोबतच त्यांना वेळोवेळी मदत करणाऱ्या डॉ. सुहैल शिकलगार व डॉ. सुजय काकरमठ यांचेही अभिनंदन!

No comments:

Post a Comment