कसे आहात?
आपण जवळपास तीन महिन्यांनी
भेटत आहोत. कारण सीमोल्लंघन या अंकापासून त्रैमासिक करण्याचे ठरवलेले आहे. तुम्ही
काय काम करत आहात, काय नवीन
काम केलं, काय नवीन वाचलं, काय नवीन
पाहिलं याबद्दल सीमोल्लंघनच्या संपादकीय टीमला जरूर सांगा.
गेल्या तीन महिन्यात
निर्माणींचा हालहवाल वाचा ह्या अंकात...
पद्मश्री!
नुकतीच
भारत सरकारच्या गृह खात्याकडून नायना-अम्मांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची
बातमी आली होती. भारत सरकारकडून दिला जाणारा ‘पद्मश्री’ चौथा महत्त्वाचा नागरी पुरस्कार आहे. २० मार्चला
राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे पद्मपुरस्कार प्रदान सोहळा
पार पडला. गडचिरोली येथे केलेल्या आरोग्य क्षेत्रातील कामासाठी आणि बालमृत्यूवरील
संशोधनासाठी नायना-अम्मांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
नायना-अम्मांनी हा पुरस्कार सर्चच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कामाचे बक्षीस आहे
असे म्हटले. ‘पुरस्कार हा व्यक्तिगत दिला जात असला तरी तो
सर्चच्या कामाला मिळाला आहे, म्हणून सर्चच्या
कार्यकर्त्यांना आणि गडचिरोलीच्या लोकांना हा पुरस्कार समर्पित आहे’, असे नायना म्हणाले.
नायना-अम्मा
आणि सर्चच्या सर्व कार्यकर्त्यांचं ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन!
निर्माण ८.१ ब (वैद्यकीय) आणि क (मिश्र)
शिबिरे संपन्न
‘तारुण्यभान
ते समाजभान’ ही मुख्य थीम घेऊन निर्माण ८ मालिकेतील ब
(वैद्यकीय) आणि क (मिश्र) बॅचचे पहिले शिबीर शोधग्राम, गडचिरोली
येथे पार पडले.
स्वतःच्या लैंगिकतेविषयी,
भावनांविषयी, मूल्यांविषयी, प्रेरणांविषयी, स्वप्नांविषयी निरोगी समज तयार होणे.
स्वचा विस्तार – स्वच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव वाढणे,
समाजातील मुख्य आव्हानांची ओळख होणे.
सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि आत्मविश्वास
निर्माण करणे.
अर्थपूर्ण आयुष्य, जीवनातील ध्येयाविषयी स्वतःसाठी स्पष्टता यावी.
ही काही
मुख्य उद्दिष्टे या शिबिरांची होती.
राज्यातील
वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या ६१ युवांचे निर्माण ८.१ ब शिबीर १० फेब्रुवारी ते १८
फेब्रुवारी असे पार पडले. राज्य आणि राज्याबाहेरील एकूण ६६ युवांचे निर्माण ८.१ क
शिबीर ९ मार्च ते १५ मार्च असे शोधग्राम येथे पार पडले.

माझ्या
सामजिक काम करण्यामागच्या प्रेरणा काय, माझी मुल्ये काय, ती मी कशी शोधू, माझी मासिक आर्थिक गरज किती, ती मी कशी काढू,
मी काम करण्यासाठी क्षेत्र कोणत्या निकषांवर निवडू असे प्रश्न समजून
घेतले आणि त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. निर्माणच्या वैद्यकीय शिबिराला
सुप्रसिद्ध स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज हे उपस्थित होते. स्पाइन फाउंडेशन या
ग्रुपमार्फत राज्यभर आणि राज्याबाहेर त्यांनी केलेल्या कामाचा आढावा त्यांनी
मांडला. शेखर काकांचं काम हे इथिकल प्रायव्हेट प्रॅक्टिस करत प्रभावी समाजोपयोगी
काम करण्याचं उत्कृष्ट मॉडेल आहे. ‘समाजातील वेगवेगळ्या
घटकांचे शेती आणि शेतकऱ्याविषयीचे समज/ मत आणि शेतकऱ्याची परिस्थिती’ हा विषय घेऊन निर्माण ८.१ क शिबिरात नाटकाचा एक प्रयोग करण्यात आला.
सतीशने (निर्माण ७) विजय तेंडूलकरांच्या ‘शांतता! कोर्ट चालू
आहे’ या नाटकाच्या संहितेवर आधारित ‘शांतता!
आत्महत्या चालू आहे’ असे नाटक लिहिले आणि दिग्दर्शितही केले.
शरद अष्टेकर (निर्माण ४), मंदार देशपांडे (निर्माण ४),
कोमल नवले (निर्माण ५), चेतना सोयाम (निर्माण
६) आणि मनवीन कौर (निर्माण ७) या आपल्या मित्रमैत्रिणींनी शिबिरात येऊन
शिबिरार्थ्यांशी गप्पा मारल्या.
शिबिराच्या
अंतिम टप्यात नेहमीप्रमाणे पुढील ६ महिन्यात मी काय कृती करणार याचा एक ढोबळ
आराखडा सर्वांनी बनवला.निर्माण
परिवारात नव्याने सामील झालेल्या सर्व निर्माणींचे स्नेहपूर्वक स्वागत!
औपचारिक ट्रेनिंग संपले!
मी
घेतलेल्या शिक्षणाचा समाजासाठी काय उपयोग आहे, समाजाचे प्रश्न आणि माझं जीवन याची सांगड घालू शकतो का असे जीवनाबद्दलचे
मुलभूत प्रश्न पडलेल्या निर्माण ७ च्या शिबिरार्थ्यांचे शेवटचे शिबीर २६ जानेवारी
ते २ फेब्रुवारी असे पार पडले. निर्माण ६ मधील काही शिबिरार्थ्यांनीदेखील ह्या
शिबिरात सहभाग घेतला.
सर्च, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट मिळून
गडचिरोलीत सुरु असलेला ‘मुक्तीपथ’ हा
जिल्हाव्यापी दारूतंबाखू विरुद्ध उपक्रम मयूर गुप्ता यांनी समजून सांगितला.
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सत्यमेव जयतेच्या टीमने पानी फाउंडेशन वॉटर कप
स्पर्धा सुरु केली. पानीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी एक
संध्याकाळ शिबिरार्थ्यांसोबत घालवली. गडचिरोली जिल्ह्याचे डीएचओ डॉ. शशिकांत
शंभरकर यांनी गडचिरोलीच्या सरकारी आरोग्य व्यवस्थेची माहिती दिली. यामुळे सामाजिक
प्रश्न सोडवण्याचे वेगवेगळे मार्ग, अप्रोचेस यांबद्दल
स्पष्टता यायला मदत झाली.
योगेश दादाने
असुरक्षिततांना कसं सामोरं जावं, अनिश्चिततेची
भीती का वाटते, जीवनातील महत्त्वाचे निर्णय कसे घ्यावे
याबद्दल चर्चा केली. सर्चला नुकतेच रुजू झालेले डॉ. चैतन्य आणि डॉ. शिल्पा मलिक
यांनी दिल्लीचे आलिशान हॉस्पिटल्स सोडून सर्चमध्ये काम करण्याचा निर्णय का घेतला,
यांचा दिल्ली ते गडचिरोली प्रवास कसा राहिला, याबद्दल
त्यांच्याशी गप्पा मारल्या. महेशभाऊंनी आपल्या प्रोजेक्टचे/ कामाचे नियोजन
कसे करावे यासाठी रॉबर्ट मिगरच्या ‘गोल अॅनालिसिस’
या पुस्तकावर आधारित सेशन घेतले. काम करत असताना पुढच्या टप्प्यातील ध्येय स्पष्टता, निर्णयक्षमता आणि कृतिकार्यक्रम बनवण्यास
या सेशन्सची मदत झाली. त्यासोबतच बुक क्लब, जंगल ट्रीप, ग्रुप अभ्यास आणि सादरीकरण, आणि अर्थात नायनांसोबत प्रश्नोत्तरी या सर्वांचा परिपाक ह्या शिबिरात
होता.
नवीन
उत्साह घेऊन शिबिरार्थी आपल्या जीवनातील प्रश्नांना उत्तरे
शोधतील,
सर्वांना खूप शुभेच्छा!
प्रांजल
नवा करके देखो फेलो
मुळ
पुण्याचा असलेला प्रांजल कोरान्ने नुकताच निर्माणच्या ८.१ शिबिराला गडचिरोलीला आला
होता. गावभेटीदरम्यान गिरोला या आदिवासी गावातील प्राथमिक शाळेतील स्थिती त्याने
पाहिली. शिक्षण आधीपासूनच प्रांजलच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्याला
तिथल्या शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल मनात प्रश्नचिन्ह उभे झाले.
प्रांजलने
नुकतेच आयआयटी मद्रासमधून इंग्लिश स्टडीज् या विषयात त्याचे पदव्युत्तर शिक्षण
पूर्ण केले. भाषा हा त्याचा मुख्य विषय आणि Artificial
Intelligence या विषयात त्याला रस आहे. निर्माण शिबिराला
येण्यापूर्वी ‘Teach For India’ या नामांकित उपक्रमात त्याची
फेलो म्हणून निवड झाली होती. पण गिरोल्यात पाहिलेल्या परिस्थितीमुळे ‘माझी गरज कुठे?’ हा प्रश्न त्याला भेडसावू लागला.
शिबीर संपल्यानंतर प्रांजल दोन दिवस शोधग्राममध्ये थांबला, आणि
गिरोला आणि आसपासच्या गावातील शिक्षणाच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. “Teach
For India ला सगळेच जातील, मी नाही गेलो तर
त्यांना कोणीना कोणी भेटून जाईल पण गिरोल्याला कोणी येणार नाही”, असा विचार करून प्रांजलने ‘Teach For India’ फेलोशिपवर
पाणी सोडले.
सध्या
प्रांजलने तीन महिन्यांसाठी गडचिरोलीतल्या आदिवासी गावांतील भाषा आणि शिक्षणाच्या
परिस्थितीचा अभ्यास करण्याचे ठरवले आहे. त्याच्या अभ्यासातून, निरीक्षणातून आदिवासी भागातील शिक्षणाच्या
प्रश्नावर काही उपाय योजता येतील का, हा त्याच्या कामाचा
पुढचा टप्पा असेल. पण तूर्तास तो फक्त प्रश्न समजून घेणार आहे.
प्रांजल
उत्तम फोटोग्राफरसुद्धा आहे. त्याने समोर आलेल्या परिस्थितीला दिलेल्या
प्रतिसादाबद्दल आणि त्याच्या या शोधासाठी निर्माणकडून त्याला ‘करके देखो फेलोशिप’ सपोर्ट
देण्यात आला आहे.
प्रांजलला
त्याच्या शोधासाठी खूप शुभेच्छा!
प्रांजल
कोरान्ने, निर्माण ८