'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 30 April 2016

सीमोल्लंघन : मार्च - एप्रिल २०१६

सौजन्य: अमृता ढगे

या अंकात...

मनजितसिंघ का धाबा...


प्रचंड ऊन, प्रतिकूल वातावरण आणि परिस्थिती यातही सर्व स्वयंसेवक तग धरून राहिले आणि जिद्दीने काम केलं. कोणाला कुलर शिवाय झोपायची सवय नाही, तर कोणाला उघड्यावर शौचास जाण्याची लाज वाटे, कोणी पहिल्यांदा कुदळ-फावडे हातात घेतले तर कोणी पहिल्यांदा कांदा चिरला. अशा आपापले कम्फर्ट झोन्स तोडत, एकमेकांची काळजी घेत, नवनवीन गमतीजमती करत शिबीर चालू होतं. ‘झुंज दुष्काळाशीच्या अंतर्गत सहभागी स्वयंसेवकांनीसालईबनला मनजित भाईंच्या मदतीने जलसंवर्धनाचे काम करण्याचा चंग बांधला होता. त्याचा हा वृत्तांत...

मनजित सिंघ... तारूण्यात बाबा आमटेंचा सहवास लाभला. पत्रकारिता करता करता सामाजिक कामांचा प्रवास सुरु झाला. खामगावमध्ये (जि. बुलढाणा) ‘तरुणाई फाऊंडेशननावाने एक छोटी संस्था काढली आणि पर्यावरण संवर्धनाची कामे चालू केली.

वडपाणी, जळगाव-जामोद (जि. बुलढाणा) पासून १२-१५ कि.मी. अंतरावर विनोबांच्या भूदान यज्ञातून मिळालेला ७२ एकराचा परिसर. जंगलाचा होणारा ऱ्हास आणि जमिनीवरील होणारं अतिक्रमण रोखण्यासाठीमहात्मा गांधी लोकसेवा संघाने ही जागा मनजित भाईंच्या ताब्यात दिली. गेलं एक वर्ष मनजित भाईंनीसालईबनया नावाने तिथे नंदनवन फुलवण्याचे, पर्यावरण संवर्धनाचे काम आरंभले आहे. सालईबनात पाणी आडवून जिरवण्यासाठी एका टेकडीवर सलग समतल चर खोदणे आणि माती नाला बांध बांधणे अशा कामांचे नियोजन मनजित भाईंनी केले होते. स्वयंसेवकांना दुष्काळाचा अनुभव मिळावा; त्यावर कृती चिंतन व्हावे; पाणी प्रश्नाबद्दल, गाव गावातील समस्यांबद्दल आणि स्वतःबद्दल त्यांचे शिक्षण व्हावे असा निर्माणचा उद्देश होता.
          'झुंज' ची पूर्वतयारी म्हणून अजय होले (निर्माण ) याच्या मार्गदर्शनाखाली एका टेकडीवर सलग समतल चर खोदण्यासाठी मार्किंग करून घेण्यात आली, तसेच बंधारा बांधण्यासाठी जागेची पाहणी झाली. अजयने स्वयंसेवक युवांना तांत्रिक बाबी समजून दिल्या. स्वयंसेवकांनी रोज पहाटे श्रमदानाच्या माध्यमातून काम सुरू केले. दोन दिवसांतच सालईबनच्या टेकडीवर मी. X . मी. X . मी. चे चर सलग समतल चर खोदून पूर्ण झाले. मातीचा बंधाऱ्याचे मार्किंग झाल्यानंतर स्वयंसेवकांनी चार ट्रॅक्टर भरून दगड गोटे गोळा केले. दगडगोटे आणि मातीचा वापर करून माती नाला बांध बांधण्याचे काम त्यांनी केले. नाल्याचीच माती वापरल्यामुळे नाल्याचे रुंदीकरण आणि खोलीकरणही झाले. सकाळी श्रमदान संध्याकाळी चालठाणा गावच्या आदिवासींच्या समस्या समजून घेण्यासाठी सर्वे अशा प्रकारे एकूण ३६ स्वयंसेवकांनी मिळून १२७ मनुष्यदिवस  काम केलं.
          शिबिरात दिसलेला दुष्काळ समजून घेण्यासाठी सत्रे आणि चर्चादेखील घडल्या. अजयने मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि त्याची संभावित कारणे काही आकडेवारीच्या स्वरूपात समजून सांगितली. त्यानंतर पाणलोट क्षेत्राचा विकास (माथा ते पायथा) करून भूजल पातळी कशी वाढवता येईल यावरही सर्वांना मार्गदर्शन केले. अमोल शैलेशने (निर्माण ) त्याला जाणवणारा जाणीवांचा दुष्काळ सर्वांसमोर मांडला. त्यावर सर्वांनी मिळून चर्चा केली आणि बदल स्वतःपासून सुरु करण्याचा संकल्प केला. मनजीत भाईंनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन पहिले ITI मग अपघाताने पत्रकारिता, सोबत श्रमसंस्कार छावणी, बाबा आमटेंचा सहवास, त्यातून फुलत गेलेलं सामाजिक काम हा त्यांचा प्रवास सर्वांसमोर उलगडून सांगितला. गुलाबराव मारोडे हे बुलढण्यातील अग्रेसर प्रयोगशील शेतकरी, सोबतच बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकरी आत्महत्या समितीत ते शेतकरी प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. त्यांनी शेतकरी आत्महत्या, सेंद्रिय शेती, हमीभाव, दुष्काळ अशा विविध विषयांवर त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन केले. प्रताप मारोडेने (निर्माण ) मनरेगा, टँकर योजना, चाराछावणी आणि यासारख्या दुष्काळात राबवण्यात येणा-या विविध सरकारी योजनांची माहिती दिली.
          एके दिवशी सकाळी सातपुडा पर्वत रांगेच्या दिशेने पसरलेल्या जंगलात फेरफटका मारण्यासाठी सर्वजण निघाले. बरेच अंतर चालून गेल्यानंतर कोणीतरी मनजित भाईंना विचारलं की, “जंगल अजून किती दूर आहे?”; त्यावर ते म्हणाले, “तुम्ही आता जंगलातूनच चालत आहात.” हे बहुधा मनजीत सिंग यांना सर्व तरुणांना दाखवायचे होते. नावालाही सावली मिळाल्याने जंगलांचे आणि झाडांचे महत्त्व सर्वांना चांगलेच पटले.
आदिवासी वस्तीत जाणे असो, किंवा बंधारा बांधणे असो, चर खोदणे असो किंवा वेगवेगळ्या विषयांवर केलेल्या चर्चा असो, सर्वच युवा त्यात तल्लीनतेने सहभागी झाले होते. त्याचे पडसाद त्यांच्या बोलण्यातून दिसत होते. कोणाला आदिवासी समाजाविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली, कोणी दुष्काळावर अभ्यास वाचन करण्याचे ठरवले, कोणी वृक्षारोपण करायचे ठरवले तर कोणी घरात आणि मित्रांमध्ये पाणी काटकसरीने वापरण्यासाठी जागृती करण्याचे ठरवले.
पर्यावरण पूरक जीवनशैली जोपासण्याचा संकल्प, संघटीत होऊन केलेलं काम, एकमेकांना दिलेलं पाठबळ, चांगल्या विचारांचे कृतीचे केलेलं कौतुक, मनजित भाईंकडून मिळालेली प्रेरणा, काही दिवसातच झालेली घट्ट मैत्री हे चित्र प्रत्येकाच्या मनात रुजत शिबिराची सांगता झाली.

स्त्रोत: अमोल शैलेशamolsd07@gmail.com