'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 30 April 2016

चावी घेऊन कुलूप शोधताना...!

२०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षात एक वेगळा पथशोधक उपक्रम करून बघायचा ठरवला. हा पथशोधक उपक्रम म्हणजेचावी घेऊन कुलूप शोधण्याचाएक प्रयत्न होता. चावी म्हणजे माझं शिक्षण झालेला विषय;‘माहिती तंत्रज्ञान’. कुलूप म्हणजेग्रामीण भागातील शिक्षण’. जोडीला शिक्षणात सकारात्मक बदल घडवण्याची इच्छा. उस्मानाबाद जिल्ह्यातील १९९३च्या भूकंपग्रस्त हराळी गावात, ज्ञान प्रबोधिनीच्या केंद्रावर दोन वर्षांपूर्वी रुजू झालो. या वर्षी इथे या विषयाला explore करण्याचा प्रयत्न ज्ञान प्रबोधिनीच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. यातील काही अनुभव व शिक्षण मी (अश्विन भोंडवे) तुमच्या सर्वांबरोबर शेअर करत आहे...
पथशोधक उपक्रमाचे स्वरूप:
            चार गावांत दोन Facilitators (सहाध्यायी) दररोज एक-एक तास अभ्यासिका घेतात. अभ्यासिका शाळेत नसते व शाळेच्या वेळेत नसते. तर ही अभ्यासिका गावाने दिलेल्या एका खोलीत व शाळेच्या वेळेच्या आधी किंवा नंतर असते. सहाध्यायी बाईकवर जाताना पाठीवरच्या सॅक मध्ये ७-८ चार्जिंग केलेले लॅपटॉप्स घेऊन जातात. अभ्यासिकेत एक-एक लॅपटॉप मध्यभागी छोट्या स्टूलवर ठेवून त्या भोवती ६वी-७वीतील चार-चार विद्यार्थी गोल करून बसतात. ते चार विद्यार्थी सहाध्यायीच्या सांगण्यानूसार लॅपटॉपवर वेगवेगळ्या क्रिया करतात व त्यातूनच शिकतात आणि एकमेकांना शिकवतात. या शिवाय सहाध्यायी शिकलेले मुद्दे पक्के होण्याच्या दृष्टीने काही activity पण घेतात. या उपक्रमात चारही गावात मिळून १५० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
            जुलै २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत हा उपक्रम सुरु राहिला. या उपक्रमाच्या निमित्ताने काही गोष्टी लक्षात आल्या. त्या पुढीलप्रमाणे...
तंत्रज्ञान एक साधन मात्र :        
सुरुवातीला लॅपटॉप पाहून गावकरी, पालक व मुलं सर्वांनाच याचे नाविन्य वाटले. पण जसे जसे लॅपटॉपचे नाविन्य कमी होऊ लागले, काही अभ्यासाशी संबंधी उपक्रम सुरु झाले तसा उत्साह घटू लागला. एक महिन्यानंतर काही ठराविक मुलच बाकी होती. या मुलांसाठी पुढील महिन्यात आम्ही इ-साधनांबरोबरच विविध अभ्यासपूरक उपक्रम सुरु केले. उदा. लॅपटॉपवर बघितलेल्या गोष्टींचे दृढीकरण विविध खेळांच्या माध्यमाने करणे, शिबीर व सहली, ... मुलांना त्यात रस वाटू लागला. सध्या आम्हालाशिक्षणविषय म्हणून अभ्यास करण्याची गरज वाटते आहे. जो विषय मुलांपर्यंत पोहचवायचा आहे त्या आशयावर प्रभुत्व असण्याची गरज वाटत आहे. म्हणून वाटते, की नवीन तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करण्याची गरज नाही, ते आपोआप पोहचणार आहेच. (कदाचित काही लोकांना तंत्रज्ञानाची उपलब्धी आर्थिक कारणामुळे शक्य नसेल तिथे गरज असू शकते.) मुळात त्या विषयाकडे बघण्याची दृष्टी विकसित होण्याची गरज आहे असे दिसते. कारण तंत्रज्ञान फक्त वस्तू/ साधन आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेले काम सोपे व वेगाने होणार आहे. पण त्या कामाची दृष्टीच नसेल तर ही साधने नव्याचे नऊ दिवस म्हणून राहतात व मूळ परीस्थितीत सहजा सहजी बदल होण्याची शक्यता कमी दिसते.
फक्त माहिती पुरे का?:
            ‘शिक्षणाशिवाय इतर क्षेत्रात काही काम करू शकू का?’ असा शोध घेताना लक्षात आले की गावात सध्या मोबाईलच्या माध्यमाने माहिती तंत्रज्ञान गावात पोहोचले आहे. पण त्यावर सोशल मेडियाचा वापर अधिक होतो. याच्या खालोखाल व्हिडीओ पहाण्यासाठी जास्त वापर होतो. किती लोक काही ठराविक माहिती मिळण्यासाठी सर्फिंग करतात हा प्रश्नच पडला. याचा अभ्यास करायला हवा. थोडा सखोल विचार केला असता लक्षात आले की विचार करण्याची सवय फारच कमी आहे. त्यामुळे आजूबाजूला ज्या गोष्टी जशा चालू आहेत तशाच करण्यावर भर जास्त असतो. त्यात जास्त विश्वासार्हता पण वाटते. त्यामुळे नवी माहिती मिळवून, स्वत: अभ्यास किंवा विचार करून काही करण्याची गरज वाटत नाही.
शिक्षणाबद्दल शिक्षण:
            शिक्षणाशी संबंधी काही गोष्टी लक्षात येत आहेत. मुलं फारच बोलका, प्रामाणिक फीडबॅक सहजरीत्या देत असतात, जर ते बंधनात किंवा दबावाखाली नसले तर. त्यांना काय आवडले किंवा आवडले नाही हे आम्हाला सतत कळत होते. मुलांबरोबर पालकांचे शिक्षण होणे गरजेचे आहे असे वाटले. कारण गृह भेटीच्या वेळी पालकांबरोबर चर्चा केली असता बरेच पालक मुलाला पाढे किती येतात, इंग्रजी शब्द किती पाठ केले यातूनच त्याचा अभ्यास चालू आहे की नाही हे ठरवताना दिसले. शिक्षणात पाठांतराशिवाय इतरही गोष्टींचा अंतर्भाव असतो हे नियमितपणे पालकांपर्यंत पोहचवणे आवश्यक वाटते. याच बरोबर शिक्षण म्हणजे नेमके काय, त्यात कशाचा अंतर्भाव व्हावा व ते मुलांपर्यंत चांगल्या पद्धतीने कसे पोहचू शकते? यासाठी आमचा अभ्यास सुरु आहेच.
            शिक्षा पाकर भिक्षा मांगे, युवजन खाये ठोकर आज...: शाळेत असताना ही ओळ आम्ही म्हणत असायचो. पण अशीच काही परिस्थिती सध्या गावात दिसते. सहयोगींचा शोध घेताना, काही बरोबर प्रत्यक्ष काम करताना काही गोष्टी लक्षात आल्या. कागदाचे प्रमाणपत्र बऱ्याचजणांच्या जवळ आहे. पण ते नेमके कशाचे याचा गंधही नसतो. हातात कौशल्य नाही, डोक्यात जगण्यासाठी एखादा विचार किंवा ध्येय नाही, ‘गावात जी चालते चर्चा, तिकडे आमचा वळतो मोर्चाअशी अवस्था युवकांची! काही ठराविक प्रकारचे प्रयत्न करताना तरुण दिसतात. सैन्य भरती, स्पर्धा परीक्षातून सरकारी नोकरी, शहरात काही महिन्यांचे unskilled (क्वचित semi-skilled) काम करून भट्टी न जमल्याने गावात परत येतात, खूप कमी युवक शहरात चिकाटीने राहून आपली जागा स्थिर करू शकत आहेत. दुसऱ्या बाजूला युवतींना आणखीही घराच्या बाहेर, गावात किंवा शहरात (लग्न न करता) काम करणे म्हणजे आई-वडील किंवा नातेवाईकांमधील मुख्य सदस्यांना ताण वाटतो.
            पथशोधक उपक्रमासाठी सहाध्यायी शोधताना युवक-युवतींची अशी परिस्थिती लक्षात आली. सुरुवातीला दोन सहाध्यायी या कामासाठी नियुक्त केले. पण पुढील दोन महिन्यात ते लातूरला व पुण्याला स्वत:ला आजमावायला गेले. पुढे नवीन सहाध्यायींचा शोध घेतला व पुढे काम सुरु राहिले.
स्पीडब्रेकर:
            पूर्वी सर्च मध्ये काम करताना शिकलेल्या काही गोष्टींचा फार छान उपयोग झाला. मोजमापाचे महत्व, People participatory approach, नियोजन कौशल्य, गांधीजींचा जादूचा तावीत या सर्वांचा काम करताना निश्चित उपयोग झाला. याच बरोबर प्रबोधिनीतील जेष्ठ शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन पण वेळोवेळी मिळत होते. पण या गोष्टी असून देखील हा उपक्रम अधिक प्रभावी झाला नाही, असे मला वैयक्तिक वाटते. या साठी सखोल अभ्यासाचा व संकल्पपूर्वक ठरवलेले नियोजन टोकास नेण्याच्या शक्तीचा अभाव अशी कारणे लक्षात आले. स्वत:वर काम करणे खूप गरजेचे आहे; नाहीतर आपण स्वत:च कामाचे नकळत स्पीडब्रेकर बनत जातो.
समस्यांचा खजिना... पण दुबळी माझी झोळी:
            खडा मारू तिथे समस्या दिसेल, जिथे कामाला स्कोपच स्कोप आहे अशा उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात रहात आहोत. त्यामुळे विविध समस्या जिवंतपणे, सगुण रुप घेऊन पुढे येतात. जसे की... दररोज संध्याकाळी घरात पाणी भरावे लागते म्हणून खेळू शकत नाही (७वी-१०वी मधील मुलं), ८वीला गेले म्हणून आता खेळणे बंद (मुली), १०वीला ९२% गुण मिळवले तरी देखील लग्न पुढील दोन वर्षात झालेच (एक मुलगी), या वर्षी चांगला कांदा आला पण कांदा काढताना अचानक पाऊस आला आणि कांद्याला काहीच भाव मिळाला नाही (तरुण शेतकरी), डोक्यावर कर्जाचा डोंगर होता उपाय म्हणून जगच सोडले (तिसी-चाळीशीचा एक शेतकरी)... असे अनेक प्रसंग किंवा समस्या कानावर येत असतात. वाटते लगेचच या कामाला देखील सुरुवात करावी. अशा वेळी एका मार्गदर्शक कार्यकर्त्याने सांगितले की... “या प्रश्नांना उघड्या डोळ्याने, संवेदनशीलतेने बघून कामाची परिणामकारकता व त्याची व्यापकता वाढवणे हा मार्ग जास्त योग्य असू शकतो.” तरी देखील अधूनमधून आपण इतर समस्यांवरही काम करावे अशी इच्छा होतेच!
Keep me serving:
            येत्या वर्षात या अनुभावातून धडे घेऊन पुढील नियोजन सुरु आहे. गावात इंटरनेट कनेक्टिव्हिटी OFC च्या माध्यमाने लवकरच होईल असे दिसत आहे. तंत्रज्ञान जोरदारपणे गावात घरोघरी व प्रत्येक हातात येत आहे, स्थानिक गरजा ओळखून त्या संबंधी योग्य अशा चांगल्या आशयाची निवड किंवा निर्मिती करावी लागेल.सर्वात महत्त्वाचे शिक्षण म्हणून गावातील मुला-मुलींचा विकास कोणत्या विविध मार्गांनी होऊ शकेल याकडे अधिक लक्ष द्यायचे आहे; आणि जसे शक्य होईल तसे तंत्रज्ञानसाधन म्हणून नक्कीच वापरायचे आहे.
            एक प्रार्थना नेहमीच पुढे जाण्यास मदत करते:‘Give me love in my heart, keep me serving…, Keep me serving till the break of day!’

स्रोत: अश्विन भोंडवे, ashwin.bhondave@gmail.com

No comments:

Post a Comment