'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

गडचिरोलीतील ‘निमगाव’मधील हगवणीच्या साथीची पाहणी करण्यासाठी सर्चचे डॉक्टर पथक आणि निर्माणच्या गटाची गावास भेट


विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना अमृत,  डॉ. वैभव व डॉ. सुजय
12 जूनला गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्‍या ‘निमगाव’ या गावात हगवणीची भयंकर साथ आल्याची बातमी सर्च टीमच्या कानावर आली. यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचेही कळले. त्यामुळे या घटनेची पाहणी करण्यासाठी डॉ. योगेश काळकोंडे आणि सर्चच्या फिरते आरोग्य पथकातील निर्माणचे डॉक्टर्स डॉ. सुजय काकरमठ, डॉ. वैभव आगावणे तसेच अमृत बंग आणि निखिल जोशी यांनी संपूर्ण औषधोपचाराच्या साहित्यासकट निमगावला भेट दिली.
 
निमगावमध्ये एकूण 6 घरांची वस्ती असून लोकसंख्या 330 आहे. हे गाव ‘मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असले तरी ते केंद्रापासून 45 किमी दूर आहे. त्यामुळे 5 किमी अंतरावर असलेले ‘भाकरोंडी’चे केंद्र या गावास अधिक जवळ आहे. या गावात आशा नाही. MPW (गावपातळीवरील सरकारी आरोग्यसेवक) गेल्या सहा महिन्यापासून गायब आहे. यावरुन येथील आरोग्य व्यवस्थेची साधारण कल्पना येऊ शकेल.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गाव अत्यंत अस्वच्छ होते. मागील 10 दिवसात गावातील 2 व्यक्तींचा हगवणीमुळे मृत्यु झाला होता. आणि 11 व्यक्ती हगवणीने आजारी होत्या. सर्च टीमने ज्यावेळी गावाला भेट दिली त्यावेळी मुरुमगावच्या डॉक्टरांनी उपचार सुरु केल्याचे सांगण्यात आले. सर्चच्या टीमने सर्व रुग्णांना ORS नियमित घेण्याचा सल्ला दिला. एका म्हातार्‍या महिलेला दवाखान्यात भरती करण्याची गरज होती. परंतु रोवणी चालू असल्यामुळे तिच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला जमणार नाही असे कारण पुढे करुन टीमने सांगून सुध्दाही तिला भरती केले गेले नाही.     

गावातील पाणी दुषित आहे का हे बघण्यासाठी डॉ. सुजय, डॉ वैभव, अमृत आणि निखिल यांनी 4 सार्वजनिक विहिरींचे, 3 हातपंपांचे आणि 2 रुग्णांच्या घराचे पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत आणले. तसेच विहिरीतील Bleaching powder चे प्रमाण निश्चित करण्यासाठी विहिरीची खोली व व्यास मोजला आणि त्याप्रमाणे विहिरीच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण केले आहे का याची खातरजमा केली. यातील 2 घरांच्या पाण्याचे नमुने पिण्यायोग्य नाहीत हे तपासणीनंतर सिध्द झाले आहे. विहिरीचे दुषित आढळले नाही. कदाचित गावात दोन मृत्यू झाल्यानंतर विहिरीचे ग्रामपंचायतीद्वारे Bleaching करण्यात आले असावे असा अंदाज आहे. पाण्याच्या नमुन्याचा रिझल्ट गावात कळवण्यात आला असून त्यावर योग्य ती उपाययोजना केली जाईल अशी आशा आहे. रोगाच्या साथीच्या काळात आपत्कालीन सुविधा कशी द्यावी याचा एक चांगला अनुभव यानिमित्ताने निर्माणच्या गटाला मिळाला.  

विश्वासाच्या ‘पाया’तील काटा दूर.....

सर्च’ आणि ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेला फिरता दवाखाना (MMU) आदिवासी गावांमध्ये चांगला जम बसवत आहे. निर्माणचा 1 चा वैभव आगावणे आणि निर्माण 4 चा सुजय काकरमठ हे या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. रुग्ण डॉक्टरची सतत परिक्षा घेत असतात, आणि ते त्या चाचणीत यशस्वी ठरले तरच लोक त्यांच्याकडून उपचार घ्यायला तयार होतात हे सिध्द करणारा एक प्रसंग नुकताच फिरता दवाखान्याच्या टीमबरोबर घडला. गाडी ‘कोवानटोला’ या आदिवासी गावात उभी होती. 15 मिनिटे थांबल्यावरसुद्धा गाडीकडे येणारे कुणीही दिसत नव्ह्ते. टीम ने घरोघरी जाऊन ‘कुणी बीमार आहे का?’ असे विचारायला सुरूवात केली. पण गावात कुणीच आजारी नव्ह्ते. दवाखाना निघण्याच्या तयारीत होता. तेव्हा एक 8-9 वर्षांची मुलगी तिचा पाय दाखवायला आली. तिच्या पायात पू भरलेला एक मोठा फोड होता. ती गेल्या 8-10 दिवस त्याचा त्रास सहन करत होती. तिचा फोड फुटून पू काढावा लागणार होता. डॉ. सुजयने गावाच्या चौकातच ही छोटी शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात केली. ह्ळूह्ळू बघ्यांची गर्दी जमायला लागली. फोड फोडल्यावर त्यातून एक 3 सेंमी. X 0.5 सेंमी अशी काडी बाहेर निघाली. लोक चकित झाले. तिचे वडील सांगायला लागले की तिला एका बंगाली doctor कडे नेले होते. त्याने 2 इंजेक्शन दिले आणि 300 रुपये घेतले. ‘ही काडी त्याला नाही का दिसली?’ असे कोणीतरी म्हणाले. लोकांत या विषयावर चर्चा सुरू झाली. आणि MMU कडे तपासायला भली मोठी गर्दी जमली!  येवढया वेळ घरात दडी मारुन बसलेले लोक डॉक्टरच्या एखाद्या Success story ची वाट बघत होते. आणि अखेर डॉक्टर चांगला असल्याची खात्री झाल्यावर लोक तपासणीसाठी बाहेर आले. फिरत्या दवाखान्यातील वैद्यकीय सेवेचे अजून एक वैशिष्ट समोर येते. डॉक्टर जेव्हा आपल्या दवाखान्यात बसलेला असतो तेव्हा रुग्ण त्याच्याकडे येतात. यात डॉक्टर राजा असतो. परंतु फिरत्या दवाखान्याची टीम घरोघरी जाऊन लोकांना दवाखान्यात तपासणी करुन घेण्याची विनंती करते. यात डॉक्टर आणि रुग्णाचे नाते पूर्णत: बदलते. मी डॉक्टर आहे याचा अहंभाव दूर सारुन रुग्णसेवा हे अंतिम फलित मानणार्‍या या टीमचे यामुळे कौतुक वाटते.

Thursday, 26 July 2012

अमृत बंग, रंजन पांढरे व सायली तामणे यांचा अभ्यास दौरा


निर्माण 1 ची सायली तामणे, अमृत बंग आणि निर्माण 4 च्या रंजन पांढरे यांनी नुकताच सोलापूरचा दौरा केला. या दौऱ्याचे मुख्यत्वे दोन उद्देश्य होते. दुष्काळाचा प्रश्न समजून घेणे आणि सोलापूर व आजुबाजुच्या परिसरातील काम करणाऱ्या निर्माणींना भेटणे. सांगोल्यातील श्री. गणपतराव देशमुख हे गेली ५० वर्षे सातत्याने आमदार म्हणून निवडून येत आहेत. निर्माण ४ च्या बाबासाहेब देशमुखचे ते आजोबा आहेत. दुष्काळाचा प्रश्न समजून घेण्याच्यानिमित्त त्यांना भेटण्याचा या तिघांना योग आला. मॉन्सूनचे वारे महाराष्ट्रातील दक्षिण पूर्व भागाकडे (सांगली, सातारा, सोलापूर ह्यांचा पूर्वभाग) येईपर्यंत त्यांच्यातील आर्द्रता कमी होत जाते. म्हणूनच हा पट्टा – जत, खटाव, मंगळवेढा इत्यादी. दुष्काळी भाग आहे. सांगोला तालुका सोलापुरातील इतर दुष्काळग्रस्त भागांपेक्षा वेगळा दिसून येतो तो गणपतरावांच्या प्रयत्नांमुळे. त्यांच्या मते सांगोल्याचा सर्व विकास हा रोजगार हमी योजनेमुळेच शक्य झाला. त्यांच्या देखरेखीखाली त्यांनी सांगोल्यात १००० हून अधिक पाझर तलाव व ३-४ हजारहून जास्त बंड / बंधारे / नाले रोजगार हमी योजनेचा योग्य वापर करून बांधले. सांगोल्यात ८१ खेड्यांना पंढरपूरहून ८० – ९० कि.मी. पाणी आणले गेले आहे. उन्हाळात देखील सांगोल्यात डाळींब, बोर अशी बागायती शेती भरभरून दिसते. गणपतरावांच्या मते दुष्काळ निवारणासाठी सर्वात मोठा अडथळा मागील अनेक वर्ष तंत्रज्ञान हे होते. कृष्णा व भीमा नद्यांतून पाणी उपसण्याचे तंत्र १९८४ नंतर उपलब्ध झाले. तसेच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे देखील फार मोठे कारण ठरले. 
गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या सूतगिरणीत निर्माणी

सांगोल्याचा विकास व्हावा ह्या हेतूने गणपतरावांनी सहकारी तत्वावर चालणाऱ्या सूत गिरणीची स्थापना केली. खुद्द सांगोल्यात कापूस पिकतच नाही, तर गिरणीसाठी लागणारा कापूस हा बीड आणि विदर्भातून आणला जातो. 1982 साली सुरु झालेल्या या गिरणीची आताची वार्षिक उलाढाल ही 150 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. अत्यंत अद्ययावत असलेल्या या गिरणीची सगळी व्यवस्था कामगारांचे हित लक्षात ठेवूनच चालते. गिरणीत दर वर्षी मिळणारा बोनससुद्धा कामगार स्वत:च ठरवतात. कामगारांसाठी अपघातप्रसंगी, अडचणी प्रसंगी, निवृतीनंतर त्यांच्या हिताच्या अनेक योजना गिरणी राबवते. 

सोलापूरनजीक ‘रेबीज’ या रोगावर काम करीत असलेला सारंग देसाई तसेच टेंभूर्णीजवळ गावात मुलांसाठी वाचनालय तसेच वृक्षारोपण अशी ग्राम विकासाची कामे करीत असणार्‍या रणजित लोंढे  या निर्माणच्या मुलांशीही या दौरादरम्यान भेट झाली. 

परतीच्या वाटेवर असताना औरंगाबादमध्ये श्री. माधवराव चितळे तर जालन्यामध्ये श्री. विजय अण्णा बोराडे या पाणी प्रश्नावर काम केलेल्या व त्याचे सखोल ज्ञान असलेल्या दोन मान्यवरांसोबतही निर्माणच्या गटाने दुष्काळाबाबत चर्चा केली. तसेच बीडमधील पाटोदा तालुक्यातील डोमरी या दुर्गम गावात जाऊन तिथे गेली 25 वर्षे वर्ग 5 वी ते 10 वी अशी मुलांसाठी गुरुकुल पद्धतीने शाळा चालवणा-या श्री. सुदाम भोंडवे यांना भेटून त्यांचेही काम समजून घेता आले.

निर्माण 3 चा अश्विन पावडे ‘निमकर ऍग्रीकल्चर रीसर्च इन्स्टिट्यूट’ सातारा येथे रुजू

निर्माण 3 चा अश्विन पावडे मुळचा अकोल्याचा असून त्याने औरंगाबादमधून मेकॅनिकल इंजिनीयरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. जानेवारीमध्ये झालेल्या निर्माणच्या इंजिनीयरींग कॅम्पला तो उपस्थित होता. त्यावेळी त्याने गेल्या दोन वर्षापासून किर्लोस्करमध्ये करत असलेली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला पुढे ग्रामीण भागात पारंपारिक उर्जेचा अधिकाधिक वापर कसा करता येईल आणि त्याद्वारे रोजगारउपलब्धी कशी होईल या विषयात काम करण्याची इच्छा आहे. यात काम करणार्‍या फलटण-सातारा येथील ‘निमकर ऍग्रीकल्चर रीसर्च इन्स्टिट्यूट’ ला अश्विन नुकताच रुजू झाला आहे. अश्विन पुढील सहा महिने डॉ. अमित राजवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रीसर्च असोसिएट म्हणून काम करेल. अश्विनला निर्माण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा!

निर्माण 4 च्या डॉ. आरती गोरवाडकर, स्वाती देशमूख आणि युगंधरा काटे महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत


एम.बी.बी.एस. झाल्यावर सर्व सरकारी कॉलेजेस मधून बाहेर पडणाऱ्या डॉक्टर्सने एक वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा देणे अनिवार्य असते. तसा करार (बॉंड) असतो. मात्र फार कमी मुले हे गांभीर्याने घेतात. एम. डी. ची तयारी करण्याच्या निमिताने मुले घरी राहून आभ्यास करणे पसंत करतात. सरकारी यंत्रणासुद्धा ही बाब फार मनावर घेत नाही. त्यामुळे एकी\कडे आपल्याला ग्रामीण / आदिवासी भागात योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही असे चित्र दिसते तर दुसरीकडे एम.बी.बी.एस. झालेली ९० टक्के मुले बॉंड न पाळता घरी बसून केवळ पुस्तकी अभ्यास करताना दिसतात.

निर्माणच्या डॉक्टर्समध्ये मात्र एक वेगळा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. प्रियदर्श तुरे (मेळघाट) पासून सचिन बारबदे, विठ्ठल साळवे, विक्रम सहाने, रामानंद जाधव, शिवप्रसाद थोरवे (गडचिरोली) , स्वप्नील गिरी (यवतमाळ), बाबासाहेब देशमुख (परिते – सोलापूर) या सर्व मुलांनी स्वत:हून मागणी करून ग्रामीण भागात पोस्टिंग घेतले. विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे मुली सुद्धा यात मागे नाहीत. निर्माण 4 च्या स्वाती देशमुख, युगंधरा काटे, आरती गोरवाडकर या मुलींनी आदिवासी भागात सेवा देण्याचा घेतलेला निर्णय वाखाण्याजोगा आहे.
 
  निर्माण ४ ची आरती गोरवाडकर ही मुळची नाशिकची. पुण्यातील बी.जे मेडिकल कॉलेज मधून तिने एम.बी.बी.एस. पूर्ण केले. सध्या ती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील हरसूल या आदिवासी भागातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. निर्माण 4 च्या स्वाती देशमुखने मुंबईमधील जे. जे महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून ती नुकतीच गडचिरोलीतील आरमोरी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. निर्माण 4 च्या सुजय काकरमठच्या संपर्कातून निर्माण परिवाराला सामील झालेली डॉ. युगंधरा काटे हीनेही याच रुग्णालयात एका वर्षासाठी वैद्यकीय अधिकारीपद स्विकारले आहे. युगंधरा मूळची मुंबईची असून तिने अकोल्याच्या सरकारी महाविद्यालयातून एम.बी.बी.एसचे शिक्षण पूर्ण केले आहे. या तिघींचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा! 

युगंधरा काटे
आरती गोरवाडकर
स्वाती देशमुख

व्यंकचित्र, मे २०१२


निर्माण 4 चा ‘शिवप्रसाद थोरवे’ धानोरा तालुक्यातील पेंढरी तर ‘रामानंद जाधव’ जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू


शिवप्रसाद थोरवे
रामानंद जाधव

डॉ. सचिन बारब्दे  डॉ. विठठल साळवे आणि डॉ. विक्रम सहाने या धानोर्या तालुक्यात काम करणार्या निर्माणच्या मित्रांकडून प्रेरणा घेऊन निर्माण 4 च्या शिवप्रसाद थोरवे आणि रामानंद जाधव यांनीही याच भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्याचे ठरवले आहे. या दोघांनीही औरंगाबाद येथून एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण केले आहे. शिवप्रसाद थोरवे हा मूळचा परभणी असून पेंढरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तो वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला आहे. रामानंद जाधव हा मूळचा नांदेडचा असून पेंढरीपासून 10 किमी अंतरावर असणार्या जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तो काम करू लागला आहे. सध्या गट्टा येथे काम करणारा निर्माण 4 चा विक्रम सहाने, शिवप्रसाद आणि रामानंद हे तिघेही औरंगाबाद येथे वर्गमित्र होते. पुढील एका वर्षात हे तिघेही एकाच भागात काम करणार असल्यामुळे आपआपल्या कामात त्यांना एकमेकांची नक्कीच मदत होईल. सचिनचा पेंढरीतील कार्यकाल संपल्यावर दुसर्‍या दिवशी त्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवप्रसाद वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला. निर्माणमध्ये सुरु झालेली ही रिले रेस कार्यक्षमता वाढवण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल. शिवप्रसाद आणि रामानंद या दोघांचे निर्माण परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा