'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 31 December 2015

धरण

"मित्रांनो, धरणं म्हणजे शेती सुजलाम् सुफलाम् करणारी अत्यावष्यक गोष्ट असं वाटत असतानाच या संकल्पनांना छेद देणारे अनेक मुद्दे आपण अमृताच्या धरणांच्या या लेखमालेत बघत आहोत. धरण हा मुळात आतबट्ट्याचा व्यवहार आहे याची आकडेवारी आपण बघितली.  आणि ''वाहणे' या नदीच्या मूळ स्वभावविरुद्ध जाऊन बांधलेल्या धरणांचे नदी या जिवंत परिसंस्थेवर अनेक दूरगामी परिणाम होतात हेही आपण बघितलं. गेल्या लेखात चर्चिलेल्या याच मुद्द्यावर आणखी थोडा प्रकाश टाकणारा हा चौथा लेख.
धरणांचे परिणाम (भाग २)
मागच्या भागात आपण बघितलं की धरणांचे हानिकारक परिणाम वेगवेगळ्या प्रकारच्या नद्यांमधे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या संदर्भात दिसत आहेत आणि जरी ते तुकड्या तुकड्यांमधे असले तरी पुरेसे ठळक आहेत. नक्की कोणत्या प्रकारचे परिणाम कुठे ठळकपणे दिसतील हे त्या-त्या नदी खो-यातील परिसंस्थेवर अवलंबून असते. यामधे हिमालयात उगम पावणार्‍या नद्यांवरचे परिणाम बघताना आपण उत्तराखंडमधे गंगा नदीच्या खो-यात जलविद्युत प्रकल्पांसाठी अनेक धरणं जी एकाला लागून एक बांधली गेली त्याचे काय परिणाम झाले आहेत याचा धावता तरी एकसंध आढावा घेतला. आता जरा दख्खनच्या पठारावरून वाहणा-या नद्यांवर तुकड्यातुकड्यात दिसणारे पण तितकेच गंभीर परिणाम बघूया. यांची यादी खरं तर खूपच मोठी होईल. पण लेखाची लांबी बघता मी मानवनिर्मित पूर,जैव विविधतेवर होणारे परिणाम याची काहीउदाहरणं दिली आहेत आणिकृष्णा गोदावरी या नद्यांमधील जवळजवळ १००% गाळ धरणांनी अडवल्यामुळे या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाचा किनारा खचण्याची प्रक्रिया जी वेगाने सुरू आहे त्याचा तपशील दिला आहे. आणि शेवटी या आणि अशांसारख्या अनेक प्रकारच्या परिणामांना एका छ्त्राखाली आणणार्‍या ’जागतिक हवामान बदल’ या घटनेचा धरणांशीनक्की काय प्रकारचा संबंध आहे त्याची चर्चा केली आहे. मागच्या आणि या लेखात आपण मुख्यतः धरणांच्या पर्यावरणीय परिणामांची चर्चा केली आहे. सामाजिक आणि आर्थिक परिणाम आपण पुढच्या लेखात समजून घेणार आहोत.

मानवनिर्मित पूर
तुकड्यातुकड्यांमधले हे परिणाम समजून घ्यायला आपण शहरापासून सुरुवात करू. शहर हा नदी खोर्‍याच्या तुलनेत क्षेत्रफळानी त्या मानानी लहान असलेला घटक. धरणाच्या अकार्यक्षम यंत्रणेमुळे पूर्ण शहराला किती मोठा फटका बसू शकतो याचं हे उदाहरण.
असा दावा सर्रास केला जातो की भारतातली ४००० पेक्षा जास्त धरणं पूर नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावतात. पण आकडेवारी बघितली तर असं दिसतं की धरणांच्या व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे पुष्कळदा पुरानी होणार्‍या नुकसानात वाढच झाली आहे.
भारतातल्या मान्सूनचं वैशिष्ट्य असं की खूप जास्त पाऊस काही तासांत किंवा काही दिवसांत कोसळू शकतो. अशा वेळी धरणामधल्या वाढत्या पाणी साठ्याला आवर घालणं मुष्किल होऊन बसतं. असं असून सुद्धा भारतात पूर नियंत्रणासाठी मोठी धरणं आणि किनार्‍यालगतचे मोठे बांध हेच दोन उपाय मुख्यतः योजले जातात.
पण जेव्हा हे उपाय फसतात तव्हा परिस्थिती इतकी आवाक्याबाहेर जाते की मोठा अनर्थ ओढवतो.
उदा. २००६ च्या ऑगस्ट महिन्यात गुजरात राज्यामधल्या ’उकाई’ या सूरतपासून ८० किमी वर बांधलेल्या तापी नदीवरच्या धरणामुळे पूर येऊन हाहा:कार उडाला. ८ ऑगस्टच्या संध्याकाळपासून उकाई धरणातून तापी नदीच्या धारण क्षमतेच्या जवळ्जवळ दुप्पट पाणी सोडायला सुरुवात झाली. त्यातच समुद्राला भरती असल्यामुळे नदीची पाणी सामावून घ्यायची क्षमता आणखीच कमी झाली होती. असा पाण्याचा लोंढा सतत चार दिवस धरणातून सोडला जात होता. बघता बघता संपूर्ण सूरत शहर पाण्याखाली गेलं. पूर ओसरेपर्यंत १२० लोक मृत्युमुखी पडले, शेकडो बेपत्ता झाले आणि जवळजवळ ४००० गुरांचा मृत्यू झाला. एकंदर आर्थिक नुकसानीचा अंदाज ४९००कोटी अमेरिकन डॉलर्स इतका जास्त आहे.
सूरतमधील २००६ चा पूर
धरणातलं पाणी वाढतं आहे याचा प्राथमिक अंदाज २ जुलैलाच आला होता. धरण २० जुलैला ५१%, ३ ऑगस्टला ७७.५४% भरलं होतं आणि ७ ऑगस्टला ते १००% भरलं. शिवाय धरणातला मान्सूनपूर्व पाणी साठाही गेल्या चार वर्षातला सगळ्यात जास्त होता. जर १ ऑगस्टपासूनच हळूहळू जास्त पाणी सोडायला सुरुवात केली असती तर परिस्थिती आटोक्यात ठेवणं शक्य होतं. पण तसं न करता ऑगस्ट ८ पर्यंत अधिकार्‍यांनी अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी काहीच पावलं उचलली नाहीत आणि ८ तारखेला संध्याकाळी धरणाचे दरवाजे सताड उघडले गेले.
भाक्रा धरण, हिराकुंड धरण, तवा-बार्गी धरण, दामोदर धरण अशा अनेक ठिकाणी नेमकं हेच घडलं. तापी, नर्मदा, गोदावरी, मही, साबरमती इ. नद्यांवर बांधलेल्या धरणांच्या अकार्यक्षम यंत्रणांमुळे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश इ. राज्यांत मानवनिर्मित पूरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पूर नियंत्रणासाठी धरणं, बांध इ. उपाय योजलेल्या क्षेत्रात एकीकडे वाढ होत असतानाच दुसरीकडे मात्र पूरामुळे होणारं नुकसानही वाढतं आहे. गंगा-ब्रम्हपुत्रा या दोन सगळ्या पूर प्रवण खोर्‍यांमधे तर काही ठिकाणी पूराचा धोका ६०% नी वाढला आहे.

जैव विविधतेवर होणारे परिणाम
शहराकडे बघितल्यावर आता जरा झूम आऊट करून उपनदीच्या खोर्‍याकडे बघूया. नदी खोर्‍यात जो भाग दाट जंगलांचा असतो अशा भागातल्या वन्य जीवांवर आणि परिणामे जैव विविधतेवर धरणांचे अनेक दूरगामी परिणाम होऊ शकतात. महाराष्ट्रातल्या वैनगंगा नदीचं खोरं हे याचं उत्तम उदाहरण आहे.
वैनगंगा ही गोदावरीची एक महत्वाची उपनदी. वैनगंगेचं खोरं हा जैवविविधतेच्या दृष्टीने मध्य भारतातला एक अत्यंत महत्वाचा प्रदेश आहे. ’जंगल बुक’ मधल्या मोगलीच्या गोष्टी लिहिताना रुडयार्ड किपलिंगच्या डोळ्यासमोर वैनगंगेच्या खोर्‍यामधलीच जंगलं होती.[i]मध्य भारतातले अनेक व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, संरक्षित आणि राखीव जंगलं या खोर्‍यात वसलेली आहेत.[ii] वाघ, हत्ती अशा अनेक वन्यजीवांच्या स्थलांतरांच्या मार्गाचं जाळं  हे या ४९,६९५ चौ. किमी.[iii]या क्षेत्रफळाच्या खोर्‍यात पसरलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातलं पन्नास टक्क्यांहून जास्त जंगल या खो-यात वसलेल्या भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांमधे आहे. राज्यातले सहापैकी चार व्याघ्र प्रकल्प या खोर्‍यात आहेत. कान्हा, पेंच, सातपुडा, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर, ताडोबा या व्याघ्र प्रकल्पांमधले महत्वाचे दुवे म्हणून वैनगंगेच्या खोर्‍यातली अनेक जंगलांचे पट्टे काम करतात. वाघासारख्या प्रजातीला वावरण्यासाठी, स्थलांतर, प्रजनन यासाठी लागणारा विस्तार त्यामुळे उपलब्ध होतो. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अहवालानुसार वैनगंगेचं खोरं हे वाघांच्या दृष्टीने भारतातल्या चार सर्वोत्तम अधिवासांपैकी एक आहे.[iv]
१२ ऑक्टोबर २०११ साली कालव्यात अडकलेल्या ’कला’ नावाच्या तरूण वाघिणीला सोडवायला जवळपास ४८ तास लागले
मात्र गोसिखुर्द, बावनथडी, इतियाडोह यासारख्या धरणांमुळे आणि त्यांच्या कालव्यांमुळे या जगलांची एकसंधता धोक्यात आली आहे.[v] प्राण्यांच्या स्थलांतराचे मार्ग खंडित झाले आहेत. उदा. बावनथडी धरणामुळे बुडलेल्या ४,३८८ हे. जंगलामधे २,३५० हे. व्याघ्र क्षेत्र नष्ट झालं.[vi] याच धरणाच्या १०० किमी लांबीच्या कालव्यामुळे पेंच ते नागझिरा अभयारण्यामधील वाघांचे स्थलांतराचे मार्ग खंडित झाले आहेत. गोसिखुर्द धरणामुळे २,९६१ हे. जंगल बुडालं आहे. याशिवाय आणखी ११९ हे. जंगल धरणाच्या उजव्या कालव्यासाठी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.[vii]तज्ञांच्या मते २७ वाघ असलेल्या ब्रम्हपूरी जिल्ह्यातून जाणारं गोसिखुर्द कालव्याचं ९१ किलोमीटरचं जाळं हे सध्या ’ताडोबा अंधारी’ व्याघ्र प्रकल्पाला असलेला सगळ्यात मोठा धोका आहे.[viii]कालवे ओलांडण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे वन्यप्राणी कालव्यात अडकून पडल्याच्या घटनाही अनेक वेळा घडल्या आहेत.
६२५ किमी क्षेत्रावर पसरलेल्या ताडोबा प्रकल्पाला असलेल्या धोक्यात आणखी भर पडली आहे ती पर्यावरण खात्याने नुकतीच मंजूरी दिलेल्या हुमण प्रकल्पामुळे.[ix] चंद्रपूर जिल्ह्यात प्रस्तावित असलेला हा प्रकल्प जर अस्तित्वात आला तर ताडोबामधून ब्रम्हपूरीला जातानाचा उर्वरित चिंचोळा व्याघ्र मार्गदेखील नष्ट होईल.[x] यामुळे वाघांच्या स्थलांतरावर आणि परिणामी त्यांच्या एकूण संख्येवर विपरीत परिणाम होईल. चंद्रपूर जिल्ह्यात गोसिखुर्द, घोडाझरी, आसोलामेंढा, नल्लेश्वर इ. धरणं असताना आणखी एक धरण बांधायचे प्रयोजन काय असा प्रश्न वन्य जीव संवर्धन करणारे तज्ञ उपस्थित करत आहेत.

अडवलेला गाळ आणि खचणारे त्रिभुज प्रदेश
संपूर्ण नदीकडे एका दृष्टीक्षेपात बघायचं ठरवलं तर धरणांचे परिणाम किती मोठ्या पातळीवर असू शकतात याची पुरेपूर कल्पना येते. यासाठी कृष्णा-गोदावरी नद्यांचं हे उदाहरण. कृष्णा गोदावरी या नद्यांमधील जवळजवळ १००% गाळ धरणांनी अडवल्यामुळे या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाचा किनारा खचण्याची प्रक्रिया जी वेगाने सुरू आहे त्याचा हा तपशील.
नदीमधून वाहून आणलेल्या गाळाचा नदीच्या एकंदर आकृतीबंधावर मोठा परिणाम होतो. नदीची पात्र, वळण, घाट, ढाचा या सगळ्याला आकार देण्यात गाळाची महत्वाची भूमिका आहे. नदी वाहते तो भूभाग, तिचा आकार, लांबी, प्रवाह याप्रमाणे गाळामधील घटकद्रव्य बदलतात. जरी नद्यांमधला पुष्कळसा गाळ हा काठावरच्या प्रदेशांमधे पसरवला जात असला तरीही नद्यांचे त्रिभुज प्रदेश हे सर्वात सुपिक गाळातून बनतात. या गाळामुळेच त्रिभुज प्रदेशात नदीच्या मुखाशी अनेक वितरिका तयार होतात. जगभरात सर्वच ठिकाणी  त्रिभुज प्रदेश हे अत्यंत सुपिक आणि दाट लोकसंख्येचे प्रदेश आहेत. जगातील सगळ्या त्रिभुज प्रदेशांचे मिळून एकूण क्षेत्रफळ पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या केवळ ५% असले तरीही जगामधली जवळ जवळ पाऊण लोकसंख्या त्यांवर अवलंबून आहे. त्रिभुज प्रदेशातील जैविक परिसंस्था हा भूसृष्टी आणि जलसृष्टी या मधला अत्यंत महत्वाचा दुवा आहे.
खचणारे त्रिभुज प्रदेश
पण आता जगभरात ठिकठिकाणी झालेल्या अभ्यासांमधून असं निष्पन्न होत आहे की धरणांमुळे सर्व प्रमुख नद्यांमधला जवळपास सगळाच्या सगळ्या गाळ अडवला जातोय. उदा. कृष्णा नदीच्या मुखापर्यंत पोहोचणा-या गाळात ९५% घट झाली आहे, गोदावरीच्या गाळात ७४%, नर्मदा नदीच्या गाळात ९५% तर साबरमतीच्या गाळात ९६% घट दिसून आली आहे. याचाच अर्थ असा की नद्यांकडून गाळ वाहून नेण्याची प्रक्रिया जवळ जवळ थांबली आहे. याचाच परिणाम म्हणजे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन किनारपट्टीचा प्रदेश खचायला लागला आहे. समुद्री लाटा, भरती ओहोटी, समुद्री प्रवाह या रूपात समुद्रातली ऊर्जा सतत किना-रांवर आघात करत असते. नद्यांनी वाहून आणलेला गाळ पसरण्याची प्रक्रियाही सतत चालू असल्यामुळे समुद्राच्या आघातांनी किनारे खचत नाहीत. पण आता तो सगळा गाळ अडवल्यामुळे किना-यांना संरक्षण उरलेले नाही आणि ते खचायला लागले आहेत. याबरोबरच खरफुटीच्या प्रदेशाचे नुकसान होणे, या प्रदेशातील गोड्या पाण्याच्या विहिरींमधे खारं पाणी शिरणे, वादळांमुळे होणा-या नुकसानाचा धोका वाढणे हेही परिणाम होत आहेत. यासाठीचे तपशीलातले अभ्यास भारतातीलही अनेक नद्यांसाठी उपलब्ध आहेत. सॅंडर्पने गेल्या वर्षी हे सगळे अभ्यास आणि धरण प्रकल्पांची सद्य स्थिती याकडे बएकत्र बघत याचा एक गोषवारा तयार केला.
आपण कृष्णा-गोदावरी नद्यांचं उदाहरण जरा खोलात बघूया. या नद्यांच्या जोड-त्रिभुज प्रदेशात (twin-delta) १२,७०० चौ. किमी क्षेत्रफळावर मिळून ९२.६ कोटी लोकसंख्या राहते. या भागात लोकसंख्येची घनता भारताच्या सरासरी घनतेच्या दुप्पट आहे. आंध्र विद्यापिठाच्या डॉ. नागेश्वर राव यांच्या अभ्यासगटाने २०१० साली केलेल्या अभ्यासात असं निदर्शनास आलं की १९६५ ते २००८ या ४५ वर्षात ३३६ किमी किनारपटेटीच्या प्रदेशाचा ७६ चौ. किमी भाग खचून समुद्द्राखाली गेला आहे. आणि किनारा खचण्याचा वेग १९९० ते २००० च्या दशकात प्रतिवर्ष १.३९ चौ. किमी वरून प्रतिवर्ष २.३२ चौ. किमी इतका वाढला आहे. कृष्णा नदीच्या मुखापर्यंत पोहोचणा-या गाळाचं प्रमाण जवळजवळ शून्य आहे आणि म्हणूनच किनारा वेगाने खचत समुद्राची पातळी वेगाने वाढते आहे. गोदावरी नदीच्या मुखापर्यंत पोहोचणा-या गाळात १९७०-७९ च्या तुलनेत तिप्पट घट झाली आहे.
डॉ. राव यांच्या अभ्यासात असं दिसलं की धरणांच्या खालच्या बाजूच्या गाळाचं प्रमाण वरच्या बाजूच्या गाळाच्या प्रमाणापेक्षा सातत्यानं कमी होतं. त्यांच्या मते ’धरणं’ हे कृष्णा गोदावरीच्या मुखाजवळचा किनारा गेल्या चाळीस वर्षार खचण्याचं प्रमूख कारण आहे. याचे थेट परिणाम उप्पाडा सारख्या गावांमधे दिसतात.
दुर्दैवाची गोष्ट अशी की या गंभीर परिणामांची दखल न घेता महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा ही सर्व राज्ये जास्तीत जास्त धरणं बांधून पाणी आणि पर्यायाने गाळ अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. असलेलं धरण गाळाने भरलं तर नवीन धरण बांधणे हा त्यावर उपाय योजला जात आहे. उदा. गंगापूर धरण गाळाने भरत आलं आहे म्हणून नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी त्र्यंबकेश्वरजवळ किकवी धरण प्रस्तावित आहे. हे जंगल उभारण्यासाठी १००० हे. जंगल बुडवायला नुकतीच केंद्रीय वन्य सल्लागार समितीने मान्यता दिली.
धरणं बांधण्याचा हट्ट चालूच ठेवला तर लवकरच भारतातील अनेक प्रमुख त्रिभुज प्रदेशांचे भरून न येता येण्यासारखे नुकसान होईल व भविष्यात हे प्रदेश वास्तव्य करण्याच्या स्थितीतही राहणार नाहीत.

हवामान बदल आणि धरणं
जैवविविधतेला निर्माण होणारा धोका, नदीचा वहनाचा मार्ग, गाळाचं वहन, नदीचा एकंदर आकृतीबंध यांवर होणारे परिणाम, त्रिभुज प्रदेशावर होणारे समुद्राचं आक्रमण किंवा मागच्या भागात बघितलेले जलविद्युत प्रकल्पांचे परिणाम हे सगळे परिणाम जरी वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रदेशांत आणि वेगवेगळ्या वेळी होणारे असले तरीही जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मात्र ते एकत्रितपणे आणि अधिक गंभीर स्वरूप धारण करतात. Inter-governmental Panel on Climate Change’s (IPCC)च्या Working Group IIच्या ‘Climate Change 2014: Impacts, Adaptation, and Vulnerability’या अहवालात अनेक ठिकाणी धरणांचा उल्लेख आणि त्यावर टिपण केलेलं आढळतं. अहवालात हे स्पष्टपणे म्हंटलेलं आहे की धरण हा हवामानाच्या दृष्टीने योग्य पर्याय नाही.[xi] जागतिक हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर धरणांच्या परिणामांबाबत नमूद केलेल्या काही बाबी खालील प्रमाणे-
१)     धरणांचे ’हवामान निरपेक्ष’ असे अनेक परिणाम आहेत (Non-Climate Impacts). हे परिणाम हवामान बदलाशी संबंध आल्यावर उग्र स्वरूप धारण करतात
a.       हवामान बदलामुळे समुद्र पातळी वाढत असतानाच धरणांनी अडवलेल्या गाळामुळे त्याचा वेग आणि तीव्रता आणखी वाढते
b.      धरण आणि हवामान बदल हे एकत्रितपणे खूप मोठ्या प्रदेशावर परिणाम करतात
c.       नदीच्या प्रवाहामधे होणार्‍या चढ उतारांची आणि त्यामुळे नदीवर व ती वाहणार्‍या प्रदेशावर होणार्‍या परिणामांची तीव्रता कैक पटींनी वाढते
२)     पूर नियंत्रणासाठी धरण किंवा बांध बंदिस्ती या उपाय योजना केल्यास त्याचा फायद्यापेक्षा तोटाच जास्त होऊ शकतो
३)     हवामान बदलाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असणार्‍या जैव विविधतेवर धरण आणि जलविद्युत प्रकल्पांमुळे हानीकरक परिणाम होतो
४)     विषुववृत्तीय प्रदेशांमधे जलविद्युत प्रकल्पांची तापमान वाढीची क्षमता औष्णिक विद्युत प्रकल्पांपेक्षा जास्त असू शकते
५)     समाजातल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना हवामानबदलामुळे असलेला धोका धरणांमुळे वाढू शकतो
६)     निसर्गाचा, जैव विविधतेचा, पारिस्थितिकीला विचारात घेऊनच असलेल्या धरणांचे व्यवस्थापन व्हायला हवं
७)     जलविद्युत प्रकल्पांना हवामान बदलाचा धोका जास्त असल्याने असे प्रकल्प बांधणे सुरक्षित नाही
८)      
आणि तरीही धरणंच
जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलविद्युत प्रकल्प आणि धरणं ही विनाशकारी पर्याय असतील हे IPCC ने आपल्या  अहवालात निःसंदिग्धपणे म्हंटलेलं आहे. अमेरिकेच्या “The Bulletin of the American Meteorological Society” ने त्यांच्या वार्षिक तीव्र हवामानासंबंधीच्या २०१४ सालच्या अहवालात २०१३ साली जगभरात झालेल्या १६ तीव्र हवामानाच्या घटना नोंदवल्या त्यात उत्तराखंडच्या पूर आपत्तीचा समावेश होता. इतकं असून सुद्धा भारताने मात्र पॅरीसमधे नुकत्याच पार पडलेल्या ’जागतिक हवामान परिषदेत’ कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीच्या उपायांमधे पुन्हा जलविद्युत प्रकल्पांवरच भर दिला आहे. परिषदेत भारतातर्फे सादर केलेल्या “Intended Nationally Determined Contribution या दस्त ऐवजात असं नमूद केलं आहे की “१०० गिगावॅट एवढा प्रचंड जलविद्युत निर्मिती क्षमता असल्यामुळे अनेक धोरणात्मक उपक्रम युधपातळीवर हाती घेतले आहेत”.[xii]
ज्या जवाहरलाल नेहरूंनी धरणांना ’अधुनिक भारताची मंदिरं’ असं संबोधलं त्याच नेहरूंनी त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटीशेवटी मात्र आपला दृष्टीकोन बदलला आणि धरणासारख्या महाकाय सेवा-सुविधा प्रकल्पांना त्यांनी ’महाकायतेचा रोग’ असं संबोधलं. एका शास्त्रज्ञाची वृत्ती जोपासलेल्या नेहरूंमधे इतका कमालीचा प्रामाणिकपणा होता.
आपल्या देशाच्या सरकारनी इतका प्रामाणिकपणा अंगिकारून वास्तव स्वीकारत धरणांबद्दलची भूमिका बदलायला भारतात उत्तराखंडसारख्या अजून किती आपत्ती याव्या लागतील?
स्रोत: अमृता प्रधान, amrutapradhan@gmail.com
References
“A Dam-Made Disaster”, HimanshuThakkar, SANDRP, 2007
 “Sinking and shrinking deltas”, ParinitaDandekar, SANDRP, 2014
“Dams are not Climate Friendly: Readings from IPCC WG II Report”, ParinitaDandekar, SANDRP
End notes


[i]GoMP (2011): “District Census Handbook Seoni” , Directorate of Census Operations Madhya Pradesh, 2011, (pdf) p.7
[ii]WWF(Undated): Website of World Wildlife Fund India, Web Page of ‘About SatpuraMaikal landscape’
[iii] ibid p.,31
[iv] Jay Mazoomdaar (2010): “Surrendering the Last Frontier”, OpenMagazine, Issue dated 23 January 2010
[v] TOI (2011): “Labyrinth of canals cuts into tiger path”, Vijay Pinjarkar, Times of India, November 05,  2011
[vi]MoEF (2010): “Monitoring and Evaluation of Forest Area diversions for Non-Forest purpose including the
Status of Compliances of Approved Conditionalities and Impact of forest diversion cases on Forest and Wildlife”, Report by Richa Sing &SonalKhare, submitted to Forest Conservation Division of Ministry of Environment & Forest, June 2010
[vii]MoEF (2014): Minutes of Forest Advisory Committee dates July 17 & 18, 2014, p.1
[viii] TOI (2011): “Labyrinth of canals cuts into tiger path”, Vijay Pinjarkar, Times of India, November 05,  2011
[ix] TOI (2014): “27 tigers in Tadoba-Nagzira corridor, says study”, Vijay Pinjarkar, Times of India, July 19,2014
[x] TOI (2015): Vijay Pinjarkar “Give tigers their space, value corridors”, op., cit.
[xi]SANDRP (2014): “Dams are not Climate Friendly: Readings from IPCC WG II Report” , ParineetaDandekar, South Asia Network on Dams Rivers & People
[xii]SANDRP (2015): “India’s INDC will increase the water insecurity and problems of the vulnerable and the poor”, HimanshuThakkar, South Asia Network on Dams Rivers & People




प्रत्यक्ष प्रश्नासोबत!

निर्माण ४ चा रंजन पांढरे सहा महिन्यांपूर्वी सर्च च्या व्यसनमुक्ती विभागासोबत ‘प्रोजेक्ट असोसिएट - तंबाखू व दारू नियंत्रण कार्यक्रम’ या कामासाठी रुजू झाला. शिक्षणाने सिव्हील इंजिनियर असलेल्या रंजनने त्याचे पोस्ट ग्रजुएशन ‘आरोग्य, सुरक्षा व पर्यावरण व्यवस्थापन’ या विषयात केले. त्यानंतर पुढील करियर कसे निवडावे, काय काम करावे हा त्याचा प्रवास कसा झाला, या कामादरम्यान त्याला काय अनुभव आले याबद्दल रंजनच्याच शब्दात -

“सिव्हिल इंजीनियरींगचं शिक्षण झाल्यावर पुढे काय करायचं? पोस्ट ग्रजुएशन! आणि ते संपल्यानंतर देखील प्रश्न तोच आता पुढे काय? निर्माण मध्ये सतत आपण आपल्या जीवनाच्या अर्थावर भरभरून ऐकतो, बोलतो पण कृती मधे प्रत्यक्षात तो अर्थ शोधणे हे नक्कीच खूप कठीण असतं. पण यामधे मदतीला येणारा एक प्रश्न म्हणजे आपली गरज नेमकी कुठे आणि कोणाला आहे? आणि दुसरा प्रश्न, मला काय नाही करायचं? हे दोन प्रश्न नक्कीच मला माझा अर्थ शोधण्यात मदत करतात आणि याच शोधात येऊन पोहोचलो एका प्रश्नाच्या आणि त्याच्या उत्तराच्या गडचिरोलीला...
गेली सहा महिने मी सर्च, गडचिरोली येथे तंबाखू आणि दारू नियंत्रण कार्यक्रमात काम करतो आहे. गडचिरोली मधे तंबाखू आणि दारूची प्रचंड मोठी समस्या आहे, आणि या समस्येच मूळ आहे एका शब्दात तो म्हणजे ‘व्यसन’! गडचिरोली जिल्ह्यात वर्षाला सुमारे ३६० कोटींची दारू आणि तंबाखू विकली जाते असे सर्चने केलेल्या अभ्यासातून समोर आले. तंबाखू आणि दारूच्या प्रश्नावर काम करणे मोठे आवाहन आहे हे या आकडेवारीतून स्पष्ट होते. गडचिरोली जिह्यात १९९३ साली दारूबंदी झाली, मात्र स्थानिक ठिकाणी मोहापासून सहज दारू तयार होते आणि उपलब्ध असते तसच बंदीची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्यामुळे दारू मुबलक उपलब्ध असते. त्यातूनच व्यसनाधीनातेकडे पाउल आपोआप उचलले जाते.
दुसरे मोठे व्यसन म्हणजे तंबाखू. ती खर्र्याच्या स्वरूपात सर्वाधिक प्रमाणात पहावयास मिळते. सुगंधीत तंबाखू सुपारी एकत्र घोटून तयार केलेला पदार्थ म्हणजे खर्रा! इथे खर्रा हे स्वागताचे माध्यम आहे. प्रत्येकाने भेटून एकमेकांना खर्रा देणे ही मोठी परंपरा आहे. ही समस्या जवळून बघताना काही अनुभव शेअर करावेसे वाटले.
अगदी वयाच्या दुसऱ्या वर्षापासून लहान मुलांमध्ये तंबाखू किवा खर्रा खाण्याची सुरुवात होते. सकाळी दात घासताना नस, गुडाखुचा सहज वापर होताना लहान मूल आपल्या आईला बघत असतं, हेच काही खर्र्याच्या बाबतीत होतं, आणि हट्ट सुरु होतो. तू खातेस तर मला का नाही? किमान तीन वेळा निकोटीनचं सेवन केलं तर मेंदू आपल्याला निकोटीनची आठवण करून देतो असं शास्त्र म्हणत, त्यामुळे खर्रा लवकरच गरज बनते आणि तो खाल्ला की छान वाटत. आजूबाजूला आई, वडील, शिक्षक, सगळेच तंबाखू वापरत असतात, त्यामुळे ती सहज उपलब्धही असते. सध्या आम्ही शाळांमध्ये खर्रा-तंबाखू च्या वापरा विरोधी कार्यक्रम करतो आहे. एक राकेश नावाचा जि. प. शाळेचा ७वी चा विद्यार्थी; त्याच्याशी माझा झालेला संवाद मला या व्यासानाविषयी खूप काही शिकवून गेला.
मी : का खातोस रे खर्रा, तूला डॉक्टरने कॅन्सरची पूर्व लक्षणे असल्याचे सांगितलंय, तुझ तोंड त्यामुळे उघडत नाही...
राकेश : छान वाटते, मला नाही होत काही त्रास कॅन्सरचा  
मी : नको न खाऊ तू खर्रा, तुला कॅन्सर झाला नाही पाहिजे असं वाटते आम्हाला 
राकेश : माझी आई गेली १० वर्ष खाते आहे, नाही झाला तिला अजून
मी : अरे दिवसाला तू ५ वेळा खर्रा खातोस, मी काय करू म्हणजे तू खर्रा सोडशील
राकेश : कशाला भाऊ ? तुम्ही काही केलं तरी मी खर्रा सोडणार नाही आणि नाही केलं तरी मी सोडणार नाही!
या छोटाशा उदाहरणातून या व्यसनाची गंभीरता मला पहिल्यांदा जाणवली आणि नंतर ती मी आता रोजच बघत आहे. रोज एक नवीन कहाणी समोर असते. तंबाखू सेवनामुळे होणारा ‘ओरल सब्म्युकस फायब्रोसीस’ हा मुख्य आजार इथल्या शालेय मुलांमध्ये आढळतो. यामध्ये व्यक्तीचे तोंड हळूहळू उघडण बंद होते.    
इथल्या आश्रमशाळांमध्ये काम करताना शिक्षण संस्थांना आलेल्या निधीचा किती वापर प्रत्यक्ष कामात होत असेल या बद्दल खूप मोठे प्रश्न चिन्ह आहे. आरोग्य, आहार आणि शिक्षण तीनही बाबी सर्रास धुडकावल्या जातात. काही दिवसापूर्वी असाच एका १०वी च्या विद्यार्थिनीचा मलेरियाने मृत्यू झाला. त्यांना घालायला कपडे नाहीत, अन्न म्हणजे केवळ पाण्यातली भाजी आणि भात. मलेरिया, खरूज, डायरिया सारखे आजार मोठ्या प्रमाणावर आहेत. हे सगळ उघड्या डोळ्याने बघितल्यावर मन विषण्ण होतं. आपल्याकडे सगळ काही असत तरी आपल्याला प्रॉब्लेम असतात, इथे काहीच नाही, ही जाणीव माझ्यासाठी खूप शिकवण देणारी ठरते आणि पाय जमिनीवर ठेवणारी...
थोडं दारू विषयी -                
ग्रामीण भागांमध्ये दारू पिण्याचे खूप मोठे प्रमाण आहे. मोहाची किवा खोपडीची दारू स्थानिक ठिकाणी तयार होते आणि सहज उपलब्ध असते. युवांमध्ये याचे मोठे प्रमाण आढळते. गावामधले अनुभव वेगवेगळे असतात. म्हणजे गावात दारू बंदी करण्याच्या सभेत दारुडे येउन गोंधळ करणे असो, गावातील सरपंच किंवा इतर पदाधिकाऱ्यांचा (स्वतःची) दारूची भट्टी असल्यामुळे बंदीला होणारा विरोध असो. हा कायमच एक संघर्षाचा क्षण असतो. पण अशा वेळेस महिला पाठींबा देण्यास तयार होतात. कारण दारू पिणाऱ्या व्यक्तीचा सर्वात जास्त त्रास कोणाला होत असेल तर तो घरातील, गावातील महिलांना. त्यामुळे त्यांचा या विषयाला सकारात्मक पाठींबा असतो. दारूमुळे होणारे आजार असो, की दारुड्या नवऱ्याने पत्नीला केलेली अमानुष मारहाण असो, की प्रचंड आर्थिक नुकसान! यातील कुठलेही घटक कधीच स्वीकार केले जाऊ शकत नाहीत. महिला या समस्येने प्रचंड त्रस्त आहेत. दारू विकणे हे अनेकांचे उत्पन्नाचे साधन असते. मग अशा वेळेस त्यांना दारूमुक्तीसाठी हे बंद करा म्हणताना, रोजगाराचं काय? असा प्रश्न नक्कीच ते विचारतात आणि तेव्हा निरुत्तर व्हायला होत.

सहा महिन्यांमधे माझ्यासाठी महत्वाची शिकवण म्हणजे संवाद, टीमचे व्यवस्थापन, कार्यक्रम व्यवस्थापन, कार्यक्रमाची रचना, धोरणं आणि केलेल्या कामाचे परिणाम आणि मोजमाप. सार्वजनिक आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात सर्वात गरजेच्या अशा या गोष्टी. कामासोबत गडचिरोली आणि इथले निसर्ग सौंदर्य, डोंगर, नद्या, आणि त्यांच्यासोबत आमचा प्रवास हा खूप सुखावणारा आणि कधीही न थकवणारा असतो. दिल्ली अभी दूर है असे म्हणायला काही हरकत नाही, पण आनंद आहे की माझी सुरवात झाली आहे या प्रवासाला, शोधाला!”

स्रोत: रंजन पांढरे, pandhare.ranjan33@gmail.com

वेताळाच्या आरोग्यकथा

लेखक - रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

डॉक्टर होताना वैद्यकीय अभ्यासक्रमातील पाच वर्षात शिकलेल्या औषधशास्त्राचे वास्तविक जीवनातलं स्वरूप ‘वेताळाच्या आरोग्यकथा’ हे पुस्तक वाचताना उलगडत गेलं. वाचून सज्ञान झाल्यासारखं वाटलं.
नायनांची (डॉ. अभय बंग) प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकातला मसुदा विक्रम-वेताळ संवाद रूपाने मांडला आहे; ज्यात वेताळ विक्रमादित्याला त्याच्या राज्यात चालणाऱ्या घडामोडींविषयी डिवचत राहतो आणि संवादातील विषयांवरून राजाचे भान हरपाल्यावर पुह्ना झाडावर जाऊन लटकतो आणि राजाचा प्रवास सुरु होतो पुन्हा पूर्वीपासून. त्यामुळे वाचताना असे वाटते, जणू हा पुस्तकरुपी वेताळ आपल्यातील विक्रमादित्याच्या पाठीवर बसला आहे आणि विचारतोय ‘राजा, काय चाललंय तुझ्या राज्यात?’ वेताळाची प्रश्न विचारातानाची गम्मत आणि त्यातून उलगडलेलं गंभीर वास्तव वाचाणाराची रुची टिकवून ठेवते. लेखकाने पुस्तक लिहिताना वाचकांच्या मानसशास्त्रीय बाजूचा विचार केल्याचे जाणवते. पुस्तकाची मांडणी करताना त्यांनी आपल्या आजूबाजूच्या समाजात सुरु असणाऱ्या वाईट वृत्ती, प्रवृत्ती व घटनांवर बोट ठेवले आहेच पण ते करत असताना सध्या चालू असलेल्या, नव्याने करता येऊ शकणाऱ्या सकारात्मक गोष्टींही मांडल्या आहेत.
उदाहरण घेणे झाल्यास, सर्दी पडसे हा जगातील सर्वात जास्त होणारा पण साधारणतः निरुपद्रवी आजार! ज्या अनेक व्हायरसमुळे तो होतो त्या व्हायरसवर उपाय नाही. उपचार केला तर सात दिवसात आणि न केला तर आठवड्याभरात दुरुस्त होणारा असा हा रोग आहे. पण त्या काळात रुग्णाला बरेच अस्वस्थ वाटत असल्याने काहीतरी आराम हवासा वाटतो. या गरजेला आधार करून सर्दी पडशावर हमखास उपाय म्हणून हजारो औषधे बाजारात विकली जातात. वस्तुतः त्यापैकी एकानेही सर्दीचा जन्तुदोष कमी होत नाही. फक्त काही लक्षणं तात्पुरती कमी होतात. पण (ही) लक्षणे कमी करणारे असे प्रत्येक औषध कोणत्या न कोणत्या दुष्परिणामांना कारणीभूत ठरत असते. सर्दी पडशावरील औषधांमागील हे वैज्ञानिक सत्य वेताळ राजाला (वाचकाला) विस्तृतपणे सांगतो.
अजून सांगायचे झाल्यास, दोन लाख मुलांवरील प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळले की, बाळाला उपचारासाठी देण्यात येणाऱ्या Paracetamol (Crocin, Metacin, Calpol, etc.) या औषधांमुळे भविष्यात दमा होण्याचा धोका ४६ टक्क्यांनी वाढतो. हगवणीचा त्रास हा दुसरा सामान्य आजार. त्यावर बाजारात विकले जाणारे लोमोटील हे औषध पोटातली हगवण कमी करत नाही तर ती पोटात साठवते. त्यामुळे उलटपक्षी जन्तुदोष होण्याचा धोका वाढतो. म्हणून हगवणीसाठी लोमोटील सारखी औषधे वापरू नयेत असा सल्ला जागतिक आरोग्य संघटना देत असतानाही औषध कंपन्या ते उत्पादित करतात, डॉक्टर मंडळी प्रिस्क्राईब करतात व फार्मासिस्ट मंडळी विकतात.
लेखकाने वैज्ञानिक माहिती व बाजारू फसवणूक या दोन्हींवर प्रकाश पडल्याने रुग्ण स्वस्थ व सुद्न्य होऊ शकतील. याचा अर्थ स्वतःचा औषधोपचार त्यांनी स्वतः करावा असे नाही पण त्यासोबत काय घडते आहे व काय घडू शकते हे समजावून घेणे आवश्यक आहे. पुस्तकात अशा रोजच्या जीवनातील विविध आजारांची व औषधांची उदाहरणे घेऊन त्यांच्या मागचं रोगविज्ञान, औषधशास्त्र व फसवणूक हे तीनही उलगडून सांगितले आहेत. त्यात कान साफ करायच्या कानकाळ्या (ज्यांच्या डब्याखाली सूक्ष्म अक्षरात लिहून असते की ‘सावधान, या कानात घातल्याने इजा होऊ शकते.’), त्वचेचा रंग गोरा करण्याचे वेड पसरवणाऱ्या ब्लिचिंग क्रीम्स (फेअर अँड लव्हली), टॉनिक्स, हर्बल नावाने विकली जाणारी औषधे, इंजेक्शन बाबत अंधश्रद्धा व मागणी अशा अनेक गोष्टींचे विश्लेषण केले आहे. अज्ञान्यांची फसवणूक अशा किती तरी प्रकारे केली जाते...
त्याचबरोबर रुग्णांच्या न्याय्य हक्कासाठी लढाई देणारे पी. सी. सिंधी, बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांच्या एकाधिकार शाहीला आव्हान देऊन बांगलादेशमध्ये स्वदेशी गण फार्मसी सुरु करणारे व नंतर राष्ट्रीय वैद्यकीय नीतीत बदल घडवणारे डॉ. झफरुल्ला चौधरी, औषधाच्या ब्रांडच्या  नावाखाली दुप्पट तिप्पट किमती द्याव्या लागू नयेत म्हणून गुजराथ मध्ये चालवलेला ‘लो कॉस्ट’ नावाचा स्वयंसेवी प्रयोग, रिव्हर्स फार्माकोलोजी पद्धतीने आयुर्वेदिक औषधांमधील गुणकारी सत्याचा शोध घेणारे डॉ. अशोक वैद्य, व श्री. वैद्य अंतरकर अशी सकारात्मक कृती-शिलतेची काही उत्तम उदाहरणेही या पुस्तकात आहेत. 
अज्ञान हा बचाव होऊ शकत नाही. म्हणून आपण खात असलेल्या औषधांमागील विज्ञान, राजकारण, फसवणूक व त्यावरील उपाय या सर्वांचा शोध घेण्यास मदत करणारे हे पुस्तक रुग्णांनी, त्यांची काळजी घेणार्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि डॉक्टरांनी देखील वाचाव अस आहे.

स्रोत: सुरज म्हस्के, surajrmhaske@gmail.com

Saturday, 31 October 2015

गांधीसोबत appointment

२०१५ ची निर्माण ऑक्टोबर कार्यशाळा सेवाग्राम मध्ये पार पडली. 'सेवाग्राम आश्रम बापुकुटीकडे कसं पहावं?' याविषयी नायना शिबिरार्थ्यांसोबत बोलत होते. गांधी हा माणूस, त्याची तत्त्वे यातील बारकावे टिपण्यासाठी नायनांच्या बोलण्यातून आलेले काही प्रसंग...

           
१९३७ मध्ये भारतात कॉंग्रेसला प्रांतीय सरकारची सत्ता मिळाली. त्याआधीच गांधींच्या लक्षात आलं होतं की खरंच जरी सत्ता मिळाली, तरी गावांची स्थिती सुधरवल्याशिवाय स्वराज्याला तसा अर्थ नाही. गावांचे प्रश्न कोणते, ते कसे सोडवायचे याचा त्यांनी अधिक तीव्रतेने शोध सुरू केला. कॉंग्रेसच्या नेत्यांनी खेड्यात जाउन रहावे असा गांधींचा प्रयत्न होता. मात्र कॉंग्रेसचे अनेक नेते खानदानी पार्श्वभूमीचे होते, कोणी शहरी, तर कोणी बॅरिस्टर. त्यांना खेड्यांचा तितका स्पर्श नव्हता. सुरूवात आपल्यापासूनच केली पाहिजे. गांधींनी वर्धा जिल्ह्यातलं एक खेडं निवडलं ज्याचं नाव शेगाव (जे नंतर सेवाग्राम म्हणून ओळखले जाऊ लागले). शेगावची निवड करण्यामागे अनेक कारणे होती. ज्यांच्या आग्रहाखातर गांधींनी इथे आश्रम सुरू करायचे ठरवले, ते जमनालाल बजाज वर्ध्याचे. वर्ध्यापासून पायी जाण्यासारखं हे गाव होतं. मात्र तिथे जायला पक्का रस्ताही नव्हता. भारतातल्या अनेक सर्वसामान्य खेड्यांप्रमाणेच ते एक खेडे होते. त्याची विशेषता म्हणजे ते मुख्यतः दलित अस्पृश्य वस्तीचे गाव होते.
            १९३६ मध्ये राहण्यासाठी घरेही बांधली नसताना गांधी इथे रहायला लागले. आश्रमात कुटी बांधण्यासाठी गांधींनी मुन्नालाल शहांना काही सूचना दिल्या होत्या. १०० रूपयांमध्ये कुटी बांधून झाली पाहिजे. पाच मैलांच्या परिधीत जे सामान मिळेल ते वापरूनच कुटी बांधली पाहिजे. त्यामुळे त्यावेळी कुटी बांधताना लोखंड, सीमेंट अजिबात वापरले गेले नाही. अगदी दारांचे खटकेही लाकडांचेच बनवले गेले. योगायोगाने या गोष्टी आता environmental fashion म्हणून येऊ घातल्या आहेत.
            माझं लहानपण नंतर इथेच गेलं. गांधींच्या सोबतचे अनेक आश्रमवासी, गांधींचे पुत्र रामदासभाई व सून निर्मलाबहन त्यावेळी आश्रमात होते. मुन्नालाल शहांची मुलगी शाळेत माझ्या वर्गात होती. पण बापुकुटीकडं कसं पहावं हे सर्वांत प्रभावीपणे मला कोणी शिकवलं असेल तर इव्हान इलिच यांनी. १९७० च्या दशकातले इव्हान इलिच हे प्रमुख जागतिक चिंतक. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि संस्कृती या विषयांवरील त्यांची पुस्तके अतिशय landmark मानली जातात. इलिच तेव्हा भारतात आले होते. गांधींना भेटायला जायचं तर मला तयारी केली पाहिजे म्हणून पहिले सहा महिने वाराणासीला राहिले. भारत समजायचा तर मला भारताच्या भाषा आल्या पाहिजत म्हणून भारताच्या मूळ भाषा - संस्कृत आणि तामिळ शिकले. सहा महिन्यांनंतर १९८० च्या आसपास ते सेवाग्रामला आले. सात दिवस आश्रमात राहिले. सव्वा सहा फूट उंचीचा तो म्हातारा रोज बापुकुटीमध्ये जाउन बसायचा. मोठा विद्वान माणूस. आम्हाला त्यांच्याकडून काही ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सात दिवस काहीच बोलले नाहीत. सातव्या दिवशी त्यांनी जे 'The message of Bapukuti' हे भाषण केलं ते अद्भुत होतं. (ते भाषण इथे वाचता येऊ शकतं - http://www.mkgandhi.org/museum/msgofbapuhut.htm) ते म्हणाले, “मी सात दिवस जेव्हा बापुकुटीमध्ये बसून होतो, तेव्हा मी गांधींशी संवाद साधू शकलो. या कुटीचा साधेपणा मला खूप भावला. किती कमी गरजांमध्ये माणूस राहू शकतो याविषयी खूप मोठा संदेश ही बापुकुटी जगाला देत आहे.
            खरंच, गांधींसारखा माणूस, ज्याचा एक लक्ष लोकांसोबत परिचय होता, २० हजार लोकांशी नियमित पत्रव्यवहार होता (त्यातील अनेकांना ते स्वतःच्या हाताने पत्र लिहायचे. उजवा हात थकला तर डाव्या हाताने लिहायचे.), जो २०० जणांचा आश्रम चालवत आहे, देशाचं राजकारण नैतिककारण सांभाळत आहे, किती कमी सोयीसुविधांमध्ये राहू शकतो! त्यांचं सुंदर वाक्य आहे, 'मला जगाला दारिद्र्य नाही शिकवायचं. I want to convey to the world the beauty of the austerity and the slowness of the life.' टॉलस्टॉय ची कथा आहे ना, की माणसाला शेवटी साडे तीन हात जमीन लागते; तसेच माणसाला शेवटी घर किती मोठं लागतं, सामान किती लागतं? बापुकुटी त्याचं उत्तर देते.
            परचुरे शास्त्रींची कुटीही ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाची आहे. परचुरे शास्त्री पूर्वी साबरमती आश्रमात संस्कृत शिकवायचे. त्यांनी मुळशीच्या सत्याग्रहात भाग घेतला होता, जेलमध्ये गेले. त्या काळात त्यांना कुष्ठरोग झाला. त्यानंतर काही वर्षे ते पुण्यात राहिले. जेव्हा फार जास्त अंग गळायला लागले नातेवाईकांना त्रास होऊ लागला तेव्हा 'हिमालयात जाऊन मरून जाऊ' असा विचार करून तिकडे निघून गेले. तिकडे जेव्हा रोग वेदना खूप वाढल्या तेव्हा निरूपायाने शेवटचा आसरा म्हणून इथे गांधींकडे आले. गांधींची वाट पाहत एका झाडाखाली बसून होते. संध्याकाळी फिरायला जाताना गांधी तेथे येताच त्यांच्या पायाशी परचुरे शास्त्रींनी लोळणच घातले. गांधीनी त्यांना प्रथम ओळखलेच नाही. त्यांनी स्वतःची ओळख करून देताच गांधी स्तब्ध झाले. ते गांधींना म्हणाले, “बापू, शेवटचा आसरा म्हणून तुमच्याकडे आलो आहे. मला आसरा तरी द्या, नाही तर मरू तरी द्या."
            गांधींनी तेव्हा त्यांची तात्पुरती तिथेच सोय केली. त्यांना जेवण आणि ब्लॅंकेट दिले. गांधी आश्रमात आले, पण खूप अस्वस्थ होते. परचुरे शास्त्रींचे काय करायचे? कुष्ठरोग संसर्गजन्य रोग आहे. त्या काळात तर लोक कुष्ठरोगाला एवढे घाबरायचे की १०० फूटांवरही यायला तयार नाही व्हायचे. गांधींनी आश्रमवासीयांची मीटिंग घेतली. सर्वांना सांगितले, "परचुरे शास्त्री आले आहेत. आपलाच माणूस आहे. त्यांना आश्रमात घ्यायची मला इच्छा आहे. मी स्वतःला तर धोक्यात टाकू शकतो, पण तुम्हा सर्वांची परवानगी घेतल्याशिवाय मी त्यांना कसे आत घेऊ?" आश्रमवासीयांनी लगेच संमती दिली. त्यानंतर गांधींनी त्यांना आश्रमात घेतले. त्याकाळात कुष्ठरोगावर औषध नव्हते. गांधी स्वतः आपल्या हातांनी रोज परचुरे शास्त्रींची मालिश करायचे. भारतामध्ये भारतीय माणसाने कुष्ठरोगावर पहिलं काम केलं ते मनोहर दीवाण यांनी. बाबा आमटेंचंही कुष्ठरोगावरचं नंतर केलेलं काम खूप मोठं आहे. पण कुष्ठरोगाबद्दलचा stigma मोठ्या प्रमाणात गांधींमुळे मोडला गेला.
            ही समोरची महादेव कुटी. महादेवभाई गांधींचे मानसपुत्र, त्यांचे सेक्रेटरी. गांधींशी इतके एकरूप झालेले की कधी कधी गांधींच्या नावाने तेच संपादकीय लेख लिहायचे. गांधी एकदा तपासून घ्यायचे, पण सहसा त्यांना एकही अक्षर बदलावे लागायचे नाही. महादेवभाईंना गांधींचे मन जितके माहित होते, तितके कदाचित कस्तुरबांनाही माहित नव्हते. सेवाग्राम आश्रमात केवळ ब्रह्मचर्याची शपथ घेणारेच रहायचे, पण महादेवभाईंचे एकच कुटुंब त्याला अपवाद होते. येरवड्याच्या जेलमध्ये गांधींसोबत गेल्यानंतर सातच दिवसांत महादेवभाईंचे हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झाले. त्यावेळी बघणा-यांनी अतिशय करूण वर्णन करून ठेवले आहे. गांधी महादेवभाईंचे डोके मांडीवर घेऊन म्हणाले, "महादेव, तुम मेरे अज्ञा के बिना मरही नही सकते. महादेव, ऑंखे खोलो." गांधी अतिशय स्थितप्रज्ञ होते, पण महादेवभाईंच्या निधनाच्या वेळी ते जेवढे भावनाविवश झाले तेवढे कस्तरबांच्या निधनाच्या वेळीही झाले नाहीत. कस्तुरबा वृद्धपणात आजारामध्ये गेल्याने गांधींची मानसिक तयारी झाली होती.
            पुढे गांधींनी असे ठरवले की दलित-सवर्ण विवाह सोडल्यास कोणत्याही विवाहाला स्वतः जाऊन आशीर्वाद द्यायचा नाही. महादेवभाईंचा मुलगा नारायण देसाई, जे माझे गुरू. नारायणभाई म्हणजे तर गांधींचा नातूच, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेला. नारायणभाईंचे लग्न एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीशी ठरले. जातपात पाळली नाही तरी दुर्दैवाने दोघेही ब्राह्मणच होते. आता गांधींना कसं सांगावं की लग्नाला या? गांधींना आमंत्रण द्यायची हिंमत नारायणभाईंच्या आईला होईना. त्यांनी प्यारेलालजींकडून निरोप पाठवला, 'बापूको कहो, नारायण की शादी है. बापू शादी में आशीर्वाद देने जरूर आए, अपवाद करें.' गांधी म्हणाले, 'महादेव मेरा बेटाही था. तो नारायणभी मेराही है. इसिलिए मैं नही आऊंगा.' नाहीच, माझ्या घरच्या माणसासाठी तर मी अजिबातच अपवाद करू शकत नाही. तत्त्व लावायचं तर माझ्या घरापासून. त्याचे जास्तीत जास्त कष्ट मलाच झाले पाहिजेत.
            हे जे आदि निवास आहे, त्याबाबतीत एक interesting गोष्ट आहे. गांधी होते महाकंजूष. कोणताही खर्च करायचा, दहा रूपयांचा का असेना, सहजासहजी तयारच व्हायचे नाहीत. लोकांनी दिलेला पैसा, असा कसा खर्च करणार? या कुटीची सगळी दारं सुरूवातीला छोटी होती. गांधींच्या उंचीला ते चालून जायचे. खान अब्दुल गफार खान अनेकदा आश्रमात यायचे. त्यांची उंची साडे सहा फुट. त्यांना वाकून जावे लागायचे. एक दिवस गफलत झालीच. ते वाकायला विसरले आणि त्यांचे डोके दारावर आपटले. त्यांना -यापैकी लागलं, तेव्हा कुठे गांधींनी त्या दाराची उंची वाढवायला परवानगी दिली. खान अब्दुल गफार खान नॉर्थ वेस्ट फ्रंटीयरहून यायचे. तिथे सगळेच मांस खातात. ते आश्रमात यायचे तेव्हा गांधींनी त्यांच्यासाठी चक्क मांस मागवायला सांगितले. याला काय म्हणावं ते मला समजत नाही. शाकाहारी असण्याला अहिंसक म्हणायचे, का स्वतः कट्टर शाकाहारी असताना खान अब्दुल गफार खान यांना असह्य होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी मांस मागवण्याला अहिंसक म्हणायचे? आज गोमांसाबद्दल आपली काय भूमिका असावी? गाय मारू नयेच, पण माणूस मारावा का?
            माझे आई-वडील सेवाग्रामलाच थोडे दूर, चरखा संघात रहायचे. माझी आई मला सांगते की रोज आमच्या घरासमोरून गांधीजी चालत जायचे. हे ऐकून माझ्या अंगावर रोमांचच उभे राहतात. आपल्या घरासमोरून रोज गांधी जायचे! फक्त तेव्हा माझा जन्मच झाला नव्हता! माझ्या आयुष्यात दुसरं कोणतंच regret नाही. गांधी असताना माझा जन्म झाला नाही हे एकमेव मोठं regret आहे.
            मला वाटतं हा आश्रम बघताना प्रत्येकाने आपापल्या नजरेने पहावा, आपापल्या हृदयाने पहावा. माझा अनुभव असा आहे की प्रत्येक वेळी मी जेव्हा बापुकुटीत जातो, मी त्यांना भेटतो. अगदी खरंच सांगतो. इतके वर्ष असंख्य वेळा तिथे जाऊनही माझ्यावरचा बापुकुटीचा प्रभाव काही कमी होत नाही. There is some magic. You enter and the magic starts working on you. म्हणून काल २ ऑक्टोबरला आश्रमातील भाषणात मी सुचवलं की बापुकुटीत सार्वजनिक कार्यक्रमात जाता एकटं जायला पाहिजे; आणि बापूंसोबत appointment घेऊन जायला पाहिजे. ती appointment घेता येते. ती आपली स्वतःच घ्यावी लागते. आपणच ठरवतो, आणि तिथे जाऊन शांतपणे बसलं की बापूंसोबत भेट होते. तर प्रत्येकाने थोडी appointment घेऊन तिथे बसावं आणि गांधीला भेटावं.

नायना

(शब्दांकननिखिल जोशी)