'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 31 August 2015

खरंच दुष्काळ म्हणजे फक्त पाणी टंचाईच का ?

ताडोबाच्या जंगलात आपण वाघ बघायला जातो आणि त्यानिमित्ताने इतरही प्राणी दिसतात. त्याचप्रमाणे दुष्काळावर काम करण्याची प्रेरणा घेऊन दीड  महिना बीड जिल्ह्यातील नित्रुड येथे  गेलेल्या विकासवाघमोडेला (निर्माण ६) गावातील इतर समस्यांनीही अस्वस्थ केलं. विकासने त्यांना कसा प्रतिसाद दिला?
            दुष्काळ म्हटला की कडक उन्हाचा तडाका... भेगा पडलेले शेत... चातक पक्षाप्रमाणे ढगाकडे पावसाची वाट पाहत बसलेलाएक म्हातारा... अस चित्र रंगवलंजातं. झुंज दुष्काळाशीअभियानांतर्गत दोन महिने पूर्ण वेळ काम, आणि तेही ज्याला आपण महाराष्ट्रातील राजस्थान म्हणतो असा भाग..... मराठवाडा, आणि त्याच वाळवंटातील ज्याच्यावर ऊस तोडणीवाल्यांचा जिल्हाअसाशिक्का आहे, त्या बीड जिल्ह्यातील नित्रुड (ता. माजलगाव) या गावी काम केलं.काम करण्याआधी मला दुष्काळ विरुद्ध पाणी असंच वाटायचं. परंतु प्रत्यक्ष काम करताना माझी दुष्काळाविषयी संकल्पनाच बदलली.
            खरचं दुष्काळ म्हणजे फक्त पाणी टंचाईच का?” माझ्यामते खरंतर दुष्काळ म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव. मग तो रोजगाराचा असेल, शिक्षणाचा असेल, सरकारी योजनांचा असेल नाहीतर स्वत:च्याच गावामध्ये ऊस तोडणीनंतर परत आल्यावर न मिळणाऱ्या विकासाचा.१० एप्रिल २०१५, प्रथमच या भागात आलो आणि तेही काहीतरी आव्हानात्मक करायचं आहे असं ठरवून. गाव फिरताना सर्वत्र दिसली ती उदासीनता, बस स्टँडवर निवांत बसलेले लोक (वयोवृद्ध फक्त, कारण तरुण वर्ग ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झाला होता), शेतात दिसलं ते वाळलेलं कापसाच पीक. हे सर्व पाहताना मनात एकाच प्रश्नाचा कल्लोळ माजला.आपण खरंच स्वातंत्र्य झालोय का?” या लोकशाहीप्रधान देशात ज्या विकासाच्या योजनांसाठी एवढा अमाप पैसा खर्च केला जातो त्या योजना खरंच तळातील लोकांपर्यंत पोहचल्या असतील का?
            मग तेव्हाच ठरवलं सध्या ६० दिवस आपल्याकडे आहेत या ६० दिवसात किमान ६ समस्या तरी आपल्यापरीने समजून घेऊन त्यावर काहीतरी उपाययोजना करायच्या.एक समस्या सोडवायला घेतली आणि दुसरी समस्या दिसत गेली. रोजगार हमी योजना गावात सुरु करायची या एकाच समस्येवर भर दिला होता. आणि त्याच वेळी इतर समस्या दिसल्या.
            गावात फिरताना एक जाणवलं की दलित आणि मुस्लीम वस्तीमध्ये विकासाचा खूप अभाव दिसला.मग ठरवलं फक्त या दोन वस्तीमधील लोकांमध्ये जागृती करायची व येथीलच समस्या जाणून घ्यायच्या.मुस्लीम वस्तीमधील लोकांमध्ये जागृती करताना लोक जास्त संवाद करत नव्हते. गावी मस्जिदमध्ये नमाजसाठी जात असल्यामुळे येथे पण मस्जिदमध्ये गेलो. त्यामुळे नंतर जाणवलं की लोक दिसेल तिथे बोलायला लागले आणि खुल्यामनाने संवाद करायला लागले.  
            रोजगार हमी योजनेची बऱ्यापैकी जागृती केली, लोक स्वतः हून भेटायला लागले. गावातीलच एका जोडप्याने (बाळासाहेब व वर्षाताई आवाड)खूप मदत केली. रोहयोबाबत सरपंचांशी व ग्रामसेवकांशी बोलताना त्यांनी नकारात्मकता दाखवली, पण मग मी लोकांना रोजगाराची किती गरज आहे याबाबत सांगितले. पण म्हणतात ना सरकारी काम आणि सहा महिने थांबतसा अनुभव आलाच. ग्रामसेवक ते तहसीलदार सर्वांना भेटायला लागले.येऊ घातलेल्या पावसाळयामुळेकाम काही चालू झाले नाही फक्त कामाचे अंदाजपत्रक तयार झाले.
            रोहयो जागृतीसाठीच गावात फिरताना एका बाईने तिचे वीजबिल सांगितले रुपये १३००० ! मीतिचे वीजबिल पहिले तर त्यावर मीटरचा फोटोच नव्हता. मग वस्तीमधील बऱ्यापैकीलोकांची बिले पाहिली. तर गेल्या दोन वर्षात फक्त डिसेंबर महिन्यातीलच बिलावर फोटो होता. मग ऑनलाईन आणि कार्यालयात जाऊन तक्रार दिली.त्यानंतर कार्यालयाने ज्या ठेकेदाराला फोटो काढण्याचा ठेका दिला होता, त्याच्या जागी नवा ठेकेदार नेमल्याची माहिती दिली.
            PHC उपकेंद्र तर लसीकरणाव्यतिरिक्त चालूच नसायचे मग ऑनलाईन व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.या समस्येचं काय झालं हे प्रत्यक्ष पहायला मी गावात राहू शकलो नाही, पण हे उपकेंद्र अधूनमधून उघडू लागल्याचे लोकांच्या फोनवरून कळले.
            ऊसतोडणीसाठी स्थलांतर करावे लागते, त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा कसा होतो, शेतीचे नुकसान कसे होते व इतर ही बऱ्याच बाबी सांगितल्या. एका माणसाने विचारले, ‘जर गावातच रोजगार मिळालातर कशाला जाऊ ऊसतोडायला?’ ऊसतोडणीवरून गावाकडे परतताना अपघातामुळे एक बाई पूर्णपणे झोपून होती. मग जाणवले जर या बाईचा अपघाती विमा असता तर तिला पैसे मिळाले असते. त्याच वेळी पंतप्रधानांनी दोन विमा योजनांची घोषणा केली होती. त्याबाबत मग जागृती केली. चक्क लोकांनी दुसऱ्याच दिवशी बॅंकेमध्ये जाऊन पैसे भरले.
            मोबाइल सिमकार्ड हरवल्यामुळे F.I.R. साठी माजलगाव पोलीस ठाणेमध्ये गेलो. परंतु रुपये २०० ची मागणी केली गेली. मग १०० या टोल फ्री नंबरवरती फोन केला. परंतु फोन न लागल्यामुळे सरळ जिल्हा पोलीस प्रमुखांना (पोलीसअधीक्षक) फोन केला.मग काय लगेच F.I.R. ची कार्बन कॉफी मिळाली.
            कोर्ट फी स्टँप साठी सहाय्यक दुय्यम उपनिबंधक कार्यालयात गेलो होतो. स्टँप वेंडर म्हणाले,‘रुपये १० चा एक स्टँप घेतला तर तो रुपये १५ ला मिळेल आणि ५ घेतले तर रुपये ६० होतील.मग सारथी या मुद्रांक विभागाच्या टोल फ्री नंबरला फोन केला व एक R.T.I. अर्ज दिला. परत काही दिवसांनी गेलो आणि स्टँप मागितले तर मग जेवढ्या रुपयांना होते तेवढ्यास दिले. समस्या सोडवता सोडवता मला यासर्वबाबीवरून एकच समजले की, समस्या म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सृजनशीलतेचा अभावच आहे.
२४ जुलैच्या लोकमत दैनिकाच्या ऑक्सिजन पुरवणीत आलेली ही बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..
स्रोत: विकास वाघमोडे, waghmodevikas@gmail.com


रवींद्रचा गावातील दारू विरुद्ध लढा . . .

गडचिरोली मधील चिंतलपेठ या छोट्याश्या गावात राहणारा रवींद्र चुनारकर (निर्माण ६) गेले काही महिने सातत्याने गावातील दारूबंदीच्या प्रश्नावर काम करत आहे. या उलाढालीत त्याला आलेले अनुभव त्याच्याच शब्दात -
            “हा प्रयोग आहे गावातील कुप्रवृत्तीच्या विरोधात बंड पुकारण्याचा! अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ हे ४०० लोकवस्तीच गाव. गावातील एकूण पुरुषांच्या ८० ते ९० टक्के लोक दारू पिणारे, ३० ते ४० टक्के लोक जुगार खेळणारे. एकंदरीत विकासाच्या आणि विचारांच्या  दृष्टीने खूप मागासलेलं गाव...
            मी पण याच गावचा रहिवासी, शिक्षणासाठी शहरात आलेला. मी जेव्हा गावाबद्दलचा विचार करायचो, तेव्हा गावात चालू असलेल्या कुप्रथा मला सापासारख्या डसायच्या. मग मी सारी शक्ती एकवटून निर्धार करायचो की गावात गेल्यावर या बद्दल काहीतरी करायच. पण जस गावात जातो तशी माझी सारी शक्ती नष्ट व्हायची. एक तर कुणालाच या प्रश्नाबद्दल काही वाटत नव्हते, त्यामुळे लोकांना माझं म्हणण पटवून देण खूप कठीण काम होत. आणि नेमकं म्हणजे लोकांची दारूवर इतकी श्रद्धा असते की त्यांना दारू विरुद्ध काही ऐकायचं नसत... म्हणूनच एक गोष्ट स्पष्ट होती, ती म्हणजे लोकांची दारू पिणे सोडवणे शक्य नव्हत! पण हातभट्टीवरील दारू काढणे आणि विकणे मात्र बंद केल्या जाऊ शकले असते...
            डिसेंबर २०१४ ला मी ही कल्पना गावातील चार मित्रांसमोर मांडली. त्यांचा नकार नव्हता, पण त्यांना विश्वास नव्हता की हे आम्ही करू शकू. कारण गावातील महिलांनी दोनदा दारूबंदीचा प्रयत्न केला होता पण तो व्यर्थ ठरला... त्यामुळे आम्हाला हे काम वेगळ्या पद्धतीने करावे लागणार होते. मी पहिले गावातील दारू पिणारे व जुगार खेळणाऱ्यांची संख्या काढली. प्रत्येक घरातून महिन्याला किती रुपये खर्च होतात त्याचा लेखी डाटा तयार केला. पण त्या महिन्यात आम्ही त्याचे फार काही करू शकलो नाहीत.  
            जानेवारी मध्ये निर्माणचा पहिला कॅम्प झाला. माझ्यासारखे बरेच पागल मला तिथे भेटले. आणि खूप आत्मविश्वास आला. सगळ्यात प्रेरणादायी भेट म्हणजे संतोष गवळे (निर्माण २ चा संतोष आणि त्याची पत्नी जयश्री मन्याळी या त्यांच्या गावात राहून ग्रामसुधारणेचे काम करतात) यांची. त्यांच्याकडून खूप माहिती मीळाली. तेव्हा मला वाटायला लागल की मी हे दारूबंदीच काम करू शकतो आणि गावात गेल्या-गेल्या काम सुरु केल. मी माझ्या त्याच मित्रांना पुन्हा या विषयी बोललो. आम्ही जेमतेम सात मुले होतो. ते म्हणाले की, आपण सात जणच हे काम करण्यापेक्षा गावातील आणखी मुलांना विचारू... माझ्या गावाला पूर्ण फेरफटका मारायला पंधरा मिनटे लागतात, आम्ही असाच फेरफटका मारत मुलांना जमवू लागलो. पंधरा मिनिटांनी आमच्या सोबत ४१ मुले होती. म्हणजे ६०% घरातील कुणी-ना-कुणी होतेच. आम्ही निवेदन पत्र लिहिलं आणि सगळ्या गावाची भव्य मिटिंग घेतली, आणि त्यात आम्ही आमची बाजू मांडली. गावकऱ्यांनी होकार दिला, चार दिवसांची सवलत देऊन दारू पूर्णपणे बंद करण्याच आवाहन केल. आम्ही दहा मुलांची नावं गावच्या ग्रामसुरक्षा दलामध्ये दिली.
            आम्ही खूप खुश होतो कारण आमच्या मनासारखं सगळ झाल होत आणि खूप सहज रीतीने. पण आम्ही नाण्याच्या दुसऱ्या बाजूने विचार केला नव्हता... त्याच कारण नंतर कळाल! आम्ही सगळी मुलं जेमतेम वीस-ते-बावीस वर्षांची. दारू काढणाऱ्या लोकांना असे वाटत होते की आम्ही काहीतरी पोरखेळ करत आहोत, ही मुले काय बंद करणार दारू, थोडे दिवस मागे लागतील आणि सोडून देतील.
            एक महिना जवळ-जवळ ६०ते ७० टक्के दारू बंद होती. पण हळू -हळू परिस्थिती हातातून सुटू लागली कारण दारू काढणारे परत लपून-छपून दारू काढू लागले. आम्ही पुन्हा एकदा पूर्ण गावाची सभा घेतली, पण या वेळी मात्र चित्र बदललेलं होत. लोक आमच्या विरोधात बोलू लागले, तुम्ही  शिक्षणाकडे लक्ष द्या, असे म्हणून आमचे मनोबल खचऊ लागले. आम्हा मुलांमध्ये एक-दोन खूप आक्रमक आहेत त्याना खूप राग आला व ते म्हणाले की आम्हाला ज्यांवर शक आहे त्याच्या घराची झडती घेणार. ते त्या लोकांच्या घराकडे धाऊ लागले. आणि नको होत तेच झाल, मुले त्यांच्या घरात घुसली नाहीत तरीही त्या माणसाने आम्हाला खूप घाण-घाण शिव्या घातल्या, आणि मला तर खूपच खराब शिव्या दिल्या, आणि म्हणू लागला की माझ्या घरातील साठ हजार रुपये चोरीला गेले अशी मी केस करणार. मुले घाबरली नाहीत कारण आम्ही काहीच चुकीच केल नव्हत. पण तो केस करणार मग काय करायचं हा प्रश्न पडला. पण आमच्या सुदैवानी तीन महिन्या अगोदर त्या माणसावर जंगलातील प्राणी मारण्यावरून केस झाली होती आणि तो पैसे देऊन सुटला होता, आम्हाला सगळ माहित होत म्हणून मी त्याच्या मुलाला जाऊन भेटलो व सांगितलं की बाबांना समजावून सांग नाहीतर आम्ही मागील केस रीओपेन करणार. आमच्यावर केस झाली नाही...
            पण एक गोष्ट मात्र कळाली की या प्रकारचे धोरण सुरु करणे सोपे असते पण ते टिकून ठेवणे खूप कठीण असते . ४०० लोकांच्या गावात जर हे काम करायला इतक्या अडचणी येत असतील तर पूर्ण जिल्हा दारूमुक्त ठेवणे, खरच खूप मोठ प्रश्नचिन्ह उभ राहात... आणि पूर्ण महाराष्ट्र दारू मुक्त करण्याचे स्वप्नच बघू नये अस वाटत... पण आव्हानांना घाबरतील ते तरुण कसले!” 

स्रोत: रवींद्र चुनारकर, chunarkarravi@gmail.com

पुस्तक परिचय: Man's search for meaning


            व्हिक्टर फ्रँकल हा स्ट्रियन ज्यू मनोवैद्यानिक. दुसऱ्या महायुद्घाच्या काळात त्याला Auschwitz इथल्या नाझी छळछावणीत राहाव लागल. तिथल्या त्याच्या अनुभवांवर आधारलेल हे पुस्तक आहे. छळछावणीतील अमानुषपणा, निर्दयता, प्रचंड कष्ट, उद्या जिवंत राहू की नाही याबद्दलची अनिच्शितता यामुळे अनेकांनी जगण्याची आशा सोडली. काहींनी आत्महत्येच्या मार्गाने मृत्यूला जवळ केल. या परिस्थीतीतही ज्या माणसांनी तग धरला त्यांना का बरं जगावस वाटल? याचा एक मनोवैद्यानिक म्हणून आणि छावणीतील एक कैदी म्हणून व्हिक्टर फ्रँकल ने घेतलेला शोध हा या पुस्तकाचा विषय आहे.
            पुस्तकाच्या पहिल्या भागात फ्रँकलने छळछावणीतील रोजचं आयुष्य कस होत आणि त्याचा स्वतःवर आणि छावणीतल्या इतर कैद्यांच्या मनस्थितीवर काय परिणाम होत होता हे सांगीतलय. छळ छावणी मधील वातावरण, दिनक्रम, रोजची उपासमार, गार्डसचा क्रूरपणा, रोग्यांच्या साठी, मरेस्तोर काम आणि काम करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी गॅस चेंबर; या सगळ्याचं हृद्यद्रावक वर्णन फ्रँकल ने केलंय. छावणीत आल्यावर पहिल्यांदा कैद्यांना प्रचंड मानसिक धक्का बसत असे. त्यानंतर तिथल्या आयुष्याशी जुळवून घेताना हळूहळू ते भावनाशून्य होत, त्यांच्यातील सहवेदना हरवून जाई आणि जगण हे एकच उद्दिष्ट त्यांच्या आयुष्यात राही. जे कोणी जिवंत राहू शकले आणि महायुद्धानंतर छळ छावणीतून सुटले त्यांना प्रचंड नैराश्य आले, नैतिक र्हास झाला आणि त्यांचे माणूसपण हरवत गेले..
            फ्रँकलने स्वतः हे अनुभवल्याने त्याच्या अनुभवात एक सच्चेपणा आहे. फ्रँकलला असं आढळल की तिथल्या हालाखीच्या परिस्थितीतही ते लोक तग धरू शकले ज्यांच्या जगण्याला काही उद्दिष्ट होत. कोणाला आपले अपुरे राहिलेले संशोधन कार्य पूर्ण करायचे होते कोणाला भविष्यात आपल्या पत्नी व मुलांची काळजी घ्यायची होती. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना जगावस वाटत होत आणि त्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टांमध्येही त्यांना अर्थ वाटत होता.
            फ्रँकल म्हणतो की जेव्हा तुम्ही परिस्थती बदलू शकत नाही तेव्हा तुम्हाला स्वतःला बदलाव लागत. तुम्ही माणसाकडून सार काही हिरावून घेवू शकता पण आलेल्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं त्याच स्वातंत्र्य हिरावून घेवू शकत नाही. ( to choose one’s attitude in any given set of circumstances). फ्रेड्रिक नित्शे च्या एका विधानाचा उल्लेख फ्रँकल ने केलाय - "He who knows why of living can bear almost any how".
फ्रँकलने यावरून काढलेला निष्कर्ष हा की - जगण्याचा अर्थ शोधण्याची इच्छा ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात फ्रँकलने, त्याने विकसित केलेली जगण्याचा अर्थ शोधण्यावर आधारीत मानसोपचार पद्धत logotherapy, उपचारासाठी त्याने तिचा वापर कसा केला आणि जगण्याच्या अर्थाबद्दलच्या त्याच्या संकल्पनांबद्दल सांगितलय.
            माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात असताना मला हे पुस्तक मिळाले. जीवनाचा अर्थ काय आहे किंवा कसा असावा या प्रश्नांची रेडीमेड उत्तर या पुस्तकात मिळत नाहीत. पण जीवनाला अर्थ का असावा आणि तो कसा शोधावा या प्रश्नांची उत्तर शोधायला हे पुस्तक वाचून मदत झाली. फ्रँकलने जगण्याचा अर्थ शोधण्याविषयी पुस्तकात एक छान वाक्य लिहीलाय ज्याचा उपयोग मला माझ्या प्रश्नचं उत्तर शोधताना होतोय.
            “We needed to stop asking about the meaning of life, and instead to think of ourselves as those who were being questioned by life—daily and hourly. Our answer must consist, not in talk and meditation, but in right action and in right conduct. Life ultimately means taking the responsibility to find the right answer to its problems and to fulfil the tasks which it constantly sets for each individual.

स्रोत: सम्मित वर्तक,  sammitdvartak@gmail.com