निर्माण ४
ची आरती बंग, सप्टेंबर २०१६ पासून सर्च मधील मां
दंतेश्वरी रुग्णालयात मानसोपचारतज्ञ म्हणून काम करत आहे. तिच्या रूपाने सर्चला व परिणामी गडचिरोली जिल्ह्याला पूर्णवेळ मानसोपचारतज्ञ
मिळाली आहे. तिच्या OPD सोबतच ती ‘सर्च’मधील
व्यसनमुक्ती केंद्राचेदेखील काम सांभाळते.
तिचा मागील एक वर्षात झालेला प्रवास वाचूया..
“मला तुम्हा सर्वांना माझ्या या एक वर्षाचा ‘सर्च’मध्ये काम करायला सुरुवात केल्यापासूनचा प्रवास
सांगायला आवडेल. आणि हा प्रवास मला आलेल्या काही अनुभवांमधून सांगणं अधिक परिणामकारक होईल.
मला आलेले काही अनुभव
अतिशय उत्कट होते, प्रसंगी
अनेक रुग्णांनी मला त्यांच्या आयुष्यातल्या अतिशय व्यक्तिगत गोष्टी सांगितल्या
आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे.
मी ५ सप्टेंबर २०१६ पासून माझ्या कामाला सुरुवात केली. माझ्या
आधी ‘सर्च’मध्ये केवळ महिन्यातून एकदा मानसिक आरोग्यासंबंधी O.P.D
आणि I.P.D असे,
त्यामुळे साहजिकच रुग्णांची संख्या महिन्याला ५०-७० रुग्ण
एवढीच होती. त्यामुळे
इथे आल्यावर सर्वप्रथम ही संख्या अजून कशी वाढेल या संदर्भात लक्ष देण्याचं काम मला
सोपवण्यात आलं. पण त्याचबरोबर हॉस्पिटलची O.P.D,
I.P.D किंवा
emergencies हे देखील मी पहावं असा
सल्ला मला अम्मांनी दिला. कारण मानसिक रुग्णांची संख्या सुरवातीला कमीच असणार होती.
माझं आठवड्याचं काम हे
विभागलेलं असतं. आठवड्यातले
तीन दिवस मी सर्च हॉस्पिटलला देते आणि उरलेले तीन दिवस व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काम
करते. तसंच नायनांनी माझी ‘संकल्प’ या पोलीसांसाठी असलेल्या व्यसनमुक्ती प्रकल्पाची ‘तांत्रिक सल्लागार’ म्हणून नियुक्ती
केली होती. खरं सांगायचं तर लहान मुलांसोबत काम करावं या उद्देशाने मी मानसरोगशास्त्र निवडलं होतं.
त्यामुळे सुरुवातीला मी याबाबत थोडी साशंक होते.
सुरुवातीला मला या कामात
अजिबात रस नव्हता. जेव्हा मी मानसशास्त्राची रेसिडेन्सी करत होते, त्यामध्ये व्यसनमुक्ती हा
एक छोटासा भाग होता. प्रत्येक रुग्णासाठी साधारणपणे फक्त १०- १५ मिनिटं असायचे कारण त्यामध्ये
फक्त ७ ते
८ प्रश्न
त्या रुग्णासंदर्भात विचारायचे असायचे. तसंच त्या
रुग्णांमधल्या withdrawal management संदर्भातले औषधोपचार एवढ्यापुरताच आमचा अभ्यासक्रम मर्यादित
होता.
एक दिवस एक रुग्ण माझ्याकडे आला. त्याला दारूचं व्यसन होतं.
या आधी त्याने बऱ्याच
डॉक्टर्सचा सल्ला घेतला, टेस्टस्
देखील करून झाल्या होत्या. टेस्ट्समध्ये vascular
necrosis of femur head असं निदान झालं होतं. आणि
त्याला माझ्याकडे पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी तो त्याच्या व्यसनाबद्दल काहीच बोलत नव्हता.
त्याच्या पायाच्या
दुखण्याबाबत तक्रार होती की कसं ते दुखणं थांबत नाहीये वगैरे.
ते ऐकून मी त्याला विचारायला सुरुवात केली की कुठे
अपघात झाला का, दारूच्या
नशेत कुठे पडला होतात का. पण या सगळ्यावर त्याचं ‘नाही’ हे एकच उत्तर होतं.
त्याच्याबरोबर त्याचा एक
नातेवाईकदेखील आला होता. त्याला
देखील मी विचारलं तेव्हा तो त्या रुग्णाला म्हणाला की ‘सांग
ना की त्या दिवसापासून तुला दुखायला लागलं होतं म्हणून’. पण
त्यावर सुद्धा त्या रुग्णाचा ठाम नकार होता.
मी अगदी खोदून विचारल्यावर
त्याने शेवटी सांगितलं की एका लग्नाच्या वेळी तो दारू प्यायला होता आणि दारूच्या
नशेत खूप उकडत होतं म्हणून तो जवळपास २-३ तास चक्क बर्फाच्या लादीवर
झोपला. सुरवातीला
एवढं दुखणं नव्हतं म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. पण शेवटी ते फारच
वाढल्यामुळे तो उपचारासाठी आला होता. हे ऐकून मी पूर्ण हादरले. मला हे खूपच
विचित्र वाटलं की उकडतंय म्हणून कोणी बर्फाच्या लादीवर कसं काय झोपू शकतं?
त्या घटनेनंतर मी विचार करायला सुरुवात केली की दारू
कोणी गरज म्हणून पीतं का? आणि काही काळानंतर त्याचं व्यसन कसं होतं?
मला withdrawal
management चं अतिशय चांगलं ट्रेनिंग
मिळालं होतं. त्यामुळे मला असा विश्वास होता की रुग्ण withdrawal
मध्ये जाणार नाही.
काही काळानंतर रुग्णदेखील
वाढायला लागले. पण कधीकधी असं व्हायला लागलं की पंधरा
दिवस रुग्ण नीट राहत होता, त्यानंतर परत दारू प्यायला सुरुवात करत असे. याबाबत
मग रुग्णाचे नातेवाईक तक्रार करत असत. या सगळ्या मुद्यांशी माझा थेट संबंध आला नव्हता. कारण
त्यावेळी एक रेसिडेंट डॉक्टर म्हणून अनेक लोकांची टीम मला दिली होती.
त्यामुळे औषध सांगून मी
रुग्णांना माझ्या टीमकडे पाठवत असे. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की
माझ्याकडे relapse management, trigger management, व्यसनाधीन
रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या समुपदेशनाची कुठली विशिष्ट पद्धत आणि
कौशल्य नाहीयेत. हे सगळं मला माहित नव्हतं ही सगळ्यात योग्य गोष्ट तेव्हा माझ्यासोबत घडली. त्यामुळे
मी त्यावर बरंच वाचन केलं, या
क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बऱ्याच संस्थांना भेटी दिल्या.
आणि त्या वेळी माझ्या असं
लक्षात आलं की हा फक्त एक भाग नसून एक पूर्ण वेगळं क्षेत्र आहे आणि ते
अतिशय आव्हानात्मक आहे. त्यानंतर मी या गोष्टींवर अधिक सखोलपणे काम करायला सुरुवात केली.
तसंच अनेक गुंतागुंतीच्या
केसेस घेऊन रुग्ण यायला लागले. पण जेव्हा एखादा रुग्ण परत प्यायला लागतो, त्याचा या व्यसनाला लोक
पाप समजतात, त्यांना
वाटतं की तो बनाव करतोय किंवा खोटं बोलतोय.
यासंदर्भात मला असा प्रश्न
पडायला लागला, की व्यसन हे मानसिक HIV सारखं आहे का? या सगळ्या गोष्टींमुळे या काळामध्ये माझा खूप मानसिक विकास
झाला. तसंच फक्त औषधोपचार आणि समुपदेशन या गोष्टी काम करू शकत नाहीत ही गोष्ट
व्यसनमुक्तीबाबत माझ्या लक्षात आली.
यानंतर इथे मला एक १७
वर्षाच्या मुलाचा अनुभव नमूद करावासा वाटतो, साधारणपणे माझ्या OPD मध्ये आमच्या नर्सेस कधीच एखाद्या रुग्णाला आधी तपासा किंवा
एखाद्या रुग्णाला नंतर तपासा अशी शिफारस करत नाहीत.
पण एके दिवशी आमच्या एक
सिस्टरने तुम्हाला हा रुग्ण आधी घ्यावाच लागेल असं सांगितलं.
त्यावेळी हा १७
वर्षांचा मुलगा रोशन (नाव बदलेले आहे), आपल्या वडिलांसोबत आणि भावासोबत आला होता. अतिशय
अव्यवस्थित आणि कुणालाही न जुमानणारा असं एकंदरीत त्याचं रूप होतं.
त्याचे भाऊ आणि वडीलसुद्धा
अतिशय वैतागलेले दिसत होते. तो bipolar
disorder चा रुग्ण आहे हे मला बघूनच
कळालं. अतिशय वाईट भाषेत बोलत होता, मला
वाईट नजरेने निरखत होता. त्याची ती असभ्य वागणूक बघून त्याच्या वडिलांच्या डोळ्यात
अक्षरशः पाणी आलं. आणि माझ्या समोर त्यांनी त्याच्या थोबाडीत मारली.
त्याला असा रोग झाला आहे
म्हणून तो असं वागतोय, त्यामुळे
मारून काही होणार नाही असं मी त्यांच्या वडिलांना सांगितलं गावातल्या अनेकांशी
मारामारी झाली असल्याने त्याच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या.
त्यामुळे आम्ही त्याला
अॅडमिट करून घेतलं. आणि ज्यादिवशी अॅडमिट करून घेतलं त्यानंतरचे काही दिवस
हॉस्पिटल स्टाफसाठी अतिशय वाईट होते. त्यांनी अशा प्रकारचा रुग्ण कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे
त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आम्हाला त्याला sedatives
द्यायला लागले. त्यानंतर जवळपास १५ ते २० दिवस तो आमच्याजवळ होता. त्यादिवसात त्याने खूप गोंधळ घातला.
१५ दिवसांनी
देखील त्याच्यामध्ये केवळ ६०%
पर्यंत सुधारणा झाली होती.
पण ५-६ follow
ups नंतर मात्र त्याच्यामध्ये जवळपास ९५% सुधारणा
झाली. एवढ्या दिवसांच्या येण्या-जाण्याने त्याच्या वडिलांमध्ये आमच्याबद्दल एक विश्वास तयार
झाला होता. त्यामुळे एके दिवशी मी त्याच्या
वडिलांना विचारलं, “काय
हो, तुम्ही याला या आधीच
माझ्याकडे का नाही आणलं? एवढा उशीर का लावला?” ते म्हणाले, “आधी बाबा-तांत्रिककडे नेलं. मग काहीच फरक पडला नाही
म्हणून चंद्रपूरच्या एका दवाखान्यात दाखवलं.
तरी काहीच फरक पडला नाही.
यात दोन महिने गेले.” या मुलाच्या वडिलांनी आपली
शेती, बैल
विकून या मुलाच्या उपचारासाठी या दोन महिन्यात जवळपास सत्तर हजार रुपये खर्च केले
होते. पण त्यांना त्याचं काही दुःख नव्हतं.
“जाऊ
द्या नं मॅडम, पैसे गेले तर गेले.
पण माझा एकुलता एक मुलगा तर ठीक झाला नं.” विचित्र झालेला मुलगा नीट झाल्याचं त्यांना जास्त समाधान
होतं. समाजामध्ये एखाद्या गोष्टीसाठी सेवा उपलब्ध असणं आणि त्यामुळे ठीक होणं हीच खूप मोठी गोष्ट
समजली जाते, ही किती दुर्दैवाची बाब आहे. २०-३० वर्षांपूर्वीपासून
मानसरोगशास्त्राच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत. तरी पण इकडे अजून साध्या सुविधादेखील उपलब्ध नाहीत.
हे कितपत बरोबर आहे?
रोशनच्या केसमुळे मला त्यावेळी अनेक प्रश्न पडले. रोशन आजारी पडल्यापासून ते तो माझ्याकडे येईपर्यंत त्याला अनेक health
care providers मिळाले जे की त्याच्या
उपयोगात आले नाहीत. म्हणून प्रश्न असा पडतो की मानसिक
आजार उद्भवण्यापासून ते त्या व्यक्तीला योग्य निदान आणि त्यावरचा उपचार मिळण्याच्या
प्रक्रियेत कुठले अडथळे येऊ शकतात. एक तर म्हणजे आपल्या देशात मानसोपचारतज्ञांची संख्या फार कमी, म्हणजे जवळपास ४०००, आहे. दुसरं म्हणजे मानसिक आरोग्याच्या परवडतील अशा सुविधाच नाहीत. म्हणूनच
एक प्रभावी आणि परवडेल अशी मेंटल हेल्थ केअर सिस्टीम कशी उभारता येईल हा सध्या माझ्या समोर असलेला सर्वात
मोठा प्रश्न आहे.
यानंतर मला सांगावासा
वाटेल तो अनुभव म्हणजे एका ३५ वर्षीय विवाहित बंगाली महिलेचा.
तिच्या मुख्य तक्रारी
म्हणजे जीव घाबरणे आणि डोकं दुखणे. तिला निदान
झालं ते Anxiety Disorder चं. त्यावर मी तिला तिच्या
काळजीचे कारण विचारले. पण खूप विचारूनही मला ठोस असं psycho stressor मिळालं नाही. तेव्हा मी नायनांना-अम्मांना ह्या केसबद्दल सांगितलं. त्यांच्याशी बोलून मला कळालं की तिच्या
बंगाली असण्याचा आणि तिच्या आजाराचा कुठेतरी संबंध आहे.
बंगाली असल्यामुळे ती तिच्या भावना मला तितक्या प्रभावीपणे सांगू शकत नव्हती. कारण
तिची भाषा, संस्कृती
हे वेगळी आहे. तसेच
तिचं स्थलांतरीत असणं हाच तिच्यासाठी एक मोठा मानसिक आणि सामाजिक प्रश्न
होता. हे सगळं Psycho Social Psychiatry मध्ये मोडतं. तेव्हापासून मी यावर बरंच वाचन केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की
प्रत्येक सामाजिक घटकांची स्वतःला व्यक्त करण्याची भाषा असते.
हे सगळं खूप
गमतीशीर आहे की तुम्ही कसं समाजाची विचारधारा व त्यांच्या अस्वस्थतेची
भाषा समजून घेता व ते कसं तुमच्या आजारांविषयच्या माहितीत भर टाकतात.
मानसिक आजार व्यक्त करण्याच्या पद्धती हे स्वतःमध्ये एक संशोधनाचा विषय आहे.
२०१५ मध्ये
झालेल्या GBD studies मध्ये भारताचा मानसिक आजारांचा YLD
(Years of Life Lived with Disability) हा
जवळपास १५-२०% आहे. तोच ऑस्ट्रेलियात ३२% तर अमेरिकेत २८% आहे. आपण त्या दिशेने वाटचाल करत आहोत. आणि या १५-२०% मधील ४०% प्रमाण Anxiety
Disorders चं आहे. म्हणजेच
फक्त पाहिल्यावर असं वाटतं की तो व्यक्ती पूर्णपणे बरा आहे, त्याला कुठलाच मानसिक त्रास नाही.
परंतु तसं बऱ्याचदा नसतं. तो
त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही.
म्हणूनच Anxiety
Disorders माझ्यासाठी एक पूर्णपणे
नवीन गोष्ट होती.
एकदा एक लहान मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत आला होता. त्यांची तक्रार अशी होती की तो
दिवसभर बडबड करत राहतो, मित्रांबरोबर खेळणं बंद केलंय, खातपीत नाही,
शून्यात बघत राहतो.
त्याची आई त्याचा त्रास
बघून तर रडायलाच लागली. हा असाच राहील याची
त्यांना भीती होती. दोन तीन ठिकाणी जाऊन सुद्धा काहीच उपयोग झाला नव्हता.
त्याला Depression
with Psychotic Features असं मी
निदान केलं. आणि योग्य तो उपचार केला. दुसऱ्या फॉलोअपपर्यंत त्याची ४०-५०% सुधारणा झाली होती. तरी पण तो पहिल्यासारखा झालेला नव्हता. त्यांच्या घरच्यांची या बाबतीत कौन्सिलींग झाली होती.
हीच केस जर रेसिडेन्सी करत
असताना माझ्या पुढे आली असती तर ती माझ्या सिनिअर्सनी बघितली असती.
कारण तसा प्रोटोकॉलच असतो.
कारण अशा केसेस
गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे सुरवातीचे ४-५ महिने याबाबतीत माझा
आत्मविश्वास कमी होता. त्याला काही नुकसान होऊ नये ही भीती
होती. पण मी यावर विचार केल्यावर असं लक्षात आलं की त्याचं
जे काही भलं व्हायचंय ते इथेच होणार आहे.
कारण आख्या गडचिरोलीत दुसरं कोणी
मानसोपचारतज्ञच नाहीये. आणि नागपूरला जाणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणून मी
माझीच कौशल्ये वाढवायचा प्रयत्न करू लागले.
काही गुंतागुंतीच्या
केसेसबद्दल मी योगेशदादा (डॉ. योगेश
कालकोंडे) बरोबर चर्चा केली. सोबतच
भरपूर रिसर्च पेपर्स वाचले. आणि या १०-११ महिन्याच्या शेवटी मला
असं वाटतं की मी आता पेशंट्सना चांगल्या पद्धतीने उपचार देऊ शकते.
दुसरी शिकण्यासारखी गोष्ट
म्हणजे Patient Expectancy Management. त्यांच्या आजाराच्या सुधारणेबाबत काही संकल्पना असतात. त्या पूर्ण नाही केल्या तर ते नाराज होतात आणि
नातेवाईकांची चिडचिड होते. मला माझ्या विषयात आवडणारी गोष्ट म्हणजे कामातील, मला भेटणाऱ्या लोकांची
विविधता. जसे की ‘संकल्प’मध्ये करत असलेलं पर्यवेक्षण, क्लिनिकमध्ये होत असलेलं निदान, RCT
मध्ये होणारा रिसर्च.
एकंदरीत हे सगळं करण्यात खूप उत्साह येतो. कधीकधी खूप दुर्मिळ आजार जसे की Autoimmune
Encephalitis चे पेशंट्स येतात. अशांवर
उपचार करण्यात वेगळाच आनंद मिळतो. दुसरी गोष्ट जी आनंद देऊन जाते ती म्हणजे अशा गरज असलेल्या
ठिकाणी सेवा देणं. गडचिरोलीतल्या
पेशंट्ससाठी मी ना सोशल क्लासमध्ये मोडते ना इकॉनॉमिक क्लासमध्ये. तरीही
जेव्हा एक व्यक्ती येऊन माझ्याकडे त्यांच्या अत्यंत खासगी असुरक्षितता,
त्यांचे दुःख मला सांगतात तेव्हा मला खूप honoured
वाटतं. कारण एकतर ते खूप धाडसी असावेत किंवा त्यांना असलेला मानसिक त्रास खूप मोठा
असावा. म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये माझं ‘तो’ एक व्यक्ती म्हणून असणं मला खूप
महत्त्वाचं वाटतं. हा खरच खूप सुंदर अनुभव
आहे. स्वतःच्या करिअरबद्दलची काळजी
मला त्यांच्या तुलनेत क्षुल्लक वाटते.
सर्चमध्ये काम करत असताना इथल्या शिस्त आणि जबाबदारीने (Responsibility & Accountability) मला खूप शिकवलं. प्रत्येक
१५ दिवसात आम्हाला रिपोर्ट तयार करावा लागतो.
अशाप्रकारे Mental
Health OPD चं काम चालू आहे. खेड्यातल्या जीवनाबद्दलच्या माझ्या ज्या कल्पना होत्या त्या
वास्तवापेक्षा खूप वेगळ्या होत्या हे मला इथे येऊन कळालं. इथे
मानसिक आरोग्याची स्थिती ही खरंतर
शहरापेक्षा वाईट आहे.
त्याला कारण म्हणजे एकतर
इथे मानसोपचारतज्ञांची कमतरता आहे आणि दुसरं म्हणजे बदलणारी जीवनशैली. एकविसाव्या शतकाची येऊ
घातलेली आधुनिकता आणि प्रचंड गरिबी यामध्ये इथे
संघर्ष निर्माण झाला आहे. हेच लोकांच्या काळजीचे मुख्य कारण आहे.
आणि मला हे सुद्धा
सांगायला आवडेल की मला सर्चमध्ये नायना,
अम्मा, योगेश दादा आणि अमृत यांच्या रुपात खूप चांगले गुरु
मिळाले. जेव्हा मी अम्मा आणि नायना यांना
बघते तेव्हा मला दोन अत्यंत हुशार डॉक्टर्स दिसतात, जे आजपर्यंत केवळ ३०,००० रुपये महिना पगार घेऊन अशा भागात काम करत आहेत.
जेव्हा मी नायनांना बघते
तेव्हा मी त्यांच्यात एक अशी व्यक्ती बघते,
जिने ठरवलं
असतं तर, WHO किंवा Johns
Hopkins चे डायरेक्टर होऊ शकली
असती. पण रोज सकाळी ५ ला उठून मला ते गडचिरोलीमधल्या आपल्या ऑफिसला जाताना
दिसतात. आताच मी एका Mental Health
Conference ला भेट दिली. मानसोपचारशास्त्रातील
अत्यंत नामांकित नाव म्हणजे डॉ. विक्रम पटेल, हे
जेव्हा नायनांना श्रेय देतात तेव्हा असं वाटतं की या व्यक्तींशी पाच मिनिटं बोलणं हेसुद्धा
आयुष्यात लख्ख प्रकाश देऊन जातं.”