मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट
नाटककारांपैकी एक श्री. महेश एलकुंचवार यांना निर्माणच्या शिबिराला आमंत्रित
करण्यात आले होते. पुढील लेख हा श्री. महेश एलकुंचवार यांनी शिबिरार्थींना
केलेल्या मार्गदर्शनाचे तसेच शिबिरार्थींसोबत झालेल्या प्रश्नोत्तराचे संक्षिप्त
स्वरूप आहे.
माझे प्रेरणास्थान काय?
मी लिहायला जेव्हा लागलो तेव्हा प्रत्येक वेळेला मला कळत नव्हतं
की प्रेरणा वगैरे असं काही असतं.
लिहायला लागलो आणि माझी नाटकं यायला लागली. तेव्हा
तेंडुलकर तारीफ करायचे, गिरीश कर्नाड तारीफ करायचे. कोणी वेगळंही लिहून देण्यास सांगितलं. त्यावर म्हणायचो,
“असं मला जमणार नाही. मला जसं जमतय तसंच मी लिहिणार.
ज्यांना आवडतं ते लोक माझी नाटकं करणार, ज्यांना
आवडत नाही ते नाही येणार.” तेव्हा माझी प्रेरणा काही विकण्यासाठी
नव्हतीच. मी पूर्वीपासून सतत ऐकतोय की लेखकांना हजारो लोकांपर्यंत
पोहोचायचं असतं. मग लोकांना जे आवडतं ते चमचमीत मनोरंजन करणारं
ते लिहतात. मला हा प्रकार भ्रष्ट वाटतो. शेकडो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे जे शुद्ध स्वरूपात आहे त्यात पाणी
घालून पातळ करणार का? तुम्हाला जे मूलभूत स्वरूपात सापडलं आहे,
ते इतकं महत्त्वाचं असेल तर त्यात पाणी घालून पातळ करणं गैर आहे.
कमर्शियल लिहिणारे असे बेतलेले असतात. लोकांना काय आवडतं?
मग ते ज्वलंत आहे का? लिहा! असं का लिहितात? कारण त्यांच्या प्रेरणा वेगळ्या आहेत.
त्यांना आयुष्यातून काय पाहिजे हे कळत असेल नसेल पण त्यांची प्रेरणा
जर अमुक काही मिळवण्याची असेल तर ते त्याप्रमाणे लिहितात. मलापण
बरीच वर्ष कळलं नाही की मी असंच का लिहितो. पण मला असं लक्षात
आलं की मला एवढंच हवं - इतरांपेक्षा स्वतःशी संवाद साधण्याचे
माध्यम. मला माझ्या मनातलं सांगायचयं. मग
मनातलं सांगायचयं. तर कोणाला सांगायचे? कोणी वाचक तर पाहिजे ना.
हे 'जीवन' आहे ते मूलभूत आहे, हे कळल्यानंतर असं वाटलं आपल्याला तर काहीच लिहिता येत नाही. एक क्षणही पकडता येत नाही आपल्याला. आता मी लेखक आहे. आयुष्यातील एक क्षण पकडतो आणि त्या क्षणाबद्दल लिहितो. पण त्या क्षणाच्या प्राणशक्तीला मला भेटताच येत नाहीये. याचं कारण की जीवनाची प्राणशक्ती मला कळलीच नाहीये. लेखकाची धडपडत तीच असते. प्राणशक्ती सापडली पाहिजे जीवनाची! ती आपण जे काम करतो त्यात असते. ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण काही नाही. त्या गोष्टीचे हिशोबच वेगळे आहेत. ती मिळेल तोवर आपण काहीच यशस्वी झालो असं वाटत नाही. मी स्वतःला पराभूतच लेखक समजतो. कारण बुद्धीच्या पातळीवर आकलन झालयं, पण त्यापलीकडे काही घडलेलं दिसत नाहीये. माणसाने आशा सोडू नये. इथे मी माझ्याबद्दल बोललो. इथे माझ्या सौंदर्य कल्पनांची आसक्ती जाऊन तिथे सौंदर्यानुभव आला. त्यानंतर मूलभूत सौंदर्य कशाला म्हणावं हे कळू लागलं आणि हे सगळं घडण्यामागे या ललित कलांचा फार मोठा हात आहे, हे तर नक्कीच. माझी मूळ प्रेरणा स्वतःला व्यक्त करण्याची होती, माझा जो जीवनाचा मार्ग आहे तो सांगायची होती.
कामामागील प्रयोजकता काय?
कुठल्या प्रेरणेने तुम्हाला हे सामाजिक काम करावंसं वाटतं हा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारला आहे का? मी इथे येऊन हे काम का करतोय? इथे येण्याच्या मूळ प्रेरणेपासून दूर सरकून दुसरे काही हेतू मला चिकटले आहेत का? लेखकांचा, कलावंतांचा अध:पात इथूनच सुरू होतो. मी येतो, लिहू लागतो. माझ्या डोक्यात इतकंच असतं की आपण मस्त लिहितोय. लिहिल्यानंतर अचानक ते गाजतं. चार पैसे मिळू लागतात. मग सगळं आपोआप बदलतं. तडजोड होऊ लागते.
मला माझा जीवनाचा मार्ग शेअर करायचा आहे. माझं जे काही संचित आहे,
ते मानवाचं संचित आहे. महेशचं संचित नाही आहे.
माझं नाव महेश आहे हा एक्सीडेंट आहे. हे संचित
सगळ्यांसमोर व्यक्त करायचं, ते बाजूला राहून मग दुसरे बाहेरचे
हेतू मनाला चिटकतात आणि हे चटकन होतं कलावंतांच्या बाबतीत. गाणाऱ्यांना
तर मी विचारतो, का हो तुम्ही एक भजन, एक
ठुमरी, एक टप्पा कशाला गाता? यावर ते म्हणतात
कसे , ‘नाही हो लोकांना हल्ली तेच पाहिजे असतं.’ लोकांना पाहिजे
असतं तेही द्या. पण गंगुबाई असं नव्हत्या कधी म्हणत, केशव बाई
नव्हत्या कधी म्हणत. त्या म्हणायच्या तिथेच खाली उतरायला लागतो
आपण. असं तुमचं सामाजिक काम करणाऱ्यांचं होतं का? बाहेरचे हेतू असतात का? ते चिकटतात का? ते चिकटल्याने तुमच्या कामाचं काय होतं? ते करून कामाचा
फायदा होतो की तुमचा फायदा होतो? मुळात हे प्रश्न तुम्हाला पडतात
का?
मी समाजाची सेवा करत नाही याबद्दल कधीही
मला अपराधीपणाची भावना वाटली नाही. एक काळ असा होता की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी
मला असं सांगितलं की तुम्ही समाजासाठी काही करीत नाही. तुम्हाला
याची शरम वाटली पाहिजे. एक पुण्याचे समाजसेवक आहेत. ते आता लेखकही झालेले आहेत. त्यांनी तर मला पहिल्याच
भेटीत 'अरे बैला' अशी सुरुवात केली.’
रे बैला! काही समाजासाठी लिहीत जा’. पण मी जे लिहितोय ती समाजातीलच माणसं
वाचतायेत. चारच असतील पण ती वाचतायेत आणि नाही वाचलं तर त्याने
काही फरक पडत नाही. पण हा काय तुमचा अहंकार आहे? मला कळत नाही. मला काही गिल्टी वाटत नाही. मी प्रयत्नही केला त्याचा, मला काही वाटत नाही.
'आपण समाजासाठी काही करत नाही' परंतु मला असं वाटलं
की मी असं का समजतो समाजासाठी काही करत नाही? मी लिहितोय,
अत्यंत गंभीरपणे लिहितोय. ते गुणात्मकदृष्ट्या
उत्तम आहे की लहान आहे तो मुद्दा वेगळा. पण मी जे लिहितोय त्याला
कुठलेही हेतु चिकटले नाहीत, तोपर्यंत समाजासाठीच काहीतरी करतोय.
पण अशीही माणसे भेटली की ती म्हणाली तू
योग्य मार्गावर आहेस. पैशाचं म्हणाला तर मला काहीच फरक पडत नाही. वर्षांची
माझी वर्गणी जर सांगितली तर मला सुद्धा हसू येईल. माझा एक महिन्याचासुद्धा
खर्च निघणार नाही. साधा राहण्याचा! हे डागाळू
नये असा मी प्रयत्न केलाय. मला भौतिक पातळीवरचे यश खूपच मिळाले.
पटापटा मिळत गेलं. परंतु त्यामुळे माझे अग्रक्रम
बदलले असं मला वाटत नाही. आताही मला जसं वाटतं तसंच लिहितो.
माझी, पुस्तकाची एक हजारची प्रत निघते.
ती खपायला पाच ते सात वर्ष लागतात. म्हणजे वर्षाकाठी
शंभर ते दीडशे प्रति दहा-अकरा कोटींच्या महाराष्ट्रात खपतात.
यावरून तुम्हाला कल्पना येईल की लेखक हा किती बिनमहत्त्वाचा आहे आपल्या
देशात. पण त्याने काहीच फरक पडत नाही. याचं
कारण असं की मी कोणासाठी करीत नाही. मी स्वतःसाठी करतो.
माझा वयक्तिक प्रवास होतोय का? पुढे जातोय की मागे
जातोय हे मला महत्त्वाचं वाटतं. तुमची प्रेरणा अशी आहे का की
स्वतःचा प्रवास होतोय म्हणून हे महत्त्वाचं आहे की फक्त जगाचं भलं करायचं आहे? याचा विचार करावा.
Aesthetics व
सौंदर्यानुभव
Aesthetics वर खूप पुस्तकं
लिहिली गेली आहेत. मी फक्त माहितीसाठी काही वाचत नाही.
याचं कारण असं की नुसती इन्फॉर्मेशन किंवा माहिती डोक्यात कोंडून काही
होत नाही. त्याचा अनुभव जोपर्यंत होत नाही तोवर त्याचा काहीही
अर्थ नाही. अनुभवच लागतो. मला कोणीजरी सांगितलं
गुलाबाचं फूल असतं, रंग त्याचा असा असतो, सुवास असा असतो. पण सुवास म्हणजे काय ते अनुभवानेच येणार!
फक्त परीक्षेला बसून गुलाबाच्या फुलाचं वर्णन करून दहा पैकी दहा मार्क
मला मिळतीलही पण मला अनुभव काहीच मिळणार नाही. म्हणजे मला गुलाब कळलेलाच नाही.
सौंदर्यानुभव ही गोष्ट आली की आपोआप त्यात काही गोष्टी जुळलेल्या असतात,
अशी माझी समजूत आहे. हे वाचनाने, संगीताने होतं. पण कसं होतं? ती
केमिस्ट्री काय हे मला कळत नाही. पण हा फरक मी डोळ्यांनी इतरांच्याही
आयुष्यात पाहिलेला आहे की जसजसं वय वाढत जातं आणि या कलांचा संपर्क आल्यानंतर आपण या कलांमध्ये खोल खोल जाऊ लागतो तसे
तसे हे बदल आपोआप आपल्यात
घडत जातात. यात फक्त माझाच नाही तर इतरांचाही अनुभव आहे.
याचं कारण असं की, मूलभूत/ महत्त्वाचं सौंदर्य म्हणजे काय? हे आपल्याला कळू लागतं.
सौंदर्याची प्राणशक्ती कळू लागते. आपल्याकडे सौंदर्याच्या
कल्पना फार बटबटीत आहेत. फेविकॉलचा राजवाडा बनवतात व त्याला
'कला' म्हणतात. आता ज्या
महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक म्हणजे बॉलिवूड नट-नट्यांचा नाच
असं राज्यकर्त्यांना वाटतं तर तिथल्या व्यवस्थेविषयी बोलायलाच नको. परंतु अभिजात सुंदर काय आहे हे कळण्यासाठी आपल्याला ह्या आसक्तीच्या पलीकडे
जायला हवं.
साहित्यातून
संपन्नता
महाभारतात जे नाही ते जगात कुठेही नाही
हे खूप खरं आहे. सर्व प्रकारची माणसं, जीवनाच्या अनेक कळा आणि या सर्वांना
कवेत घेणार असं एक काहीतरी जीवन. म्हणजे बघा आपले धर्म,
आपली विचारप्रणाली हे सगळं एका छत्रीखाली आहे, ती छत्री म्हणजे जीवन. जीवनापेक्षा मोठे ते काय!
नंतर ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न मी केला. पण ते खूप अवघड आहे समजायला.
म्हणून त्याची भाषांतर मी एक दोन वर्षे वाचली. पाश्चात्त्य वाङ्मयसुद्धा वाचावं. कारण यात असा भेदभाव
करून चालत नसतो.
कुठलीही कलाकृती तुम्हाला कुठल्या पातळीवर
संपन्न करेल याचा भरोसा नसतो.'Grapes
of Wrath' यासारखी कादंबरी वाचताना
काही जागा अशा येतात की संपूर्ण अंगावर शहारा येतो. डोळ्यात पाणी
येतं. ती नुसती सुंदर जागा असते म्हणून नाही तर जीवनाबद्दल काहीतरी
मूलभूत सांगितलेलं असतं. तिथे त्या क्षणी तुम्ही संपन्न होता.
तुम्हाला त्यातला एक प्रसंग सांगतो. दुष्काळी अमेरिकेमधून
माणसांचं स्थलांतरन चालू होतं. प्रचंड दुष्काळामुळे माणसं पटापटा
मरत आहेत. दक्षिण अमेरिकेतून माणसं पुढे प्रवास करत आहेत.
भयंकर परिस्थिती. कुटुंब विभागलेली आहेत,
माणसं दुरावलेली आहेत.
म्हातारा कुडकुडत एका भागात येतो आणि तो मरणासक्त झालेला असतो.
तो झोपडीपाशी येऊन पडतो. तिथे एक मुलगी आपल्या
बाळाला अंगावर दूध पाजत असते. तिला दिसतं की हा भुकेने मरतोय.
तर ती आपलं स्तन्य त्याला देते! हा तो क्षण आहे!
आता याच्याहून अनोखा क्षण साहित्यात मला कुठे भेटला नाही. तिथे
विलक्षण झेप लेखकाने घेतली आहे. हा एकच क्षण असेल पण तो उन्नत होऊन गेला आहे.
कोणाला कुठून, काय, केव्हा भेटेल हे माहीत नसतं. म्हणून अखंड वाचत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही कितीही कामात असला तरी वाचत असले पाहिजे. आता काय वाचायचं? तर सगळं! तुम्हाला असं झालंय का कधी की आपण असं काम करतोय समाजात? हे देखील एक माध्यम आहे आणि या माध्यमातून आपण स्वतःला शोधतोय. काही वेगळे शोधतोय असं वाटतंय की फक्त लोकांना सुखी करणं हेच वाटते? हे प्रश्न अवघड आहेत. तुम्हाला पडत असतील हे प्रश्न. एकदा स्वतःच्या प्रेरणांचे स्वरूप जर कळलं ना, तर मग पुढचा प्रवास जरा सोपा होतो असं मला वाटतं. माझ्या मनात मी समाजसेवा करत नाही, याबद्दल थोडीही अपराधी भावना नाही. याचं कारण असं की मला माझ्या प्रेरणांचा गांभीर्य कळलं. मग म्हटलं ठीक आहे मी हेच काम करणार.
निसर्गावरील प्रेम की निसर्गाचा उपभोग?
नाटक हे माध्यम आहे. गाणं हे माध्यम आहे किंवा चित्रकला हे माध्यम आहे. त्या माध्यमापेक्षा कलावंत कधीच मोठा नसतो. कलावंत हा जन्मला, त्यानं काम केलं आणि तो गेला. हे सतत चालू असतं. पण नाटक तिथेच आहे. चित्रकला तिथेच आहे. विंचीपासून आपल्याकडे एम एफ हुसेनपर्यंत सर्व गेले. पण चित्रकला तिथेच आहे. माध्यम तिथेच आहे. कलावंत बदलतो. आपण फार छोटे असतो कलेपेक्षा. हे पण मला फार झगझगीत कळलं. म्हणून आपण नाट्यसृष्टीला काही दिलं हा भ्रम डोक्यातून आधी गेला. कारण मी आठ वर्ष काहीही लिहिलं नव्हतं. त्याने नाट्यसृष्टीत एवढीशीही खळबळ झाली नाही. कोणाला आठवण पण आली नाही की का लिहीत नाहीत? काय चाललंय तुझं? बरयं का? बंद का? पण काही थांबत नाही तुमच्याशिवाय! मी त्यावेळी विचार केला की मी नाटकाला काही दिलेलं नाहीये पण; नाटकाने मला काय दिलंय? मी माझं काम करतोय त्याने मला काही दिलंय का? मी जे करतो त्याने जर माझ्या मनाला समृद्धी येत नसेल, माझ्या मनाचं जर काही उन्मयन होत नसेल तर आपल्या कामांमध्ये काहीतरी गडबड होत आहे. या कल्पनेशी मी सात-आठ वर्ष दबकलेलो होतो. नाट्यसृष्टीला काही दिलं नाहीये मी, पण त्या सात-आठ वर्षात पुष्कळ गोष्टी घडत गेल्या. इथून जीवनाकडे आणि कलांकडे पाहण्याच्या दृष्टीमध्ये बदल होत गेले.
म्हणून मघाशी म्हटलं की सौंदर्यासक्त व
कलास्वाद या शब्दांशी अडखळायला लागलो. आसक्ती
हा शब्द कुठेतरी तुमची वाढ थांबवतो आणि ती पायरी ओलांडून गेल्याशिवाय तुमच्या मनाला
त्या माध्यमाची खरी पायरी गाठताच येत नाही अशी माझी समजूत आहे. हे बघा, मी जे सांगतोय ते माझ्या बुद्धीला कळलेलं आहे. My intellect is involved म्हणून
त्याचा अनुभव झालाच आहे असं माझं म्हणणं नाही. सध्यातरी बुद्धीला
कळलयं पण त्याचा बोध झालाच असेल की नाही हे मला माहित नाही. त्याचा
फारसा विचार देखील आपण करू नये. जेव्हा ज्या गोष्टी कळायच्या
तेव्हा त्या कळतात. पण त्या आसक्त शब्दात विसावलो की कलेच्या
प्रेमासाठी आपण हे करतोय का? असं वाटायला लागतं. ही एक abstract गोष्ट असते.
कलेच्या प्रेमासाठी हे गाणं आहे. या गाण्याच्या प्रेमासाठी
आपण करतोय असं नसतं, तर ते स्वतःसाठी असतं. आसक्त या शब्दावर एवढं जोर देण्याचं कारण आपली सौंदर्य कल्पना आसक्तीशी जुळलेली
आहे आणि तिथे माणसांची इतकी मोठी फसगत होते. तिथे अडकून पडतात
माणसं आणि मग पुढे आयुष्यात विचित्र वांझोटेपण येतं याचं उदाहरण मी तुम्हाला देतो.
आपल्याकडे निसर्गावर प्रेम असणारे हल्ली तर खूपच झाले आहेत. ताडोबात जाऊन वाघाला त्रास देतात. मला इतकी चीड येते.
आपण झुंडीच्या झुंडी जीप्स घेऊन तिथे जातो आणि त्या वाघांना बिचार्यांना कोंडीत पकडून बघतो. ते येतात का कधी तुम्हाला बघायला?
का तुम्ही त्यांना त्रास देता? हेच सरळ त्या वन्य
पशूंच्या जीवनावर आक्रमण आहे. पर्यावरण पर्यटन हे तर खातं आहे.
सरकारला पैसे मिळतात. राहू द्या ना त्यांना शांतपणे
सुखाने, पण नाही! लोक जाणार! कारण त्यांचं निसर्गावर भयंकर प्रेम!
निसर्गाच्या सानिध्यात चार दिवस घालवण्यासाठी लोक जातात तिथे.
ते घालवले की परत येतात. ते चार दिवस जातात,
तिथे राहतात.
बरं, मग आम्हाला खाण्याची फार हौस! सॅंडविचेस, बियरच्या बाटल्या, व्हिस्कीच्या बाटल्या आणि मग इकडे
पाहून हाs हाs हाs तिकडे पाहून हाs हाs हाs.
हिमालय सुंदरच आहे, महाबळेश्वर सुंदरच आहे,
माथेरान सुंदरच आहे, चिखलदरा सुंदरच आहे.
सगळं हाs हाs हाs
तर आहेच. त्या लोकांना वाटतं की आपण निसर्गाशी
एकप्राण झालो पण संध्याकाळी ते रेस्टॉरंटमध्ये येऊन दारू पितात.
मी तर कुठेच निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी
गेलो नाही. सध्या तर नाहीच. याचं सरळ कारण असं की तुम्ही तिथे निसर्गाशी
एकप्राण व्हायला गेलेलाच नाही आहात आणि आणि जर एकप्राण झाला असता तर बियरची आठवण झालीच
नसती. तिथे जाऊन बडबड करतात एक सारखी. निसर्ग
तर मूक आहे. त्यामुळे तिथे तुम्ही जे जाता ते निसर्ग भोगायला
जाता. सुंदर दृश्य डोळ्याने भोगण हेच तुमचं पर्यावरणाचं प्रेम
समजा. आता सौंदर्याची इतकी उथळ आणि बटबटीत कल्पना जर आपली असेल
तर त्याही पलीकडे एका वेगळ्या प्रकारचं सौंदर्य असतं आणि त्याचा आस्वाद असा वेगळ्या
प्रकारचा मिळायला पाहिजे, तयार करायला पाहिजे याची कल्पना तरी
असते का? चार दिवसांनी परत आल्यानंतर आमच्या जीवनात काय फरक पडला? निसर्गाच्या सानिध्यात राहून,
एकताल होऊन आलात पण निसर्गाने तुम्हाला काय शिकवलं? तर काहीच नाही! हा सौंदर्यसक्तीचा प्रकार आहे.
डोळ्यांना बरं वाटतं, गाणी ऐकताना कानाला बरं
वाटलं पाहिजे, खाताना जिभेला बरं वाटलं पाहिजे हीच आपली कुवत.
सावजी मटन खायला जातात तर कुठून कुठून मुंबईहून सुद्धा येणारे लोक पहिले
आहेत. मी एक तर शाकाहारी आहे, मला मटन चालत
नाही. आता अभिरुचीपूर्ण खाऊ नये, अभिरुचीपूर्ण
ऐकू नये अभिरुचीपूर्ण राहू नये असं नाहीये. परंतु हा आसक्तीचा
जो प्रकार आहे तो भयंकर आहे. माझा एक मित्र म्हणाला तुला काय
वाटतं तुझ्यात तर प्रेमच नाहीये. मी म्हटलं, मला असं वाटत नाही. माझं खूप गोष्टींवर प्रेम आहे.
माझ्या गावात एकाच बाभळीचे झाड आहे.वाळून कोरडं
झालेलं असतं उन्हाळ्यामध्ये. पाठीमागे वैराण आहे. पण मला ते अतिशय सुंदरच दिसतं. ते अतिशय सुंदर झाड आहे
असं माझं मत आहे. महाबळेश्वरचा तो 'निसर्ग'
आणि माझ्या शेतातला किंवा तुमच्या अवतीभवती जो काही आहे तो काही निसर्ग
नाही का? तो सुंदर नसतो का? तो नसतो कारण
डोळ्यांनी बघता येत नाही. मला एकच म्हणायचंय महाबळेश्वर काय आणि
माझ्या घराच्या अवतीभोवती काय, तिथं मला एकरूप होता आलं पाहिजे.
पण असं होत नाही याचं कारण आपली जगण्याची कल्पनाच मुळी
homocentric आहे. 'मी' मध्ये
व 'माझ्या' अवतीभवती सगळं माझ्यासाठीच आहे
असं जिथे आहे तिथे सौंदर्याची कल्पना मरण पावते. ती जीवनाच्या
सगळ्या अंगांमध्ये दिसते.
विहित कर्म करावे
आपली जगण्याची कल्पनाच मुळी एकांगी आहे. 'मी' मध्ये व 'माझ्या' अवतीभवती सगळं माझ्यासाठीच आहे असं जिथे असतं तिथे सौंदर्याची कल्पना मरण पावते. ती जीवनाच्या सगळ्या अंगांमध्ये दिसते. एखादा प्राध्यापक असतो. देखणा आहे सुदैवाने. उत्कृष्ट कपडे घालतो. रोज कपड्याला इस्त्री करतो, बुटाला पॉलिश असते, केस छान वळवलेले असतात. ऐटीत वर्गात जातो. तिथे सुस्कारे निघतात आणि मग तो वेळघालूपणा करतो. त्याची अभ्यासाची तयारी झालेली नसते. गृहपाठ केलेला नसतो. चुकीचं शिकवतो. मन शिकवण्यात नसतं आणि परत येतो. या माणसाला सौंदर्यदृष्ठी आहे असं मला वाटत नाही. हा अत्यंत भडंग माणूस आहे असं मला वाटतं.
आपलं विहित कर्म जे आहे ते जर आपल्याला
सुरळीत करता येत नसेल तर बाकीच्या सौंदर्याचा डोलारा आपल्या अवतीभोवती बाळगणं यात काहीही
अर्थ नाही. अनेक लोकांच्या राहणी मी पाहिल्या आणि काय राहतात लोक! काय राहणी आहेत त्यांच्या! सुंदर घर, सुंदर कपडे, सुंदर काया. त्यांना
एक काडी इकडची तिकडे झालेली चालत नाही. परंतु त्यांचं विहित काम
ते 'असंच' करतात. लग्नपत्रिकांचंच बघा, पाचशे पाचशे हजार रुपयांची एक एक
पत्रिका असते. पाच एक लाखांच्या पत्रिकाच छापतात. एक मोठा बॉक्स असतो मग त्यात दुसरा बॉक्स असतो. त्यात
सोनेरी काम केलेली पत्रिका असते. पत्रिका उघडल्यानंतर मग आतमध्ये
पहिल्या ओळीपासून शुद्धलेखनाच्या चुका असतात. तिथपासून शेवटपर्यंत
पत्रिका वाचवत नाही. मग काय उपयोग आहे सौंदर्याचा. हे काय सौंदर्य आहे?
आता माझ्याकडे पीएचडीच्या महिला आल्या होत्या. त्यांनी पहिली दहा पाने
दाखवताच मी गाईड होण्यास नकार दिला. याचं कारण त्यांनी
'मि' आणि 'स्त्रि'
असे शब्द अशुद्धलेखन केलेलं होत. जे आपलं विहित
काम आहे ते अत्यंत उत्कृष्ट मी करीन असा कुठे आग्रह नव्हता त्या महिलेला. अशा माणसांमध्ये सौंदर्य भावनेचा अभाव आहे. त्यांना सौंदर्याचा अर्थच
कळलेला नाही.
माझे एक कलावंत मित्र आहेत - प्रभाकर कोलते.
त्यांचं रोजचं जीवन अतिशय अस्ताव्यस्त आहे. सगळंच
अस्ताव्यस्त. घरात काहीच धड नाही. रॅक मध्ये
दहा पंधरा दिवसाचे सामान पडलेले, त्यावर बुरशी लागलेली, पुस्तक
इकडे, चपला तिकडे. पण तो कामाला उभा राहिला
की त्याला रेष सुद्धा इकडची तिकडे झालेली चालत नाही. प्रभाकर
कोलते चित्रकार आहे. घर अस्ताव्यस्त पण काम जेव्हा करतो तेव्हा
ते बघण्यासारखं असतं. तिथे थोडीही तडजोड त्याला चालत नाही. आता कोणाची सौंदर्यदृष्टी
चांगली? टीप-टॉप राहणार्या एका व्यक्तीची की कोलतेची?
इतरांमध्ये सौंदर्यासक्ती असते. किंवा ते सौंदर्य जगतात
असं मला वाटत नाही. विचारांच्या बाबतीत पण तसं होऊ लागतं अशी
माझी समजूत आहे. अनावश्यक विचार ज्याने आपल्या मनाचं काही उन्मयन
होणार नाही असे हळूहळू आपण दूर सारू लागतो किंवा तसा प्रयत्न तरी आपला असतो.
मी या टप्प्यावर साधारण इथे कोठेतरी आहे. मला सगळं
साधलंय अशातला भाग नाही परंतु संगीत, चित्रकला या गोष्टींचा मनःपूर्वक
खोल जाऊन सौंदर्यानुभव घेता आला. त्यासाठी मला तज्ञांची मदत झाली.
प्रभाकर कोलते, सुधीर पटवर्धन अशी सगळी माणसं मला
वेळोवेळी भेटत गेली. संगीताच्या बाबतीत मोठी मोठी माणसं मला भेटली.
पाश्चात्य संगीतासाठी मुंबईच्या काही मित्रांची मला खूप मदत झाली.
त्याच्यामुळे या कलांमध्ये मला अवगान करता आलं. केलं. इथपर्यंत आलो आणि हेही कळलं की जितकं आपण आपल्या
आयुष्यात अडगळ कमी करू, तितकं आपल्या आयुष्यातलं सौंदर्य वाढेल.
आता हे सगळं झाल्यानंतर ते तुमच्या कामात
दिसलं पाहिजे ना! तुम्ही जे काम करीत आहात त्यात ते आलं पाहिजे. नाहीतर
त्याचा परिणाम वाटत नाही. म्हणून विहित कर्म अचूक करावे.
प्रश्नोत्तरे
प्रश्न: कामामुळे व्यक्तीचे उन्मयन होते का? जर होत असेल तर त्याची प्रोसेस काय?
उत्तर: ही दुटप्पी प्रोसेस आहे असं मला वाटतं. कामामुळे उन्मयन होतं, यापेक्षा काम करता करता ते घडतं.
मी जेव्हा एखादं पुस्तक वाचतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे पुस्तक
आधीच्या पुस्तकापेक्षा वैचारिक, भावनिक, स्पिरिच्युअल यादृष्टीने जरा पुढे सरकलेलं आहे. इथं काहीतरी
जास्त माझ्या हाती लागलेलं आहे. जीवनाबद्दलची माझी समजूत वाढू
लागते, त्यादृष्टीने उन्मयन होतं. म्हणजे
मी संत वगैरे झालोय असं काही नाही. राग, लोभ सगळे चिकटले आहेत मला. परंतु जीवनाबद्दलची समजूतच
नसणं आणि आंधळेपणाने काम करीत राहणं हे मला काही लोकांच्या बाबतीत कळत नाही.
मग तो लेखक असो, समाजसेवक असो, डॉक्टर असो किंवा अजून काही असो.
प्रश्न
: तुम्ही व्हॉट इज अननेसेसरी,
इज अनब्युटीफुल असं बोलता. तुमच्या मनातील जी नेसेसिटी आहे त्याला डिफाइन करता येईल का?
उत्तर: माझ्या घरात मी वस्तूंची जमवाजमव करणं हे हव्यासामुळे होतं. याचं कारण मी सौंदर्यासक्त असतो. ज्याला परिग्रह म्हणतो
आपण, तो मी करतो. मला गोष्टी सुंदर वाटल्या
की घे, असं करतो. मग सगळ्यांच्याच आयुष्यात
तो (अपरिग्रहाचा) टप्पा येतो असं नाही.
काही माणसं मरेपर्यंत वस्तूंशी चिकटून बसलेली असतात. पण परिग्रहाची वृत्ती हळूहळू गळून पडायला लागते ते वाढत्या वयाबरोबर. जीवनाविषयी
समजुतीमुळे ते घडू लागतं. मग आपल्याला कळतं की त्या गोष्टीचं
सौंदर्य मी एकदा पाहिल, दोनदा पाहिल आता मला त्यातून काहीच नवीन
मिळत नाही. पण दुर्मिळ चित्र असेल एखादं उत्तम कलाकाराचं,
तर ते अननेसेसरी गोष्ट होत नाही. ते अनब्युटीफूल
होत नाही. याचं कारण असं की, ते चित्र रोज
माझ्याशी बोलतं. रोज मला नवीन अनुभव देतं. म्हणून त्या अभिजात कलाकृती आहेत.
पण पाण्यात पाय बुडवून बसलेली कॅलेंडरवरची युवती, तिचा फोटो फ्रेम करून लावणं,
हे एक दिवस छान वाटेल. मग ते अनावश्यक होतं.
अशा गोष्टी कमी केल्या तर आपलं घर खूप मोकळं मोकळं आणि छान वाटतं.
तसंच माणसाचं व नात्यांचं सुद्धा आहे. तसं मी इथपर्यंत
खेचत नाही की माझ्या आयुष्यात मी किती नाती निर्माण करतोय? लोकसंग्रह
म्हणतात त्याला. आता 'लोकसंग्रह'
समाजकारणात काम करणाऱ्यांना आवश्यक असेल, आहेच.
पण एरवी 'उपचार' म्हणून लोक
सांभाळणं याच्यामध्ये माझी फार शक्ती व्यथित होते. अनेक लोकसंग्रह
करणारे, अनेक नाती जमा करणारे दुसऱ्यांच्या ताब्यातच असतात आणि
मी कोणामुळे आहे, हे सांगता येत नाही. कारण
एका व्यक्तीमुळे आहे असं कसं म्हणायचं? जर हिचं अन् माझं भांडण
झालं तर ते फक्त तिच्यामुळे झालं असं कसं म्हणायचं? तिच्यातही
गैर आहे व माझ्यातही काही गडबड आहे. पण जर फक्त भांडणच होतंय
गेली वीस वर्ष तर ती आयुष्यातली अडगळ आहे. ती अडगळ शांतपणे बाजूला
केली पाहिजे. म्हणून माझ्या आयुष्यातली तापदायक नाती
(जी माझ्याचमुळे असतील असे मी गृहीत धरतो, इतरांमुळे
नाही) ती आपण नाहीशी केली पाहिजेत. कारण
ती नाती मला डागाळत असतात आणि ते त्याही व्यक्तीला तेवढेच तापदायक होत असेल.
हे लोकसंग्रह करणं वेगळं, लोकांना सांभाळणं वेगळं.
ज्याला सामाजिक काम करायचं आहे त्याला तर हे करावंच लागतं. पण वैयक्तिक पातळीवर अंर्तजीवनाची गजबज कमीच करावी लागते. नात्यांची सुद्धा! जे नातं प्रवास करीत नाही,
पुढे जात नाही, जे रूपांतरण करीत नाही ते नातं
उगीच फॉर्मॅलिटी म्हणून टिकवून ठेवणं हे आता पुष्कळ निरर्थक उद्योग आहे. हे दोन्ही पक्षांना कळलं पाहिजे. हे टोकाचं बोलणं असेल
पण हे बघा, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
प्रश्न:
कामाबद्दल Passion आणि कामाबद्दल आसक्ती यामध्ये काय फरक आहे?
उत्तर: खूप फरक आहे. ज्या लोकांसाठी
तुम्ही काम करता त्यांच्याबद्दल तळमळ असणं हे स्वतःच्या पलीकडे आहे. आसक्ती म्हणजे तुमचा यात काही पर्सनल इंटरेस्ट आहे. आसक्ती
म्हणजे नुसती ओढ नाहीये. लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे,
या गोष्टी मनात असतील तर आसक्ती वाढेल. नसतील तर
मग आसक्ती राहणार नाही. तळमळ राहील. आणि
तळमळ ही फार मोठी गोष्ट आहे. उदात्त गोष्ट आहे. या दोन मूलभूत मनोवृत्तीच वेगळ्या आहेत असं मला वाटतं.
प्रश्न:
काम करताना एक हेतू असू शकतो की या कामातून मला स्वतःला शोधावसं वाटतं. मग कामाकडे
साधन म्हणून पाहणे आणि स्वतःला शोधणे योग्य आहे का?
उत्तर: मला तर वाटतं की कामाकडे
दुर्लक्ष करून स्वतःला शोधत राहणे ही आसक्ती आहे. पण आपण काम
करीत असतानाच हळूहळू प्रगती होत राहते. त्यासाठी वेगळं काही करावं
लागत नाही. हा प्रवास निरंतर चालणारच असतो. निरंतर, आयुष्यभर. माझ्या माहितीतील
काही लोक आहेत, ते वेल बीइंग आहेत. पण फक्त
स्वतःपासून पळून जाण्यासाठी अशा कामात गुंतलेले आहेत. त्यांना
स्वतःला तोंड देता येत नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये इतकी गुंतागुंत
आहे, इतके तापदायक अनुभव आहेत की त्यापासून पळून जाण्यासाठी ते
हे काम करतात का? अशी माझी शंका आहे. मी
त्यांना विचारलं नाही पण माझं विश्लेषण तसं आहे. तुम्हाला उद्या
समजा असं कळालं की आपल्यामध्ये आसक्ती आहे म्हणून हे काम करतो, तर कशाला तुम्ही त्याच्यामुळे अपराधीपणा वाटून घेता? गळून पडेल ना ती. तो आपल्या प्रवासाचा भागच असतो.