'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 23 December 2023

लग्न - सहकार की व्यवहार?

मी शिक्षणाने इंजीनियर आहे. कॉलेजच्या प्लेसमेंट्सनंतर मी नागपूरला एका बहुराष्ट्रीय कंपनीत काही काळ नोकरी केली, पण कामाचं समाधान लाभेना, म्हणून मी ती नोकरी सोडली. आणि कित्येक वर्षांपासून मनात साचलेलं, 'समाजासाठी काम करायचंच,' या प्रेरणेनं गडचिरोली जिल्ह्यातील एका मोठ्या सामाजिक संस्थेबरोबर जोडली गेले. गेली पाच वर्ष मी तिथेच काम करत आहे. मला माझं काम आवडतं, त्याचा होणारा दृश्य परिणाम लक्षात येतो, बरोबरीने माझादेखील सातत्यानं विकास होतो आहे, हे जाणवतं आणि मनःपूर्वक समाधान वाटतं. काही आठवड्यांपूर्वीच मी २७ वर्षांची झाले. वाढदिवसानंतर अनेकांनी मला विचारलं, की आता लग्नाचं कायघरीदेखील याविषयी चर्चा सुरू झाली. मी लग्नाला तयार आहे. पण मला चिंता वाटते आहे. आणि भीतीदेखील. 

कारण... 

रुजत आलेलं माझं इथलं काम मला सोडायचं नाहीये. कुणी विचारेल, की मग अडचण कुठे आहे? अडचण समाजधारणेत आहे. मी मुलगी, तरुणी, स्त्री असण्यात आहे.

लग्नानंतर सासरी जाणं, लग्नानंतर मुलीने आपलं घर, कुटुंब आणि त्या घरातील जवाबदाऱ्या सोडून सासरी, नवऱ्याच्या घरी जावं, तिथून पुढे तेच तिचं सासर- म्हणजे घर असणार आहे, अशी प्रथा, मानसिकता अजूनही समाजात रूढ आहे. ती वर्षानुवर्षे आहे हे मान्य; पण म्हणून, मुलीनेच स्वतःचं घर का सोडावं? आपल्या कुटुंबाप्रति असलेल्या कर्तव्यास तिलांजली का द्यावी? करिअर-नोकरीबाबत तडजोड का करावी? हा माझ्यासारख्या मुलींना सातत्याने पडणारा, परंतु अद्याप उत्तर न सापडलेला प्रश्न.

असं म्हटलं जातं, की फार पूर्वीच्या काळात मुबलक प्रमाणात जमीन जिथे उपलब्ध आहे, तिथे पती-पत्नी लग्नानंतर आपला संसार सुरू करायचे. जमीन ही स्थावर असल्यामुळे आणि त्याचा व्यवहार करण्याची यंत्रणा त्या वेळी विकसित न झाल्यामुळे, ज्याच्याकडे जमीन जास्त, त्याच्याकडे संसार सुरू व्हायचा. मुलाकडे जमीन कमी असल्यास मुलगा लग्नानंतर मुलीकडे जायचा आणि जीवनातील नव्या पर्वाला सुरुवात करायचा. उत्तरोत्तर पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व वाढलं आणि मुलींच मुलाकडे कायमस्वरूपी जावं, ही प्रथा समाजात रूढ झाली. परंतु वर्तमानात, जिथे  जमिनीचे व्यवहार करणं सुलभ झालं आहे, संपत्ती साठवण्याचे इतर स्रोत उपलब्ध आहेत आणि शिक्षण, आर्थिक क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता येऊ लागलेली असतानाही ही प्रथा का सुरू राहावी?

स्वातंत्र्य; पण लग्नापर्यंतच! 

आज नोकरी-व्यवसायासाठी अनेक तरुण- तरुणी घरापासून दूर जातात. मुंबई-पुणे ही शहरे तर अनेकांना आकर्षित करतात. परंतु 'सासरघरी जायचं' असल्यानं तरुणींना स्वतःच्या नोकरीचं ठिकाण निवडण्याचं स्वातंत्र्य मात्र गमवावं लागतं. पती-पत्नी दोघंही छोट्या शहरातील असल्यास, जर तरुणीला मुंबईला आणि तरुणाला पुण्याला नोकरी मिळाली तर अगदी क्वचित घडणारा अपवाद सोडल्यास त्यांच्यातल्या पत्नीलाच मुंबईतील नोकरीचा पर्याय सोडून पुण्याला नोकरीचा शोध घ्यावा लागतो. माझ्या शेजारी राहाणारी एक प्रेमविवाह झालेली तरुणी. एकाच बिल्डिंगमध्ये राहणारे हे दोघे. लहानपणापासून एकत्र वाढलेले. शिकता शिकता प्रेम जुळलं. दोघंही इंजिनीयर झाले. त्याला दुबईला नोकरी मिळाली. तीन वर्षांनंतर दोघांनी लग्न केलं. दरम्यान, तिलाही मुंबईतच चांगल्या कंपनीत, मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. सध्या ती सासूबरोबर राहते. नवरा लग्नानंतर लगेच दुबईला गेला आणि तो भारतात लगेच परत येणार नाही, हे नक्की झालं. त्यामुळे तिला तिथे नोकरी मिळेल का याची चाचपणी सुरू झाली, कारण तिला नवऱ्याकडे जावं(च) लागणार आहे. याचं कारण तसं गृहीतच आहे. अशा परिस्थितीत नेहमीच 'Adjustment' करावी लागते ती स्त्रीलाच. याचा पाया मुलीच्या लहानपणापासूनच रचला जातो. शिक्षण, मित्रमैत्रिणी, छंद आणि अंतिमतः नोकरी या साऱ्याचं स्वातंत्र्य मुलीला मिळतं... पण अर्थात 'लग्नापर्यंतच'! 'तुला जे करायचं आहे ते कर. पण लग्नानंतर मात्र नवऱ्याच्या, सासरच्या कलानं गोष्टी कराव्या लागतात,' असं अनेक आई-वडील आपल्या मुलीला बिनदिक्कत सांगत असतात. इतर सर्व बाबतींत मुलीला सूट दिली जाते, परंतु लग्नाचा विषय निघाला, की मर्यादांचा पाढा सुरू होतो. मुलांना मात्र स्वातंत्र्य आणि तेही 'लाइफटाइम'. मुलींना निवडक स्वातंत्र्य; तेही लग्नापर्यंतच! मग प्रश्न पडतो, की मुली खरंच स्वतंत्र आहेत का? मुली म्हणून करिअर, इच्छा-आकांक्षा आणि कर्तव्यांचे (कुटुंब आणि समाजाप्रति) काय? या देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून स्वतःची प्रगती करण्याचा, जीवनविषयक किंवा सामाजिक जाणिवांवर काम करण्याचा, त्यानुसार जगण्याचा अधिकार मुलींना नाही का? मुलीनं कायमच त्याग करायचा किंवा तडजोड करायची आणि मुलानं लाभ घ्यायचा. याला लग्न म्हणायचं की एखादी 'वन साइडेड बिझनेस डील'?

भौगोलिक विकासातील असमानतेचा आणि खासगी नोकरीपेक्षा सामाजिक कार्याला कमी समजण्याच्या समाजमान्यतेचादेखील परिणाम होतो. मी स्वतः जर पुण्यात किंवा बंगळूरूला एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करून 'सेटल' होण्याचा निर्णय घेतला आणि तसाच मुलगा हवा, असा आग्रह धरला, तर तो काही प्रमाणात रास्त समजला जाईल. मुलगी 'मॉडर्न' आहे, 'करिअरिस्टिक' आहे असं मानलं जाईल. पण मी जर गडचिरोलीत राहून पूर्णवेळ सामाजिक कार्य करायचं म्हणते आहे तर त्याला मात्र वेडगळपणा समजलं जाईल! इथे येऊन सेटल होणारा मुलगा हवा किंवा त्यानं इथून त्याचं 'वर्क फ्रॉम होम' करावं, किंवा अन्य पर्याय शोधावा, असं जर मी जाहीर केलं, तर ती अवास्तव अपेक्षाच मानली जाईल.

सातत्याने गृहीत धरणं! 

दुसऱ्या एका तरुणीचं उदाहरण पाहूयात. ती ५ वर्षांपासून नोकरी करत आहे. उत्तम काम करत असल्यामुळे तिची प्रगती होतच आहे, परंतु ते काम म्हणजे तिच्यासाठी नुसती नोकरी नाही, तर तिला त्याचा ध्यास आहे, ते तिचं 'पॅशन' आहे. घरी लग्नाचं बोलणं सुरू झालं की मात्र तिला दडपण येतं. तिचं स्वप्न, तिचं करिअर, तिचं काम यांचं काय होणार? कारण आईवडिलांनी ठरवलेलं स्थळ त्यांच्या दृष्टीनं एकदम उत्तम आहे. पण या स्थळाचा आग्रह आहे की तिने नोकरी सोडावी किंवा 'वर्क फ्रॉम होम' करावं. ही एकतर्फी त्यागाची अपेक्षा योग्य आहे का? हा तिचा प्रश्न आहे. आणखी एक उदाहरण. माझ्या ओळखीतल्या एका तरुणीने लग्न केलं. नवरा-बायको दोघांचंही करिअर उत्तम चालू आहे. घरात 'सपोर्ट सिस्टीम' ही उत्तम आहे. त्यामुळे सगळं चांगलं चाललं होतं. अचानक सासूची तब्येत बिघडली तेव्हा पहिली अपेक्षा सुनेने सुट्टी घ्यावी ही होती. नंतर तो आजार जेव्हा गंभीर निघाला, तेव्हा तिनं नोकरीच सोडावी, असा जणू फतवाच निघाला. आईच्या आजारपणात मुलाने रजा घ्यावी किंवा घरातल्यांनी एकत्र बसून त्यावर काही तडजोडीचा उपाय शोधावा, हा विचारच कुणी करू नये? की सेवाभाव बाईलाच जास्त जमतो, तीच योग्य रीतीने काळजी घेऊ शकते, असं गृहीत धरून तिला त्याकामी लावावं? हा कुठला न्याय? खरं तर काळानुसार तरुणांनीही विचार करायला हवा की त्यांच्या संसारासाठी, बायकोसाठी ते काय देऊ शकतात? व्हॉट ही कैन ऑफर टू हिज फॅमिली?

आणखी एक उदाहरण. अश्विनीला वर्षाला १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. त्याचबरोबर ती सुगरण आहे, तब्येतीनं 'फिट' आहे, हुशार आहे आणि ऑफिसमध्ये ५ जणांची टीम लीड करते. वयाच्या २८ व्या वर्षी तिच्याकडे एक चारचाकी गाडी आहे आणि नुकताच तिनं एक फ्लॅट बुक केला आहे. मागच्या महिन्यात अश्विनीला घरच्यांनी एक स्थळ सुचवलं. तिलासुद्धा वाटतंय, की आता तिला आवडेल लग्न करायला. 'कांदेपोहे' कार्यक्रमासाठी आलेल्या आशीषला तिने प्रश्न विचारला, "सो, टेल मी आशीष, व्हॉट डू यू प्लॅन टू ऑफर इन धिस रिलेशनशिप?" बापरे! या प्रश्नावर घरात असं काही वादळ उठलं की विचारायलाच नको! खरं तर हा प्रश्न तरुणींनी भावी नव-याला विचारायच्या आधीच तरुणांनी स्वतःलाच विचारायची वेळ आली आहे. स्त्री आता परावलंबी नाही राहिलेली. ती स्वतंत्र होते आहे. तिला तिच्या घरापलीकडे ओळख मिळते आहे. हा प्रश्न कधी समाजाच्या मनात आलाच नाही का की आता कदाचित स्त्रियांच्याही अपेक्षा बदलल्या असतील? त्याही काही वेगळा विचार करत असतील? त्यांच्या काही वेगळ्या मागण्या असतील? आणि का नसाव्यात? या बदलत्या परिस्थितीत जोडीदार म्हणून एक तरुण आपल्या होणाऱ्या बायकोला खरंच काय मूल्यवर्धक गोष्टी देऊ शकतो याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. इथे कुणी हे विचारू शकेल, की हेच तरुणांच्या बाबतीतही होऊ लागलं आहे. आजकालच्या मुली, अगदी नोकरी न करणाऱ्यासुद्धा खेडेगावांत किंवा फार सोयीसुविधा नसलेल्या ठिकाणी यायला उत्सुक नसतातच. त्यामुळे एखाद्याला अशा ठिकाणी काम करत आयुष्य घालवायचं असेल तर त्याच्या समोरही प्रश्नचिन्ह आहे. हे मान्य आहेच; परंत मुलींच्या बाबतीत हा प्रश्न सध्या प्राधान्याने येतो आहे, कारण मुली आता वेगळं करिअर करू लागल्या आहेत. 

मुलांचंही असावं 'न्यू नॉर्मल!' 

आमच्या संस्थेच्या समुदायातीलच डॉ. सूरज म्हस्के या आमच्या मित्राने वेगळी वाट निवडली आणि थेट ग्रामीण भागात जाऊन सेवाभावी रुग्णालय सुरू केलं. शहरातील आर्थिक भरभराटीचा पर्याय सोडणाऱ्या सूरजला त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी पत्नी, डॉ. जानकी भेटली. या जोडीच्या अगदी उलट म्हणजे माझी एक मैत्रीण डॉ. हर्षा कुमारी आणि तिचे पती. हर्षादेखील एका सामाजिक संस्थेत काम करते. या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे हर्षाच्य पतीने तिच्यासोबत 'शिफ्ट' होऊन 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वतः निवडला. एकीकडे सुरजबरोबर ग्रामीण भागात, सामाजिक क्षेत्रात आलेली जानकी तिनं निवडलेला पर्याय हा 'अपेक्षित' वाटतो, तर दुसरीकडे हर्षासोबत आलेला तिचा पती- याचं उदाहरण मात्र 'दुर्मीळआहे! अर्थात, दुर्मीळ असलं तरी शक्य आहे आणि मुलांसाठी 'न्यू नॉर्मल'चा पायंडा पाडणारं आहे. मुलांनी 'न्यू नॉर्मल'चा गांभीर्याने विचार केल्यास आणि तरुण-तरुणीने एकत्र चर्चा करून ठरवल्यास अनेक मुलींना कामाविषयी वाटणारी अनिश्चितता नक्कीच कमी होऊ शकेल.

एम. डी. असलेली माझी एक डॉक्टर मैत्रीण- जी आदिवासी भागात गेली ३ वर्ष उत्कृष्ट काम करत आहे. पश्चिम घाटात पर्यावरण संवर्धनाचं काम करत असलेली दुसरी एक 'एम.एस्सी.झालेली तरुणी तिथेच राहून काम करते आहे. मराठवाड्यातील गरजू कुटुंबांतल्या लहान मुलांच्या शिक्षणावर काम करणारी तरुणी, 'सायकियाट्री''एम.डी.' करणारी आणि भविष्यात ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार देऊ इच्छिणारी आणखी एक मैत्रीण... अशा अनेक तरुणी आहेत. यांना आता त्यांचा जिथे जम बसला आहे तिथेच स्थायिक व्हायचं असेल तर त्यांना लग्नाच्या बाबतीत सुयोग्य जोडीदार मिळेलच याची खात्री नाही. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या आणि देशाच्या 'यंग अँड प्रॉडक्टिव्ह वर्कफोर्स'चा (तरुण आणि कार्यक्षम मनुष्यबळाचा) भाग बनणाऱ्या तरुणींचं प्रमाण वाढतं आहे, ही अतिशय आशादायक आणि आनंददायी बाब आहे. मात्र त्याबरोबर सामाजिक क्षेत्र असो, वा खासगी क्षेत्र; तरुणींचं काम आणि त्यांचं करिअर यालादेखील समान प्राधान्य देणं आवश्यक आहे, अविभाज्य आहे. लग्न झालं, की ती तरुणीच फक्त जागा बदलून नवऱ्याच्या ठिकाणी जाईल, तिथे काम शोधेल, त्यानुसार आपलं करिअर 'Adjust' करेल वा बदलेल, अशा अपेक्षा ठेवणं आता बदलायला हवं. ते योग्यही नाही आणि वास्तववादीदेखील नाही. तसा बदल काही प्रमाणात होतो आहे, मात्र तो वाढायला हवाय.

दोघंही नोकरी वा व्यवसाय किंवा वेगळं करिअर करत असतील, तर लग्नाचा निर्णय घेताना आणि जोडीदार निवडताना म्हणजे लग्नाच्या आधीच दोघांना सुसंगत असलेल्या ठिकाणाचा विचार व्हायला हवा. कुणाचं काम कुठे आहे आणि कुठे करणं आवश्यक आहे, कुणाच्या कामाची जागा वा प्रकार बदलणं तुलनेनं सोपं आहे, कुणाच्या कामाचा विशेष सकारात्मक सामाजिक परिणाम घडू शकतो आणि त्यामुळे ते अबाधित ठेवावं, आदी बाबींचा, 'टिपिकल' दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन विचार करणं, हे आता जरुरी आहे.

दोघांकडून योगदान अपेक्षित!  

कोणत्याही नात्यात दोन्ही व्यक्तींकडून प्रयत्न आणि योगदान होणं आवश्यक असतं. लग्न तर दीर्घकाळासाठी जोडलं जाणारं नातं आहे. यात जर नवऱ्याच्या उत्कर्षासाठी त्याची बायको योगदान देत असेल, तर मग तिच्या उत्कर्षासाठी त्याने योगदान द्यायला हवं. त्यामुळे स्त्रियांनाही त्यांच्या स्वधर्माच्या मार्गावर चालणं सुकर होईल आणि एकूणच आपला समाज एका नव्या दिशेनं पुढे जातानाचं चित्र पाहण्याचा आनंद आपल्याला मिळेल.

मी माझ्या कामानिमित्तानं अनेक तरुणींशी चर्चा करत असते. नोकरी करणाऱ्या, न करणाऱ्या, शिक्षण घेत असलेल्या, अनेक जणी लग्नाच्या वयात आल्यानंतरही नवरा नेमका कसा हवा- इथे पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे विचार करणं अपेक्षित- पुढे त्या काय करणार आणि कुठे राहणार, याविषयी संभ्रमात असतात. लग्नानंतर माझं आयुष्य कसं वळण घेईल याविषयी त्यांच्या मनात प्रचंड असुरक्षितता असते. त्या सगळ्यांच्या मनावर समाजाचं एक अदृश्य दडपण आहे. लग्न तर करायचंय, करिअर किंवा वेगळ्या वाटेवर चालायचंही आहे, पण मग समाजाला योग्य वयात लग्न होणंही अपेक्षित असतं, अशा वेळी कशाला महत्त्व द्यायचं?

आपल्या समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्त्रियांची यादी जर आपण पाहिली, तर त्यातील अनेक जणींना त्यांच्या जोडीदाराचा भक्कम पाठिंबा लाभला. मग त्या मुलींच्या शिक्षणासाठी राबणाऱ्या सावित्रीबाई फुले असोत, गडचिरोलीच्या दुर्गम भागात जाऊन स्त्रीरोगांवर अभ्यास करणाऱ्या डॉ. राणी बंग असोत किंवा सुधा मूर्ती असोत! अशी अनेक उदाहरणं आहेतच, मात्र हे केवळ अपवादात्मक न राहता सर्वांसाठी कसं साध्य होईल ते बघणं महत्त्वाचं आहे.

शेवटी, मुलींची सातत्यानं होणारी घुसमट थांबवायची असेल, तर या प्रश्नावर विचार करावाच लागेल, की लग्न म्हणजे सहकार की लग्न म्हणजे व्यवहार

- अदिती पिदुरकर (निर्माण, सर्च)  

aditipidurkar95@gmail.com

Wednesday, 20 December 2023

समलिंगी विवाहांबद्दल तरुणांचे मत काय आहे?


भारतीय तरुणांच्या सर्वांगीण विकासाला मदत व्हावी, आणि त्यांच्यात सामाजिक बदल घडवून आणण्याची संवेदनशीलता, प्रेरणा व कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने गेली १७ वर्षे आम्ही निर्माण हा युवा उपक्रम चालवतो आहोत. सर्च संस्थेचे संस्थापक डॉ. अभय व डॉ. राणी बंग आणि एम. के. सी. एल.चे श्री. विवेक सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निर्माणने भारताच्या २१ राज्यातील हजारो तरुणांसोबत काम केलेले आहे. आम्ही चालवत असलेल्या विविध उपक्रमांपैकी गडचिरोलीला होणारी युवांची शैक्षणिक शिबिरे आणि त्यानंतरचा सातत्याने होणारा पाठपुरावा हा एक अतिशय सघन उपक्रम आहे. आमच्या वेळेच्या आणि संसाधनांच्या मर्यादा लक्षात घेऊन आम्ही दरवर्षी एक निवडप्रक्रिया करतो आणि भारतभरातून साधारण दीडशे युवांना निवडतो.

जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत होणारी ही निवडप्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये असते – ‘अप्लिकेशन फॉर्म, इंटरव्ह्यू आणि असाइनमेंट्स’. आमच्या वेबसाईट वर एक अतिशय सुंदर आणि आत्मनिरीक्षणात्मक असा अर्ज आहे. यातील प्रश्न हे युवांना स्वत:च्या जीवनाबद्दल अंतर्मुख व्हायला तसेच बाह्य सामाजिक परिस्थितीविषयी विचार करायला भाग पाडणारे असे दोन्ही प्रकारचे असतात. आणि हे प्रश्न दरवर्षी काही प्रमाणात बदलत असतात त्यामुळे त्यातली उत्सुकता व नावीन्य टिकून राहते.

या वर्षी त्यात विचारलेला एक प्रश्न असा होता: 
"भारतात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता असावी का? तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करा."

भारतातील युवा व इतरही अनेकांसाठी अतिशय कळीच्या अशा या प्रश्नाविषयी विचार करायला व आपले म्हणणे सुसूत्रपणे मांडायला युवांना संधी मिळावी हा शैक्षणिक उद्देश्य तर आमच्या मनात होताच, पण सोबतच याबाबतीत युवा नेमका काय विचार करतात याचादेखील काही अंदाज यावा हा भाग होता. भारतातल्या अनेकविध नामांकित कॉलेजेसमधून येणारी आणि शैक्षणिक आणि भौगोलिक विविधता असलेली ही युवा मंडळी काय मत प्रकट करतात हा आपल्या सगळ्यांसाठीच उत्सुकतेचा विषय असेल म्हणून आम्हाला जे सापडले ते इथे शेअर करत आहोत:

१८ ते २९ वयोगटातील एकूण ५२८ युवांनी या प्रश्नाला उत्तर दिले. त्यात ४४% पुरुष, ५५% स्त्रिया होत्या आणि एक जण ‘इतर’ या वर्गात मोडत होता. शैक्षणिकदृष्ट्या बघितले असता ४८% जण हे वैद्यकीय पार्श्वभूमीचे तर ५२% हे अ-वैद्यकीय पार्श्वभूमीचे (उदा. कला, वाणिज्य, विज्ञान, इंजिनियरिंग, इ.) होते.

यांच्या उत्तरांचे विश्लेषण केले असता आम्हाला असे आढळले की ७५.७% युवांनी भारतात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता असावी याला “हो” असे उत्तर दिले होते. केवळ ७.४% युवांनी “नाही” असे उत्तर दिले होते तर १६.९% युवांनी त्यांच्या उत्तरांत नेमकी कुठलीही एक भूमिका स्पष्ट केली नव्हती.

एवढ्या मोठ्या प्रमाणात युवा समलैंगिक विवाहांबद्दल खुलेपणे विचार करतात हा आमच्यासाठी सुखद आश्चर्याचा अनुभव होता. जेव्हा आम्ही या प्रतिसादांचे खोलवर गुणात्मक विश्लेषण केले तेव्हा समलिंगी विवाहांच्या समर्थनार्थ खालील प्रमुख कारणे मांडलेली दिसली:

१. नातेसंबंध आणि लग्नामध्ये निवडीचे स्वातंत्र्य 
२. विवाहाचा अधिकार 
३. जोडप्यांना आणि अनाथ वा सोडलेल्या मुलांसाठी कुटुंब
४. मालमत्तेच्या वारसाहक्कामध्ये सुलभता 
५. संधीची आणि मानवी हक्कांची समानता 
६. ही एक वैज्ञानिक स्पष्टीकरणासह समजता येणारी नैसर्गिक घटना आहे 
७. समलिंगी जोडप्यांचे भावनिक आरोग्य जपता येणे 
८. सामाजिक स्वीकृती आणि संरक्षण, स्टिग्मा आणि भेदभाव कमी करणे 
९. तो/ती स्वत: LGBTQ समुदायाशी संबंधित आहे किंवा त्याचा/तिचा LGBTQ समुदायातील कोणी मित्र आहे 
१०. इतर देशांनी हे मान्य केले आहे, त्यामुळे भारतानेही त्याचे पालन केले पाहिजे.


विशेष म्हणजे, प्यू रिसर्च सेंटरने, ऑक्टोबर २०२२ मध्ये अमेरिकेतील प्रौढांसाठी केलेल्या सर्वेक्षणात देखील असे आढळून आले होते की १८-२९ वर्षे वयोगटातील ७५% अमेरिकन नागरिकांना समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यात यावी असे वाटते. म्हणजे या विषयाबाबतीत भारतीय आणि अमेरिकन तरुणांमध्ये एकसमान वेव्हलेंग्थ आहे तर! ग्लोबल जगामध्ये अजून काय अपेक्षित असेल?

१८ ते २९ वयोगटातील तरुण हे भारतीय लोकसंख्येच्या २२% आहेत. निर्माणने केलेला हा अभ्यास सर्वव्यापी प्रातिनिधिक जरी नसला तरी भारतातील सुशिक्षित व विचारी तरुणांच्या एका गटाच्या मनात समलिंगी विवाहांबाबत काय समज आहे याची झलक तो नक्कीच दाखवतो.

प्रतिसाद देणाऱ्या ७५.७% तरुणांनी समलिंगी विवाहांना समर्थन दिले आणि ते कायदेशीर होण्याच्या बाजूने होते. बदलत्या भारताचा हा युवा आवाज राजकारणी ऐकत आहेत का? समलिंगी विवाहांबाबत कायदा बनवताना ते तो विचारात घेतील का?


- अमृत बंग (लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत)
- आदिती पिदुरकर व साईराम गजेले (निर्माण, सर्च, गडचिरोली)