लहान मुलांच्या शारीरिक कुपोषणाबाबत बर्याचदा चर्चा होते, बातम्या होतात, ते योग्यच आहे. पण आपल्या युवांच्या व्यक्तित्व कुपोषणाची काय परिस्थिती आहे याची भनक देखील कोणाला नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – 5 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 5 वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषणाचे (stunting) प्रमाण हे 35% आहे. मात्र निर्माणद्वारे आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासात युवांमधील व्यक्तित्व कुपोषणाचे (languishing) प्रमाण हे 43% आढळून आले. भारतासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हे लक्षात घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याची चर्चा आपण पुढील लेखात करुया.
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Wednesday, 31 January 2024
युवा कसे जगत आहेत?
लहान मुलांच्या शारीरिक कुपोषणाबाबत बर्याचदा चर्चा होते, बातम्या होतात, ते योग्यच आहे. पण आपल्या युवांच्या व्यक्तित्व कुपोषणाची काय परिस्थिती आहे याची भनक देखील कोणाला नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – 5 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 5 वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषणाचे (stunting) प्रमाण हे 35% आहे. मात्र निर्माणद्वारे आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासात युवांमधील व्यक्तित्व कुपोषणाचे (languishing) प्रमाण हे 43% आढळून आले. भारतासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हे लक्षात घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याची चर्चा आपण पुढील लेखात करुया.
Sunday, 28 January 2024
युवा म्हणजे नेमके कोण?
निर्माण उपक्रमाद्वारे गेल्या दीड दशकात प्रथम महाराष्ट्रातील आणि नंतर भारताच्या 21 राज्यातील हजारो तरुण-तरुणींना भेटण्याची, संवाद साधण्याची, त्यांचे जीवन जवळून पाहण्याची, त्यांचे प्रश्न – द्वंद्व – निर्णय – त्यांचे परिणाम बघण्याची आणि त्यांच्या विकासात हातभार लावण्याची संधी मला आणि निर्माण टीम मधील माझ्या सहकार्यांना लाभली. बहुतांश वेळा आनंददायी, कधी त्रासदायक पण कायमच शिकवणारा असा हा प्रवास राहिला आहे. या दरम्यानचे आमचे अनुभव व निरीक्षणे, गोळा झालेल्या माहितीचे विश्लेषण आणि सोबतच ‘यूथ सायकॉलॉजी’ या विषयाचे आधुनिक विज्ञान या सगळ्यांचा आधार 'लोकसत्ता' या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या सदरातील मांडणी करताना मी घेणार आहे.
‘भारत हा युवांचा देश आहे’ हे आता वापरुन वापरुन गुळगुळीत झालेले वाक्य आहे. पण ‘युवा / यूथ’ म्हणजे नेमके कोण ही मात्र अगदी सर्वज्ञात व सर्वमान्य अशी संज्ञा नाही. ‘यूथ’ या नावाखाली अनेक विविध वयोगट खपून जातात. युनायटेड नेशन्स असो की भारत सरकार, वय वर्षे 13 पासून ते वर्ष 35 पर्यन्तच्या दरम्यानचे अनेक कालखंड (13 ते 35, 15 ते 34, 15 ते 29, 18 ते 24, 18 ते 29, ...) हे युवावस्थेसाठी म्हणून वापरले जातात. यात दुर्दैवाने अजून सार्वमत नाही. व्याख्येचाच गोंधळ असेल तर भारतात नेमके युवा किती याच्या उत्तरांत देखील तफावत येणारच. काही तरी ठोस नेमकेपणा हवा म्हणून निर्माणमध्ये आम्ही 18 ते 29 या वयोगटाला युवा म्हणून मानायचे असे ठरवले आहे (त्यामागची काही वैज्ञानिक व व्यावहारिक कारणे पुढे येतील). या सदरासाठी देखील आपण तीच व्याख्या कायम ठेऊया.
तर 18 ते 29 या वयोगटात भारताची 22% लोकसंख्या आहे. म्हणजे एकूण 26 कोटी लोक! आवाका समजून घ्यायचा तर भारताचे हे 26 कोटी युवा हे आख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येहून जास्त आहेत. या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाला (डेमोग्राफिक डिव्हिडेंड) पाया समजून त्यावर मजबूत उभारणी करणे हे अत्यावश्यक आहे, कारण हा युवा वर्गच देशाचा चेहरा, ताकद आणि भविष्य असणार आहे. 2021 साली भारताचे ‘मिडियन’ वय हे 28 वर्षे होते, म्हणजेच भारताची अर्धी लोकसंख्या ही 28 वर्षांपेक्षा कमी वयाची आणि उरलेली अर्धी अधिक वयाची होती. तुलनेसाठी म्हणून त्याच सुमारास चीनचे ‘मिडियन’ वय हे 37, पश्चिम युरोपचे 45 व जपानचे 49 वर्षे होते. जगातल्या सर्वाधिक तरुण देशांपैकी एक हा भारत आहे. पण सोबतच हे समजून घेणे देखील गरजेचे आहे की ही अमर्यादित काळासाठी उपलब्ध असलेली संधी नाही. 2031 साली भारताचे ‘मिडियन’ वय हे 31 वर्षे होणार आहे आणि त्यापुढे ते अधिकाधिक वाढत जाणार आहे. आपण कोणीच आज जितके तरुण आहोत तितके भविष्यात नसणार, हे जसे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत वैयक्तिकरीत्या खरे तसेच ते देशाच्या पातळीवर देखील खरे आहे. म्हणूनच युवांच्या बाबतीतली आपली समज वाढणे आणि त्यांच्या सकारात्मक वाढीला, कर्तृत्वक्षमतेला खतपाणी घालणे ही येत्या दशकातली कळीची बाब असणार आहे. हे नीट करता यावे यासाठी युवावस्था नेमकी काय, ती कशी उदयाला आली / येते, तिची प्रमुख लक्षणे (फीचर्स) काय, त्यादरम्यानच्या प्रमुख समस्या काय, इ. बाबतीत आपले समाज म्हणून आकलन विस्तारणे आवश्यक आहे.
अमेरिकेतील क्लार्क विद्यापीठातील रिसर्च प्रोफेसर जेफ्री आर्नेट यांनी 2000 साली ‘अमेरिकन सायकॉलॉजिस्ट’ या प्रख्यात शोधपत्रिकेत लिहिलेल्या निबंधात या मधल्या अवस्थेचे विस्तृत वर्णन करून तिला ‘इमर्जिंग ऍडल्टहूड’ असे नाव दिले आहे. एरिक्सन यांच्या ‘लाईफस्पॅन थियरी’ मधील पौंगडावस्था ते प्रौढावस्था यांच्या दरम्यानची अशी ही नवीन पायरी आता मानली जात आहे. आर्नेट यांचा हा शोधनिबंध एक मैलाचा दगड ठरला असून त्यानंतर आता इमर्जिंग ऍडल्टहूड हा एक गंभीर अभ्यासाचा विषय बनला आहे. या विषयाला पूर्णत: वाहून घेतलेले आणि दर दोन महिन्यांनी प्रकाशित होणारे इमर्जिंग ऍडल्टहूड याच नावाचे एक जर्नल देखील आहे ज्यामध्ये जगभरातून येणारे शोधनिबंध असतात. दुर्दैवाने जगातील सर्वात जास्त इमर्जिंग ऍडल्ट्स (म्हणजेच 18 ते 29 वयोगटातील आपले युवा अथवा यूथ) ज्या भारत देशात आहेत तिथून मात्र फारच कमी (जवळजवळ नाहीतच) असे या विषयावरचे शोधनिबंध प्रकाशित होतात. भारतासाठीच्या महत्त्वाच्या अशा आरोग्याच्या अनेक प्रश्नांवर (उदा. मलेरिया, टीबी) जसे भारतीयांनी नाही तर पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी संशोधन केले, तसे काहीसे याबाबतीत व्हायचे नसेल तर आपल्या देशातील संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठे, सामाजिक संस्था, इत्यादींनी आपल्याकडील या 26 कोटी इमर्जिंग ऍडल्ट्स / यूथ / युवांबाबत संशोधन करणे, त्यांना समजून घेणे व त्यांच्या सुयोग्य वाढीसाठी विविध उपक्रम विकसित करणे हे अत्यावश्यक आहे.
जन्मल्यापासून पुढे
मनुष्याची वाढ टप्प्याटप्प्याने कशी होते याबाबत मानसशास्त्रामध्ये एरिक एरिक्सन
यांची ‘लाईफस्पॅन थियरी’ महत्त्वाची मानली जाते. बालपण ते प्रौढावस्था यांच्या
मध्ये पौंगडावस्था (ऍडॉलेसन्स) ही एक पायरी यात मानली गेली आहे. जी. स्टॅन्ली हॉल
हे अॅडोलेसन्सच्या वैज्ञानिक अभ्यासाचे जनक मानले जातात. त्यांनी 1904 साली
या विषयावर पहिल्यांदा दोन खंडांचे पुस्तक लिहिले. त्यांतर हळुहळु ऍडॉलेसन्स हा
घरोघरी वापरला जाणारा शब्द झाला. (हॉल यांच्या इतर दोन विशेषता म्हणजे ते
अमेरिकेतील सायकॉलॉजीचे पहिले पीएचडी आणि अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनचे
संस्थापक!)
आपण जर ओघाने आपल्या
आजी-आजोबा, पणजोबा यांच्या पीढीच्या जीवनप्रवासाकडे नजर टाकली तर असे
लक्षात येईल की काही दशकांपूर्वीपर्यन्त माणसे पौंगडावस्थेतून सरळ प्रौढावस्थेत
पदार्पण करीत. उच्च शिक्षणाचे प्रमाण फारसे नसे व त्यासाठी फार वर्षे देखील लागत
नसत. लग्न व मुलबाळ लवकर होत असे. एकूणच प्रौढ जीवनाच्या जबाबदार्या विशीतच
स्वीकारल्या जात आणि माणसे कुटुंब व काम यामध्ये चटकन ‘सेटल’ होत असत.
मात्र हळुहळु हे स्वरूप बदलायला लागले आहे. आता पौंगडावस्था ते प्रौढावस्था असे लगेच संक्रमण होत नसून या प्रवासाला बराच कालावधी लागतोय. उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले असून आजकाल अनेकदा 27 - 28 वयापर्यंत (अनेकदा त्याच्याही पुढे) लोक औपचारिक शिक्षण घेत असतात. लग्न होण्याचे वय वाढत चालले आहे आणि साहजिकच मुले देखील उशिरा होत आहेत. तरुण-तरुणी ‘सेटल’ होण्याआधी विविध पर्याय (कामाचे, जागेचे, जीवनशैलीचे, जोडीदाराचे) ‘एक्स्प्लोअर’ करु इच्छितात व त्यासाठी वेळ घेताहेत. ज्या 18 ते 29 वयोगटाला आपण युवा म्हणतोय त्यातील अनेक जण हे आता ‘ऍडॉलेसेन्ट’ तर नाही पण पूर्णत: ‘ऍडल्ट’ देखील नाही अशा एका मधल्या अवस्थेत आहेत.
बालमृत्युचा प्रश्न
पूर्णत: संपला जरी नसेल तरी आपल्या देशासाठी ते आता तेवढे मोठे आव्हान उरलेले
नाही. जगण्याची संधी मिळून आता युवावस्थेत पोहोचलेल्या (आणि पुढील वर्षांत येऊ
घातलेल्या) कोट्यवधी तरुण – तरुणींना आपण कसे घडवतो, घडायला
मदत करतो हा आता आपल्यापुढचा सर्वात कळीचा प्रश्न असणार आहे.
युवावस्थेतील महत्त्वाची लक्षणे काय, यूथ फ्लरिशिंग म्हणजे नेमकं काय, युवांना पडणारे मुख्य प्रश्न कोणते, ‘पर्पज’ ही संकल्पना नक्की काय व युवांसाठी त्याचे महत्त्व काय, करियरची निवड, मूल्यव्यवस्था, आर्थिक गरजा व आकांक्षा, भावनांविषयी जागरूकता व व्यक्त होता येणे, युवा व व्यसने, युवांची सामाजिक जबाबदारी व कृतीशीलता, इ. अनेक विषय या सदरातील पुढील लेखांत आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. त्यातील माहितीचा उपयोग करुन ज्याला अधिक समजून घेता येईल आणि ज्याच्या विकासात योगदान देता येईल असा तुमच्या परिचयातील किमान एक इमर्जिंग ऍडल्ट शोधून ठेवा! भेटूच लवकर!
लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.
वरील लेख हा 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात संपादित सदरामधील एक लेख आहे.
amrutabang@gmail.com