'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 30 April 2024

युवांपुढचा सगळ्यात कळीचा प्रश्न?

युवांच्या मनात स्वत:विषयी, स्वत:च्या भविष्याविषयी काय प्रश्न आहेत? ते याबाबत काय विचार करताहेत हे कसे जाणून घ्यावे? गडचिरोलीला शोधग्राम येथे होणार्‍या आमच्या निर्माण शिबिरांमध्ये भारतातील 21 राज्यांतून विविध प्रकारची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी असलेले तरुण-तरुणी येतात. हे युवा भारतातील 26 कोटी युवांचे पूर्णत: सार्वत्रिक प्रतिनिधी नसलेत तरी त्यांच्या मनोविश्वात डोकावून बघितल्यास व्यापक युवामानसाबद्दलची काही झलक आपल्याला समजायला मिळू शकते. किमान हे तरी नक्कीच कळू शकेल की ज्या युवांना स्वयंविकासाची व सामाजिक योगदानाची इच्छा आहे आणि त्यासाठी जे स्वत:हून निर्माणसारख्या उपक्रमात भाग घेऊ पाहतात अशा युवागटाच्या मनातील प्रश्न, संभ्रम, उद्दिष्ट्ये काय आहेत.

याच विचाराने आम्ही एक छोटा अभ्यास केला. 3 वर्षांच्या काळात झालेल्या वेगवेगळ्या निर्माण शिबिरांमध्ये ज्यांनी भाग घेतला अशा 492 ‘युनिक’ युवांना प्रत्येक शिबिराच्या सुरुवातीला आम्ही विचारले की तुमच्या मनात सध्या स्वत:च्या जीवनाविषयी नेमके कुठले प्रश्न आहेत, तुम्ही कशाची उत्तरे शोधता आहात हे कृपया लिहून काढा. हे सर्व ‘रिस्पॉन्सेस’ आम्ही संगणकात नोंदवले आणि गुणात्मक विश्लेषणासाठी त्यांची सात विविध ‘कॅटेगरीज’ / गटांमध्ये विभागणी केली. 492 युवांनी लिहिलेल्या एकूण 6100 प्रश्नांची गटवार विभागणीची टक्केवारी ही सोबतच्या ‘पाय चार्ट’ प्रमाणे होती. यामध्ये सोयीसाठी सातपैकी तीन सगळ्यात छोट्या गटांना’ इतर’ या गटात एकत्र केले आहे. जे चार प्रमुख गट आहेत त्यांत प्रत्येकी काही उपगट देखील आहेत आणि त्यानुसार माहितीचे ‘कोडिंग’ करण्यात आले आहे. परंतु शब्दमर्यादेमुळे ते गटनिहाय अधिक विस्तृत चित्र इथे मांडण्याचे मी टाळतो आहे.



6100 ही 492 युवांनी लिहिलेल्या एकूण सर्व प्रश्नांची बेरीज आहे. प्रति व्यक्ती प्रश्नांची सरासरी ही 12.4 आहे. हे प्रश्न वाचतांना तरुण-तरुणींच्या मनात काय सुरु आहे याचा एक सुंदर रंगपट आपल्या पुढे उभा राहतो.

सर्व प्रश्नांचा एकत्र विचार केला असता सगळ्यात जास्त वेळेस विचारला गेलेला प्रश्न म्हणजे अस्तित्वात्मक व आध्यात्मिक गटामधील ‘माझ्या जीवनाचा उद्देश्य काय? माझा नेमका पर्पज काय?’ हा प्रश्न! खरं तर या बाबत आश्चर्य वाटायला नको कारण हा जीवनातला सर्वात कळीच्या प्रश्नांपैकी एक आहे. आणि 18 ते 29 वर्षातील ‘इमर्जिंग ऍडल्टहूड’चे वय हे या प्रश्नाच्या शोधासाठीचे सर्वात उत्तम वय आहे. 5 आणि 10 वर्षांच्या मुलांना सहसा माझा पर्पज काय हा प्रश्न पडत नाही. इयत्ता बारावीपर्यंतची आपल्याकडची परीक्षार्थी घोडदौड देखील मुलांना या प्रश्नापासून दूर ठेवते. मात्र त्यानंतर, कॉलेजच्या आणि कामाला सुरुवात केल्याच्या वर्षांत हा प्रश्न अनेकांना प्रथमच भेडसावायला लागतो. युवावस्थेत देखील मेंदूची वाढ व विकास होतच असते आणि आयुष्याविषयी, विश्वाविषयी, स्वत:च्या अस्तित्वाविषयी गंभीर प्रश्न पडायला सुरुवात होते (किमान होऊ शकते) असे याबाबतीतले विज्ञान सांगते. जणू काही युवांचा मेंदू या ‘ऍबस्ट्रॅक्ट’ प्रश्नांना भिडण्यासाठी सज्ज होत असतो. मात्र हा शोध घ्यायला मदतरुप होईल असे वातावरण, संधी, वेळ, आणि गरज भासल्यास मार्गदर्शन हे युवांना पुरेशा प्रमाणात मिळते का?

आपल्याकडचे बहुतांश महाविद्यालयीन शिक्षण हे भारंभार माहिती देते, क्वचित प्रसंगी काही कौशल्ये देते. पण एक गोष्ट जवळपास कुणालाच मिळत नाही ती म्हणजे पर्पज. मी घेत असलेल्या या माहितीचा आणि (जर मिळाले असतील तर) कौशल्यांचा उपयोग मी कोणासाठी, कशासाठी करु याची काही नेमकी स्पष्टता फारशी कोणाजवळच नसते. इतकेच नाही तर ही स्पष्टता मिळवण्यासाठी वेळ देणे, विशेष प्रयत्न करणे हे देखील अमान्य असते. घरची मंडळी, शिक्षक तसेच इतर सहाध्यायी या सगळ्यांचाच भर असतो तो लवकरात लवकर पुढची कुठली तरी पदवी घेण्यावर. पर्पजच्या अभावात माहितीचे अधिकाधिक भेंडोळे आणि किमान कुठली तरी कौशल्ये मिळतील या (भाबड्या) आशेने तरुण-तरुणींचा चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू होतो. पुढचा क्लास, परीक्षा किंवा पदवी मिळवण्याच्या सततच्या शर्यतीत मला नेमके कुठे जायचे आहे याचा विचार व शोध कुठच्याकुठे मागे पडून जातो. कदाचित त्यामुळेच एखाद्या विषयाच्या खोलात जावे, कोण्या प्रश्नाच्या झपाटून मागे लागावे हे देखील आपल्या कॉलेज तरुण-तरुणींमध्ये फार कमी प्रमाणात दिसते आणि त्यांचे रोजचे दिवस तात्पुरते मन रमवण्यासाठी नेटफ्लिक्स, यू ट्यूब, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍप मध्येच चालले जातात.

शिक्षणतज्ञ आणि सायकॉलॉजिस्ट आर्थर चिकरिंग त्याच्या ‘एज्युकेशन अँड आयडेंटिटी’ या पुस्तकात तरुण वयातले विकासाचे सर्वात महत्त्वाचे असे जे ‘व्हेक्टर्स’ (सदिश) मांडतो त्यामध्ये स्वत:च्या पर्पजचा शोध घेणे याचा समावेश आहे. चिकरिंग असे देखील नोंदवतो की अनेक तरुण विद्यार्थी हे छान सजून तयार आहेत (ड्रेस्स्ड अप) पण कुठे जायचे हे मात्र त्यांना माहिती नाही आहे. त्यांच्यात ऊर्जा आहे पण त्यांना गंतव्यस्थानाची कल्पना नाही आहे.

निर्माणमध्ये येणारे सुमारे 40% युवा हे भारतातल्या उत्तमोत्तम वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी असतात. बारावीनंतर मोठ्या मेहनतीने आणि आशेने मेडिकलला प्रवेश मिळवणार्‍या या तरुण विद्यार्थ्यांना एकदा का ते कॉलेजमध्ये आले की मग मात्र मी डॉक्टर का बनतोय, आरोग्य क्षेत्रात सध्या महत्त्वाची अशी कुठली आव्हाने आहेत, मी शिकत असलेल्या दवाखान्यात येणार्‍या रुग्णांच्या काय समस्या आहेत, वैद्यकीय ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया काय, या क्षेत्रात ज्यांनी अफाट काम केले आहे असे पूर्वसूरी कोण, मी माझ्या जीवनकाळात नेमके कोणासाठी, कुठे, कशा प्रकारे काम करु शकतो इ. प्रश्नांविषयी विचार करायला, त्यांचा शोध घ्यायला कुठलेही प्रोत्साहन, वेळ वा तसे मार्गदर्शन करणारे ‘मेंटर्स’ मिळत नाहीत. एमबीबीएसला आल्या आल्या आता नीट पीजीची तयारी कशी करायची, कुठला क्लास लावायचा यात ते बूडून जातात. मला ही फार मोठी शोकांतिका वाटते.

हार्वर्ड विद्यापीठातील व्यवस्थापनाचे सुप्रसिद्ध प्राध्यापक क्लेटन क्रिस्टनसन असे म्हणतात, “इफ यंग पीपल टेक द टाईम टू फिगर आऊट देयर लाईफ पर्पज, दे विल लुक बॅक ऑन इट ऍज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दे डिस्कव्हर्ड. बट विदाऊट अ पर्पज, लाईफ कॅन बिकम हॉलो”. युवांच्या एकंदरीत ‘फ्लरिशिंग’ साठी जे विविध घटक कारणीभूत ठरतात त्यातील पर्पज / जीवनहेतू हा सगळ्यात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे.

जयप्रकाश नारायण असे म्हणायचे की ‘अध्यात्म ये बुढापे की बुढभस नहीं तो तारुण्य की उत्तुंगतम उडान है’. युवांच्या पुढचा कळीचा प्रश्न हा निव्वळ उपजीविकेचा नाही तर जीविकेचा आहे, या जीवनाचे काय करु हा आहे. माझ्या जीवनाचा उद्देश्य काय हा आध्यात्मिक प्रश्न आहे आणि याचा शोध उतारवयात नाही तर ऐन तारुण्यातच घ्यायला हवा. त्यातच खरी मजा आहे आणि तरुण असण्याचे प्रात्यक्षिक आहे.

हा शोध घेण्यासाठीची उंच भरारी मारायला आपण युवांना मदत करणार की त्यांचे पंख छाटणार?



अमृत बंग
लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

#युवांना स्वत:च्या पर्पजविषयी विचार करायला चालना मिळावी म्हणून निर्माणने भारतातील प्रथमच अशी एक ‘यूथ पर्पज प्रश्नावली’ विकसित केली आहे. ही मराठी व इंग्रजीमध्ये पूर्णत: ऑनलाईन उपलब्ध असून https://nirman.mkcl.org/selection/selection-process या संकेतस्थळावर बघता येईल.