'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 29 May 2024

सामाजिक कार्य का? - समाजबदलाच्या कृतींची आणि सामाजिक क्षेत्राची नेमकी गरज काय यासाठीचे सहा आयामी फ्रेमवर्क

सध्या सुरू असलेल्या आमच्या निर्माण उपकमाच्या पुढील बॅचच्या निवडप्रक्रियेसाठी भारतभरातून युवक-युवती अर्ज पाठवत आहेत. समाज परिवर्तनासाठी सहभाग नोंदवण्याची, प्रसंगी झोकून द्यायची त्यांची भावनिक प्रेरणा अतिशय उत्तम आहे. मात्र या मार्गावर लांब पल्ल्यात टिकायचे असल्यास आणि तात्कालिक यशापयशाने भुलून वा खचून जायचे नसल्यास काही एक वैचारिक स्पष्टता व आधार आवश्यक आहे. मी सध्या जे करतोय त्याचा कंटाळा आलाय, मला सामाजिक कामात समाधान लाभते, याला एक ग्लॅमर आहे या किंवा अशा इतर केवळ वैयक्तिक कारणांच्या पलीकडे जाउन मुळात सामाजिक कार्याची अथवा सामाजिक क्षेत्राची गरज काय यासंबंधी मूलभूत विचार करणे जरुरी आहे. पुढे जाऊन भ्रमनिरास व्हायचा नसेल आणि येणारी आव्हानं पेलायची असतील तर ही स्पष्टता मिळवणं भाग आहे.

सुप्रसिद्ध अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ पीटर ड्रकर यांचे 'मॅनेजिंग द नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन' हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्यात ते असं म्हणतात की शासकीय क्षेत्राची प्रमुख भूमिका म्हणजे समाजाला सुरळीतपणे कार्य करण्यास सुकर व्हावे यासाठीचे विविध कायदे कानून, धोरणे व नियम बनवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. खाजगी क्षेत्राचं मुख्य काम म्हणजे लोकांना आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा उत्पादित व वितरित करणे. मग सामाजिक क्षेत्राचं मुख्य काम काय? पीटर ड्रकर असं म्हणतात की 'चेंज्ड ह्यूमन बीइंग्स' म्हणजेच ‘माणसं घडवणे’ ही सामाजिक क्षेत्राची प्राथमिक भूमिका आहे. एखादा खाजगी विक्रेता जेव्हा अमुक वस्तू विकतो आणि ग्राहक त्याचे पैसे देतो तेव्हा त्यांच्यातील व्यवहार संपला असे मानले जाईल. तथापि, सामाजिक क्षेत्र एवढ्यावरच समाधान मानून थांबू शकत नाही. व्यक्तीचा विकास होतो आहे की नाही, त्या व्यक्तीच्या अंतरंगात व बाह्य जीवनात, वर्तनात बदल होतो आहे की नाही यावरुन सामाजिक कार्याचे आणि त्याच्या परिणामकारकतेचे मोजमाप केले जाईल, करायला हवे. यामुळे सामाजिक क्षेत्राची भूमिका एकाचवेळी अतिशय रोमांचक आणि आव्हानात्मक अशी बनते.

या व्यापक भूमिकेला अनुसरून मग प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर सामाजिक क्षेत्राची नेमकी व्याप्ती काय, कामाचे ठोस प्रकार व त्याचे विविध पैलू काय या विषयी मी एक सहा-मितीय रचना सुचवतो:-



1. लोकसेवा: 

समाजातील सर्वात गरजू आणि राजकीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना जीवनावश्यक सेवा मिळवून देणे, प्रसंगी स्वत: ती सेवा देणे, कारण सहसा शासन व बाजार व्यवस्था त्यांच्यापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाही किंवा पोहोचू इच्छित नाही. ग्रामीण, आदिवासी भागात किंवा शहरी झोपडपट्ट्यांमधील वंचित लोकांसोबत काम करणारे अनेक सामाजिक उपक्रम या पैलूवर काम करत असतात. महत्त्वाचा एक फरक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे तो आहे मानसिकतेचा. ‘एखादी सेवा पुरवणे’ ही खासगी क्षेत्राची मानसिकता आहे, तर ‘गरजू लोकांची सेवा करणे’ ही सामाजिक क्षेत्राची मानसिकता आहे, असायला हवी.


2. लोक सक्षमीकरण: 

सत्तेचा असमतोल आणि विषमता दूर करण्याच्या उद्देशाने व्यक्तींना सक्षम करणे आणि विकेंद्रीकरणाच्या व लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला बळकट करणे हे सामाजिक क्षेत्राचे अत्यावश्यक कार्य आहे. इंग्रजीतील ‘एंपॉवर’ हा शब्द बघा, ‘पॉवर’ पासून आलेला आहे. खासगी क्षेत्राकडे आर्थिक पॉवर आहे. शासकीय क्षेत्राकडे राजकीय, नोकरशाही, दंडशक्ती आणि संसाधन वाटपाची पॉवर आहे. सहसा असं दिसेल की हे दोन्ही क्षेत्र त्या सत्तेला घट्ट पकडून ठेवतात. नागरिकांनी निव्वळ मतदार, योजनांचे लाभार्थी, ग्राहक किंवा नोकर बनून रहावं, बाकीची सत्ता अधिकाधिक प्रमाणात स्वतःच्या हातात केंद्रित व्हावी अशी मानसिकता सरकारी व खाजगी क्षेत्रांत सहसा दिसते. हे शक्तीचे असंतुलन दूर करून लोकांना सक्षम करणं, जेणेकरुन ते स्वतः त्यांचे प्रश्न सोडवू शकतील आणि स्वतःच्या जीवनाचे सुकाणू हातात घेऊ शकतील, असे काम हे सामाजिक क्षेत्राचा आत्मा आहे. नुसतीच सेवा केली पण लांब पल्ल्यातही जर समोरची व्यक्ती स्वत:च्या पायावर उभी राहण्यास स्वतंत्र झाली नाही तर ती सेवा तर निव्वळ सामाजिक क्षेत्राची ‘रोजगार हमी योजना’ होईल. लोकांना आत्मनिर्भर होण्यास मदत करणं, त्यांच्यातल्या अव्यक्त सामर्थ्याला पूर्णत्वाने बहरता येणं, आणि याद्वारे विकसित, स्वायत्त आणि जागरुक 'चेंज्ड ह्यूमन बीइंग' घडवणं हे सामाजिक क्षेत्राच्या अस्तित्वाचा गाभा आहे.


3. प्रश्न सोडविण्याचे पथदर्शी प्रयोग:

सामाजिक समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारचे तांत्रिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक व लोकसहभागाचे प्रयोग करणे आणि कल्पक व नाविन्यपूर्ण उपाय शोधणे. लोकांशी व त्यांच्या प्रश्नांशी जवळीक असणे, शासकीय नोकरशाहीतील लाल फितीचे बंधन नसणे आणि कॉर्पोरेट क्षेत्रामधील दर तिमाही नफा मिळवायचा दबाव नसणे ही सामाजिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये आहेत जी या क्षेत्राला एक गतीशीलता आणि लवचिकता देतात. हे स्वातंत्र्य सामाजिक संस्थांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी आणि समस्या निवारणाचे सर्जनशील उपाय विकसित करण्यासाठी वापरले पाहिजे. ‘कुठलीही समस्या ज्या समजेतून निर्माण झाली त्याच पातळीवरून सोडवली जाऊ शकत नाही’ हे अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. म्हणूनच ‘सोशल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’ साठी सृजनात्मक उपाय, कृतीशील ज्ञाननिर्मिती व पुराव्यावर आधारित पद्धती विकसित करणे हे सामाजिक क्षेत्राचं तिसरं महत्त्वाचं काम. तथापि, पुरेशी चाचपणी व चाचणी न करताच ‘यशस्वी मॉडेल’ म्हणून फार चटकन यशाचा दावा करण्याचा बौद्धिक अप्रामाणिकपणा हा अन्यांची दिशाभूल करणारा आणि शेवटी सामाजिक क्षेत्राच्याच विश्वासार्हतेला बाधा आणणारा असतो. म्हणून त्या प्रकारच्या पळवाटेपासून सावध राहणे आवश्यक आहे.


4. व्हिसल ब्लोअर: 

समाजामध्ये जेव्हा कुठे अन्याय, अत्याचार किंवा भ्रष्टाचार होत असेल अशा प्रसंगी “जागल्या” म्हणून भूमिका पार पाडणे. राजकीय, सरकारी वा खाजगी क्षेत्राचे हितसंबंध जिथे आड येतात तिथे अनेकदा व्यक्ती, समूह, प्राणी, पर्यावरण, इ. वर अन्याय होतो. अशा वेळेस त्या अन्यायाला वाचा फोडणे आणि पीडितांच्या हक्कांसाठी लढणे ही सामाजिक क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.


5. योगदानाचे माध्यम व व्यासपीठ: 

समाजाच्या भल्यासाठी मदत करण्याच्या व आपला काही वाटा उचलण्याच्या अनेकाविध लोकांच्या इच्छेसाठी एक अभिव्यक्तीचे माध्यम (चॅनेल ऑफ एक्स्प्रेशन) असणे हे सामाजिक क्षेत्राचे एक अंगभूत काम आहे. समाजामध्ये सुदैवाने अनेक लोकांना असं वाटतं की मी इतरांसाठी काहीतरी मदत करायला पाहिजे. पण ते इतर कोण, त्यांच्यासाठी मी नेमकं काय करणार, कसे करणार हे शोधण्यात व ठरवण्यात बर्‍याचदा अडचणी जातात. म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक, आर्थिक दाते, हितेच्छूक लोक, जागरूक नागरिक अशा विविध मंडळींना त्यांच्या समाजाप्रतीच्या उत्तरदायीत्त्वाच्या पूर्तीसाठी मदतरूप असे एक माध्यम म्हणून, आणि लोकांमधील परोपकाराच्या भावनेला व्यक्त होण्यासाठी एक संघटित व्यासपीठ म्हणून सामाजिक क्षेत्र अतिशय उपयुक्त ठरते.


6. मूल्यांची अभिव्यक्ती व प्रसार: 

सामाजिक क्षेत्राने कितीही वेगवेगळ्या कृती केल्या तरी त्या कृतींच्या आवाक्याला शेवटी काहीतरी मर्यादा राहणारच. आख्या देशभर शाखा पसरवण्याची ‘स्केल’ आम्हाला प्राप्त व्हाही अशी महत्त्वाकांक्षा हे सामाजिक क्षेत्राचं लक्ष्य वा मानदंड नसावं. तर करत असलेल्या कृतींच्या माध्यमातून काय वृत्ती प्रसारित होतेय, कुठल्या मूल्यांची अभिव्यक्ती होतेय याकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे. मानवी समाज आणि संस्कृती ज्या अनेक मूल्यांना महत्त्वाचे मानते त्यांची कायम जाण राहावी म्हणून व्यक्ती, संस्था आणि कृतींच्या रुपातील ‘रोल मॉडेल्स’ आवश्यक असतात, जे या मूल्यांचे दीप म्हणून काम करतात, या मूल्यांवर समाजाचा विश्वास कायम ठेवतात आणि व्यापक प्रमाणावर लोकांना नैतिकदृष्ट्या उन्नत जगण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच आपल्याला गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग किंवा ग्रेटा थनबर्ग हवे असतात. हा मूल्यात्मक प्रभाव समाजकार्याच्या इतर उपक्रमांच्या तात्कालिक फायद्यांपेक्षा खूप मोठा आणि दीर्घकालीन असतो.


या सहा-मितीय फ्रेमवर्कमुळे सामाजिक प्रश्नावर काम करू इच्छिणा-या युवक-युवतींना त्यांच्या वैयक्तिक प्रेरणेसोबतच सामाजिक क्षेत्राच्या अस्तित्वाचा व्यापक संदर्भ व प्रयोजन काय याविषयी स्पष्टता व नेमका दृष्टिकोन विकसित करण्यास मदत होईल ही आशा! ‘का?’ याचं उत्तर मिळाल्यास पुढे ‘काय?’ आणि ‘कसं?’ ही उत्तरे मिळणं आपसूकच सोपं होईल.


अमृत बंग
amrutabang@gmail.com


लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा लेखकाच्या लोकसत्ता लेखमालेतील सदरात प्रकाशित झालेला लेख आहे.




Monday 27 May 2024

युवांचा नैतिक निर्णय-गोंधळ

कॉलेजच्या कट्ट्यांवर तरुण-तरुणींच्या गटात होणार्‍या गप्पांमध्ये सहसा नैतिक मुद्द्यांवर चर्चा होत नाहीत. पण जर का कधीमधी एखाद्या विषयाला घेऊन योग्य – अयोग्य काय यावर वादविवाद झालाच तर बहुतांश वेळा त्याचा शेवट कसा होतो?
‘तू तुझ्याजागी आणि मी माझ्याजागी योग्य आहोत’,
‘इट डिपेण्ड्स ऑन द सिच्युएशन’,
‘सबका अपना अलग अलग पर्स्पेक्टिव्ह होता है, सभी अपनी जगह ठीक है’, ‘छोड ना... क्यूँ टेंशन लेता है?’
ही अथवा अशा वाक्यांचे विविध प्रकार आपल्याला वारंवार ऐकू येतात. हे कशाचे द्योतक आहे?

वैयक्तिक आवडीनिवडीच्या पलीकडे नैतिक मुद्द्यांवर विचार व भाष्य करताना, त्याबाबत आपली काही भूमिका ठरवतांना अनेक युवांना अडचण जाते. या पुढे जाऊन स्वत:च्या जीवनात जेव्हा प्रत्यक्ष काही निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा एकतर त्यांचा फार गोंधळ उडतो किंवा काही एका विशिष्ट पद्धतीनेच (फायदा / तोटा) बहुतांश निर्णय घेतले जातात.
युवांची ‘मॉरल डेव्हलपमेंट / नैतिक विकासाची’ प्रक्रिया काय असते? ते नेमका कसा विचार करतात?
निर्माणमधील आमचा अनेक युवांसोबतचा अनुभव तसेच या विषयाच्या वैज्ञानिक शोधसाहित्याच्या अभ्यासातून काही मुद्दे पुढे येतात:

1. बर्‍याचशा तरुण-तरुणींनी नैतिक मुद्द्यांविषयी फारसा विचारच केला नसतो. परीक्षा, कॉलेज, पी.जी. / प्लेसमेंट्स आणि मजा यांच्या गदारोळात मी जे काही शिकतो आहे किंवा पुढे जे काही करणार आहे, जसा जगणार आहे त्याचा नैतिक बाजुने विचार करण्याची त्यांना कधी गरज भासत नाही व उसंत देखील मिळत नाही. मेकॅनिकल इंजिनियरिंग केल्यानंतर मी लॉकहीड मार्टिन या युद्धसामग्री व शस्त्रे बनविणार्‍या कंपनीमध्ये नोकरी करणार की एखाद्या ‘इलेक्ट्रिक व्हेहिकल्स’ अथवा ‘रिन्युएबल्स रिसर्च’ करणार्‍या कंपनीत, हा निव्वळ कोणाचे पॅकेज किती एवढाच प्रश्न नसून नैतिक देखील आहे हे सहसा तरुण मुला-मुलींच्या ध्यानीमनी नसते. आणि म्हणूनच कधी अशा विषयांविषयी चर्चा छेडल्यास त्यांच्या प्रतिक्रिया या ‘म्हणजे...’, ‘माहित नाही...’, ‘पण...’, ‘मला वाटते...’, ‘आय गेस...’ अशा अनिश्चिततापूर्ण असतात. या इमर्जिंग ऍडल्ट्सना गुंतागुंतीच्या नैतिक प्रश्नांना कसे सामोरे जायचे, सुसंगत तर्क कसा करायचा यासाठीचे मार्गदर्शन व बौद्धिक साधने कोणी फारशी दिलेलीच नसतात. तशा विचारांना, संवादांना ते अगदी क्वचितच सामोरे गेले असतात. आणि म्हणुनच एक प्रकारचा ‘नैतिक सापेक्षतावाद’ (मॉरल रिलेटीव्हिजम) – सब रिलेटिव्ह है, हर कोई अपनी जगह पे ठीक है – बळावताना दिसतो. मग हिटलरपण आपल्या जागी ठीकच होता असे म्हणायचे का? पोस्टमॉडर्निझमच्या वाढत्या प्रभावात बळावलेला नैतिक व्यक्तिवाद नैतिक बाबींवर सामाजिक चर्चा, विवाद, संवाद व सहमती साध्य करण्याच्या जबाबदारीपासून मुक्तता देतो आणि म्हणुनच अनेकदा सोईस्कर वाटतो. पण म्हणून तो श्रेयस आहे का? बहुलता आणि विविधतेचा स्वीकार करणे, विरुद्ध नैतिकदृष्ट्या सापेक्षतावादी असणे यात फरक आहे आणि तो कळणे महत्त्वाचे आहे.

2. याचाच दुसरा परिणाम म्हणजे स्वतःच्या नैतिक विचारांना आवाज देणे हेच जणू अनैतिक आहे असे वाटायला लावणारे पियर प्रेशर! स्वतःचा नैतिक दृष्टिकोन व्यक्त करणे (मद्यपान असो वा रॅगिंग, कट प्रॅक्टीस असो वा विजेचा अपव्यय, ...) म्हणजे जणू इतरांवर वर्चस्व गाजवणे आणि नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे असे भासवले जाते. यामध्ये काही नैतिक मूल्य नाही तर ही केवळ एक वैयक्तिक निवड आहे, व्यक्तीगत मामला आहे असे मानले जाते. म्हणूनच अनेक युवा स्वत: कोणतेही भक्कम नैतिक दावे करणे पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करतात, तसेच इतरांच्या नैतिक मतांवर टीका करणे टाळतात. फळस्वरूप आम्ही नैतिक संभाषण कमी करतो आणि त्यावर आधारित भूमिका घेणे हे गप्पाटप्पा, गॉसिप आणि निष्क्रियतेवर सोडतो. माझी मॉरल आयडेंटिटी, नैतिक ओळख काय आहे हे समजणे हा ‘यूथ फ्लारिशिंग’चा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या अभावात नैतिक निर्णय घेण्याची आणि नैतिकदृष्ट्या सुसंगत जीवन जगण्याची असमर्थता ही युवांमधली एक प्रकारची निर्धनता व कुपोषण आहे.

3. व्यक्तीच्या नैतिक विचार प्रक्रियेचा विकास कसा होतो याबाबात शिकागो विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स कोहलबर्ग यांची स्टेज थिअरी प्रसिद्ध आहे. सुलभ रुपात सांगायचे झाल्यास कोहलबर्गच्या मते व्यक्तीच्या नैतिक विचार व निर्णयक्षमतेचा विकास तीन पातळ्यांतून टप्प्याटप्प्याने होतो. यातील पहिल्या पातळीला कोहलबर्ग प्रि-कन्व्हेंशनल असे म्हणतो ज्यामध्ये प्रामुख्याने ‘फायदा / तोटा काय’ (प्रोज अँड कॉन्स) या विचारसरणीतून निर्णय घेतले जातात. आई रागावेल म्हणून अमकी गोष्ट करु नये, काका चॉकलेट देतील म्हणून तमके वागावे असे ज्याप्रमाणे लहान मुले ठरवतात ती ही पातळी. पुढची पातळी म्हणजे कन्व्हेंशनल. आजुबाजुचे लोक काय विचार करतात, कसे वागतात, ‘गुड बॉय – गुड गर्ल’ कडून काय अपेक्षित आहे, सहजगत्या समाजमान्य काय, त्यानुसार निर्णय घेण्याची ही पातळी. पौंगंडावस्थेतील अनेक मुले ‘सभी लोग तो यही कर रहे है’ अशा कारणाने जेव्हा निर्णय घेतात ती ही विचारसरणी. तिसरी आणि या थियरीमधील सर्वात वरची पातळी म्हणजे पोस्ट-कन्व्हेंशनल अथवा ‘मूल्याधिष्टीत’ पातळी. या टप्प्यावर इतर लोक काय म्हणतात किंवा फायदा/तोट्याचे हिशेब यापेक्षा व्यक्ती स्वतंत्ररीत्या आपला मूल्यविचार ठरवते, योग्य – अयोग्य कशाला म्हणायचे ते ठरवते आणि त्यानुरुप निर्णय व वर्तन करते. समजायला सोपे असे एक ठळक उदाहरण म्हणजे महात्मा गांधींची दांडी यात्रा! स्वत:ला अटक होऊ शकते या तोट्याचा विचार न करता आणि तत्कालीन समाजमान्यता व कायद्यालाही झुगारुन त्यांना जे नैतिकदृष्ट्या योग्य वाटले तो निर्णय घेऊन तद्नुसार वागणे ही म्हणजे कोहलबर्गची तिसरी पातळी. विविध समाजसुधारकांच्या जीवनात अशा प्रकारचे अनेक प्रसंग आपल्याला दिसतील. आपण स्वत:ही कधी आपल्या जीवनात असे निर्णय घेतले असतील किंवा आजुबाजुच्या लोकांमध्ये बघितले असतील. ज्यांच्याविषयी आपल्याला नैतिक आदर वाटतो असे लोक नजरेपुढे आणाल तर त्यांत या प्रकारे ‘मूल्याधिष्टीत’ विचार करणारे लोक दिसतील.

कोहलबर्गचे संशोधन मात्र असे देखील सूचित करते की बहुतांश लोक हे नैतिक तर्काच्या दुसर्‍या (कन्व्हेंशनल) टप्प्याच्या पलीकडे जात नाहीत. आणि जर यदाकदाचित तिसर्‍या पातळीकडे वाटचाल झालीच तर ती सहसा वयाच्या विशीच्या दशकात होते. म्हणुनच या काळात युवांना माझी नैतिक संहिता कोणती ज्यानुसार मला माझे जीवन जगायचे आहे ही स्पष्टता येण्यास मदत करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या जीवनातील निर्णय आणि निवडींची क्रमवारी कशी लावायची? त्याला नैतिक आधार असू शकतो का? कुठला? या बाबत तरुणांना स्पष्ट विचार करण्याची, ओळखण्याची आणि निर्णय घेण्याचा सराव करण्याची (मॉरल जिमिंग) संधी मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. मुळात मनाने चांगले असणारे अनेक युवा यामुळे मात्र अयोग्य विचार करताना दिसतात. नुकताच घडलेला एक प्रसंग: महाराष्ट्रातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील एक रेसिडेंट डॉक्टर तेथील एम.बी.बी.एस.च्या अंतिम वर्षाला असलेल्या काही मुलींना त्रास देत होता. मात्र त्या मुली याविषयी ठामपणे बोलायला, तक्रार करायला घाबरत होत्या. का तर त्यांना भीती होती की तो रेसिडेंट त्यांना परीक्षेच्या वेळेस अडचण पैदा करेल. तुम्ही नापास व्हाल अशी धमकी त्याने दिलेली. ‘क्यूँ रिस्क लेना’ असा पातळी एक वरील विचार किंवा ‘ऐसा थोडा बहोत तो होता ही है, पिछले बॅच वालोंनेभी सह लिया था’ असा पातळी दोन वरील विचार, दोन्हीनुसार मान खाली घालून अन्याय सहन करणे हा मार्ग होता. एम.बी.बी.एस.ला गेलेल्या मुलींची ही अवस्था तर बाकीच्यांची काय गत असेल? सुदैवाने आमच्या निर्माण शिबिरात सहभागी झालेली अशी त्यांची एक सीनियर होती तिने हा मुद्दा लावून धरायचे ठरवले. कुठल्याही हालतीत असली अयोग्य वागणूक खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका तिने घेतली. पीडित मुलींना एकत्र करुन समजावले, धीर दिला, कॉलेजच्या डीनकडे एकत्र तक्रार नोंदवली आणि शेवटी त्या रेसिडेंटला रस्टिकेट करण्यात आले. तिचे अभिनंदन करतानाच इतर युवांमध्ये या प्रकारचे धैर्य कसे निर्माण होईल यावर विचार करणे गरजेचे आहे.

4. फायदा / तोटा काय यानुसार निर्णय घेणे ही दैनंदिन जीवनातल्या साध्या सोप्या व्यावहारिक प्रसंगांमध्ये बर्‍याचदा उपयुक्त पडणारी पद्धत आहे. मात्र तिला तिथेच मर्यादित नाही ठेवले आणि जास्त महत्त्वाच्या निर्णयांसाठी तिचा वापर करायचा ठरवला तर मात्र अडचणी आणि संभ्रम सुरू होतो. उदाहरणार्थ, माझा पर्पज काय, मी नेमके काय प्रकारचे काम करु, जोडीदार म्हणून कोणाला निवडू अशा मूलभूत मुद्द्यांसाठी ‘प्रोज अँड कॉन्स’ ही विचारपद्धती मदतरुप ठरत नाही, कारण आज एक गोष्ट चांगली वाटते तर उद्या तिचाच दुसरा पैलू चिंताजनक वाटतो. स्पष्टता आणि निश्चय याऐवजी गोंधळ, काळजी व सततची अस्वस्थता अनुभवास येते. म्हणूनच माझी मूल्ये काय, योग्य – अयोग्य ठरवण्याचे माझे निकष काय व त्यानुसार जगण्याचे निर्णय घेण्याची क्षमता विकसित होणे हे तरुण वयासाठी अत्यावश्यक आहे. तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासोबतच, तरुणांना त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात मार्गदर्शन करणारी नैतिक मूल्ये शोधण्यात मदत करणे हे देखील शिक्षणाचे, पालकांचे आणि आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. त्यातूनच युवांचा निर्णय-गोंधळ दूर होईल.


अमृत बंग


लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.


amrutabang@gmail.com