'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 17 September 2013

सीमोल्लंघन, सप्टेंबर २०१३

सौजन्य: अतुल गायकवाड, atuldd99@gmail.com   

सिंहस्थ- कुसुमाग्रज

(डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ही कविता पनवेलच्या व्याख्यानात वाचली होती)

व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले

रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला

बँड वाजविती, सैंयामिया धून
गजांचे आसन, महंता‌सी

आले खड्ग हाती, नाचती गोसावी
वाट या पुसावी, अध्यात्माची?

कोणी एक उभा, एका पायावरी
कोणास पथारी, कंटकांची

असे जपीतपी, प्रेक्षकांची आस
रुपयांची रास, पडे पुढे

जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ
त्यात हो तुंबळ, भाविकांची

क्रमांकात होता, गफलत काही
जुंपते लढाई, गोसव्यांची

साधू नाहतात, साधू जेवतात
साधू विष्ठतात, रस्त्यावरी

येथे येती ट्रक, तूप साखरेचे
टँकर दुधाचे, रिक्त तेथे

यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची
चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी

येथे शंभराला, लाभतो प्रवेश
तेथे लक्षाधीश, फक्त जातो

अशी झाली सारी, कौतुकाची मात
गांजाची आयात, टनावारी

तुज म्हणे ऐसे, मायेचे माइंद

त्यापाशी गोविंद, नाही नाही.

विवेकाची हत्या


२० ऑगस्ट २0१३ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट अक्षरांनी लिहिला जाईल. या दिवशी उगवत्या सूर्यासमोर डॉ.नरेंद्र दाभोलकर या प्रबोधन सूर्यास कायमचे ग्रहण लागले. दाभोलकरांसारख्या सेवाव्रतीची झालेली निघृण हत्या धक्कादायक तर आहेच पण ती महाराष्ट्राच्या इतिहासास लांछनास्पद आहे.या घटनेमुळे महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली असून प्रबोधन, समाजसुधारणेच्या बाबतीत महाराष्ट्र किमान ३ दशके मागे गेला आहे.
आपला उत्तम चाललेला डॉक्टरी पेशा सोडून संपूर्णवेळ समाजकार्याला वाहून घेणे हे समाजाप्रती खरी आस्था, तळमळ असल्याखेरीज साध्य होत नाही. आणि ज्या लोकांना समाजाप्रती खरी आस्था, कळकळ असते, समाज उत्थानाचेच ज्यांचे ध्येय असते त्यांच्याकडूनच समाजप्रबोधनाचे असे महान कार्य घडते. डॉ.दाभोलकरांनी डॉक्टरी पेशा सोडला पण डॉक्टरचा रोगावर इलाज करणेहा पवित्र धर्म सोडला नाही.
जो धर्म, जो समाज जुन्या बुरसटलेल्या चालीरीतींना चिटकून राहतो त्याचे पतन होते; जो धर्म, जो समाज पाश्चात्त्य अंधानुकरण करतो त्यात न्यून निर्माण होते आणि जो धर्म, जो समाज आपल्यामध्ये कालानुरूप बदल करतो, प्रथा, रुढी, परंपरा यांच्या कालसंगत अन्वयार्थ लावतो आणि त्यानुसार आचरण करतो त्या समाजाचे उत्थान होते. डॉ.दाभोलकरांचा प्रबोधन पंथ असा प्रशस्त होता.
डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी लोकांच्या श्रद्धेला तडा जाईल असे वक्तव्य, वर्तन कधीही केले नाही. “देव आहे का नाही ?” या प्रश्नाचे उत्तर देखील त्यांनी नंतर जाहीरपणे देणे टाळले, पण अंधश्रद्धेवर कठोर आघात करण्याची एकही संधी सोडली नाही. किंबहुना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमध्ये जी अस्पष्ट, अरुंद सीमारेषा असते ती अधोरेखीत करण्याचे कार्य त्यांनी अविरत केले. अंधश्रद्धा निर्मूलन हे त्या महान कार्याचे नाव.
निश्चित विचार घेऊन एखादी चळवळ उभी करणे, कार्यकर्ते जोपासणे आणि मूल्यांपासून दूर न जाता ती चळवळ चालू ठेवणे हे काम सोपे नाही, परंतु डॉ. दाभोलकरांना हे साध्य झाले ते त्यांची समर्पित वृत्ती, ध्येयनिष्ठा आणि तात्त्विक अधिष्ठान यामुळेच. धर्माचा, श्रद्धेचा प्रश्न लोकांच्या भावनांशी निगडीत असतो त्यामुळे जपून वागावे लागते. डॉ. दाभोलकरांनी जे विचार मांडले, जी भूमिका घेतली ती बुद्धीवादाशी निगडीत होती. त्यामागे शास्त्रीय संशोधन होते. चिकित्सक अभ्यास होता. त्यांनी नुसतीच थिअरी मांडली नाही तर प्रात्यक्षिक देऊन भंपक बाबांच्या चमत्कारातील भोंदूगिरीचे पितळ उघडे करून दाखवले.
सततच्या अभ्यासामुळे, आपल्या भूमिका बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहण्याच्या भूमिकेमुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीस प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. आणि या आत्मविश्वासातूनच ते चमत्कार सिद्ध करून दाखवणाऱ्यास २१ लाख रुपयांचे इनाम जाहीर करू शकले आणि हे आव्हान आजतागायत कोणीही स्वीकारलेले नाही. विद्यापीठात जोतिषशास्त्र अभ्यासविषय म्हणून लागू होण्याला त्यांनी विरोध केला तो बुद्धीवादी भूमिकेतूनच.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ कधीही नकारात्मक नव्हती आणि ती कायम सनदशील आणि लोकशाही मार्गाने चालवली गेली. या चळवळीने फॅसिस्ट प्रवृत्तीला आव्हान दिले आणि त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार मान्य करून खुल्या चर्चेचे आवाहन देखील केले. पण त्यांचे आव्हान स्वीकारण्याची कुवत आणि आवाहनाला प्रतिसाद देण्याची मानसिकता प्रतिगामी चळवळीत नव्हती.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अंनिस कोणाच्या विरुद्ध होते ? ते त्या अपप्रवृत्तींविरोधात होते ज्या करणी करते म्हणून स्त्री ला विवस्त्र करून तिची धिंड काढण्याची शिक्षा देतात. जे स्त्रीला डाकिन ठरवून तिच्या डोक्यात खिळे ठोकण्याची शिक्षा देतात. जे स्त्री च्या पावित्र्याची परीक्षा घेण्यासाठी तिला लोखंडाचा तप्त तुकडा जिभेवर ठेवण्यास सांगतात आणि जीभ भाजली नाही तर ती पवित्र असा पावित्र्याचा अघोरी आणि अवास्तविक निकष ठरवतात. ते त्या भोंदू बाबांविरुद्ध होते जे लोकांच्या भोळेपणाचा, श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतात, स्त्रियांचे लैंगिक शोषण करतात, ‘चमत्कारकरून मंत्र्यांसाठी, क्रिकेटपटूसाठी सोन्याची चेन काढतात आणि गरिबांसाठी साधा अंगारा काढतात. त्यांचा विरोध या अपप्रवृत्तींच्या भ्रष्ट अर्थकारणास, अनैतिक आचरणास आणि त्यापायी समाजाच्या होणाऱ्या अपरिमित हानीस आणि नैतिक अध:तनास होता.
१९९५ पासून जादूटोणा, अघोरी प्रथांविरुद्ध कायदा निर्माण व्हावा म्हणून त्यांनी दिलेला लढा हा त्यांच्या लोकशाही मूल्यांवरील निष्ठेचे प्रतिक आहे.भारतीय घटनेनेदेखील मूलभूत कर्तव्यांमध्ये विज्ञान निष्ठदृष्टीकोन स्वीकारण्याचे सूचित केलेले आहे. डॉ. दाभोलकरांनी आयुष्यभर घेतलेली भूमिका ही त्यांची घटनेशी बांधिलकी अधोरेखीत करणारी आहे.
पूर्णवेळ समाजकार्य करणाऱ्या लोकांस वैयक्तिक आयुष्यात अनंत अडचणींना सामोरे जावे लागते, आर्थिक ओढाताण सहन करावी लागते. यासाठी डॉ.दाभोलकरांनी सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना केली. या उपक्रमाअंतर्गत समाजसेवकांना काही निकषांवर ठराविक मानधन दिले जात असे. स्तरावरचा हा असा पहिला उपक्रम होता. या उपक्रमाची मांडणी जरी लक्षात घेतली तरी डॉ.दाभोलकरांमधील सहृदय माणसाचे दर्शन घडते.
डॉ.दाभोलकरांसारख्या समाजसुधारकांवर झालेली जहरी टीका, त्यांचा अपमान-अवहेलना महराष्ट्रात पूर्वापार चालत आलेली आहे. हा तो समाज आहे ज्याने ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले, तुकारामाची हेटाळणी केली, शिवाजी महाराजांना क्षुद्र ठरवले, जोतिबा फुल्यांवर दगड मारले, सावित्री बाईंवर शेण फेकले, न्या.रानड्यांना बिस्किटे खाल्लीम्हणून प्राय:चित्त घ्यायला लावले, आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली आणि उभी हयात समोरून भूमिका मांडणाऱ्या डॉ.दाभोलकरांवर मागून हल्ला केला. डॉ. दाभोलकरांची हत्या ही समाजातील विवेकाची हत्या आहे. पुरोगामित्वाची हत्या आहे.
ज्या समाजात प्रत्येक माणसाचा आत्मसम्मान, प्रतिष्ठा जपली जाईल, बुद्धीच्या निकषावर प्रत्येक भूमिका ठरवली जाईल, रुढी-प्रथा-परंपरा कोणाचा बळी घ्यायला वापरल्या जाणार नाहीत तर अभिजात संस्कृतीला अधिक समृद्ध करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाईल, जेथे धर्माच्या नावाखाली कोणाचे शोषण होणार नाही, श्रद्धेवर अंधश्रद्धा मात करणार नाही अशा निकोप, समृद्ध, सजग आणि सदैव जागरूक नवसमाजाची निर्मिती हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे स्वप्न होते. आणि हे स्वप्न उघडया डोळ्यांनी पाहिलेले असल्याने तेच त्यांचे ध्येय देखील होते.
ज्या मूल्यांचा ध्यास घेतला, निष्ठा ठेवली त्या मूल्यांची परीक्षा देण्याचे प्रसंग सामान्य माणसाच्या आयुष्यात क्वचित येतात. आणि या प्रसंगी कच खाल्ल्याने त्यांचा पराभव होतो. डॉ दाभोलकरांच्या आयुष्यात असे प्रसंग वारंवार आले आणि प्रत्येक प्रसंगातून ते तावून सुलाखून बाहेर पडले. प्रत्येकवेळी त्यांचा जय झाला असे नाही पण त्यांचा पराभव देखील कधीच झाला नाही.
त्यांचे मारेकरी पकडले जातील, जाणारही नाहीत. त्यांना शिक्षा व्हायची तेव्हा होईल, होणारही नाही. जादूटोणा विरोधी विधेयक पारित होईल होणार नाही. पण आता आपल्या सर्वांवर एक समाज म्हणून मोठी जबाबदारी आलेली आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकरांसारख्या प्रबोधनकारांनी, समाजसुधारकांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याची. असे आपण केले नाही आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभोअशी पोकळ, कृतीहीन प्रार्थना केली तर तो देखील एक भोंदूपणाच ठरेल.
डॉ.नरेंद्र.दाभोलकारांशी मी व्यक्तिश: केवळ १० मिनिटे बोललो आहे. तुम्ही पूर्णवेळ समाजकार्य करताना आर्थिक गरजा कशा पूर्ण करता?” या प्रश्नाचे इतर डॉक्टर लाईफ फेलोशिप वर असतात पण मी वाईफ फेलोशिप वर आहेअसे आपल्या पत्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे उत्तर त्यांनी दिले होते. त्यांच्या हत्येची बातमी टी.व्ही. वर पहिली आणि मन सुन्न झाले. या वेळी आठवलेल्या कवी ग्रेस यांच्या ओळी मात्र अश्रू रोखू शकल्या नाहीत

   हले काचपात्रातली वेल साधी
   निनादून घंटा जरा वाकल्या...
   खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा
   प्रभूने अशा पापण्या झाकल्या..

 स्व. आणि कै हे शब्द त्यांना आवडले नसते. आणि हे शब्द त्यांच्या साठी नाहीत.
डॉ.नरेंद्र.दाभोकारांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
डॉ.नरेंद्र.दाभोलकर गेले नाहीत..डॉ.नरेंद्र.दाभोलकर जात नसतात..!

गरज बरस प्यासी धर्ती पर, फिर पानी दे मौला!

-१८ ऑगस्टदरम्यान वैद्यकीय मुलांसाठी निर्माण ५.२ ब शिबीर संपन्न झाले. ४ दिवस गडचिरोलीच्या आदिवासी व गैर आदिवासी गावातील एका ठराविक वैद्यकीय समस्येच्या व्याप्तीचे निरीक्षण करून शिबीर संपेपर्यंत ही समस्या सोडवण्यासाठी नियोजन करणे व हे नियोजन करण्यासाठी मदत करू शकतील अशा सत्रांचे आयोजन हे या शिबिराचे सूत्र होते.  
जगजीत सिंगांच्या ‘गरज बरस प्यासी धर्तीपर फिर पानी दे मौला’ या गझलेने शिबिरास सुरुवात झाली. शिबिरार्थ्यांनी गत सहा महिन्यांतील आपापले अनुभव, कृती अनेक प्रसंगातून झालेले स्वत:चे शिक्षण इतरांसोबत शेअर केले. गावात जाण्याआधी सर्वांच्या मनात अनेक प्रश्न डोकावत होते. सर्वांची पाच गटात विभागणी करून त्यांना मलेरिया, हागवण, गरोदरपणा, तंबाखूचे व्यसन आणि सर्जरी असे आरोग्यविषयक पाच विषय देण्यात आले. गटात बसून सर्वांनी आपण कसा ह्यांचा अभ्यास करू ह्याची आखणी केली शिबिरार्थी गावांकडे रवाना झाले. गावांतून परत आल्यावर शिबिरार्थ्यांनी एका प्रार्थनेनंतर गावातले मजेशीर अनुभव व मार्मिक निरीक्षणे सर्वांसोबत शेअर करून शिबिराचा उत्साह  वाढवला.
श्री. मिलिंद बोकीलांनी शिबिरार्थ्यांच्याच गावांतील अनुभवांचा आधार घेत खेड्यातीलसमाजरचना त्यामागची जडणगडण समजावून सांगितली. योगेश दादाने (डॉयोगेश कालकोंडे) त्याच्या छोट्याशा गावापासून अमेरिका व तिथून परत शोधग्राम हा प्रवास सर्वांसमोर सादर केला. विद्यार्थीदशेपासूनच प्रमाण मानल्या गेलेल्या गोष्टींना/रिवाजांना प्रश्न विचारणे योगेश दादाच्या प्रवासातून वारंवार ठळकपणे समोर येत होते. इतर प्रभावी सत्रांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो अम्मांच्या मुलाखतीचा. अम्मांचा नीडरपणा खूप भावल्याचे शिबिरार्थ्यांनी नमूद केले. ‘एका प्रश्नाचा प्रवास’ या सत्रात नायनांनी  नवजात मृत्यूचा प्रश्न त्यांना दिसला कसा, तो मोजला कसा, त्यावर उपाययोजना कशी केली, ती कशी राबवली व त्याचा गडचिरोली व इतरही राज्यांत/देशांत बालमृत्यूदरावर काय परिणाम झाला यावर विस्तृत मांडणी केली. आरोग्यदूत काजूबाईंनी ‘नवजात बाळाला आरोग्यसेवा कशी द्यावी’ हे तरुण डॉक्टरांना शिकवले तेव्हा तरुण डॉक्टरांनी  काजूबाईंना मनापासून दाद दिली.
नवजात बाळाचे उपचार तरुण डॉक्टरांना शिकवताना काजूबाई
कोणतीही समस्या सोडवताना तिचे मोजमाप महत्त्वाचे. सर्चच्य श्री. संतोष सावळकर व श्री. महेश देशमुख यांनी अनुक्रमे तंबाखू व बालमृत्यूची समस्या कशी मोजली याचे सादरीकरण केले. तसेच समस्या सोडवण्याचे विविध मार्ग सर्चमध्ये काम करणारे निर्माणचे तरुण डॉक्टर्स वैभव, सुजय व विक्रम यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे सादर केले. या काही सत्रांचा व जगभरातील संशोधनांचा आधार घेत रात्रभर जागून सर्व शिबिरार्थ्यांनी आपापल्या विषयांची सादरीकरणांची तयारी केली. पिंपळातच दोन घटका विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रत्यक्ष सादरीकरणे झाली, तेव्हा नायनांनी प्रत्येक सादरीकरण खूप बारकाईने कून प्रत्येकाला मार्गदर्शन केले.
सादरीकरण करताना शिबिरार्थ्यांचा एक गट
कोणतेही नियोजन न करता झालेला स्वयंस्फूर्त सांस्कृतिक कार्यक्रम निर्माणच्या signature dance सहित जवळ जवळ रात्रभर चालला.
या आरोग्याच्या समस्या गावागावांत मोठ्या प्रमाणावर आहेत. शिबिरात स्वाध्याय करता करता खऱ्याखुऱ्या आयुष्यातही या समस्या सोडवण्याची प्रेरणा मिळो ही शिबिरार्थ्यांना शुभेच्छा!

दारूच्या जाहिरातींवर सचिन महालेचा हल्लाबोल !

‘आपल्या जिल्ह्यातून दारू जाहिरातींचे फलक हटवावेत कसे?’ या प्रश्नाची उकल करताना डॉ. सचिन महाले (निर्माण ५) महत्त्वाच्या टप्प्यावर पोचला आहे. प्रश्नाची व्याप्ती मोजण्यापासून सुरुवात, माहितीच्या अधिकाराचे हत्यार व या माहितीच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा यामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे ८०% दारूच्या जाहिरातींचे बॅनर निघाल्याचे सचिनने सांगितले.
“मी ज्या शाळेत दहावीपर्यंत शिकलो तिच्या १०० मी. परिसरात २ बीअर बार आहेत. त्यांच्याबाहेर लावलेले दारूच्या जाहिरातींचे फलक जणू मुलांना आकर्षित करण्यासाठी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना माझ्या भागात मद्यविक्रीचे फलकदेखील दूर का करता येऊ नयेत?’ निर्माण ५.१ शिबिरानंतर असा विचार मनात घोळत असल्याचे सचिन म्हणाला. यासाठी माहितीच्या अधिकारा अंतर्गत त्याने पुढील माहिती मागवली:
१.      जिल्ह्यात ठोक व किरकोळ मद्यविक्रीची किती दुकाने आहेत?
२.      त्यातील नियमबाह्य व नियमांतर्गत किती?
३.      दुकानांबाहेर लावण्यात येणाऱ्या फलकांसाठी नियम काय आहेत?
४.      या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास कोणत्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे?
२ महिन्यांनंतर मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुमारे २५% मद्यविक्री महिला व १८ वर्षांखालील मुलींच्या नावाने होत होती. तसेच फलकांवरील जाहीरातींद्वारे माद्यविक्रीस प्रोत्साहन देणे महाराष्ट्र देशी दारू नियम ‘१९७३’अंतर्गत नियमबाह्य आहे व मुंबई दारूबंदी कायदा १९४९ मधील नियमांत त्यास शिक्षा आहे.
या पुराव्यांच्या आधारे डॉ. संग्राम व डॉ. नुपूर पाटील यांच्यासोबत सचिनने जिल्हाधिकारी कार्यालयात फलकांविरूद्ध निवेदन दिले. या मुद्याला प्रसार माध्यमांतून बरीच प्रसिद्धी मिळाली. बार मालक भेटून गेल्यानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम राहत १५ दिवसांनी पुन्हा निवेदन दिले.
दारूबंदी अजून दूर असली तरी जिल्ह्यातील सुमारे ८०% दारू जाहिरातींचे फलक निघणे ही सुरुवात असल्याचे सचिन म्हणाला. दारूमुक्तीच्या दिशेने पाउल म्हणून तरूणांना व रुग्णांना समुपदेशन करणे सचिनने सुरू केले आहे. त्याला त्याच्या कामासाठी शुभेच्छा!

स्त्रोत- सचिन महाले, dr.sachin.mahale@gmail.com

मयूर दुधेने मित्राला दिली व्यसनमुक्तीची प्रेरणा

            काही महिन्यांपूर्वी सौरभ सोनावणेला आपल्या तीन मित्रांची दारू सोडवण्यात यश आले होते. हीच किमया सिगरेटच्या बाबतीत साधलीय मयूर दुधेला (निर्माण ५).
मयूर बी.जे. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असून त्याच्या एका शाळेपासूनच्या मित्राला सिगारेट पिण्याचे वाइट व्यसन जडले होते. दिवसाला ४ ते ५ सिगारेट्स तो सहज पीत असे. फार्मसी शिकणाऱ्या  ह्या मित्राचे व्यसन परीक्षेच्या वेळी दिवसाला २ पाकिटे पिण्याइतके वाढायचे. वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने सांगून देखील त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. मयूरला मात्र वैद्यकीय शिक्षण घेताना फुप्फुसाच्या, तोंडाच्या कर्करोगाचे अनेक रोगी सारखे पहायला मिळत व त्यामुळेच आपल्या मित्राला व्यसनाच्या विळख्यातून सोडवणे किती गरजेचे आहे ह्याची जाणीव होई. मयूरने ह्या विषयावर माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्याचदरम्यान निर्माण ५ च्या पहिल्या शिबिरात व्यसनांचा विषय हाताळण्यात आला. त्यानंतर मात्र मयूरने मित्राचे व्यसन सोडवण्याचा निश्चय केला. मयूर व त्याच्या भावाने एके दिवशी ह्या मित्राला सिगरेटने  होणाऱ्या दुष्परिणामांची शास्त्रीय माहिती दिली. तसेच त्यामुळे होणाऱ्या आर्थिक व सामाजिक दुष्परिणामांची देखील जाणीव करून दिली. त्या दिवसापासून आपल्या मित्राने सिगरेट सोडल्याचे मयूरने आवर्जून सांगितले. मयूरचे ह्या कामाबद्दल अभिनंदन!
व्यसन सोडवण्याचा एक असा नेमका मार्ग नाही. आपल्याच सामूहिक अनुभवातून आपण व्यसनमुक्तीचे शास्त्र शोधू शकतो का?
स्रोत - मयुर दुधे, mayurdudhe99@gmail.com

डॉक्टरांनी संपावर जावे का?

निर्माण शिबिरांत आपल्या अनेक मार्गदर्शक आपला प्रवास शिबिरार्थ्यासमोर मांडतात. या प्रवासादरम्यान घडलेल्या अनेक घटनांनी आपण प्रभावित होऊन जातो. आपल्याही जीवनात आपली मूल्ये/विचारांची परीक्षा पाहणाऱ्या अनेक घटना येत असतात. आपल्यातलाच एक मित्र, भागवत रेजीवाड (निर्माण ५), नुकतेच घडलेल्या एका घटनेदरम्यान निर्माण सत्राचा अर्थ आपल्या जीवनात शोधू शकला आहे. 
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात BAMS करणारा भागवत इंटर्नशिपदरम्यान नांदेडच्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अपघात विभागात जबाबदारी सांभाळत होता. नांदेडच्या अपघात विभागात आजूबाजूच्या जिल्ह्यांतील शासकीय  रुग्णालयातून रुग्ण रेफर होत असल्यामुळे रोजच खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. या रुग्णांना आपात्कालीन सेवा देण्यासाठी ३ इंटर्न्स व एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक झाली होती. मात्र रुग्णांची संख्या पाहता इंटर्न्सची संख्याही वाढवावी यासाठी भागवत व सहकाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला.
निर्माण शिबिरात ‘सेवाग्राम ते शोधग्राम’ या प्रवासादरम्यान नायनांनी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून संपावर जाण्यास नकार दिल्याचे सांगितले होते. ‘आपण संपावर गेल्यावर रुग्णांना, त्यातही तातडीने आरोग्यसेवेची गरज असणारे रुग्णांना कोण आरोग्यसेवा देईल?’ असा विचार भागवतला छळत राहिला. अखेर त्याने संपातून माघार घ्यायचा निर्णय घेतला व अपघात विभागात आपली जबाबदारी सांभाळली. मूल्यांच्या परीक्षेत खरे उतरल्याबद्दल भागवतचे अभिनंदन !

स्त्रोत- भागवत रेजीवाड

नागपूर निर्माणच्या वार्षिक आढाव्यात डॉ. अभय बंग यांचे मार्गदर्शन

नंदा खरे व विद्यागौरी खरे यांच्याबद्दल गटाकडून कृतज्ञता व्यक्त


निर्माणचा नागपूरमधील गट मागील वर्षभर सक्रियपणे कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रमांच्या आयोजनात सहभागी राहिला आहे. ह्या वर्षभरामध्ये त्यांना नागपूर व जवळच्या भागांमधील विविध व्यक्ती / संस्था ह्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ह्या सर्व लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, व मागील एका वर्षाच्या कामाचा आढावा घेण्याच्या हेतूने, आंतरराष्ट्रीय युवा दिन्याचे औचित्य साधून ११ ऑगस्ट रोजी एका छोट्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ह्या प्रसंगी डॉ. अभय बंग ह्यांनी युवा पिढीसमोरील पुढील १० वर्षांतील आव्हानेह्या विषयावर मार्गदर्शन केले
डॉ. बंग ह्यांनी मुख्यत्वे भांडवलशाही व्यवस्थाधार्मिक हिंसाचार आणि जागतिक तापमानवाढ  पर्यावरणाचा ऱ्हास ही प्रमुख आव्हाने असून त्यांच्याबद्दल कृती करण्याची तातडीने गरज असल्याचे सांगितले. पैसे कमविणे हे जगण्याच्या आयोजनाचे केवळ एक साधन असून त्याला प्रयोजनाचे स्थान देऊ नयेतसेच मर्यादित स्वरूपात का होईना, पण आपल्या समाजाचे नेतृत्व स्वीकारून पुढे येणे व कृती करणे गरजेचे आहे असे आवाहन ह्यावेळी त्यांनी तरुणांना केलेकशाला महत्व द्यायचे व आपले हित कशात मानायचे ह्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असेदेखील त्यांनी युवकांना सांगितले 
ह्याप्रसंगी नंदा खरे व विद्यागौरी खरे ह्यांचे सर्व निर्माण गटाने त्यांच्या सततच्या मार्गदर्शनाबद्दल विशेष आभार मानले. रंजन पांढरे (निर्माण ४) ह्याने मागील वर्षभरातील निर्माण नागपूर गटाच्या उपक्रमांचा आढावा घेतला.    
स्रोत - रंजन पांढरे, pandhare.ranjan33@gmail.com