'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday 2 September 2013

चॉकलेटचे पार्सल, सप्टेंबर २०१३


प्रिय युवा मित्रांनो,
सात दिवसांपूर्वी अनिल अवचट व विवेक सावंत यांच्यासोबत मी साताऱ्याला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कुटुंबियांना भेटून आलो. नरेंद्र आम्हा तिघांचा मित्रही होता व अनेक सामाजिक उपक्रमांत अतिशय भरवशाचा खंबीर सहकारीही होता. त्याच्या मृत्यूपेक्षाही ज्या तऱ्हेने त्याचा मृत्यू झाला, त्यामुळे आम्ही तिघेही व्यथित होतो. तुम्ही सर्वही असाल.
            श्री. हेरंब कुलकर्णी यांनी व्यथित मनाने लिहिलेली कविता आज पाठवतो आहे. सोबतच नरेंद्रचा कमी माहित असलेला एक सुंदर लेख या पार्सलमध्ये आहे.

            निर्माणमधील अनेकांना शिक्षण या विषयात रस आहे. तंत्रज्ञानामुळे शिक्षणपद्धतीत काय क्रांती होऊ घातली आहे? ‘The Economist’ मध्ये नुकतेच आलेले एक संपादकीय अतिशय रसपूर्ण व उत्साहवर्धक आहे.

            भारताचा विकास कसा होणार? आर्थिक विकासाच्या (growth) मार्गाने की ‘न्याय्य वितरण’ या मार्गाने? प्रा. अमर्त्य सेन विकासाचा तिसराच मार्ग, आशिया खंडाचा मार्ग सांगत आहेत.

            गेल्या महिन्याच्या ‘चॉकलेटचे पार्सल’ नंतर तुमच्या ज्या अनेक प्रतिक्रिया आल्यात, त्यापैकी एक, भूषण देवची ‘गृत्समद’ या लेखावर आलेली इमेल अशी:

प्रिय नायना,
            लेख फार छान आहे, यात वैज्ञानिक व अध्यात्मिक ऋषी यांचा परिचय झाला. मी मागील सप्ताहात वर्धा निर्माणी ग्रुपसोबत गोपुरी येथे गेलो होतो. तेथे करुणा फुटाणे ताईंनी गृत्समद ऋषींबद्दल माहिती दिली होती व तुमच्याबद्दलच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या होत्या. हा लेख वाचल्यानंतर मला आठवलं की निर्माण शिबिरात एका संध्याकाळी पिंपळमध्ये प्रार्थना आटोपल्यावर सर्च मध्ये काम करीत असलेल्या एका निर्माणीच्या (नाव आठवत नाही) पालकांशी तुम्ही बोलत होतात. त्यांनी तुम्हला म्हटलं होतं की तुमचे वैज्ञानिक (scientist) आणि आध्यात्मिक अशी दोन्ही रूपे मला पाहायला मिळाली. तेव्हा तुम्ही सांगितलेले गांधीजींनी म्हटलेले "वैज्ञानिक ऋषी हवेत" या संदर्भातील वाक्य आठवले.
आपला निर्माणी
भूषण देव

            गांधीजींचा शब्द ‘सत्याग्रही सायंटिस्ट’ असा आहे. गांधीजींच्या मनातली ‘परिवर्तनाचा कार्यकर्ता कसा असावा?’ याबद्दल व विज्ञानाबद्दल असलेली भूमिका काही वर्षांपूर्वी डॉ. शंभू प्रसाद यांनी लिहिलेल्या लेखात उत्कृष्ट मांडली आहे. निर्माणमधील सर्व युवांना स्वतःला पडताळण्यासाठी हा महत्त्वाचा लेख आहे.

            कल्याणने विनोबांच्या ‘गृत्समद’वर प्रश्न विचारला आहे:

पाढे, कापसाची शेती आणि चंद्र्प्रकाशाचा गर्भावर होणारा परिणाम अशा तीन गोष्टींचा विचार करणारी व्यक्ती एक असू शकते. पण का सुचावं एखाद्या मनाला हे सारं? केवळ व्यावहारिक गरजांपोटी किंवा कुतूहलापोटी हे घडू शकतं?

...
हा श्लोक ह्यानेच "पाहिलेला", असं लिहिलंय विनोबांनी. वाचलेला, सांगितलेला किंवा लिहिलेला असं नाही. असं का? श्लोक पाहणं म्हणजे काय? 
कल्याण

            गृत्समदला हे जमलं कारण तो प्रत्यक्ष जीवन जगत होता व जीवनातील समस्या सोडवता सोडवता संशोधन करत होता. Action-research करणाऱ्यांचा तो आद्यगुरू ! म्हणून शोधग्राममध्ये एका इमारतीला त्याचं नाव दिलं आहे.
            “श्लोक पाहिला” असं का लिहिलं असावं? त्याने पुस्तकातून/गुगलवरून ती माहिती मिळवली नाही. त्या श्लोकातील अर्थ त्याच्या कविमनाला, मनःचक्षूंना प्रत्यक्ष दिसला असावा. ‘ऋषी’ या शब्दाचा अर्थदेखील ‘अंधारात किंवा दूरचे बघू शकणारा’ असा आहे असे अन्यत्र विनोबांनी म्हटले आहे. म्हणून त्याने तो श्लोक रचला किंवा रटला नाही, पाहिला.
  
          ख्वाब देखना पडता है !

नायना

No comments:

Post a Comment