Face
to face
समाजातल्या
प्रश्नांसाठी काहीतरी केलं पाहिजे अशी तळमळ निर्माण होण्यासाठी माझ्या कॉलेज
जीवनातील तीन अनुभव महत्त्वाचे ठरले: एक- मराठवाड्यातील दुष्काळात काम करण्याचा,
दुसरा- बांगलादेश युद्धाच्या काळात बंगालमध्ये refugee camp मध्ये काम करण्याचा, आणि तिसरा- बिहार दुष्काळाचा (जरी मी त्यात प्रत्यक्ष
सहभागी नव्हतो).
बंगालच्या refugee camp मध्ये एक महिना आरोग्यसेवा तर
देता आलीच, पण बांग्लादेशचं युद्ध, भारत पाकिस्तान संबंध, वेगळ्या बांग्लादेशच्या
मागणीमागील कारणीमीमांसा येथपासून सरकारी यंत्रणा कशी चालते, युद्धामुळे refugees ची स्थिती कशी दयनीय होऊन जाते, पन्नास हजारांच्या छावणीला आरोग्यसेवा कशी
पुरवायची हे कळत गेले. कॉलेजमधून बाहेर पडून आपण जेव्हा एखाद्या समस्येला तोंड
देतो, तेंव्हा त्या समस्येसोबतच तिच्या पुढे मागे असणारा समाज व राजकारण यांचाही
अनुभव येतो.
महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ १९७२-७३ साली पडला. रोजगार हमीचा जन्मच या
दुष्काळात झाला. मी तेंव्हा मेडीकल कॉलेजमध्ये internship करत होतो. दुष्काळात काम करायला मी स्वयंसेवक म्हणून गेलो. बीड जिल्ह्यातील केज येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रात आपला बेस करून दुष्काळावर जागोजागी काम करणारे जे मजूर
होते त्यांना आम्ही एक महिना आरोग्यसेवा दिली. ती देता देता दुष्काळ का निर्माण
झाला? फक्त गिट्टी फोडून दुष्काळाचा प्रश्न सुटेल का? असे प्रश्न पडू लागले.
प्राथमिक आरोग्य केंद्राताला विलक्षण गलथानपणा आणि भ्रष्टाचार प्रत्यक्ष बघायला
मिळाले. सरकारी आरोग्यव्यवस्था भारताच्या गरजांसाठी फार अपुरी आहे, शिवाय आम्हाला
देण्यात येणारं वैद्यकीय शिक्षणही त्या गरजांना पूरक नाही असं जाणवू लागलं. मग काय
केलं पाहिजे? या
अस्वस्थतेतून उत्तरे शोधण्यासाठी मी मित्रांना जे पत्र लिहिलं, त्यातून Medico Friend
Circle नावाची एक संघटना स्थापन झाली. पुढे ती देशव्यापी संघटना बनली आणि आजही सुरू
आहे.
बिहारच्या दुष्काळात मदत करण्यासाठी जयप्रकाश नारायणांनी तरूणांना आवाहन केले.
देशभरातून सुमारे ५०० युवा बिहारला गेले. त्यातूनच तरुण शांती सेना तयार झाली.
भारतात पुढची १० वर्षे परिवर्तनाची कामे त्यांच्याकडून घडली.
अनिल अवचटांचंही उदाहरण आहे. ते बिहारच्या दुष्काळात स्वयंसेवक म्हणून दोनदा
गेले. ‘पूर्णिया’ पुस्तक त्यातूनच निघालं. महाराष्ट्राला लेखक म्हणून त्यांचा
पहिला परिचय पूर्णियामधून झाला. कोणामध्ये दडलेला लेखक या समस्यांच्या निमित्ताने
बाहेर येतो, कोणामध्ये दडलेला सामाजिक आरोग्याचा तज्ञ बाहेर येतो. ‘स्व’भान
येण्यासाठी, ‘स्व’भाव ओळखण्यासाठी, ‘स्व’धर्माला सामोरं जावं लागतं असा माझा अनुभव
आहे.
या समस्यांना भिडताना आपल्या हातून जी काही थोडी सेवा होते, त्यामुळे आपलं
हृदय शुद्ध होतं, पण डोकं अस्वस्थ होतं. तरूणांना जेव्हा असं exposure मिळतं, तेंव्हा याचे खूप लांब पल्ल्याचे चांगले परिणाम होतात. म्हणून
निर्माणने महाराष्ट्रासमोर आलेलं दुष्काळाचं आव्हान स्वीकारून काम केलं पाहिजे.
नायना
‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेची उद्दिष्टे:
v समाज, पर्यावरण, सेवा कार्य आणि स्व या चारही पातळ्यांवर समजून घेण्याची, स्वतःला पारखण्याची आणि शिकण्याची
संधी युवांना उपलब्ध करून देणे
v युवांना दुष्काळ व पाण्याच्या प्रश्नावर तात्कालिक आणि कायमस्वरूपी उपाय समजणे
v सामाजिक प्रश्नांवर कृतीशील होऊ शकणारे नवे युवा ओळखणे
v एका मर्यादित भौगोलिक भागातील दुष्काळाच्या समस्येवर या युवांकडून ठोस कृती होणे
‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेत सहभागी
संस्था / गट:
v
Maharashtra
Knowledge Foundation
v
प्रगती अभियान
v
मराठवाडा शेती सहाय्य मंडळ (कृषी विज्ञान केंद्र)
v
ग्रामगौरव प्रतिष्ठान (पाणी पंचायत)
v
ACWADAM
v
मानवलोक
v निर्माण
निर्माणींचा प्रतिसाद:
v
आकाश भोर
(निर्माण ५) आणि विकास वाघमोडे (निर्माण ६) यांनी दोन महिने पूर्ण वेळ या
मोहिमेच्या समन्वयाचे काम केले.
v
संतोष गावळे (निर्माण १) आणि दीपक
पाटील (निर्माण ३) हे दोघे मन्याळी (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) आणि सोनाळे (ता. जामनेर, जि. जळगाव)
येथे ग्रामविकासाचे काम करतात. या दोघांनी स्वयंसेवकांना आपापल्या गावात कृती
करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
v
या मोहिमेत दोन महिन्यांच्या काळात ८५ स्वयंसेवकांनी
(निर्माण शिबिरांतून गेलेले २२ जण) कृती केली.
आढावा:
v
या मोहिमेत ८५ स्वयंसेवकांनी ५ जिल्ह्यांतल्या (जालन्याला
केवळ पाणलोट क्षेत्र विकासाचे प्रशिक्षण झाले.) ८ तालुक्यातील २१ गावांत काम केले.
एकूण ४५० मनुष्यदिवस काम झाले.
v
यातील साधारणपणे २० स्वयंसेवकांना सलग वेळ देता येणं शक्य
नसल्यामुळे वीकेंड्सना काम केले.
v
कामाचे स्वरूप:
o
नाशिक जिल्ह्यात ‘प्रगती अभियान’च्या सौजन्याने गावागावांत
रोजगार हमी योजने विषयी जाणीवजागृती करण्यासाठी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण व कृती
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
o
पुणे जिल्ह्यात ACWADAM या संस्थेने ‘प्रगती अभियान’च्या
मदतीने अशाच कृती कार्यक्रमाचे आयोजन केले.
o
जालन्याला ‘मराठवाडा शेती सहाय्य
महामंडळ’ने स्वयंसेवकांना पाणलोट क्षेत्र विकासाचे प्रशिक्षण दिले.
o
याच स्वयंसेवकांनी नित्रुड (जि.
बीड) व सोनाळे (जि. जळगाव) येथे जाऊन शेतकऱ्यांच्या सहभागाने त्यांच्याच शेतात
करायच्या पाणलोटाच्या उपचारांचे नियोजन (Net planning) केलं. दोन्ही ठिकाणच्या कृती कार्यक्रमांचे आयोजन MKF ने केलं.
o
आंबाजोगाई, बीड येथे ‘मानवलोक’च्या मार्गदर्शनाखाली
स्वयंसेवकांनी दुष्काळग्रस्त गावांचा सर्वे करून कृती आराखडा तयार केला.
o
मान्याळी (जि. यवतमाळ) येथे संतोष गवळेच्या मार्गदर्शनाखाली
स्वयंसेवकांनी श्रमदानातून बांधबंधिस्ती केली.
o
पुणे जिल्ह्यात ‘पाणी पंचायत’ने केलेल्या कामाचा
स्वयंसेवकांनी फीडबॅक घेतला. तसेच वृक्षारोपणासाठी रोपे तयार केली.
v कामाचे फलित:
o
शेतात पडणारे पाणी शेतातच मुरावे आणि शेतातली सुपीक माती
वाहून जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाने ३ गावांतील २६१ एकर शेताचं net planning झालं.
o
मन्याळीच्या नाल्यात श्रमदानातून दोन अनघड दगडी बांध
बांधण्यात आले.
o
सोनाळेला ७० घरांचा सर्वे होऊन ज्या कुटुंबांना संडास
बांधण्याची इच्छा आहे आणि शेतीशाळेत सहभागी व्हायची इच्छा आहे त्यांची यादी बनली.
दीपक या कुटुंबांचा पाठपुरावा करणार आहे.
o
नाशिक जिल्ह्यात गावकऱ्यांना job cards आणि बँक खाते काढायला स्वयंसेवकांनी मदत केली.
o
याखेरीज स्वयंसेवकांचे शिक्षण
झाले. त्यांच्या काही मोजक्या प्रतिक्रिया देत आहोत....
स्वयंसेवकांच्या प्रतिक्रिया:
‘कुठल्याही समाजात/व्यवस्थेत एक ठराविक काळ
गेल्यानंतर आपोआपच एक equilibrium तयार होतो, किंवा तसं वाटतं. आपल्याला फक्त हे ओळखता आलं
पाहिजे की हा equilibrium वाईट स्थितीतला आहे की चांगल्या. आणि तो जर वाईट स्थितीतला असेल तर काम
करण्याची नक्कीच गरज आहे.”
यानंतर
कामाच्या गरजेबद्द्ल मुळीच शंका उरली नाही. फक्त कामाच्या पद्धतीत बदल हवा हे
लक्षात आलं.”
-
शतानंद पाटील
“गावाची एकी झाल्यावर केवढा कायापलट होऊ शकतो याचे जिवंत
उदहरण जालन्यातल्या कडवंचि गावच्या शेती विकासतून पहायला मिळाले. जालना जिल्हा
दुष्काळी, परंतु
कडवंचि गावात पाण्याची कमतरता नाही. गावची सगळी शेती नाशिकसारख्या द्राक्ष वेलींनी
सजलेली. गावात शेतावर जाऊन काही शेतकऱ्यांना भेटलो. त्यांचा गावाची पाणीपातळी, विहिरीत-शेततळ्यात शिल्लक पाणी, त्याचं अगदी लिटर लिटरचं नियोजन, प्रत्येक झाडाला दैनंदिन लागणारं
पाणी, पावसाला
असलेला अवधी, मागच्या
नऊ-दहा वर्षांत भारतात-महाराष्ट्रात-गावात पडलेला पाउस, या वर्षीचे तज्ञांचे अंदाज आणि
त्यावरून गावाचं नियोजन या सगळ्या गोष्टी आम्हाला दोन ६०-७० वयाचे वृद्ध सांगत
होते. या वृद्ध शेतकऱ्यांचा अभ्यास आणि नियोजन माझ्यासारख्या तरुणांनाही लाजवणारं
होतं.”
-
भारत गोरे
“डोक्यावर २-३ हंडे घेऊन निघालेल्या स्त्रियांनी, मोठे मोठे barrel वाहून आणणाऱ्या दुबळ्या बैलांनी आणि बैलगाडीच्या मागे निरागसपणे धावणाऱ्या
लहानग्यांनी पुढच्या रविवारी आमचं स्वागत केलं. १०-१५ किमी वर धरण होतं, पण गावाला
प्यायला पाणी मिळत नव्हतं. गावकऱ्यांशी बोलू लागलो, तर त्यांनी फक्त पावसाळ्यातच
शेती करत असल्याचं सांगितलं. एका पिकातून येणारे उत्पन्न आणि नंतर रोहयो ची व इतर
कामे करून दिवस जातायत यात त्यांना आनंद होता. त्यांची शिकली सवरलेली मुले
कामासाठी मुंबई, पुणे, सोलापूर ई
शहरांमध्ये स्थलांतरित झाली आहेत आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर त्यांच्या शेतांचे पण
छोटे छोटे तुकडे होत आहेत. एकंदरीत शेती करणं out of date होत
चाललाय की काय असं वाटलं लोकांशी बोलून.
आता पावसाळ्यात गावामध्ये पाऊस किती पडला हे गावातील
लोकांबरोबर मोजून त्यांच्या शिवारातून किती पाणी वाहून गेलं यावर त्यांच्याशी
पावसाळ्यानंतर चर्चा करावी असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जेणेकरून या
पावसाळ्यानंतर तरी गावात पाणी साठवण्यासाठी काही प्रयत्न करता येतील.”
-
प्रथमेश
मुरकुटे
“पहिल्यांदा गावात लोकांशी बोलायला गेल्यावर मिळालेला
response न विसरता येण्यासारखा आहे. एक छोटी
सभाच मी address करतीय असं वाटलं. लोकांच्या प्रश्नांना तोंड देताना सुरुवातीला कचरले, पण नंतर
छान संवाद झाला.
लोकांकडे जाताना उत्तरे घेऊन जाऊ नये, आपली उद्दिष्टे
त्यांच्यावर लादू नये हे लक्षात आले.”
-
सयाली खांडेकर
“सोनाळे गावात काम करताना लक्षात आले, की ‘दुष्काळ’ पाहणे
कठीण आहे. एका बाजूला गावाच्या मध्यवर्ती भागातील हौद पाण्याने भरला होता.
गावाच्या टाकीत पाणी होतं. गावात नळ होते. मात्र दुसऱ्या बाजूला नळाला ५ दिवसांतून एकदा पाणी यायचं.
अंघोळीसारख्या क्षुल्लक गोष्टीचे खूप planning करायला लागायचं. पाण्याअभावी
आम्हाला भेटलेल्या सर्वच शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. आणेवारीचा अधिकृत आकडा ४२
पैसे होता. दुष्काळ ही गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचं लक्षात आलं.
शेतात बांधबंधिस्ती करण्यासाठी net planning करणं आणि ती बांधबंधिस्ती प्रत्यक्ष होणं यात खूप फरक असल्याचं जाणवलं. अनेक
शेतकरी आम्हाला बरं वाटावं म्हणून net planning मध्ये सहभागी व्हायचे. त्यांची
देहबोली मात्र वेगळंच बोलायची. पाणी व माती अडवण्यासाठी शेताच्या मध्ये बांध
घातल्यास नांगरणी करणे कठीण होते. बांध बांधण्यासाठी शेतातली माती ‘वाया’
घालवण्यास शेतकरी सहज तयार होत नाही. बांधबंधिस्ती पेक्षा शेतमालाला मिळणारा
बाजारभाव व इतर समस्या महत्त्वाच्या वाटतात. यावर्षी net planning करून खूप शिक्षण झालं. मात्र काम व्हायचं असेल तर ही लांब काळाची लढाई आहे
असं जाणवलं.”
-
निखिल जोशी
मला समजलेला
दुष्काळ
‘झुंज
दुष्काळाशी’ या मोहिमेचा आकाश भोर समन्वयक. या
कामाच्या निमित्ताने आकाशने पाणी प्रश्नावर काम करणाऱ्या अनेक संस्थांसोबत
काम केले. वेगवेगळया चष्म्यांमधून दुष्काळाकडे पाहण्याचा त्याला समृद्ध अनुभव आला.
तो त्याच्याच शब्दांत...
पी. साईनाथ यांची Nero’s Guests ही documentary पाहिली आणि खूपच अस्वस्थ झालो. माझ्या आजूबाजूला एवढं
सगळं सुरू आहे आणि मला याची काहीच माहिती नाही, याचं वाईट वाटलं. त्यामुळे जेव्हा
‘झुंज दुष्काळाशी’ या उपक्रमाबद्दल समजलं, तेंव्हा त्याच्या कामात लगेच सहभागी
झालो.
दुष्काळ हा इतर
नैसर्गिक आपत्तींपेक्षा निराळा आहे. भूकंप, त्सुनामी यामुळे कमी काळात प्रचंड
नुकसान होते. मोठ्या प्रमाणात जीवितहानीही होते आणि आर्थिक नुकसानही होते.
दुष्काळाचे मात्र असे नाही. प्रत्यक्ष जीवितहानी कमी असली तरी शेती-गुरे यावर
विपरीत परिणाम होतो. त्यामुळे स्थलांतर होते, आर्थिक घडी विस्कटते, आरोग्य-शिक्षण
यावर देखील परिणाम होतो व त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक-कौटुंबिक समस्या देखील
तितक्याच भयानक आहेत हे समजलं.
सध्याचा दुष्काळ
१९७२ च्या दुष्काळापेक्षा वेगळा आहे. तेंव्हा २-३ वर्षे पाऊसच कमी पडला होता.
यावेळी मात्र तसे नाही. पाऊस भरपूर पडलाय, पण आपण पाण्याचे व्यवस्थित नियोजन न
केल्याने ही वेळ आली आहे. हा दुष्काळ मानवनिर्मित आहे. इगतपुरीमध्ये २३०० मिमी
पाऊस पडूनही पाण्यासाठी रोज पायपीट करावी लागते. दुष्काळ निवारणासाठी, सिंचनासाठी
मोठी धरणे, बंधारे, कालवे बांधले गेले. पण महाराष्ट्रातील फक्त १८% शेती ही
याद्वारे केली जाते. बाकी ८२% शेतीसाठी पावसाचे पाणी व भूजलाचा वापर केला जातो.
गेल्या काही वर्षांत भूजलाचा प्रचंड उपसा झालाय. सरकारने बोअरसाठी २०० फूट ही
मर्यादा घालून दिली आहे. पण ती कोणी पाळताना दिसत नाही. काही ठिकाणी भूजल पातळी
१००० फूट एवढी खोल गेली आहे.
वाहून जाणारे
पावसाचे पाणी माती पण वाहून नेते. १ इंच मातीचा थर तयार व्हायला १० हजार वर्षे
लागतात. भूजल पातळी उंचावण्यासाठी, तसेच मृद्संधारण व पाणलोट विकासासाठी माथा ते
पायथा करायच्या उपचारांची माहिती मिळाली. कडवंची पाणलोट क्षेत्राला भेट दिली.
तिथल्या शेतकऱ्यांशी गप्पा मारल्या. ८००-१००० मिमी पाऊस पडणाऱ्या कडवंचीत
पाणलोटाच्या कामामुळे झालेला बदल थक्क करणारा होता. या पाणलोट क्षेत्राचे नियोजन
कसे करावे याविषयी कृषीविज्ञान केंद्र, जालना येथे Net planning चं प्रशिक्षण घेतलं.
ACWADAM भूजलासंदर्भात शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून काम करते. गावात पडणारा पाऊस व
बाष्पीभवनाचा दर, ओढ्यातून वाहून जाणारे पाणी इ. मोजमापे रोजच्या रोज घेतली जातात.
यावरून किती पाणी जमिनीत मुरते हे समजते. ही मापके आणि लोकांचा पाण्याचा अंदाजे
वापर यावरून गावाचे पाण्याचे गणित मांडले जाते. जमिनीखालून पाण्याचे प्रवाह कसे
आहेत, recharge zone व discharge zone कोणते हे पाहिलं जातं. त्यानुसार recharge zone मध्ये पाणलोटाची जास्त कामे झाली तर त्याचा जास्त फायदा होतो. गावाचे water budgeting
करून हे पाण्याचे गणित लोकांना सोप्या भाषेत समजावले जाते. त्यानुसार पीक
पद्धती बद्दल मार्गदर्शन केले जाते.
प्रगती अभियान दुष्काळाच्या
या प्रश्नावर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम करते. जेणेकरून लोकांना
त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे स्थलांतर थांबेल, तसेच
यातून होणारी वैयक्तिक व सामुदायिक लाभाची ८०% कामे ही पाणलोटाची असतात. तिथे
झालेल्या प्रशिक्षणामध्ये रोहयो सोबतच पंचायत राज व्यवस्था, जलयुक्त
शिवार योजना, दुष्काळ
आणि मीडिया तसेच संविधान आणि आपण या विषयांबद्दल अधिक जाणून घेता आले. लोकांची नरेगा बद्दल अपुरी व
चुकीची माहिती, प्रशासनाची
अनास्था,
भ्रष्टाचार
यामुळे ही योजना कशी बारगळते आणि प्रगती अभियान करत असलेल्या कामामुळे होणारा बदल
या गोष्टी प्रत्यक्ष कामातून अनुभवता आल्या.
कामाचा मुख्य उद्देश जरी
दुष्काळ हा असला तरी त्या निमित्ताने गावाची, गावातील इतर समस्यांशी
झालेली ओळख, शेतीबद्दल
अधिक जाणून घेता आले. श्रमदान करणे हा फारच छान अनुभव होता. श्रमदानातून
मन्याळी येथे दोन अनघड दगडी बांध बांधले. या दोन महिन्यात बऱ्याच ठिकाणी फिरणे
झाले,
अनेक
लोकंशी ओळखी झाल्या. दुष्काळाचा प्रश्न अधिक व्यापकतेने समजला आणि योग्य पद्धतीने
लोकसहभागातून काम केले तर भविष्यात येणारे संकट टाळता येईल असा विश्वास देखील वाटला.
एका
मोहीमेने दुष्काळही संपणार नाही आहे, आणि आपल्यालाही आपले ध्येय १००% सापडणार नाही
आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यानंतर पुन्हा भेटू...