२०१५
ची
निर्माण
ऑक्टोबर
कार्यशाळा
सेवाग्राम
मध्ये
पार
पडली. 'सेवाग्राम आश्रम व बापुकुटीकडे कसं पहावं?' याविषयी नायना शिबिरार्थ्यांसोबत बोलत होते. गांधी हा माणूस, त्याची तत्त्वे यातील बारकावे टिपण्यासाठी नायनांच्या बोलण्यातून आलेले काही प्रसंग...
१९३६ मध्ये राहण्यासाठी घरेही बांधली नसताना गांधी इथे रहायला लागले. आश्रमात कुटी बांधण्यासाठी गांधींनी मुन्नालाल शहांना काही सूचना दिल्या होत्या. १०० रूपयांमध्ये कुटी बांधून झाली पाहिजे. पाच मैलांच्या परिधीत जे सामान मिळेल ते वापरूनच कुटी बांधली पाहिजे. त्यामुळे त्यावेळी कुटी बांधताना लोखंड, सीमेंट अजिबात वापरले गेले नाही. अगदी दारांचे खटकेही लाकडांचेच बनवले गेले. योगायोगाने या गोष्टी आता environmental
fashion म्हणून येऊ घातल्या आहेत.
माझं लहानपण नंतर इथेच गेलं. गांधींच्या सोबतचे अनेक
आश्रमवासी, गांधींचे पुत्र रामदासभाई व सून निर्मलाबहन
त्यावेळी आश्रमात होते. मुन्नालाल शहांची मुलगी शाळेत माझ्या
वर्गात होती. पण बापुकुटीकडं कसं पहावं हे सर्वांत प्रभावीपणे मला कोणी शिकवलं असेल तर इव्हान इलिच यांनी. १९७० च्या दशकातले इव्हान इलिच हे प्रमुख
जागतिक चिंतक. शिक्षण, आरोग्य,
पर्यावरण आणि संस्कृती या विषयांवरील त्यांची पुस्तके अतिशय landmark
मानली जातात. इलिच तेव्हा भारतात आले होते. गांधींना भेटायला जायचं तर मला तयारी केली पाहिजे म्हणून पहिले सहा महिने वाराणासीला राहिले. भारत समजायचा तर मला भारताच्या भाषा आल्या पाहिजत म्हणून भारताच्या मूळ भाषा -
संस्कृत आणि तामिळ शिकले. सहा महिन्यांनंतर १९८० च्या आसपास ते सेवाग्रामला आले. सात दिवस आश्रमात राहिले. सव्वा सहा फूट उंचीचा तो म्हातारा रोज बापुकुटीमध्ये जाउन बसायचा. मोठा विद्वान माणूस. आम्हाला त्यांच्याकडून काही ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सात दिवस काहीच बोलले नाहीत. सातव्या दिवशी त्यांनी जे 'The
message of Bapukuti' हे भाषण केलं ते अद्भुत होतं. (ते भाषण इथे वाचता येऊ शकतं -
http://www.mkgandhi.org/museum/msgofbapuhut.htm) ते म्हणाले, “मी सात दिवस जेव्हा बापुकुटीमध्ये बसून होतो, तेव्हा मी गांधींशी संवाद साधू शकलो. या कुटीचा साधेपणा मला खूप भावला. किती कमी गरजांमध्ये माणूस राहू शकतो याविषयी खूप मोठा संदेश ही बापुकुटी जगाला देत आहे.”
खरंच, गांधींसारखा माणूस, ज्याचा एक लक्ष लोकांसोबत परिचय होता, २० हजार लोकांशी नियमित पत्रव्यवहार होता (त्यातील अनेकांना ते स्वतःच्या हाताने पत्र लिहायचे. उजवा हात थकला तर डाव्या हाताने लिहायचे.), जो २०० जणांचा आश्रम चालवत आहे, देशाचं राजकारण व नैतिककारण सांभाळत आहे, किती कमी सोयीसुविधांमध्ये राहू शकतो! त्यांचं सुंदर वाक्य आहे, 'मला जगाला दारिद्र्य नाही शिकवायचं. I
want to convey to the world the beauty of the austerity and the slowness of the
life.' टॉलस्टॉय ची कथा आहे ना, की माणसाला शेवटी साडे तीन हात जमीन लागते; तसेच माणसाला शेवटी घर किती मोठं लागतं, सामान किती लागतं? बापुकुटी
त्याचं उत्तर देते.
परचुरे शास्त्रींची कुटीही ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाची आहे. परचुरे शास्त्री पूर्वी साबरमती आश्रमात संस्कृत शिकवायचे. त्यांनी मुळशीच्या सत्याग्रहात भाग घेतला होता, जेलमध्ये गेले. त्या काळात त्यांना कुष्ठरोग झाला. त्यानंतर काही वर्षे ते पुण्यात राहिले. जेव्हा फार जास्त अंग गळायला लागले व नातेवाईकांना त्रास होऊ लागला तेव्हा 'हिमालयात जाऊन मरून जाऊ' असा विचार करून तिकडे निघून गेले. तिकडे जेव्हा रोग व वेदना खूप वाढल्या तेव्हा निरूपायाने शेवटचा आसरा म्हणून इथे गांधींकडे आले. गांधींची वाट पाहत एका झाडाखाली बसून होते. संध्याकाळी फिरायला जाताना गांधी तेथे येताच त्यांच्या पायाशी परचुरे शास्त्रींनी लोळणच घातले. गांधीनी त्यांना प्रथम ओळखलेच नाही. त्यांनी स्वतःची ओळख करून देताच गांधी स्तब्ध झाले. ते गांधींना म्हणाले, “बापू,
शेवटचा आसरा म्हणून तुमच्याकडे आलो आहे. मला आसरा तरी द्या, नाही तर मरू तरी द्या."
गांधींनी तेव्हा त्यांची तात्पुरती तिथेच सोय केली. त्यांना जेवण आणि ब्लॅंकेट दिले. गांधी आश्रमात आले, पण खूप अस्वस्थ होते. परचुरे शास्त्रींचे काय करायचे? कुष्ठरोग संसर्गजन्य रोग आहे. त्या काळात तर लोक कुष्ठरोगाला एवढे घाबरायचे की १०० फूटांवरही यायला तयार नाही व्हायचे. गांधींनी आश्रमवासीयांची मीटिंग घेतली. सर्वांना सांगितले, "परचुरे शास्त्री आले आहेत. आपलाच माणूस आहे. त्यांना आश्रमात घ्यायची मला इच्छा आहे. मी स्वतःला तर धोक्यात टाकू शकतो, पण तुम्हा सर्वांची परवानगी घेतल्याशिवाय मी त्यांना कसे आत घेऊ?" आश्रमवासीयांनी लगेच संमती दिली. त्यानंतर गांधींनी त्यांना आश्रमात घेतले. त्याकाळात कुष्ठरोगावर औषध नव्हते. गांधी स्वतः आपल्या हातांनी रोज परचुरे शास्त्रींची मालिश करायचे. भारतामध्ये भारतीय माणसाने कुष्ठरोगावर पहिलं काम केलं ते मनोहर दीवाण यांनी. बाबा आमटेंचंही कुष्ठरोगावरचं नंतर केलेलं काम खूप मोठं आहे. पण कुष्ठरोगाबद्दलचा stigma
मोठ्या प्रमाणात गांधींमुळे मोडला गेला.
ही समोरची महादेव कुटी. महादेवभाई गांधींचे मानसपुत्र, त्यांचे सेक्रेटरी. गांधींशी इतके एकरूप झालेले की कधी कधी गांधींच्या नावाने तेच संपादकीय लेख लिहायचे. गांधी एकदा तपासून घ्यायचे, पण सहसा त्यांना एकही अक्षर बदलावे लागायचे नाही. महादेवभाईंना गांधींचे मन जितके माहित होते, तितके कदाचित कस्तुरबांनाही माहित नव्हते. सेवाग्राम आश्रमात केवळ ब्रह्मचर्याची शपथ घेणारेच रहायचे, पण महादेवभाईंचे एकच कुटुंब त्याला अपवाद होते. येरवड्याच्या जेलमध्ये गांधींसोबत गेल्यानंतर सातच दिवसांत महादेवभाईंचे हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झाले. त्यावेळी बघणा-यांनी अतिशय करूण वर्णन करून ठेवले आहे. गांधी महादेवभाईंचे
डोके मांडीवर घेऊन म्हणाले, "महादेव, तुम मेरे अज्ञा के बिना मरही नही सकते. महादेव, ऑंखे खोलो." गांधी अतिशय स्थितप्रज्ञ होते, पण महादेवभाईंच्या निधनाच्या वेळी ते जेवढे भावनाविवश झाले तेवढे कस्तरबांच्या निधनाच्या वेळीही झाले नाहीत. कस्तुरबा वृद्धपणात आजारामध्ये गेल्याने गांधींची मानसिक
तयारी झाली होती.
पुढे गांधींनी असे ठरवले की दलित-सवर्ण विवाह सोडल्यास कोणत्याही विवाहाला स्वतः जाऊन आशीर्वाद द्यायचा नाही. महादेवभाईंचा मुलगा नारायण देसाई, जे माझे गुरू. नारायणभाई म्हणजे तर गांधींचा नातूच, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेला. नारायणभाईंचे लग्न एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीशी ठरले. जातपात पाळली नाही तरी दुर्दैवाने दोघेही ब्राह्मणच होते. आता गांधींना कसं सांगावं की लग्नाला या? गांधींना आमंत्रण द्यायची हिंमत नारायणभाईंच्या आईला होईना. त्यांनी प्यारेलालजींकडून निरोप पाठवला, 'बापूको कहो, नारायण की शादी है. बापू शादी में आशीर्वाद
देने जरूर आए, अपवाद करें.' गांधी म्हणाले, 'महादेव मेरा बेटाही था. तो नारायणभी मेराही है. इसिलिए मैं नही आऊंगा.' नाहीच, माझ्या घरच्या माणसासाठी तर मी अजिबातच अपवाद करू शकत नाही. तत्त्व लावायचं तर माझ्या घरापासून. त्याचे जास्तीत जास्त कष्ट मलाच झाले पाहिजेत.
हे जे आदि निवास आहे, त्याबाबतीत एक interesting
गोष्ट आहे. गांधी होते महाकंजूष. कोणताही खर्च करायचा, दहा रूपयांचा का असेना, सहजासहजी तयारच व्हायचे नाहीत. लोकांनी दिलेला पैसा, असा कसा खर्च करणार? या कुटीची सगळी दारं सुरूवातीला छोटी होती. गांधींच्या उंचीला ते चालून जायचे. खान अब्दुल गफार खान अनेकदा आश्रमात यायचे. त्यांची उंची साडे सहा फुट. त्यांना वाकून जावे लागायचे. एक दिवस गफलत झालीच. ते वाकायला विसरले आणि त्यांचे डोके दारावर आपटले. त्यांना ब-यापैकी लागलं, तेव्हा कुठे गांधींनी त्या दाराची उंची वाढवायला परवानगी दिली. खान अब्दुल गफार खान नॉर्थ वेस्ट फ्रंटीयरहून यायचे. तिथे सगळेच मांस खातात. ते आश्रमात यायचे तेव्हा गांधींनी त्यांच्यासाठी चक्क मांस मागवायला सांगितले. याला काय म्हणावं ते मला समजत नाही. शाकाहारी असण्याला अहिंसक म्हणायचे, का स्वतः कट्टर शाकाहारी असताना खान अब्दुल गफार खान यांना असह्य होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी मांस मागवण्याला अहिंसक म्हणायचे? आज गोमांसाबद्दल आपली काय भूमिका असावी? गाय मारू नयेच, पण माणूस मारावा का?
माझे आई-वडील सेवाग्रामलाच थोडे दूर, चरखा संघात रहायचे. माझी आई मला सांगते की रोज आमच्या घरासमोरून गांधीजी
चालत जायचे. हे ऐकून माझ्या अंगावर रोमांचच उभे राहतात. आपल्या घरासमोरून रोज गांधी
जायचे! फक्त तेव्हा माझा जन्मच झाला नव्हता! माझ्या आयुष्यात दुसरं कोणतंच regret
च नाही. गांधी असताना माझा जन्म झाला नाही हे एकमेव मोठं regret
आहे.
मला वाटतं हा आश्रम बघताना प्रत्येकाने आपापल्या नजरेने पहावा, आपापल्या हृदयाने पहावा. माझा अनुभव असा आहे की प्रत्येक वेळी मी जेव्हा बापुकुटीत जातो, मी त्यांना भेटतो. अगदी खरंच सांगतो. इतके वर्ष असंख्य वेळा तिथे जाऊनही माझ्यावरचा बापुकुटीचा प्रभाव काही कमी होत नाही. There
is some magic. You enter and the magic starts working on you. म्हणून काल २ ऑक्टोबरला आश्रमातील भाषणात मी सुचवलं की बापुकुटीत सार्वजनिक कार्यक्रमात न जाता एकटं जायला पाहिजे; आणि बापूंसोबत appointment
घेऊन जायला पाहिजे. ती appointment
घेता येते. ती आपली स्वतःच घ्यावी लागते. आपणच ठरवतो, आणि तिथे जाऊन शांतपणे बसलं की बापूंसोबत भेट होते. तर प्रत्येकाने थोडी appointment
घेऊन तिथे बसावं आणि गांधीला भेटावं.
नायना
(शब्दांकन – निखिल जोशी)