'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 31 October 2015

पुस्तक परिचय : झाडाझडती - विश्वास पाटील

झाडाझडती ही आधुनिक मराठी सहित्यातील राजकीय आणि सामजिक आशय असलेली महत्वपूर्ण कादंबरी आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा नेहरूंनी भारतात शेतीला सतत हुलकावणी देणाऱ्या पावसावर उपाय म्हणुन मोठमोठी धरणे बांधण्याचा प्रयत्न केला. परिणामी स्वातंत्र्योत्तर कालखंडात धरणांची संख्या वाढू लागली. यातूनच 'धरण ग्रस्त' नावाचा एक नव्या प्रकारचा अल्प संख्यांक गट तयार होऊ लागला. अगोदरच असणाऱ्या बांग्लादेशी विस्थापित आणि फाळणी चे विस्थापित यामधे आदिवासी, धरणग्रस्त इ. गटांची भर पडू लागली. यामधे बहुसंख्य ग्रामीण भाग असल्याने त्यात ग्रामीण लोक ओढले गेले. अश्या पार्श्वभूमीवर धरणग्रस्तांच्या प्रश्नांना एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न 'झाडझडती ' ने केला आहे.
            मुखपृष्ठावरील अर्धनग्न अवस्थेतील गरीब धरणग्रस्त हे भविष्यामुळे चिंताग्रस्त झालेले दिसतात. आतील पानावरील धरणग्रस्थानसाठी लढणारे गुरूजी खेटे मारून खंगलेले पण खंबीर दिसतात. कादंबरी सुरु होते तेव्हा धरण व्हावे म्हणून शिंगाड़े पाटील नावाचे खासदार उपोषणाला बसलेले असतात. कारण त्यांच्या मुलाचा हट्ट असतो साखर कारखाना काढायचा! त्यासाठी ऊसशेती पाहिजे, ऊसासाठी पाणी पाहिजे, पाण्यासाठी धरण आणि धरणासाठी जमीन व गाव... आणि याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे 'धरणग्रस्त'... धरणात जांभळी गावासह आणखी चार पाच गावे जाणार असतात.
            सहकार चळवळीमुळे जागोजागी ऊस क्षेत्रे व साखर कारखाने यांचे पेव फुटून साखरसम्राट नावाचा एक नवा सरंजामदारी वर्ग निर्माण झालेला असतो. जांभळी गावातील सरपंच व उपसभापती गावचे राजकारण करतात. तर शिंगाडे पाटील व सर्जेराव पितापुत्र तालुक्याचे राजकारण करतात. जांभळी गावात खैरमोडे नावाचे एक प्रामाणिक गुरूजी व अजाण जनता तेवढी शिल्लक असते. खैरमोडे गुरुजींनी या अगोदर कोयना धरणग्रस्तांचे हाल पाहिले असल्याने ते आपल्या गावातील धरणाला प्राणप्रणाने विरोध करतात. त्यासाठी धरणग्रस्तांची एकी करून संघटना उभी करतात व धरणाला २५ वर्षे राजकीय शह देतात.
            पण हळूहळू समीकरणे बदलू लागतात. राजकीय सत्तेपुढे गुरूजी व जनता टिकत नाही. शेवटी धरण तयार होऊ लागते आणि प्रचंड हालाखित विस्थापनाचे काम सुरु होते. धरण बांधणे सोपे पण पुनर्वसनाचे काम अतिशय अवघड. पिढ्यांपिढ़या एकाच ठिकाणी राहिलेल्या गावकऱ्यांना आपल्या गावाशी त्या परिसराशी आत्मीयता असते, पण पर्याय नसतो. त्यातच आळशी, असंवेदनशील, भ्रष्ट राजकारणी आणि प्रशासन यामुळे विस्थापितांचे प्रश्न न सुटणारे असतात. गुरूजी व जांभळी ग्रामस्थ हे पुनर्वसन कार्यालयात हेलपाट्या मारत राहतातदया पवार म्हणतात तसं..
बाई मी धरण धरण बांधिते
माझ मरण मरण कांडीते
            या वास्तवदर्शी ओळींची आठवण होते. राहण्याची गैरसोय, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, उपरे विस्थापित म्हणून शेजारील  गावातून होणार त्रास, गावगुंडांचा बायका मुलींना होणारा त्रास इ. मुळे गावकरी हतबल होतात. जांभळीतील सुभानजी या माणसाचे प्रेत त्याच्या कुटुंबपर्यंत नेण्यासाठी झालेली परवड आतड़े पिळवटून टाकणारी आहे...
            गावाचा सरपंच गावातील बहुसंख्य जमिनी हडपून श्रीमंत होतो. शिंगाडे पाटील सर्जेराव यांना कारखाना बांधून देतात. मध्यंतरी देशमुख नावाचे प्रामाणिक जिल्हाधिकारी येतात पण राजकीय दबावमुळे त्यांची बदली होते. गुरूजींच्या मुलीवर बलात्कार होतो, गुरूजींना मारहाण होते, पुढे ते मरण पावतात. गावातील पुढील तरूण आशास्थानाचा हैवतीने खून केला जातो आणि 'धरणग्रस्त' या जातीचे प्रश्न असेच जगाच्या अंतापर्यंत सुरूच राहतात...
            एक भीषण राजकीय आशय असलेली ही कादंबरी तिच्या सामाजिक परिणाममुळे सुन्न करून जाते. दोन वर्गातील संघर्ष, दोन गावातील संघर्ष, गरीब स्त्रियांची उच्चवर्ग श्रीमंतांकडून होणारी शारीरिक व आर्थिक पिळवणूक, प्रशासकीय अनास्था, भ्रष्टाचार, नैतिक अधःपतन, असंवेदनशीलता, मुजोर सरंजामदारी, औद्योगिक व्यवस्थेमुळे निर्माण झालेले प्रश्न, नवीन सामाजिक वर्ग, जीवनशैलीतिल बदल यामुळे संभ्रमित झालेला धरणग्रस्त हा वर्ग असे विविध कंगोरे कादंबरीत दिसून येतात.
            शतकानुशतके निवांत असलेली खेड़ी आणि आपल्या पारंपरिक जाती, निष्ठा, सण, व्रत, मूल्य जपणाऱ्या ग्रामीण जनतेला या नवीन राजकीय, सामाजिक, औद्योगिक शहरी व्यवस्थेत जगण्यासाठी, मृत्यूनंतरही करावा लागणारा संघर्ष समजावून घेण्यासाठी 'विश्वास पाटील' यांची 'झाडाझडती' अतिशय महत्वाची वाटते...

स्रोत: देवल सावरकर, natkhatdewal@gmail.com

1 comment:

  1. हि कादंबरी कोणत्या साली प्रकाशित झाली ?

    ReplyDelete