'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 August 2016

सीमोल्लंघन : जुलै - ऑगस्ट २०१६

सौजन्य: अमृता ढगे, dhage.amruta@gmail.com

नमस्कार मित्रमैत्रिणींनो...

मनापासून धन्यवाद !
            निर्माणची ७वी बॅच जानेवारी २०१५ मध्ये सुरू होत आहे. ७व्या बॅचच्या प्रसिद्धीसाठी सर्व निर्माणी, 'झुंज दुष्काळाशी' या मोहीमेत व सर्चमधील विविध कामात सहभागी स्वयंसेवक मित्र, निर्माण समुदाय, पत्रकार मित्र, प्राध्यापक मित्र यांनी निर्माणच्या अर्जाला व अस्वस्थ युवांना एकमेकांपर्यंत पोहोचवले; आपापल्या गावांतील कॉलेजेस मध्ये पोस्टर्स लावले, फेसबुक व्हाट्सअॅपवर आव्हाने-पोस्टर्स-व्हिडीओ शेअर केले, वर्तमानपत्रांतून निर्माणचे आव्हान तरूणांपर्यंत पोहोचवले. ३० ऑगस्टअखेर निर्माण प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील ३०४ जणांनी महाराष्ट्राबाहेरून ६ जणांनी अर्ज भरला आहे. अजूनही अर्ज येतच आहेत.
            सप्टेंबरमध्ये मुलाखती सुरू होणार आहेत. १५ ऑक्टोबरला निर्माणसाठी निवड झालेल्या युवांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. तत्पूर्वी महाराष्ट्रातील विविध जिल्हयांत या मुलाखती होणार आहेत. यादरम्यान शक्य तेंव्हा मुलाखती घ्यायला आणि मुलाखत घेणाऱ्या टीमला भेटायला नक्की या. प्रसिद्धीसाठी तुम्ही केलेल्या सहकार्यासाठी कृतज्ञता व मुलाखतींदरम्यान तुम्हाला भेटण्याची उत्सुकता आहेच.



निर्माण – दस साल बाद...
            समाजातील विविध समस्यांना आव्हान म्हणून स्वीकारू इच्छिणा-या युवांना संघटीत करणे, त्यांना आवश्यक मार्गदर्शन, कौशल्ये पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण ही प्रक्रिया सुरू झाली. बघताबघता निर्माणला १० वर्षेही पूर्ण झाली. या १० वर्षांत ३६ शिबिरांमध्ये ७१० निर्माणींनी सहभाग घेतला. यात ४० % मुली होत्या. यापैकी सर्वाधिक शिबिरार्थी (२८९) वैद्यकीय पार्श्वभूमीचे असून त्यांच्यासाठी सुयोग्य अशी वेगळी शिक्षणप्रक्रियाही सतत विकसित होत आहे. ७१० पैकी केवळ निर्माणी मुस्लीम असून मुस्लीम युवांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज यानिमित्ताने जाणवली. ४६० निर्माणींनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले असून आजच्या दिवशी त्यापैकी १२२ जण पूर्ण वेळ सामाजिक समस्यांवर काम करत आहेत, तर इतर जण आपापल्या परीने आपला वेळ, कौशल्ये, आर्थिक मदत देतच आहेत. विशेष गोष्ट म्हणजे निर्माणच्या कुटुंबातील १०० युवांनी निर्माणी मित्र/मैत्रिणीलाच जोडीदार म्हणून निवडले आहे ! याचदरम्यान आपल्याला ८८ रिसोर्स पर्सन्सनी निर्माण व निर्माणींच्या वैचारिक वाढीत हातभार लावला आहे.
            या काळात निर्माण शिबिरांशिवाय कुमार निर्माण, कृती शिक्षण कार्यक्रम ('झुंज दुष्काळाशी' या मोहीमेत व सर्चमधील विविध कामात कृतीतून शिक्षणाची संधी), IITB सोबत कार्यशाळा असे विविध कार्यक्रम विकसित होत आहेत.
            तसेच या काळात निर्माणची वेबसाईट, मुखपत्र सीमोल्लंघन, फेसबुक पेज, विकी पेज, युट्युब चॅनेल ही माध्यमे प्रस्थापित झाली असून प्रिंट मेडिया मध्येही निर्माणबद्दल आकर्षण राहिले आहे.
            दशकपूर्तीचे औचित्य साधत या १० वर्षांचा आढावा पुढील ५ वर्षांची वाटचाल याविषयी चिंतन करण्यासाठी 'बायफ' पुणे येथे १०-११ ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. बैठकीला निर्माण कुमार निर्माण टीमशिवाय नायना, आनंद करंदीकर, विवेक सावंत, MKCLKF चे उदय पंचपोर नरेंद्र खोत उपस्थित होते.

निर्माण टीमचा विस्तार
            अमोल शैलेश रखमा हेमा श्रीकांत (दोघेही निर्माण ) नव्याने, तर अमृत बंग पुन्हा रुजू झाल्यामुळे निर्माण टीमला बळकटी आली आहे.
            अमोल गेले महिने 'झुंज दुष्काळाशी'चा समन्वयक म्हणून कार्यरत होता. आताही त्याची मुख्य जबाबदारी कृतीशिक्षण कार्यक्रम असणार आहे. रखमा प्रामुख्याने निर्माण प्रसिद्धी व निवड प्रक्रियेशी संबंधित जबाबदा-या सांभाळेल. अमृतने गेल्या वर्षभरात University of Pennsylvania येथे MS (Non-Profit Leadership) हे पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्याच्या कौशल्यांचा निर्माणला नक्कीच फायदा होईल.

२०१५-१६ च्या दुष्काळाने माझा निर्णय बदलला - प्रतीक उंबरकर
            प्रतीक उंबरकर (निर्माण ) पाचवा 'कर के देखो' फेलो बनला आहे. या फेलोशिप अंतर्गत पुढचे वर्ष तो 'समाज प्रगती सहयोग' या संस्थेसोबत मनरेगा पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करणार आहे. 'समाज प्रगती सहयोग' पर्यंतचा त्याचा प्रवास त्याच्याच शब्दांत...
            "निर्माणच्या शिबिरांदाराम्यान मी 'शेतमालाची प्रक्रीया' आणि 'कमी खर्चाची शेती' या विषयांवर काम करण्याचे ठरवले होते. त्यानुसार BAIF बरोबर काम करायचे असे नियोजन केले होते. या कामांची पद्धत शिकून घ्यायची आणि नंतर स्वतःच्या गावात काम करायचे असे ठरवले होते. पण २०१५-१६ च्या दुष्काळाने माझ्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. आजच्या परीस्थितीत पाण्याची समस्याच मोठी वाटायला लागली आहे.
            माझ्या गावात ८० ते ९० फुटांवर विहिरीला पाणी आहे. तरीही शेतकऱ्याची मोटर हिवाळ्यात दोन ते तीन तासांमध्ये पाणी सोडणे बंद करते. ज्या शेतकऱ्याचे बोअर वेल आधी स्प्रिंकलरचे १५ नोझल पाणी सोडायची त्यांची आता ८ नोझलच पाणी फेकते. गावात नळाला पिण्याचे पाणी ज्या बोअर वेल पासून यायचे ती बोअर वेल सुद्धा उन्हाळ्यात दूषित पाणी सोडायला लागली आहे. या उन्हाळ्यात गावात टँकरने पाणी यायला सुरुवात झाली. दोन दिवस मी स्वतः टँकरवर बसून लोकांना पाणी वाटायचं काम केलं. पाणी वाटताना लोकांची भांडणे बघितली. शेजारी एकमेकांसोबत चांगली राहणारी मंडळीसुद्धा पाण्यासाठी भांडत होती.
            'ग्रॅज्यूएशन झालं आता पुढे काय करणार?' असा प्रश्न विचारणाऱ्या वरिष्ठ मंडळीला मी उत्तर द्यायचो 'गावात शेती कारणार'. या उत्तरावर लोकं म्हणतात 'पुढे शेतात पाणीच नाही तर कशी करणार शेती? नोकरी कर, गावात थांबून काहीच फायदा नाही.' या लोकांच्या उत्तराने गावातील तरुण वर्ग शेतीला घाबरतोय.
            या उन्हाळ्यात पाहलेली परिस्थिती मला पाणी प्रश्नाकडे आकर्षित करून गेली. अजय होले आणि प्रताप मारोडे यांच्या सोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी मला 'समाज प्रगती सहयोग (SPS)' सोबत काम करायला सुचवलं.”
            प्रतीकला त्याच्या कामासाठी आणि शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रतीक उंबरकर (निर्माण ),

झुंज दुष्काळाशी: दृष्टीआडचा दुष्काळ
            रोजगार हमी योजना गावा-गावात पोहचवणे, पाणलोटाची कामे करणे, गावाचा-शेतीचा अभ्यास सर्वे करणे अशा वेगवेगळ्या कृतींचा समावेश असलेली निर्माणची ‘झुंज दुष्काळाशी’ ही मोहीम जून महिन्याअखेरीस नुकतीच पार पडली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतून ७५ युवांनी यावर्षी मोहिमेत सहभाग नोंदवला. ‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेत गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनुभवलेला दुष्काळ, युवांना आलेले अनुभव आणि झालेले शिक्षण शेअर करण्यासाठी; त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या कृतींचा दुष्काळाच्या व्यापक सामाजिक-आर्थिक-राजकीय चित्राशी संबंध समजून घेण्यासाठी आणि युवांना न दिसलेला दुष्काळ जाणून घेण्यासाठी औरंगाबाद येथे ‘झुंज दुष्काळाशी’ चे सांगता शिबीर ३० जून ते ३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
            शिबिरात युवांनी कृती कार्यक्रमांदरम्यान त्यांना आलेले अनुभव, पडलेले प्रश्न, झालेले शिक्षण सर्वांसोबत शेअर केल्यामुळे गटाचे सामूहिक शिक्षण झाले. याशिवाय या शिबिरात विविध मान्यवरांची सत्रे झाली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऊस, बाटलीबंद पाणी, बिअर-मद्य कारखाने, आयपीएल या मुद्द्यांवर अश्विनीताईंनी भूमिका मांडली. या सत्रादरम्यान अश्विनी ताईंसोबत प्रश्नोत्तरी चांगलीच रंगली. ‘शहर आणि दुष्काळ’ यांचं नातं सांगताना विजय दिवाण यांनी मोठी धरणे, कुंभमेळा, औद्यागिकीकरणामुळे होणारा पाणी स्त्रोतांचा ऱ्हास समजावून सांगितला. औरंगाबाद महानगरपालिकेने केलेल्या पाण्याच्या खासगीकरणाविरूद्ध यशस्वी लढ्याची गोष्ट त्यांनी शब्दांतून उभी केली. महाराष्ट्रातील पाणी, सिंचन आणि धरणांचा गाढा अभ्यास असलेले प्रदीप पुरंदरे यांनी सरकारची असून नसलेली जलनीती, ‘कायदा आहे नियम नाही’, ‘समिती आहे मिटिंग नाही’, ‘खातं आहे अधिकारी आणि ऑफिस नाही’ हा असा जलव्यवस्थापनातला सरकारी पातळीवरचा सावळा गोंधळ खूप सोप्या पण तितक्याच अभ्यासपूर्ण शब्दांत त्यांनी युवांसमोर मांडला. दुष्काळ या समस्येसोबत तिच्या उपायांविषयीही चर्चा झाली. विजयअण्णा बोराडे यांनी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची, तर उमा असोलेकर यांनी भूजल व्यवस्थापनाची पद्धत, त्यामागील शास्त्र व विचार समजावून दिला.
दुष्काळाखेरीज युवांसाठी उपयुक्त अशी सत्रेही झाली. प्रफुल्ल शशिकांतने ‘Happiness and Meaning’ असे interactiveसत्र घेतले. युवांचे झालेले शिक्षण ऐकण्यासाठी आणि स्वतःचे अनुभव शेअर करण्यासाठी शिबिरात नायनाही उपस्थित राहिले होते. वर्ध्याला शाळेत असताना रसोईच्या कामाने भविष्यात मजूरांची किमान मजूरी वाढण्यात कसा हातभार लावला, ७२च्या मराठवाड्याच्या दुष्काळात स्वयंसेवक म्हणून गेल्यावर सार्वजनिक आरोग्याचे काय दर्शन झालं हे नायनांनी सर्वासोबत शेअर केले.
हे शिबीर आयोजित करण्यासाठी निर्माणचा त्रिशूल कुलकर्णी व मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद येथील त्याचे सहकारी यांनी मनापासून सहकार्य केले. शिबिराचा शेवट पुढील वर्षाचा कार्यक्रम कसा असावा, यावर युवांच्या सूचना आणि कल्पना जाणून घेत झाला.
शिबिरात ग्रामीण भागातील युवांची त्यांच्या गावाबद्दल, तिथल्या प्रश्नांबद्दल तळमळ आणखी वाढलेली दिसत होती; दुष्काळाची भीषणता वाढवण्यात शहरांच्या असलेल्या भूमिकेविषयी जाणीव झाल्यावर शहरी युवा पाणी प्रश्नाबद्दल जबाबदार दिसत होते. ग्रामीण-शहरी युवांचे एकत्र येणे; पाण्यासारख्या विषयावर चर्चा, अनुभव शेअर करणे; पाणीतज्ञांचे मार्गदर्शन असे अनुभवांनी आणि शिक्षणाने समृद्ध शिबीर औरंगाबादला पार पडले. आणि मोहिमेची ‘सांगता’ करणाऱ्या या शिबिराने खूप साऱ्या नवीन प्रश्नांना, विचारांना आणि कृतीकल्पनांना प्रत्येकाच्या मनात ‘सुरूवात’ करून दिली !
           
पाणी मागतात च्यायला
            या शिबीरातील मार्गदर्शक प्रदीप पुरंदरे यांनी त्यांच्या सत्रानंतर त्यांची पुढील कविता वाचून दाखवली.

लोकं उद्धट व्हायला लागली आहेत
पाणी मागतात – पिण्याकरता, शेतीकरता
ठोकून काढलं पायजे साल्यांना
साहेबांनी म्हटलं- अहो, जलनीती घ्या
कायदे करू, नियम करू
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतातच्यायला

सायबांनी असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतातच्यायला

कान इकडं करा तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले- इन्टरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टॅंकरवर काम भागणार नाही, राजेहो
साहेब तर म्हनतात- आता टॅंकच बोलवा
टॅंक. टॅक. रणगाडा ! धडाधडा.
पाणी मागतातच्यायला


साहेब जाऊन आले परवा चायनाला
केवढी प्रगती केली राव त्यांनीथ्री गारजेस
सायबाला विचारलं एवढं सगळं जमवलं कसं त्यांनी?
साहेब म्हनलेपयले तियानमेन केलं. तियानमेन! ते मेन!!
आपण काहीच करत नाही. कशी होणार प्रगती?
पाणी मागतातच्यायला