जयश्री कुलकर्णी,
निर्माण ७ चे शिबीर झाल्यावर, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे ‘वयम’ या संस्थेसोबत
प्रायोगिक तत्त्वावर काम करण्यासाठी गेली. ‘वयम’ ही संस्था जव्हारमधील
आदिवासींच्या हक्कांबाबत जनजागृती आणि लोकशिक्षणाचे काम करते. तसेच महिलांसोबत आणि
लहान मुलांसोबत त्यांचे इतरही काही उपक्रम चालतात. गेल्या तीन महिन्यात जयश्रीला ‘वयम’सोबत
काम करताना आलेले अनुभव ऐकुया तिच्याच शब्दात...
निर्माण ७.१ चे
शिबीर झाल्यापासून पुढे काय? याचं विचारचक्र चालूच होतं. फार झालं बोलणं – आता काम सुरू केलंच
पाहिजे असं मार्च अखेरीपर्यंत ठरवलं आणि जव्हारला 'वयम'मध्ये काम करायला सुरवात केली. पालघर जिल्हा
महाराष्ट्राची उत्तर सीमा. त्यातला जव्हार तालुका हा पूर्ण आदिवासी लोकवस्ती असणारा!
माझी आत्तापर्यंतची जीवनशैली आणि जव्हारमधली जीवनशैली यात
ब-यापैकी तफावत होती. त्यामुळे इथं आपण कसे टिकणार? जमेल का आपल्याला? असे प्रश्न ‘आ’ वासून उभे होते. कामाची सुरूवात मुलांबरोबर झाली. ‘बिन बुका या शिका’ प्रकल्पाअंतर्गत ४ पाड्यांत गंमत
शिबीरं घ्यायची होती. पाड्यात जाऊन रहाणं हा आता कामाचाच भाग असणार होता.
पहिल्याच दिवशी सुळ्याच्या पाड्यात रहायला होते. महिला का असेनात पण २ अनोळखी
व्यक्तींच्या शेजारी झोपताना मनात असंख्य प्रश्न होते. वर पंखा नाही, १ मिणमिणता बल्ब होता फक्त. ती रात्र फक्त छताच्या लाकडी फळ्यांकडे बघत या
कुशीवरून त्या कुशीवर वळत कशीबशी काढली. घरचा comfort zone सोडून मी इथे का आलीये? काय
ठेवलंय आयुष्यात पुढे? एकूणच - प्रचंड
भिती, घुसमट, गोंधळ, प्रश्न यांची दलदल! पण त्याच क्षणी- ‘हा मार्ग आपण स्वत:हून निवडलाय. असे
खाचखळगे येणारच. हीच घडण - खरी परीक्षा आहे आपली’ असं समजावत होते आणि
तथ्यही होतं त्यात, हे पुढच्या काही दिवसातच समोर येऊ लागलं, पटायला लागलं.
मुलांची निरागसता, त्यांची भडक नसणारी चमक, त्यांचं माझ्याभोवती सतत कोंडाळं करणं या सगळ्यामागे झाकली जाणारी त्यांची dark background आत्ता आत्ता लक्षात
यायला लागलीये. या लहानग्यांबरोबर काम करताना मलाही स्वत:चे आजतगायत माहीत नसलेले पैलु उलगडायला लागलेत. इथला
प्रत्येक दिवस नवा, ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे गोष्टी घडतीलंच असं नाही. मग ती
महिला बचत गटाची मिटिंग असो, PESA ची मिटिंग असो, मुलांना जमवणं
असो. त्यामुळे निराशा आली तरी संयम ठेवणे आलेच. अजूनही पाड्यात गेल्यावर कधीकधी
संडासातच आंघोळ करावी लागते, रात्री डास ही चावतात – भिती वाटते; पण थोडीशी मनाची तयारी करून गेलं की गोष्टी
सोप्या, सुसह्य होत आहेत.
‘बिन बुका या शिका’ द्वारे
मुलांना मागील वर्षी त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशी खेळणी दिली होती. त्या
खेळण्यांची मालकीही त्यांचीच. हीच मुले पुढे त्यांच्या जल जंगल जमिनीची मालकी घेतील.
त्याचीच ही पायाभरणी! मुलांमधील
नेतृत्व गुण वाढणे, संघटन वाढ, कल्पनाशक्ती या सगळ्याच गोष्टींना वाव देणारी
शिक्षण पध्दती उभी करण्याची गरज आहे. ज्या पध्दतीत मुलं
व्यक्त होऊ शकतात, आपल्या भावनांची मांडणी करू शकतात, विचार करून त्यावर कृती करू
शकतात अशा पध्दतीची रचना करणं हा माझ्या कामाचा पुढचा महत्वाचा भाग असेल.
छोट्या संस्थेत पडणारी लहान-मोठी कामे, लोकांशी स्वत:हून संवाद साधणे, एखाद्या पाड्यात श्रमदानासाठी जाणे या सगळ्याकडेच,
कुठल्याही कामाला कमी न लेखता एका नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज मला
प्रकर्षाने जाणवली. इथे आल्यापासून इथल्या मूलभूत जीवनशैलीचे अनेक बारकावे
अनुभवायला मिळाले. स्त्रिया कसलीही लाज न बाळगता सर्वांदेखत आपल्या मुलांना दूध
पाजतात, पुरूष स्वयंपाक करतात, स्त्रिया घरं बांधतात. एकूणच स्त्री-पुरूष समानता,
स्त्रीचा मान, निसर्गाशी जवळीक, त्याचे रक्षण हे सगळंच किती सहज, जीवनाचा
अविभाज्य भाग असल्यासारखं घडतं. हीच नाहीत का निरोगी समाजाची लक्षणं?
कधीकधी आपण एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जातो तेव्हा इथे
कसं आपल्या गावासारखं/ शहरासारखं
नाही या नजरेतून पाहतो; पण ही तुलना, आपल्या समजुती काही
काळासाठी बाजूला ठेवल्या तर नवं ठिकाण आपल्याला बरंच काही देऊन जातं!!!
जयश्री
कुलकर्णी, निर्माण ७