'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday 17 December 2021

‘जाऊ स्वतःपलीकडे – परिपूर्ण आयुष्याच्या शोधत’


आरोग्यम् धनसंपदाहे शब्द आपण अनेकवेळा ऐकत असतो. परंतु आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक असा मर्यादित अर्थ घेत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. वस्तुतः मानसिक स्वस्थता नसणे हे एका व्यक्तीच्या जीवनात अनेक नकारात्मक परिणाम घडवू शकते. विशेषतः मनसोपचारतज्ञांची तुटपुंजी उपलब्धता असलेल्या ग्रामीण भागांतील रुग्णांना व पर्यायाने त्यांच्या परिवाराला अनेक भीषण परिणामांना सामोरे जावे लागते. मानसिक आजारांबद्दल समाजात असलेला न्यूनगंड आणि ग्रामीण भागांतील ढिसाळ आरोग्यव्यवस्था यामुळे मानसिक आरोग्यसेवा पुरवणे हे आव्हानच ठरते. हेच आव्हान समर्थपणे पेलण्याचे काम करत आहे आपली नाशिकची निर्माणी मैत्रीण डॉ. हर्षाली मोरे.  

हर्षाली तिच्या प्रवासाबद्दल सांगते - “दहावीला चांगले गुण मिळाले होते पण तोपर्यंत करिअरचा गांभीर्याने विचार केला नव्हता. म्हणून माझ्या पालकांच्या सल्ल्यानुसार विज्ञान – बायोलॉजी – वैद्यकीय प्रवेश परीक्षा असा प्रवास करत मी MBBS (सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालय – मुंबई) पर्यंत पोहोचले. त्यात माझे आई-वडील स्वतः डॉक्टर असल्यामुळे या क्षेत्रात काम करणं म्हणजे स्वतःमध्येच लोकांना मदत करण्याचं एक माध्यम असतं हे मी मला ठाऊक होतं.”

 

विचार उद्युक्त करणारे अनुभव

हर्षाली तिचा MBBSचा अनुभव सांगते - “जिथे प्राथमिक पातळीवर आरोग्यव्यवस्था रुग्णांपर्यंत पोहोचायला हवी तिथे तसं न होता रुग्णांना अगदी शेवटच्या स्तरापर्यंत आणि मोठ्या रुग्णालयांपर्यंत धाव घ्यावी लागत होती. यात रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना होणारा त्रास दिसत होता. या गोष्टीचा रागदेखील येऊ लागला आणि रुग्णांवर केवळ उपचार न करता त्यापलीकडे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न मी करू लागले.” हर्षालीसोबत मुंबईला शिकणारा आणि निर्माण सातचा मित्र डॉ. मयूर पवार सांगतो – “स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवत समोरच्या व्यक्तीच्या भावनांना समजून घेण्याची क्षमता हर्षालीमध्ये आहे. या क्षमतेचा रुग्णांसोबत संवाद साधताना निश्चितच उपयोग होतो.”

 

महत्त्वपूर्ण वळण – निर्माण

आयुष्याच्या या महत्त्वपूर्ण वळणावर हर्षाली निर्माण या शिक्षण प्रक्रियेत सहभागी झाली. “निर्माणमुळे मला स्वतःपलीकडे पाहण्याचे धैर्य प्राप्त झाले. अवतीभवती चाललेल्या करिअरच्या जीवघेण्या शर्यतीतून मी बाहेर पडू शकले. रुग्णांकडे केवळ ‘Case’ म्हणून न पाहता त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टीकोनदेखील मला निर्माणमुळे मिळाला.” निर्माणच्या शिबिरांनंतर वैद्यकीय क्षेत्राला एक वर्ष सेवा देण्याच्या बॉण्डची (अटीची) पूर्तता करण्यासाठी हर्षालीने डॉ. अभय आणि डॉ. राणी बांग यांची SEARCH (गडचिरोली) ही संस्था निवडली. इथे हर्षाली Mental Health Department मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा देत आहे. “पुढे जाऊन Medicine, Public Health किंवा Mental Health या व्यापक विषयांपैकी एक विषय निवडण्याचा माझा मानस होता. बॉण्डसाठी SEARCH निवडण्याचे कारण म्हणजे इथे विषयांच्या खोलात जाण्याची संधी आणि उपलब्ध असलेले अनुभवी लोकांचे मार्गदर्शन. त्याशिवाय ग्रामीण व आदिवासी भागांतील रुग्ण तपासण्याची संधीदेखील इथे मिळणार होती.” घरून या निर्णयाला तीव्र विरोध झाला नसला तरी हर्षालीच्या आई-वडिलांना चिंता मात्र वाटत होती. परंतु जशी तिला पुढील दिशा स्पष्ट होत गेली तशी त्यांची चिंतादेखील कमी होत गेली. “आपल्या कुटुंबाचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्या विचारांमध्ये स्पष्टता असणे महत्त्वाचे असते”, असे हर्षाली म्हणते.  

 

गडचिरोलीतील अनुभव आणि मानसिक आरोग्य

गडचिरोलीमध्ये सेवा देत असताना आलेले अनुभव हर्षालीला अजून प्रगल्भ करत आहेत. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा ग्रामीण / आदिवासी कुटुंबांवर होणारा परिणाम, व्यसनांमुळे उध्वस्त होणारे परिवार व त्यांचा समाजावर होणारा दुष्परिणाम आणि उपचार केलेल्या रूग्णांच्या चेहर्‍यावरील समाधान पाहून अजून चांगलं काम करण्यासाठी मिळणारी ऊर्जा असा व्यापक अनुभव सध्या हर्षाली घेत आहे.

SEARCH रुग्णालयातील अनुभवी नर्सिंग असिस्टंट आणि हर्षालीच्या सहकारी रंजीता डे सांगतात – “एखाद्या रूग्णाला शांतपणे कसे हाताळावे व डोकं थंड ठेवून कसं काम करावं या गोष्टी डॉ. हर्षालीकडून मला शिकता आल्या. अनेकदा वेळ-काळ व स्वतःचं खाणं-पिणं मागे ठेवून रूग्णाला सेवा देण्याला प्राधान्य देताना मी डॉ. हर्षालीला पाहिलं आहे. तिला आपल्या जबाबदारीची पूर्ण जाण आहे हे यातून दिसतं.” 

मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर काम करतनाचा अनुभव हर्षाली सांगते - “कित्येकवेळा मानसिक आजार हा केवळ एका व्यक्तीचा त्रास म्हणून पाहिला जातो. परंतु ग्रामीण व आदिवासी भागांतील कुटुंबांत जर एकमेव कमावती व्यक्ती मानसिक आजाराला बळी पडली तर पूर्ण कुटुंबाचे हाल होतात. गावातील एखाद्या मानसिक रूग्णाला वेडा म्हणून वार्‍यावर सोडून दिलं जातं. अशा रुग्णांची वेळेत व योग्य उपचार मिळाल्यास ठीक होण्याची शक्यता असते. याशिवाय दारू व तंबाखू सारखे व्यसन हे सबंध समाजासाठी घातक कसे आहेत हे देखील मी गडचिरोलीमध्ये जवळून अनुभवलं.”  

 

पुढील दिशा

पुढे जाऊन हर्षालीला Psychiatry मध्ये पोस्ट ग्रॅजुएशन करायचे आहे. मानसिक आरोग्य ठीक नसलेली व्यक्ती परिपूर्ण आयुष्य जगू शकत नाही असे तिला वाटते. “आपल्या अवतीभवती समस्या ठळकपणे दिसत नसली तरी अनेकजण मानसिक आरोग्याच्या समस्येने त्रस्त असतात. मुळात मानसिक समस्या असणं, ती ओळखणं आणि त्यावर उपचार करायला तयारी दर्शवणं याचं प्रमाण आपल्या समाजात कमी आहे. शिवाय Depression, Anxiety यासारख्या सामान्यतः आढळणार्‍य मानसिक समस्यांमुळे देखील एखाद्या व्यक्तीची उत्पादकता आणि त्याच्या आयुष्याचा दर्जा खालावत जातात. अनेक अभ्यासांतून असेदेखील पाहण्यात आले आहे की या सामान्यतः आढळणार्‍या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा जास्त धोका हा तरुण व नोकरदार वर्गाला असतो. यासगळ्या गोष्टींवरून मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे स्पष्टपणे कळतं.”

समाजाच्या मनातील न्यूनगंडापासून ते मानसिक आरोग्याच्या समस्यांशी लढण्यासाठी असणार्‍या तोकड्या आरोग्यासुविधांपर्यंत अनेक आव्हानांचा सामना करत हर्षाली पुढे वाटचाल करत आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातच पुढे जाऊन लोकांसाठी काम करण्याचं तिचं ध्येय आहे. “एका व्यक्तीच्या जीवनातील नात्यांचा त्याच्या मानसिक आरोग्याशी असलेला परस्परसंबंध कसा असतो हे मी मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर काम करताना शिकले. त्या अर्थाने आपण सर्वच आपल्या अवतीभवतीच्या लोकांना त्रस्त करून सोडलेल्या या समस्येवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. स्वतःपूर्ती मर्यादित न राहता स्वतःपलीकडचा विचार करून लोकांसाठी काम करण्याचा अनुभव मला समृद्ध करणारा वाटतो. असंच पुढे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्याचं माझं ध्येय आहे.”

डॉ. हर्षालीला तिच्या आयुष्याची दिशा स्पष्ट दिसत आहे. तिच्यासारखेच अनेक तरुणतरुणी, विशेषतः आरोग्याक्षेत्रात काम करू इछिणारे तरुणतरुणी आज त्यांच्या आयुष्याची दिशा शोधत आहेत. अशा प्रत्येक तरुणतरुणीने स्वतःला प्रश्न विचारायला हवा –

स्वतःपलीकडचा विचार करून समृद्ध व परिपूर्ण आयुष्य जागण्याची खुणावणारी संधी मिळवण्यासाठी मी स्व च्या कोशातून बाहेर केव्हा पडणार


No comments:

Post a Comment