'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 4 April 2018

‘मन’ की बात – गडचिरोलीची मानसोपचारतज्ञ

निर्माण ४ ची आरती बंग, सप्टेंबर २०१६ पासून सर्च मधील मां दंतेश्वरी रुग्णालयात मानसोपचारतज्ञ म्हणून काम करत आहे. तिच्या रूपाने सर्चला व परिणामी गडचिरोली जिल्ह्याला पूर्णवेळ मानसोपचारतज्ञ मिळाली आहे.  तिच्या OPD सोबतच ती ‘सर्च’मधील व्यसनमुक्ती केंद्राचेदेखील काम सांभाळते. तिचा मागील एक वर्षात झालेला प्रवास वाचूया..
“मला तुम्हा सर्वांना माझ्या या एक वर्षाचा ‘सर्च’मध्ये काम करायला सुरुवात केल्यापासूनचा प्रवास सांगायला आवडेल. आणि हा प्रवास मला आलेल्या काही अनुभवांमधून सांगणं अधिक परिणामकारक होईल. मला आलेले काही अनुभव अतिशय उत्कट होते, प्रसंगी अनेक रुग्णांनी मला त्यांच्या आयुष्यातल्या अतिशय व्यक्तिगत गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे.

   मी ५ सप्टेंबर २०१६ पासून माझ्या कामाला सुरुवात केली. माझ्या आधी ‘सर्च’मध्ये केवळ महिन्यातून एकदा मानसिक आरोग्यासंबंधी O.P.D आणि I.P.D  असे, त्यामुळे साहजिकच रुग्णांची संख्या महिन्याला ५०-७० रुग्ण एवढीच होती. त्यामुळे इथे आल्यावर सर्वप्रथम ही संख्या अजून कशी वाढेल या संदर्भात लक्ष देण्याचं काम मला सोपवण्यात आलं. पण त्याचबरोबर हॉस्पिटलची O.P.D, I.P.D किंवा emergencies हे देखील मी पहावं असा सल्ला मला अम्मांनी दिला. कारण मानसिक रुग्णांची संख्या सुरवातीला कमीच असणार होती. माझं आठवड्याचं काम हे विभागलेलं असतं. आठवड्यातले तीन दिवस मी सर्च हॉस्पिटलला देते आणि उरलेले तीन दिवस व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काम करते. तसंच नायनांनी माझी ‘संकल्प’ या पोलीसांसाठी असलेल्या व्यसनमुक्ती प्रकल्पाची ‘तांत्रिक सल्लागार’ म्हणून नियुक्ती केली होती. खरं सांगायचं तर लहान मुलांसोबत काम करावं या उद्देशाने मी मानसरोगशास्त्र निवडलं होतं. त्यामुळे सुरुवातीला मी याबाबत थोडी साशंक होते. सुरुवातीला मला या कामात अजिबात रस नव्हता. जेव्हा मी मानसशास्त्राची रेसिडेन्सी करत होते, त्यामध्ये व्यसनमुक्ती हा एक छोटासा भाग होता. प्रत्येक रुग्णासाठी साधारणपणे फक्त १०- १५ मिनिटं असायचे कारण त्यामध्ये फक्त ७ ते ८ प्रश्न त्या रुग्णासंदर्भात विचारायचे असायचे. तसंच त्या रुग्णांमधल्या withdrawal management संदर्भातले औषधोपचार एवढ्यापुरताच आमचा अभ्यासक्रम मर्यादित होता.
          एक दिवस एक रुग्ण माझ्याकडे आला. त्याला दारूचं व्यसन होतं. या आधी त्याने बऱ्याच डॉक्टर्सचा सल्ला घेतला, टेस्टस् देखील करून झाल्या होत्या. टेस्ट्समध्ये vascular necrosis of femur head असं निदान झालं होतं. आणि त्याला माझ्याकडे पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी तो त्याच्या व्यसनाबद्दल काहीच बोलत नव्हता. त्याच्या पायाच्या दुखण्याबाबत तक्रार होती की कसं ते दुखणं थांबत नाहीये वगैरे. ते ऐकून मी त्याला  विचारायला सुरुवात केली की कुठे अपघात झाला का, दारूच्या नशेत कुठे पडला होतात का. पण या सगळ्यावर त्याचं ‘नाही’ हे एकच उत्तर होतं. त्याच्याबरोबर त्याचा एक नातेवाईकदेखील आला होता. त्याला देखील मी विचारलं तेव्हा तो त्या रुग्णाला म्हणाला की ‘सांग ना की त्या दिवसापासून तुला दुखायला लागलं होतं म्हणून’. पण त्यावर सुद्धा त्या रुग्णाचा ठाम नकार होता. मी अगदी खोदून विचारल्यावर त्याने शेवटी सांगितलं की एका लग्नाच्या वेळी तो दारू प्यायला होता आणि दारूच्या नशेत खूप उकडत होतं म्हणून तो जवळपास २-३ तास चक्क बर्फाच्या लादीवर झोपला. सुरवातीला एवढं दुखणं नव्हतं म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. पण शेवटी ते फारच वाढल्यामुळे तो उपचारासाठी आला होता. हे ऐकून मी पूर्ण हादरले. मला हे खूपच विचित्र वाटलं की उकडतंय म्हणून कोणी बर्फाच्या लादीवर कसं काय झोपू शकतं? त्या घटनेनंतर मी विचार करायला सुरुवात केली की दारू कोणी गरज म्हणून पीतं का? आणि काही काळानंतर त्याचं व्यसन कसं होतं?
             मला withdrawal management चं अतिशय चांगलं ट्रेनिंग मिळालं होतं. त्यामुळे मला असा विश्वास होता की रुग्ण withdrawal मध्ये जाणार नाही. काही काळानंतर रुग्णदेखील वाढायला लागले. पण कधीकधी असं व्हायला लागलं की पंधरा दिवस रुग्ण नीट राहत होता, त्यानंतर परत दारू प्यायला सुरुवात करत असे. याबाबत मग रुग्णाचे नातेवाईक तक्रार करत असत. या सगळ्या मुद्यांशी माझा थेट संबंध आला नव्हता. कारण त्यावेळी एक रेसिडेंट डॉक्टर म्हणून अनेक लोकांची टीम मला दिली होती. त्यामुळे औषध सांगून मी रुग्णांना माझ्या टीमकडे पाठवत असे. त्यामुळे  माझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडे relapse management, trigger management, व्यसनाधीन रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या समुपदेशनाची कुठली विशिष्ट पद्धत आणि कौशल्य नाहीयेत. हे सगळं मला माहित नव्हतं ही सगळ्यात योग्य गोष्ट तेव्हा माझ्यासोबत घडली. त्यामुळे मी त्यावर बरंच वाचन केलं, या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बऱ्याच संस्थांना भेटी दिल्या. आणि त्या वेळी माझ्या असं लक्षात आलं की हा फक्त एक भाग नसून एक पूर्ण वेगळं क्षेत्र आहे आणि ते अतिशय आव्हानात्मक आहे. त्यानंतर मी या गोष्टींवर अधिक सखोलपणे काम करायला सुरुवात केली. तसंच अनेक गुंतागुंतीच्या केसेस घेऊन रुग्ण यायला लागले. पण जेव्हा एखादा रुग्ण परत प्यायला लागतो, त्याचा या व्यसनाला लोक पाप समजतात, त्यांना वाटतं की तो बनाव करतोय किंवा खोटं बोलतोय. यासंदर्भात मला असा प्रश्न पडायला लागला, की व्यसन हे मानसिक HIV सारखं आहे का? या सगळ्या गोष्टींमुळे या काळामध्ये माझा खूप मानसिक विकास झाला. तसंच फक्त औषधोपचार आणि समुपदेशन या गोष्टी काम करू शकत नाहीत ही गोष्ट व्यसनमुक्तीबाबत माझ्या लक्षात आली.
 यानंतर इथे मला एक १७ वर्षाच्या मुलाचा अनुभव नमूद करावासा वाटतो, साधारणपणे माझ्या OPD मध्ये आमच्या नर्सेस कधीच एखाद्या रुग्णाला आधी तपासा किंवा एखाद्या रुग्णाला नंतर तपासा अशी शिफारस करत नाहीत. पण एके दिवशी आमच्या एक सिस्टरने तुम्हाला हा रुग्ण आधी घ्यावाच लागेल असं सांगितलं. त्यावेळी हा १७ वर्षांचा मुलगा रोशन (नाव बदलेले आहे), आपल्या वडिलांसोबत आणि भावासोबत आला होता. अतिशय अव्यवस्थित आणि कुणालाही न जुमानणारा असं एकंदरीत त्याचं रूप होतं. त्याचे भाऊ आणि वडीलसुद्धा अतिशय वैतागलेले दिसत होते. तो bipolar disorder चा रुग्ण आहे हे मला बघूनच कळालं. अतिशय वाईट भाषेत बोलत होता, मला वाईट नजरेने निरखत होता. त्याची ती असभ्य वागणूक बघून त्याच्या वडिलांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. आणि माझ्या समोर त्यांनी त्याच्या थोबाडीत मारली. त्याला असा रोग झाला आहे म्हणून तो असं वागतोय, त्यामुळे मारून काही होणार नाही असं मी त्यांच्या वडिलांना सांगितलं गावातल्या अनेकांशी मारामारी झाली असल्याने त्याच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या. त्यामुळे आम्ही त्याला अॅडमिट करून घेतलं. आणि ज्यादिवशी अॅडमिट करून घेतलं त्यानंतरचे काही दिवस हॉस्पिटल स्टाफसाठी अतिशय वाईट होते. त्यांनी अशा प्रकारचा रुग्ण कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आम्हाला त्याला sedatives द्यायला लागले. त्यानंतर जवळपास १५ ते २० दिवस तो आमच्याजवळ होता. त्यादिवसात त्याने खूप गोंधळ घातला. १५ दिवसांनी देखील त्याच्यामध्ये केवळ ६०% पर्यंत सुधारणा झाली होती. पण ५-६ follow ups नंतर मात्र त्याच्यामध्ये जवळपास ९५% सुधारणा झाली. एवढ्या दिवसांच्या येण्या-जाण्याने त्याच्या वडिलांमध्ये आमच्याबद्दल एक विश्वास तयार झाला होता. त्यामुळे एके दिवशी मी त्याच्या वडिलांना विचारलं, “काय हो, तुम्ही याला या आधीच माझ्याकडे का नाही आणलं? एवढा उशीर का लावला?” ते म्हणाले, “आधी बाबा-तांत्रिककडे नेलं. मग काहीच फरक पडला नाही म्हणून चंद्रपूरच्या एका दवाखान्यात दाखवलं. तरी काहीच फरक पडला नाही. यात दोन महिने गेले.” या मुलाच्या वडिलांनी आपली शेती, बैल विकून या मुलाच्या उपचारासाठी या दोन महिन्यात जवळपास सत्तर हजार रुपये खर्च केले होते.  पण त्यांना त्याचं काही दुःख नव्हतं. “जाऊ द्या नं मॅडम, पैसे गेले तर गेले. पण माझा एकुलता एक मुलगा तर ठीक झाला नं.” विचित्र झालेला मुलगा नीट झाल्याचं त्यांना जास्त समाधान होतं. समाजामध्ये एखाद्या गोष्टीसाठी सेवा उपलब्ध असणं आणि त्यामुळे ठीक होणं हीच खूप मोठी गोष्ट समजली जाते, ही किती दुर्दैवाची बाब आहे. २०-३० वर्षांपूर्वीपासून मानसरोगशास्त्राच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत. तरी पण इकडे अजून साध्या सुविधादेखील उपलब्ध नाहीत. हे कितपत बरोबर आहे?

 रोशनच्या केसमुळे मला त्यावेळी अनेक प्रश्न पडले. रोशन आजारी पडल्यापासून ते तो माझ्याकडे येईपर्यंत त्याला अनेक health care providers मिळाले जे की त्याच्या उपयोगात आले नाहीत. म्हणून प्रश्न असा पडतो की मानसिक आजार उद्भवण्यापासून ते त्या व्यक्तीला योग्य निदान आणि त्यावरचा उपचार मिळण्याच्या प्रक्रियेत कुठले अडथळे येऊ शकतात. एक तर म्हणजे आपल्या देशात मानसोपचारतज्ञांची संख्या फार कमी, म्हणजे जवळपास ४०००, आहे. दुसरं म्हणजे मानसिक आरोग्याच्या परवडतील अशा सुविधाच नाहीत. म्हणूनच एक प्रभावी आणि परवडेल अशी मेंटल हेल्थ केअर सिस्टीम कशी उभारता येईल हा सध्या माझ्या समोर असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे.
 यानंतर मला सांगावासा वाटेल तो अनुभव म्हणजे एका ३५ वर्षीय विवाहित बंगाली महिलेचा. तिच्या मुख्य तक्रारी म्हणजे जीव घाबरणे आणि डोकं दुखणे. तिला निदान झालं ते Anxiety Disorder चं. त्यावर मी तिला तिच्या काळजीचे कारण विचारले. पण खूप विचारूनही मला ठोस असं psycho stressor मिळालं नाही. तेव्हा मी नायनांना-अम्मांना ह्या केसबद्दल सांगितलं. त्यांच्याशी बोलून मला कळालं की तिच्या बंगाली असण्याचा आणि तिच्या आजाराचा कुठेतरी संबंध आहे. बंगाली असल्यामुळे ती तिच्या भावना मला तितक्या प्रभावीपणे सांगू शकत नव्हती. कारण तिची भाषा, संस्कृती हे वेगळी आहे. तसेच तिचं स्थलांतरीत असणं हाच तिच्यासाठी एक मोठा मानसिक आणि सामाजिक प्रश्न होता. हे सगळं Psycho Social Psychiatry मध्ये मोडतं. तेव्हापासून मी यावर बरंच वाचन केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक सामाजिक घटकांची स्वतःला व्यक्त करण्याची भाषा असते. हे सगळं खूप गमतीशीर आहे की तुम्ही कसं समाजाची विचारधारा व त्यांच्या अस्वस्थतेची भाषा समजून घेता व ते कसं तुमच्या आजारांविषयच्या माहितीत भर टाकतात. मानसिक आजार व्यक्त करण्याच्या पद्धती हे स्वतःमध्ये एक संशोधनाचा विषय आहे.
 २०१५ मध्ये झालेल्या GBD studies मध्ये भारताचा मानसिक आजारांचा YLD (Years of Life Lived with Disability) हा जवळपास १५-२०% आहे. तोच ऑस्ट्रेलियात ३२% तर अमेरिकेत २८% आहे. आपण त्या दिशेने वाटचाल करत आहोत. आणि या १५-२०% मधील ४०% प्रमाण Anxiety Disorders चं आहे. म्हणजेच फक्त पाहिल्यावर असं वाटतं की तो व्यक्ती पूर्णपणे बरा आहे, त्याला कुठलाच मानसिक त्रास नाही. परंतु तसं बऱ्याचदा नसतं. तो त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. म्हणूनच Anxiety Disorders माझ्यासाठी एक पूर्णपणे नवीन गोष्ट होती.
 एकदा एक लहान मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत आला होता. त्यांची तक्रार अशी होती की तो दिवसभर बडबड करत राहतो, मित्रांबरोबर खेळणं बंद केलंय, खातपीत नाही, शून्यात बघत राहतो. त्याची आई त्याचा त्रास बघून तर रडायलाच लागली. हा असाच राहील याची त्यांना भीती होती. दोन तीन ठिकाणी जाऊन सुद्धा काहीच उपयोग झाला नव्हता. त्याला Depression with Psychotic Features असं मी निदान केलं. आणि योग्य तो उपचार केला. दुसऱ्या फॉलोअपपर्यंत त्याची ४०-५०% सुधारणा झाली होती. तरी पण तो पहिल्यासारखा झालेला नव्हता. त्यांच्या घरच्यांची या बाबतीत कौन्सिलींग झाली होती. हीच केस जर रेसिडेन्सी करत असताना माझ्या पुढे आली असती तर ती माझ्या सिनिअर्सनी बघितली असती. कारण तसा प्रोटोकॉलच असतो. कारण अशा केसेस गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे सुरवातीचे ४-५ महिने याबाबतीत माझा आत्मविश्वास कमी होता. त्याला काही नुकसान होऊ नये ही भीती होती. पण मी यावर विचार केल्यावर असं लक्षात आलं की त्याचं जे काही भलं व्हायचंय ते इथेच होणार आहे. कारण आख्या गडचिरोलीत दुसरं कोणी मानसोपचारतज्ञच नाहीये. आणि नागपूरला जाणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणून मी माझीच कौशल्ये वाढवायचा प्रयत्न करू लागले. काही गुंतागुंतीच्या केसेसबद्दल मी योगेशदादा (डॉ. योगेश कालकोंडे) बरोबर चर्चा केली. सोबतच भरपूर रिसर्च पेपर्स वाचले. आणि या १०-११ महिन्याच्या शेवटी मला असं वाटतं की मी आता पेशंट्सना चांगल्या पद्धतीने उपचार देऊ शकते.
 दुसरी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे Patient Expectancy Management. त्यांच्या आजाराच्या सुधारणेबाबत काही संकल्पना असतात. त्या पूर्ण नाही केल्या तर ते नाराज होतात आणि नातेवाईकांची चिडचिड होते. मला माझ्या विषयात आवडणारी गोष्ट म्हणजे कामातील, मला भेटणाऱ्या लोकांची विविधता. जसे की ‘संकल्प’मध्ये करत असलेलं पर्यवेक्षण, क्लिनिकमध्ये होत असलेलं निदान, RCT मध्ये होणारा रिसर्च. एकंदरीत हे सगळं करण्यात खूप उत्साह येतो. कधीकधी खूप दुर्मिळ आजार जसे की Autoimmune Encephalitis चे पेशंट्स येतात. अशांवर उपचार करण्यात वेगळाच आनंद मिळतो. दुसरी गोष्ट जी आनंद देऊन जाते ती म्हणजे अशा गरज असलेल्या ठिकाणी सेवा देणं. गडचिरोलीतल्या पेशंट्ससाठी मी ना सोशल क्लासमध्ये मोडते ना इकॉनॉमिक क्लासमध्ये. तरीही जेव्हा एक व्यक्ती येऊन माझ्याकडे त्यांच्या अत्यंत खासगी असुरक्षितता, त्यांचे दुःख मला सांगतात तेव्हा मला खूप honoured वाटतं. कारण एकतर ते खूप धाडसी असावेत किंवा त्यांना असलेला मानसिक त्रास खूप मोठा असावा. म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये माझं ‘तो’ एक व्यक्ती म्हणून असणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. हा खरच खूप सुंदर अनुभव आहे. स्वतःच्या करिअरबद्दलची काळजी मला त्यांच्या तुलनेत क्षुल्लक वाटते.
 सर्चमध्ये काम करत असताना इथल्या शिस्त आणि जबाबदारीने (Responsibility & Accountability) मला खूप शिकवलं. प्रत्येक १५ दिवसात आम्हाला रिपोर्ट तयार करावा लागतो. अशाप्रकारे Mental Health OPD चं काम चालू आहे. खेड्यातल्या जीवनाबद्दलच्या माझ्या ज्या कल्पना होत्या त्या वास्तवापेक्षा खूप वेगळ्या होत्या हे मला इथे येऊन कळालं. इथे मानसिक आरोग्याची स्थिती ही खरंतर शहरापेक्षा वाईट आहे. त्याला कारण म्हणजे एकतर इथे मानसोपचारतज्ञांची कमतरता आहे आणि दुसरं म्हणजे बदलणारी जीवनशैली. एकविसाव्या शतकाची येऊ घातलेली आधुनिकता आणि प्रचंड गरिबी यामध्ये इथे संघर्ष निर्माण झाला आहे. हेच लोकांच्या काळजीचे मुख्य कारण आहे.
 आणि मला हे सुद्धा सांगायला आवडेल की मला सर्चमध्ये नायना, अम्मा, योगेश दादा आणि अमृत यांच्या रुपात खूप चांगले गुरु मिळाले. जेव्हा मी अम्मा आणि नायना यांना बघते तेव्हा मला दोन अत्यंत हुशार डॉक्टर्स दिसतात, जे आजपर्यंत केवळ ३०,००० रुपये महिना पगार घेऊन अशा भागात काम करत आहेत. जेव्हा मी नायनांना बघते तेव्हा मी त्यांच्यात एक अशी व्यक्ती बघते, जिने ठरवलं असतं तर, WHO किंवा Johns Hopkins चे डायरेक्टर होऊ शकली असती. पण रोज सकाळी ५ ला उठून मला ते गडचिरोलीमधल्या आपल्या ऑफिसला जाताना दिसतात. आताच मी एका Mental Health Conference ला भेट दिली. मानसोपचारशास्त्रातील अत्यंत नामांकित नाव म्हणजे डॉ. विक्रम पटेल, हे जेव्हा नायनांना श्रेय देतात तेव्हा असं वाटतं की या व्यक्तींशी पाच मिनिटं बोलणं हेसुद्धा आयुष्यात लख्ख प्रकाश देऊन जातं.”
                                                                                                           
                                                                                         आरती बंग, निर्माण४ 
                                                                                         aarti520g@gmail.com
                                                                                         शब्दांकन – आकाश भोर 
       

विक्रेता, वितरक ते प्रकाशक - शरद अष्टेकर

विदर्भातील मागासलेल्या जिल्हामध्ये तरुणाईच्या खिशाला परवडतील आणि मनाला भावतील अशी पुस्तक आपल्या ‘मायमराठी’ या उपक्रमामार्फत उपलब्ध करून द्यायचा चंग बांधणारा आपला मित्र शरद अष्टेकर (निर्माण ४), याने पुस्तक विक्रीसोबत स्वतःची  प्रकाशन संस्था – मधुश्री पब्लिकेशन - पण सुरु केली आहे. मधुश्री प्रकाशनाचा थोडक्यात प्रवास जाणून घेऊया शरदच्या शब्दांत...

“गेले सात वर्ष ग्रामीण भागात मराठी पुस्तके पोहचवीत असताना आम्ही बरेच प्रयोग केलेत आणि त्यांना उत्तम  प्रतिसाद पण मिळाला. मायमराठी बुक वितरणाचे काम अगदी जोरात चालू असताना २०१५ साली मी युवल नोआह हरारी याचं ‘Sapiens’ हे पुस्तक वाचलं आणि फारंच प्रभावित झालो. त्यानंतर  बराच काळ ते पुस्तक माझ्या सोबतच होतं आणि मी सतत याच पुस्तकाचा विचार करत असायचो. वर्षभराने मला जाणवायला लागलं की ‘Sapiens’सारखीच अनेक दर्जेदार पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत आणि फक्त भाषेच्या बंधनामुळे मोठा मराठी वाचकवर्ग हा अशा अनेक दर्जेदार पुस्तकांना मुकतोय. त्यामुळे अशी चांगली पुस्तके मराठी भाषेत यायला हवीत असं मला प्रकर्षाने वाटायला लागलं. त्यासाठी मला स्वतः प्रयत्न करायला हवेत, आणि वेळ पडलीच तर स्वतःची प्रकाशन संस्था पण सुरु करू अशी मी मनाशी तयारी केली. प्रथम मला आवडलेल्या ‘Sapiens’ पुस्तकाचा मराठीत अनुवाद करावा असा विचार करून ‘Sapiens’ पुस्तकाचे हक्क मिळवण्यासाठी मी जोरदार तयारीला लागलो. पण दुर्दैवाने एका दुसऱ्या प्रकाशनाने ‘Sapiens’ चे हक्क माझ्याआधी मिळवले होते. त्यानंतर मी प्रकाशनाचा विचारच सोडून दिला होता. सोबतच माझी प्रकाशक होण्याची इच्छा पण मेली.
युवल नोआह हरारी यांच्या सोबत शरद
त्यानंतर मी माझ्या नियमित कामात गुंतण्याचा प्रयत्न करत असतानाच सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवरती व्यवसायाने पत्रकार असणाऱ्या स्वाती चतुर्वेदी यांचं ‘आय अॅम अ ट्रोल’ हे पुस्तक गाजत होतं आणि मुग्धा कर्णिक ह्यांनी त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करायला सुरुवात केली होती. पण कोणताही मराठी प्रकाशक ते पुस्तक प्रकाशित करायला तयार नव्हता, कारण सरकार विरोधी पुस्तक छापण्याची हिंमत कोणी करणार नव्हतं. हे बघून माझ्या डोक्यात पुन्हा प्रकाशनाचा किडा घुसला. ‘आय अॅम अ ट्रोल’ हे पुस्तक कोणीही प्रकाशित करायला तयार नसल्याने मला पण चांगली संधी होतीच. त्यांनतर ताबडतोब या पुस्तकाचे हक्क मिळवले आणि माझ्या मुलीच्या नावाने – मधुश्री - प्रकाशन संस्था रजिस्टर करून घेतली. हे मधुश्री प्रकाशनाचे पहिले वहिले पुस्तक!
युवल नोआह हरारी यांनी शरद ला भेट दिलेल्या
पुस्तकावरती त्यांनी शरदसाठी लिहिलेला संदेश
 
हे पुस्तक इतकं गाजलं की आम्हाला लवकरच ह्याची चौथी आवृत्ती पण काढावी लागली. त्यानंतर भारतातील आठ हिंदूत्ववादी संघटना आणि त्यांचं राजकारण ह्या विषयावरच धिरेंद्र झा यांचं ‘शॅडो आर्मीज’ हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं. चौथ्याच दिवशी याही पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली! ‘आय अॅम अ ट्रोल’ आणि ‘शॅडो आर्मीज’ या पुस्तकांचा जोरात खप होत असतानाच मी जगभर गाजलेल्या पुस्तकांचे हक्क मिळवायला सुरुवात केली. सर्वात पहिले युवल नोआह हरारी यांच्या ‘Sapiens’ या पुस्तकाचा पुढचा भाग असलेल्या ‘Homo Deus’ या पुस्तकाचे हक्क मिळवले. त्यानंतर ‘Zero To One’, ‘The God Delusion’, ‘Alibaba Genome’, ‘Guns Germs and Steel’, ‘Short History of Nearly Everything’, ‘Surely You’Re Joking Mr. Feynman’ यासारखेच इतर बरेच पुस्तक आता मधुश्री प्रकाशन मराठीत आणत आहे. सोबतच रविश कुमारांचं ‘The Free Voice’ हे पुस्तक पण मधुश्री प्रकाशन मराठीत प्रकाशित करत आहे. ‘मायमराठी बुक वितरण’ आणि ‘मधुश्री प्रकाशन’ यासंबंधी भविष्यात बऱ्याच योजना आहेत. वेळ येईल तसं सांगेलच सविस्तर. सध्या पुरत एवढंच.”
दर्जेदार पुस्तके मराठी भाषेत आणण्याच्या शरदच्या या ध्यासाला खूप साऱ्या शुभेच्छा!
                                                                                        
                                                                                                                शरद अष्टेकर, निर्माण ४
                                                                                                                                                   

निर्माणीच्या नजरेतून



There he was, a man in a village in the tribal hinterlands of Maharashtra, so far away from the cities, geographically and economically. For me, his 'google.com' shirt symbolizes the unrealized possibility of development due to neglect by society.


प्रांजल कोरान्ने, निर्माण ८




Freedom for Sale by John Kampfner

‘फ्रीडम फॉर सेल’ हे पुस्तक लिहिलंय जॉन कॅम्फनर या लेखकाने. तो एक राजकीय पत्रकार आहे जो आता मानवी हक्कांचा (Human Rights) प्रचारक बनलाय. त्याने या पुस्तकात ८ देशांतील राजकीय परिस्थिती, तिथले सरकार, लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य, तिथल्या मीडियाच्या स्वातंत्र्यवरची गळचेपी यांचे विस्तृत चित्रण प्रस्तुत पुस्तकात केले आहे. त्याने अनेक देशांमध्ये राहून तिथली राजकीय परिस्थिती जवळून पाहिली आहे, तिथल्या लोकांचा आणि राजकीय नेत्यांचा त्याचा जवळून संबंध आलेला आहे.
 मला जर तुम्ही विचाराल की लोकशाही काय आहे मी म्हणेल ही ‘सरकार चालवण्याची सर्वात चांगली पद्धत’ आहे. पण जॉन कॅम्फनर म्हणेल की, ही ‘सरकार चालवण्याची सर्वात कमी वाईट पद्धत’ आहे. विकास/ सुबत्तेच्या नावाखाली तर कधी राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली लोकांचं स्वातंत्र्य कसं ओढून घेतलं जातं हे जॉन कॅम्फनरने या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे मांडलं आहे. सध्या आर्थिक सुबत्ता आणि यश हे मापदंड इतके मोठे बनले आहेत की त्याच्यापुढे राजकीय स्वातंत्र्य महत्वाचे मानले जात नाही. पुस्तकात सिंगापूर, चीन, रशिया, UAE, भारत, इटली, ब्रिटन आणि अमेरिका या आठ देशातील सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करून तो परिस्थितीचे गांभीर्य आपल्याला जाणवून देतो.
 सिंगापूर या देशाने एक नवीन करार जन्माला घातला आहे. या करारानुसार सिंगापूरचे नागरिकत्व मिळाले की तुम्हाला भरपूर संपत्ती कमवता येते, तुम्हाला खायला उत्तम मिळतं, राहायला घर आणि फिरायला आलिशान गाड्या मिळतात. ह्या सर्व सुविधा बऱ्याचदा सरकार प्रायोजित असतात. तिथे तुम्हाला भासवलं जातं की प्रत्येकच जण आनंदी आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला विलासी आयुष्य मिळेल, पण तुमच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात! हा करार या आधारावर बनवला गेला आहे की तुम्हाला पर्याय आहे की तुम्हाला कोणताच पर्याय नाही. “Liberty is the most precious thing, hence most of the people can’t afford it. So they trade it.”
 UAE बद्दल बोलताना लेखक म्हणतो तुम्ही या देशाला एक ब्रँड म्हणू शकता. प्रचंड पैशांचा भला मोठा ब्रँड. एका खाडीचे सिमेंटच्या जंगलात झालेले रुपांतर म्हणजे दुबई शहर! पण इथे कोणाचाच आवाज ऐकला जात नाही. आणि ऐकला तरी का जावा? इथे पैसे कमवण्यातच लोक इतके खुश आहेत तर त्यांचा आवाज ऐकला जाण्याची पर्वा कोण करणार?
भारताबद्दल बोलताना लेखक म्हणतो की “भारतीय समाज सहिष्णू असला तरी अत्यंत क्रूर आहे. भारतामध्ये बहुपक्षीय लोकशाही, सत्ता विकेंद्रीकरण, स्वायत्त न्यायव्यवस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे घटक असून देखील पाच वर्षातून येणाऱ्या मतदानाशिवाय नक्की कोणतं स्वातंत्र्य या देशाने प्रस्थापित केलंय? नरेंद्र मोदी सारखा नेता, ज्याचा २००२ साली गुजरात धार्मिक दंगली भडकवण्यात प्रत्यक्षरित्या सहभागी होता, कोणतीही चिकित्सा न करता मिडीयाने गुजरात मॉडेल पैसे घेऊन देशभर पसरवलं, अशा माणसाला जर लोकशाही रोखू शकत नसेल तर त्या लोकशाहीचा काय उपयोग?”
या पुस्तकात काही देशांची अवास्तव आणि गरजेपेक्षा जास्त राजकीय वर्णने रंगवली आहेत, जी निरर्थक वाटतात. जगातल्या वेगवेगळ्या देशातील राजकीय परिस्थिती, नागरिकांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली कशी केली जाते, भांडवलशाही व्यवस्थेचे समर्थक सार्वजनिक मत कसे तयार करतात, मिडीयाला कुत्र्याचा पट्टा बांधून त्याचा वापर कसा करतात ह्याचे सुंदर वर्णन ह्या पुस्तकात दिले आहे.
 हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या मनात असंख्य प्रश्न तयार होतील, नक्की किती लोकांना स्वातंत्र्य हवं असतं आणि किती लोकांना स्वातंत्र्य विकून जगायचं असतं? की आपल्या प्राथमिक गरजा भागल्या म्हणून आपणच अमुक स्वातंत्र्य, तमुक स्वातंत्र्याचा विचार करतोय? जगात अब्जावधी लोक आहेत ज्यांना दोन वेळेचं खायलाच मिळत नाही, ते त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करत असतील का? किती लोक ट्रबलमेकर या वर्गात मोडतात? शोध पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते, आरटीआय कार्यकर्ते, वकील सोडून जो तो आपल्या जीवनाचा गाडा ओढण्याच्या मागे लागलाय. त्यांच्या जीवनाचा हेतू काय हा मूलभूत प्रश्न मागे उरतोच.
 आपल्यावर नकळतपणे प्रभाव टाकणारे हे राजकीय घटक समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचा!

                                                                                                                        वैभव बागल, निर्माण ७
                                                                                                            vbagal20@gmail.com