'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 19 November 2012

तू जिंदा है...



निर्माण परिवाराचा लाडका सदस्य व मित्र सागर जोशी याचे १५ ऑक्टोबर २०१२ च्या दुपारी पुण्यात दुःखद निधन झाले. सागरच्या मागे त्याच्या कुटुंबात त्याचे आई-वडील, भाऊ व वाहिनी आहेत. त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात निर्माण परिवार सहभागी आहे.

आज सागर आपल्यात नसला तरी त्याचं नेहमी हसतमुख असणं, दुसऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असणं, संगीत, नाटक येथपासून विविध सामाजिक प्रश्नांबद्दल त्याची समज व जाण, आपल्या शारीरिक मर्यादा सांभाळूनही रोजगार हमी योजना, मेळघाट धडक मोहीम, निर्माण निवड प्रक्रिया इत्यादी कामांत त्याचे योगदान देणं हे आज आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत.

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो...

वाई येथे निर्माण समुदाय चिंतन बैठक संपन्न

महाराष्ट्रातील युवांमधून सामाजिक कृती व परिवर्तनासाठी नवे कार्यकर्ते निर्माण व्हावेत यासाठी सुरु झालेल्या ‘निर्माण’ या उपक्रमाबाबत व या एकूणच कल्पनेबाबत ज्यांना आस्था आहे, जे निर्माणला विविध पद्धतींनी मदत व मार्गदर्शन करतात, जे निर्माणचे हितचिंतक आहेत अशा महाराष्ट्रभरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा व विचारवंतांचा गट म्हणजे निर्माण समुदाय! संख्येने व वैविध्यात सतत वाढत असलेला हा गट दर वर्षा-दोन वर्षात एकत्र जमतो व निर्माणच्या वाटचालीचा आढावा घेतो, विविध मुद्द्यांवर चर्चा करतो व भविष्याच्या दृष्टीने विचारमंथन करतो. या गटाची दोन दिवसीय चिंतन बैठक 16 व 17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या पुढाकाराने वाई येथे आयोजित करण्यात आली होती. “२१व्या शतकातील महाराष्ट्रासाठी सामाजिक परिवर्तनाच्या युवा कार्यकर्त्यांचे निर्माण” ही या बैठकीची मुख्य थीम होती. महाराष्ट्राच्या विविध भागात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक व वैज्ञानिक क्षेत्रांत कार्यरत असलेले सुमारे 30 मान्यवर बैठकीला उपस्थित होते.

२१व्या शतकाच्या पहिल्या अर्धशकांत महाराष्ट्राचे चित्र काय राहील, प्रमुख सामाजिक आव्हाने कोणती असतील, यासाठी आवश्यक परिवर्तनाचा कार्यकर्ता कसा असेल, त्याच्या आर्थिक आधाराचे स्वरूप/ मार्ग काय असू शकेल, महाराष्ट्रातील युवांना समाजोन्मुख होवून व पुढे परिवर्तनाचा कार्यकर्ता म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक विचार, मूल्य, निष्ठा व क्षमता कशा मिळतील, त्यासाठी शिक्षण व विकास प्रक्रिया काय असू शकेल, इ. विविध विषयांवर या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. सुरुवातीला निर्माण प्रक्रियेची आजवरची वाटचाल, उपलब्धी, प्रश्न व या प्रक्रियेद्वारे महाराष्ट्रातील युवांचे कळलेले चित्र यावर निर्माण कोऑर्डिनेशन टीमद्वारे थोडक्यात मांडणी झाली. बैठकीच्या अंती निर्माण समुदाय म्हणून मी काय करू इच्छितो/इच्छिते यावरही चर्चा झाली.

सर्व उपस्थित मान्यवर हे गेली कित्येक वर्षे आपापल्या कार्यक्षेत्रात अत्यंत संवेदनशीलपणे व सामाजिक जाणीवेतून सातत्याने महत्वपूर्ण योगदान देत असल्याने त्यांच्या अनुभवाचा व चिंतनाचा उपयोग ही बैठक अर्थगर्भ होण्यासाठी तर झालाच पण सोबतच निर्माण व निर्माण समुदायाच्या पुढील प्रवासामध्येही उपयुक्त असेल.

दोन निर्माणी डॉक्टरांनी घडवला प्राथमिक आरोग्य केंद्रांचा जीर्णोद्धार

डॉ. रामानंद जाधव
उण्यापुऱ्या ७ महिन्यांत मिळाली लोकांची पावती



गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे निर्माणचे डॉ. शिवप्रसाद थोरवे (प्राथमिक आरोग्य केंद्र, पेंढरी) व डॉ. रामानंद जाधव (प्राथमिक आरोग्य पथक, जाराबंडी) यांच्या कामाला रुग्णांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. शिवप्रसाद थोरवे
आलेला रुग्ण परत जावू नये म्हणून डॉ.  शिवप्रसाद याने रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध असण्यावर व औषधांचा साठा अद्ययावत ठेवण्यावर भर दिला. तसेच त्याने उपलब्ध सोयीसुविधांमध्ये सतत सुधारणा करण्याचा धडाका लावला. Operation theatre दुरुस्त करणे, आरोग्य केंद्रात विजेचा अखंडित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी inverter बसवणे येथपासून बंद पडलेली उपकेंद्रे सुरू करणे, उपकेंद्रांवर नर्स उपलब्ध राहतील याची काळजी घेणे, सुरक्षित बाळंतपणासाठी त्यांना साधनसामुग्री पुरवणे, आशांच्या मानधनाचा अनुशेष भरून काढणे अशी प्रशासकीय कामेही त्याने सांभाळली. त्याचा परिणाम होऊन एप्रिल महिन्यात दवाखान्यात भेट देणाऱ्या रुग्णांची संख्येमध्ये ३५५ वरून वाढ होऊन ऑक्टोबर महिन्यात ती १२४५ वर पोहोचली आहे.

डॉ. रामानंदच्या प्रयत्नांमुळे पूर्वी अनियमितपणे चालणारा बाह्य रुग्ण विभाग रोज नियमितपणे सुरू झाला आहे. दवाखान्याच्या ठरलेल्या वेळेत रुग्णांनी येण्याची अपेक्षा न ठेवता रुग्ण येतील तीच दवाखान्याची वेळ असा मूलगामी बदल त्याने घडवून आणला आहे. रुग्णांना दवाखान्यात यावेसे वाटावे म्हणून दवाखान्याची स्वच्छता, औषधे तसेच इंजेक्शनचा साठा अद्ययावत ठेवण्याकडे त्याने विशेष लक्ष दिले आहे. वेळप्रसंगी चालक नसताना स्वतः गाडी चालवून गडचिरोलीतून औषधे आणली आहेत. त्याच्या प्रयत्नांचा परिपाक म्हणून दवाखान्यात भेट देणाऱ्या रुग्णांची संख्या एप्रिल महिन्यात १७८ वरून ऑक्टोबर महिन्यात १०१६ पर्यंत वाढली आहे.

कठीण परिस्थितीतही स्वतःच्या अडचणींऐवजी रुग्णाला केंद्रस्थानी ठेवले तर मोठा परिणाम होतो याचे हे तरुण डॉक्टर्स उत्तम उदाहरण आहेत.

Butterfly effect: स्थानिक लढाईचे मंत्रालयात पडसाद

निर्माणच्या नवख्या डॉक्टरने दिले प्रस्थापितांच्या गैरव्यवहाराला आव्हान


(टीप: ही लढाई लढणाऱ्या निर्माणीच्या सूचनेनुसार नाव व स्थळ यांचा उल्लेख टाळला आहे. सोयीसाठी या तरुण निर्माणी डॉक्टरला आपण ‘अ’ म्हणू. त्याला मदत करणाऱ्या निर्माणच्या ज्येष्ठ सहकाऱ्याला ‘ब’ म्हणू, तर या घटनेतील भ्रष्ट वैद्यकीय अधिकाऱ्याला ‘क्ष’ म्हणू.)

‘अ’ हा निर्माणी डॉक्टर महाराष्ट्रातील एका मागासलेल्या भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू आहे. या आरोग्यकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. ‘क्ष’ यांची २६ जुलै रोजी निवड झाली. मात्र डॉ. ‘क्ष’ कागदोपत्री रुजू असूनही १२ ऑगस्ट पर्यंत आपल्या पथकात न फिरकल्यामुळे गावच्या पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्याकडे तक्रार केली. ही तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी डॉ. ’अ’लाच डॉ. ‘क्ष’ यांच्या पथकात पूर्ण वेळ काम करण्याचे आदेश दिले. मात्र स्वतःच्या केंद्राची जबाबदारी असल्यामुळे डॉ. ‘अ’ने पथकाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.

दरम्यान ‘ब’च्या सल्ल्यानुसार डॉ. ‘अ’ ने डॉ. ’क्ष’ आपल्या पथकात सेवा देतात का याची चौकशी सुरू केली. सरपंच-उपसरपंच यांनी ‘हो’ अशी ग्वाही दिली तर गावच्या पोलिसांनी व आश्रमशाळेने स्पष्टपणे ‘नाही’ म्हणून सांगितले. डॉ. ‘अ’ च्या मनात शंकेची पाल चुकचुकल्यामुळे त्याने गावकऱ्यांकडे विचारपूस केली असता डॉ. ‘क्ष’ हे पथकात फिरकत नाहीत हे स्पष्ट झालं. तक्रार करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे गेले असता असं लक्षात आलं की तोपर्यंत साक्षात डॉ. ‘क्ष’ हेच तालुका आरोग्य अधिकारी बनले आहेत.

आपल्या पथकाची जबाबदारी ३ वर्षे सांभाळणे अनिवार्य असूनही राजकीय ताकद पणाला लावून डॉ. ‘क्ष’ यांनी ही नियुक्ती करून घेतली हे स्पष्ट झाले. या नियुक्तीविरुद्ध डॉ. ‘अ’ व ‘ब’ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार केली. याची कुणकुण लागताच डॉ. ‘क्ष’ यांनी “’डॉ. ‘क्ष’ यांची नियुक्ती रद्द केल्यास तीव्र जनआंदोलन’ अशा आशयाची बातमी छापून आणली. ही बातमी छापणाऱ्या पत्रकाराला भेटून ‘ब’ यांनी ही नियुक्ती कशी बेकायदेशीर आहे हे नियमांनुसार दाखवून दिले. सत्य समजताच त्या पत्रकारानेही या नियुक्तीविरुद्ध आवाज उठला. इतर वृत्तपत्रांनीही सुरात सूर मिसळला. बातमी पूर्ण महाराष्ट्रात गाजली. तातडीने मंत्रालयातून डॉ. ‘क्ष’ यांची तालुका आरोग्य अधिकारी या पदावरून नियुक्ती रद्द करून त्यांना आपल्या पथकाची जबाबदारी तत्परतेने स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महाराष्ट्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत गरज असल्यामुळे इथून पुढे तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या पदी केवळ प्रशासकीय अधिकाऱ्याचीच नियुक्ती व्हावी असा महत्त्वाचा नियम बनवण्यात आला.

गल्ली असो वा दिल्ली, गैरव्यवहार सर्वत्रच घडत असतात. बऱ्याचदा अतिपरिचयादवज्ञा या न्यायाने आपण दुर्लक्षही करतो. परंतु डॉ. ‘अ’ व ‘ब’ यांनी दाखवून दिले आहे की गल्लीतली लढाईसुद्धा दिल्लीचे तख्त हलवू शकते आणि या लढाईचा फायदा गल्लीपुरता मर्यादित न राहता सर्वव्यापी होतो.

लिहिते व्हा...


निर्माणमधे विशिष्ठ समस्येवर प्रत्यक्ष काम करणार्‍या तरुणांची संख्या हळूहळू वाढत आहे. या कामादरम्यान किंवा कामाच्या निमित्ताने येणारे विविध अनुभव ते वेगवेगळ्या प्रकारे टिपून ठेवतात. पण ते निर्माण परिवारातील सर्व सदस्यांपर्यंत पोचू शकत नाहीत. अनेकदा ते अनौपचारिक गप्पांच्या स्वरुपात सीमित राहतात. हे सर्व अनुभव सीमोल्लंघनची टीम दर महिन्याला ‘लिहिते व्हा’ या सदराअंतर्गत निर्माणच्या सर्व तरुणांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते. आजच्या अंकात निर्माण १ च्या चारुता गोखलेचे तिच्या दीड वर्षातील सर्च या संस्थेसोबत केलेल्या कामाचे अनुभव, तिच्याच शब्दात... 

मलेरियाच्या निमित्ताने
मास्टर्सच्या प्रोजेक्टने मला Submission चा आनंद दिला. तर मलेरियावरच्या कामाने मला  Application चा आनंद दिला. मलेरिया हा विषय त्याची लक्षणं, डासांची उत्पत्तीस्थानं, मच्छरदाणीचा नियमित वापर, गप्पी मासे याच्यापलीकडे अजून बरंच काही आहे. आणि याचा खरा अर्थ पुस्तकात नाही तर कदाचित गडचिरोलीच्या जंगलात किंवा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये आहे.

पुण्यात Health Science मध्ये मास्टर्सच्या शेवटच्या वर्षाला असताना पुढील सहा महिन्यांच्या प्रोजेक्टचा विषय निवडण्यासाठी आम्हाला पंधरा दिवसांचा कालावधी दिला होता. रोज सकाळी कम्प्य़ूटरसमोर बसून ज्यावर आत्तापर्यंत विशेष काम झालेले नाही असा विषय आणि त्यातील  Research gap  शोधणे हा आमचा पुढील पंधरा दिवसांचा कार्यक्रमच बनला. नशीब बलवत्तर किंवा कदाचित कम्प्युटरचं बर्‍यापैकी ज्ञान असल्यामुळे प्रत्येकाला एक विषय मिळाला आणि तो पूर्ण करुन आम्ही सहा महिन्यांनी डिग्री घेऊन बाहेर पडलो. सर्वजण खुशीत होते. पण हा प्रोजेक्ट करताना मी मात्र खूप असमाधानी होते. यात माझ्या ज्ञानाची कसोटी लागली. आत्तापर्यंत शिकलेल्या कौशल्य़ांचा मी यात उपयोग करू शकले. पण हे सगळं कशासाठी हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. यामागचं प्रयोजन मी शोधू शकले नाही. हा प्रोजेक्ट करुन निव्वळ माझा होणारा फायदा यापेक्षा वेगळं उत्तर मी शोधत होते. वयाची 17 वर्ष शिकून जर हे ज्ञान मला काल्पनिक समस्येवर काल्पनिक उत्तर शोधण्यास प्रवृत्त करत असेल तर हे शिक्षण मला भविष्यात शहाणं होण्यास मदत करणार नाही हे माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागलं. हे सगळं विचारांचं वादळ शमेपर्यंत मास्टर्सनंतर पुढे काय? हा प्रश्न समोर येऊन उभा ठाकला. लगेच पीएच.डी करायची नाही हे पक्क होतं. मागील काही वर्षांपासून डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सुरु केलेल्या ‘निर्माण’ चळवळीशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या ‘सर्च’ या संस्थेशी तोंडओळख झाली होती. अगदी खर्‍याखुर्‍या प्रश्नाशी लढा देण्यासाठी आपली शस्त्र पुरेशी धारदार आहेत का हे आजमावण्यासाठी मी ग़डचिरोलीतील ‘सर्च’ ही संस्था माझी युध्दभूमी म्हणून निवडली. आणि शत्रू होता मलेरिया हा रोग.
सरकारच्या आकडेवारीनुसार 2010 मध्ये मुंबईखालोखाल गडचिरोली जिल्हात मलेरियाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच हा जिल्हा मलेरियाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणारा जिल्हा (Endemic district) म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे सरकारतर्फे या जिल्ह्याला विशेष लक्ष पुरवले जायला हवे. परंतु प्रत्यक्षात येथे उलटाच प्रकार आहे. भाताची शेती, चौफेर घनदाट जंगल यासारख्या नैसर्गिक आव्हानांबरोबरच आरोग्य केंद्रात डॉक्टरची कमतरता, ऐन साथीच्या काळात मलेरियाच्या प्रभावी गोळ्यांचा तुडवडा, मच्छरदाण्यांची अनुपलब्धता अशा काही मानवनिर्मित समस्यांनाही येथील लोकांना सामोरे जावे लागते.  
    
    सर्चतर्फे आजुबाजुच्या 45 आदिवासी खेडयांमध्ये चालवल्या जाणारा मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गेत गेले वर्षभर सरकारतर्फे मच्छरदाण्यांचा आणि औषधांचा पुरवठा होण्यासाठी अनुदानप्रस्ताव लिहिणे, त्यांचे योग्य वाटप आणि वापर यासाठी प्रयत्न करणे, आदिवासी लोकांचे मलेरियाविषयीचे आरोग्यशिक्षण तसेच मलेरियाच्या त्वरित निदानासाठी गावपातळीवरील आरोग्यसेवकांना प्रशिक्षित करणे या कामांमध्ये मी सहभागी आहे. या 45 गावांमध्ये मलेरियाची व्याप्ती नेमकी कशी आहे हे पाहण्याच्या दृष्टीने आजुबाजुच्या आरोग्य केंद्रांमधून मलेरिया नेमका कोणत्या महिन्यात अधिक आहे, पुरुषांमध्ये अधिक की बायकांमध्ये अधिक, कोणत्या वयोगटात अधिक यावरील आकडेवारी गोळा करण्यापासून माझे काम सुरु झाले. हळूहळू समस्येचा आवाका व आणि आव्हानं लक्षात येऊ लागली.

मलेरिया हा आजार खरंतर इथल्या लोकांच्या अंगवळणी पडलेला. मलेरियामुळे औषधांवर होणारा खर्च, दवाखान्यात भरती केल्यामुळे बुडणारी रोजी, उपचाराच्या अभावी होणारा मृत्यू या सर्व बाबी जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे असं मानणार्‍या आदिवासींमध्ये मलेरिया प्रतिबंधाविषयी जागरुकता निर्माण करुन ती कृतीत परिवर्तीत करणं हे माझ्यापुढील मोठं आव्हान होतं. आदिवासी लोक मुळात मितभाषी. त्यात भाषा गोंडी. यामुळे सुरुवातीला त्यांना बोलतं करणं हे एक जिकीरीचं काम असे. पण त्यांचा स्वभाव आणि देहबोली हळूहळू परिचित होऊ लागली.     

माझ्यादृष्टीने आदिवासी लोक मलेरियाविषयी पुरेशी जाणती नसली तरी इतकी वर्ष या भागात राहिल्यामुळे आजारामागची कारणं, लक्षणं, त्याची उपचारपध्दती याविषयी प्रस्थापित समजूती नक्कीच असणार. त्या समजल्याशिवाय पुढे जाता येणं शक्यच नाही. शिकवण्याच्या तयारीत निघालेले मी शिक्षकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्याच्या भूमिकेत गेले. लोकांच्या संस्कृतीशी परिचित होत असताना लोकसहभागाचं (community participation) अनन्यसाधारण महत्व मला पटू लागलं. लहानपणापासून स्वतंत्र विचारांना प्रोत्साहन देणार्‍या माझ्या मेंदूला निर्णयप्रक्रियेत पदोपदी लोकांची मतं विचारात घेणे सुरुवातीला पटेना. यावेळी John Dewey या मानसशास्त्रज्ञाचे वाचनात आलेलं एक वाक्य आठवलं  

No matter how ignorant a person is, there is one thing he knows better than anybody else and that is where the shoes pinch on his own feet and because it is the individual that knows his own troubles even if he is not literate or sophisticated in other respects. Every individual must be consulted in such a way, actively not passively that he himself becomes  a part of the process of authority, of the process of social control that his needs and wants have a chance to be registered in a way where they count in determining social policy.

जोपर्यंत मलेरियाविरुध्द उपाययोजना शोधणं हा माझा एकटीचा अजेंडा राहतो तोपर्यंत एक देणारा आणि एक घेणारा हा भेद कायम राहणार. आणि यासाठी या लोकांना critically conscious करुन त्यांच्या समस्यांच्या किल्ल्या त्यांच्याच हातात सूपूर्त केल्यास हा भेद कमी करणे शक्य आहे हे मी हळूहळू शिकू लागले. यानिमित्ताने आरोग्यशिक्षणाच्या अनेक शास्त्रीय पध्दती मी शिकले. माणूस नेमका शिकतो कसा आणि शिकलेलं वर्तनात कसा आणतो या पूर्णत: नवख्या विषयाशी यादरम्यान माझी ओळख झाली.   

मध्यंतरी ‘सर्च’मध्ये अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील एका डॉक्टरबरोबर मलेरियावरील एका संशोधनात सहभागी होण्याची संधी मिळाली. या डॉक्टरने आदिवासी भागातील लोकांच्या मलेरियाविषयीच्या समजूती, त्यांचे वर्तन व त्याचा आर्थिक बोजा यांचा Anthropology (मानववंशशास्त्र) च्या अंगाने अभ्यास केला. हा अभ्यास माझ्यासाठी एक नवीन विषय शिकण्याचा सुंदर अनुभव ठरला. मलेरियाच्या उपचारासाठी गावातील पुजार्‍यांचा लोकांवरील प्रभाव, मच्छरदाणीच्या वापरामधले अडथळे, डॉक्टरांना गावातील मलेरिया हाताळण्यात येणार्‍या अडचणी याविषयीची महत्त्वाची माहिती या अभ्यासादरम्यान मिळाली.    

Medical Anthropology, Adult education, Behavioral Science हे सगळे विषय जर मी स्वतंत्रपणे पोकळीत शिकले असते तर कदाचित ते रुक्ष झाले असते. पण आज मलेरिया या एकाच समस्येसाठी मी हे ज्ञान उपयोगात आणते तेव्हा त्याचं प्रयोजन कळतं. ‘नई तालीम’ पध्दतीने काम करत करत शिकण्यात हाच खरा आनंद आहे.

या सर्व प्रवासात ‘निर्माण’च्या सहकार्‍यांची साथ मला खूप मोलाची वाटते. सुरुवातीला शहरातल्या मित्रमंडळींचे पाच अंकी पगार, त्यांची पदं पाहून आपण या वर्तुळाच्या बाहेर फेकले गेलो आहोत असा विचार यायचा आणि असुरक्षित वाटायचं. पण आज जमाखर्चाचा हिशोब मांडायचाच झाला तर कामादरम्यान मिळालेल्या अनुभवांचं आणि निर्माणच्या मुलांचं निव्वळ ‘असणं’ याने माझं पारडं खूपच जड झालं आहे हे लक्षात येतं.

शाळा कॉलेजचं शिक्षण घेताना आपल्या खूप मर्यादित कौशल्यांचा कस लागतो. अनेक वेळा आपल्या खर्‍या क्षमतांचा आपल्याला परिचयच झालेला नसतो. कारण बहुतांश वेळेला प्रश्नांची इतर कोणीतरी तयार केलेली उत्तर आपण फक्त reproduce करत असतो. ती पडताळून पाहण्याची  एकतर कधी आपल्याला संधीच मिळत नाही किंवा त्यासाठी पुरेसे कष्ट आपण घेत नाही. पण एखादा खराखुरा प्रश्न सोडवताना अरे, मला हेही जमतं असा अचानक प्रत्यय येतो. हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं आणि खूप आत्मविश्वास देऊन जातं.

सर्चमधल्या कामादरम्यान माझ्या व्यक्तिमत्वातल्या अनेक मर्यादा मला ओलांडता आल्या. आदिवासी गावात प्रत्येक घरी जाऊन मच्छरदाण्या विकणं, लोकांना मच्छरदाणी वापराचं महत्त्व पटवून देणं हे मी करू शकेन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण स्वत:ला आव्हानात्मक परिस्थितीत ढकल्याशिवाय आपल्या खर्‍या क्षमतांशी परिचय होत नाही हे मी कामादरम्यान शिकले.

निर्माणच्या काही सत्रांदरम्यान ‘मी कोण’ यापेक्षा ‘मी क़ोणाचा’ हा प्रश्न महत्त्वाचा आहे हे ऐकलं होतं. आज काम करायला लागल्यानंतर ‘मी कोण’ या प्रश्नाचं उत्तर ‘मी क़ोणाचा’ यात दडलं आहे हे लक्षात येतं.

सर्चमधल्या या कामाच्या अनुभवाने मला असं काय दिलं जे मास्टर्सच्या प्रोजेक्टने दिलं नाही? मास्टर्सच्या प्रोजेक्टने मला Submission चा आनंद दिला. तर मलेरियावरच्या कामाने मला  Application चा आनंद दिला. माझं ज्ञान कोणासाठी या प्रश्नाचं उत्तर मला या कामाने दिले. विनोबा भावेंचं ‘मधुकर’ या पुस्तकातलं एक सुंदर वाक्य आहे, ‘अश्व’ या शब्दाचा अर्थ कोशात घोडा दिला आहे. पण त्याचा खरा अर्थ तबेल्यात बांधला आहे. कोशातून बाहेर पडून तबेल्यात गेल्याशिवाय घोडा कळणारच नाही. मलेरिया हा विषय त्याची लक्षणं, डासांची उत्पत्तीस्थानं, मच्छरदाणीचा नियमित वापर, गप्पी मासे याच्यापलीकडे अजून बरंच काही आहे. आणि याचा खरा अर्थ पुस्तकात नाही तर कदाचित गडचिरोलीच्या जंगलात किंवा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये आहे.
चारुता गोखले

साकल्यवादी आणि घटकवादी विचार


     शब्द, चिन्हे, अधिकारपदे घ्या; शेतजमिनीची
     आखणी, तण आणि धान,जोखड आणि
     लगाम घ्या; चंद्रग्रहणाचे वेध, दगडधोंड्यांचा
     शोध, तलवारींची धातुपरीक्षा घ्या ---
     थोडक्यात जे जे काही माणसाचे आहे,
     माणसावर अवलंबून आहे,
     माणसाच्या कामी येणारे आहे,
     माणसाचे मनोगत सांगणारे आहे,
     माणसाच्या उपस्थितीची, कर्तृत्वाची,
     अभिरुचीची आणि जीवनरीतीची ओळख
     पटवणारे आहे,, त्या त्या सगळ्यांची
     नव्या इतिहासकाराला दखल घ्यायची आहे.

     "एका नव्या प्रकारच्या इतिहासाकडे" ( Vers une autre histoire) या १९४९ मधल्या,
मूळ फ्रेंच लेखातून वरील उतारा "भाषा आणि जीवन" या मराठी त्रेमासिकाने घेतला.
     निर्माण ४.३ शिबिरात Holistic विचार आणि Reductionist विचार यांवर काही चर्चा
झाली. शेवटी सल्ला दिला गेला, की विचार Holistic, साकल्यवादीच हवा, पण कृती मात्र
नेहेमी Reductionist, घटकवादीच असतात.
     आपण कृती करताना छोटीछोटी तात्कालिक, स्थानिक उद्दिष्टे गाठू पाहतो. पण विचार
करताना मात्र एकूण मानवजातीच्या हिताच्या दृष्टीने आपण करू जात असलेल्या कृतीचे
परिणाम काय असतील, असाच विचार करायला हवा. हे सूत्र इंग्रजीत Think globally, act
locally असे सांगितले जाते.
     आता हे ठसवणारे चुटके म्हणा, सूत्रे म्हणा--
     एका गोमेला विचारले, "तू तुझ्या शेकडो पायांपैकी कोणत्या पायापासून चालायला
सुरुवात करतेस?" ती global विचार करायला लागली, आणि तिला चालताच येईना! तेव्हा
चालताना, कृती करताना, local, reductionist राहणेच बरे.
     पण विचार करताना मागचा-पुढचा करावा, कारण Those who forget history are
condemned to repeat it. आणि History repeats itself, first time as tragedy, and
second time as farce. तेव्हा, जुन्या चुकाच पुन्हा करून आपण रडतो आहोत, इतर लोक
आपल्याला हसत आहेत, असे होऊन नको असेल, तर विचार सार्वकालिक, वैश्विक करावा!

नंदा खरे (नंदा काका)

पुस्तक परीक्षण: मंगल प्रभात (महात्मा गांधी)


दोनशे वर्षांनतर लोक गांधीजींना ओळखतील ते या पुस्तकामुळे –  विनोबा भावे

१९३० साली गांधीजी ‘येरवडा मंदिरात’ तुरुंगवास भोगत होते. तेव्हा २२ जुलै ते १४ ऑक्टोबर या दरम्यान त्यांनी आपल्या आश्रमवासी सहकाऱ्यांना १३ पत्रे लिहिली. मंगल प्रभात हे तळहाताहून थोड्या मोठ्या आकारांच्या साठ पानांचे पुस्तक या पत्रांचा संग्रह आहे. दर मंगळवारी सकाळची प्रार्थना आटोपली की गांधीजी हि पत्रे लिहायला बसायचे. त्यामुळे या संग्रहाला “मंगल-प्रभात” असे नाव दिले गेले. भारतीय समाजावर जेव्हा नैराश्येचे घोर साम्राज्य पसरले होते तेव्हा ज्या व्रतांनी राष्ट्रीय जीवनामध्ये आशा पल्लवित केल्या, स्वतःवरती विश्वास निर्माण केला, स्फूर्ती आणि धार्मिकतेचे वारे वाहते केले त्या व्रतांविषयीची गांधीजीची ही प्रवचने आहेत, असा खुलासा दत्तात्रेय कालेलकरांनी या पुस्तकास लिहिलेल्या प्रस्तावनेत केला आहे.
सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अस्वाद, अस्तेय (चोरी न करणे), अपरिग्रह (अतिरिक्त साठा न करणे), अभय, अस्पृश्यता निवारण, अंगमेहनत, सर्वधर्म समभाव, नम्रता आणि  स्वदेशी या व्रतांचा अर्थ, त्यांचा परस्पर संबंध आणि आपल्या आयुष्यातील त्यांचे महत्व गांधीजी आपल्या प्रवचानांमधून स्पष्ट करतात. तुरुंगामध्ये असताना ‘स्वदेशी’विषयी भाष्य करणार नाही असे वचन गांधीजींनी इंग्रज सरकारला दिले होते. त्यामुळे मूळ तेरा पत्रांमध्ये ‘स्वदेशी’ या व्रताचा समावेश नव्हता. तो पुढे केव्हातरी केला.
व्रत म्हणजे अटळ निश्चयाने नियमितपणे करावयाचा आचार आणि विचार. एखादी कृती नियम म्हणून करणं आणि तीच कृती व्रत समजून करणं यात अंतर आहे. अडचणीच्या एखाद्या वेळी नियम मोडण्याची मुभा घेतली जावू शकते. व्रतस्थ माणसाला हे स्वातंत्र्य नसते. अडचणींच्या वेळी निश्चयापासून न हटता उलट त्याचे पालन करणे म्हणजेच त्या निश्चयाप्रती व्रतस्थ असणे. अशी व्रते घेतल्याशिवाय माणसाची प्रगती होणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्या सारासार विवेक बुद्धीला जे पटत पण जे आपण सवयीने आचरणात आणू शकत नाही असे काम करण्याचेच आपण व्रत घेतले पाहिजे. प्रसंगी जीवाची बाजी लावून निर्धाराने त्याचे पालन केले पाहिजे. ‘जमेल तेवढे, झेपेल तसे नक्की करेन’ म्हणणारे पहिल्याच अडचणींचा सामना करताना हार पत्करतात. उलट कठीण प्रसंगीही आपल्या व्रताचे पालन केल्याने आपण नैतिकतेच्या कसोटीवर खरे उतरतोच शिवाय इतरांवरही त्याचा विलक्षण सकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे काही व्रते आपल्या जीवनाचा आधार असली पाहिजेत असे गांधीजी आपल्या शेवटच्या पत्रात सांगतात. कोणती व्रते आपल्या जीवनाचा आधार असावीत हे ठरवताना गांधीजीनी एका सुंदर कसोटीचा वापर केला आहे. ते म्हणतात संपूर्ण सत्याचा अनुभव हे आपले ध्येय आहे, तर अहिंसा हा त्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग. त्यामुळे जी व्रते आपल्याला अहिंसेच्या मार्गाने सत्यापर्यंत घेवून जातील ती व्रते आपण अंगिकारली पाहिजेत.
अर्थात त्यासाठी आधी सत्य आणि अहिंसेचे म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. सत्य म्हणजे केवळ खोटे बोलणे नव्हे. जे जे अस्तित्वात आहे ते सारे सत्य आहे. जे स्थळ आणि काळ व्यापून उरतं ते सत्याचे विश्वरूप. ते कधीही नष्ट होणारे नाही. विश्वाच्या पटलावर आपला देह कणभर आहे आणि काळाच्या आलेखावर आपले आयुष्य अक्षरशः क्षणभर आहे. त्यामुळे सत्याच्या विश्वारुपाचे या देही दर्शन होणे अशक्य आहे. मात्र सत्याचा शोध घेत राहणे हा “चटपटीत” अनुभव असतो, असं गांधीजी पहिल्याच पत्रात लिहितात. सत्य गवसणे म्हणजेच ज्ञान प्राप्त होणे. ज्ञान प्राप्त होण्यातच आनंद सामावलेला आहे. असा आनंद अनुभवणं म्हणजेच त्या सत्-चीत्-आनंद रूपाशी एकरूप होणं. ह्या सत्-चीत्-आनंदाचा शोध घेण्यातच माझ्या जगण्याचे इप्सित दडलेले आहे यावर श्रद्धा ठेवली तर प्रयोगशीलता आणि वैराग्य या दोन साधनांच्या मदतीने तो अनुभव घेता येतो.
आपले विचार-बोलणे आणि वागणे यातील खरेपणा म्हणजे सत्य, असे समजून सुरुवात करावी. आपल्याला सापडेल त्या मार्गाने सत्य शोधण्याचा प्रवास सुरु करावा. हा प्रवास खडतर आहे. ठेचा खात खात योग्य मार्ग शोधात राहणे हि तपश्चर्या आहे. ती करताना स्वार्थ आपोआप गळून पडतो. आणि निःस्वार्थ प्रवास करणारा कुणीही आजवर चुकीच्या मार्गाने शेवटपर्यंत गेलेला नाही. वाट चुकली तर ठेच लागतेच. ठेच लागलेला माणूस त्याच चुकीच्या वाटेने चालणार नाही. तो योग्य वाटेच्या शोधात परत फिरेल. त्यामुळे तो योग्य मार्गानेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेल. तेव्हा सत्याच्या शोधात चालत राहिले पाहिजे. साहजिकच हा मार्ग डरपोक लोकांसाठी नाही. मात्र हे खरे कि सत्य परीस-कामधेनु-चिंतामणी-परमेश्वर आहे. 
सत्याच्या शोधात निघालेल्या जिज्ञासुला अहिंसेचा मार्ग सापडतो. सत्याच्या शोधात अनेक अडचणी समोर येतात. त्या झेलू कि त्यांचा सामना करण्याचे टाळण्यासाठी शक्य तो नाश करू ? हा प्रश्न पडतो. नाश करून पुढे जाता येत नाही. अडचणी झेलूनच ते शक्य होते. अडचणी झेलणं हि शूरता, आणि त्यां संपवण्यासाठी विनाश करणे ही कायरता आहे. ‘मी अडचणींचा सामना करू कि त्या संपवण्यासाठी हल्ला करण्याची कायरता दाखवू?’ या प्रश्नात दडलेले सत्य शोधताना अहिंसेची भावना निर्माण होते. तमाम खराब विचार आणि त्याबरहुकूम झालेली प्रत्येक कृती ही हिंसाच आहे. केवळ एखाद्याला शाररीक यातना देणे म्हणजेच अहिंसा नव्हे. या दृष्टीने अहिंसा समजून घेतली आणि पाळली तर आपल्यामते धैर्य, साहस, उदारता, शांती आणि सुख वाढते. हे हवे असते तेव्हाच तर आपल्याला चिंतामणी आणि परमेश्वाराची आठवण होते, नाही का ?
अहिंसा म्हणजे सर्वव्यापी प्रेम. प्रापंचिक जीवनात अडकलेल्या व्यक्तींसाठी कुटुंबाची कल्पना खूप मर्यादित झालेली असते, त्यांनी आपले सर्वस्व आपल्या कुटुंबियांना अर्पण केलेले असते. ते सर्वांप्रती सारखे प्रेम बाळगू शकणार नाहीत. म्हणून  सत्यशोधकाने ब्रम्हचर्य पाळावे. याचा अर्थ जनन इंद्रियांवर काबू असा न घेता सर्व इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे असा घेतला पाहिजे. 
चौथे, पाचवे आणि सहावे पत्र अनुक्रमे अस्वाद, अस्तेय आणि अपरिग्रह या व्रतांविषयी आहे. चवीसाठी किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर शरीराची गरज भागविण्यासाठी औषध समजून गरजेपुरतेच अन्न आपण ग्रहण केले पाहिजे. संबंधित व्यक्तीची  परवानगी असल्याशिवाय आणि आपली ती खरच गरज असल्याशिवाय एखाद्याची कोणतीही वस्तू घेणे किंवा त्यावर वाईट नजर ठेवणे, ती वस्तू हस्तगत करण्याचा विचार करणे म्हणजेच चोरी करणे, जगात आज जी काही कंगाली आहे ती माणसाच्या या वृत्तीमुळेच बोकाळलेली आहे तेव्हा आपण सार्वार्थाने चोरी करू नये. कुणी गरजेपेक्षा जास्त साठवले नाही तर जगात विषमता उरणारच नाही त्यामुळे आपण जाणीवपूर्वक आपल्या गरजा कमी कराव्यात, वस्तू आणी ज्ञानाचा सुद्धा अनावश्यक संग्रह करू नये. असा ह्या व्रतांचा ठोबळ अर्थ आहे.
गांधीजी पुढे अभय, अस्पृश्यता निवारण, अंगमेहनत आणि सर्वधर्म समभाव या व्रतांविषयी लिहिताहेत. सर्व बाह्य भीतींपासून आपण मुक्ती मिळवली पाहिजे. भीती ही शरीराशी संबंधित असते. शरीराचा मोह टाळला तर आपण आत्मरूप होतो. आपण सारेच आत्मरूप आहोत. स्पृश्य-अस्पृश्यतेचा भेद हा हिंदू धर्मास लागलेली कीड आहे. ती आपण प्रतत्नपूर्वक काढून टाकली पाहिजे. अस्पृश्यता हि कामाच्या विभागणीपासून सुरु होते त्यामुळे कोणतेही काम वाईट न समजता आपण ते केले पाहिजे. जो कष्ट करीत नाही त्याला खायचा अधिकार काय ? असा तीक्ष्ण प्रश्न गांधीजी विचारतात. पुढची तीन पत्रे सर्वधर्म समभाव, नम्रता आणि स्वदेशी विषयी आहेत.
सर्वच व्रतांची चर्चा करताना गांधीजी मी स्वतः ते समाज, सृष्टी आणि त्याही पलीकडे जे अमूर्त आहे तिथपर्यंत साऱ्याचा पट उलगडतात. त्याचा परस्पर संबंध सांगतात. एक एक व्रत आचरून आपण काय अनुभवू शकतो ते सांगतात. व्रत घ्यायचे म्हणजे लगेच उद्यापासून त्याचे तंतोतंत पालन केल पाहिजे असे नव्हे तर तसे करण्याचा रोज प्रामाणिक प्रयत्न करणे, हे आग्रहाने सांगतात. वाचायला सोपे आणि समजायला कठीण असे हे पुस्तक आपल्याला पडलेल्या कोड्यांची उत्तरे देते. निदान तसे क्षणिक समाधान तरी देते. पुन्हा ते वाचावे अशी ओढ निर्माण करते.
माझे सत्य आणि त्याचे सत्य खरे असू शकते, मग कोणते सत्य मानायचे ? रोज कितीतरी किडे-मुंग्या पायाखाली चेंगरून मारतात, मग अहिंसा पाळणे कसे शक्य होईल ? लग्न केलेल्यांनी ब्रम्हचर्य कसे पाळायचे आणि ते पाळायचे असेल तर इतर सर्वानीच लग्न करायचे नाही, हे कसे चालेल ? मीठ जेवणाला स्वाद देते मग अस्वादी व्हायचे म्हणजे मीठही खायचे नाही का ? असे प्रश्न पडले असतील तर हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे.
कल्याण टांकसाळे