'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

सीमोल्लंघन, ऑक्टोबर २०१३

सौजन्य: अमृता ढगे, dhage.amruta@gmail.com 

या अंकात...
मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये भरती झाल्यावर एखाद्या फुटबॉलप्रमाणे आपण वेगवेगळया स्पेशालिस्ट, लॅब, फार्मसीत फिरत असतो. या प्रवासामागचं अर्थकारण काय? डॉ. सोपान कदम यांचे अनुभव...

ü स्त्रीभ्रूण हत्यांविरुद्ध हल्लाबोल !

ü सलग दुसऱ्या गणेशोत्सवात नागपूर निर्माण गटातर्फे निर्माल्यसंकलन

ü मोजमाप व विल्हेवाट निर्माल्याची

ü जलव्यवस्थापनात उच्च शिक्षणासाठी सचिन तिवलेला मानाचीशिष्यवृत्ती !

ü प्रियंका यादवच्या रिसर्च पेपरची Population Association of America च्यावार्षिक conference साठी निवड

ü पुण्यामध्ये महाराष्ट्र सोशल ऑलिम्पियाडची पहिली कार्यशाळासंपन्न

ü मेळघाटातील कुपोषणग़्रस्त भागात काम करण्यासाठी धडक मोहिमेतअनेक निर्माणींचा सहभाग

ü दलितांच्या पैशांतून स्मशानभूमीचे सुशोभीकरण ?

ü नाशिकला कचरावेचकांची आरोग्यतपासणी

ü महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे जळगावात जातपंचायत मूठमाती संघर्ष परिषदचे आयोजन

ü दक्षिण आशियातील शांतता, लोकशाही आणि आव्हाने

ü मयूर सरोदेचा Tech ForSeva परिषदेत सहभाग

ü मनोहर शेखावतचे सुमित्रा भावे व सुनिल सुखटणकरांसोबत काम सुरु

ü सुहेल शिकलगार मल्हारपेठ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणूनकार्यरत

ü भूषण देव पारोळ्यात बालस्वास्थ्य वैद्यकीय अधिकारी म्हणूनरुजू

ü चारुता गोखलेचे UnitedNations Population Fund या संस्थेबरोबर काम सुरु

ü निर्माण पुणे गटासाठी अर्थक्रांती व आयुर्वेद चिकित्सेवरसत्रे

ü उत्तर महाराष्ट्रातील गटाची पहिली भेट !

ü सेंद्रीय शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे !

ü उत्तराखंड प्रलय भाग २

उत्तराखंड प्रलयाची शास्त्रीय कारणे काय होती? त्यातली नैसर्गिक कोणती होती? मानवनिर्मित कोणती होती? हा प्रलय कसा पसरत गेला? या संकटावर मेडीयाचा चांगला आणि वाईट प्रभाव कसा पडला? holistic view देणारा डॉ. प्रियदर्श तुरे याच्या लेखाचा उत्तरार्ध

ü पुस्तक परिचय

दोन अगदी वेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या डॉक्टरांच्या पुस्तकाचा परिचय करून देतोय शिवप्रसाद थोरवे... डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे ‘विचार तर कराल’ आणि डॉ. शशांक परुळेकर यांचे ‘डॉक्टरबाबू’ तुम्हाला कसे वाटले?

ü निर्माणीच्या नजरेतून...

आपल्या पेशंटचं सुंदर छायाचित्र टिपलंय डॉ. बाबासाहेब देशमुखने...

ü तिनका तिनका जर्रा जर्रा

या स्तंभाच्या माध्यमातून काढलेला नंदा काकांचा शेवटचा चिमटा...

ü IF - Rudyard Kipling


आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘Jungle book’ ची रचना करणाऱ्या कवीची सुंदर कविता...


‘नोबल’ प्रोफेशनचा ‘कट’


आपण जेव्हा एका डॉक्टरकडून दुसऱ्या स्पेशालिस्टकडे, लॅबवाल्याकडे व फार्मसीमध्ये जातो, डॉक्टरांनी सांगितलेल्या साऱ्या तपासण्या करून घेतो, सारी औषधे विकत घेतो, तेंव्हा ‘आपल्याला लुटत तर नाही आहेत ना?’ असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. नुकतेच निर्माण ५.२ब (वैद्यकीय) शिबिरात एक वादळी सत्र झालं डॉ. सोपान कदम यांचं. महाराष्ट्रातील दोन मोठ्या शहरांतील खासगी व्यवसायाची स्थिती डॉ. सोपानना पाच वर्षे खूप जवळून पहायला मिळाली. खासगी वैद्यकीय व्यवसायामागचे अर्थकारण डॉ. सोपानना कसे दिसले? वाचूया त्यांच्याच शब्दांत...

माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि माणसाच्या आजूबाजूला खूप चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. त्यापैकी एक वाईट गोष्ट म्हणजे कामाबद्दल कमिशन घेणे. पूर्वी कोणीही कोणाचे काम हे मदत किंवा कर्तव्य म्हणून करत असे. जसाजसा काळ बदलला, शहरीकरण झाले, पैशांचे महत्त्व वाढले. माणसांचे राहणीमान उंचावले आणि गरजा वाढल्या. प्रत्येक गोष्ट पैशांत मोजली जाऊ लागली. पैसा मानाचा मानबिंदू झाला तसे कमी वेळेत व कमी श्रमामधे पैसे मिळवण्यासाठी प्रत्येक कामामधे पैसे घेण्याची पद्धत सुरु झाली.
कमिशन घेण्याची पद्धत प्रत्येक क्षेत्रात आहे, जसे घर, जमीन खरेदी-विक्री. मंदिरासमोर फुलांच्या दुकानात गिऱ्हाईक पाठवले तर कमिशन मिळते. बांधकाम क्षेत्रात, घर भाड्याने घेणे देणे, लग्न जमवणे, एका वकीलाने केस दुसऱ्या वकीलाला देणे  असे अगदी लहानापासून ते मोठ्या क्षेत्रांत कामाच्या बदल्यात कमिशन सुरु आहे. यावर कळस म्हणजे ज्या क्षेत्राला ‘नोबल’ लोकांचे क्षेत्र म्हणतात ते वैद्यकीय क्षेत्रसुद्धा कमिशन पद्धतीखाली आले आहे व वाढत आहे. मी या क्षेत्रातील फार जास्त काही सांगू शकणार नाही; पण जे मी पाहिले, अनुभवले, ऎकले आणि माझी गरज होती म्हणून केले व करायला लावले मी ते आज तुमच्यासमोर मांडणार आहे.
कमिशन घेणे आणि देणे या वाक्प्रचाराला वैद्यकीय भाषेमधे कट प्रॅक्टिस म्हणतात. कट म्हणजे काय, तर आपल्या वाईट कामाचा रितसर वाटा घेणे. मी आज आपल्यासमोर दोन मोठ्या शहरांतील कट प्रॅक्टिसबद्दल बोलणार आहे.
कट प्रॅक्टिसची खरी सुरुवात होते पेशंट रेफर करण्यातून. पेशंट रेफर करणे पूर्वी चांगल्या उद्देशाने होत असे. पूर्वीच्या काळी फॅमिली डॉक्टर असल्यामुळे त्यांना कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आजारांचा इतिहास माहीत असायचा. फॅमिली डॉक्टरचे रुग्णाशी खूप जवळचे सबंध असायचे. त्यामुळे रुग्णाचा वेळ, पैसा वाचावा, त्याला योग्य उपचार मिळावे व फ़ॉलोअप करणे सोपे व्हावे म्हणून फ़ॅमिली डॉक्टर पेंशटला रेफर करत असे. पण जशी जशी वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आणि सेवेऎवजी नफा कमावणे हा उद्देश झाला, ह्या ‘नोबल’ व्यवसायाचे बाजारीकरण झाले व कट प्रॅक्टिसचा रोग वैद्यकीय क्षेत्राला लागला.
कट प्रॅक्टिस कशी चालते? हा सरळ सरळ व्यवहार असतो. एखाद्या डॉक्टरने (व्यक्तीने) एखादा रुग्ण जर दुसऱ्या डॉक्टरकडे उपचारासाठी पाठवला, तर त्या रूग्णाचा उपचार झाल्यानंतर जी काही रक्कम तो रुग्ण दुसऱ्या डॉक्टरांना देईल, त्या रक्कमेतील काही वाटा पहिल्या डॉक्टरला (व्यक्तीला) रुग्ण पाठवला म्हणून देणे याचा अर्थ म्हणजे कट देणे असा होय. कट प्रॅक्टिसचे दर शहर, शहराचा परिसर, रुग्ण पाठवणाऱ्याचे शिक्षण, ज्या डॉक्टरकडे रुग्ण जातात त्याचे शिक्षण, रुग्णालयाचे बांधकाम, सुविधा यावर आकरले जाते. मी ज्या शहरात काम केले, तिथे रुग्ण पाठवणाऱ्या व्यक्तीप्रमाणे कट खालीलप्रमाणे:
·       जी.पी. - ३० ते ३५ %
·       डिग्री नसलेले लोक - ३५ ते ४० %
·       जीप ड्रायवर - १२ ते १५ % [आर्थो, न्युरो, मेडीसीन]
·       अॅम्बुलन्स ड्रायवर - १२ % [मेडीसीन, बालरोग, स्त्रीरोग]
·       सरकारी नर्स,वार्ड बॉय,कर्मेचारी -१० % [जाण्यायेण्याचे भाडे]

कट प्रॅक्टिसचा व्यवहार कसा पार पाडला जातो? बहुतेक लहान-मोठे हॉस्पिटल्स व डॉक्टर हे एक पी.आर.ओ. कामाला ठेवतात. पी.आर.ओ. म्हणजे पब्लिक रिलेशन ऑफिसर.
पी.आर.ओ. काय काम करतो ? तो शहरातील व आजूबाजूच्या खेड्यातील जी.पी.ची भेट घेउन आपल्या हॉस्पिटलची माहिती त्यांना देतो व “तुम्ही पेंशट पाठवा, हिशोबाचे मी बघून घेतो. पेशंट असला की मला फोन करा” असे सांगून  व्यवहाराला सुरुवात करतो.
पी.आर.ओ. काय माहिती गोळा करतो?
पी.आर.ओ. जी.पी.चे नाव, पत्ता, घरचा पत्ता, डिग्री, दवाखाना कधी सुरु केला [त्याच काळात आजूबाजूला इतर कोणी दवाखाना सुरु केला आहे व त्याची प्रॅक्टिस कशी आहे], जात, धर्म, वय, गाव, कोठे शिकला आहे इ. माहिती जमा करतो. डॉक्टरकडे येणारा पेशंट कसा आहे? लहान मुले / महिला, त्याचा आर्थिक स्तर - श्रींमत आहे की गरीब यावरुन ह्या जी.पी.वर किती लक्ष द्यायचे हे ठरते. तसेच एखादा डॉक्टर कोणाकडे पेशंट पाठवतो व तिथेच का पाठवतो? त्याला किती कट भेटतो? किती पार्ट्या भेटतात? कट हा प्रत्येक पेशंट डिस्चार्ज झाल्याबरोबर द्यावा लागतो की दोन–तीन पेशंट मिळून दिला तरी चालतो? हिशोब दाखवावा लागतो का नाही? तसेच त्याचे छंद किंवा व्यसने - दारु पिणे, क्रिकेट, पर्यटन इ. ही माहितीदेखील गोळा केली जाते. तसेच डॉक्टरांचे दुसऱ्या हॉस्पिटलसोबत संबंध कसे आहेत? दुसऱ्या हॉस्पिटलबाबत त्यांना काही वाईट अनुभव आहे का? असेल तर तो अनुभव इतर जी.पी.ना सांगून त्यांना आपल्या हॉस्पिटलकडे वळवून घेणे व तसा अनुभव आपल्या हॉस्पिटलमध्ये येणार नाही याची पी.आर.ओ. काळजी घेतो.
याबद्दल मी आपल्याला एका बालरोग तज्ञाचा अनुभव सांगतो. ह्या बालरोग तज्ञाचे एक हॉस्पिटल आहे. त्यांच्याकडे एका जी.पी.ने रुग्ण  पाठवला होता. रुग्णाला हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यावर रुग्णाला बिल देण्यात आले. रुग्णाचे नातेवाईक बालरोग तज्ञाकडे बिल कमी करुन घेण्यासाठी आले असता, त्या बालरोगतज्ञाने त्या जी.पी.ला फोन केला व मोबाईलचा लाउड स्पिकर ऑन ठेवला. बालरोगतज्ञ जी.पी.ला म्हणाले “तुमचे पेंशट बिल कमी करुन मागत आहेत, मग तुमच्या पैशांचे काय करायचे?” जी.पी.ला नातेवाईक बोलणे ऎकत आहेत हे माहित नव्हते. त्यामुळे जी.पी. बालरोग तज्ञाला म्हणाला “मला ते काही माहित नाही. मला माझे पैसे पाहिजेत.” यामुळे रुग्णाचे नातेवाईक जी.पी.वर खूप रागवले व त्यांनी जी.पी.ला शिव्या दिल्या. त्यामुळे जी.पी. खूप चिडला व त्यांनी ही गोष्ट जी.पी. संघटनेला कळवली. त्यामुळे सर्व जी.पी.नी त्या बालरोगतज्ञाकडे रुग्ण पाठवणे बंद केले. सहा महिन्यांत बालरोगतज्ञाचे हॉस्पिटल बंद होण्याची वेळ आली. मग पी.आर.ओ. ने मधस्थी करुन एक पार्टी आयोजित केली व त्या बालरोग तज्ञाने सर्वांसमोर त्या जी.पी.ची माफी मागतली आणि प्रकरण मिटवण्यात आले.
एखाद्या जी.पी. चा रुग्ण चुकून दुसऱ्या हॉस्पिटलला गेला तरी त्या जी.पी.ला क़ट मिळतो. याचे कारण तो जी.पी. इतर डॉक्टरांनासुद्धा हा अनुभव सागंतो व त्यामुळे नवीन जी.पी. सुद्धा त्या हॉस्पिटलकडे रुग्ण पाठवायला सुरुवात करतात.
कट प्रॅक्टिसमध्ये पी.आर.ओ. सोबत हॉस्पिटल मधील इतर कर्मचारीसुद्धा सहभागी असतात, जसे- जुन्या सिस्टर, जुन्या आयाबाई,  घरच्या ग़ाडीचा ड्रायवर, आर.एम.ओ. व रिसेप्शनिस्ट सुद्धा कट प्रॅक्टिस पार पाडण्यात हॉस्पिटलला मदत करतात. उदा. जुन्या सिस्टर रुग्णाची माहिती काढतात की हा रुग्ण कोणाच्या सांगण्यावरून आला आहे. कारण रुग्ण वैद्यकीय क्षेत्रातील माहिती असलेल्या व्यक्तीचा सल्ला घेतात.जसे –मेडिकल दुकानदार, लॅब टेक्नीशिअन, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, अॅम्बुलन्स ड्राइव्हर, गावातील पुढारी लोक, गावातील वैद्यकीय क्षेत्रात शिकणारा विद्यार्थी इ. मग जुन्या सिस्टर ह्या लोकांना सांगतात, ‘पुढच्या वेळेस नवीन रुग्णाला घेउन आलात तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ’ किंवा ‘मला फक्त फोन करा, मी डॉक्टरना सांगून तुम्हाला पैसे मिळवून देते.’ आयाबाई सुद्धा अशाच प्रकारे काम करतात. घरच्या ग़ाडीचा ड्राइव्हर इतर रुग्ण घेऊन येणारे ड्राइव्हर, अॅम्बुलन्स ड्रायवर यांना या साखळीत ओढतो. हॉस्पिटल मधे आर.एम.ओ. म्हणून काम करणारा डॉक्टर आपल्या मित्रांना सांगतो की तुम्ही पेशंट पाठवा मी तुम्हाला कट मिळवून देतो. पुढे हाच आर.एम.ओ. त्याचा छोटा दवाखाना टाकतो व ते ह्या हॉस्पिटलचे extension  center होते.
हॉस्पिटल कटचे पैसे रुग्णाकडून कसे वसूल करतात?
[१] बेड चार्ज वाढवून –जर रुग्ण रेफर होऊन आला असेल तर रेफर करणाऱ्या डॉक्टरनुसार बेड चार्ज ठरवला जातो (जर रुग्णाची शस्त्रक्रिया असेल तर आधीच पैसे वाढवून सांगितले जातात)
[२] रुग्णाच्या गरजेपेक्षा जास्त तपासण्या करणे, जसे –रक्ताच्या तपासण्या करणे कारण रक्त तपासाणीच्या एकूण पैशांच्या ४०% ते ५०% लॅबवाल्याकडून मिळतात. तेच पैसे जी.पी.ला क़ट म्हणून देण्यासाठी वापरतात. तसेच रेडिओलॉजी तपासण्यांमधून २०% मिळतात. ह्या तपासण्या वारंवार फक्त कटचे पैसे वसूल करण्यासाठी केल्या जातात.
[३] औषधीमधून – हॉस्पिटलला ज्या औषध कपंनीच्या औषध विक्रीतून जास्त फायदा मिळतो, असे महागडे गरजेपेक्षा जास्त औषध रुग्णाकडून फक्त आपल्याच हॉस्पिटलच्या फार्मसीमधून मागवले जाते. ते थोडेच वापरून रुग्णाला/नातेवाईकांना कळू न देता पुन्हा वॉर्डबॉय, आया, सिसटर यांच्यामार्फत हॉस्पिटलच्या फार्मसीत जमा होते.
[४] रुग्णाला डिस्चार्ज लवकर दिला जात नाही. भरपूर बिल झाले की मगच डिस्चार्ज दिला जातो.
[५] व्हिजिटिंग डॉक्टरला बोलावून त्याचे पैसे रुग्णाकडून वसूल केले जातात. त्यातील थोडे पैसे व्हिजिटिंग डॉक्टरला देऊन व बाकीचे हॉस्पिटलवाले ठेवून घेतात.
[६] जर रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असेल तर आधीच जास्तीचे बिल वासूल करुन घेतले जाते किंवा बिल वाढवून सांगितले जाते.
[७] जर हॉस्पिटलचीच लॅब असेल तर पैसे पूर्ण तपासण्याचे घ्यायचे व तपासण्या अर्ध्याच करून रिपोर्ट दिले जातात.

            क्रमशः

डॉ. सोपान कदम, drkadamsopan@gmail.com

स्त्रीभ्रूण हत्यांविरुद्ध हल्लाबोल !


नाटकातील एक क्षण !
स्त्रीभ्रूण हत्यांविरुद्ध कायदा असला तरी स्त्रीभ्रूणहत्येच्या घटना घडताना आज दिसतात. यावरून कायदा करण्याबरोबरच प्रबोधनाचे महत्त्व लक्षात येते. ही गरज ओळखून निर्माण नागपूर गटातर्फे या नवरात्री नागपूर शहरामध्ये विविध सार्वजनिक दुर्गा मंडळांच्या ठिकाणी स्त्रीभ्रूणहत्या या विषयावर नाटक सादर करण्यात आले.
या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला
या नाटकात शहरातील एका युवतीचा विवाह ग्रामीण युवकासोबत होतो. तिला दिवस जाताच सासरचे लोक तिच्या विरोधाला न जुमानता गर्भलिंग निदान करवून घेतात. मुलगी होणार हे कळताच तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणतात. यावेळी मात्र दबावाला न जुमानता माहेरी निघून येते. माहेरीच एका गोंडस मुलीला जन्म देते. पतीला ही बातमी कळताच तो तिच्या सासरच्या मंडळींसह मुलगी पहायला येतो. मुलीचा गोड चेहरा बघून सासरचे पाघळतात व त्यांना आपली चूक कळते. अशी या नाटकाची पटकथा होती. यानाटकामध्ये काल्याणी बारापतरे, गौरव पांडे, कुमार हतगडकर, कालिका गोरडे, अश्विनी दंडवते, अक्षय देशमुख, अनघा गोरडे, साक्षी पडेगावकर, आनंद जुमळे यांनी प्रमुख भूमिका केल्या. कुमार हतगडकरने या नाटकाची संहिता लिहिली, तर गौरव पांडेने दिग्दर्शन केले. पहिल्याच प्रयोगाला ३००० प्रेक्षक उपस्थित होते. इतर प्रयोगांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

स्त्रोत : रंजन पांढरे- pandhare.ranjan33@gmail.com

सलग दुसऱ्या गणेशोत्सवात नागपूर निर्माण गटातर्फे निर्माल्य संकलन

निर्माल्य रथ
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही नागपूर निर्माण गटाने गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलन मोहीम आयोजित केली होती. यावेळी मोठे लक्ष्य नजरेसमोर ठेवता दोन प्रयोग करण्यात आले. पहिला प्रयोग म्हणजे ‘निर्माल्य रथ’. गणेशोत्सव सुरु झाल्यापासूनच लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याकरता निर्माल्य रथाचा प्रयोग करण्यात आला. एकूण पाच निर्माल्य रथांसोबत निर्माणींनी घरोघरी फिरून लोकांना पर्यावरण रक्षणाविषयी माहिती दिली तसेच निर्माल्य गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन केले.
दुसरा प्रयोग म्हणजे यावेळी अंबाझरी आणि सोनेगाव या दोन ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ७० निर्माणींनी या मोहिमेत सहभाग घेतला. दोन्ही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन स्थळ तयार करण्यात आले होते. कृत्रिम विसर्जन स्थळांमध्येच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन निर्माणींतर्फे करण्यात आले आणि या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. अंदाजे ७००० गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन स्थळांमध्ये करण्यात आले. याचबरोबर, १४ टन निर्माल्यही लोकांकडून गोळा करण्यात आले. या निर्माल्याचे फुलं-पानं, प्रसाद, नारळ, प्लास्टिक इ. गटात वर्गीकरण करण्यात आले. हे निर्माल्य ‘निसर्गविज्ञान मंडळ, नागपूर’ येथे देण्यात आले व त्यापासून २ टन खत तयार करण्यात आले.
निर्माल्य संकलना दरम्यान नागपूर निर्माण गट
 लोकांसोबत संवाद साधणे, पर्यावरण रक्षणाविषयी माहिती देणे, निर्माल्याचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करणे, योग्य पद्धतीने कचरा व्यवस्थापन करणे इ. अनेकच बाबतीत निर्माणींचे शिक्षण झाले. या संपूर्ण मोहिमेचे आयोजन रंजन पांढरे (निर्माण ४) आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केले होते. या गटाची मेहनत आणि नागपूर महानगरपालिका व जनतेच्या सहकार्यामुळे पर्यावरणाची हानी बऱ्याच प्रमाणात टाळता आली. सतत कृतीशील राहणाऱ्या या गटाचे अभिनंदन आणि पुढील उपक्रमांसाठी निर्माणतर्फे शुभेच्छा!



स्त्रोत- रंजन पांढरे, pandhare.ranjan33@gmail.com  

दलितांच्या पैशांतून स्मशानभूमीचे सुशोभीकरण ?

काही दिवसांपूर्वी एरंडोल नगरपालिकेतर्फे ‘स्मशानभूमी सुशोभीकरणा’साठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र माहितीच्या अधिकाराखाली या सुशोभीकरणासाठी ‘दलित वस्ती सुधार योजने’चा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संग्राम पाटील व डॉ. सचिन महाले (निर्माण ५) यांना मिळाली. यावर त्यांनी तात्काळ दलित, आदिवासी व भिल्ल वस्त्यांची मीटिंग घेऊन दुसऱ्याच दिवशी रास्ता रोको आंदोलन केले. ‘या वस्त्यांमध्ये रस्ते, पथदिवे, पाणी, सार्वजनिक शौचालये अशा मूलभूत सुविधा झाल्यानंतरच सुशोभीकरण करण्यात यावे’ अशी जोरदार मागणी करण्यात आली. आंदोलनाबाबत बोलताना सचिन म्हणाला, “या आंदोलनासाठी तब्बल ७००-८०० भिल्ल व दलित बांधव रस्त्यावर होते. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की वृत्तपत्रांना नगरपालिकेकडून जाहिराती मिळत असल्याने त्यांनी एवढ्या मोठ्या आंदोलनाची दखलसुद्धा घेतली नाही.”
स्त्रोत : डॉ. सचिन महाले- dr.sachin.mahale@gmail.com

नाशिकला कचरावेचकांची आरोग्यतपासणी


नाशिकमधील निर्माण आणि कृती या गटांचे काही मित्र-मैत्रिणी महानगरपालिकेचा खत प्रकल्प पहायला गेले होते. तिथे अधिकृत कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त साधारण ८० स्त्री-पुरुष कचरा वेचण्याचे काम करतात. त्यांची कुठेही नोंद नसल्याने त्यांना कोणत्याही सुविधा, साधने मिळत नाहीत. त्यांच्यासोबत कामाची सुरुवात म्हणून एका आरोग्य तपासणी शिबिराचे या गटाने आयोजन केले होते. कचरा वेचकांचे प्रश्न आणि त्यांच्या आरोग्याची सद्यस्थिती जाणून घेणे असा यामागचा उद्देश होता. या उपक्रमात श्री गुरुजी रुग्णालयाचे काही डॉक्टर्स सहभागी झाले. इथून पुढे कचरा वेचकांच्या प्रश्नांसाठी काय करता येईल याचा हा गट विचार करत आहे.
स्त्रोत : मुक्ता नावरेकर-  muktasn1@gmail.com

सुहेल शिकलगार मल्हारपेठ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत

सुहेल शिकालगार (निर्माण ४),  साताऱ्यातील पाटण तालुक्यातल्या मल्हारपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) वैद्यकीय अधिकारी म्हणून जानेवारीपासून कार्यरत आहे. त्याच्या गावाची लोकसंख्या ३०,५३२ असून त्याच्या PHC अंतर्गत ५ उपकेंद्रे आहेत. ह्यातील २ आदिवासी भागात आहेत. Indian Public Health Standards (IPHS) नुसार, ज्या PHC मध्ये महिन्याला १० किंवा जास्त प्रसुती होतात व एका ठराविक संख्येपेक्षा जास्त पेशंट्स असतात त्यांना (IPHS) च्या सर्व सुविधा, जसे की रुग्णवाहिका, National Rural Health Mission कडून निधी इ. मिळतात. मात्र शासकीय यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे ह्या सुविधांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचत नाही असा सुहेलचा अनुभव आहे. तसेच गावपातळीवरील राजकारणामुळेदेखील बराच तणाव असतो असे देखील तो सांगतो. 

अशा परिस्थितीतदेखील सुहेल त्याच्या परीने शक्य तितके प्रयत्न करून लोकांपर्यंत आरोग्याची सुविधा पोहोचवतो आहे. महिन्याला ८०० -९०० च्या आसपास असलेल्या बाह्यरुग्णांची संख्या आता १८०० - १९०० पर्यंत वाढली आहे. ‘लोक वेळप्रसंगी थांबून राहणे पसंत करतात पण दुसरीकडे जात नाहीत’ हादेखील एक मोठा बदल झालेला त्याला जाणवतोय. तसेच परिसरातील शाळांमध्ये adolescent health बद्दल जागृती करणे, De-addiction Counselling करून पेशंटला पुण्यातील मुक्तांगण येथे दाखल करणे असे अनेक उपक्रम तो राबवत असतो.  सरकारी नियमानुसार त्याच्या भागातील ११ PHC वर किमान २२ डॉक्टर तरी हवेत, मात्र प्रत्यक्षात केवळ ९ च असल्याचे दिसतात. ह्या MOship च्या अनुभवावरून खूप काही शिकल्याचे तो सांगतो. 

त्याला त्याच्या कार्यासाठी शुभेच्छा !


स्रोत : सुहेल शिकलगार - suhail.bjmc@gmail.com

भूषण देव पारोळ्यात बालस्वास्थ्य वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत भूषण देव (निर्माण ५) जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात बालस्वास्थ्य वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला आहे. या अंतर्गत फिरत्या दावाखान्यासोबत ०-१८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी व उपचार करणे, तसेच शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या आजारांचे उपचार अशा विशिष्ट सेवांची गरज असणाऱ्या मुलांना योग्य ठिकाणी रेफर करणे हे भूषणचे काम असणार आहे. या कार्यक्रमांतर्गत एक वर्षभरांत २१४ अंगणवाड्यातील १५,६७८ मुलांची दोन वेळा तर १६० शाळांतील (आश्रमशाळांसहित) २८,३८७ मुलांची एक वेळा तपासणी होणार आहे. भूषणला या प्रवासासाठी शुभेच्छा!
स्त्रोत : भूषण देव- drbhushandeo@gmail.com

निर्माण पुणे गटासाठी अर्थक्रांती व आयुर्वेद चिकित्सेवर सत्रे

निर्माण पुणे गटाच्या मागील भेटीत, गटाची वैचारिक प्रगल्भता वाढावी ह्या दृष्टीने श्री. अमोल फाळके व निर्माणचाच आपला मित्र अभिजित सफई ह्यांची सत्र आयोजित करण्यात  आली होती. 

श्री. अमोल फाळके हे गेली अनेक वर्ष 'अर्थक्रांती' ह्या चळवळीशी जोडलेले असून, सध्या ते 'पर्यायी अर्थव्यवस्था' ह्या संकल्पनेवर महाराष्ट्र नॉलेज फौंडेशन बरोबर काम करीत आहेत. अमोल फाळकेंनी अर्थक्रांतीची गरज, मूळ संकल्पना, ती प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग व अडचणी ह्या सर्व विषयांवर मोकळेपणाने मार्गदर्शन केले. मुलांनीदेखील उत्साहाने चर्चेत भाग घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. अर्थक्रांती हा सक्षम अर्थव्यवस्थेकडे नेणारा एक विचार असून त्यातील काही सूचना खालीलप्रमाणे आहेत. 
·       प्रचलित कर प्रणाली पूर्णत: काढून टाकणे
·       सर्वस्तरीय सरकारी महसुलासाठी ‘बँक व्यवहार करहा एकमेव कर लागू करणे
·       उच्च मूल्याच्या नोटा सरसकट बंद करणे
·       रोखीच्या व्यवहारांवर कुठलाही कर लागू न करणे
·       विशिष्ट मर्यादेपर्यतच्याच रोखीच्या व्यवहारांना मान्यता देणे 
अधिक माहितीसाठी www.arthkranti.org या संकेतस्थळाला भेट द्या. 

ह्याच प्रसंगी अभिजीत सफई ह्याने 'आयुर्वेदिक चिकित्सेची चिकित्सा' ह्या विषयावर त्याचे विचार मांडले. आयुर्वेद चिकित्सेत सध्या जुन्या पद्धतींनाच धरून ठेवण्याच्या अट्टाहासामुळे नवीन संशोधन व खुल्या चिकित्सक दृष्टीचा आभाव दिसतो आहे असे मत अभिजीतने मांडले व विविध उदाहरणे व संदर्भ देऊन त्यांची पुष्टी केली. निर्माणच्या गटानेदेखील या बाबतीत अभिजीतला अनेक प्रश्न विचारले. 


स्रोत : प्रफुल्ल वडमारे - prafulla.wadmare@gmail.com