दुष्काळ आवडे सर्वांना – पी. साईनाथ
परवा
‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पुस्तक मी वाचून पूर्ण केलं. पालागुम्मी साईनाथ यांनी
लिहिलेले Everybody
loves a good draught याचे हेमंत कर्णिक यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक आहे. ‘Times’
शिष्यावृत्तीसाठी केलेल्या संशोधनातून हे पुस्तक जन्माला आलं. या पुस्तकात त्यांनी
भारतातील अत्यंत गरीब अशा वसाहतीत राहून, तेथील अभ्यास करून,
भारतातील खरं दारिद्र्य रेखाटलं आहे. साईनाथ यांच्या ह्या पुस्तकात भारतातील
गरिबात गरीब खेड्याची होत गेलेली दुर्दशा वर्णन करणाऱ्या, हलवून टाकणाऱ्या सत्यावरून
कळून येते की एका छोट्याश्या चुकीचे किती दूरवर उमटणारे परिणाम असतात, ती समस्या
संपूर्णपणे हाता बाहेर जाण्यापर्यंत. गरिबीकडे एक घटना म्हणून न बघता प्रक्रिया म्हणून
बघणे हेचं या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकात शिक्षण, आरोग्य,
राहणीमान, शेती, बालमृत्यूचे प्रमाण, कर्ज, जमीन, मालमत्ता इ.वेगवेळ्या बाजूंनी
गरिबी दाखवून दिली आहे. या पुस्तकातल्या बहुतेक लेखनामध्ये भारतीय शासनाकडून
झालेला आश्चर्यकारक हलगर्जीपणाच नजरेत भरतो. साईनाथ यांच्या लेखनातून वरिष्टांचा हलगर्जीपणा,
कपटीपणा, काम न
करण्याची प्रवृत्ती आणि अमाप भ्रष्टाचार सतत दिसत राहतात.
मला असं वाटते की पुस्तकाला योग्यच नाव दिलेलं
आहे. भारतातील गरिबीचा तसा खूप जणांचा फायदाच होतो. याच कारणाने बहुदा भारतातील गरिबी
हटत नाही. जातीव्यवस्थेप्रमाणेच या गोष्टीलाही आता राजनैतिक आधार मिळतोय आणि हा हळूहळू
भारतीय शासनाचा स्थायी कणाच बनत चालला आहे.
गायीने जास्त दूध द्यावे म्हणून दूरवरून
आणलेल्या जर्सी रेत वापरून गायीला फलवणे आणि त्यासाठी स्थानिक व तेथील हवामानाला
अनुकल झालेल्या बैलांचे नपुंसकीकरण करणे; गायीचा चारा उगवण्यासाठी सरकारी जमीन, पण
शेतकऱ्यांना अन्न पिकवायला जमीन नसणे; कागदोपत्री असणाऱ्या शाळेत मुलांऐवजी
शेळ्या-बकऱ्या बसलेल्या; ‘विकासा’च्या नावाखाली चीकापर गावच्या आदिवासींचे तीनदा
झालेले विस्थापन; अशी अनेक चित्रे सुन्न करून जातात.
पण साईनाथ
यांच्या लेखांमध्ये फ़क़्त दुःख आणि कष्ट यांचेच वर्णन नव्हे, तर एक आशावादही आहे:
आशावाद हा की भारतातील गरीब अन्यायाविरुद्ध लढा द्यायला शिकला आहे, स्वतःची प्रतिष्ठा
जपायला शिकला आहे, आणि समस्यांना तोंड देत स्वतःची वाट काढून जगण्यासाठी मोकळा
श्वास घेतो आहे.
या पुस्तकाचा
माझ्यावर बराच प्रभाव पडला आहे. एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने करायची असेल तर
त्यासाठी जास्तीत जास्त विचार विनिमय करणे आवश्यक असते; इतिहासाबद्दल जागरूक असले
की मागे झालेल्या चुका पुन्हा होत नाहीत; सखोल अभ्यासाचे महत्त्व; कल्पनेतल्या आणि
प्रत्यक्षातल्या कामांत राहणाऱ्या फरकाचा अंदाज घेऊन काम करावे; ज्यांच्यासोबत आपण
काम करतो ते लोक आणि त्यांचे होणारे फायदे वा नुकसान यांचे भान ठेवावे; अशा अनेक
गोष्टी शिकायला मिळाल्या.
या पुस्तकाद्वारे
मी लेखकाबरोबर जास्तीत जास्त गरीब जिल्ह्यांपर्यंत पोहोचू शकले, आणि मला अजपर्यंत
माहित नसलेल्या गोष्टी समजावून घेवू शकले.