गंगेमध्ये गगन वितळले – अंबरीश
मिश्र
गांधींविषयीचे
पुस्तक या कुतूहलापोटी ‘गंगेमध्ये गगन वितळले’ हे पुस्तक
वाचायला घेतले. गांधींचा राजकीय, आध्यात्मिक, वैचारिक प्रवास श्री अंबरिश मिश्र
यांनी या पुस्तकातून मांडला आहे. गांधीचे चरित्र माहित असणार्यांनाही हे पुस्तक
वाचावेसे वाटेल, कारण या पुस्तकांत गांधीच्या जीवनमार्गाचा त्रयस्थपणे विचार
केलेला आहे. काळाच्या पटावर मोहनदास गांधी ते महात्मा गांधी असे उलगडत जाणारे
गांधी आपल्याला समजतात. गांधीच्या मोठेपणाबरोबरच त्यांच्या प्रयोगातील यश-अपयश
देखील लेखकाने छान विशद केले आहे.

लेखक
मनुबेन गांधी यांना सत्तांतराच्या महानाट्याची निरूपक म्हणून संबोधतात. देशाच्या
फाळणीच्या साक्षीदार असणाऱ्या मानुबेन गांधींच्या दैनंदिनीतील गांधीजीचे
अहिंसेबद्दलचे विचार विशेष उल्लेखनीय वाटले. फाळणीपेक्षाही देशभर उसळलेल्या
हिंसाचाराने आणि रक्तपातानं गांधीजी खिन्न झाले होते. ‘आज विरोचित अहिंसेची गरज
आहे’ असे म्हणणारे गांधीजी, दुर्बलतेतून पत्करलेल्या अहिंसेपेक्षा सक्षम असताना
पालन केलेल्या अहिंसेचे महत्व अधोरेखित करतात आणि वीरत्व आणि अहिंसेची अद्भुत
सांगडही घालून देतात.
अहिंसा
आणि सत्याचा छिन्नी हातोडा घेउन नवभारताचं शिल्प साकारण्यात आपण कमी का पडलो,
यांची विस्तृत कारणमीमांसा लेखकाने केली आहे. विज्ञानवाद- समाजवाद- निधर्मीवाद-
पंचवार्षिक योजना- भाक्रा धरण या सगळया गोष्टींमध्ये ग्रामपातळीपर्यंत सत्तचे
विक्रेद्रीकरण, सार्वजनिक निधीचा चोख हिशेब, जबाबदारीचं तत्व अशा गांधींच्या
गोष्टी मागे कशा पडत गेल्या याची जाणीव करून देतो.
सत्य,
अहिंसा, दया, क्षमाशीलता या उदात्त तत्त्वांपेक्षा गांधी आपली दैनंदिन
कामे कसे करत, एखांदं छोंटं कामदेखील किती कौशल्याने, चिकाटीने करत, यांचे वर्णन
लेखक करतो. गांधींमधला पत्रकार, त्यांचं व्यवस्थापन कौशल्य, या गुणांची जाणीव
आपल्याला होते.
थोर नेत्यास
दैवत न मानता, त्याचा सर्वप्रथम माणूस म्हणून विचार करायला हवा ही नवी दृष्टी
या पुस्तकाने मला दिली.
No comments:
Post a Comment