'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday 27 June 2016

जागतिक तंबाखू विरोधी दिवसाच्या निमित्ताने...

मित्रांनो,
 ३० मे च्या दुपारी व्हॉट्सअॅप पाहत असताना एका तंबाखू विरोधी कार्यक्रमाचं निमंत्रण दिसलं, पण मी तिथे वेळेत पोहोचू शकलो नाही. त्यामुळे मनात ही खंत बाळगून मी फेसबुकवर तंबाखूविरोधी पोस्ट्सना लाईक व शेअर करण्याचा सपाटा सुरू ठेवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन मित्र म्हणालेआम्ही कॉलेजमध्ये व्यसन विरोधी काहीतरी कृती करण्याचा विचार करतोय, आपण पेशंटच्या नातेवेकांसाठी एक तंबाखूविरोधी नाट्य व सादरीकरण करूया का?” मी लगेच होकार दिला.
आम्ही चर्चा करत असताना व हॉस्पिटल अधीक्षकांची परवानगी घेईपर्यंत अजून तिघे सोबत आले. हॉस्पिटल अधीक्षकांनी वॉर्डाच्या समोरील प्रतीक्षलायाची जागा सुचवली. तेथे भिंतीचे कोपरे लोकांनी खर्रा थुंकून रंगवून टाकले असल्यामुळे आमाच्यासाठी आधीपासूनच 'रंगमंच' तयार होता! अवघ्या एक तासात नाटक बसवलं, तसेच कार्यक्रमात दाखवण्यासाठी खर्रा-तंबाखू विरोधी व्हिडीओ शोधला. कार्यक्रमामध्ये कोणत्या व्यक्तीचे स्वागत, हार-तुरे असा प्रकार नव्हता. वॉर्डातील खुर्ची, त्यावर एक लॅपटाप, स्पीकर, हॉस्पिटलमधील जुने तंबाखूविरोधी फलक एवढी जमवाजमव झाल्यावर, लोकांना एकत्र जमवण्यासाठी आम्ही व्हिडीओ सुरु केला व प्रत्येक वॉर्डमध्ये दवंडी देवून नातेवाईकांना कार्यक्रमाच्या जागेवर घेऊन आलो.

कार्यक्रमाची सुरूवात कोण कोण तंबाखू खात नाही या प्रश्नाने केली. साठ पैकी आठच जण तंबाखूचे सेवन न करणारे होते! आम्ही उपस्थित लोकांना प्रश्न विचारून त्यांचे तंबाखूविषयी मत जाणून घेतले. तुम्ही तंबाखू का खाता? असं विचारल्यावर  ‘मनोरंजनासाठी खातो', 'शौचास होत नाही म्हणून खावाच लागतो', 'मला माहीत नाही मी का खातो, पण सहजच..’ अशी उत्तरे आली. त्यानंतर आम्ही नाटक सादर केले. आमच्या नाटकाचा बोध कळण्याकरिता आणि दृश्यामागचा विचार सर्वांना समजावा, याकरिता आम्ही सूत्रधार नेमला होता.
मित्राच्या प्रभावामुळे व्यसनाकडे ओढ, वडिलांमुळे व्यसनाबद्दल आकर्षण, मुलीला पटवण्याकरिता मर्दानगीसाठी तंबाखू सेवन आणि ताणतणाव दूर करण्यासाठी मित्राने दिलेला सल्ला अशा चार प्रसंगांमधून व्यसन कसं लागतं हे दाखवलं. नंतर सूत्रधाराने व्यसनांच्या फुटकळ कारणांविषयी, तसेच व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक दुष्परिणामांविषयी व आर्थिक हानीबद्दल सांगितले. तंबाखू-खर्रा या विषयी प्रबोधन करणारा एक व्हिडीओ दाखवला. नाटकाच्या उर्वरित भागात व्यसनामुळे नायकाची झालेली दुर्दशा दाखवली. शेवटी नायकाचा मित्र त्याला व्यसनाचे दुष्परिणाम व धोके पटवून देण्यात यशस्वी होतो आणि दोघेही जण आयुष्यभर निर्व्यसनी राहून मैत्री टिकवण्याची शपथ घेतात, असा सकारात्मक व उद्बोधक संदेश देऊन नाटकाचा शेवट झाला.
जवळपास ६० लोकांच्या गर्दीमध्ये ३० लोक संवादाच्या वेळेस उभे राहिले. त्यांनी 'मला दारू सोडायची आहे काय करू?', 'तंबाखूविना शौच होत नाही' इथपासून तर 'सरकार या दारू-तंबाखूच्या कंपन्या का बंद करत नाही?' असे प्रश्न केले. आम्हाला शक्य होती तेवढी उत्तरे आम्ही दिली. काही नातेवाईक पेशंटच्या आजारपणाबद्दल देखील बोलले. शेवटी सर्वांसोबत फोटो काढून आम्ही तंबाखू विरोधी कार्यक्रमाची सांगता केली.
सरकार कधी तंबाखू बंद करेल किंवा आरोग्य व्यवस्था समाजाला जागरूक करण्यात कधी यशस्वी होईल, माहीत नाही. पण वेळेवरचे नियोजन, नाटक, लोकांसोबतचा संवाद शिकत आम्ही या ३१ मे लाजागतिक तंबाखू विरोधी दिवससाजरा करत आमची भूमिका मांडली.
- रोहीत गणोरकर, (निर्माण ६)

No comments:

Post a Comment