'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 10 January 2017

‘जीवन निष्ठा’

आपण सर्वच निर्माणी ठराविक काळाच्या अंतराने आपल्या सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या प्रेरणा तपासत असतो. आणि त्याबद्दल कधी कधी असुरक्षितही असतो. निर्माण ७.१ अ शिबिरात एका शिबिरार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नायनांनी ‘जीवन निष्ठा’ म्हणजे काय, ती कशी येते याबद्दल सांगितलं.

मी लहानपणी ज्या शाळेत शिकलो, सेवाग्रामच्या शाळेमध्ये, तिथे एक पद्धत होती. विनोबांचा जो जन्मदिन असायचा त्याला ‘भूमी-क्रांती दिन’ म्हणायचे. का, कारण ज्याला अजिबात भूमी नव्हती, जमीन नव्हती, जगण्याचं कोणतंच साधन नव्हतं, त्याच्या उद्धारासाठी विनोबांनी आंदोलन केलं. तर त्यादिवशी आमच्या शाळेमध्ये, आश्रमामध्ये, एक प्रयोग व्हायचा की मजुराचं जीवन समजून घेतलं पाहिजे. त्याचं जीवन समजून घ्यायचं असेल तर त्याचं जीवन अनुभवायला पाहिजे. ते फक्त बौद्धिकरित्या नाही समजणार. त्यादिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला अन्नाचा एकही कण मिळायचा नाही. शेतामध्ये दिवसभर आम्ही मजुरासारखं काम करायचो. जेवढे काही पन्नास साठ लोकं आम्ही होतो, शिक्षकही आमच्याच सोबत. आणि दिवसाच्या शेवटी आमच्या कामाचं मोजमाप व्हायचं. किती जमिनीतलं गवत कापलं, किती ज्वारीची कापणी केली, किती माती ओढली, असं काम असायचं. मग त्या कामाचं आम्हाला शेतमजुरीच्या रेटने पैसे मिळायचे. आणि जे कितीक आणे मिळायचे, त्यातून संध्याकाळचा आमचा स्वयंपाक व्हायचा. फक्त तेवढ्याच पैशांवर. आणि बस्स, त्याच स्वयंपाकात आम्हाला जेवायला लागायचं. अर्धी-मुर्धी भाकरी यायची हाती. तीच खाऊन आम्ही झोपायचो. भूक लागलेली असायची, रडूही यायचं. पण तरीही, मजुराची भूक काय असते, गरीबाची भूक काय असते, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव कोणत्याही पुस्तकातल्या ज्ञानापेक्षा जीवनभर कायमचा सोबत राहिला.
ज्यांच्या गरजा अजिबातच पूर्ण होत नाहीत, जगण्यालाही जी किमान अपेक्षा असते तेही ज्यांना मिळत नाही अशा लोकांच्या जितक्या जवळ जाता येईल तितकी तुमची सामाजिक प्रश्न सोडवण्याची प्रेरणा मजबूत होत जाईल. मग ती प्रेरणा केवळ बौद्धिक राहत नाही, बौद्धिकतेच्या खोल जाते. ‘हे बघा आकडे, पर्यावरणाचा किती ऱ्हास होतोय’ फक्त असं राहत नाही, तर आकड्यांच्या पलीकडे जाते. तो माझा, जीवनाचा, वास्तववादी अनुभव बनून जातो. तर काही गोष्टी अनुभवाच्या पातळीवरती स्वतः जगल्या पाहिजेत आणि त्या जगत असलेल्या लोकांच्या जवळदेखील गेलं पाहिजे. आपण फक्त बघतो, खरं म्हणजे बघणे हे अनुभवाला substitute नाहीये. ते अप्रत्यक्षच राहतं. मी त्याची भूक पाहिली, म्हणजे मला समजते का त्याची भूक? नाही. भूक काही बघून समजण्याची गोष्ट नाही. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. तर तो अनुभव जितका मला घेता येईल, तितकी मला त्याची गरज कळते. म्हणून माझ्या गरजा कमी करण्याला, त्याचा प्रश्न सोडवण्याला एक पक्का मानवी आधार मिळतो.
गांधीजींनी एकदा विनोबांना एक जबाबदारी दिली. त्यावेळी लोकं चरख्यावर सुत कातायचे. कातणारे मजूर, त्यांना मजुरी मिळायची. मग किती मीटर कातलं, त्याचे रेट ठरलेले असायचे. त्यावर ज्याची त्याची मजुरी मिळायची. त्यावेळी मीटर वैगेरे भानगड नव्हती, यार्न होतं. ६४० यार्नचं एक युनिट होतं आणि त्याच्या आधारावर मजुरी मिळायची. भारतामध्ये असे लाखो कातणारे मजूर होते, त्यांची गांधीजींकडे एकदा तक्रार आली, की ही मजुरी अपुरी पडतीये. आणि खादी विकणारे जे मॅनेजर्स होते, खादी भांडारातले, ते म्हणत होते की आधीच खादी महाग आहे, विकता विकता नाकी नऊ येतात. लोकांना समजावून सांगायला कठीण जात आम्हाला. तुम्ही याच्याहून जास्त मजुरी द्याल मजुरांना, तर खादी इतकी महाग होईल की विकणं अजून अवघड होऊन बसेल. तर गांधीजींनी विनोबांना याचं न्यायाधीश म्हणून नेमलं. गांधीजी, “मला सांग की किती मजुरी ठेवावी.” विनोबांनी त्या विषयावर तीसेक वर्ष काम केलेलं होतं, म्हणायला गेलं तर विनोबा त्या विषयाचे खरंच महर्षी होते. त्यावर विनोबा म्हणाले की “मला ६ महिन्याचा वेळ पाहिजे”. गांधीजी म्हणाले, “अरे घाई आहे. तिकडे मजुरांना उत्तर द्यायचंय”. “नाही मला ६ महिने पाहिजे. तसं नाही उत्तर देऊ शकत मी” विनोबा. “ठीके घे”. ६ महिने विनोबांनी गांधीजींशी काहीच संपर्क केला नाही. ६ महिन्यांनंतर विनोबा आले गांधीजींना भेटायला तर ३० पौंड वजन कमी झालेलं, शरीर अगदीच किडकिडीत झालेलं. ते पाहून गांधीजींनी विचारलं, “काय झालं रे तुला?” त्यावर विनोबा उत्तरले “काही नाही. तुम्ही मला काम दिलं होतं की कातणीची मजुरी किती असावी. तेव्हापासून गेली ६ महिने मी रोज ८ तास कातण्याचंच काम करतोय. आणि त्या कातण्यातून मजुरीच्या रेटने ६ पैसे इतकी मजुरी मिळवता येते. ६ महिने मी जगून पाहिलं ६ पैश्यांमध्ये. तर माझा निष्कर्ष एवढाच की आज जी मजुरी आपण देतो कातणाऱ्यांना त्यातून अशी स्थिती होते. त्यामुळे मजुरी वाढवली पाहिजे.” ह्या उत्तरात गांधीजींना कुणाच्या दुसऱ्या तर्काची गरजच नाही पडली. सगळ्या खादीच्या मॅनेजर्सचा विरोध बाजूला ठेऊन, गांधीजींनी मजुरी तिप्पटीने वाढवली. तर स्वतः प्रत्यक्ष ते जगणं किंवा करणं किंवा अनुभवणं हे महत्त्वाचं ठरतं. आपल्या कामामध्ये, मतामध्ये निष्ठा आणि विश्वासार्हता मिळवण्यासाठी.
पण काही अनुभव घेताही येत नाहीत, उदाहरणार्थ बालमृत्यूचा अनुभव. माझं मुल काही कधी मेलं नाही, त्याची गरजही नाही मला. पण बालमृत्यू मी माझ्या उघड्या डोळ्यांनी इतक्या जवळून पाहिले की तेच पुरेसे होते मला हलवून टाकायला. २०-३० वर्ष माझी ती प्रेरणा टिकली कारण अतिशय हादरवून टाकणारे अनुभव गाठीशी होते. तर प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे ती जी निष्ठा आहे, ती जी प्रेरणा आहे, ती निव्वळ एक हॉबी किंवा एक adventurous अनुभव किंवा एक intellectual asset राहत नाही. त्याच्या पलीकडे जाते. आणि ती जेव्हा जाते, तिला आपण ‘जीवन निष्ठा’ म्हणतो. बौद्धिकतेच्या पलीकडे जाणारी आणि मला दुसऱ्याच्या तर्काची, अर्ग्युमेंटची गरज राहणार नाही अशी ती माझ्या जीवनामध्ये उतरली पाहिजे. अशी ‘जीवन निष्ठा’ आपण मिळवली पाहिजे.
आपल्या आजूबाजूच्या समाजात दिसणाऱ्या अनेक सामाजिक प्रश्नांना, समाज घटकांना समजून घेण्यासाठी आणि त्यासोबतच आपला ‘स्व’ अधिक उन्नत व्हावा व आपल्या जीवननिष्ठा अधिक दृढ व्हाव्या या उद्देशाने आपण ‘निर्माण’ अंतर्गत कृती शिक्षणाचा उपक्रम सुरु केला आहे. ज्यात गेल्या दोन वर्षात आपण दुष्काळ हा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यासोबत दुष्काळामुळे होरपळणारा समाज घटकही जवळून पाहिला. हा प्रयत्न म्हणजेच नायनांनी सांगितलेल्या जीवननिष्ठा दृढ करण्याचा भाग होता, असं म्हणता येईल. इथून पुढेही अशाच प्रकारे सामाजिक प्रश्नांच्या, वंचित समाज घटकांच्या अधिकाधिक जवळ जाऊन आपल्या निष्ठा, प्रेरणा समृद्ध करूयात.

धीरज च्या प्रयत्नातून सटाण्याला फिजिओथेरपी केंद्र सुरु

           सर्व शिक्षा अभियानामध्ये अपंग समावेशित शिक्षण या विभागात मी समावेशित शिक्षण विशेषज्ञ म्हणून गेल्या ५ वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील बागलाण (सटाणा) येथे काम करत आहे.
         विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शाळेत दाखल करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शासनाच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे ही दुव्याची भूमिका मी पार पडतो. आमच्या तालुक्यामध्ये मतीमंद, कर्णबधीर, अस्थिव्यंग, अल्पदृष्टी, सेरेब्रल पाल्सी, अंध, बहुविकलांग, वाचदोष इत्यादी अपंगत्व असणारे ० ते १८ वर्षातील १२०० विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत.
       दरवर्षी आम्ही जून-जुलै महिन्यात किती विद्यार्थी शाळेत दाखल झाले याचे सर्वेक्षण करत असतो. हे सर्वेक्षण आम्ही शाळा व अंगणवाड्यांवर जाऊन करतो. सर्वेक्षण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करायची आहे, ज्यांना अपंग प्रमाणपत्र काढायचे आहे, ज्यांना व्हीलचेअर आवश्यक आहे, ज्यांची फिजिओथेरपी करायची आहे अशा विद्यार्थ्यांच्या आम्ही याद्या बनवतो. त्यानुसार जिल्हास्तरावर अथवा तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरांसाठी आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित करतो.
      हे करत असतना एक गोष्ट नेहमी मनात यायची, कि जास्तीत जास्त शिबिरे हि जिल्हास्तरावर म्हणजे नाशिकला असतात. सटाणा ते नाशिक हे अंतर ९० किमी आहे. त्यातूनही हि मुले सटाण्याहून पुढे छोट्या छोट्या गावात राहतात. सटाणा ते नाशिक बस भाडे १०१ रु. आहे. पालक आणि विद्यार्थी दोघेही जर नाशिक ला फिजिओथेरपीसाठी आले तर त्यांचे ४०० ते ४५० रु. एका फिजिओथेरपीसाठी खर्च होतात. खासगी फिजिओथेरपिस्ट पण एका सेशन चे ३५० रु. घेतात. पण ते देखील आमच्या तालुक्यात उपलब्ध नाहीत. फक्त एकाच थेरपीस्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे बरेचसे पालक आपल्या मुलांना घेऊन जात नाहीत व टी मुले उपचारांपासून वंचित राहतात.
        माझे व माझ्या सहकार्यांचे स्पेशल एजुकेशन चे शिक्षण झालेले असल्यामुळे आम्हाला बेसिक फिजिओथेरपी व स्पीच थेरपी ची माहिती आहे. त्यामुळे आपणच आपल्या तालुक्याच्या ठिकाणी एक फिजिओथेरपी सेंटर सुरु केले तर, आपण येथेच विद्यार्थ्यांना बेसिक थेरपी ची सेवा निशुल्क देऊ शकू असा विचार मनात आला. मी तो माझ्या सहकाऱ्यांना बोलून दाखवला. त्यांना हि कल्पना आवडली. मग आम्ही सगळ्यांनी मिळून थोडे पैसे जमा केले आणि बेसिक थेरपी चे साहित्य जमा केले आहे. ज्याद्वारे आम्ही फिजिओथेरपी च केंद्र सुरु केले आहे व आम्ही दर सोमवारी ही सुविधा विनाशुल्क पुरवतो. या प्रसंगामुळे आता माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे.


धीरज वाणी, (निर्माण ६)

आर्थिक घोटाळे आणि मी

           आदर्श! सत्यम! सहारा आणि सध्या गाजत असलेला मल्ल्या यांच्या कोटयावधींच्या घोटाळ्यांबद्दल आपण पेपरात वाचत असतो व बातम्यांमध्ये ऐकत असतोच. एवढे मोठे आकडे बघून ‘भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश!’ असाच विचार मनात डोकावतो. या घोटाळ्यांचे पुढे काही होते का? आणि कधी होते? या प्रश्नांची उत्तरे मात्र आपण शोधात राहतो.
   असाच विचार करत असताना मला अचानक आर्थिक गुन्ह्यांच्या तपासामध्ये मदत करण्याची संधी मिळाली. अशा गुन्ह्यांमधील आर्थिक व्यवहारांच्या परीक्षणासाठी Chartered Accountant (सनदी लेखापाल) ची Forensic Auditor म्हणून नेमणूक केली जाते. अशा नेमणूक केलेल्या जळगाव मधील शेखर सोनाळकर या C.A. सोबत मी काम करू लागले. Chartered Accountant च्या नेहमीच्या कामापेक्षा हे क्षेत्र वेगळे आहे. सर्व आर्थिक व्यवहारांचे सखोल परीक्षण करून यातील परस्परसंबंध जोडून गैरव्यवहार शोधावा लागतो. त्यापुढे ती साखळी शोधून पोलिसांसोबत त्याचे पुरावे जोडावे लागतात.

सध्या आम्ही तीन घोटाळ्यांच्या तपासावर काम करत आहोत.
१. सहकारी संस्थांमधील संचालक मंडळाने केलेले गैरव्यवहार
२. Ponzi scheme – एका pvt. ltd. company ने दाम दुप्पट च्या आमिषाने गोळा केलेले कोट्यावधी रुपये व फरार झालेले डायरेक्टर
३. सरकारी संस्थेमधील घोटाळा (विशिष्ठ समाजघटकांच्या प्रगतीसाठी ही संस्था सरकारी अनुदान/निधी घेते.

   या गुन्ह्यांच्या तपास करताना असे जाणवले की खात्रीशीर गुंतवणुकीची हमी देण्यासाठी गरीब लोकांना मुख्य प्रवाहाच्या बँकिंगमध्ये आणणे गरजेचे आहे. कारण सहकारी पतसंस्था त्यांना आकर्षक व्याज दरात कर्जे सहजरीत्या उपलब्ध करून देतात. संचालकांनी केलेले घोटाळे बाहेर आल्यानंतर अशा लाखो ठेवीदारांचे पैसे बुडतात. त्यांचे घामाचे कष्टाचे पैसे आर्थिक गुन्हेगार केव्हाच घेऊन गेलेले असतात. ते परत मिळवून देणे हे एक मोठे आव्हानच आहे. आर्थिक साक्षरतेची आता प्रचंड गरज जाणवू लागली आहे.
   सरकारी यंत्रणेसोबत काम करण्याची माझी खूप इच्छा होती. यानिमित्ताने यंत्रणेसोबत जवळून काम करता आले. त्यांना असलेले फायदे, अधिकार व मर्यादा समजून घेता आल्या. आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख अडचण अशी आहे की पैशाची फेरफार वर्षानुवर्षे सुरु असते, ती उघडकीस खुप उशिरा येते. मग त्याचे परिणाम दिसू लागतात. मग लोक तक्रार नोंदवतात. (यातही काळा पैसा असलेले लोक पुढे येत नाहीत) त्यानंतर कारवाई सुरु होते, मग तपास आणि सरतेशेवटी न्यायालय, मग निकाल. ही सर्व खूप वर्षांची प्रक्रिया असते. यासोबत सरकारला पण खूप मर्यादा असतात. उदा. आर्थिक गुन्ह्यातील व्याख्या समजून घोटाळ्याचा तपास करणे, निधीची उपलब्धता, एकाच वेळी अनेक तपासाची जबाबदारी, सतत बदलणारे तपास अधिकारी, इ.
   आर्थिक गुन्ह्यांच्या तपासामध्ये या अनेक टप्प्यांमधून पुढच्या टप्प्याला जाताना पुरावे बदलण्याचे, पुरावे नष्ट होण्याच्या शक्यता असतात. काही वेळा आरोपी सरळ तक्रारदारालाच पैसे देऊन टाकतात; त्यामुळे तपासच थांबतो. मात्र सगळ्यात चांगला मुद्दा की आर्थिक गुन्ह्यांमधील पुरावे हे documental evidence असल्याने पुराव्याची ताकद राहते (उदा. A transferred 50 lakhs to B – यात बदल होऊ शकत नाही). जर आम्ही चांगले काम करून forensic audit report मजबूत करून दिला तर आरोपीला शिक्षा होणार याची खात्री असते.

आर्थिक घोटाळ्यांपासून कसे वाचाल?
१. कोणत्याही दाम दुप्पट व जलद पैसे देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करू नका.
२. आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहाच्या बँकिंगमध्ये आणण्यास प्रयत्न करा.
३. रोजंदारी करणारे, भाजीवाली, भांडीवाली यांना आवर्जून विचारा की ते पैसे कोठे गुंतवतात व कर्जे किती व्याज दराने घेतात. त्यांना आर्थिक साक्षर करा.
४. कोणत्याही संस्थेमध्ये गुंतवणूक करताना वार्षिक अहवाल – Balancesheet वाचा. त्यामध्ये संचालकांची कर्जे, संबंधित संस्था (related party) यांच्याशी व्यवहाराविषयी दिलेली माहिती नक्की वाचा.

गीता लेले, (निर्माण ६)



मुक्कामपोस्ट मन्नेराजाराम - २

           निर्माण ५ चा डॉक्टर दिग्विजय बंडगर एप्रिल २०१६ पासून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. सोलापूर GMC मधून MBBS चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने MOship करायचा निर्णय घेतला आणि गडचिरोली जिल्ह्यात काम करायचे ठरवले. तिथे काम करताना त्याला आलेला अनुभव त्याच्याच शब्दात...

           मन्नेराजाराम सारख्या दुर्गम आरोग्य केंद्रात काम करताना स्वतःच्या ज्ञानाचा कस लागत होता. मला काम करताना अजून खूप काही शिकण्याची नितांत गरज जाणवत होती. पुस्तकातून वाचून वाचून उपचार चालू होते. तपासणी कक्षात पुस्तकांचा खच पडला होता. लोकांनाही केलेले उपचार चांगले वाटत असावेत, त्यामुळे ओपीडीतील (Out Patient Department) सुरवातीची चार पाच संख्या आता चाळीस पन्नास वर पोहोचली होती. प्रसूतीसाठी महिला आरोग्य केंद्रात येऊ लागल्या. माझ्याकडून होत असलेले सगळे उपचार मी करत होतो. लहान सहान गोष्टींपासून दुर्धर आजारांपर्यंत लोक माझ्याकडे येऊ लागले. मला शक्य नसल्यास हेमलकशात अनघा ताईकडे (अनघा आमटे) रेफर करत होतो. मी काही दिवस ओपीडी व काही दिवस गावांमध्ये फिरायचो, उपकेंद्रांना भेटी द्यायचो. दवाखान्यात “पोट्टासा डॉक्टर” आला आहे, अशी माझी प्रतिमा आसपासच्या गावात होती. एक दिवशी अशी घटना घडली मी एका रात्रीत हिरो वैगरे झालो.
संध्याकाळी ओपीडी संपल्यावर घरी जात असताना एका पेशंटला खाटेवर टाकून बांबूने उचलून लोक माझ्याकडे घेऊन आले. त्यांना मी त्याला दवाखान्यातील खाटेवर घ्यायला सांगितले. वीस पंचवीस लोक पाहून काहीतरी गंभीर असल्याची कल्पना मला आली होती. फुलाबाईला पेशंटचे नातेवाईक काय सांगत आहेत ते विचारले (फुलाबाई आरोग्य केंद्रातली सफाई कामगार आहे, दुभाषी म्हणून काम करते). दोन दिवसांपासून पेशंट झोपून असल्याचे त्यांनी सांगितले. काही प्रतिसाद देत नाही, शुद्ध नाही, श्वास सुरु नाही असे वाटतंय. तर तो मरण पावला आहे की नाही, असेल तर आम्ही अंत्यविधी करू का, या गोष्टीसाठी ते आले होते. येचली या त्यांच्या जवळच्या गावी त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी निरोप पाठवला होता. मी पेशंटची तपासणी केली असता पेशंट जिवंत असल्याची लक्षणे (हृदयाचे ठोके, डोळ्यांची बाहुली) दिसत होती. पेशंट जिवंत असल्याचे मी त्यांना सांगितले पण त्याचे निदान मात्र मला होत नव्हते. मी त्यांना तसे सांगितले व रुग्णवाहिका घेऊन हेमलकसाला जाण्यास सांगितले. त्यांनी पेशंटला पुढे नेण्यास नकार दिला. “तुम्हीच काही तरी करा नाहीतर, आम्ही अंत्यसंस्कार करतो.” असे त्यांनी मला सांगितले आणि माझ्यावर मोठी नैतिक जबाबदारी आली.
मी खूप विचार केला, हिस्टरी अजून एकदा विचारली. त्यातून एक गोष्ट कळाली की तो दोन दिवसापूर्वी खूप मोहाची दारू पिऊन होता. तीन चार दिवस जेवण केले नव्हते. मग मला माझ्या इंटर्नशिपच्या मेडिसनच्या पोस्टिंगमध्ये हायपोग्लायसेमियाची केस आठवली. रक्तामधली साखर ४० पेक्षा कमी झाल्यावर देखील अशी सेमी कोमाची अवस्था होते, बेशुद्धी येते. उपचारांनी पूर्णपणे बरा झालेला पेशंटही मी पाहिला होता. मग लगेचच सिस्टरने रक्तातील साखर ग्लूकोमीटरने तपासली आणि मला एकदम माझं निदान मिळालं. रक्तातील साखर होती १५ ग्रॅम/डी.एल. त्याच्यामुळेच त्याची ही स्थिती होती. मी लगेचच आमच्यकडे उपलब्ध असलेली Dextrose 10% I.V. Drip लावायला सांगितली. आर्धी बोटल जाते न जाते तोच पेशंट उठून बसला आणि बडबडायला लागला. लोकांच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. मेलेला माणूस जिवंत झाला म्हणून सगळ्या लोकांमध्ये चर्चा सुरु झाली. दवाखान्यात पेशंटला बघायला गावातील लोक येऊ लागले. मलापण माझ्या उपचारावर विश्वास बसत नव्हता. हसूही येत होतं. त्यानंतर “पोट्टासा डॉक्टर”चा भाव वधारला. तेव्हापासून ओपीडी वाढली आणि प्रसुतींची संख्यादेखील!
त्या दिवशी मला मी पी.जी.च्या अभ्यासाच्या मागे न लागता लक्षपूर्वक इंटर्नशिप केल्याचा अभिमान वाटला आणि करत असलेल्या कामाचा देखील!

दिग्विजय बंडगर (निर्माण ५)

Before The Flood

फिशर स्टीवन्स आणि लिओनार्डो डिकॅप्रियो यांचा BEFORE THE FLOOD’ हा माहितीपट म्हणजे आधुनिक जगातील सर्वात गहन आणि तरीही दुर्लक्षित अशा हवामानातील बदलावर केलेले कठोर भाष्य आहे. निर्माण ६ चा आपला मित्र विवेक पाटील याने आपल्याला या माहितीपटाची ओळख व्हावी म्हणून लिहिलेला हा परिचय....
           Climate change, म्हणजेच पृथ्वीच्या पर्यावरणात मानवी कृतींमुळे झालेले बदल हा २१ व्या शतकातील सर्वात मोठी समस्या असण्याचा दावा केला गेला असून जगातील सर्व भागांत आणि देशांना त्याची झळ लागत आहे. माहितीपटाचे नाव हे 'the garden of earthly delights' नावाच्या एका प्रसिद्ध कलाकृतीच्या चित्रातून प्रभावित झालेले आहे. पृथ्वीचा नाश होण्याच्या आधीचे चित्र या भागात कलाकाराने रेखाटलय. या कथेचा एक रूपक म्हणून वापर करून आजच्या जगातील परिस्थीतीची कल्पना केली गेली आहे - हवामान बदलाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास पर्यावरणीय विनाश अटळ आहे.
    मागील ४० वर्षांत जीवाश्म इंधनांचा अविवेकी वापर केल्याने पूर्ण जगभरात झालेल्या वायू आणि पाण्याच्या प्रदूषणाची चाचपणी केली गेली. त्यातून आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत. पाश्चात्य देशांत चाललेल्या अनिर्बंध विकासापोटी ज्या देशांना अजून विकासाचे वारे पूर्णपणे लागले नाहीत त्यांना याची झळ सहन करावी लागत आहे. त्यात भर म्हणजे जगभरातील उद्योजक, प्रशासक आणि ग्राहक पुरेशा समजुतीअभावी या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष करत आलेले आहेत. एका दृष्यानुसार, चीन मधील एक औद्योगिक शहर, जे जगाचे उत्पादन केंद्र म्हणून समजले जाते, तेथे दिवसाला होणारे प्रदूषण हे पूर्ण अमेरिकेत होणाऱ्या प्रदूषणाइतके गणले गेले.



   जीवाश्म इंधनांच्या वापरावर, तसेच हवेत सतत जाणार्या प्रदूषित वायुंवर होणारे उपाय व्यक्तिगत बदलांतून आणि धोरणात्मक बदलांतून अशा दोन्ही मार्गाने करता येतील. माहितीपटाच्या ओघानुसार यातील व्यक्तिगत उपायांचा काळ आता लोटून गेलेला आहे. कितीही प्रयत्न केले तरी जीवाश्म इंधनांवर आणि पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या उद्योगांतून उभी राहिलेली व्यापाराची साखळी ही व्यक्तिगत सवयींतून होणार्या बदलांच्या आवाक्यापलीकडली आहे. आता विकसित देशांचे प्रशासन आणि मोठे उद्योग यांना बदलायला सांगणे महत्त्वाचे आहे. पूर्ण जगात कुठेही गेले तरी सरकार लोकांच्या मानसिकतेप्रमाणे आपली धोरणे बदलते हे नक्की. तेव्हा विविध मार्गाने जनतेने पर्यावरणाच्या संवर्धनाला आपला पाठींबा दाखवणे महत्त्वाचे आहे.
   Centre for Science and Environment या संशोधन संस्थेच्या सुनिता नारायण यांनी आपले खडतर मत व्यक्त केले. अमेरिकेसारखे प्रगत देश इतरांना जीवाश्मांचा वापर आणि प्रदूषण कमी करायला सांगत असताना त्यांच्या जीवनशैलीत बदल करायला मात्र तयार होत नाहीत. एका अभ्यासानुसार, अमेरिकेतील व्यक्तीचा सरासरी उर्जेचा वापर भारतातील व्यक्तीच्या ३४ पट आहे. तेव्हा प्रगत देशांनी पुढाकार घेऊन उद्योगांच्या आणि पायाभूत सुविधांच्या शैलीत मोठे बदल घडवायला सुरुवात केल्यास इतर देश त्याचा आदर्श घेऊ शकतील. भारतासारख्या प्रगतीशील देशात आजही जवळपास ३० कोटी लोकांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. तेव्हा पर्यावरणाच्या प्रश्नाआधी विजेच्या उपलब्धीला प्राधान्य दिले जाणार आणि त्यापायी जीवाश्मांचा मोठ्या प्रमाणावर वापर अनिवार्यच असणार. अशा वेळी जास्तीत जास्त प्रमाणात अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करणे हे भविष्याला अनुसरून एक मोठे योगदान म्हणता येईल.
‘टेसला’ सारख्या कंपन्या हवामानातील बदलाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तांत्रिक विकास करण्यात पुढाकार घेत आहेत. पण तरीही मोठ्या प्रमाणावर इच्छाशक्तीचा अभाव हा या लाटेच्या प्रसारातील मुख्य अडथळा असल्याचे सांगितले गेले. धोरणात्मक बदल होण्यात लोकांच्या मताचा आणि मानसिकतेचा खूप मोठा वाटा असतो हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
   पायर सेलर्स या अंतराळवीराच्या आशादायी मनोगताने या माहितीपटाची शेवट होते.
  “हो, अजूनही आशा आहे.. मी एक सकारात्मक व्यक्ती आहे. माझा लोकांवर विश्वास आहे. आणि मला वाटते कि जेव्हा लोक या प्रश्नाबद्दल असणाऱ्या अनिश्चिततेतून बाहेर येतील, उघड्या डोळ्यांनी या गोष्टीकडे एका पातळीवर एक खरीखुरी समस्या म्हणून पाहायला सुरुवात करतील, आणि जर यावर योग्य कृती करण्याची त्यांना काही प्रमाणात समज दिली गेली असेल, तर ते तसे नक्की करतील.”
 विवेक पाटील, (निर्माण ६)



पुस्तक परिचय - स्वभाव विभाव

           आपल्या शरीरात मन आणि बुद्धी नावाचे दोन न दिसणारे पण अतिशय महत्त्वाचे अवयव आहेत. हे दोन्ही अवयव सदैव एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. मनाच्या स्वच्छंद उधळण्याला काही मर्यादा नाही. त्याला बुद्धीचा लगाम द्यावाच लागतो. मन एका क्षणात चंद्रावर जाऊन पोहोचते तर बुद्धीला त्याच चंद्रावर पोहोचायला यानाची गरज असते. या मनाचा लगाम फक्त बुद्धीच्याच हाती द्यावा. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांना जर मनावर हावी होऊ दिले तर मात्र काही खैर नाही. दैनंदिन आयुष्यात आपण असेच भावनिक लाटांमध्ये गटांगळ्या खात असतो. अश्याच काहीशा अवस्थेत मी असताना हातात आलं “स्वभाव विभाव”.
  आपल्या आयुष्यात घडत असलेल्या घटनांमुळे आपल्याला आपला स्वभाव कळत जातो. आपला स्वभाव कळल्यावर आपण पुढे भविष्यात आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेऊ शकतो. आपल्याला आपला स्वभाव कळणं हि किती सुंदर गोष्ट आहे. स्वतःला स्वतःची अनुभूती होण्यासारखा दुसरा आनंद नाही. हा अनुभव मी “स्वभाव विभाव” वाचत असतांना, त्यावर मनन करतांना घेतला.
  मनोगत व्यक्त करतांनाच लेखक म्हणतो, हे पुस्तक लिहितांना त्याची भूमिका ही ‘मनोविकास’ तज्ञाची आहे आणि या पुस्तकाचा उपयोग व्यक्तिमत्व विकासासाठी व्हावा. पुस्तकात २७ लेखांमध्ये विविध नात्यांमधील वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करीत लेखक मानवी आयुष्यातले भावनांचे उमलते, मावळते रंग आणि त्यांचा वर्णपट उलगडत जातो.

यातील काही लेखांचा मी इथे उल्लेख करेन.
  पुस्तकातील पहिलाच लेख वाचताना लक्षात आलं, अरेच्चा हे तर असंच माझ्याही मनात होतं कधी कधी. मलाही हेच प्रश्न पडतात. चला, म्हणजे खुद्द मनोविकास तज्ञ आनंद नाडकर्णी सुद्धा या अवस्थेतून गेले आहेत. आपण स्वतःला कधी कधी जितके भावनिकदृष्ट्या कमजोर समजतो ते म्हणजे आपलं पूर्ण व्यक्तिमत्व नाही, तर ती फक्त एक अवस्था आहे आणि कालपरत्वे ती बदलते.
  “मी आणि माझे गाणे...” प्रत्येक प्रसंगामध्ये काही घटक आपल्या नियंत्रणाखाली असतात तर काही आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. शक्यसाध्य आणि अशक्य यातला नेमका फरक आपल्याला कळायला हवा. कुठल्याही प्रसंगातून जात असताना आपल्या नियंत्रणाखाली असणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपला दृष्टीकोन आणि आपले विचार. पण आपण स्वतःशीच भांडतो की परिस्थितीने बदलावे, आपल्या जवळच्या माणसांनी त्यांचे स्वभाव बदलावे व आपल्याला प्रतिसाद द्यावा. ज्या घटकांवर आपले नियंत्रण नव्हते-नाही-असणार नाही, त्यांच्यावर सारे लक्ष केंद्रित करण्याचा अट्टाहास आपल्याला आपल्या उद्दिष्टांपासून दूर नेतो. म्हणजेच नियंत्रणाखालील घटकांचा योग्य वापर केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते, भावनिक असमतोल कमी होतो.
  सुखद व दुःखद भावना या एकमेकांचे ठोस पर्याय नव्हे. दोन्ही गटातील भावना बदलत्या व्याप्तीमध्ये पण एकाच वेळी मनात असू शकतात, त्यांचे रंग व त्यांच्या छटा बदलू शकतात. ज्या रंगाचे अधिक्य त्याप्रमाणे वर्तन घडते; पण याचा अर्थ इतर छटा नसतातच असा नव्हे.
  “तिसऱ्या मजल्यावरचे तत्त्वज्ञान..” मानवी भावनांचे सुखद व दुःखद असे दोन भाग न करता त्याच्या वेगवेगळ्या छटा असून आपण त्यांना “अनुरूप-उचित-पोषक” पातळीवर आणावे याकरिता लेखक, या भावना व त्यांच्या वेगवेगळ्या छटा यांना एक सहा मजली इमारतीचे रूप देतो. मनातल्या या इमारतीचे नाव आहे भावना अपार्टमेंट. सहाव्या मजल्यावर टोकाच्या दुखद भावना राहतात. तीव्र संताप, अगतिक नैराश्य, भीषण चिंता, टेन्शन आणि खंत या काही प्रमुख भावना. या इमारतीच्या तळमजल्यावर आहेत शांती, समाधान, आनंद, प्रेम वगैरे. सहाव्या मजल्यावरील दुखद भावनांचे रुपांतर एका दमात सकारात्मक भावनांमध्ये होणार नाही. त्यांना प्रथम खुपणाऱ्या, पण तरीही “अनुरूप-उचित-पोषक” पातळीवर आणावे लागेल. या अनुरूप भावना म्हणजे तिसऱ्या मजल्यावरच्या भावना. नकारात्मक भावनांचे अस्तित्व नसणे म्हणजे बेचव जीवन. त्या जर सहाव्या मजल्यावर गेल्या तर खारटपणा; पण तिसऱ्या मजल्यावर म्हणजे प्रमाणात असतील तर जगण्याला चव आहे.
 
  “नाही म्हणावयाला..” कोणाला कुठल्याही गोष्टीकरिता नाही म्हणण्याचा प्रसंग आपल्या आयुष्यात अनेकदा येतो. इतरांना सांभाळून घेण्याच्या प्रयत्नात आपण अनेकदा तोंडघशी पडतो. स्वतःला सांभाळणेही विसरून जातो. हे सारे एकाबाजूने त्रासदायक असते. समोरच्या व्यक्तीचे वागणे, म्हणणे पटत नसूनही आपण मनातल्या मनात चडफडत राहतो. If you know to say ‘NO’ at times and how to receive a ‘NO’ at times, then world becomes a much better place for you to live in.
  “तोफेच्या तोंडी..” आपण सारेच कधी न कधी मुर्खासारखे किंवा वेड्यासारखे वागत असतो; पण चूक केल्यावर आपणच तिचे रुपांतर करतो गुन्ह्यामध्ये. एकदा ‘गुन्हेगार’ हे लेबल आपण स्वतःला लावले कि परिणामांची शिक्षा मुक्तपणे भोगण्याशिवाय कोणताही पर्याय आपण स्वतःसमोर ठेवत नाही. पण या स्वरूपाचा विचार व्यक्तीला चुकीपासून शिकायचे व त्याची पुनरावृत्ती टाळायची असे सांगत नाही. यासाठी माझ्या मनातली, माझ्या संदर्भातली भूमिका अशी करायला हवी – ‘मी चुका न करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. तरीही माझ्या हातून चूक होऊ शकते. तसे झाल्यास मी प्रथम स्वतःला सांगेन, की तू जसा चुकणारा माणूस आहेस तसाच तू शिकणारा माणूसही आहेस. चुकीचे मूल्यमापन करून, तिच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न प्रथम. ते मार्गी लागले की झालेल्या चुकीबद्दल स्वतःला काहीतरी दंड द्यायचा.’ चुकीच्या वर्तनाची जबाबदारी उचलायची, पण तरीही स्वतःवर चुकांचे खिळे ठोकून सुळी चढवायचे नाही, हे कळले तर ‘स्वतःचा क्रॅास स्वतःच्या खांद्यावरून नेणे’ याचा भावार्थ समजू शकेल.
  “डौलदार परिवर्तन..” भावनिक पर्याय हे विरुद्ध टोकांचेच असतात. रागाच्या विरुद्ध मऊ मिळमिळीत भूमिका याशिवाय पर्यायच नसतो? स्वतःला त्रासदायक ठरणाऱ्या, उद्दिष्टांपासून स्वतःला दूर नेणाऱ्या भावनांमध्ये बदल घडवून आणण्याचे प्रयत्न केल्यावर त्या व्यक्तीला स्वतः मधल्या ‘शांतशक्ती’ चा (quiet strength) अनुभव येत असतो. कणखरपणाचे नियंत्रित व उद्दिष्टाकडे नेणारे प्रदर्शन त्यामध्ये असते. ‘There is a difference between Change and Elegant change’ – Dr Albert Ellis
   बदल आणि डौलदार परिवर्तन यातील फरक काय? स्वतःला त्रास देणाऱ्या भावनांना योग्य जागा दाखवून व्यक्ती जेव्हा आपल्या वृत्ती – प्रवृत्ती मध्ये परिवर्तन करते आणि वैचारिक परिवर्तनाचा अतूट भाग म्हणून कृती होते तेव्हा त्यात डौल येतो.
   पुस्तक एकदा वाचून झाल्यावर आपल्याला सगळं कळलं असं होत नाही. तर पुन्हा पुन्हा वाचावं लागतं. अनुभवावं लागतं. मानवी भावना, त्यातली गुंतागुंत, एकदाच वाचल्यावर कशी उलगडणार ?


सुवर्णा खडककर, (निर्माण ५)