'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 17 January 2018

नमस्कार मित्रमैत्रीणींनो...

२०१७ वर्ष संपून २०१८ हे नवीन वर्ष आलं. सरणारा प्रत्येक क्षणतसा नवीन असतोच, आपल्यासोबत नवीन शक्यता घेऊन येतो. आपल्याकडे वर्षहे एकक सेलिब्रेट करण्याची पद्धत आहे. काळाच्या पट्टीवर (टाईम स्केलवर) बघायला गेलं तर वर्षहे एकक इतकं छोटं आहे (एक अब्जांशचा ०.०७ वा भाग!) की त्याची किती दखल घ्यावी हा प्रश्न पडतो. तर दुसऱ्याच बाजूला, समाजाच्या दुनियादारीत हेच एकक खुपच मोठं वाटतं. जगात प्रत्येक सेकंदाला ८ जीव वयाचं एक वर्ष पूर्ण होण्याअगोदर मरतात, भारतात एका मिनिटाला ५१ बालके जन्म घेतात, एका तासाला ४५० भारतीय जोडपी लग्न करतात, दिल्लीत प्रती दिवस४ बलात्कार होतात, सरासरी ५०० भारतीय शेतकरी प्रत्येक महिन्याला आपली जीवनयात्रा संपवतात, इ. इ.
समाजातील विषमता, अन्याय, अत्याचार त्यांचं वर्षसाजरे करत नाहीत, प्रत्येक दिवसाला (क्षणाला!) वर्तमानपत्रातून त्यांचं अस्तित्व जाणवत असतं. त्यामुळे प्रत्येकच क्षणाला ह्या शक्तींना प्रतिकार करणारी कृती करणे महत्त्वाचे ठरते. तयांशी दोन हात करणाऱ्या निर्माणी प्रतिशक्तीची द्वैमासिकदखल/ कौतुक घेऊन आलोय ह्या अंकांत...
नवीन वर्षातील ३,१५,३६,००० सेकंदाच्या सर्व निर्माणींना खूप साऱ्या शुभेच्छा!


निर्माणचे सातवे Alumni Workshop
माझ्या शिक्षणाचा/ कामाचा सामाजिक प्रश्नांशी काय संबंध आहे?’, ‘पैसे कमवण्यापलीकडे माझ्या जगण्याला काय अर्थ आहे?’ ह्या प्रश्नासोबत सुरु झालेला निर्माणचा प्रवास पूर्णवेळ सामाजिक कामापर्यंत नेणाऱ्या निर्माणच्या शिबिरार्थ्यांची दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात शोधग्रामला कार्यशाळा होते. हे त्याचे सातवे वर्ष! शोधग्राममधीलपूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ह्यावर्षी कार्यशाळा नोव्हेंबर महिन्यात पार पडली.
२५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित निर्माणच्या ह्या कार्यशाळेत एकूण ४० शिबिरार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मागच्या वर्षभरात आपल्या कामाविषयी किंवा प्रश्नाविषयीची निरीक्षणे, त्यातून झालेले शिक्षण, ह्या प्रवासात स्वतःविषयी जाणवणारे काही महत्त्वाचे बदल आणि मुद्द्यांचे सर्वांनी शेअरिंग केले. इतिहासाचे अभ्यासक प्रा. रामचंद्र गुहा यांनी शिबिरात निर्माणींशी संवाद साधला. महात्मा गांधींना अभिप्रेत असलेलं स्वराज्य आपण साकारत आहोत का, राजकीय स्वातंत्र्य मिळून गेल्या ७० वर्षांत आपण काय साधलं ह्या विषयावर त्यांनी शिबिरात मार्गदर्शन केले. व्हेअर इंडिया गोज्ह्या पुस्तकाचे लेखक, प्रिन्स्टन विद्यापीठातील अर्थतज्ञ डीन स्पिअर्स यांनी भारतातील स्वच्छतेच्या प्रश्नावर स्काईपद्वारे मांडणी केली. आपल्या कामासंदर्भात आणि समाजातील राजकीय परिस्थितीवर शिबिरार्थ्यांनी नायनांसोबत संध्याकाळी प्रश्नोत्तरी केली.
            शोधग्राममधून नवी ऊर्जा आणि उमेद घेऊन सर्व निर्माणी आपापल्या जागी परतले.
प्रा. रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या गडचिरोली भेटीबद्दल द टेलिग्राफया इंग्रजी दैनिकात लिहिलेला लेख:


निर्माण ८.१ अ शिबीर
            मागील ३ महिने निर्माण ८ साठी चालवलेल्या निवड प्रक्रियेतून निवड झालेल्या शिबिरार्थ्यांचे गटाचे पहिले शिबीर २७ डिसेंबर, २०१७ ते ४ जानेवारी, २०१८ या दरम्यान शोधग्रामला पार पडले. निर्माण ८.१ अ शिबिरात एकूण ५४ शिबिरार्थी सहभागी झाले होते. तारुण्यभान ते समाजभानअशी या शिबिराची थीम होती.
·       स्वतःच्या लैंगिकतेविषयी, भावनांविषयी, मूल्यांविषयी, प्रेरणांविषयी, स्वप्नांविषयी निरोगी समज तयार होणे.
·       स्वचा विस्तार स्वच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव वाढणे, समाजातील मुख्य आव्हानांची ओळख होणे.
·       अर्थपूर्ण आयुष्य, जीवनातील ध्येयाविषयी स्वतःसाठी स्पष्टता यावी.
ही काही मुख्य उद्दिष्टे या शिबिराची होती.
            वयात आल्यावर जागृत होणारे कुतूहल आणि पुरुष प्रजनन इंद्रिये हा विषय अम्मांनी समजावून सांगितला. डॉ. आरती आणि अमोलने स्वचा स्वीकार, सुनील काकांनी सामाजिक विषमता हे विषय समजावून सांगितले. माया स्टोरी, जितो जितना जीत सको अशा खेळांतून स्वतःसाठी काही मुल्ये शोधण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. अमृतने सर्चच्या कामाबद्दल सांगताना एखाद्या सामाजिक संस्थेकडे कसे बघावे या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतला. सामाजिक काम करण्यामागे माझ्या प्रेरणा काय आहेत, याचे आत्मपरीक्षण केले, वेगवेगळ्या पुस्तकांतून सामाजिक-राजकीय-आर्थिक परिप्रेक्ष विस्तारले, आकाशने घेतलेल्या सेशनमधून माझी आर्थिक गरज आणि आर्थिक नियोजन समजून घेतले. गावात एक दिवस घालवल्यावर तिथल्या प्रश्नांवर निरीक्षणे नोंदवली. पी. साईनाथ यांच्या विदर्भातील शेतकरी आत्महत्येवरील कामावर आधारित निरोज् गेस्टही डॉक्युमेंटरी पाहिली.

            
आनंद दादाने गडचिरोली, मुंबई आणि दिल्ली अशा त्याच्या गेल्या १० वर्षांच्या कामातून झालेले शिक्षण सर्वांसोबत शेअर केले. डॉ. मनवीन (निर्माण ७), प्रतिक (निर्माण ६), डॉ. सुरज (निर्माण ५), गजानन (निर्माण ७), संकेत (निर्माण ७) आणि रविंद्र (निर्माण ६) यांनी आपापल्या कामाविषयी आणि वैयक्तिक प्रवासाविषयी थोडक्यात शिबिरार्थ्यांसोबत शेअरिंग केले. मनातल्या असुरक्षितता, स्वधर्म, शिक्षणाचे खरे प्रयोजन, आई-वडिलांशी संवाद, जोडीदार, इ. अनेक प्रश्नांना नायनांनी शिबिरात झालेल्या प्रश्नोत्तरीच्या सेशनमध्ये उत्तरे दिली. आणि शेवटच्या दिवशी आपल्यासाठी एका मोठ्या ध्येयाचा विचार करून पुढील सहा महिन्यांसाठी स्वतःचा कृतीकार्यक्रम सर्व शिबिरार्थ्यांनी बनवला.
            निर्माण परिवारात नव्याने दाखल झालेल्या निर्माणींचे स्वागत!



कुमार निर्माणचे पाचवे सत्र सुरु
समाजाप्रती असलेली उदासीनता, आजूबाजूंच्या घटकांकडे बघून मिळणारे मर्यादित संस्कार आणि माध्यमांचा भडीमार ह्या सर्वांमुळे दिवसेंदिवस मुलांमध्ये आत्मकेंद्रीपणा आणि एकलकोंडेपणा वाढत चालला आहे. अभ्यासात हुशार असण्यासोबतच सामाजिक जोडही गरजेची आहे, याबाबत बोललंच जात नाही. सर्वांगीण विकासाचे अनेक पर्याय/ क्लासेस बाजारात उपलब्ध असताना, मुलांमध्ये सामाजिक जोड निर्माण करणारी प्रक्रिया आजूबाजूला दिसत नाही. याच विचारातून डॉ. अभय बंग आणि मा. विवेक सावंत यांनी कुमार निर्माणया संकल्पनेची मांडणी केली.
शालेय वयोगटातील मुलामुलींमधील सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करणे आणि त्यांच्यामध्ये वैश्विक मानवी मुल्यांची रुजवणूक करणेहे या उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
कुमार निर्माणचा या वर्षीचा पुढील टप्पा सुरु झाला आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे, नव्या पिढीवर विश्वास ठेवणारे व त्यांना मार्गदर्शन करू इच्छिणारे नागरिक, बदल स्वतःपासून सुरु होतो याची समज असणारे तरूण व प्रयोगशील शिक्षक हे परिसरातील मुलांचे गट तयार करून मुलांचे भवितव्य घडवण्यात योगदान देवू शकतात.
अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा.
कुमार निर्माण कार्यकारी गट
शैलेश: ९५०३०६०६९८
प्रणाली: ९७६७४८८३३७


जुई आणि गजानन निर्माण टीममध्ये सामील
कोल्हापूरची जुई जामसांडेकर (निर्माण ५) ३० डिसेंबर, २०१७ पासून निर्माण टीममध्ये ६ महिन्यांसाठी काम करण्यास सर्चमध्ये रुजू झाली आहे. जुईने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेले आहे आणि याआधी ४ वर्षे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तिला कामाचा अनुभव आहे. सायकोलॉजी या विषयात तिला विशेष रस आहे. ती सध्या  इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून सायकोलॉजी या विषयाचे पदवित्तर शिक्षण घेत आहे. निर्माणसाठी येणाऱ्या युवा वयोगटाचे वैशिष्ट्ये काय असतात, विज्ञान शाखेत ह्या वयोगटावर अस्तित्त्वात असलेले साहित्य वाचून निर्माण प्रक्रियेला अभिप्राय देणे, निर्माण शिबिराच्या आयोजनात मदत करणे, तसेच डॉ. आरतीला (निर्माण ४) मानसिक आरोग्याच्या कामात मदत करणे अशा मुख्य जबाबदाऱ्या पुढचे ६ महिने मुख्यत्वे ती सांभाळणार आहे.
मुळचा लाखांदूरचा (जि. भंडारा) असलेला गजानन बुरडे निर्माण टीमसोबत काम करण्यासाठी सर्चमध्ये रुजू झाला आहे. शिक्षणाने इंजिनिअर असलेला गजानन निर्माणच्या ८ व्या बॅचचा शिबिरार्थी आहे. निर्माण शिबिरांच्या आयोजनात मदत करणे, निर्माण ऑफिसचे काम सुरळीत चालण्यासाठी लागणारा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट देणे, निर्माण संबंधित कामाचे डॉक्युमेंटेशन आणि डेटा सांभाळणे ही त्याच्या कामाची मुख्य जबाबदारी असणार आहे.

जुई आणि गजाननचे निर्माण टीममध्ये स्नेहपूर्वक स्वागत!

एक पाठ्यपुस्तकाचा जन्म

सायली तामणे (निर्माण १) हिने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता ९ वी अणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्व-विकास अणि कलारसास्वादया विषयाच्या पुस्तक निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली. ह्या पुस्तकच्या निर्मितीच्या अनुभवाबद्दल सायली सांगतेय...
            लहानपणी, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू होण्यामध्ये मला खरंतर एकच आनंद असायचा, नवीन पाठ्यपुस्तकं हातात मिळण्याचा! नवी कोरी पाठ्यपुस्तकं, त्यांचा वास घेणं, अधाश्यासारखी त्यांतली सगळी चित्रं आधी पाहणं आणि मग भाषेच्या पुस्तकांतली एक-एक गोष्ट जेवताना चवीने वाचणं हा माझा आवडता छंद. बालभारतीच्या पुस्तकांमधील चित्रं मला विशेष आवडायची. चाचा चौधरी किंवा बल्लू वगैरे कॉमिक्समधील चित्रेदेखील मला अशीच आवडायची. त्यांतले चेहरे अतिशय भोळे असायचे. कितीही मोठ्या इमारतीवरून तुम्ही खाली पडलात तरी फक्त एखादा हात मोडायचा, बॉम्ब फुटला तरी फक्त कपडे काळे व्हायचे, वगैरे. थोडक्यात त्या जगात फार वाईट काही होणारच नाही अशी एक शाश्वती वाटायची. मला अजूनही आठवतं, मी पुण्यात नवीन आल्यावर पहिल्यांदा बालभारतीची इमारत पाहिली तेव्हा खूप वेळ बघत राहिले. याच इमारतीत आपलं सारखं येणं-जाणं होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो योग आला स्व-विकास आणि कलारसास्वादया पुस्तकाच्या निर्मितीच्या निमित्ताने.
इयत्ता नववी आणि दहावी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण काळ असतो. याच काळात विद्यार्थ्यांमध्ये झपाट्याने शारीरिक, मानसिक बदल घडत असतात आणि त्या सर्व बदलांचा प्रभाव त्यांच्या अभ्यासावर, पालकांशी-शिक्षकांशी असलेल्या संबंधावर, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या निर्णयांवर पडत असतो. तसंच या काळात विद्यार्थ्यांची स्वत:ची ओळख निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. मुलांची स्वत्वाची जाणीव या काळात वाढीस लागते. आपण कोण आहोत, आपल्या आवडीनिवडी काय आहेत याचा मुलं  जागरूकपणे विचार करू लागतात. दहावीनंतर आपण काय करणार, कुठली बाजू निवडणार यासंबंधीचे विचारदेखील मुलांच्या मनात घर करू लागतात. दुर्दैवाने या सर्व मुद्द्यांना थेटपणे हात घालणारा कुठलाच विषय आपल्या शालेय अभ्यासक्रमात नाही.
National Curricular Framework, 2005 म्हणजेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये या सर्व बाबींचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो, मात्र पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा थेटपणे समावेश झालेला नाही. खरं सांगायचं तर मूल्यांप्रमाणेच स्व-विकास हा विषय वेगळा न ठेवता, मुलांच्या १० वर्षांतल्या शालेय प्रवासात केल्या जाणार्‍या अभ्यासातूनच त्यांना स्वत:बद्दलची स्पष्टता आपसूक येणं अपेक्षित असावं. मात्र शिक्षणाचे तुकडे पाडून फक्त आपापला विषय शिकवण्याकडे झुकलेल्या आपल्या शिक्षणपद्धतीत हे उद्दिष्ट कुठेतरी फार मागे पडून जातं. याआधी व्यक्तिमत्त्वविकास किंवा व्यवसायमार्गदर्शन अशा वैकल्पिक विषयांद्वारे ते साध्य करण्याचा प्रयत्न झाला; तरी या विषयांना पाठ्यपुस्तक नसल्याने अनेक शिक्षक गाईडचा वा व्यवसायमालेचा आधार घेऊन शिकवत आणि मग संस्कारांची व्याख्या लिहा’ (हा खऱ्या गाईडमधील खरा प्रश्न आहे) या पातळीवर सगळंच प्रकरण येऊन थांबे.
या विषयाची सुरुवात करताना स्व-विकासम्हणजे नक्की काय इथपासून अभ्यासाला सुरुवात झाली. त्याआधी स्वम्हणजे काय याबद्दल अभ्यास केला. त्याबद्दल अनेक रिसर्च पेपर वाचले, संदर्भ तपासून पाहिले. स्व-ओळखमध्ये कशाचा समावेश होतो? फक्त व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांचा? की तिच्या सामाजिक-सांस्कृतिक ओळखीचा? या वयात मुलांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांबद्दल शास्त्रोक्त मांडणी काय आहे, आपल्या राज्यातल्या मुलांना नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं, याआधी असणाऱ्या व्यक्तिमत्त्वविकास  किंवा व्यवसायमार्गदर्शन या विषयांमध्ये कुठल्या मुद्द्यांवर भर दिला गेला होता, या प्रश्नांचा बारीक अभ्यास केला. या कामी डॉ. शिरिषा साठे, शीतल बापट, विद्यानिधी (प्रसाद) वनारसे यांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन मिळालं. मुख्य म्हणजे हे सर्वच जण विविध स्तरांवर मुलांसोबत काम करत असल्यामुळे फक्त क्लिष्ट शास्त्रीय माहिती किंवा संकल्पना देण्याचा मोह कुणालाच झाला नाही.
पाठ्यपुस्तकाचं स्वरूप कसं असावं याचा विचार करताना, दोन गोष्टी पक्क्या ठरवल्या होत्या. पहिली म्हणजे पाठ्यपुस्तक हे ज्ञानरचनावादावर आधारलेले असेल. ज्ञानरचनावाद असं सांगतो, की कुठलंही ज्ञान आपण रेडिमेड आणून मुलाच्या डोक्यामध्ये ओतू शकत नाही. ज्ञान हे प्रत्येकाने स्वत:साठी, स्व-प्रयत्नातून निर्माण करायचं असतं. म्हणजे काय, तर एखाद्याने मला एखादी माहिती सांगितली, की लगेच ती पाठ करून तिचं ज्ञानात रूपांतर होत नाही. एखादी व्यक्ती जेव्हा तिला आलेल्या अनुभवाचा अर्थ लावते, त्यातून एखादं मूर्त वा अमूर्त सूत्र शोधते, आपल्या पूर्वानुभवाशी ते ताडून बघते आणि मग ते स्वीकारते, तेव्हाच त्या माहितीचं खऱ्या अर्थाने ज्ञानात रूपांतर होतं नि त्या ज्ञानाचं उपयोजन ती व्यक्ती करू शकते. असं म्हणतात, ‘The aim of education is to unsettle’. ज्ञानरचनावादी शिक्षणाचा पाया विसंवादातून बोध घेण्यात म्हणजे  ‘cognitive dissonance’ निर्माण करण्यात आहे. म्हणजे काय, तर जेव्हा आपल्या मेंदूला दोन परस्परविरोधी अनुभव मिळतात, तेव्हा त्या दोन्हींचा अर्थ लावल्याशिवाय आपल्या मेंदूला चैन पडत नाही; कारण आपल्या डोक्यात कुठल्याही विषयासंबंधी एक सुसूत्र चित्र निर्माण करण्याचा मेंदू प्रयत्न करत असतो. त्यामुळे एखाद्याला विचार करायला भाग पाडण्याचा सर्वांत परिणामकारक मार्ग म्हणजे त्याच्यासमोर दोन परस्परविरोधी अनुभव ठेवणं किंवा त्याच्या मताला छेद देईल अशी माहिती वा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण करणं.
एक उदाहरण पाहू सजीव म्हणजे काय याची पुस्तकी व्याख्या पाठ केलेल्या मुलांना जर असं विचारलं, की आग तिच्या रस्त्यात येणाऱ्या सर्व गोष्टी खाते, धूर बाहेर निघतो या अर्थी श्वासोच्छ्वास करते, आग पुढे पसरत जाते म्हणजे स्थानदेखील बदलते आणि आग वाढत जाते या अर्थी तिचं प्रजननदेखील होतं. मग आग सजीव आहे का?’ तर नक्की सजीव म्हणजे काय याचा विचार करणं त्यांना भाग पडतं आणि मग सजीवांची व्याख्या अधिक सखोलपणे, तिच्या मर्यादेसह मुलांना कळते. त्यामुळे सुरुवातीला पाठ्यपुस्तकाने कोणतीही थेट माहिती मुलांना न पुरवता अनेक प्रश्न निर्माण करावेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना होणाऱ्या वैचारिक संघर्षातून मुलांनी स्वत:चं मत बनवावं, स्वत:साठी एक बाजू निवडावी किंवा किमानपक्षी कुठलीच बाजू निवडता येत नाहीये याची जाणीव त्यांना व्हावी आणि त्यातून मुलांचं शिक्षण व्हावं. दुसरं म्हणजे जरी आपण कितीही विविध उपक्रम दिले आणि त्यावर प्रश्न विचारले, तरी जर शिक्षकांनी ते वर्गात वापरलेच नाही, गाळून टाकले तर? म्हणून फक्त शिक्षकांवर अवलंबून न राहता मुलांनी पुस्तक हातात घेतल्यावर त्यांना स्वत:ला ते प्रश्न इंट्रेस्टिंग वाटावेत, अशा प्रकारे पुस्तक तयार केलं पाहिजे; जेणेकरून कोणी काही शिकविलं नाही, तरी मुलांना त्यातले उपक्रम स्वत: करून बघता येतील.
पुस्तकाचा पहिला खर्डा वाचला तेव्हा आणि तो लिहितानादेखील असं लक्षात आलं, की काहीच माहिती थेट न देणं शक्य होणार नाही. खरंतर एखादा अनुभव देणं, त्यावर प्रश्न विचारणं, त्यावर मुलांनी विचार करून एखादा निष्कर्ष काढणं, त्यावर प्रतिप्रश्न करणं, परत मुलांनी विचार करणं अशी शिक्षणाची एक सलग प्रक्रिया असते वा निदान असावी. मात्र पाठ्यपुस्तकात तुम्हांला एखाद्या अनुभवावर एकदाच प्रश्न उपस्थित करता आला असता. वाढीस पूरक मानसिकता (Growth Mind-set), किंवा करिअर कसे निवडावे याबद्दल अनेक नवीन संकल्पना पुस्तकात होत्या आणि फक्त अनुभव देऊन मुलांना प्रश्न विचारले, तरी त्यातून ती काय निष्कर्ष काढतात त्यावर पुस्तक लिहिणार्‍याचा काही ताबा असणार नव्हता. त्या वेळी, समोरासमोर शिक्षण आणि  इ-लर्निंग किंवा पाठ्यपुस्तक या दोन प्रकारच्या माध्यमांतला फरक दिसून आला. पुस्तक या माध्यमाच्या अनेक मर्यादा समोर आल्या. त्यामुळे माझ्या आदर्शवादी संकल्पनांना थोड्या प्रमाणात मुरड घालावी लागली.
सुरुवातीला एखाद्या व्यवसायासारखी या पुस्तकाची रचना असावी असा विचार होता; जेणेकरून मुलांना त्यात दिलेली एखादी कृती करून झाल्यावर त्याखालीच त्यांचे अनुभव, मत मांडता आलं असतं. मात्र यात दोन अडचणी समोर आल्या. एक म्हणजे अनेक विद्यार्थी आर्थिक कारणांसाठी दुसऱ्याची पुस्तकं पुन्हा वापरतात. दुसरं म्हणजे ठरावीक आकाराच्या रिकाम्या ओळींमध्ये उत्तर बसवताना, मुलांच्या अभिव्यक्तीवर खूपच मर्यादा येऊ शकतात असं जाणवलं. स्वतःबद्दल मला काय वाटतं हे पाच ओळींमध्ये बसवण्याची सक्ती करणं फारच अन्यायाचं झालं असतं. मी शैक्षणिक तंत्रज्ञानाचं उच्चशिक्षण घेतलेलं असल्यामुळे कल्पनेचे घोडे मी खूप वेगाने पळवत होते. पुस्तकात खेळासारख्या रचनेचा (gamification) वापर करता येईल का? एखाद्या खेळासारखी पुस्तकाची रचना करता येईल का, जेणेकरून प्रत्येक उपक्रमानुसार खेळणार्‍याला काही गुण मिळतील आणि खेळाच्या पुढच्या फेरीत पोचता येईल? किंवा हे एखादं गोष्टीचं पुस्तक होऊ शकेल का, ज्यात गोष्ट पुढे-पुढे जाईल तसतशी त्यातल्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून एक-एक संकल्पना वा एक-एक उपक्रम उलगडला जाऊ शकेल? अखेर वेळ, पृष्ठसंख्या आणि निर्माण होणारी गुंतागुंत लक्षात घेता फक्त एका गोष्टीने सुरुवात करून प्रत्येक प्रकरणाच्या आधी त्या प्रकरणाशी संबंधित एक व्यंगचित्राचं पान असावं, एवढीच मर्यादित कल्पना राबवणं शक्य झालं.
नंतरचा प्रश्न होता भाषेचा. पुस्तकातली भाषा क्लिष्ट, औपचारिक, शासकीय आणि निरस नसावी. सोपी, कुणालाही सहज समजण्याजोगी, मैत्रीपूर्ण वाटण्यासारखी अशी असावी. मात्र ती बाळबोध किंवा कृत्रिमपणे गोड-गोड देखील होता कामा नये याचं सतत भान ठेवावं लागलं. मूळ खर्डा इंग्रजीत लिहिल्यामुळे भाषांतर करताना एकच तारांबळ उडाली. अनेक उदारमतवादी आणि वस्तुनिष्ठ संकल्पनांना मराठीत योग्य शब्दच नाहीत (किंवा ते मला सापडले नाहीत) असं लक्ष्यात आलं. उदा. Stereotype ला योग्य मराठी शब्द कुठलाकिंवा ‘Have you ever found yourself making sand castles on the beach?’ यातली त्रयस्थपणे स्वत:कडे बघण्याची छटा मराठीत कशी पकडायची? पुस्तक लिहिताना त्यातली उदाहरणं वा प्रसंग एखाद्या विशिष्ट आर्थिक, सामाजिक, भौगोलिक प्रदेशातल्या विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित तर राहत नाहीत ना, अशी शंका सारखी वाटायची. आपली जात, आपली आर्थिक-सामाजिक परिस्थिती चुकून आपल्या लिखाणात उतरतेय का? आणि किती प्रमाणात? असा विचार सारखा व्हायचा. बालभारतीचं काम, व्याप किती मोठा आहे हे अगदी जवळून पाहून थक्क व्हायला होत असे.
पुस्तकातली चित्रं हा एक स्वतंत्र महत्त्वाचा विषय. चित्रं जितकी अधिक तितकी चांगली असं वाटत असताना ती मजकुराला डोईजड तर होत नाहीत ना, याची काळजी घ्यावी लागत होती. बरं, चित्रं जितकी वाढवावी तितकी पृष्ठसंख्या आणि पर्यायाने पुस्तकाची किंमत वाढत जाणार हे समीकरण ठरलेलंच. एस.एस.सी बोर्डाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला विनाकारण भुर्दंड! सगळी चित्रं हातात आल्यावर लक्षात आलं की काही चित्रांत दाखवलेली मुलं नववीच्या वयोगटापेक्षा लहान वाटत आहेत. मग ती परत बदलली.
पुस्तकाचं परीक्षण करताना शिक्षकांनी अपघाताबद्दलच्या एक-दोन रेखाचित्रांवर आक्षेप घेतला. तसंच व्यसनांबद्दलच्या स्वाध्यायात वापरलेलं, सिगारेट ओढणार्‍या मुलाचं चित्रदेखील काढून टाकावं अशी सूचना आली. लैंगिकतेबद्दलचा आशय लिहायला घेतला, तर त्यासाठी एकही शब्द लिहिण्याअगोदरच तो मजकूर आक्षेपार्ह ठरेल अशी शंका आली होती. तसंच झालं. मला लगेच पहलाज नेहलानी आणि सेन्सर बोर्ड आठवले. श्यामलाताई वनारसेंनी तज्ज्ञांच्या नजरेतून पुस्तकाचं परीक्षण करताना नोंदवलेलं एक मत मला खूप विचारात पाडून गेलं. त्या म्हणाल्या, “पुस्तकात Stereotypes बद्दल लिहिताना आपण चित्रं मात्र प्रचलित Stereotypes चीच वापरली आहेत. म्हणजे जे बदलायला हवं, तेच एका अर्थाने आपण मुलांच्या मनावर ठसवत आहोत.
पाठ्यपुस्तकाच्या विषयात कलारसास्वाददेखील असल्यामुळे शिक्षकांच्या दृष्टिकोनातून समीक्षण करण्यासाठी आलेले बरेच शिक्षक हे कलाशिक्षक होते. त्याआधीच कला आणि कार्यानुभव या विषयांचे तास कमी केल्याचं शासकीय परिपत्रक निघाल्यामुळे कलाशिक्षक आंदोलन करत होते. या पार्श्वभूमीवर स्व-विकास आणि कलारसास्वादया पुस्तकामध्ये कलेला काहीच महत्त्व देण्यात आलेलं नाही आणि असलेले सर्व उपक्रम बाळबोध आहेत, असाही त्यांचा आक्षेप होता. मुख्य भारांश (weightage) कलारसास्वादाला द्यावा, जेणेकरून कलाशिक्षकांचे शिकवण्याचे तास वाढतील, असाही त्यांच्या मागणीचा रेटा होता. शेवटी थोडं तुमचं-थोडं माझं, असं करत-करत कलेचे बरेच उपक्रम अंतर्भूत करण्यात आले आणि आता पुस्तक बघता ते चांगलंच झालं, असं वाटतं.
पुस्तक प्रकाशनाला जाण्याआधी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही पुन्हा पुन्हा त्याची मुद्रितं तपासत होतो. पुस्तकात काहीतरी आक्षेपार्ह लिहिल्यामुळे आपल्या घरावर दगड पडत आहेत किंवा मोर्चा चालून येत आहे असं स्वप्नदेखील मला दोन-तीनदा पडलं! १७ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारं पुस्तक ही किती मोठी जबाबदारी आहे, हे सारखं जाणवायचं आणि खरं सांगायचं तर त्याचं खूप दडपणदेखील यायचं. पुस्तकात राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख फक्त शाहू महाराज एवढाच झालाय असं शेवटचं मुद्रित तपासताना लक्षात आलं, तेव्हा एकदम घाबरगुंडी उडाली. तडक फोन फिरवण्यात आले आणि तत्काळ बदल करण्याचं फर्मान सोडण्यात आलं.
मूल्यमापन हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा. सुरुवातीपासूनच या विषयाची लेखी परीक्षा नसावी, हे सर्वांचंच मत पडले. लेखी परीक्षा म्हटलं की रिकाम्या जागा भरा, व्याख्या करा हे ओघानं आलंच! लेखी परीक्षा नसल्यास कोणी या विषयाकडे ढुंकूनही पाहणार नाही अशी शक्यता अनेकांनी बोलून दाखवली. मात्र लेखी परीक्षा ठेवल्यास या विषयाचं उद्दिष्ट आणि शिकवायची पद्धत दोन्ही बदलेल, ही भीती वाटल्याने आम्ही परीक्षा नकोया आमच्या निश्चयावर ठाम राहिलो. पाठ्यपुस्तकातले सर्व उपक्रम पूर्ण केले तर विचार करणं मुलांना निश्चितच भाग पडेल आणि तेच या विषयाचं साध्य आहे. त्यामुळे खरंतर हे सर्व उपक्रम पूर्ण केलेत का, कशा पद्धतीने केलेत यावरच मूल्यमापन व्हायला पाहिजे हे लक्षात आलं. तरीसुद्धा एखाद्या प्रकरणात कशावर भर द्यावा, काय महत्त्वाचं आहे हे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांना समजणं महत्त्वाचं आहे. अनेक संशोधनांतून असं दिसून आलं आहे की मूल्यमापनाचे निकष विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच माहिती असल्यास ते त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करतात आणि त्यांचा मूल्यमापनपद्धतीवरील विश्वास वाढतो. पाठ्यपुस्तकांच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे घडलं असेल; की मूल्यमापन कोणत्या घटकांच्या आधारे होणार आहे, काय केल्यास आपल्याला पूर्ण गुण मिळतील हे प्रत्येक प्रकरणानंतर स्पष्टपणे देण्यात आलं आहे. हे विद्यार्थी आपण शिकलेल्या संकल्पनांचं किती उपयोजन करतात यानुसार सर्व मूल्यमापन करण्यात आलं आहे.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकावर काम करताना बालभारती करत असलेल्या अफाट कामाबद्दल आदर वाढला. अनेक तज्ज्ञांची मोट बांधून त्यांच्या सतत मीटिंग्स घेऊन कोणालाही न दुखावता पाठ्यपुस्तकं तयार करून घेणं; ३६ जिल्ह्यांमधल्या शिक्षकांकडून त्यांचं परीक्षण करून घेणं; त्यात प्रत्येकाच्या मताचा आदर करत बदल करणं; वापरलेल्या प्रत्येक चित्राच्या वा साहित्याच्या स्वामित्वहक्काची शहानिशा करून घेणं; सगळे संदर्भ नीट तपासणं; त्यातली  भाषा, मान्यवरांचे उल्लेख, मुद्रितं पुन्हा पुन्हा तपासून, रंगसंगती, किंमत यांचा मेळ घालून त्याचं मुद्रण करून घेणं; आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या ३५८ तालुक्यांतल्या १७ लाख विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवायची सोय करणं. आणि हे सगळं ठरावीक वेळेच्या आणि संसाधनांच्या चौकटीत राहून! नेहमीच टीकाकाराच्या भूमिकेतून पाठ्यपुस्तकांकडे बघताना, त्या कामामागची मेहनत, विचार आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रचंड भाषिक, भौगोलिक विविधतेचं राखलेलं भान कधीच लक्षात आलं नव्हतं. अगदी पालघर, नंदुरबार, मेळघाट, गडचिरोली इथल्या, मराठी भाषेतदेखील ज्यांना अडचणी येतात अशा आदिवासी मुलांपासून, निमशहरी जिल्हापरिषदेच्या शाळेत जाणार्‍या, महानगरातल्या वस्त्यांमध्ये राहून महानगरपालिकेच्या शाळेत जाणार्‍या, पुण्या-मुंबईतल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांत जाणाऱ्या, खूप एक्स्पोझर मिळालेल्या, वर्षाला लाखभर रुपये भरून शिकणाऱ्या उच्चमध्यमवर्गीय मुलांपर्यंत सगळ्यांनाच अर्थपूर्ण वाटेल असा आशय, उपक्रम आणि मांडणी करणं हे निश्चितच खूप मोठं आव्हान बालभारतीपुढे असतं.
कुठलंही काम करताना ते कसं चुकू शकेल, त्यात कशा त्रुटी राहतील अशा विचारांनी आधीच बिचकून मोठ्या जबाबदाऱ्या टाळण्याकडेच कल असणाऱ्या माझ्यासारख्या मुलीसाठी या पुस्तकावर काम करणं, ही एक मोठी उडी होती. पुस्तक प्रकाशित झालं. त्यावर बहुतांश चांगल्या आणि थोड्या वाईट प्रतिक्रियादेखील आल्या. मात्र या सर्वांपेक्षा जास्त भावलेली प्रतिक्रिया मला माझ्या शाळेतल्या मुलांकडून मिळाली. माझ्या तासाला व्यवसाय करण्याबद्दल मी काहीतरी महत्त्वाचं सांगत असताना माझ्याकडे काडीमात्र लक्ष न देता माझी मुलं नुकतंच हातात पडलेलं स्वविकास आणि कलारसास्वादाचं पुस्तक वाचण्यात हरवून गेली होती!

    सायलीचा हा अनुभव रेषेवरची अक्षरेया मराठी ब्लॉगवर याआधीच प्रकाशित झाला होता. http://www.reshakshare.com/2017/10/1037/

सायली तामणे, निर्माण १