'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 6 September 2022

'मी' नावाचा गुंता

 

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सातत्याने व वेळोवेळी आत्मपरीक्षण करणे अनेक कारणांसाठी आवश्यक ठरते. ‘मी’पणाच्या गुंत्यात मी अडकलो आहे का? – हे तपासून पाहणे हे त्यातील एक महत्त्वाचे कारण. पण नक्की काय व कसा असतो हा ‘मी’पणाचा गुंता?

निर्माणच्या एका शिबिरात डॉ. अभय बंग यांनी उलगडला 'मी' नावाचा गुंता! खालील लेख हा डॉ. अभय बंग यांनी शिबिरार्थींसोबत साधलेल्या संवादाचे संक्षिप्त स्वरूप आहे.


माझा रस कशात आहे?

जरी आपण एखादा प्रश्न सोडवतोय असं आपल्याला वाटत असलं तरी अखेरीस आपण वेगळ्या समस्येशी लढत असतो. ती समस्या आहे आपण स्वतः - ‘I is the problem. आपण कितीही म्हटलं की समाजाचे प्रश्न सोडवतोय तरीही आपल्याला त्या प्रश्नात रस नसतो. आपल्याला रस असतो स्वतःमध्ये. आणि आपला - ‘स्व’चा गुंता सोडवण्यात आपण इतके गुंतलेले असतो की त्या बाह्य समस्येवर फार उर्जा लावत नाही. आपलं सतत सुरू असतं – ‘मी इथे असायला पाहिजे होतं की अजून कुठे असायला पाहिजे होतं?’ असं सारखं  ‘मी.. मी.. मी..’ सुरू असतं.

प्राधान्य कशाला – सामाजिक प्रश्न की स्वतःचा प्रश्न?

पाण्यातल्या शक्तिशाली भवऱ्यांचे इतके सामर्थ्य असते की ते अख्ख्या जहाजाला गिळून घेतात. परंतु, ह्या प्रचंड फिरणाऱ्या भवऱ्यांच्या मध्यभागी काही नसतं. भवऱ्याच्या गतीमुळे पाणी फिरतं आणि मध्यभागी एक  ‘Illusion’ निर्माण होतं. मनुष्याचं मन हे भवऱ्यासारखं असतं. ते एका ‘मी’ च्या भ्रमाभोवती फिरत असतं. आपण बहुतेकजण जेव्हा समाजातील किंवा वास्तवातील कामाला भिडतो, तेव्हा आपण त्या समस्येला भिडत नसतो. आपण मानसिकदृष्ट्या पुढचं शिक्षण कुठे घ्यायचं हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो हा की बहुतांश लोकांच्या बाबतीत काम सुरू करण्यापूर्वीच पुढचे निर्णय झालेले असतात. ‘इथे एक वर्ष करुन मग मास्टर्सला प्रयत्न करेन. मग ते मास्टर्स कशात करायचं?’ असे प्रश्न आधीपासून पडतात. त्यामुळे आपण त्या समस्येला गांभीर्याने भिडतही नाही. म्हणून फार काही त्यातून घडत नाही. सामाजिक काम करायला नाही, तर आपण स्वतःचा प्रश्न सोडवायला जात असतो. आपल्याला कशात रस आहे ते पाहत असतो. पण त्याला काही आपला दोष नाही. शिक्षण व्यवस्था, करिअर, कुटुंब, आई-वडील, सगळे असंच घडवतात आपल्याला. म्हणून आपण त्या सापळ्यात पडलेलो असतो. पदव्युत्तर शिक्षण कुठून घ्यायचं हे शोधण्यात उर्जा खर्ची पडत जाते आणि म्हणून मूळ समस्येबाबत तसं ठोस काही घडत नाही. त्यतून असा प्रश्नही निर्माण होतो - समस्या सोडवयला जे शिक्षण पाहिजे ते त्या समस्येवर काम करतानाच नाही घेऊ शकत का? पण सहसा ते करायचं धाडस कोणी करत नाही. बहुतेकांना MTech, MD, PHD हेच आकर्षित करतात.


दिशाहीन क्षमता विकास काय कामाचा?  

एके वर्षी मी २ ऑक्टोबरला हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यानासाठी उपस्थतीत होतो. तिथे श्रोत्यांमध्ये जवळपास १०० भारतीय विद्यार्थी होते. त्यातही बहुतांश वैद्यकीय विद्यार्थी. त्यांना भेटून 'तुम्ही काय करणार?' असे विचारले असता प्रत्येकाचे उत्तर – ‘माहित नाही, कोणीतरी जॉब देईल, कोणीतरी डेटा ऍनॅलिसिस करायचे काम देईल, कोणीतरी संशोधनात समाविष्ट करेल, आमचे शिक्षक काहीतरी प्रोजेक्ट देतील’ - असेच काहीसे होते. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या, जगातील उत्कृष्ट व मानांकित विद्यापीठांमधील हुशार विद्यार्थ्यांची ही उत्तरे होती. दुर्दैवाने आपली शिक्षण व्यवस्था एखाद्या समस्येला तोंड देण्यासाठी लागणारे – Confidence आणि Competence – दोन्ही देत नाही. शैक्षणिक व्यवस्थाच विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण करते. मग ती असुरक्षितता पदवी प्राप्त करूनदेखील पुरेसं ज्ञान नसण्याची असो किंवा थेट एखाद्या प्रश्नाला भिडून काम करत ज्ञान प्राप्त करणे मारक ठरण्याची भीती असो. म्हणून मग क्षमता वाढवण्यासाठी पदव्युत्तर शिक्षणाचा पर्याय स्वीकारला जातो. मुळात उच्च शिक्षण घेणे व क्षमता वाढवणे गैर नाही. पण क्षमता वाढवून कोणत्या समस्येवर काम करणार ते ठरवणे गरजेचे असते. अनेकांना कुठे जायचं हे ठाऊक नसतानाच गाडीत बसायची घाई झालेली असते. जर आयुष्यातील अनेक वर्षे चुकीच्या निर्णयामुळे वाया घालवायची नसतील तर मी म्हणेन की जीवनातील समस्यांना सामोरे जा. आणि तेही पुढील शिक्षणाचा विचार न करता. ती समस्या सोडवायचा प्रयत्न करा.

चुकाल तेव्हा शिकाल

समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना अडचणी येतील. कारण सुरवातीला Competence कमी पडू शकतो. पण ती तर सुरुवातच असते. आज माझं वय ६७ आहे. माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी एकही काम असं केलं नाही ज्यात मी चुकलो नाही. ५० वर्षांच्या अनुभवानंतरही जेव्हा मी एखादं काम करतो तेव्हा पहिले मी चुकतोच. चुकतो आणि मग त्यातून मी शिकतो.

गांधीजींनी लिहिलेल्या एका पुस्तकातील प्रसंग सांगतो. वर्ष होतं १९४६. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना गांधीजींच्या मनात प्रश्न निर्माण झाले - देशाच्या आरोग्याचं काय? खेड्यापाढ्यामध्ये आरोग्याचं काय होईल? गांधीजी त्या प्रश्नाच्या मागे लागले. पुण्याला मेहेता नावाचे एक डॉक्टर होते. Naturopathy करायचे. गांधीजी स्वतःचा उपचार इथे करायचे. तिथेच एक संस्था स्थापन करून गांधीजींनी ठरवलं की खेड्यांमधील आरोग्यव्यवस्थेच्या प्रश्नावर काम करायचं. प्रश्नाची व्याप्ती समजून ते स्वतः कामाला लागले. पण १५ दिवस काम केल्यावर त्यांनी एक वाक्य लिहिलं - ''I was a fool''. त्यांचं म्हणणं होतं की इतके दिवस काम केल्यावरदेखील त्यांना समजलं नाही की खेड्यांमधील आरोग्यव्यवस्थेवर काम करण्यासाठी पुण्यात न राहता खेड्यात जाणे आवश्यक आहे. त्यांनी हे सर्वांसमक्ष मान्य केलं. गांधीजी ही चूक करू शकतात, मग आपण तर फार छोटे आहोत. म्हणून अपयशी होणं, गोंधळून जाणं यामुळे वाईट वाटून घेण्याची गरज नसते. सामाजिक समस्या सोडवणं खूप सोपं असतं तर आपली गरजच पडली नसती.                

कामातूनच होते ‘स्व’ ची ओळख

‘मला तो प्रश्न किती भिडला? मला तो प्रश्न किती हलवतो? मी त्यावर अवलंबून आहे का? की आता सर्व सोडून पळू आणि विद्यापीठाचा आसरा घेऊ? की जीवनाचा विद्यापीठामध्येच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू?’ – असे अनेक प्रश्न पडत असतात. आज कितीही अंधार असला तरी उद्या सूर्य उगवणार आहे असा आंतरिक विश्वास असणं महत्त्वाचं असतं. म्हणून SEARCH या आमच्या संस्थेचा लोगो जर पाहिला असेल तर अंधारामध्ये आडवी-तिडवी वाट आहे, काटेरी आहे, फार काही रुळलेली, मांडलेली नाही. तो राजमार्ग नाही. पण ती अंधारलेली वाट सोडण्यासाठी, एक नवी वाट शोधण्यासाठी, एक विश्वास पाहिजे. तो विश्वास पाहिजे निर्माण कसा करावा? तो टीकवून कसा ठेवावा? जेव्हा ठेच लागते, गोंधळलेलं वाटत असेल, तेव्हा तो विश्वास कसा निर्माण करावा? मी असं मानतो की आपल्या जीवनाची सार्थकता कशात आहे हे कळलं आणि तो जर नुसता भौतिक खेळ नसेल तर त्या सोबत विश्वास येतो. तो विश्वास आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायला भाग पाडतो – ‘या कर्तव्याशिवाय मला गत्यंतर काय? – If not this, then what else?’ आपल्याला या ठेचा खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण जितक्या ठेचा खाऊ तेवढेच एक पाऊल पुढे जात राहू. हाच विश्वास निर्माण होण्याचं दुसरं कारण असू शकतं प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल केलेल्या व्यक्तींच्या जीवन प्रवासाचं वाचन. ते प्रेरणादायी असतं. इथे गांधीजींच्या आयुष्यातील एका प्रसंगांचे उदाहरण घेता येईल. गांधीजींचे वडील मरण पावले होते व इतर भावंडे जास्त शिकले नव्हते. वकिली करून गांधीजीनी घरी सुख व समृद्धी आणावी म्हणून कर्ज काढून त्यांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं गेलं. शिकून भारतात परत आल्यावर मात्र गांधीजींना आपली वकिली चालत नसल्याचा अनुभव आला. १ – २ वर्षे प्रयत्न करून मग गांधीजी दक्षिण आफ्रिकेत एका वकिलाचे सहकारी म्हणून काम करू लागले. खरंतर, ब्रिटनमधील बॅरिस्टरची पदवी ही मोठी पदवी मानली जायची, अगदी आजच्या काळात IIT सारखी. पण पदवी असूनदेखील येत काही नाही हे लक्षात येताच गांधीजी आफ्रिकेत गेले. तिथे त्यांच्यावर एका मागे एक अपमानाचे प्रसंग कोसळले. Pietermaritzburg या ठिकाणी तर त्यांना ट्रेनमधून फेकून दिलं गेलं. अपमानित मनस्थितीत ते तिथेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्रभर कुडकुडत राहीले. ब्रिटनमध्ये त्यांनी असा भेदभाव पहिला नव्ह्ता. त्या क्षणी भारताचं तिकीट काढून घरी परत जावं असं वाटत असल्याचं त्यांनी आपल्या आत्मकथेत नमूद केलं आहे. ‘किती कठीण आहे अवस्था! इथे लोक अपमान करतात, वाईट वागतात! मी काय करू? पळून जाऊ का परत भारतात?’, असं मनात विचारांचं काहूर सुरु होतं. पण गांधीजी तिथेच थांबले. त्यांना तिथे स्वतःचे ध्येय सापडलं. स्वतःप्रमाणे इतर भारतीयांचाही जो अपमान होत आहे त्यासाठी न्याय मिळवण्याचा निश्चय त्यांनी केला.

मी स्वतः Pietermaritzburg येथे जाऊन आलो आहे. माझ्यासाठी ते एक तीर्थक्षेत्रच आहे. गांधीजींच्या जीवनातील त्या क्रांतिकारी दिवसाला जेव्हा १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रध्यक्ष होते. या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व ओळखून त्यांनी त्या रेल्वे स्थानकात गांधीजींचा पुतळा आणि एक वेटिंग रूम तयार करून घेतली. १९९६ साली त्या पुतळ्याचे अनावरण करताना मंडेला म्हणाले होते, “गांधी नावाचा बॅरिस्टर भारताने आम्हाला पाठवला आणि २० वर्षांनी आम्ही भारताला एक महात्मा परत पाठवला.” गांधीजींनी अविकसित देशांतील जनतेच्या हाती वसाहतवादाविरुद्ध लढण्यासाठी एक शस्त्र दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तो मोहनदास करमचंद गांधी नावाचा स्थित्यंतराचा क्षण आपल्याही जीवनात येतो. जेव्हा आपल्याला पाणी प्रश्न कठीण वाटतो, जेव्हा आरोग्य सेवा कशी द्यायची हे कळत नसते, जेव्हा एखादा ‘Governance Issue’ सोडवता येत नसतो, तेव्हा तो आपल्या जीवनातला ‘प्लॅटफॉर्म’ असतो. त्या क्षणी आपण काय निर्णय घेतो यावर आयुष्याची गाडी पुढे कुठे जाणार आहे हे ठरतं. सुदैवाने, मोठ्या संकटांतून जावं लागणाऱ्या अनेक व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचं उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर असतं. त्या उदाहरणांना भेट दिली पाहिजे. कठीण परिस्थतीत अनेकदा शैक्षणिक व्यवस्थेचा आसरादेखील घ्यावासा वाटतो. विद्यापीठांनी जणू विद्यार्थ्यांना प्रोग्रॅम करून ठेवलेलं असतं – When you face a problem come back to us for higher education. भीती वाटली की एखादं बाळ आईच्या कुशीत जात तसंच काहीसं असतं हे. पण एका टप्प्यानंतर आईकडे जाता येत नसतं. आपल्यासमोरील समस्या आपल्यालाच सोडवावी लागते. तो प्रश्न सोडवताना आपल्यातलं Unknown हे Unfold होत असतं. ते झाकण दूर होताना त्रास होतो. ‘माझ्यात काय क्षमता आहेत? मी काय करू शकतो?’ – या प्रश्नांना सामोरे जाताना त्रास होतो. पण ते झाकण जर आपण दूर करू शकलो तर त्या समस्येला भिडता-भिडता आपल्याला स्वतःचा साक्षात्कार होतो. साक्षात्कार म्हणजे काय? प्रत्यक्ष अनुभूती – ‘मी कोण आहे? कसा आहे? माझ्यात क्षमता काय आहे?’ इतरवेळी आपण केवळ अंदाज बांधत असतो. प्रत्यक्ष माहिती नसतं. सध्याची पिढी ‘सेल्फी’मध्ये अडकून पडली आहे. पण ‘सेल्फ’ काय आहे? ‘तू कोण आहेस?’असं विचारलं तर तरुणतरुणी गोंधळून जातात. ‘Self is like a Ray of Light – the ray is invisible when it passes but it becomes visible when it falls on an obstacle.' बस आपणही असेच आहोत. एका खोलीत बसून स्वतःच्या क्षमतांची, मर्यादांची जाणीव होत नसते. एखाद्या आव्हानाला धडक दिल्यावरच आपल्याला स्वतःच्या क्षमता, मर्यादा व आत्मविश्वासाची जाणीव होते. स्वतःचे सगळे भ्रम दूर होतात. 'स्व' ची ओळख होते. म्हणून ‘सेल्फ’ काय आहे हे समजून घेण्यासाठी सेल्फी घेऊ नका. थेट एखाद्या प्रश्नाला भिडा.



एक जन्म तुमचा आईच्या पोटात झाला. दुसरा जन्म तुमचा तुम्ही स्वतः करणार आहात. जेव्हा तुम्ही समस्येला भिडाल, तेव्हा तुमचा दुसरा जन्म होईल. तेव्हा तुम्हाला स्वतःचा साक्षात्कार होईल – Who  am I, What am I & Whose am I? या तीनही प्रश्नांची उत्तरे जेव्हा मिळतील, तेव्हा तुमचा दुसरा जन्म होईल. मग या दुसऱ्या जन्माचं बाळंतपण स्वतः करावं लागेल. स्वतःच स्वतःला जन्म द्यावा लागेल.

No comments:

Post a Comment