'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 24 December 2013

सीमोल्लंघन, डिसेंबर २०१३


तिमिरातुनी तेजाकडे ...!

सौजन्य: ऋतगंधा देशमुख, hrtdeshmukh@gmail.com

या अंकात...
ü ताज्या घडामोडी
ü नवी क्षितिजे
ü लिहिते व्हा...
अरुणाचल प्रदेश हे विकासाच्या दृष्टीने मागासलेले राज्य. तिथल्या मुलांशी विज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांच्या सहाय्याने पूल विकसित करणारा ज्ञान प्रबोधिनीचा हा प्रकल्प. टाकाऊ कचऱ्यापासून विविध खेळणी / मॉडेल्स बनवणे व त्यांच्या सहाय्याने वैज्ञानिक तत्त्वे शिकवणे असे या उपक्रमाचे स्वरूप. या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर अश्विनच्या मनात काय तरंग उमटले?
ü कविता
ü पुस्तक परिचय
सामाजिक काम म्हणजे फक्त 'charity' ह्या  संवेदनेला छेद देणारे एक पुस्तक म्हणजे रश्मी बन्सल ह्यांचे "I have a Dream". हजारो कोटींचा नफा कमवून त्यातून दोन चार कोटी सामाजिक संस्थांना दान देण्याऐंवजी सामाजिक काम करतानादेखील नफा कमावता येतो, किंवा नफा कमवताना देखील हजारो लाखो वंचित लोकांची खऱ्या अर्थाने उन्नती होऊ शकते. पुस्तकाचा परिचय करून देत आहेत सुनील काका...

निर्माणीच्या नजरेतून...

पुणे मनपाचा स्तुत्य उपक्रम... स्तनपानासाठी शिवाजीनगर बस स्थानकावर वेगळी खोली...
छायाचित्र: यशस्विनी पाटील, yashup2006@gmail.com

बाटली आडवी !

बिटरगाव बु. (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान मतदानाद्वारे हटविण्यात महिला यशस्वी झाल्या.
गेल्या दोन वर्षापूर्वीपासून मन्याळी गावात संतोष व जयश्रीने ठाणेदार देवकते यांच्या मदतीने दारू (हातभट्टी) बंदीची मोहीम सुरू केली. मन्याळी गावात हातभट्टीची दारू बंद झाली. याच पद्धतीने पोलीस स्टेशन बिटरगाव अंतर्गत येणाऱ्या ३२ गावांत हातभट्टीची दारू बंद केली गेली. परंतु शासनमान्य देशी दारूच्या दुकानातून काही लोक दारू पिऊन येत होते. हे थांबवणं मोठं आव्हान होतं. यासाठी देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. दारूच्या परिस्थितीबद्दल बोलताना संतोष म्हणाला, “बिटरगावातील दारूच्या दुकानावर आठ ते दहा खेड्यांतील दारू पिणारे लोक रांगा लावत होते. या गावातही पिणार्‍यांचं प्रमाण वाढलं. चौदा-पंधरा वर्षाची मुलंदेखील दारूच्या आहारी चालली होती.”
दारूबंदीसाठी मतदान करण्यास येणाऱ्या स्त्रिया
आजूबाजूच्या गावातील दारूबंदी झाली त्यामुळे बिटरगावात महिला कार्यकर्त्या, ठाणेदार व काही कार्यकर्त्यांनी दारू बंदीची चळवळ राबवण्याचा विचार व्यक्त केला. चळवळ उभी राहिली. आडव्या बाटलीसाठी मतदान घेण्यात आले व ९६% मतदानाने महिला विजयी झाल्या. यासाठी आमदार, तहसीलदार, ठाणेदार व बिटरगावातील महिला कार्यकर्त्यांसह, अ‍ॅटो चालक संघटना, ग्रामपंचायत आदीनी सहकार्य केले.

स्त्रोत – संतोष गवळे, sgawale05@gmail.com   

गडचिरोलीतील दुर्गम भागत स्वखुशीने आरोग्य सेवा देणाऱ्या तरुण डॉक्टरांचा गौरव

श्री सुरेश शेट्टी यांच्यासोबत विठ्ठल, विक्रम व रामानंद
वैद्यकीय अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर १ वर्ष सरकारी आरोग्य केंद्रांवर सेवा देणे अपेक्षित आहे. पण सहसा ही सेवा न देता, त्यातून काहीतरी पळवाट काढण्याचा अनेक विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो.
पण याच्या अगदी उलट असे काही डॉक्टर आहेत, जे स्वखुशीने अशा अतिदुर्गम गावांमध्ये सेवा देतात. अशा गडचिरोली मधील दुर्गम, नक्षलप्रभावित आदिवासी गावात स्वतःहून पोस्टिंग मागून काम केलेल्या ९ डॉक्टरांचा आरोग्य मंत्री श्री. सुरेश शेट्टी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. १८ डिसेंबर २०१३ रोजी नागपूर मध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी या तरुण डॉक्टरांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला गेला. कार्यक्रमाला आरोग्य सचिव, आरोग्य संचालक, अतिरिक्त आरोग्य संचालक, आणि ६ विभागांचे उप आरोग्य संचालक अशा वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सत्कार झालेल्यांमध्ये निर्माणच्या सचिन बारब्दे, विठ्ठल साळवे,  विक्रम सहाने, रामानंद जाधव, शिवप्रसाद थोरवे, स्वाती देशमुख, युगंधरा काटे, आरती बंग, आणि पवन मिल्खे यांचा समावेश होता. यावेळी या डॉक्टरांची मुलाखत घेवून त्यांना कामादरम्यान आलेले अनुभव, अडचणी जाणून घेण्यात आल्या. कार्याक्रमची सांगता सहभोजनाने झाली.
दुर्गम भागात असलेली वैद्यकीय सेवाची नितांत गरज आणि या कामात तरुण डॉक्टरांच्या योगदानाचे महत्व याची शासन दरबारी असलेली जाणीव या कार्यक्रमामुळे उधृत झाली. उत्तरोत्तर अशा डॉक्टरांची संख्या वाढून वैद्यकीय सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या प्रकीयेतील हे एक सक्रीय पाउल ठरावे अशी आशा करूया!


स्रोत : विक्रम सहाने,langs.vs@gmail.com

दंतेवाड्यातील SRI पद्धतीचा आगळावेगळा प्रयोग यशस्वी

Prime Minister’s Rural Development Fellow म्हणून छत्तीसगढ मधील दंतेवाडा प्रशासनासोबत कार्यरत असणाऱ्या आकाश बडवे (निर्माण ४) याने दंतेवाड्याच्या शेतकऱ्यांसोबत एक आगळावेगळा प्रयोग नुकताच पूर्ण केला. या प्रयोगाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी: दंतेवाड्यात सिंचनाची अनुपलब्धता, तसेच चराईबंदी नसल्यामुळे फक्त खरीप हंगामात पावसाच्या भरवशावर मुख्यतः भाताची शेती केली जाते. छिडकावा (broadcasting) किंवा रोपा (transplantation) पद्धतीने भात लावला जातो. मात्र या दोन्ही पद्धतींनी उत्पादन खूप कमी येते. यावर उपाय म्हणून खात्रीने उत्पादन वाढवणाऱ्या SRI (System of Rice Intensification) पद्धतीचा प्रयोग या खरीप हंगामात करण्यात आला.
या प्रयोगांतर्गत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना या पद्धतीने लागवड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी गावागावात शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीरे घेतली. ही पद्धती वापरण्यास प्रोत्साहन म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना तारांचे कुंपण देण्याची घोषणा करण्यात आली. या पद्धतीने लागवड करण्यास तयार २७० शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करण्यात आले. या शेतकऱ्यांनी हायब्रीड बियाणे न वापरता पारंपारिक बियाणे वापरावे, तसेच रासायनिक खते / कीडनाशके वापरू नयेत म्हणून प्रोत्साहन देण्यात आले. याचबरोबरीने जैविक खते / कीडनाशके कसे बनवावेत याचेही प्रशिक्षण देण्यात आले. या पद्धतीचा खूपच सकारात्मक परिणाम झाल्याचे निरीक्षण आकाश नोंदवतो. बहुतेक शेतांमध्ये दरवर्षीपेक्षा ५०%-१००% उत्पादन वाढल्याचे, तसेच छिडकावा पद्धतीच्या तुलनेत हे उत्पादन खूपच वाढल्याचे आकाश नमूद करतो. दंतेवाड्यातील बहुतेक शेतकरी स्वतःपुरते धान पिकवतात, मात्र ज्या शेतकऱ्यांना धान विकण्याची इच्छा आहे त्यांना बचत गटांमार्फत मार्केटिंगसाठी प्रशासन मदत करणार आहे. या उत्पादन वाढीचा दाखला देऊन येत्या खरीपमध्ये ही पद्धत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रशासन प्रयत्न करणार आहे. आकाश आणि त्याच्या टीमचे हार्दिक अभिनंदन !

स्त्रोत – आकाश बडवे, akashsbadave@gmail.com

Fan साठी लागणाऱ्या विजेची बचत करणारे पाउल !

मयूर सरोदेने (निर्माण ४) सुरू केलेल्या REnergize Eco-Planet कंपनीने Energy Efficient Ceiling Fan ची नाशिक जिल्ह्यासाठी Distributorship घेतली आहे. Versa Drive नावाच्या कंपनीने तामिळनाडू मध्ये Superfan नावाने या Fan ची Maufacturing Factory काही महिन्यांपूर्वी सुरु केली आहे. सध्या घराघरामध्ये जे Ceiling Fan वापरले जातात ते बहुतकरून ७५ W चे असतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जे काही 5 Star Energy Efficient Ceiling Fan बाजारात मिळतात ते सुद्धा ६० W किंवा ५० W चे असतात. परंतु महाग असल्यामुळे ते बहुतेक ऑफिसमध्ये किंवा Factory मध्ये असतात.

कंपनीच्या दाव्यानुसार Superfan हे केवळ ३५ W एवढी उर्जा वापरून इतर नामांकित Fan एवढीच Air Delivery देतात. या Fans चं Packing Material सुध्दा Recycle केलं जाऊ शकतं. यामध्ये Plastic किंवा Thermocole चा वापर केलेला नाही. Inveter वर जेव्हा हे Fan वापरले जातात तेव्हा यामधून आवाज येत नाही. हे Fan बनवतांना BLDC (Brushless DC) Motor वापरलेली असल्यामुळे हे Highly Energy Efficient असे आहेत. शिवाय या Made in India Superfan चा Power Factor ०.९ असल्यामुळे सोलर प्रणाली मध्ये हे खुपच चांगल्या पद्धतीने वापरले जाऊ शकतात.

सध्या चालू असलेल्या गावागावामध्ये सोलर लाईट पुरवण्याबरोबरच सोलर वर चालणारा Fan सुध्दा पुरवण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे पारंपारिक Fan ला पर्याय म्हणून हा Fan वापरल्यास विजेची भरपूर प्रमाणात बचत होते.


स्त्रोत- मयुर सरोदे, mayursarode17@gmail.com


सामाजिक फेसबुक !

डॉ. प्रियदर्श तुरे व सहकाऱ्यांनी मिळून ‘investment in humans’ (i2h) ही संस्था सुरू केल्याचे आपण जाणतोच. या संस्थेचे वेब पोर्टल आकार घेत आहे. आपला वेळ, पैसा किंवा कौशल्ये समाजाच्या उपयोगी यावीत अशी तळमळ अनेकांना वाटत असते. मात्र हे कसे करता येईल हे काही कळत नाही. याउलट अनेक सामाजिक कामे करणारे गट व NGOs यांना स्वयंसेवक, काही कौशल्ये तसेच आर्थिक मदतीची गरज असते. या दोघांना थेट सामोरासमोर आणण्याचे i2hworld.com हे पोर्टल करणार आहे.
फेसबुकप्रमाणेच या पोर्टलवरदेखील प्रत्येक व्यक्ती / संस्थेला आपले प्रोफाईल उघडता येणार आहे. आपल्या आवडीचे कार्यक्षेत्र / भौगोलिक ठिकाण टाईप केल्यानंतर त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची यादी दिसणार आहे. स्वयंसेवकांना व देणगीदारांना एका क्लिकवर तशी गरज असणाऱ्या संस्थांची यादी दिसणार आहे. तर संस्थांनादेखील आपल्या उपक्रमांबद्दल घोषणा करून स्वयंसेवकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करता येणार आहे.
येत्या डिसेंबरमध्ये या पोर्टलचे टेस्टिंग होणार असून यादरम्यान १०० हून अधिक संस्था व १००० हून अधिक युझर्स यांच्यासोबत हे टेस्टिंग करण्याचा प्रियदर्श व सहकाऱ्यांचा विचार आहे. आवश्यक सुधारणा केल्यानंतर हे पोर्टल जानेवारी मध्ये सुरू होईल. याआधी तुम्हाला उत्तम सामाजिक काम करणारे गट / संस्था माहित असल्यास त्याबद्दलची माहिती http://i2hworld.org/wp-content/uploads/2013/12/i2h-NGO-Subscription-Form-final.pdf या फॉर्मद्वारे भरून पाठवण्याचे आवाहन प्रियदर्शने केले आहे.


स्त्रोत- डॉ. प्रियदर्श तुरे, gracilis4@gmail.com

निर्माणीच्या नजरेतून...

अभ्यासाची खोली माझी!!!

छायाचित्र: डॉ. स्मिता तोडकर, smt.todkar@gmail.com 

पुस्तक परिचय

I have a dream – Rashmi Bansal

सामाजिक काम म्हणजे फक्त 'charity' ह्या  संवेदनेला छेद देणारे एक पुस्तक म्हणजे रश्मी बन्सल ह्यांचे "I have a Dream". रश्मी बन्सल ह्यांची चार पुस्तके खूपच प्रसिद्ध झाल. त्याव्यतिरिक्त त्या एका युवा मासिकाच्या संपादिका आहेत, youth curry नावाचा एक blog चालवतात आणि नामांकित कंपन्यांच्या त्या सल्लागारही आहेत. युवा पिढीच्या प्रश्नांवर त्यांनी खूप संशोधन केले आहे अनेक माध्यमातून त्यांनी हे प्रश्न समाजापुढे मांडले आहेत.

ह्या पुस्तकात रश्मी बन्सल ह्यांनी २० व्यक्ती अधोरेखित  केल्या आहेत, ज्यांनी नफा कमावणारे व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपली आहे. ह्या सर्वांनी जणू जगाला हे दाखवून दिले आहे की हजारो कोटींचा नफा कमवून त्यातून दोन चार कोटी सामाजिक संस्थांना दान देण्याऐंवजी सामाजिक काम करताना देखील तुम्ही नफा कमवू शकता, किंवा नफा कमवताना देखील हजारो लाखो वंचित समाजातील लोकांची खऱ्या अर्थाने उन्नती करू शकता.

रस्त्यावर कचरा गोळा करणाऱ्या मुलांना घेऊन (आणि त्यावर सतत तीन वर्ष संशोधन करून) श्री सौ अहुजा ह्यांनी  प्लास्टिकच्या fashionable वस्तू बनविण्याचा कारखाना उभा केला, जिथे आज ७०० हून अधिक ह्यापूर्वी कचरा उचलून जेमतेम पोट भरणारे लोक काम करतात. त्यांचे आयुष्यमान संपूर्णपणे बदलून गेले आहे.

IIM अहमदाबाद मधून पास झाल्यावर अनेक मोठ्या MNC च्या नोकऱ्या नाकारणारा २५ वर्षाचा तरुण ध्रुव लाक्रा. काही तरी वेगळे करायचे आहे, पण काय ते कळत नाही शा संभ्रमावस्थेत असताना दारी एक मुलगा courier घेऊन येतो आणि एकही शब्द बोलता सही घेऊन निघून जातो. त्या रोज आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेत ध्रुवला काही तरी वेगळे करण्याचा मार्ग सापडला. त्याने Mirakle नावाची एक courier company उभी केली ज्यात आज ४०० मुकबधीर मुले मुली काम करत आहेत. जगातील सर्वात शांत ऑफिस असे तो गमतीने गर्वाने आपल्या ऑफिसचे वर्णन करतो.

अशा २० व्यक्ती, त्याचं आयुष्य बदलून टाकणारे प्रसंग किंवा आयुष्याची दिशा दाखवून देणाऱ्या घटनांनी भरलेले प्रवास वर्णन लेखिकेने आपल्या समोर मांडले आहे.

लेखिकेने पुस्तकाचे विभाजन तीन प्रमुख भागात केले आहे.

            Rainmakers  - ह्या भागात अशा सर्व लोकांचा उल्लेख आहे की ज्यांनी समाजाची उन्नती करता करता एकयशस्वीव्यवसाय उभा केला. त्यात उल्लेखनीय आहेत श्री बिंदेश्वर पाठक ज्यांनी मैला वाहून नेणाऱ्याना त्यातून मुक्त करण्याच्या उद्दिष्टाने सुलभ शौचालये सुरू करून गावोगावी संडास बांधून दिले. आज ती संस्था Sulabh International नावाने जगभर व्यवसाय करत आहेआसाममध्ये सरकारी नोकरीत रुजू असताना ULFA  दहशतवाद्यांनी श्री घोष ह्यांचा खून केला. स्वत:चे अश्रू पुसत श्रीमती घोष ह्यांनी रंगसूत्र नामक व्यवसाय उभा करून गावातील इतर विधवा महिलांना स्वत:च्या पायावर उभे रहायला एक साधन निर्माण केले

Changemakers - ह्या सर्व लोकांनी आपल्या स्वप्नाच्या दिशेने जवळ जवळ अंधारातच पहिले पाऊल पुढे टाकले आणि बघता बघता त्यातून एक क्रांती घडली. श्री माधव चव्हाण ह्यांच्या, “देशातील प्रत्येक  मुलास शिक्षण मिळालेच पाहिजेह्या प्रेरणेतून उभी राहिली प्रथम. श्री अंशू गुप्ता ह्यांनी ठरविले की देशातील गरीबात गरीब व्यक्तीकडेही अंग झाकायला कपडे हवेतच आणि त्यातून उभी राहिली गुंज.

Spiritual Capitalists - एखाद्या दैवी शक्तीने प्रेरित होऊन समाजासाठी काही तरी करून दाखवणारे व्यवसाय ह्या भागात चर्चिले आहेत. मधु दासा हा IIT चा विधार्थी नुकताच खूप निराश होऊन स्वित्झर्लंडहून भारतात परतला होता. निराशेच्या गर्द छायेत आत्महत्येच्या जवळ पोहोचलेल्या ह्या तरुणाने श्रीकृष्णाला साद घातली व त्यास झालेल्या दृष्टान्तातून उभी राहिली जगातील सर्वात मोठी mid day meal पुरवणारी संस्था - अक्षय पात्र. ही संस्था रोज दुपारी लाखो लोकांना सुग्रास व सकस आहार पोहोचवते. परिवार आश्रमाचे विनय लोखानी किंवा बेलूर मठाचे श्रीश जाधव ह्यांनाही असाच कुठला तरी दृष्टांत घडला व त्यातून उभ्या राहिल्या अशा काही संस्था की जिथे देवाची भक्ती समाज सेवेतून साकार होत आहे

ह्या पुस्तक रूपाने रश्मी बन्सल यांनी हळुवारपणे आपल्या समोर मांडल्या आहेत कुठल्यातरी अज्ञात वेडाने पछाडलेल्या २० व्यक्ती, त्यांच्या व्यवसायांची जडणघडण, त्यामागची विचारसरणी तळमळ आणि ते व्यवसाय उभे करण्याकरिता त्यांनी केलेली धडपडह्या वीसही लोकांनी स्वप्ने पाहिली, त्यातच ते जगले, गरज असेल तेंव्हा संशोधन केले आणि समाजातील अनेक प्रश्नांना छेदून जातील असे व्यवसाय उभे केले.

समाजसेवेचा विडा उचलेल्या प्रत्येक निर्माणीने हे पुस्तक जरूर वाचावे नफा कमविणे हा काही गुन्हा नाही आणि ते करतानाही सामाजिक गरजांचे भान आपल्याला कसे जोपासता येते हेच ह्यातून शिकावे.

सुनील चव्हाण, sunil3924@gmail.com