'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Wednesday, 13 February 2013
वटवृक्षाच्या सावलीत...
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि
सर्वोदयी व रचनात्मक कार्याला वाहून घेतलेले निष्ठावान अर्थतज्ञ प्रा. ठाकूरदास
बंग (पिताजी) यांचे २७ जानेवारी, २०१३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. पिताजी ९५
वर्षांचे होते.
गरीब वडिलांच्या संसारासाठी
सुवर्णपदके विकून टाकणारे पिताजी, आय.सी.एस. वा बॅरिस्टर होण्याची योग्यता व संधी
असताना राष्ट्रीय विचारांच्या कॉलेजात प्राध्यापकी करणारे पिताजी, बेचाळीसच्या भारावलेल्या
वातावरणात ‘करो या मरो’च्या हाकेला साद देऊन आंदोलनात सहभागी होणारे पिताजी,
आंदोलनात २ वर्षे आनंदाने सक्तमजुरी भोगणारे पिताजी, तुरुंगातून सुटून आल्यानंतर
गांधीजींचे “अर्थशास्त्र सीखना है तो अमरिका के बजाय भारत के देहातों में जाओ”
एवढे एक वाक्य ऐकून ओहायो विद्यापीठातील प्रवेश नाकारून वर्ध्याजवळच्या बरबडी व
नंतर महाकाळ या खेड्यात राहणारे पिताजी, ग्रामीण अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी रोज
शेतीत राबून त्यानंतर वर्ध्याच्या कॉलेजात अर्थशास्त्र शिकवणारे पिताजी, त्रेपन्न
साली विनोबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्राध्यापकी सोडणारे व त्यानंतर भूदानयज्ञ
व सर्वोदय कार्यासाठी ‘जीवनदान’ देणारे पिताजी, भूदान यज्ञाच्या निमित्ताने उभा
भारत चालत व रेल्वेच्या तृतीय श्रेणी डब्यातून पालथा घालणारे पिताजी, बिहार आंदोलन
व संपूर्ण क्रांती आंदोलनात जे.पीं.चा डावा हात असणारे पिताजी, आणीबाणीच्या काळात
आपल्याच देशात पुन्हा तुरुंगवास भोगणारे पिताजी, गुलामीच्या काळात गांधीजींच्या
फोटोला फ्रेम करून केवळ सहा आण्यात लग्न करणारे पिताजी, तीन कपड्यांचे जोड व चरखा
एवढी ज्यांची संपत्ती, ज्यांच्या नावावर ना घर ना जमीन, स्वातंत्र्य सैनिकाचा
ताम्रपटही ज्यांनी स्वीकारला नाही, पुरस्कारांची सर्व रक्कम ज्यांनी सामाजिक
संस्थांना दिली असे पिताजी आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या संस्कारांचा वटवृक्ष
आपल्याला शांतपणे सावली देत आहे. या वटवृक्षाच्या पारंब्या होण्याचे भाग्य
आपल्याला लाभले आहे. आपली मुळे जमिनीत खोल रुजवून घेऊया!
वटवृक्ष वाढतो आहे: निर्माण-५ चे पहिले शिबीर संपन्न
निर्माण-५ शिबीरमालिकेतील युवांचे पहिले शिबीर २९ डिसेंबर
ते ६ जानेवारीदरम्यान यशस्वीरित्या पार पडले. प्रायोगिक तत्वावर या वेळी शिबीरे
दोन गटांमध्ये घेण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या गटाच्या या पहिल्या शिबिरात महाराष्ट्राच्या
विविध जिल्ह्यांतून ५९ अवैद्यकीय तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
‘तारुण्यभान ते समाजभान आणि समाजभान ते सृष्टीभान’ या सूत्राला
मध्यवर्ती ठेवून शिबीर झाले. शिबिरात डॉ. राणी बंग (अम्मा), ज्ञानेश्वरभाऊ व
राजेंद्रभाऊ यांनी शारीरिक, मानसिक व सामाजिक पातळीवरील तारुण्यभान हा विषय घेतला.
व्यंकटेश अय्यर व अतुल गायकवाड यांनी ‘स्व’ची मानसिक व वैचारिक पातळीवर ओळख होण्यासाठी
काही स्वाध्याय घेतले.
डॉ. अभय बंग
(नायना) यांनी सध्या जगभर होत असणारे विविध उठाव व त्याद्वारे होणारे सत्ता किंवा
सामजिक परिवर्तन याबद्दल मांडणी केली. दिल्लीमध्ये बलात्काराच्या निषेधात
तरुण-तरुणी रस्त्यावर आल्या, देशभरात मेणबत्ती घेऊन अनेकजण रस्त्यावर उतरले; याने
नेमक परिवर्तन होते का? काय होते? यावर स्वाध्यायाच्या मदतीने मार्गदर्शन करण्यात
आले. समाजाची ओळख होण्यासाठी व स्व-विकासासाठी वाचन हे प्रभावी माध्यम आहे.
म्हणून श्री. नंदा खरे यांनी वाचन काय
करावे? का करावे? या विषयाला धरुन सत्र घेतले. त्यात त्यांनी अनेक पुस्तकांची
सारांश माहिती व वाचन सुरू करण्यासाठी
पुस्तकांची यादीदेखील दिली आहे.
निर्माणच्या शिबीरांतून समाजाप्रती जबाबदारी व त्यासाठी
काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. पण ‘हे कसे करणार?’ याला एक प्रमाणित तयार
उत्तर नसते. या शोधास सगुण रुप देण्यासाठी काही जणांनी आपला प्रवास कथन केला. त्यामध्ये
नायनांचे ‘सेवाग्राम ते शोधग्राम’ हे सत्र होते. त्याच बरोबर शरद अष्टेकर, गौरी
चौधरी व सुजय काकरमठ यांनी देखील आपला प्रवास सर्वांसमोर मांडला.
निर्माणचे शिबीर शोधग्राम मध्ये होतात. सर्चच्या कामाबद्दल
तुषारभाऊंनी सत्र घेतले. याद्वारे एखादी सामजिक संस्था सेवा, संशोधन व संघर्ष हे सूत्र
हाती घेऊन कसे कार्य करू शकते याची ओळख सर्वांना झाली.
शिबिरात पर्यावरणाच्या प्रश्नावर विशेष विचार झाला. An Inconvenient Truth व Story of Stuff या फिल्म्स व वेंकीची ‘जाहिरातींना
बळी पडून अनावश्यक वस्तूंचा वापर’ या विषयावर मांडणी याआधारे पर्यावरणाला पूरक असे
अनेक संकल्प शिबिरार्थ्यांनी आपल्या नियोजनात केले. चर्चेच्या पलीकडे जाऊन आपण प्रत्यक्ष काय करु शकतो- याचे
सर्वांनी व्यक्तिगत, गट व सामजिक पातळीवर नियोजन सादरीकरण केले. ‘हम होंगे कामयाब’
गुणगुणत या शिबिराची समाप्ती व प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली.
गडचिरोलीसाठी बनत आहे Science and Technology Resource Center
विचार विनिमयासाठी आयोजित करण्यात
आलेल्या कार्यशाळेत निर्माणींचा सहभाग
गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली),
राजीव गांधी सायन्स अँड टेक्नोलॉजी कमिशन(महाराष्ट्र शासन), आय.आय.टी. पवई व
वनविभाग (गडचिरोली) यांच्या वतीने १८-१९ जानेवारी रोजी गोंडवाना विद्यापीठात २
दिवसांची कार्यशाळा पार पडली. गडचिरोली जिल्ह्यासाठी Science and Technology Resource
Center नव्याने बनणार असून विविध वनौपज वापरून अर्थार्जनाच्या पद्धती विकसित करणे व
त्याचे गडचिरोली-चंद्रपूरच्या युवांना प्रशिक्षण देणे असे या केंद्राचे उद्दिष्ट
असणार आहे. या केंद्राचे स्वरूप कसे असावे याबद्दल कार्यशाळेत विचार विनिमय
करण्यात आला. राजीव गांधी सायन्स अँड टेक्नोलॉजी कमिशनचे संचालक डॉ. अनिल काकोडकर,
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आईंचवार, गडचिरोलीचे प्रमुख वनसंरक्षक श्री.
रेड्डी, आय.आय.टी. पवईचे प्रा. मिलिंद सोहनी व प्रा. ए. जी. राव, आय.आय.टी.
दिल्लीचे प्रा. रवी, Visvesvaraya National Institute of Technology चे प्रा. दिलीप पेशवे, भाभा परमाणु अनुसंधान केंद्राच्या
तंत्रज्ञान हस्तांतरण शाखेच्या सौ. स्मिता मुळे व श्री. अजित पाटणकर यांच्यासोबतच
गडचिरोलीतील स्वयंसेवी संस्था ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ चे डॉ. सतीश गोगुलवार व
सर्चचे डॉ. अभय बंग (नायना) इ. मान्यवरांनी कार्यशाळेत आपले विचार मांडले. या
कार्यशाळेसाठी निर्माणी अमृत बंग, अश्विन पावडे, मयूर सरोदे व निखिल जोशी
यांच्यासोबतच निर्माणचे मार्गदर्शक श्री. सुनील चव्हाण उपस्थित राहिले.
या केंद्राला अजून
कोणतेही मूर्त स्वरूप नाही. या केंद्रातील संशोधन/कृती कार्यक्रम लोकांच्या गरजा
केंद्रस्थानी ठेवून पुढे नेण्यासाठी निर्माणींना कसे योगदान देता येईल यादृष्टीने
कार्यशाळेच्या निमित्ताने विचार सुरू झाला आहे.
Micro व Macro मधील दुवा साधण्यासाठी डॉ. आनंद बंग गडचिरोलीतून दिल्लीत
गेली ७ वर्षे ‘सर्च’मध्ये माता-बाल आरोग्य, पाठकंबरदुखी अशा विविध विषयांवरील
संशोधन, वैद्यकीय
सेवा, स्थानिक
विकासाची कामे व Living university इ. जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर निर्माण १ चा डॉ. आनंद बंग दिल्ली येथे भारत
सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे अंशतः नियंत्रण असणाऱ्या National Health Systems Resource
Center (NHSRC) या संस्थेत दीड वर्षांसाठी रुजू झाला आहे.
NHSRC च्या माध्यमातून आनंद राज्यांतील
आरोग्यव्यवस्था सुधारण्यास त्यांना मदत करेल, विशेषतः
महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ-गोवा या ४ राज्यांना आरोग्याचे वार्षिक नियोजन
बनवण्यास व त्याचे मूल्यमापन करण्यात तो मदत करेल. भारत सरकारचे आरोग्य धोरण
बनवण्यास व त्यासाठी आवश्यक संशोधनाचे नियोजन करण्यात तो मदत करेल, विशेषतः माता बाल आरोग्यासंदर्भात
राष्ट्रीय धोरणे बनवण्यात त्याचा सहभाग असेल. प्रत्येक भारतीय नागरिकाला बहुतेक
प्रकारच्या आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत पुरवण्याच्या भारत सरकारच्या धोरणाचा (जे
घडवण्यात डॉ. अभय बंग व अन्य सहकाऱ्यांचा मोठी वाटा आहे) पथदर्शी प्रयोग आखण्यात
व राबवण्यात त्याचा सहभाग असेल.
या कामासाठी गडाचिरोलीत micro पातळीवर ७ वर्षे केलेल्या कामाचा
त्याला नक्कीच फायदा होईल. NHSRC च्या निमित्ताने micro व macro यामध्ये दुवा कसा साधावा यासंदर्भात त्याचे व त्याच्या
माध्यमातून निर्माणींचे नक्कीच शिक्षण होईल. त्याच्या या प्रवासासाठी त्याला
निर्माणतर्फे शुभेच्छा!
समीक्षा फराकातेचे ‘चैतन्य’सोबत काम सुरू
नमस्कार. मी निर्माण ४ची समीक्षा. पुणे विद्यापीठात एम.ए.
करते. मी ‘चैतन्य’ नावाच्या संस्थेसोबत काम करायचे ठरवले आहे (ज्याबद्दल अमृतने
मला सुचविले होते). मी त्यांच्या ‘बटवा’ या पत्रिकेचे या महिन्यासाठी संपादन केले
आणि त्यांच्या कामात inputs देण्याच्या
दृष्टीने दोन विषयावर वाचते आहे: गरिबी कशी मोजली जाते, त्यासंबंधीचे विविध
दृष्टीकोन आणि दिल्ली रेप केसमुळे उठलेल्या वादळानंतर ‘बलात्कार’ या घटनेकडे कसे
बघितले जाते. मला ‘चैतन्य’सोबत (किंवा सध्या कोणाही सोबत) अशांच पातळ्यांवर काम
करता येईल. या निमित्ताने मायक्रोफायनान्स म्हणजे काय असते हे कळाले. सुधा
कोठारींची त्यांच्या कामातील कार्यक्षमता हा अर्थात एक शिकविणारा अनुभव आहे.
‘चैतन्य’बद्दल अधिक
माहितीसाठी: https://sites.google.com/a/chaitanyaindia.org/website/
निर्माण ५ च्या युवांची मुक्तांगणला भेट
२६ जानेवारीला, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ‘मुक्तांगण’ ला भेट देण्याचा योग आला. इथे
औचित्याचे काही विशेष दिवस आहेत. उदा. १० फेब्रुवारी हा स्व. अनिता अवचटांचा
स्मृतिदिन, १० मार्च
सहचारी दिन, २६ जून Anti Narcotics Day इ. बुधवारी व्यक्तीस उपचारासाठी
दाखल केले जाते, त्यानंतर ५
आठवड्यांनी सोमवारी त्यास डिस्चार्ज मिळतो. डिस्चार्ज च्या आधीच्या शनिवारी
व्यक्तीचा वाढदिवस साजरा केला जातो आणि त्यास मेडल दिले जाते. व्यसनमुक्तीचा
संकल्प केल्यामुळे त्या व्यक्तीचा नवीन जन्म झाला आहे अशी भूमिका त्यामागे आहे.
या २६ जानेवारीला शनिवार होता आणि
आम्ही ‘वाढदिवसाला’ उपस्थित होतो. व्यसनमुक्त झालेले ‘मित्र’ खुर्चीवर बसलेले होते. २१ ते ६५
वयोगटातील या व्यक्तींपैकी कोणी व्यसन मुक्तीची २१ वर्ष साजरे करत होते, कोणी २०, कोणी १५, कोणी १२, कोणी पहिले वर्ष साजरे करत होते.
समोर येऊन भाषण करत होते, मेडल घेत होते, खाली बसलेल्या त्यांच्या ‘मित्रांना’ प्रेरणा देत होते. प्रत्येक
व्यक्तीच्या पत्नीला आणि इतर कुटुंबियांना सुद्धा मनोगत व्यक्त करायला बोलावले
गेले. बहुतांश स्त्रिया काही बोलू शकल्या नाहीत. त्यांना अश्रू अनावर झाले. पण
त्या अश्रूंतून दिसला तो आपल्या पतीविषयीचा अभिमान, आदर आणि मुक्तांगणप्रती
कृतज्ञभाव...!
स्त्रियांमधील वाढती व्यसनाधीनता
आणि उपचाराची गरज लक्षात घेऊन ‘निशिगंध’ नावाचे फक्त
स्त्रियांचे, स्त्रियांनी, स्त्रियांसाठी चालवले जाणारे
स्वतंत्र केंद्र मुक्तांगण ने ४ वर्षापूर्वी सुरु केले आहे. (फारसे आश्वासक आणि
भूषणावह नसले तरी त्यास उदंड प्रतिसाद मिळतो आहे हे जाणवले.)
आपली संवेदनशीलता जपून, तत्वांवर निष्ठा ठेवून, वैयक्तिक कौशल्याच्या जोरावर आणि
निरपेक्ष वृत्तीने प्रयत्न केल्यास किती रचनात्मक कार्य करता येते याचा आदर्श ‘मुक्तांगण’ ने निर्माण केला आहे असे म्हटल्यास
वावगे ठरणार नाही.
‘मुक्तांगण’बद्दल अधिक
माहितीसाठी भेट द्या: http://www.muktangan.org/
तिनका तिनका जर्रा जर्रा
प्रत्येक नवे तंत्रज्ञान माणसाच्या
विस्तारासारखे असते. त्या तंत्रज्ञानाचा वापर सवयीचा झाला की ते तंत्रज्ञान
माणसाला, त्याच्या
शरीरक्रियांना, त्याच्या
विस्ताराला बदलू लगते. हे सतत होत राहते.
मग माणूस ते तंत्रज्ञान बदलू
लागतो. मधमाश्या जशा वनस्पतींच्या प्रजनन-इन्द्रियान्चे काम करतात, तसा माणूस तंत्रज्ञान बदलत
यंत्रांचे प्रजनन-इंद्रिय बनतो. तो यंत्रांची प्रजा (संख्या) वाढवू लागतो.
त्यांच्यात बदल करून त्यांना उत्क्रांत करू लागतो.
यंत्रेही त्यांच्या बाजूने
माणसांच्या इच्छा-अपेक्षा पूर्ण करून देतात. माणसांना श्रीमंत करतात.
Marshall McLuhan हा गेल्या शतकातला सर्वांत
प्रसिद्ध माध्यमशास्त्राचा तत्वज्ञ. त्याच्या Understanding Media या पुस्तकातील The Gadget Lover या निबंधातला हा उतारा.
आता तुम्हाला एक काम सुचवतो; तुम्ही मोबाईल फोन तंत्रज्ञानाबाबत
वरच्या उताऱ्यातले म्हणणे तपासून दाखवायचे!
Tuesday, 12 February 2013
दारूविरुद्ध काय परिणामकारक ठरते?
मित्रांनो, चंद्रपूरमधील दारूबंदीची चळवळ सध्या
जोमाने सुरू आहे. आपल्यातले अनेक निर्माणी यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी
आहेत. यात आपले सामाजिक कृतीचे शिक्षण होते आहे. सोबतच याला अभ्यासाची जोडही
देऊया.
दारूचे
प्रमाण, त्याचे
व्यक्तीवरील व समाजावरील दुष्परीणाम व दारूने होणारी हानी कमी करण्यासाठी कोणकोणती
धोरणे व कृती उपयोगी व परिणामकारक ठरतात याचा आढावा घेणारा निबंध लॅन्सेट या
जर्नलमधे प्रकाशित झाला होता. यातील अभ्यास व पुरावे मुख्यत: सधन (High income) देशांमधील आहेत व या निबंधात तेथील सर्व अनुभवांचा परिपाक मांडला आहे. काही
पॉलिसींचा अभ्यास गरीब (Low income) देशांमधेसुद्धा केला गेला आहे. भारतासारख्या सांस्कृतिक विविधता असलेल्या व
विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थिती असलेल्या देशात दारूचा प्रश्न सोडवण्यासाठी
पाश्चात्य देशांतील अनुभव व कृती किती व कशा उपयोगी ठरू शकतील याबद्दल जरूर विचार
करायला हवा, त्यादृष्टीने या निबंधाचा अभ्यास उपयोगी
ठरेल.
या निबंधाच्या सारांशाची मांडणी या लेखात
केलेली आहे. ज्या वाचकांना या विषयात अधिक
रस वाटतो ते हा निबंध वाचून आरोग्य व किंमतीच्या दृष्टीने विविध उपायांच्या
परिणामकारकतेविषयी तपशीलवार आकडेवारी समजून घेऊ शकतात. हा निबंध पुढील
संकेतस्थळावर मिळू शकतो: http://www.who.int/choice/publications/p_2009_CE_Alcohol_Lancet.pdf
या
निबंधात नीती व कृतीची परिणामकारकता आठ वेगवेगळ्या विभागांमधे तपासली आहे.
१.
माहिती
व आरोग्यशिक्षण:
जनमानसांतील ज्ञान
वाढविण्यासाठी, दारूप्रश्न व त्याचे अपायांबद्दलची माहिती पसरविण्यासाठी
अशा कृती उपयोगी ठरतात, परंतु दारूचा वापर व दुष्परीणाम कमी करण्यास त्या हातभार
लावत नाहीत असा निष्कर्ष अनेक अभ्यासात निघाला आहे. दारूच्या बाटल्यांवर
आरोग्यविषयक गंभीर सूचना देणारी विधाने दारू पिण्याचे प्रमाण कमी करण्यास मदतशीर
ठरत नाहीत असेही अभ्यास दर्शवितात.
२.
आरोग्यसेवा
क्षेत्र:
दारूच्या
दुष्परिणांमांविषयी रुग्णाला सल्ला देणे हा सहसा दुर्लक्षिला गेलेला पण अतिशय
परीणामकारक उपचाराचा उपाय आहे. दारूवर पूर्णपणे अवलंबित्व (Dependence) आले नाही पण हानिकारक पातळीचे दारू सेवन करतात अशा लोकांना थोडक्यात सल्ला
देणे खूप उपयोगी ठरते.
३.
सामाजिक
पातळीवरील कृती:
यामध्ये माहिती
प्रसाराच्या साधनांचा वापर, दारू दुकानांच्या वेळेवरील बंधने, सामाजिक
ठिकांणावरील दारूबंदी, कायद्यांची अंमलबजावणी, दारूविरोधी
जाहिरात मोहिमा, सामाजिक संस्थांच्या कृती इत्यादी कार्यक्रमांचा समावेश
केलेला आहे. माहिती प्रसार साधनांचा वापर करून दारूविरोधी माहिती व ज्ञान
पसरविणाच्या मार्गाने विविध स्तरांतून दारूविरोधी वातावरण निर्मिती करून राजकीय व
सामाजिक पाठिंबा मिळवणे व त्याद्वारे राजकीय अजेंडामधे दारूविरोधी कृतीला स्थान
मिळविण्याची पद्धत उपयुक्त ठरते.
४.
दारू
पिउन वाहन चालवण्याविरुद्ध नीती:
दारू पिण्यामुळे
व्यक्तीचे स्वत:वरील नियंत्रण जाऊन अपघात घडण्याची शक्यता वाढते. रस्त्यावरील
दारूच्या दुकानांची संख्या कमी करणे, दारूची किंमत वाढविणे, दारू
अधिकृतरित्या विकत घेण्याचे वय वाढविणे यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी
होते. अर्थातच, यासाठी राजकीय पाठबळ महत्वाचे ठरते. चालकांच्या रक्तातील
दारूचे हानिकारक पातळीचे कमाल प्रमाण ठरविणे व रस्त्यांवर नियमित तपासणी करणे
यामुळे अपघातांचे प्रमाण व जिवित हानी कमी होते.
५.
दारूची
उपलब्धता कमी करणे:
अनेक देशांमधे, ज्यांत
मुख्यत्वेकरून मुस्लीम लोकसंख्या आहे, दारूबंदी आहे. याशिवाय
दारू विकत घेण्याचे वय व पिण्याचे वय वाढविणे, सोबतच
या कायद्याची अंमलबजावणी होणे उपयुक्त ठरते. एखाद्या भागात जास्त प्रामाणात दारूची
दुकाने असतील तर त्या भागातील तरूणांमधे दारू पिण्याचे प्रमाण अधिक असते असे
संशोधन आहे. त्यामुळे तेथे खून, मारामारी, स्त्रियांचे विनयभंग, गाड्यांचे
अपघात यांचेही प्रमाण वाढलेले दिसते. या धर्तीवर दारूची दुकाने उघडी असण्याची वेळ
कमी केल्याने सामाजिक हानी कमी होते.
६.
जाहिरातीमार्फत
दारूचा प्रचारावर निर्बंध:
दारूची जाहिरात
करण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रे वापरण्य़ात येतात. ही तंत्रे नकळतपणे आपल्या मनात
दारू वाईट नाही हा विचार रुजवून जातात. यासाठी दारूला खेळांशी व सांस्कृतिक
कार्यक्रमांशी जोडले जाते. दारूच्या कंपन्या खेळांना, सांस्कृतिक
कार्यक्रमांना पैसा पुरवितात व आपली जाहिरात करून घेतात. अशी जाहिरात केल्याने
तरूणांमधे दारू लवकर पिणे सुरू होते व दारू पिण्याचे प्रमाण वाढते. यामुळे दारूची
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरात करणे याबाबत कठोर कायदे व त्यांची अंमलबजावणी
महत्वाची ठरते.
७.
कराच्या
स्वरूपात दारूची किंमत वाढवणे:
बाजारातील वस्तूंची
किंमत वाढविल्यावर त्या वस्तूचा वापर कमी होतो, त्याप्रमाणेच
दारूची किंमत वाढविल्यावर दारूचा वापर कमी होतो. दारूवरील कर वाढविणे त्यामुळे
परिणामकारक ठरते. दारूची किंमत वाढविल्यामुळे दारू पिणारे स्वस्त दारूकडे वळतात
असे दिसून येते. किंमत वाढविणे समाजासाठी लांब पल्ल्याच्या दृष्टीने खूप उपयोगी
ठरते, असे संशोधन सांगते.
८.
बेकायदेशीर
दारूविरुद्ध नीती:
बेकायदेशीर दारू, तस्करी
केलेली दारू, हातभट्टीची दारू, काही विशिष्ट रसायनांचा
दारूप्रमाणे वापर (उदा. स्पिरीट) यामधे सहसा मिथेनॉलचे प्रमाण भरपूर असते. यामुळे
जिवितहानी अनेकदा घडते तसेच यकृताच्या रोगांचे प्रमाण सेवन करणा-यांमधे वाढते.
यावर उपाय म्हाणून काही देशांमधे (उदा. ऑस्ट्रेलिया) मिथेनॉलच्या वापरावर कायदेशीर
बन्दी आणली आहे. बेकायदेशीर दारू शासन हस्तक्षेपाने कमी करता येते.
वैयक्तिक पातळीवर
दारू सेवनामुळे समाजाला वेगवेगळ्या स्वरूपात किंमत मोजावी लागते, या
कारणामुळे शासनाचा हस्तक्षेप संयुक्तिक ठरतो.
पुस्तक परिचय: गोष्ट मेंढा गावाची- मिलिंद बोकील
या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे हे
पुस्तक लिहिण्यास देण्याचा, ते लिहून झाल्यावर त्याचे वाचन करुन त्यातील लेखनास मान्यता
देण्याचा आणि सरतेशेवटी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा ठराव मेंढा गावच्या
ग्रामसभेने सर्वसहमतीने मंजूर केलेला आहे.एक पुस्तक अशा प्रक्रियेतून निर्माण
व्हावे हे महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या साहित्यिक इतिहासातील पहिलेच उदाहरण
असावे. अर्थात मेंढा गावाने अशी उदाहरणे घालून देण्याची सुरवात फार पूर्वीपासूनच
केली आहे .
“दिल्ली मुंबईत आमचे सरकार
आमच्या गावात आम्हीच सरकार”
अशी घोषणा देऊन आणि ती प्रत्यक्षात
उतरवून लोकशाही व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचे उदाहरणदेखील या गावाने घालून
दिलेले आहे.
मेंढा(लेखा) हे गडचिरोली
जिल्हयाच्या धानोरा तालुक्यातील एक छोटे गाव.’वनहक्क कायदा -२००६’ मधील तरतुदींनुसार आपल्या गावच्या
भोवतालच्या सुमारे १८०० हेक्टर जंगलावर आणि त्यातील वनौपजावर सामूहिक हक्काचा दावा
करणारे आणि तो मान्य करून घेणारे भारतातील पहिले गाव ठरल्यानंतर मेंढा गाव चर्चेत
आले. पण ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले तत्कालीन केंद्रीय वन आणि पर्यावरण
मंत्री जयराम रमेश यांनी २७ एप्रिल २०११ रोजी स्वतः जातीने गावात येऊन, मुख्यमंत्री, गृहमंत्री, इतर वरिष्ठ मंत्री आणि
नोकरशहांच्या उपस्थितीत या कायद्यान्वये बहाल करण्यात आलेल्या वनहक्क
व्यवस्थापनाची परवाना पुस्तिका प्रदान केली त्या घटनेनंतर !
वरील परिस्थिती निर्माण होण्यास
काय पार्श्वभूमी होती आणि मेंढा गावातील लोकांनी कोणत्या प्रकारे अहिंसक, लोकशाही मार्गाने संघर्ष करून आपला
भोवतालच्या जंगलावरील परंपरागत व नैसर्गिक हक्क मान्य करवून घेतला त्याचे चित्रण
या पुस्तकात आहे .परंतु हे परीक्षण फार ढोबळ मानाचे होईल.
हे पुस्तक म्हणजे गोष्टीच्या रूपाने
जाणारे समाजशास्त्रीय लेखन, चिंतन आहे असे म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही, कारण यात
आदिवासी समूह आणि निसर्ग यातील परस्पर संबंध, आदिवासींमधील पारंपारिक चालीरीती, शिक्षणपद्धती, आदिम-अभिजात जीवनशैलीने तिच्यावर
अतिक्रमण करू पाहणाऱ्या यंत्रणांशी केलेला संघर्ष, सामुहिक सर्वसहमतीने घडवून आणलेला
आणि म्हणूनच स्थायी स्वरुपातला विकास, लोकशाही विकेंद्रीकरण इ.विषयांवर विस्तृत विवेचन मेंढा
गावातील घडामोडींच्या अनुषंगाने केलेले आहे.
पुस्तकाचे नाव जरी ‘गोष्ट मेंढा गावाची’ असे असले तरी ही एक गोष्ट नसून ते
एक कथानक आहे आणि मुख्य म्हणजे ते एक सत्य कथानक आहे. वर उल्लेखलेली घटना ही या
कथानकाची एक उपकथा आहे.अशा अनेक उपकथा या कथानकाला आहेत. मेंढा गाव, या गावाने आपले नैसर्गिक आणि
घटनेने बहाल केलेले अधिकार प्रत्यक्षात मिळवण्यासाठी केलेला संघर्ष हा या
पुस्तकाचा केंद्रबिंदू असला तरी हा संघर्ष आसूयेचा, जीवघेणा असा नाही, तो रक्तरंजितही नाही, पण तो
रोमहर्षक नक्कीच आहे .
मेंढा गाव हे इतर पुरस्कार प्राप्त
आदर्श गावांपेक्षा वेगळे आहे याचे कारण आपल्या आसपासच्या परिस्थितीत सकारात्मक बदल
घडवण्यासाठी,आपले जीवन
सुखमय करण्यासाठी आणि सामूहिक विकास करण्यासाठी राजकीय परिस्थितीत अमुलाग्र बदल
घडवून आणण्याची असलेली निकड या गावाने ओळखली आणि त्या दिशेने अभ्यासपूर्ण आणि
निश्चयपूर्वक वाटचाल केली. वर उद्धृत केलेली ‘दिल्ली मुंबईत आमचे सरकार - आमच्या
गावात आम्हीच सरकार’ ही घोषणा
जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांति’तील ‘सिंहासन खाली करो...जनता आयी है’ या घोषणेशी साधर्म्य सांगणारी आहे.
ही नुसती घोषणा नसून ते एक तत्त्व आहे. या तत्त्वात मेंढावासीयांना अभिप्रेत आहे
ते स्थानीय पातळीवर सरकारच्या अधिकारांचे केलेले विकेंद्रीकरण आणि कल्याणकारी
राज्याच्या संकल्पनेतून येणारी जबाबदारी आणि कर्तव्यांची जाणीव सुद्धा! मेंढा
गावाने या तत्त्वाचा अविष्कार कुठे आणि कसा केला याचे विवेचन म्हणजे हे पुस्तक.
मिलिंद बोकिलांची कोणत्याही
विषयावर लिहिण्यापूर्वी त्या विषयाच्या खोलात शिरण्याची, त्या विषयाच्या परिघातील प्रत्येक
बाब विचारात घेण्याची, निरनिराळ्या
तपशीलांची छाननी करण्याची, गरज पडेल तिथे ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक आणि तात्त्विक संदर्भ
देण्याची, समोर आलेली
तथ्ये निष्पक्षपणे स्वीकारण्याची आणि असे करत असताना कोणत्याही परिस्थितीत
वास्तवाशी फारकत न घेता(ही) संवेदनशीलता जपण्याची शैली या पुस्तकाच्या जडणघडणीस
उपयुक्त ठरली आहे .
आज आधुनिक म्हणवणाऱ्या शहरी समाजात
विविध समूहांचे परस्पर संबंध ताण-तणावाचे, संशयाचे बनलेले आहेत. नातेसंबंधांना
व्यावहारिक स्वरूप आले आहे. स्वार्थी वृत्ती, दांभिकता, चंगळवाद बळावतो आहे. स्पर्धा निकोप
राहिलेली नाही. ‘सर्वेत्र सुखिनः संतू | सर्वे संतू निरामयः’ अशी शिकवण देणाऱ्या समाजातूनच
सहजीवनाची संकल्पना लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या समाजास
मेंढा गावाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
एकूणच काय तर भ्रष्टाचार, अनैतिकता, विधिनिषेधशून्यता इ. दुराग्रहांमुळे
एकूणच राजकीय प्रक्रियेपासून दुरावत चाललेल्या, संसदीय लोकशाही व्यवस्थेकडून
भ्रमनिरास झालेल्या सामान्य माणसांस आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मेंढा गावचा
प्रवास आशादायक आणि उत्साहवर्धक ठरेल.
आज विकासाच्या मूलभूत संकल्पनेची
फेरतपासणी करण्याची आणि विकासाची प्रक्रिया, त्याची प्रारूपे यांमध्ये अमुलाग्र
बदल करण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळी मेंढा गावाची गोष्ट निश्चितच प्रेरणादायी
आणि मार्गदर्शक ठरेल.
प्रकाशक : ग्रामसभा, मेंढा
वितरक : मौज प्रकाशन गृह, मुंबई
टीप : या पुस्तकाच्या छपाई आणि इतर
तांत्रिक बाबींचा खर्च वगळता, पुस्तकाच्या विक्रीतून येणारी सर्व रक्कम ग्रामसभा मेंढा
यांच्या सार्वजनिक फंडात जमा होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)