'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 12 February 2013

दारूविरुद्ध काय परिणामकारक ठरते?


मित्रांनो, चंद्रपूरमधील दारूबंदीची चळवळ सध्या जोमाने सुरू आहे. आपल्यातले अनेक निर्माणी यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत. यात आपले सामाजिक कृतीचे शिक्षण होते आहे. सोबतच याला अभ्यासाची जोडही देऊया.
            दारूचे प्रमाण, त्याचे व्यक्तीवरील व समाजावरील दुष्परीणाम व दारूने होणारी हानी कमी करण्यासाठी कोणकोणती धोरणे व कृती उपयोगी व परिणामकारक ठरतात याचा आढावा घेणारा निबंध लॅन्सेट या जर्नलमधे प्रकाशित झाला होता. यातील अभ्यास व पुरावे मुख्यत: सधन (High income) देशांमधील आहेत व या निबंधात तेथील सर्व अनुभवांचा परिपाक मांडला आहे. काही पॉलिसींचा अभ्यास गरीब (Low income)  देशांमधेसुद्धा केला गेला आहे. भारतासारख्या सांस्कृतिक विविधता असलेल्या व विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थिती असलेल्या देशात दारूचा प्रश्न सोडवण्यासाठी पाश्चात्य देशांतील अनुभव व कृती किती व कशा उपयोगी ठरू शकतील याबद्दल जरूर विचार करायला हवा, त्यादृष्टीने या निबंधाचा अभ्यास उपयोगी ठरेल.
            या निबंधाच्या सारांशाची मांडणी या लेखात केलेली आहे. ज्या वाचकांना या विषयात अधिक  रस वाटतो ते हा निबंध वाचून आरोग्य व किंमतीच्या दृष्टीने विविध उपायांच्या परिणामकारकतेविषयी तपशीलवार आकडेवारी समजून घेऊ शकतात. हा निबंध पुढील संकेतस्थळावर मिळू शकतो: http://www.who.int/choice/publications/p_2009_CE_Alcohol_Lancet.pdf  
            या निबंधात नीती व कृतीची परिणामकारकता आठ वेगवेगळ्या विभागांमधे तपासली आहे.
१.      माहिती व आरोग्यशिक्षण:
जनमानसांतील ज्ञान वाढविण्यासाठी, दारूप्रश्न व त्याचे अपायांबद्दलची माहिती पसरविण्यासाठी अशा कृती उपयोगी ठरतात, परंतु दारूचा वापर व दुष्परीणाम कमी करण्यास त्या हातभार लावत नाहीत असा निष्कर्ष अनेक अभ्यासात निघाला आहे. दारूच्या बाटल्यांवर आरोग्यविषयक गंभीर सूचना देणारी विधाने दारू पिण्याचे प्रमाण कमी करण्यास मदतशीर ठरत नाहीत असेही अभ्यास दर्शवितात.
२.      आरोग्यसेवा क्षेत्र:
दारूच्या दुष्परिणांमांविषयी रुग्णाला सल्ला देणे हा सहसा दुर्लक्षिला गेलेला पण अतिशय परीणामकारक उपचाराचा उपाय आहे. दारूवर पूर्णपणे अवलंबित्व (Dependence) आले नाही पण हानिकारक पातळीचे दारू सेवन करतात अशा लोकांना थोडक्यात सल्ला देणे खूप उपयोगी ठरते.
३.      सामाजिक पातळीवरील कृती:
यामध्ये माहिती प्रसाराच्या साधनांचा वापर, दारू दुकानांच्या वेळेवरील बंधने, सामाजिक ठिकांणावरील दारूबंदी, कायद्यांची अंमलबजावणी, दारूविरोधी जाहिरात मोहिमा, सामाजिक संस्थांच्या कृती इत्यादी कार्यक्रमांचा समावेश केलेला आहे. माहिती प्रसार साधनांचा वापर करून दारूविरोधी माहिती व ज्ञान पसरविणाच्या मार्गाने विविध स्तरांतून दारूविरोधी वातावरण निर्मिती करून राजकीय व सामाजिक पाठिंबा मिळवणे व त्याद्वारे राजकीय अजेंडामधे दारूविरोधी कृतीला स्थान मिळविण्याची पद्धत उपयुक्त ठरते.
४.      दारू पिउन वाहन चालवण्याविरुद्ध नीती:
दारू पिण्यामुळे व्यक्तीचे स्वत:वरील नियंत्रण जाऊन अपघात घडण्याची शक्यता वाढते. रस्त्यावरील दारूच्या दुकानांची संख्या कमी करणे, दारूची किंमत वाढविणे, दारू अधिकृतरित्या विकत घेण्याचे वय वाढविणे यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होते. अर्थातच, यासाठी राजकीय पाठबळ महत्वाचे ठरते. चालकांच्या रक्तातील दारूचे हानिकारक पातळीचे कमाल प्रमाण ठरविणे व रस्त्यांवर नियमित तपासणी करणे यामुळे अपघातांचे प्रमाण व जिवित हानी कमी होते.
५.      दारूची उपलब्धता कमी करणे:
अनेक देशांमधे, ज्यांत मुख्यत्वेकरून मुस्लीम लोकसंख्या आहे, दारूबंदी आहे. याशिवाय दारू विकत घेण्याचे वय व पिण्याचे वय वाढविणे, सोबतच या कायद्याची अंमलबजावणी होणे उपयुक्त ठरते. एखाद्या भागात जास्त प्रामाणात दारूची दुकाने असतील तर त्या भागातील तरूणांमधे दारू पिण्याचे प्रमाण अधिक असते असे संशोधन आहे. त्यामुळे तेथे खून, मारामारी, स्त्रियांचे विनयभंग, गाड्यांचे अपघात यांचेही प्रमाण वाढलेले दिसते. या धर्तीवर दारूची दुकाने उघडी असण्याची वेळ कमी केल्याने सामाजिक हानी कमी होते.
६.      जाहिरातीमार्फत दारूचा प्रचारावर निर्बंध:
दारूची जाहिरात करण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रे वापरण्य़ात येतात. ही तंत्रे नकळतपणे आपल्या मनात दारू वाईट नाही हा विचार रुजवून जातात. यासाठी दारूला खेळांशी व सांस्कृतिक कार्यक्रमांशी जोडले जाते. दारूच्या कंपन्या खेळांना, सांस्कृतिक कार्यक्रमांना पैसा पुरवितात व आपली जाहिरात करून घेतात. अशी जाहिरात केल्याने तरूणांमधे दारू लवकर पिणे सुरू होते व दारू पिण्याचे प्रमाण वाढते. यामुळे दारूची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरात करणे याबाबत कठोर कायदे व त्यांची अंमलबजावणी महत्वाची ठरते.
७.      कराच्या स्वरूपात दारूची किंमत वाढवणे:
बाजारातील वस्तूंची किंमत वाढविल्यावर त्या वस्तूचा वापर कमी होतो, त्याप्रमाणेच दारूची किंमत वाढविल्यावर दारूचा वापर कमी होतो. दारूवरील कर वाढविणे त्यामुळे परिणामकारक ठरते. दारूची किंमत वाढविल्यामुळे दारू पिणारे स्वस्त दारूकडे वळतात असे दिसून येते. किंमत वाढविणे समाजासाठी लांब पल्ल्याच्या दृष्टीने खूप उपयोगी ठरते, असे संशोधन सांगते.
८.      बेकायदेशीर दारूविरुद्ध नीती:
बेकायदेशीर दारू, तस्करी केलेली दारू, हातभट्टीची दारू, काही विशिष्ट रसायनांचा दारूप्रमाणे वापर (उदा. स्पिरीट) यामधे सहसा मिथेनॉलचे प्रमाण भरपूर असते. यामुळे जिवितहानी अनेकदा घडते तसेच यकृताच्या रोगांचे प्रमाण सेवन करणा-यांमधे वाढते. यावर उपाय म्हाणून काही देशांमधे (उदा. ऑस्ट्रेलिया) मिथेनॉलच्या वापरावर कायदेशीर बन्दी आणली आहे. बेकायदेशीर दारू शासन हस्तक्षेपाने कमी करता येते.
वैयक्तिक पातळीवर दारू सेवनामुळे समाजाला वेगवेगळ्या स्वरूपात किंमत मोजावी लागते, या कारणामुळे शासनाचा हस्तक्षेप संयुक्तिक ठरतो.  

वैभव आगवणे, vaibhs.agavane2@gmail.com

No comments:

Post a Comment