एक वर्षापूर्वी
जितेंद्र जोशी अणि सोनाली कुलकर्णी यांच्या आवाजात ‘आणि विजेते आहेत… काकडदरा!’ या आवाजासोबत निर्माण
परिवाराने एक मैलाचा दगड गाठला
आणि मंदारच्या ‘ढिश्क्यांव... ढिश्क्यांव... ढिश्क्यांव’ने तर पूर्ण महाराष्ट्र गाजवला. यावर्षी पुन्हा त्याच सोहोळ्यात... माईकवर जितेंद्र जोशी आणि स्पृहा जोशी... “आणि विजेते आहेत”… “टाकेवाडी!”... पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धा २०१८ त
पहिलं आलेलं गाव म्हणजे ‘टाकेवाडी’ आणि विशेष म्हणजे ह्या गावाचा तालुका समन्वयक आणि तांत्रिक सल्लागार दोघेही
‘निर्माणी’! प्रफुल्ल सुतार (निर्माण ६), तालुका समन्वयक, सांगत आहे त्याच्या आणि टाकेवाडी
गावाच्या प्रवासाबद्दल...
“मी मूळचा सातारा जिल्ह्यातील खटाव
तालुक्यातील कलेढोण गावचा. तिथेच दहावीपर्यंत शिक्षण झालं. पुढं काय करायचं?
हा प्रश्न पडला. त्यावेळेस इंजिनिअरिंगला लई डिमांड आहे म्हणून डंका
वाजत होता म्हणून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. इंजिनिअरिंग करत असताना मन अस्वस्थ
असायचं त्यामुळे नेहमीच गोंधळलेल्या अवस्थेत राहिलो. त्याचवेळेस एका मित्राने ‘सर्च’मधील डॉ.अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या ‘निर्माण’ या महाराष्ट्रातील युवांना सामाजिक
समस्यांविषयी सजग करून त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार करणाऱ्या
उपक्रमाबद्दल सांगितलं. मी फॉर्म भरला, मुलाखत होऊन निवड
झाली. शिबिरासाठी गडचिरोलीला गेलो.
शिबिरामध्ये मला महत्त्वाचे दोन प्रश्न जाणवले - एक प्रशासनात माजलेला भ्रष्टाचार आणि दुसरा दुष्काळ. त्याच
दरम्यान ‘पानी फाउंडेशन’मध्ये
तालुका समन्वयकसाठी अर्ज सुटले होते. मी अर्ज भरला आणि
चार-पाच टप्प्यातून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा समन्वयक म्हणून रुजू झालो.
तालुक्यात आल्यावर सुरुवातीला ज्यांनी मागच्या वर्षी पूर्ण तालुका पिंजून काढून
जनचळवळ उभी केली आणि तालुक्यातील ३० टक्के दुष्काळ मिटवला अशा दोन जलवीरांची भेट
झाली. ते म्हणजे अजित पवार आणि डॉ. प्रदीप पोळ. हे दोघेही तालुका समन्वयक आणि मी
तिसरा. पहिली जबाबदारी होती सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे अर्ज सरपंच आणि
ग्रामसेवकांकडून भरून घेणे. रोज सात-आठ गावे फिरायचो. सकाळी
आठ वाजता बाहेर पडलो की रात्री यायला दहा-अकरा वाजत असे.
त्याच काळातला एक अनुभव आहे, अर्ज वाटत असताना रात्री दहा वाजता एका गावातून तालुक्याच्या
ठिकाणी निघालो. गावातून जसा बाहेर पडलो तशी दुचाकीची हेडलाईट बंद पडली. रात्र...
काळोख... आता काय करायचं? कुणाला फोन लावायचा तर दोन्ही
सिमकार्डला रेंज नाही. रस्ताही नीट माहिती
नव्हता. कुत्री भुंकत होती. रस्त्याने कुणी येताना-जाताना दिसत पण नव्हतं...
अशावेळी खिशातून नोकियाचा १६०० चं मॉडेल बाहेर काढलं त्याचा टॉर्च चालू केला आणि
तोंडात मोबाईल धरून गाडी हळूहळू चालवत निघालो. जिथं जिथं कुत्री असायची ती असा
अवतार बघितल्यावर अजून जोरात भुंकत मागे लागली. तोंडात टोर्च तसाच धरून
घाटा-घाटातून रूम गाठली. अशी तारांबळ बघून पानी फाउंडेशन करावं की नको असाही विचार
मनात यायचा.
त्यानंतर ग्रामसभा घेवून ५ गावकरी त्यात दोन महिला आणि तीन
पुरुष यांची ट्रेनिंगसाठी निवड करणे. त्यात पण महिलांची निवड सक्तीची त्यामुळे गावोगावी
अडचण गेली. पुढे गावकऱ्यांच्या ट्रेनिंग सेंटरचा प्रवास. तिथला अनुभव म्हणजे ऐनवेळी
निवडलेल्या प्रशिक्षणार्थीऐवजी वेगळीच लोकं असायची. काहींना ट्रेनिंग सोडू वाटत
नव्हतं तर काही पळून गेलेल्या प्रशिक्षणार्थींना पकडून आणावे लागत असायचे.
अशाप्रकारे ट्रेनिंगमध्ये भावनिक आणि मजेशीर अनुभव यायचे.
ट्रेनिंग
झालं... तालुक्यात ६६ गावांनी ट्रेनिंग पूर्ण करून सहभाग पक्का केला होता. आता
स्पर्धा होणार होती... दुष्काळाला ‘ढिश्क्यांव ढिश्क्यांव ढिश्क्यांव’ करण्याची... प्रत्येक गाव दुष्काळावर हल्ला करण्यासाठी
दारूगोळा तयार करत होती. कुणी फावडे, घमेले, टिकावाचे नियोजन तर कुणी शिवारफेरी काढून
पाणलोटाचे उपचार कुठे-कुठे करायचे त्याचे नियोजन, कुणी
रोपवाटिका, शोषखड्डे, माती परीक्षण
याची जबाबदारी घेत होता. अखेर ८ एप्रिलला दुष्काळविरुद्ध वॉटरकपचं तिसरं महायुद्ध
सुरू झालं. माणवासीयांनी रात्री १२ वाजता कुदळ, फावडे घेऊन
कामाचा शुभारंभ केला. सुरवातीलाच ८ एप्रिलला ३५ हजार लोकांनी श्रमदानाला सुरुवात
केली. गावागावात टीम बनल्या. त्याचबरोबर जी प्रशिक्षक गावकऱ्यांना शिकवायला होती
तीच टीम परत पुन्हा तालुक्यात आली. त्यांच्याबरोबर गावांचा अवाका मोठा असल्यामुळे
आम्ही मंडलनिहाय गावे वाटून आपापली जहागिरी फिक्स केली. प्रत्येकजण आपापली कामगिरी
बजावत होता. मग गावातच मुक्काम ठोकणे सुरु झाले. तिथेच सकाळी उठून त्या गावच्या
श्रमदानात हजेरी लावत असू. गावातील लोकं ग्रामसभेसाठी रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत
आमची वाट बघत बसायची इतकी लोकं कामाने
भारावून गेली होती. कुकुडवाड गावाने तर इतिहासच रचला! महाश्रमदानासाठी ८ हजार ७००
लोकांनी श्रमदान केले. अशाप्रकारे रोज माणमधील सरासरी श्रमदात्यांचा आकडा ३० हजार
असायचा.
हे सर्व घडत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची साथ इथे मोठ्या
प्रमाणात मिळाली. माजी कोकण आयुक्त, मंत्रालय सचिव, आयकर आयुक्त, आयपीएस,
आयआरएस, महानगरपालिका आयुक्त सुट्टी काढून यायचे.
हे ४५ दिवसाचं दुष्काळाविरुद्धचं महायुद्ध होत असताना अनेक प्रेरणादायी घटना
घडल्या. काम झालं. १५ गावांनी ८७ मार्काचा पेपर सोडविला. परीक्षण झालं. राज्य
स्तरावर दोन गावं गेली. एक म्हणजे भांडवली आणि दुसरं टाकेवाडी. त्या गावांचे
पोपटराव पवारांच्या टीमने परिक्षण केले. आता चाहूल लागली होती ती वॉटर कप स्पर्धेच्या
निकालाची. राज्यात द्वितीय क्रमांक ‘भांडवली’ असं पुकारलं तसं आमच्या अंगात भूतच संचारलं...
आता प्रथम क्रमांक जाहीर होणार होता. “वॉटर कप २०१८ प्रथम क्रमांक... आणि विजेते आहेत”... आता उत्कंठा शिगेला पोहोचली होती. “टाकेवाडी!!!” आवाज आला आणि संपूर्ण स्टेडियम सातारकर आणि माणकर लोकांनी घोषणांच्या
आवाजांनी गाजवून टाकलं. आणि शेवटी माण तालुक्यातील टाकेवाडी (आंधळी)
हे गाव वॉटरकपचा मानकरी ठरलं. हे सगळं यश पदरात पाडून घेत
असताना समाधान वाटत होतं की, मी
पाणी प्रश्नावर काम करतोय जो मला निर्माणमध्ये असताना जाणवला होता. आता ‘जिंदगी वसूल’ झाल्यासारखं वाटतंय!”
प्रफुल्ल सुतार, निर्माण ६
No comments:
Post a Comment