'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 14 January 2019

जागर - नरहर कुरुंदकर


राजकीय इतिहासाचा अभ्यास भूतकाळात रमण्यासाठी नव्हे, तर इतिहासातील चुका वर्तमानात आणि भविष्यात होऊ नये यासाठी असावा असे मला वाटते. नरहर कुरुंदकर यांचं ‘जागर’ हे आताच्या काळातही मला सुसंगत वाटते. निर्माणींची स्वतःची चिकित्सक राजकीय मूल्यप्रणाली असावी म्हणून हे पुस्तक महत्वाचं आहे.
पुस्तकाच्या सुरवातीलाच कुरुंदकरांनी भारतीय बुद्धिजीवी वर्गाचे वैफल्य दाखवले आहे. प्राचीन काळापासून भारतात नेहमीच समन्वयवादाची भूमिका चालत आलेली आहे. एकीकडे आधुनिक विद्येचा पुरस्कार आणि दुसरीकडे प्राचीन भारताचा अतिरेकी गौरव या दोन्ही बाबी बुद्धिजीवी वर्गाच्या मनात कायम दृढ होत्या. त्याचबरोबर बुद्धिजीवी वर्गाची दुसरी भूमिका चिकित्सेचा अभाव आणि सतत तडजोडीची होती. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात राजकीय तत्त्वज्ञानाच्या दोन भूमिका होत्या, एक मार्क्सवाद आणि दुसरी गांधीवादाची. या दोन्ही विचारसरणींना बुद्धिजीवी वर्गाचा विरोध होता. बुद्धिजीवी वर्ग शेतकऱ्यांचे, कामगारांचे, श्रमिकांचे श्रेष्ठत्व स्वीकारू शकत नाही म्हणून ह्या वर्गाची अवहेलना गांधीवादी आणि मार्क्सवादी चळवळींचे वैशिष्ट्य राहिले. त्यामुळे भारतीय लोकशाही ही कायम अपरिपक्व राहिली.
बहुजन समाजातील सर्व दरिद्री शेतमजूर वंशपरंपरेने चालत आलेल्या आपल्या जाती-जमातींतील प्रमुखांच्या नेतृत्वाखाली राहत आला आणि हाच मजूरवर्ग संघटित करण्यात समाजवाद्यांची शक्ती वेचली गेली. जुनाट प्रतिगामी विचारसरणी, जातीव्यवस्था यामुळे समाजवादी शक्तींची कायम पिछेहाट होत राहिली. ग्रामीण भागात शेतमजुरांचे लढे लढविताना आणि परंपरावादाचा प्रभाव चिकित्सेने फोडण्यासाठी जर समाजवादी शक्ती संघटित होऊ लागल्या, तरच लोकशाहीच्या संथ प्रवाहात त्या प्रभावी ठरतील असं कुरुंदकर सुचवतात.
समाजवादी तत्वज्ञान आणि मार्क्सवाद - तत्व आणि व्यवहार या परिप्रेक्षातून विचार केला तर ज्या देशात औद्योगिकीकरण पुरेसे झालेले होते अशा एका पुढारलेल्या देशात क्रांती प्रथम व्हायला हवी होती. ज्या ठिकाणी भांडवलशाही पूर्णपणे विकसित झालेली असेल, तेथून समाजाची पुढची प्रगती समाजवादी क्रांतीने केली पाहिजे यासाठीच मार्क्सवादी तत्वज्ञान निर्माण झालेले होते. भरपूर उत्पादन असलेल्या देशात उत्पादनाचे न्याय्य वाटप करण्याची आकांशा असणारे हे तत्वज्ञान व्यवहारात मात्र मागासलेले उत्पादन असणाऱ्या देशात तातडीने प्रगती व्हावी यासाठी पुरस्कारले जाते. या व्यावहारिक सत्यातच मार्क्सवादी तत्वज्ञानाच्या मर्यादा दडलेल्या आहेत असं मला वाटतं.
कुरुंदकर पुढे असं म्हणतात की, मार्क्सचे तत्वज्ञान विकसित भांडवलशाहीचे समाजवादात रूपांतर करणारे तत्वज्ञान म्हणून पराभूत होते, आणि अर्धवट सरंजामशाही युगात असणाऱ्या राष्ट्रांत वेगाने व सक्तीने औद्योगिकरण आणणारे तत्वज्ञान म्हणून शिल्लक राहते. महात्मा गांधी - काही चिंतन यामध्ये तर कुरुंदकर म्हणतात की, राजकीय मुत्सद्यांना गांधीजी धार्मिक वाटत. पण धार्मिकांना मात्र गांधीजी आपले शत्रू वाटत होते. याचे खरे कारण गांधीजींच्या कार्यक्रमात सापडते. एखादा संत आपले विचार व्यवहारात आणू लागला की सर्व परंपरावाद्यांना तो आपला शत्रू वाटू लागतो. आणि गांधीजी तर एकही विचार व्यवहारात न आणता शिल्लक ठेवू इच्छित नव्हते. संपूर्ण भारतात प्रांतोप्रांती सुशिक्षित बुद्धिमंतांचे (सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, . चि. केळकर, इ.) नेतृत्व होते. हे नेतृत्व गांधीजींच्या मागे उभे राहिले. म्हणून गांधीजींचे राजकीय नेतृत्व उभे राहिले. स्वातंत्र्यलढ्यात पुन्हा पुन्हा एक गोष्ट सर्वांच्या लक्षात येई की, एक-दोन इंग्रज अधिकारी मारून स्वातंत्र्य मिळेल ही भ्रामक कल्पना आहे. राजकीय लढ्यात निशस्त्र जनतेला सहभागी करून घ्यावेच लागेल. स्वातंत्र्यलढ्यात गांधींच्या राजकीय नेतृत्वाचे चित्रच पुस्तक वाचताना आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. पुरेसे औद्योगिकीकरण व उत्पादनवाढ झाल्याशिवाय समाजवादी कार्यक्रम निरर्थक होऊन जाईल. म्हणून नेहरूंनी केंद्र सरकार प्रबळ केले. इथे नेहरू गांधींच्या विकेंद्रीकरणाच्या तत्वापासून दूर गेले.
सेक्युलॅरिझम आणि इस्लाम यामध्ये कुरुंदकर म्हणतात की आधुनिकता, धर्मसुधारणा आणि चिकित्सा यांच्या परंपरा इस्लामध्ये फारशा नाहीतच. मुस्लिम समाजात आजही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. मुस्लिम समाजात सुधारणावादाची चळवळ सुरू झाली तर ती सर्वांनाच हवी आहे. हिंदू समाजाची सनातनी मनोवृत्ती हाच भारतातील सेक्युलॅरिझमला अडथळा आहे. मुस्लिम समाजात परिवर्तन होत नाही याचे मुख्य कारण हिंदू समाजातील सेक्युलर नेतृत्वही परंपरेने चालत आलेल्या परंपरावादी नेत्यांच्याच हातात आहे.
सगळ्यात शेवटी कुरुंदकरांनी राजकीय शोध आणि बोधमध्ये जी मांडणी केली आहे ती सर्वांनी प्रत्यक्ष वाचावी अशीच आहे. जागर वाचल्यानंतर मी स्वतः राजकीय व सामाजिक प्रश्नांकडे चिकित्सक दृष्टीने बघू लागलो. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करताना जागर वाचणे महत्वाचे वाटते. समाजवाद-गांधी-मार्क्स-नेहरू-विकेंद्रीकरण-सेक्युलॅरिझम-इस्लाम-धर्मग्रँथ व त्याचे अनुयायी इतक्या साऱ्या गोष्टींची जागरमध्ये मांडणी आहे.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील चिकित्सा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुस्तकात अजिबात उल्लेख नाही ही गोष्ट पुस्तक वाचताना थोडी खटकते. भारतातील राजकारण आणि समाजकारण समजून घेण्यासाठी आणि स्वतःचा वैचारिक जागर घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकदा तरी जागर वाचाच...

स्वप्नील अंबुरे, निर्माण ८

No comments:

Post a Comment