'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 13 June 2013

वैद्यकीय मान्सून !

यावर्षी मान्सूनसोबतच निर्माणी डॉक्टरांची वैद्यकीय सेवा महाराष्ट्रात व छत्तीसगढमध्येही जागोजागी पोहोचत आहे.
पवन मिल्खे (निर्माण ३) मन्ने राजाराम (जिल्हा- गडचिरोली, तालुका- भामरागड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला आहे. पवनने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS चे शिक्षण पूर्ण केले आहे.
धनश्री बागल (निर्माण ३) सायवन (जिल्हा- ठाणे, तालुका- डहाणू) या आदिवासी बहुल भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महिन्यापूर्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. एका महिन्याच्या अनुभवाबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, “या भागातील आरोग्याच्या समस्या आणि मेळघाट-गडचिरोलीतील आरोग्याच्या समस्या यात कमालीचे साधर्म्य आहे. मलेरियाचे इकडे प्रचंड प्रमाण आहे. सार्वजनिक/वैयक्तिक स्वच्छता कमी आणि उलट्या-हागवणीचे प्रमाण जास्त आहे. ताडीच्या दारूचं प्रमाणही प्रचंड असून अगदी बायकामुलेही मोठ्या प्रमाणात दारू पितात. कोणताही आजार झाला तरी इंजेक्शन व सलाईन दिल्याशिवाय रुग्णांचं समाधान होत नाही. लहान लहान आणि विखुरलेले पाडे असल्यामुळे सर्वांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे कठीण जाते.” धनश्रीने सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS चे शिक्षण पूर्ण केले आहे.
प्रणाली साळवे (निर्माण ४) कुरुड (जिल्हा- गडचिरोली, तालुका- वडसा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. प्रणालीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSचे शिक्षण पूर्ण केले असून याआधी ८ महिने तिने आपल्याच महाविद्यालयात medicine विभागात house officer म्हणून वर्षे सेवा दिली आहे.
नेहा काळे (निर्माण ३) छत्तीसगढ मधील बिलासपूर जवळील गनियारी येथील ‘जन स्वास्थ्य सहयोग (JSS)’ या संस्थेत वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. नेहा मुख्यतः बाह्यरुग्ण विभागाचे काम सांभाळेल. लोकांना सेवा देताना आपली वैद्यकीय कौशल्ये वाढवण्यासाठी JSS मधील सेवाकालाचा नक्की उपयोग होईल असे नेहाला विश्वास वाटतो. गेल्या काही महिन्यांत अनेक निर्माणी डॉक्टरांनी JSS ला भेट देऊन संस्थेचे कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या भेटीदरम्यान तयार झालेले नाते पुढे नेत अनेक जणांनी तिथे सेवा देण्यासही सुरुवात केलेली आहे. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS चे शिक्षण पूर्ण केलेल्या नेहाला JSS मध्ये सेवा देणाऱ्या निर्माणच्या सचिन बारब्दे, सागर काबरा, धीरज देशमुख व बाबासाहेब देशमुख यांची नक्कीच मदत होईल
मेळघाट मध्ये गेली ४ वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. प्रियदर्श तुरे (निर्माण २) महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रमांतर्गत मुंबईच्या KEM रुग्णालयातील बालरुग्ण विभागात पुढील ६ महिने काम करता करता शिकण्याची संधी मिळाली आहे. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ज्ञान अद्ययावत राहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू केला आहे.
शासकीय अधिकारी व वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अनास्थेमुळे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर्स मिळत नसताना स्वयंप्रेरणेने सेवा देण्याची निर्माणी डॉक्टरांची परंपरा प्रेरणादायी आहे.

No comments:

Post a comment