मागील दोन महिन्यांत घडलेल्या घडामोडींचा हा आढावा...
निर्माण ६.२ ब शिबीर संपन्न
२३-३१ जुलै दरम्यान निर्माणच्या ६व्या बॅचच्या वैद्यकीय
युवांचे दुसरे शिबीर पार पडले. वैद्यकीय क्षेत्राची सध्याची स्थिती कशी आहे? ती
कशी असावी? त्या दिशेने प्रवास करणारे कोणी रोल मॉडेल्स आहेत का? असतील तर त्यांचा
प्रवास कसा होता? मग मी काय करू? या प्रश्नांची या शिबिरात उत्तरे शोधण्यात आली.
अम्मांनी केस स्टडीज् च्या आधारे डॉक्टरांकडून किती मोठ्या
प्रमाणात निष्काळजीपणा होऊ शकतो याची धक्कादायक झलक दाखवली. डॉक्टरांना
अनिवार्यपणे अवलंबून रहावे लागते अशा औषध कंपन्यांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराविषयी
स्वतः औषधशास्त्राचे PhD असणाऱ्या रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी
सत्र घेतले. तर योगेश दादाने आरोग्यसेवेच्या अमेरिकन मॉडेलकडे भारताची होणारी
वाटचाल व त्यामुळे रुग्णांच्या खिशावर कसा ताण पडेल हे स्पष्ट केले.

लोकांना सहज मिळेल व परवडेल अशी
आरोग्यसेवा असण्यासाठी विकेंद्रीत ‘आरोग्य-स्वराज्या’ची त्यांची कल्पना नायनांनी मांडली.
त्यादृष्टीने सर्चचा घरोघरी नवजात बाळाला आरोग्यसेवा देण्याचा प्रयोग आनंद बंग
(निर्माण १) विस्तृतपणे समजावून सांगितला. आरोग्य स्वराज्याचे प्रतीक असणाऱ्या
आंबेशिवनी गावच्या आरोग्यदूत काजूबाई यांनी नवजात बाळाची काळजी त्या गावातल्या गावात
कशी घेतात याचे प्रात्यक्षिक दाखवले.
या शिबिरात खूप वेगवेगळ्या रोल मॉडेल्सना ऐकण्याची संधी
शिबिरार्थ्यांना मिळाली. धानोरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अमोल लगड
(निर्माण ५) व सर्चच्या फिरत्या पथकातील वैद्यकीय अधिकारी ऋषिकेश मुन्शी (निर्माण
६) यांचा प्रवास शिबिरार्थ्यांनी प्रत्यक्ष धानोरा व खरकाडी या आदिवासी गावात
ऐकला. योगेश दादाच्या नेतृत्वाखाली आकार घेत असलेले सर्चामधील असंसर्गजन्य
रोगांवरील कामही समजून घेता आले. कर्नाटकातील सोलीगू आदिवासींना सेवा देणाऱ्या डॉ.
एच. सुदर्शन यांचा प्रवास ऐकता आला.तसेच मुक्ता पुणतांबेकर यांच्याकडून मुक्तांगण
व्यसनमुक्ती केंद्राचा प्रवासही समजून घेता आला.
यावेळी नियोजन करताना शिबिरार्थ्यांनी output to input असा विचार केला. प्रथम १० वर्षानंतर माझ्या हातून काय झाले
असले पाहिजे, व त्यानुसार मी पुढील ५ वर्षांत व २ वर्षांत मी काय केले पाहिजे हे सर्वांनी
कागदावर उतरवले.
निर्माणचा समन्वयक अमृत बंग याचा सहभाग असणारे ६व्या बॅचचे
हे शेवटचे शिबीर होते. अमृत पुढील एका वर्षात अमेरिकेतील University of Pennsylvania येथे MS
(Non-profit leadership) करणार
आहे.
सर्व शिबिरार्थी व अमृतला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
गडचिरोली निर्माणची सुरूवात
२००६ साली निर्माणची सुरुवात
झाली. निर्माण मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मुले मुली सहभागी होतात. यापैकी
अनेकांनी गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांवर कामही केले आहे. गडचिरोलीच्या
विकासात गडचिरोलीच्या युवांचा सहभाग वाढावा यासाठी निर्माणची स्वतंत्र प्रक्रिया
सुरु करता येईल का असा विचार पुढे आला. गडचिरोलीतील काही नेमक्या समस्या निवडून
त्या सोडवण्यासाठी युवांना प्रशिक्षण देणे असे गडचिरोली निर्माणचे स्वरूप असेल. हीच
कल्पना पुढे नेण्यासाठी आकाश भोर (निर्माण ५) हा सर्च मध्ये रुजू झाला आहे.
शिक्षणाने इंजिनिअर असलेला
आकाश मुळचा नारायणगावचा (जिल्हा पुणे) आहे. आपल्या या निर्णय व कामाबद्दल बोलताना
आकाश म्हणाला, “इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी माझ्याच कॉलेज मध्ये प्रोजेक्ट्स
वर काम करत होतो, काम करताना मजा येत होती पण समाजातील समस्या सोडविण्यासाठी आपण
काही तरी केलं पाहिजे हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. ‘झुंज दुष्काळाशी’ या
कार्यक्रमात सहभागी झाल्याने हा निर्णय घेताना मदत झाली. गडचिरोली
जिल्हा हा शैक्षणिक, सामजिक,
राजकीय
व भौगोलिक दृष्ट्या इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे ‘गडचिरोली
निर्माण’ चे स्वरूप काय असावे, मुलांची निवड प्रक्रिया काय असावी, कोणत्या
प्रश्नांवर प्राधान्याने काम करावे इ. बाबत सध्या अभ्यास सुरु आहे. यासाठी
गडचिरोलीतील जाणकार व्यक्तींना भेटतो आहे, Focused
Group Discussion च्या माध्यमातून युवांची मते जाणून घेत आहे.
शोधग्राम मध्ये निर्माण टीम (केदार आणि निखिल) सोबत काम करण्याची मजा काही औरच
आहे!!”
ग्रामीण युवांना सक्षम करण्यासाठीची ही
प्रक्रिया यशस्वी झाल्यास महाराष्ट्रातील इतर भागातही या प्रक्रियेचा विस्तार करता
येईल.
कुणाल परदेशी दुसरा ‘कर के
देखो’ फेलो
कुणाल परदेशी (निर्माण ६) याची ‘कर के देखो’ फेलोशिप साठी
निवड झाली आहे. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात असणारी बांबूची उपलब्धता आणि कमी
प्रमाणात असणारी रोजगाराची उपलब्धता यांच्यात दुवा जोडण्याचे काम कुणाल करेल.
आपल्या कामाबद्दल बोलताना कुणाल म्हणाला, “गडचिरोलीत बांबू
जास्त प्रमाणात आहे, पण हा बांबू घरगुती वापरासाठी उपयोगात आणला जातो किंवा
ठेकेदाराला कमी किमतीत विकला जातो.जर ह्या बांबूवर प्रक्रिया करून तो विकला किंवा
विविध शोभेच्या वस्तू, फर्निचर, अगरबत्ती इ. बनवून विकल्या तर त्याच बांबूची किंमत
वाढेल व रोजगाराची समस्याही सोडवता येतील.
यासाठी नेमकी weak link
शोधून त्यावर काम करावं असं मला वाटलं. यासाठी विविध कारागीर, प्रशिक्षण केंद्र,
सरकारी योजना व प्रकल्प, market (local & global) यांचा अभ्यास करून पुढील
कृती कार्यक्रमाची आखणी मी करणार आहे. या अभ्यासाठी मला पुढील एक वर्ष गडचिरोलीत राहावं
लागेल. मग यात बांबू शेतीची माहिती, बांबूबद्दल जागरूकता, काही आदिवासी कारागिरांना ट्रेनिंग,जगात बांबूवर झालेल्या कामाचा आढावा, सरकारी
योजना इ. अशा विविध गोष्टींचा समावेश असेल.”
|