'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 19 November 2012

सीमोल्लंघन, ऑक्टोबर २०१२
तू जिंदा है...निर्माण परिवाराचा लाडका सदस्य व मित्र सागर जोशी याचे १५ ऑक्टोबर २०१२ च्या दुपारी पुण्यात दुःखद निधन झाले. सागरच्या मागे त्याच्या कुटुंबात त्याचे आई-वडील, भाऊ व वाहिनी आहेत. त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात निर्माण परिवार सहभागी आहे.

आज सागर आपल्यात नसला तरी त्याचं नेहमी हसतमुख असणं, दुसऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असणं, संगीत, नाटक येथपासून विविध सामाजिक प्रश्नांबद्दल त्याची समज व जाण, आपल्या शारीरिक मर्यादा सांभाळूनही रोजगार हमी योजना, मेळघाट धडक मोहीम, निर्माण निवड प्रक्रिया इत्यादी कामांत त्याचे योगदान देणं हे आज आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत.

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो...

निर्माणच्या ५ व्या बॅचची यादी जाहीर

निर्माणच्या ४ बॅचेस पूर्ण झाल्या असून, ५ व्या बॅचसाठीची निवडप्रक्रिया गेले काही महिने सुरु होती. ही निवडप्रक्रिया आता पूर्ण झाली असून निर्माण ५ साठी निवडल्यागेलेल्या युवकांच्या नावाची यादी आपल्या संकेतस्थळावर (http://nirman.mkcl.org) जाहीर करण्यात आली आहे. निर्माण ५ साठी, मेडिकल व संलग्न शाखांची एक बॅच (5A)  व इतर सर्व शाखांची एक बॅच (5B) असे करण्याचे ठरविण्यात आले असून दोन्ही बॅचेस मिळून १५० निर्माणी निवडण्यात आले आहेत. ह्यामागे मुख्य दोन कारणे होती –

१.    सर्च संस्थेची पार्श्वभूमी असल्यामुळे, खास मेडिकल व संलग्न शाखांसाठी खूप उत्तम शिक्षणप्रक्रिया विकसित करता येऊ शकते हे मागील दोन हेल्थ कॅम्प्स मध्ये दर्शनास आले. मात्र निर्माण प्रक्रियेमध्ये मिश्र शाखांचे निर्माणी सहभागी असल्यामुळे ह्या शिक्षणप्रक्रियेवर मर्यादा येते.
२.    मेडिकल व इतर शाखांच्या परीक्षेच्या तारखा नियमितपणे क्लॅश होत असल्यामुळे शिबिराच्या नियोजनाच्या दृष्टीने खूप प्रश्न उद्भवतात. त्यामुळे दरच शिबिराला काही निर्माणींना हजर राहणे जमत नाही.   

दोन्ही मुद्द्यांचा विचार करता या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर दोन वेगवेगळ्या बॅचेस केल्या आहेत. या प्रयोगाचा परिणाम व त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून निर्माण ६ च्या निवड प्रक्रियेची नीती ठरवता येईल. ह्या शिबिरांच्या रचनेबद्दल आपल्या काही प्रतिक्रिया असल्यास नक्की कळवा.

वाई येथे निर्माण समुदाय चिंतन बैठक संपन्न

महाराष्ट्रातील युवांमधून सामाजिक कृती व परिवर्तनासाठी नवे कार्यकर्ते निर्माण व्हावेत यासाठी सुरु झालेल्या ‘निर्माण’ या उपक्रमाबाबत व या एकूणच कल्पनेबाबत ज्यांना आस्था आहे, जे निर्माणला विविध पद्धतींनी मदत व मार्गदर्शन करतात, जे निर्माणचे हितचिंतक आहेत अशा महाराष्ट्रभरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा व विचारवंतांचा गट म्हणजे निर्माण समुदाय! संख्येने व वैविध्यात सतत वाढत असलेला हा गट दर वर्षा-दोन वर्षात एकत्र जमतो व निर्माणच्या वाटचालीचा आढावा घेतो, विविध मुद्द्यांवर चर्चा करतो व भविष्याच्या दृष्टीने विचारमंथन करतो. या गटाची दोन दिवसीय चिंतन बैठक 16 व 17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या पुढाकाराने वाई येथे आयोजित करण्यात आली होती. “२१व्या शतकातील महाराष्ट्रासाठी सामाजिक परिवर्तनाच्या युवा कार्यकर्त्यांचे निर्माण” ही या बैठकीची मुख्य थीम होती. महाराष्ट्राच्या विविध भागात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक व वैज्ञानिक क्षेत्रांत कार्यरत असलेले सुमारे 30 मान्यवर बैठकीला उपस्थित होते.

२१व्या शतकाच्या पहिल्या अर्धशकांत महाराष्ट्राचे चित्र काय राहील, प्रमुख सामाजिक आव्हाने कोणती असतील, यासाठी आवश्यक परिवर्तनाचा कार्यकर्ता कसा असेल, त्याच्या आर्थिक आधाराचे स्वरूप/ मार्ग काय असू शकेल, महाराष्ट्रातील युवांना समाजोन्मुख होवून व पुढे परिवर्तनाचा कार्यकर्ता म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक विचार, मूल्य, निष्ठा व क्षमता कशा मिळतील, त्यासाठी शिक्षण व विकास प्रक्रिया काय असू शकेल, इ. विविध विषयांवर या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. सुरुवातीला निर्माण प्रक्रियेची आजवरची वाटचाल, उपलब्धी, प्रश्न व या प्रक्रियेद्वारे महाराष्ट्रातील युवांचे कळलेले चित्र यावर निर्माण कोऑर्डिनेशन टीमद्वारे थोडक्यात मांडणी झाली. बैठकीच्या अंती निर्माण समुदाय म्हणून मी काय करू इच्छितो/इच्छिते यावरही चर्चा झाली.

सर्व उपस्थित मान्यवर हे गेली कित्येक वर्षे आपापल्या कार्यक्षेत्रात अत्यंत संवेदनशीलपणे व सामाजिक जाणीवेतून सातत्याने महत्वपूर्ण योगदान देत असल्याने त्यांच्या अनुभवाचा व चिंतनाचा उपयोग ही बैठक अर्थगर्भ होण्यासाठी तर झालाच पण सोबतच निर्माण व निर्माण समुदायाच्या पुढील प्रवासामध्येही उपयुक्त असेल.

निर्माण अखंड शिक्षण प्रक्रियेची आणखी एक पायरी: ऑक्टोबर कार्यशाळा संपन्ननिर्माण ही शैक्षणिक प्रक्रिया फक्त शिबीरांच्या मालिकेपुरती मर्यादित नसून ती संपूर्ण जीवनभराचीच आहे. हे सूत्र ध्यानी घेऊन दि. 23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान विविध सामाजिक विषयांवर काम करत असणर्‍य़ा महाराष्ट्रातील 40 निर्माणींची कार्यशाळा सर्च इथे पार पडली. निर्माणींची आर्थिक, राजकीय व वैचारिक समज वाढावी, आर्थिक व राजकीय विचारांचा दैनंदिन जीवनाशी संबंध कळावा, विविध विषयांवर सद्य कार्यरत असलेल्या निर्माणींचा परस्पर संवाद व्हावा व झेप घेऊ पाहणार्‍या निर्माणची भविष्यातील दिशा काय असावी अशा मध्यवर्ती कल्पनांचा या कार्यशाळेत सामावेश होता.  

प्राध्यापक खांदिवाले सरांनी कार्यशाळेचा प्रारंभ भांडवलशाहीचे तत्वज्ञान, त्याची सद्य समाजजीवनातील भूमिका व विविध मर्यादा या विषयाने केला. त्यानंतर आपल्यापैकीच एक निर्माणी अमृता प्रधान हीने गांधीविचारांचे अर्थशास्त्रज्ञ कुमारप्पा लिखित Economy of Permanence या पुस्तकावर आधारित मांडणी केली. या सत्रानंतर अनेक निर्माणींनी हे पुस्तक विकत घेऊन वाचण्यास सुरुवात केली आहे. पूर्ण कार्यशाळेमध्ये श्री. अशोक भार्गव यांची उपस्थिती होती. त्यांनी निर्माणींच्या दैनंदिन जीवनात आर्थिक नियोजन अणि बचत कसे असावे याचे मार्गदर्शन केले. तसेच प्रा. हितेश भट्ट यांनी नवे काम सुरु करताना पैसा कसा उभा करावा यावर मार्गदर्शन केले. दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर सुरु झालेल्या या कार्यशाळेत अर्थशास्त्राच्या विचार सुरू होऊन त्या दृष्टीने सीमोल्लंघनच घडले आहे.

श्री.विवेक सावंत यांनी त्यांचा MKCL चा व्यक्तिगत व संस्थेच्या पातळीवरचा प्रवास सांगितला. सरकारी, खाजगी व सामाजिक क्षेत्रांना एकत्र घेऊन काम कसे करावे यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. यानंतर खूप समृद्ध असे प्रश्नोत्तरांचे सत्र झाले. विवेककाका व नायनांनी निर्माणींच्या जीवनात प्रत्यक्ष उभे असणार्‍या प्रश्नांना खूप सुंदर असे उत्तरे दिली.

रचनात्मक कामाबरोबरच संघर्षात्मक कामाचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न या कार्यशाळेत झाला. अण्णा हजारेंचे ज्येष्ठ सहकारी श्री. विश्वंभर चौधरी यांनी त्यांचा लवासाविरोधी संघर्ष व आण्णा हजारेंची भ्रष्टाचार विरोधी अंदोलन यावर एक सत्र घेतले. नंतरच्या प्रश्नोत्तरांमधून निर्माणींनी सध्या सुरु असणार्‍या भ्रष्टाचार मुक्ती अंदोलनात आपण सहभाग घ्यावा अशी इच्छा प्रकट केली. विश्वंभर चौधरी यांनी निर्माणच्या गटाने अण्णांशी भेटून पुढील दिशा ठरवावी असे सुचवले.

डॉ. अभय बंग यांनी (नायनांनी) व्यक्तिगत जीवन हेच राजकीय जीवन कसे असू शकते यावर सत्र घेतले. आपल्या देशासमोरच्या समस्या पाहून बऱ्याचदा हतबल व्हायला होते.  अशावेळी व्यक्ति मधील शक्तीची जाणीव करून देणारे हे सत्र होते.

या कार्यशाळेतील शैक्षणिक प्रक्रियेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सर्व निर्माणींचा व्यक्तिगत प्रवास व जडणघडण यांचे सादरीकरण. सहकाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपातील विविधता, व्यक्तिगत व सामाजिक पातळीवरील प्रगल्भता निर्माणींना अनुभवता आली.

भविष्यात निर्माणची दिशा काय असावी? या संदर्भात सर्व निर्माणी, नायना, विवेक काका व अशोक काका यांच्या उपस्थित चर्चा झाली. या चर्चेतून बर्‍याच निर्माणींनी विविध विषयांवर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्याची जबाबदारी घेतली.
 


दुष्काळावर काम करण्यासाठी फेलोशिपची घोषणा:
श्री. विकेक सावंत यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाचा अभ्यास व त्यावरती उपाय शोधण्यासाठी फेलोशिप ची घोषणा केली. ही फेलोशिप दर वर्षी १७ जणांना देता येऊ शकते. त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये या फेलोशिपच्या माध्यमाने तेथील पाणी प्रश्नावर काम करावे असे अपेक्षित आहे. यासाठी लागणारे मार्गदर्शन व साधनांची व्यवस्था MKCL कडून होईल. लवकरच या फेलोशिप चे संपूर्ण स्वरुप सर्वांना कळवण्यात येईल.


अशोक भार्गव, नायना व विश्वंभर चौधरी यांच्यासोबत निर्माणचा गट

उकल समितीची स्थापना

२३ ते २८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या निर्माणच्या वर्कशॉप मध्ये  एक खुले सत्र घेण्यात आले. त्यात सद्ध्या निर्माण प्रक्रियेमध्ये असणाऱ्या त्रुटी, निर्माणींबद्दल असणाऱ्या अंतर्गत तक्रारी ह्यावर मुक्तपणे संवाद साधण्यात आला. एखादी प्रक्रिया जेव्हा वाढू लागते तेव्हा तिच्यात नकळतपणे गुंतागुंत होण्याची शक्यता असते. ताकद लावून गुंता सोडवण्याचा प्रयत्न केल्यास गुंता वाढतच जातो. आपल्या ध्येयावरील लक्ष विचलीत होऊन ते गुंत्यामध्येच अडकून जाते. अशा वेळी गुंत्याची उकल करण्यासाठी  नाजूकपणे हाताळण्याची गरज असते. ह्यातूनच, निर्माणची एक उकल समिती असावी ही संकल्पना समोर आली.

निर्माण शिक्षणप्रक्रिया स्थापन होऊन आता ६ वर्ष झाली असून ३५० निर्माणी शिबिरांच्या प्रक्रियेतून गेले आहेत. तसेच निर्माण ५ चे १५० निर्माणी पुढल्यावर्षी येऊ घातले आहेत. ह्या शिक्षणप्रक्रियेच्या कामाला एक निश्चित संरचना देण्याची गरज आता जाणवू लागली आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून निर्माण उकल समिती स्थापन करण्याचे वर्कशॉपमध्ये ठरवण्यात आले. त्यातील सदस्यांची निवड वर्कशॉप मध्ये सहभागी झालेल्या निर्माणींनी एकमताने केली. 

निर्माणींना प्रक्रियेविषयी किंवा इतर निर्माणींसोबत मतभेद (निर्माणच्या कक्षेतील) असतील तर ते खालील टप्प्यांमध्ये सोडवता येऊ शकतात.
१.    मतभेद असणाऱ्या निर्माणींनी संवाद साधून
२.    वरील मार्गाने स्वतःहून संवाद साधण्यास अडचण येत असेल तर उकल समितीतील सदस्य संवादपूल बनून मदत करतील.

पहिल्या वर्षी निर्माण उकल समितीचे सदस्य खालीलप्रमाणे आहेत –
१.    वेंकी अय्यर
२.    कल्याण टांकसाळे
३.    प्रियदर्श तुरे (सोनू)
४.    चारुता गोखले
५.    अतुल गायकवाड
६.    सायली तामणे

संतोष गर्जेच्या सहारा अनाथालयाला युथ क्रांती अवॉर्ड व फेलोशिपनिर्माण ३ चा संतोष गर्जे गेली अनेक वर्षे गेवराई येथे त्याच्या आई फौंडेशन तर्फे एक अनाथाश्रम चालवत आहे. त्याच्या अथक प्रयत्नांची दखल घेऊन, इंदिरा ग्रुप औफ इन्सटिट्यूट्स तर्फे दिल्या जाणाऱ्या युथ क्रांती अवॉर्ड व फेलोशिपचा तो मानकरी ठरला आहे. ४ ऑक्टोबर २०१२ ला हा सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. हा पुरस्कार निलीमा मिश्रा ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सव्वा लाख रुपये व मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

संतोषला त्याच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

दोन निर्माणी डॉक्टरांनी घडवला प्राथमिक आरोग्य केंद्रांचा जीर्णोद्धार

डॉ. रामानंद जाधव
उण्यापुऱ्या ७ महिन्यांत मिळाली लोकांची पावतीगडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे निर्माणचे डॉ. शिवप्रसाद थोरवे (प्राथमिक आरोग्य केंद्र, पेंढरी) व डॉ. रामानंद जाधव (प्राथमिक आरोग्य पथक, जाराबंडी) यांच्या कामाला रुग्णांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. शिवप्रसाद थोरवे
आलेला रुग्ण परत जावू नये म्हणून डॉ.  शिवप्रसाद याने रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध असण्यावर व औषधांचा साठा अद्ययावत ठेवण्यावर भर दिला. तसेच त्याने उपलब्ध सोयीसुविधांमध्ये सतत सुधारणा करण्याचा धडाका लावला. Operation theatre दुरुस्त करणे, आरोग्य केंद्रात विजेचा अखंडित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी inverter बसवणे येथपासून बंद पडलेली उपकेंद्रे सुरू करणे, उपकेंद्रांवर नर्स उपलब्ध राहतील याची काळजी घेणे, सुरक्षित बाळंतपणासाठी त्यांना साधनसामुग्री पुरवणे, आशांच्या मानधनाचा अनुशेष भरून काढणे अशी प्रशासकीय कामेही त्याने सांभाळली. त्याचा परिणाम होऊन एप्रिल महिन्यात दवाखान्यात भेट देणाऱ्या रुग्णांची संख्येमध्ये ३५५ वरून वाढ होऊन ऑक्टोबर महिन्यात ती १२४५ वर पोहोचली आहे.

डॉ. रामानंदच्या प्रयत्नांमुळे पूर्वी अनियमितपणे चालणारा बाह्य रुग्ण विभाग रोज नियमितपणे सुरू झाला आहे. दवाखान्याच्या ठरलेल्या वेळेत रुग्णांनी येण्याची अपेक्षा न ठेवता रुग्ण येतील तीच दवाखान्याची वेळ असा मूलगामी बदल त्याने घडवून आणला आहे. रुग्णांना दवाखान्यात यावेसे वाटावे म्हणून दवाखान्याची स्वच्छता, औषधे तसेच इंजेक्शनचा साठा अद्ययावत ठेवण्याकडे त्याने विशेष लक्ष दिले आहे. वेळप्रसंगी चालक नसताना स्वतः गाडी चालवून गडचिरोलीतून औषधे आणली आहेत. त्याच्या प्रयत्नांचा परिपाक म्हणून दवाखान्यात भेट देणाऱ्या रुग्णांची संख्या एप्रिल महिन्यात १७८ वरून ऑक्टोबर महिन्यात १०१६ पर्यंत वाढली आहे.

कठीण परिस्थितीतही स्वतःच्या अडचणींऐवजी रुग्णाला केंद्रस्थानी ठेवले तर मोठा परिणाम होतो याचे हे तरुण डॉक्टर्स उत्तम उदाहरण आहेत.

जेथे कमी तेथे आम्ही: सोलापूर निर्माणचा चिंचोलीवासीयांना दिलासा

दुर्गम गावात शिबिराद्वारे पोहोचवल्या आरोग्य सेवा व सरकारी योजना

अजूनही एस.टी. पोचली नाही असे निर्माण ४ च्या चिंतामणी पवार याचे चिंचोली भोसे गाव. सोलापूर निर्माण गटाच्या मदतीने या गावात लोकांची आरोग्य तपासणी, गावातील गुरांची तपासणी, गावातील विविध घटकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवणे ही उद्दिष्टे समोर ठेवून एक दिवसीय साकल्यवादी शिबीर घेण्यात आले.

या शिबिरात गावातील दाई, आशा यांच्या मदतीने बाबासाहेब देशमुख, तृप्ती कल्याणशेट्टी, नेहा काळे, धनश्री बागल व श्रद्धा कोलेवाड या डॉक्टरांनी मिळून तब्बल २०० गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. सर्व महिलांचे Hemoglobin तपासण्यात आलं. आवश्यकतेनुसार मलेरिया, HIV अशा तपासण्या करण्यात आल्या. डोळ्याच्या प्राथमिक तपासण्या करून मोतीबिंदूच्या संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. शिबिरात चिंतामणीने स्वखर्चाने लोकांना औषधे उपलब्ध करून दिली. निर्माण ५ चा सारंग देसाई याने गावातील जनावरांची तपासणी केली. जनावरांचे शेण तसेच त्यांच्यावरील गोचीड्या यांच्या नमुन्यावरून तो जनावारांमधील रोग व अनुवांशिक दोष यांचे निदान करणार आहे.

याच शिबिरात गावातील लोकांची नावे मतदार यादीत नोंदवण्यात आली. आधार कार्ड तसेच पॅन कार्ड यांच्यासाठी अर्ज करण्याचीही सोय करण्यात आली. या शिबिराच्या निमित्ताने गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, निराधार वृद्धांना आर्थिक मदत, सर्वसामान्यांचा विमा अशा अनेक सरकारी योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळवून देण्यात चिंतामणी व सहकाऱ्यांना ला यश आले.
अनेक समस्या असणारे एखादे गाव आणि त्या समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती व कौशल्ये असणारा एक उत्साही गट इतक्या भांडवलावर एक रचनात्मक कृती कशी उभी करावी याचा आदर्श सोलापूर गटाने आपल्या निर्माणी मित्रांसाठी घालून दिला आहे.


रेखा देवकुळेच्या प्रयत्नांनी अनाथ चिमुकल्यांच्या जीवनात हसूसोलापूर जिल्ह्यातील बी बी दारफळ गावची रेखा देवकुळे (निर्माण ४) हिच्या प्रयत्नांतून तिच्याच वस्तीतल्या ४ चिमुकल्या अनाथ मुलांना हक्काचा निवारा मिळाला आहे. गोपाळ समाजातील या मुलांच्या आई-वडीलांचा मृत्यू काही महिन्यांपूर्वी दारूच्या व्यसनापायी झाला. खेळ करून उपजीविका करणाऱ्या या समाजात दारू पिण्याचे पुष्कळच प्रमाण आहे. ताप आला तरी देवाचे नाव घेऊन दारू पिण्याची रीत आहे. आईवडील जिवंत असताना खेळ करणे, लोकांकडून पैसे व जेवण मागून आणणे, त्याच पैशांची दारू आणून आई-वडीलांना देणे असे या मुलांचे जीवन होते. हळूहळू २ नंबरच्या मुलीलाही दारूची सवय लागण्यास सुरुवात झाली होती. पालकांना वारंवार सांगूनही त्यांनी रेखाकडे दुर्लक्ष केले. मात्र आईवडील गेल्यानंतर मुलांशी जवळीक साधण्यास रेखाने सुरुवात केली. त्यांना घरी बोलावणे, पाटी-पेन्सिल देऊन शिकवणे, जेवण देणे अशा कृतीतून तिने मुलांचा विश्वास संपादन केला. पुढे कुत्रा चावल्यानंतर छोट्या मुलाला जेव्हा जिल्हा रुग्णालयात नेण्याची वेळ आली, तेव्हा तिच्या लक्षात आलं की ही मुलं जगात असण्याची कोणतीही नोंद सरकार दरबारी नाही. रेखाने त्यांचा जन्मदाखला तसेच रेशन कार्ड बनवून घेतले. स्वतःच्या मोजक्या कमाईवर मुलांना सांभाळणे शक्य नसल्याने तिने मुलांना सांभाळू शकेल अशा निवासी शाळेत घातलं. मात्र मुलांची अस्वच्छता व आजारपण यामुळे तिला मुलांना परत नेण्यास सांगण्यात आले. दरम्यान तिला सोलापूर निर्माण गटाची भावनिक व आर्थिक पातळीवर खूप मदत झाली. निर्माणच्या डॉक्टरांनीही मुलांना वेळच्या वेळी आरोग्य सेवा मिळतील याची काळजी घेतली. सध्या या मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी पंढरपूरच्या एका बालकाश्रमाने घेतली आहे. दर रविवारी रेखा तिथे जाऊन मुलांचे केस धुणे, नखं कापणे, स्वच्छता याकडे लक्ष देत असते.

आपल्या सर्वांच्या भोवती व्यसन, अस्वच्छता, रोग यांचा चिखल असतो. मात्र स्वतःच्या अंगावर चिखल उडण्याची खात्री असतानाही रेखाने चिखलात पाय टाकण्याचे धाडस दाखवलंय. रेखाच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी आणि तिच्या मदतीसाठी जरूर संपर्क साधा.

मराठा साहित्य संमेलनात शरद आष्टेकरची ७२ हजारांची पुस्तकविक्री

चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसीय मराठा साहित्य संमेलनात निर्माणच्या शरद आष्टेकरने मराठी पुस्तकांचे प्रदर्शन मांडले होते. ह्या प्रदर्शनात त्याने सुमारे ७२ हजार रुपयांची पुस्तकविक्री केली. संमेलनाध्यक्षपदी श्री. बाबा भांड होते. प्रदर्शनामध्ये पुस्तके खरेदी करण्यात तरुण वर्ग आणि महिला आघाडीवर होत्या. या प्रदर्शनामुळे चंद्रपूरमधील काही शाळांकडून त्याला पुस्तकांच्या ऑर्डर मिळाल्या तसेच नवीन ग्राहक जुळण्यासही मदत झाली. चंद्रपूरमध्ये व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने शरदला या प्रदर्शनाचा नक्कीच फायदा होईल.

तीन महिन्यांपूर्वी त्यानेच सुरु केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्यावाहिल्या ग्रंथदालनला गडचिरोलीवासीयांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. गेल्या तीन महिन्यात त्याने तब्बल दोन लाख रुपयांची पुस्तकविक्री केली आहे. शरदच्या या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!!

Butterfly effect: स्थानिक लढाईचे मंत्रालयात पडसाद

निर्माणच्या नवख्या डॉक्टरने दिले प्रस्थापितांच्या गैरव्यवहाराला आव्हान


(टीप: ही लढाई लढणाऱ्या निर्माणीच्या सूचनेनुसार नाव व स्थळ यांचा उल्लेख टाळला आहे. सोयीसाठी या तरुण निर्माणी डॉक्टरला आपण ‘अ’ म्हणू. त्याला मदत करणाऱ्या निर्माणच्या ज्येष्ठ सहकाऱ्याला ‘ब’ म्हणू, तर या घटनेतील भ्रष्ट वैद्यकीय अधिकाऱ्याला ‘क्ष’ म्हणू.)

‘अ’ हा निर्माणी डॉक्टर महाराष्ट्रातील एका मागासलेल्या भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू आहे. या आरोग्यकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. ‘क्ष’ यांची २६ जुलै रोजी निवड झाली. मात्र डॉ. ‘क्ष’ कागदोपत्री रुजू असूनही १२ ऑगस्ट पर्यंत आपल्या पथकात न फिरकल्यामुळे गावच्या पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्याकडे तक्रार केली. ही तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी डॉ. ’अ’लाच डॉ. ‘क्ष’ यांच्या पथकात पूर्ण वेळ काम करण्याचे आदेश दिले. मात्र स्वतःच्या केंद्राची जबाबदारी असल्यामुळे डॉ. ‘अ’ने पथकाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.

दरम्यान ‘ब’च्या सल्ल्यानुसार डॉ. ‘अ’ ने डॉ. ’क्ष’ आपल्या पथकात सेवा देतात का याची चौकशी सुरू केली. सरपंच-उपसरपंच यांनी ‘हो’ अशी ग्वाही दिली तर गावच्या पोलिसांनी व आश्रमशाळेने स्पष्टपणे ‘नाही’ म्हणून सांगितले. डॉ. ‘अ’ च्या मनात शंकेची पाल चुकचुकल्यामुळे त्याने गावकऱ्यांकडे विचारपूस केली असता डॉ. ‘क्ष’ हे पथकात फिरकत नाहीत हे स्पष्ट झालं. तक्रार करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे गेले असता असं लक्षात आलं की तोपर्यंत साक्षात डॉ. ‘क्ष’ हेच तालुका आरोग्य अधिकारी बनले आहेत.

आपल्या पथकाची जबाबदारी ३ वर्षे सांभाळणे अनिवार्य असूनही राजकीय ताकद पणाला लावून डॉ. ‘क्ष’ यांनी ही नियुक्ती करून घेतली हे स्पष्ट झाले. या नियुक्तीविरुद्ध डॉ. ‘अ’ व ‘ब’ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार केली. याची कुणकुण लागताच डॉ. ‘क्ष’ यांनी “’डॉ. ‘क्ष’ यांची नियुक्ती रद्द केल्यास तीव्र जनआंदोलन’ अशा आशयाची बातमी छापून आणली. ही बातमी छापणाऱ्या पत्रकाराला भेटून ‘ब’ यांनी ही नियुक्ती कशी बेकायदेशीर आहे हे नियमांनुसार दाखवून दिले. सत्य समजताच त्या पत्रकारानेही या नियुक्तीविरुद्ध आवाज उठला. इतर वृत्तपत्रांनीही सुरात सूर मिसळला. बातमी पूर्ण महाराष्ट्रात गाजली. तातडीने मंत्रालयातून डॉ. ‘क्ष’ यांची तालुका आरोग्य अधिकारी या पदावरून नियुक्ती रद्द करून त्यांना आपल्या पथकाची जबाबदारी तत्परतेने स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महाराष्ट्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत गरज असल्यामुळे इथून पुढे तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या पदी केवळ प्रशासकीय अधिकाऱ्याचीच नियुक्ती व्हावी असा महत्त्वाचा नियम बनवण्यात आला.

गल्ली असो वा दिल्ली, गैरव्यवहार सर्वत्रच घडत असतात. बऱ्याचदा अतिपरिचयादवज्ञा या न्यायाने आपण दुर्लक्षही करतो. परंतु डॉ. ‘अ’ व ‘ब’ यांनी दाखवून दिले आहे की गल्लीतली लढाईसुद्धा दिल्लीचे तख्त हलवू शकते आणि या लढाईचा फायदा गल्लीपुरता मर्यादित न राहता सर्वव्यापी होतो.

असेही साजरे करता येऊ शकतात उत्सव

गौरव तोडकरच्या प्रयोगाला प्रचंड प्रतिसाद

अभियांत्रिकी महाविद्यालयांत शिकणाऱ्या आणि संगीत-नाट्य-वक्तृत्व कलेत पारंगत तसेच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा व आवड असणाऱ्या युवकांचा एक गट निर्माण ४ च्या गौरव तोडकरने एकत्र जमवला आहे. या गटाने गणेशोत्सवात समाज व आपण, टिळकांनी गणेशोत्सव का सुरु केले, त्यात आज घडणारे गैरप्रकार यावर आधारित संगीत नाट्य मुंबईतील वाशी, काजूपाडा, कुर्ला येथील गणेश मंडळात सादर केले. या सर्व प्रयोगांना भरघोस प्रतिसाद मिळाल्याने दुर्गादेवी उत्सवात देखील त्यांनी याच प्रकारचे कार्यक्रम करायचे ठरवले. स्त्री व तिचा संघर्ष, जन्म व आई होईपर्यंत तिचा प्रवास या गटाने गाणे व नाट्यस्वरुपात सादर केला. हे पथक पार रत्नागिरीपर्यंत जाऊन आले. गौरव तोडकरने यात गाणी बसवणे, थीम ठरवणे, सार्वमत जाणून त्यानुसार काम करणे तर कधी थोडी कडक भूमिका घेऊन रिहर्सल करून घेणे, सर्व management पाहणे अशा प्रकाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

राजू भडकेचे प्रथम संस्थेसोबत काम सुरूनिर्माण १ चा राजू भडके हा आता प्रथम संस्थेच्या मुंबई कार्यालयात रूजू झाला आहे. प्रथममध्ये राजू   सध्या ‘Read India’ व ‘Pratham Open School’ ह्या दोन प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे.

ह्यातील Read India  प्रकल्पांतर्गत निवडक जिल्ह्यांतील प्रत्येकी १०० गावांमध्ये भाषा, गणित, विज्ञान इत्यादी विषयांवर प्रथम संस्था काम करीत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक District Resource Leader असतो. त्याखाली ५ Cluster Resource Leaders व त्यांच्या बरोबर गावांमधील स्वयंसेवक असतात. Cluster Resource Leader ने गावागावात जाऊन वर्ग घेणे अपेक्षित असते. सर्व District Resource Leaders व Cluster Resource Leaders ह्यांच्या कामाचे पर्यवेक्षण व त्यांना प्रथमच्या CAMaL पद्धतीचे ट्रेनिंग देण्याचे काम State Resource Group (SRG) चे असते. राजू गणिताच्या SRG चा भाग आहे. CAMaL पद्धती मध्ये अंक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार व अपूर्णांकांचा समावेश आहे.

तसेच Pratham Open School ह्या उपक्रमांतर्गत १०वी नापास असलेल्या मुलांना १७ नंबरचा फॉर्म भरून बाहेरून बसवणे व त्यासाठी त्यांची तयारी करून घेणे ही जवाबदारी सुद्धा राजूकडे देण्यात आली आहे.