'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday 28 March 2014

पुस्तक परिचय

दुष्काळ आवडे सर्वांना – पी. साईनाथ

परवा ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पुस्तक मी वाचून पूर्ण केलं. पालागुम्मी साईनाथ यांनी लिहिलेले Everybody loves a good draught याचे हेमंत कर्णिक यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक आहे. ‘Times’ शिष्यावृत्तीसाठी केलेल्या संशोधनातून हे पुस्तक जन्माला आलं. या पुस्तकात त्यांनी भारतातील अत्यंत गरीब अशा वसाहतीत राहून, तेथील अभ्यास करून, भारतातील खरं दारिद्र्य रेखाटलं आहे. साईनाथ यांच्या ह्या पुस्तकात भारतातील गरिबात गरीब खेड्याची होत गेलेली दुर्दशा वर्णन करणाऱ्या, हलवून टाकणाऱ्या सत्यावरून कळून येते की एका छोट्याश्या चुकीचे किती दूरवर उमटणारे परिणाम असतात, ती समस्या संपूर्णपणे हाता बाहेर जाण्यापर्यंत. गरिबीकडे एक घटना म्हणून न बघता प्रक्रिया म्हणून बघणे हेचं या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकात शिक्षण, आरोग्य, राहणीमान, शेती, बालमृत्यूचे प्रमाण, कर्ज, जमीन, मालमत्ता इ.वेगवेळ्या बाजूंनी गरिबी दाखवून दिली आहे. या पुस्तकातल्या बहुतेक लेखनामध्ये भारतीय शासनाकडून झालेला आश्चर्यकारक हलगर्जीपणाच नजरेत भरतो. साईनाथ यांच्या लेखनातून वरिष्टांचा हलगर्जीपणा, कपटीपणा, काम न करण्याची प्रवृत्ती आणि अमाप भ्रष्टाचार सतत दिसत राहतात.
 मला असं वाटते की पुस्तकाला योग्यच नाव दिलेलं आहे. भारतातील गरिबीचा तसा खूप जणांचा फायदाच होतो. याच कारणाने बहुदा भारतातील गरिबी हटत नाही. जातीव्यवस्थेप्रमाणेच या गोष्टीलाही आता राजनैतिक आधार मिळतोय आणि हा हळूहळू भारतीय शासनाचा स्थायी कणाच बनत चालला आहे.
            गायीने जास्त दूध द्यावे म्हणून दूरवरून आणलेल्या जर्सी रेत वापरून गायीला फलवणे आणि त्यासाठी स्थानिक व तेथील हवामानाला अनुकल झालेल्या बैलांचे नपुंसकीकरण करणे; गायीचा चारा उगवण्यासाठी सरकारी जमीन, पण शेतकऱ्यांना अन्न पिकवायला जमीन नसणे; कागदोपत्री असणाऱ्या शाळेत मुलांऐवजी शेळ्या-बकऱ्या बसलेल्या; ‘विकासा’च्या नावाखाली चीकापर गावच्या आदिवासींचे तीनदा झालेले विस्थापन; अशी अनेक चित्रे सुन्न करून जातात.
पण साईनाथ यांच्या लेखांमध्ये फ़क़्त दुःख आणि कष्ट यांचेच वर्णन नव्हे, तर एक आशावादही आहे: आशावाद हा की भारतातील गरीब अन्यायाविरुद्ध लढा द्यायला शिकला आहे, स्वतःची प्रतिष्ठा जपायला शिकला आहे, आणि समस्यांना तोंड देत स्वतःची वाट काढून जगण्यासाठी मोकळा श्वास घेतो आहे.
या पुस्तकाचा माझ्यावर बराच प्रभाव पडला आहे. एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने करायची असेल तर त्यासाठी जास्तीत जास्त विचार विनिमय करणे आवश्यक असते; इतिहासाबद्दल जागरूक असले की मागे झालेल्या चुका पुन्हा होत नाहीत; सखोल अभ्यासाचे महत्त्व; कल्पनेतल्या आणि प्रत्यक्षातल्या कामांत राहणाऱ्या फरकाचा अंदाज घेऊन काम करावे; ज्यांच्यासोबत आपण काम करतो ते लोक आणि त्यांचे होणारे फायदे वा नुकसान यांचे भान ठेवावे; अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
या पुस्तकाद्वारे मी लेखकाबरोबर जास्तीत जास्त गरीब जिल्ह्यांपर्यंत पोहोचू शकले, आणि मला अजपर्यंत माहित नसलेल्या गोष्टी समजावून घेवू शकले.

रश्मी गायकवाड, rashmi4690@gmail.com

Saturday 8 March 2014

चॉकलेटचे पार्सल – ८ (मार्च २०१४)

या चॉकलेट पार्सल मध्ये:
नुकत्याच झालेल्या निर्माण ५.३ब शिबिरात अनेक तरुण डॉक्टरांनी खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचे ठरवले. पण खेड्यात का जायचे? तिथे सुरुवात कशी करायची? लोकांच्यात मिसळायचे कसे? कोणती पथ्ये पाळायची? स्वतःच्या अनुभवांतून विनोबांनी लिहिलेले हे विचार...
सध्या देशात निवडणुकीचे वारं वाहत आहे. डॉ. अभय बंग यांनी आजच्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करणारी मुलाखत निखिल वागळे यांना दिली होती. ही मुलाखत ‘अनुभव’ मासिकाच्या फेब्रुवारी २०१४च्या अंकात प्रसिद्ध झाली होती.
बाजारपेठेत मिळणाऱ्या वस्तूंमध्ये औषध ही बहुधा सर्वांत जास्त जीवनावश्यक बाब आहे. कारण जीवन व मरण यांतील अंतर फक्त एक गोळी किंवा इंजेक्शनएवढे असू शकते. औषध ही अशी एकमेव क्रयवस्तू आहे जिच्याविषयीचा निर्णय ग्राहक स्वतः घेत नाही; या निर्णयाचा अधिकार आपण स्वतःहून तज्ञांच्या, डॉक्टरांच्या हाती सोपवला आहे. डॉक्टरांना रुग्णाची काळजी असली तरी औषधांचे पैसे डॉक्टरांच्या खिशातून जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. औषधांसाठी आपण खर्चिलेल्या प्रत्येक रुपयात औषध-निर्मिती कंपनी, तिचे वैद्यकीय प्रतिनिधी, औषध वितरक, किरकोळ विक्रेते व सरकार या सर्वांचा वाटा असतो. डॉक्टरांचा त्यात प्रत्यक्ष वाटा नसला, तरी आपली औषधे खपवण्यासाठी औषध कंपन्या डॉक्टरांना त्यांच्या विद्यार्थीदशेपासून खूष ठेवतात, हे सर्वविदित आहे.
भारतात ख्रिस्ती मिशनरी म्हणून आलेले वेरीअर एल्विन यांनी महात्मा गांधींसोबत काम करण्यासाठी मिशनरीचे काम सोडून दिले. मध्य भारतातील बैगास आणि गोंड आदिवासींसोबत त्यांनी काम केले. एका आदिवासी मुलीसोबत त्यांनी लग्नही केले. आदिवासी जीवनशैली आणि संस्कृती यावर अधिकारवाणीने बोलू शकेल अशा खूप कमी व्यक्तींपैकी ते एक होते. आदिवासी भागांत काम करताना आलेल्या अनुभवांबद्दल त्यांनी अतिशय मार्मिक शैलीत पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांच्या Leaves from the jungle: Life in a Gond village या पुस्तकाचा वैभव आगवणे याने परिचय देखील करून दिला होता. आपल्या जीवनावर एल्विन यांचा खूप प्रभाव असणाऱ्या रामचंद्र गुहांनी एल्विन यांच्याबद्दल लिहिलेला लेख...

पाश्चात्त्य भांडवलशाही ध्यान, योगासने इ. पौर्वात्य आध्यात्मिक संकल्पनांचा आधार घेताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे, मग तो google च्या कर्मचाऱ्यांसाठी असणारा ‘search inside yourself’ हा कोर्स असो किंवा EBay, Twitter, Facebook या कंपन्यांचे इतर उपक्रम असो. याचा त्यांना काही फायदा होतो का? सतत ताणतणाव आणि प्रलोभनांचा सामना करता करता थोडा वेळ शांतपणे विश्रांती घेतली तर फायदा होईल असे मानणे अवाजवी नक्कीच ठरणार नाही. मात्र ज्या आजारांचा सामना करायचा, त्याच आजाराचा हे उपाय भाग होत आहेत. ‘स्पर्धेत टिकण्यासाठी, rat race मध्ये पुढे जाण्यासाठी ध्यान करणे’ असे या उपायांचे स्वरूप दिसत आहे. पौर्वात्य आध्यात्मिकतेचा पाश्चिमात्य भांडवलशाहीवर प्रभाव पडण्याऐवजी उलटे होताना दिसत आहे. Economist मधील हा लेख

ग्रामसेवेबाबत काही विचार – विनोबा






भारतात लोकशाहीचा उषःकाल सुरू झाला आहे – डॉ. अभय बंग








औषधे : अर्थ, व्यर्थ आणि अनर्थ – प्रा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

‘औषधे : अर्थ, व्यर्थ आणि अनर्थ’ हा लेख ‘अंतर्नाद’ मासिकाच्या सप्टेंबर २०१०च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. हा लेख वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल प्रा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचे आभार.










वेरियर एल्विन यांच्या स्मृतींत रमताना... – रामचंद्र गुहा

‘वेरियर एल्विन यांच्या स्मृतींत रमताना...’ हा लेख साप्ताहिक ‘साधना’च्या ८ मार्च २०१४च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. हा लेख वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल ‘साधने’चे संपादक श्री. विनोद शिरसाट यांचे आभार.


The mindfulness business

पाश्चात्य भांडवलशाही ध्यान, योगासने इ. पौर्वात्य आध्यात्मिक संकल्पनांचा आधार घेताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे, मग तो google च्या कर्मचाऱ्यांसाठी असणारा ‘search inside yourself’ हा कोर्स असो किंवा EBay, Twitter, Facebook या कंपन्यांचे इतर उपक्रम असो. याचा त्यांना काही फायदा होतो का? सतत ताणतणाव आणि प्रलोभनांचा सामना करता करता थोडा वेळ शांतपणे विश्रांती घेतली तर फायदा होईल असे मानणे अवाजवी नक्कीच ठरणार नाही. मात्र ज्या आजारांचा सामना करायचा, त्याच आजाराचा हे उपाय भाग होत आहेत. ‘स्पर्धेत टिकण्यासाठी, rat race मध्ये पुढे जाण्यासाठी ध्यान करणे’ असे या उपायांचे स्वरूप दिसत आहे. पौर्वात्य आध्यात्मिकतेचा पाश्चिमात्य भांडवलशाहीवर प्रभाव पडण्याऐवजी उलटे होताना दिसत आहे. Economist मधील हा लेख: